मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मधुरोत्सव… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

☆ मधुरोत्सव… ☆ श्री मनोज मेहता 

आपल्या हिंदू धर्मात व्रत-वैकल्य करायला वर्षभर वेगवेगळे सण येतात, त्यांच्या वेगळेपणाने सर्वांना मजाही येते.

सौ. मधुरा मनोज मेहता गेली २७ वर्षे अनेक आजारांशी झगडतेच आहे. प्रत्येकवेळी ती हसत – हसत त्यातून बाहेर पडते, हे तिचं कसबच म्हणावं लागेल. मधुराची नक्की मणक्याचीच शस्त्रक्रिया झाली की मेंदूची ? कारण २०१७ च्या मोठया शस्त्रक्रियेनंतर काही वेगळीच ऊर्जा तिला मिळाली की काय ? असा प्रश्न पडलाय मला !  

व्यक्तिगत पत्र-लेखनाने याची सुरुवात झाली. मग हळूहळू ती कविता व चारोळ्याही करू लागली. अनोख्या पाककलेची तर ती सॉल्लिड, खिलाडी होतीच, आता तर अष्टपैलूच झाली. लॉकडाऊन पासून तर तीची गाडी सुसाटच सुटली आहे, अन् वेगवेगळे पदार्थ करून त्याचे फोटो काढायची मला सरळ अहो ऑर्डरच द्यायची आणि माझ्या पोटोबालाही ती जणू खुराकच देत आलीय. असो…

श्रावण महिना हा अनेक सणांची नांदी घेऊन येतो. आमच्या अमेरिकेत असलेल्या मुलीचे १ मे २०२१ ला virtual लग्न अमेरिकेत झाले. कोविडमुळे आम्ही जाऊ शकलो नाही, तिचा पंचमीचा सणही करू शकत नाही. त्यासाठी काही हटके  करायचं, सौ. मधुरानं ठरवलं. 

ती श्रावण महिन्यात रोज एका सवाष्णीला फोन करून संवाद साधत होती. त्यात तिच्या बहिणी, आई, मैत्रिणी, आमच्या दोनही मुली व माझ्या मित्रांच्या सौ. ही आल्या.

यावर्षी नवरात्रीला तर मधुराने कमालच केली. घटस्थापनेच्या दिवशी घरच्या देवीची ओटी भरून झाल्यावर, सकाळी व्हाटस्अपवर रोज त्या त्या देवीची माहिती सौ. मधुरा स्वतःच्या आवाजात म्हणून तिच्या निरनिराळ्या ६०/७० मैत्रिणींना पाठवत होती. नंतर दिवसभरात रोज नऊ मैत्रिणींना, त्यात २७ वर्षांपासून ते ८७ वर्षांच्या आजींपर्यंत फोनवरून संवाद साधत होती. प्रत्येकीशी संवाद साधत असताना, तिला त्यांचा चेहरा दिसत नसला, तरी दोघींच्या संवादातून होणारा आनंद, मी कधी – कधी हळूच अनुभवत होतो.

या नऊ दिवसात आमच्या घरी येणाऱ्या सौभाग्यवतीची ओटी भरायची. या वर्षी, नवमीच्या दिवशी उद्यापन रस्त्यावर कचरा गोळा करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, ज्या आपल्या संसाराला हातभार लावून तो टिकवण्यासाठी धडपडत असतात, त्यांना वाण देऊन, आनंदोत्सव साजरा करताना मधुराचा चेहरा काय फुलून गेला होता ना, त्याला तोड नाही ! मनांत म्हटलं देवानू, माझ्या मधुराला अशीच कायम आनंदी ठेवा रे !

“आजची तरूण पिढी ऑनलाईन कामात किंवा कामावर असूनही व्यग्र असलेल्या, तर ज्येष्ठ मंडळी घरात कोणी एकटे अथवा आपल्या कुटुंबासह असायचे, अशावेळी सर्वांच्या वेळा सांभाळून, घरातील ज्येष्ठ व तरुण सौभाग्यवतींना सौ. मधुराचा अवचित आलेला फोन हा नक्कीच त्यांना आनंदून गेला असेल. तिला प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नसल्याने स्वतः फोन करून सर्वच पिढ्यांशी तिने संवादाचा सेतू बांधला. नाहीतरी आपले ‘सण-उत्सव’ साजरे करण्यामागे हाच तर हेतू आहे ना !

सर्व सौभाग्यवती मैत्रिणींना फोन करणे शक्य नाही, पण पुढच्या वेळी नक्की हं, असं मला हळूच कानात सांगितलं हो… 

असा अनोखा व भन्नाट उपक्रम तिच्या कल्पनेतून आज साकार झाला, म्हणून तिच्यासाठी खास सप्रेम…

खरं तर देव माणसातच आहे, तो शोधण्याच्या तिच्या या अफलातून आयडियेच्या कल्पनेला मनापासून सलाम !

“…हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे, हीच अमुची प्रार्थना…

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ अन्न सोहळा… लेखक : श्री सतीश बर्वे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे 

त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिक देखील होता त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरु होणं गरजेचं होतं.

दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे  टपरीवजा छोटंसं हाॅटेल दिसलं  मला. बुडत्याला काडीचा आधार तसं उपासमार होणार नाही इतपत समाधान मला होते. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो.

टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरी बाहेर पडत होती. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं.

आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला, “काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव. गरमागरम मिळेल सगळं.” हे ऐकून माझ्या जीवात जीव आला.

साहेब तुम्ही तिथे टेबल खुर्ची ठेवली आहे तिथे बसा. त्याने बोटाने दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो. आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहवून मी खुर्चीवरून उठून तिथे पोहोचलो.

“काय झालं साहेब?” तो मघाचाच मुलगा पुढे येत मला विचारु लागला. 

“ही डाळभात खाणारी माणसे कोण आहेत?” 

“ते माझा बा तुम्हाला सांगेल” असं म्हणून त्या मुलाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितले.

एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, “राम राम साहेब. तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं तो अन्न सोहळा रोज इथे सकाळ संध्याकाळ सुरू असतो. 

“ ए आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरं.” त्याने टपरीच्या दिशेने आवाज दिला. आतून आलेल्या खुर्चीवर आम्ही दोघे बसलो आणि तो माणूस सांगायला लागला.

” माझा जन्म इथूनच आत ४-५ किलोमीटर वर असलेल्या गावात झाला. माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी चार घास दिले तर ते खायचो. नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो. 

माझ्या बा ला ह्या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्याने मला गावातून उचलून इथे आणला. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढे पुढे किचनचं काम शिकून घेतले. माझ्या हाताला चव होती. सुरवातीला फक्त भजी आणि चहा विकणारा आबा नंतर मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव, नेसकाॅफी ठेवायला लागला. 

इथे आसपास खाणीत आणि उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथे यायला लागले. टपरी चोवीस तास उघडी असायची. 

बा ला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लग्न लावून दिलं त्यानं. बाने खुप गरीबी आणि उपासमारी बघितली. चांगले दिवस आल्यावर त्याने हा अन्न सोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे गरिबांना डाळभात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बा ने शिकवलंय मला.

‘आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बा ने शिकवलं मला. असं केल्याने आपण काही मरत नाही पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते’ असं समजावून सांगायचा मला तो. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतले त्यांनी हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवण्याचं. 

आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवत आहोत.

बा म्हणायचा ‘नुसतं गोणीभर जमवून काही उपयोग नसतो. तर त्या पैशातून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष्य असतं सगळ्यांकडे. आपण गरिबांना जमेल तेवढे सुखी ठेवलं की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गोणी भरत गेलो की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोहोचतो ते आपल्याला कळत नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो.’ 

बा शिकला नव्हता. पण जगण्याच्या शाळेचा तो मास्तर मात्र होता. त्याने सुरू केलेला हा अन्न सोहळा जीवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्या नंतर माझा मुलगा…. नंतर माझा नातू…..

गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागल्या तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या.

“साहेब हे काय?”

“अरे माझ्या कडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तु मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते ज्याला उद्या काय होणार ह्याची चिंता सतावत असते. 

हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच देवा जवळ प्रार्थना मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा वेळ आलीच ह्या सोहळ्यात खंड पडण्याची तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्यासोबत जमेल तेवढा हातभार लावायला.”

त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत गाडीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

लेखक : श्री सतीश बर्वे

लेखक – श्री संदीप काळे

मो. 9890098868

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रत्यक्ष अनुभवलेले एक थरारनाट्य” ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ “प्रत्यक्ष अनुभवलेले एक थरारनाट्य” ☆  सुश्री सुलू साबणे जोशी

आपल्या घराघरात आणि मनामनात चंदनाला एक अढळपद आहे. आमच्या गृहसंकुलात आपोआप उगवून आलेली चंदनाची झाडे आहेत. या भागात पक्षी खूप आहेत, बहुधा त्यांच्या शिटातून हे बीजारोपण झाले असावे.

चंदन हे नेहमी मोठ्या वृक्षांच्या जवळच जोमाने वाढते, कारण त्याचे अंशिक परावलंबित्व ! हा अर्धपरोपजीवी वृक्ष समजला जातो, कारण हा वृक्ष स्वतःचे अन्न पूर्णपणे तयार करू शकत नाही. तेव्हा तो दुस-या वनस्पतींच्या मुळांतून आपल्या मुळांच्या सहाय्याने अन्नशोषण करतो. (उदा. त्याला डाळिंब, कढीलिंब, काळा कुडा, करंज, अशा काही यजमानवृक्षांची सोबत मानवते.)                                                                                                             

गेली वीस वर्षे अशा दोन चंदनवृक्षांचा सहवास आम्हाला लाभला. हे वृक्ष सदैव मण्याएवढ्या आकाराच्या फुला-फळांनी बहरलेले असतात. त्यावर सदैव मधमाशा असतात. ही फळे कोकीळ-कोकीळा, बुलबुल, फुलचुके, खारूताई आवडीने खातात. 

काल ११ ऑक्टोबर २०२३/ बुधवार, रात्री बाराचा सुमार – इथे प्रगाढ शांतता होती. एकाएकी खालून आलेल्या एका विचित्र कर्णकटू कर्कश्श आवाजाने एकदम धडकीच भरली. या बाजूला अधूनमधून गाड्यांचे अपघात होतात. अति वेगात येणारी दुचाकी घसरून घसटत जावी, असे काहीसे वाटले. भराभरा गच्चीचे दार उघडून खाली डोकावले आणि पायाखालची जमीनच सरकली. आवाज रस्त्यावरून नव्हे तर चक्क संकुलाच्या आतूनच येत होता – यांत्रिक करवतीने एका चंदनवृक्षाचा बुंधा कापण्याचे काम चार माणसे मन लावून करत होती. मी आत येऊन खिडकीकडे धाव घेतली आणि सुरक्षारक्षकाला हाका मारल्या, ‘चोर, चोर’ म्हणून पुकारा केला. तोवर घरातील सर्व मंडळी आणि संकुलातीलही सर्वजण या विचित्र आवाजाने जागे होऊन या आरड्याओरड्यात सामील झाले. भराभर ब-याच मंडळींनी खाली धाव घेतली. पण, त्यांनी इमारतीचे प्रवेशद्वार उघडून बाहेर येऊ नये म्हणून पाऊस पडावा तसा दगडगोट्यांचा मारा करायला सुरुवात केली. दहा मिनिटात झाडाचा बुंधा कापून खांद्यावर टाकून चौघेही शांतपणे चालत मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरून निघून गेले.

तशातही संकुलातील काही धाडसी तरूणांनी बाहेर धाव घेतली. टेकडीवरून दगडांचा मारा चालूच होता. तिथे चोरांचे चार-पाच साथीदार दडलेले असावेत. संकुलातील पाच-सहाजण दगडांच्या मा-याने रक्तबंबाळ झाले. सुरक्षारक्षकाने हाकेला ‘ओ ‘ का दिली नाही, तर त्याच्या गळ्याला सुरा लावून त्याला दोघा चोरांनी दाबून धरले होते आणि मारहाण करून जखमी केले होते. काही सदस्यांनी गाड्या काढून या सर्वांना तातडीने दवाखान्यात नेले. सुरक्षारक्षक आणि आणखी एकाला टाके घालावे लागले.   याचा अर्थ – ती  ८-१० चोरांची टोळी होती. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे संकुलाची आणि झाडाच्या जागेची माहिती काढलेली होती.                                                    

हे एक मोठे बंगला-संकुल आहे. त्यात टेकडीच्या पायथ्याला आमच्यासारखी सदनिकांची संकुले आहेत. बंगलेवाल्यांनी टेकडीवर त्यांच्या बाजूपुरती आठ फूट उंचीची संरक्षक-भिंत घातली आहे. पण आम्हा सदनिकाधारकांच्या बाजूला फक्त दीड-दोन फूट उंचीची भिंत आहे, जी आरामात ढांग टाकून ओलांडता येईल. त्यावर काटेरी कुंपण आहे. पण ते कापून ये-जा करता येईल, अशी वाट चोरांनी काढली आणि मांजरपावलांनी संकुलात येऊन झाडापर्यंत पोहोचले. टेकडीवर चार चोर दगडगोटे, गलोल घेऊन दबून बसले होते, दोन चोरांनी सुरक्षारक्षकाची गठडी वळली होती आणि चारजण झाड कापून आरामात चालत निघून गेले. ८-१० जण एकूण नक्कीच होते.  

हा रस्ता उताराचा आहे, आणि उताराच्या टोकाला एका विद्यमान माननीय मंत्रीमहोदयांचा बंगला आहे. तिथे एक छोटीशी पोलिसांची छावणीच आहे. हे थरारनाट्य अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात संपले. आमचा हाकांचा सपाटा ऐकून पोलीस आले, तोवर चोरांचा कारभार संपला होता. मग येथील विभागीय पोलीस येऊन पहाणी करून त्यांनी तक्रार नोंदवून घेतली.  

या विषयाने आणि चर्चेने रात्री किती तरी वेळ झोप येईना. मृत्युमुखी पडलेल्या चंदनवृक्षाने जीवाला चांगलाच चटका लावला. तेव्हा जाणीव झाली की, हा परिसर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि कुणीतरी विश्वासघाताने त्यातला एक भाग कापून काढला आहे.

थोर शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बसूंनी सप्रमाण सिद्ध केले होते की, वृक्षसंपदा सजीव आहे आणि  भावभावनांनी युक्त आहे. त्या वृक्षाच्या आणि अवतीभोवतीच्या त्याच्या सहचरांच्या मूक आक्रंदनाने मन विषण्ण होऊन गेले.  कालची काळरात्र संपली.  सकाळ झाली. नेहमीसारखे पक्ष्यांचे कलरव ऐकू येईनात. गच्चीकडे धाव घेतली – एक वेडी आशा की कालची घटना हे स्वप्न असावे. पण कुठले काय? त्या सुंदर हिरव्या विणीला भले मोठे भगदाड पडले होते आणि त्यातून भक्क आभाळ भगभगीत नजर वटारून थेट समोर ठाकले होते….

© सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लेखक येता घरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

लेखक येता घरा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 घरात कोणी पाहुणे आले की घराला आनंद होतो, घर खुश होतं असं मला वाटते ! घराचे घरपण हे माणसांमुळे असते आणि येणारा पाहुणा जर हवाहवासा वाटणारा असेल तर घर अधिकच आनंदित होतं ! तसं आज झालं !

रोजचा दिवस ” रंग उगवतीचे” सदराने आनंदमय करणारे लेखक श्री. विश्वास देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नी, सौ श्रद्धा ताई देशपांडे आज आमच्या घरी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आले. अर्थातच त्यांच्या येण्याने चैतन्यमय वातावरणात गप्पा सुरू झाल्या. नाश्त्यासाठी इडली, सांबार, चटणी, रव्याचा लाडू असा साधाच मेनू होता. सौ. श्रद्धा वहिनींचा उपवास असल्याने फळे, कॉफी वगैरे होते. पण या सर्वांपेक्षा त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकांबद्दल अधिक उत्सुकता होती. त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली 

” चांदणे शब्द फुलांचे “, “ अजूनही चांदरात आहे “ आणि “ आनंद निधान “ ही पुस्तके मी घेतली.. आता प्रत्यक्ष वाचेन तेव्हा त्यावर काही लिहिता येईल. त्यांच्या आधीच्या प्रकाशित झालेल्या “ अष्टदीप “ ह्या पुस्तकाची प्रत ही आत्ताच माझ्या हातात आली. त्यातील प्रत्येकाबद्दल माहिती असली तरी सरांच्या दृष्टिकोनातून या सर्व थोर व्यक्तींबद्दल चांगले वाचायला मिळणार आहे याची खात्री आहे.

रंग उगवतीचे सदर सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाली हे पटतच नाही ! अरेच्चा, आत्ताच तर सुरू झालं हे सदर ! हे सदर इतकं नाविन्यपूर्ण असते की रोजचा रंग नवा ! सरांना विषय तरी इतके सुचतात की, ‘ साध्या ही विषयात आशय मोठा किती आढळे !’ याचा प्रत्यय ते लेख वाचताना येतो. सरांचा आणि माझा परिचय गेल्या तीन वर्षातला ! माझ्या ” शिदोरी” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांना आमंत्रित केले आणि त्यांनी ते मान्य करून आमच्या कार्यक्रमाला शोभा आणली. अतिशय मृदू स्वभाव, सावकाश शांतपणे बोलणे, चांगली निरीक्षण शक्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. लेखनातील सच्चेपणा, साधी सरळ प्रवाही भाषा, यामुळे वाचकांशी त्यांना ‘या हृदयीचे त्या हृदयी’ असा संवाद साधता येतो. व्यक्तिचित्रण कोणतेही असो, साध्या कामगाराचे असो किंवा मोठ्या व्यक्तीचे, त्यातील बारीक-सारीक तपशीलही त्या लेखात येतात, आणि ते चित्रण मनाला भावते ! वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे, पण वाचकांचे प्रेम, आपुलकी मिळणे हा मोठा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे !

प्रथमतः मी सरांचे ” रामायण महत्त्व आणि व्यक्ती विशेष “ हे पुस्तक वाचले होते. रामायण आपणा सर्वांना परिचित आहेच, परंतु देशपांडे सरांनी ते अभ्यासपूर्ण लेखातून चांगले सादर केले आहे. त्यामुळे रावण असो वा मंदोदरी, प्रत्येक व्यक्ती-रेखा छान, वास्तव अशी लिहिली आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाविषयी मला आदर आहे. यंदा त्यांना तितीक्षा इंटरनॅशनल चा पुरस्कार मिळाला आहे. या मान्यवर लेखकाचे स्वागत करताना स्वाभाविकच मला खूप आनंद मिळाला. देशपांडे सर आणि सौ. श्रद्धा वहिनींच्या सहवासात घालवलेला हा वेळ संस्मरणीय राहील, त्याची साक्ष हा त्यांच्यासोबत काढलेला फोटो देत आहेच !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पाचवा दिवा –

ज्या महिलांना भीक मागणं सोडायचं आहे, अशा महिला माझ्याकडे काम मागत आहेत 

मी गाडगे बाबांचा भक्त आहे, गाडगेबाबांचे विचारसरणीला अनुसरून आम्ही अशा सर्व महिलांची एक टीम तयार केली आहे, या टीमला “खराटा पलटण” असं नाव दिलं आहे 

या माध्यमातून या महिन्यात पुण्यातील वेगवेगळे भाग स्वच्छ करवून घेऊन त्यांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे ..कपडे दिले आहेत ….याव्यतिरिक्त त्यांच्या इतर गरजा सुद्धा भागवल्या आहेत. ! 

आमच्या या टीमला पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियान चे ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे, यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट ! 

या सर्व आज्या आणि मावश्या झोपडपट्टी किंवा पुलाखाली राहतात. 

अशा सर्व आज्यांच्या घरी झोपडपट्टीत जाऊन आम्ही दिवा लावला आहे… म्हणुन मंदिरात यायला आम्हाला वेळच मिळाला नाही देवी…. ! 

यासाठी मी तुझी माफी मागणार नाही….  किंवा तू माफ करावंस अशी अपेक्षा सुद्धा ठेवणार नाही…. 

कारण तू हल्ली मंदिरात राहत नाहीस, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे…. आणि तू जर रोज आम्हाला रोज रस्त्यांवर दर्शन देत आहेस… तर मी कशाला येऊ मंदिरी ??? 

सहावा दिवा – 

ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होते अशा रुग्णांना, दवाखान्यात ऍडमिट करून उपचार केले. डोळे ऑपरेशन करून चष्मे दिले, दिव्यांग व्यक्तींना काठ्या कुबड्या आणि लागेल ते इतर वैद्यकिय साहित्य दिले. 

आमच्या परीने आम्ही असा नैवेद्य अर्पण केला. 

सातवा दिवा – 

हे नऊ दिवस लोक अनवाणी पायाने रस्त्यावर चालतात….! 

माझ्या भीक मागणाऱ्या समाजाचे लोक वर्षानुवर्षे, अनवाणी पायाने चटके सहन करत जगत आहेत… 

मग यांच्या पदरात अजुन पुण्य का नाही मिळाले ?  याचा विचार करत आम्ही हि प्रथा बदलली…. 

या नवरात्रात ज्यांच्या पायी चप्पल नाही, अशा सर्वांच्या पायी चप्पल घातली… ! 

माते तुला हे आवडलं नसेल, तर माझ्या तोंडात चप्पल मार, पण यांच्या पायी मात्र चप्पल राहू दे, उन्हात खूप पाय भाजतात गं…. !!!

आठवा दिवा –

ज्यांनी आयुष्यभर पोरांच्या अंगावर मायेची चादर पांघरली, परंतु आता जे रस्त्यांवर आहेत, अशा रस्त्यावरील  सर्व आई बापांना, येणारे थंडीचे दिवस लक्षात घेवून गरम शाली आणि इतर कपडे दिले आहेत. 

नववा दिवा – 

अनेक महिलांकडे अनेक प्रकारचे कला कौशल्य असते, या कला कौशल्याचा वापर करून यांना आणखी प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून वस्तू तयार करवून घेऊन आपण त्या विक्री करणार आहोत 

आणि येणारा पैसा हा सर्व त्या महिलांना जाईल, असा विचार करत आहोत. 

अनेक भिक मागणाऱ्या महिलांना यामुळे एकाच वेळी व्यवसाय उपलब्ध होईल आणि त्या त्यांची घरं चालवू शकतील….

यांना प्रशिक्षण देण्यासाठी, एका जागेची सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. परंतु आम्हाला अजून कोणतीही जागा मिळालेली नाही. 

कामाचं खूप कौतुक होतं… अवॉर्डस मिळतात … सर्टिफिकेट मिळतात…. 

परंतु अवॉर्ड आणि सर्टिफिकेट ने आपण दुसऱ्याचं पोट नाही भरू शकत बाबा,’ हे माझ्या माईनं (आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी) माझ्या कानात खूप पूर्वीच सांगितलं होतं…! 

असो….काहीतरी होईलच…  हा नववा दिवा राखून ठेवलाय, त्या प्रशिक्षणाच्या जागेसाठी …! 

पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई….परंतु पोराच्या जीवनाचा विचार करतो तो बाप…! 

मला जे दिसते ते माझ्या पोराला सुद्धा दिसावं म्हणून जमिनीवरून कडेवर उचलून घेते ती आई…! 

पण मला जे दिसतंय, त्यापलीकडचं पोराला दिसावं म्हणून, पोराला डोक्यावर उचलून घेतो तो बाप…!!

आपण सर्वजण समाज म्हणून आमची कधी आई झालात तर कधी बाप झालात…. !! 

आमच्यावर प्रेम आणि माया करतांना, तळागाळातल्या समाजाला समरसून मदत करताना, आपण सर्व सीमा ओलांडल्या…! 

आमच्यासाठी हीच विजयादशमी…. हाच दसरा…!

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ऑक्टोबर महिना…. ! अर्थात भाद्रपद अश्विन…,,!! 

या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली…. ! 

तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते…. ! 

आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी…. ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता…. !!!  

यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा…. असं नाही…. ! 

या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिची पुजा…. !!! 

आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तिच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तिच्यापुढे  जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे ही त्या आईची पूजा….! 

काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं… ही त्या आजीची पूजा… ! 

येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे…. ! मी कशासाठी आहे… ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा…. !!

अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू….  तिथं आभाळात जाऊन झेप घे…  तिथं काय अडचण आली तर मला हाक मार… मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा…. !!!

आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत… पण अक्षरशः आम्ही “नव रात्री” जगलो…. ! 

पहिला दिवा –  

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याकडेला पडलेल्या “निराधार” आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं… … यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत…. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही….! 

बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ? 

आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ?? 

…. असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत… खत पाणी घालत आहोत….

…. आम्हाला फळं नकोच आहेत. एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे….! 

दुसरा दिवा –

फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या… एक? दोन ?? तीन??? नाही… तब्बल १३४१ …!!! 

पूर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनींनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून…  पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत. 

या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल… त्यांचे समाजात कौतुक होईल आणि भीक मागणाऱ्या इतर माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.

या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे …. ज्यांच्या दहा फुटावर सुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले…

… कुठुन येतं हे…? कसं येतं…?? आणि का ??? काय मिळत असेल यांना…????

या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले…! 

तिसरा दिवा –

भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या “कुमारिकांचे” या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता. 

सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती…!

आम्ही या सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सरस्वती पूजन केले.

संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले. 

…… मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो…! 

आई आणि बापाला अजून काय हवं ? 

माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले…. आणि काय सांगू राव…. हे “ड्राय” फ्रूट अश्रुंनी “ओले” होवून गेले… !!! 

चौथा दिवा –

ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले… ! 

गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत…!!! 

घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत. 

हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, आणि आमच्यासाठी त्यादिवशीच विजयादशमी होती!!! 

— क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय लेकरा – भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ माझ्या प्रिय लेकरा — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

माझ्या प्रिय लेकरा,

(मुलांच्या मनाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था असतील तर पालकांनी तिन्ही अवस्थेत एकच प्रतिक्रिया देऊन कसे चालेल?) – इथून पुढे..

बाहेरच्या निष्ठुर जगात आई-बापाप्रमाणे मुलांला समजून घेणारे वा समजावून सांगणारे फारसे कुणी नसते. मुलांच्या चुकांना बाह्य जगात केवळ शिक्षा मिळतात. अशा शिक्षेनंतर मायेने फुंकर घालायलाही कुणी नसते. या शिक्षांमध्ये मायेचा ओलावा नसल्याने मुलांच्या मनात त्या प्रसंगांविषयी कायमस्वरूपीची कटुता निर्माण होते. पण हेच वय सर्वात जास्त संस्कारक्षम असल्याने याच वयात चांगल्या वाईटाचे धडे दिले गेलेच पाहिजेत. समाजाकडून मुलांना रुक्षपणे जगण्याचे धडे शिकायला मिळण्याऐवजी आई-बापाने कठोरपणावर मायेचा मुलामा देऊन ते मुलांना शिकवावेत. त्यामुळे मुलांच्या मनात कटुता निर्माण होत नाही. कधी चांगल्या कामाचे बक्षिस देवून, कधी समजावून सांगून आणि वेळप्रसंगी शामच्या आईसारखी मायेच्या ओलाव्याने शिक्षा करावी लागते.

श्याम म्हणजे साने गुरुजी. त्यांना लहानपणी पाण्याची फार भीती वाटे. पोहणे शिकणे का गरजेचे आहे हे आईने श्यामला समजावून सांगितले. पोहायला जायचे ठरल्यावर ऐनवेळी श्याम लपून बसला. समजावून सांगूनही शाम पोहायला जात नाही म्हटल्यावर श्यामच्या आईने त्याला फोकाने बडवून काढले. श्यामला मारताना श्यामसोबत आईच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होते. पुढे कधी चुकून लेकरू पाण्यात पडलं तर जीवाला मुकेल या धास्तीने तिने ते सर्व केले होते. तसेच पाण्याच्या भीतीने पोहायाला न शिकलेल्या आपल्या मुलाला समाजात कुणी भित्रा समजू नये म्हणून आईने अडून बसलेल्या श्यामला शिक्षा करून पोहायला धाडले. माराच्या भीतीने श्याम शेवटी पोहायला गेला. पोहून घरी आल्यावर पाठीवरील वळ दाखवत श्याम आईवर रुसून बसला. मुलाच्या पाठीवरील वळ पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. जेवत असलेली आई भरल्या ताटावरून उठली आणि हात धुवून त्याच्या पाठीवरील वळांना तेल लावू लागली. रडवेल्या स्वरात तिने श्यामला पोहण्याचे महत्व परत समजावून सांगितले. आपल्याला मारून स्वतः रडणा-या आईला पाहून श्यामलाही गहिवरून आले. आईचे आपल्याला मारणे हे आपल्या हिताचेच होते याची ठाम जाणीव श्यामला झाली. या प्रसंगामुळे श्यामच्या मनात कुणाविषयीही कटूता निर्माण झाली नाही. उलट या घटनेतून आईचे श्यामवर असलेले प्रेमच अधोरेखीत झाले. आई आणि श्यामचे नाते अजून घट्ट झाले. श्यामला शिक्षा झाली. पण श्यामच्या मनावर कटूपणाचा ओरखडाही ओढला गेला नाही. श्यामला आयुष्यभरासाठीचा एक धडा मिळाला. या घटनेला साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक घटना म्हणून लक्षात ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या आईच्या मायेमुळे शक्य झाले होते. आईच्या जागी बाहेरचे कोणी असते तर आपुलकीच्या आभावामुळे आणि भावनिक कोरडेपणामुळे हा प्रसंग साने गुरुजींच्या स्मृतीत दुःखदायक प्रसंग म्हणून नोंदला गेला असता.

पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय पालकांनी मुलांना शिक्षा करू नये. केवळ मुले कमजोर आहेत म्हणून त्यांना पालकांनी आपल्या आयुष्यातील फ्रस्ट्रेशन काढायची पंचींग बॕग करू नये. मुलांना शिक्षा केल्यावर पालकांना मुलांपेक्षा जास्त दुःख होत नसेल तर पालक त्या शिक्षेतून असुरी आनंद मिळवत आहेत असा अर्थ होतो. अशा पालकांना मानसिक समुपदेशनाची किंवा कदाचित मानसिक उपचारांची गरज आहे असे समजावे.

मुले पटकन मोठी होतात. मग ते ‘Teen’ या असुरक्षित वयात पोहचतात. आजवर अभ्यास, खेळ, कला इत्यादी क्षेत्रात त्यांनी काही ना काही यश मिळवलेले असते. आजवर केलेल्या कर्तुत्वाची एक ओळख मुलांच्या मनात निर्माण झालेली असते. मुलांच्या मनात स्वतःविषयीची प्रतिमा आकार घेत असते. मुलांच्या मनातील स्वतःच्या प्रतिमेच्या आकाराला अहं-आकार वा अहंकार असे म्हटले जाते. बारा-तेरा वर्षांपर्यंत मनात वेगवेगळे अहंकार तयार झालेले असतात. यशाच्या श्रेयावर पोसलेला अहंकार तसा मुलांसाठी आनंदाची जागा असतो. पण या अहंकाराचा एक प्रॉब्लेम असतो. अहंकारावर थोडीशी टीका झाली तरी अहंकार दुखावला जातो. एखाद्या चुकीसाठी बोल लागला वा  शिक्षा झाली तर त्या संदर्भातील अहंकार लगेच दुखावला जातो. अहंकार दुखावला की मनात राग उत्पन्न होतो. या त्रासदायक समस्येचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केले तर स्वतःचा गाढवपणा स्वीकारावा लागतो. मग आत्मटीकेचे वाढीव दुःख पदरी पडते. आधीच अहंकार दुखावल्याने दुःखी झालेले मन हे नवीन दुःख स्वीकारायला तयार होत नाही. त्याऐवजी असे दुखावलेले मन अप्रामाणिकपणा स्विकारते आणि स्वतःच्या चुकांचे खापर जगावर फोडून मोकळे होते. त्याने मनाला तात्पुरता आराम मिळाला तरी अप्रामाणिक आत्मपरीक्षणामुळे समस्येची खरी  कारणे कधीही समोर येत नाहीत. त्यामुळे अशी समस्या कधीच सुटत नाही. अहंकारी मन एकाच चौकात, त्याच दगडाला वारंवार ठेचा खात राहते आणि त्याबाबत जगाला दोष देत राहते. या समस्येला मानसशास्त्रात “टिन एज आयडेंटिटी इशू” असे म्हणतात. या वयातील मुलांचा स्वभाव रगेल आणि विद्रोही झालेला असतो.

अशा वयात असलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या वागण्यावर टीका करून त्यांचा अहंकार दुखावला तर मुलांच्या वागण्यावर त्याचा विपरीत आणि बहुतेक वेळा विरुद्ध परिणाम होतो. मुलांना क्रिटीसाईज केले वा कधी शिक्षा केल्यास मुले पालकांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याऐवजी हट्टाला पेटून पालकांच्या सांगण्याविरुद्ध वागतात. या वयातील मुलांच्या वागण्याला खरंच वळण द्यावयाचे असल्यास आई-बापाने आपला “पालक” हा अहंकार टाकून मुलांचे “मित्र” व्हावे. आपल्याकडे आजवरच्या अनुभवांनी जमा झालेले ज्ञान फक्त मुलांसमोर मांडून, त्यांना त्यांच्या समस्येचे आकलन करून घ्यायला मदत करावी. शेवटी केवळ मित्रत्वाचा सल्ला द्यावा. तसेही १२-१३ वर्षापुढील मुले त्यांच्या बुद्धीला पटेल तेच करतात. काही पालक मुलांचा अहंकार दुखवून त्यांना वाईट मार्गावर अजून दृढपणे चालण्यास भाग पाडतात. यात कुठलेही शहाणपण नाही.

मुली, तू आता सहाव्या वर्षात पाय ठेवला आहेस. परवा तू सतत हट्ट करत होतीस. तीन-चार वेळा मी तुला समजावून सांगितले. पण तू काही केल्या ऐकेनास. मग नाईलाजास्तव तुला शिक्षा करावी लागली. तुला शिक्षा करत असतांना आणि नंतर माझ्या मनाची काय अवस्था झाली हे केवळ मलाच ठावूक आहे. कोण कुणाला शिक्षा करत होते देव जाणे ! त्या दिवशी तू जितकी रडलीस ना त्याच्यापेक्षा जास्त माझे मन रडले. पण बापाला उघडपणे आसवे गाळायचीही मुभा नसते. परत अशी वागू नकोस गं. तुझा बाबू बापाच्या कर्तव्याने बांधला गेला आहे. कर्तव्य आणि त्याच्यासोबत येणारा मानसिक त्रास मला चुकवता येणार नाही. डंब सेल्फिशसारखी कधीच वागू नकोस ग पोरी. तसाही चाळीशी ओलांडलेला पुरूष रडताना बरा दिसत नाही.

तेव्हा कुठल्याही चुका न करता लवकर मोठी हो पोरी !

तुम्हाला शिक्षा केल्यावर आमच्याच काळजाला डागण्या लागतात गं ! लेकाच्या वेळी ते मी कसंतरी सहन केलं. पण तुझ्याबाबतीत ते सहन होईल असं वाटत नाही.

लवकर शहाणी आणि मोठी हो पोरी !

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..

. . . . तुझा गोपाल बाबू

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळी माय का विकली जातेय ?… लेखक : श्री संदीप काळे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? मनमंजुषेतून ?

☆ काळी माय का विकली जातेय ?… लेखक : श्री संदीप काळे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे 

मराठवाड्यातल्या धाराशिव, बीड, लातूर या रस्त्याने मी प्रवास करत होतो. त्या प्रवासादरम्यान एक विषय समोर येत होता. तो विषय म्हणजे रस्त्यावरच्या ‘ शेती विकणे आहे’ असे लिहिलेल्या खूप साऱ्या पाट्या. बऱ्याच अंतरावर मी माझी गाडी थांबवायला सांगितली. ‘ शेती विकणे आहे’ अशा एका पाटीसमोर गेलो. तिथे थांबून मी अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत होतो, इथून शहर खूप दूर आहे. इथं कुठली वस्ती होणं शक्य नाही. मग हा शेतकरी जमीन का विकतोय. आसपास पाहिलं तर कोणी नव्हतं.

आता मी तिथून परत निघणार, तितक्यात मला एका माणसाने आवाज दिला. तो माणूस तिकडं दूरवरून मला म्हणाला,  ‘ काय अडचण आहे, कोणाला भेटायचे आहे. शेती घेण्यासंदर्भात काही बोलायचे काय?’ मी म्हणालो, ‘तुम्हालाच भेटायचं आहे.’ तो अजून माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, ‘मी आपल्याला ओळखलं नाही.’ मी म्हणालो, ‘ओळखणार कसे काय? मी पहिल्यांदाच इथं आलोय. मी हा माहिती फलक वाचून थांबलोय. तुम्ही जमीन विकत आहात का?’ त्या माणसाने जमिनीकडे बघितलं आणि होकाराची मान हलवली. 

त्याला वाटलं मी शेतीचा भाव विचारतो, पैसे कसे द्यायचे, जमीन वादाची नाही ना असे विचारतो काय असे त्याला अपेक्षित होते. पण मी त्याला म्हणालो, ‘का विकता एवढी चांगली जमीन?’ त्यांनी माझ्याकडे निरखून पाहिलं, त्याच्या लक्षात आलं की मी जमीन घेण्यासाठी आलो नाही. तरी जमीन का विकतोय हे विचारण्यासाठी थांबलोय.

मी थांबलोय हे पाहून आजूबाजूचे तीन शेतकरी आले. त्या प्रत्येकाला उत्सुकता होती, ही जमीन काय भावाने जाणार, मी काय भाव म्हणतो. त्या सगळ्यांनी माझी चौकशी सुरू केली. मी कुठून आलोय. मी कोण आहे. मी माझी ओळख सांगितल्यावर त्यांना लक्षात आलं, की मी जमीन घ्यायला आलेलो नाही.

शहरापासून जवळच्या जमिनीवर ‘शेतजमीन विकणे आहे’ असे फलक लागतात, ते आपण समजू शकतो, पण शहरापासून खूप दूर दूर अंतरावर असणाऱ्या अनेक भागांमध्ये शेत विकणे आहे, या स्वरूपाचे फलक चारी बाजूला लागल्याचे पाहायला मिळत होते. एखादा माणूस अडचण आहे म्हणून जमीन विकत असेल तर ठीक आहे, पण सर्वांनाच अडचणी कशा, हा प्रश्न मला पडला होता. मी आजूबाजूला थांबलेल्या शेतकऱ्यांना माझी ओळख सांगितली आणि त्यांना बोलते केले. त्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती.

सचिन पाटील, मकरंद जाधव, समीर वानखेडे, प्रभू गायकवाड… ही सारी शेतकरी मंडळी. या सर्वांचा वडिलोपार्जित शेती हाच व्यवसाय. जमीन का विकली जात आहे आणि त्यामागे कारण काय, हे मी सारे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. ‘ जमीन विकणे आहे’ या तीन शब्दांमागे खूप मोठी कारणे आणि लांबलचक इतिहास होता. तो सारा इतिहास त्यांच्या तोंडून ऐकताना मी चकित होत होतो. त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा त्यांना काय उत्तर द्यावे मला काही सुचत नव्हते.

सचिन पाटील यांची साठ एकर जमीन, मागच्या तीन वर्षांपासून कधी पाऊस जास्त, तर कधी पाऊस नाही, या कात्रीमध्ये सचिन यांची शेती अडकली. दोन मुलींची लग्न केली. दर दिवसाचा मोठा खर्च, सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाचे कर्ज. त्या कर्जाच्या व्याजावर लागलेले व्याज, यातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, तर शेती विकणे हाच पर्याय सचिनसमोर होता, असे तो सांगतो.

मी म्हणालो, ‘तुमचे आई- बाबा यासाठी परवानगी देतात का?’ सचिन थोडा वेळ शांत झाले आणि म्हणाले, ‘त्यांच्या परवानगीने तर शक्य नाही. मी इंजिनिअर आहे. बायकोही उच्च शिक्षित आहे. आम्ही रस्त्याची काही खासगी कामे घेऊन ती करायचो. एका प्रोजेक्टमध्ये आम्ही खूप अडचणीत आलो. तिथे आम्हाला दोन एकर जमीन विकावी लागली. हे आजारी असलेल्या माझ्या वडिलांना कळले आणि वडिलांनी तीन दिवसांत प्राण सोडला. वडील का गेले हे कुणालाच कळले नाही. तेरावे झाल्यावर आईने एकदम रडून आक्रोश करीत सांगितले, ‘ तू बापाच्या काळजाचा तुकडा असलेली काळी माय विकली म्हणून तुझ्या बापाने प्राण सोडला.’ आईचे मला हे ऐकून फार वाईट वाटले. बरेच दिवस मीच माझ्या बापाला मारले, असे मला वाटत होते. 

आमच्या मराठवाड्यात काहीही झाले तरी जमीन विकत नाहीत. ही जमीन, काळी आई म्हणजे आपल्या पूर्वजांची, वडिलांची आई आहे, असे समजले जाते. आता त्या माईला आपण विकले नाही तर स्वतः मरावे लागेल, अशी अवस्था आहे. त्याला कारणेही अनेक आहेत.

आता आई फार थकली आणि तितकेच माझे कर्जही थकले. आता कर्जमुक्त व्हायचे असेल, तर दहा एकर जमीन विकावी लागेल. नाहीतर दर वर्षी व्याजावर एक एकर जमीन विकावी लागेल. सचिन एकीकडे सांगत होता आणि दुसरीकडे डोळ्यात आलेले अश्रू पुसत होता. मी ज्या दुसऱ्या शेतकऱ्याशी बोलत होतो त्याचे नाव मकरंद जाधव. मकरंदची शेती सचिनच्या शेताजवळच आहे. मकरंद म्हणाला, ‘ माझ्याकडे तीस एकर जमीन आहे. पाण्याची कमी नाही, नापिकीचा फटका बसत नाही, कारण जमीन उंचावर आहे. सोने पिकावी अशी जमीन आहे, पण ती जमीन कशी कसायची, हा प्रश्न आहे. स्थानिक मजूर येत नाहीत. बाहेरचे मजूर येतात आणि चोरी करून पळून जातात. गेल्या दोन वर्षांपासून दहा एकर जमीन पडीक आहे. कुणी बटाईने पण करायला तयार नाही.’ मी म्हणालो, ‘तुम्ही इतरांपेक्षा मजुरी कमी देता का?’ मकरंद म्हणाले, ‘नाही, मजुरी योग्य तीच देतो. नेण्या-आणण्यासाठी वाहन आहे, पण मजूर येत नाहीत.’

सचिन, मकरंद, समीर, प्रभू सारे जण मजुराला घेऊन एक एक किस्से सांगत होते. ते मला जे सांगत होते ते माझ्यासाठी सारे काही नवीन होते. मजूर नाममात्र दरावर मिळणारे धान्य बाजारात नेऊन कसा रविवार साजरा करतात हेही ते मला सांगत होते. मी म्हणालो,  ‘ मग तुम्ही शेती कसायला कुणी भेटत नाही म्हणून शेती विकताय तर…, मग शेती विकून भेटलेल्या पैशांचे काय करणार ?  ’     मकरंद म्हणाले,  ‘ मला शेती विकून कर्जमुक्त व्हायचे आहे. मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे आहे.  ’   मी म्हणालो,  ‘  मग परदेशात शिकून तो पुढे काय करेल. ’

मकरंद शांतपणे म्हणाले, ‘मी मुलाला सांगितले, बाबा, तिकडेच राहा. तिकडेच मोठा हो. इकडे नको येऊ. इकडे सारा गोंधळ आहे. कशाचा कशाला ताळमेळ नाही. मला माझ्या आई-बापाच्या मोहापायी घर सोडता आले नाही. तू घरी येऊन मोहात नको अडकू. आता गावातल्या मुलासोबत तो एक दिवस मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसला होता. मी तेव्हाच ठरवले, एकदा का तो तिकडे गेला की परत इकडे नकोच.’आम्ही बोलत बोलत सचिनच्या आखाड्यावर गेलो. तिथे सचिनच्या वडिलांची समाधी होती. त्या समाधीचे आम्ही सर्वांनी दर्शन घेतले.

सचिनचा सालगडी काम सोडून झोपला होता. सचिन म्हणाला, ‘पाहा, आपण सोबत असलो तर मजूर शेतात काम करतात. नाही तर झोपा घेतात. त्या सर्वांनी तो काळा चहा प्यायला. मी त्या विहिरीचे नितळ पाणी प्यायलो. मी पाणी पिताना सचिन म्हणाला, ‘माझ्या बापाने भर उन्हाळ्यात ही विहीर खंदली, बापाने जिवाचे रान केले, म्हणून या विहिरीचे पाणी इतके चवदार आहे.’ मी समीरशी बोलत होतो, समीर म्हणाला, ‘मला दहा एकर शेती आहे. मला कुणीतरी असा खमका माणूस पाहिजे जो माझी पूर्ण जमीन विकत घेईल. ’   मी म्हणालो, ‘काही भांडणे झाली का? काही वाद आहे का?’ समीर म्हणाले, ‘हो,’मी म्हणालो,‘भावा-भावाचा वाद आहे का? ’   समीर म्हणाले, ‘नाही नाही, माझा आणि माझ्या बहिणीचा वाद आहे. तिला माझी अर्धी जमीन पाहिजे. या वादातून पाच वर्षांपासून जमीन पेरली नाही. ’

मी म्हणालो, ‘आता बहिणीला हिस्सा कायद्याप्रमाणे द्यायचा आहे ना.’ तो म्हणाला,‘छे हो, कशाचा कायदा, आमच्या पूर्वजांनी जे ठरवले ते महत्त्वाचे आहे. बरं बहीण, मेव्हणे मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांनाही चाळीस एकर शेती आहे.’ प्रभू यांचे जमीन विकायचे कारण वेगळे होते, प्रभू म्हणाला, ‘ माझी दोन मुले अपघातात वारली. खूप वर्षांनंतर मला मुलगा झाला. तो खूप लाडका असल्यामुळे शिकला नाही. मित्राच्या संगतीने पुण्याला गेला आणि वॉचमन झाला. त्याला आता दोन छोटी मुले आहेत. माझी बायको सारखी म्हणते, माझी वारलेली ती दोन्ही मुले पुन्हा जन्माला आली आहेत. मला आता मुलासोबत जाऊन पुण्याला राहायचे आहे. माझी पाच एकर जमीन आहे. मागच्या चार वर्षांत मी जे काही पेरले ते कधी उगवले नाही. जेव्हा उगवले तेव्हा बाजारात कवडीमोल विकले गेले. नापिकीत जमिनीच्या जमिनी मोजून नेल्या. नेते फोटो काढत शेतात आले आणि बँकेत जमा होणारे पैसे अजून जमा होतच आहेत. या सरकारवर आणि प्रशासकीय यंत्रणेवर माझा जराही विश्वास नाही.’ ते सारे जण एक एक करून आम्ही आमची जमीन का विकतोय याची कारणे सांगत होते.

गावकी, भावकी आणि निसर्गाचे सतत वाईट फिरणारे चक्र आणि या चक्राचे हे सारे झालेले शिकार. शेतीसंदर्भात असणारे चुकीचे कायदे, हे सारे यामागे आहे. या साऱ्यांची कहाणी एकदम वेगळी होती. ही कहाणी या चार जणांची नाही तर राज्यात, देशात काळ्या माईची सेवा करणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची आहे. ज्याला आपल्या काळ्या मायचा तुकडा काळजाचा वाटतो, पण त्या काळजाच्या तुकड्याला विकल्याशिवाय पर्याय नाही. बरं, यात शंभर एकर आणि एक एकर जमीन असणाऱ्यांची गत सारखीच झालेली आहे.

लेखक – श्री संदीप काळे

मो. 9890098868

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र… आज अष्टमी… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

नवरात्र… आज अष्टमी… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्त धान्य पेरलं होतं.

आज ते उगवून वर आलेलं आहे हिरवीगार लुसलुशीत पात आपल्या नजरे समोर आहे.

काही पेरलं की ते उगवून वर येतच…..

 फक्त काय पेरायचं याच भान आपण ठेवायला हवं .

एक साधं बीज पेरलं की त्यातून कणीस बाहेर येतं.

सृजनाचा हा सोहळा आपल्या डोळ्यासमोरच होतो.

आज त्या महागौरीसमोर बसा.

हातात टाळ घ्या आणि तिची आरती करा…

तिच्या स्तुती ची गाणी म्हणा.

आत आहे ते  बाहेर येऊ द्या…

न लाजता छान मोठ्या आवाजात म्हणा.

मला आतून म्हणावसं वाटतं आहे मी म्हणणार असं म्हणा आणि अनुभव घ्या.

आर्ततेनी  म्हटली जाते ती आरती

रामदास स्वामींनी संकटी पावावे निर्वाणी रक्षावे….

अशी गणरायाला विनंती केली आहे.

निर्वाणी… …

या शब्दाशी क्षणभर थांबा …

त्यातला खोल गर्भित अर्थ ध्यानात येईल.

दुःख,क्लेशातून  भावपाशातून  आम्हाला सोडव …….

ही आशा आपण अंबेकडूनच करू शकतो.

माय भवानी तुझे लेकरू…

लेकरू …

शब्द उच्चारला की त्यात सगळं आलं…

ईतक लहान व्हयच…

आईच्या कुशीतच शीरायच…

लल्लाटी भंडार

दूर लोटून दे अंधार….

कुठला अंधार?

अज्ञानाचा…

हे समजलं की पुढचं सोपं होईल.

जनार्दन महाराज सांगतातच बोधाची परडी हातात घेऊन ज्ञानाचा पोत पाजळायचा आहे.

देवीच्या सर्वांग सुंदर रूपाची वर्णन करणारी पदं म्हणा.

नसू दे तुमचा सूर सुस्वर ….

तिला तुमचा आतला आवाज ऐकायचा आहे …

तो निर्मळ आणि शुद्धच असतो….

आज त्या जगतजननीकडे जोगवा मागा

आनंदाचा……..

तो असला की बाकी सगळं आपोआप होत.

मग आज घरी तुमचा तुम्हीच गोंधळ गाऊन आईसाहेबांचा उदो उदो करा

मग म्हणा आता ….

अंबाबाईचा उदो उदो

रेणुका देवीचा उदो उदो

आदी मायेचा उदो उदो

तुळजाभवानी आईचा उदो उदो

महालक्ष्मी चा उदो उदो

सप्तशृंगी चा उदो उदो

हळू आवाजात कशाला म्हणताय?

जय जय कार चांगला जोरातच होऊ दे की…

आपल्या भवानी मातेच नवरात्र आहे. …..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– नक्षत्रे अवतरली पोस्टात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – नक्षत्रे अवतरली पोस्टात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

 (पोस्टाची संगीतसेवा…)

९ ऑक्टोबर. जागतिक पोस्ट दिनानिमित्त एक सुखद आठवण आपल्या सर्वांबरोबर शेअर करताना खूप आनंद होत आहे…

३ सप्टेंबर २०१४, हा माझ्यासाठी फार सुंदर आणि ऐतिहासिक दिवस होता. ज्या भारतीय पोस्ट खात्याची, ‘जगातील सर्वोत्तम नेटवर्क’ अशी ख्याती आहे, अशा पोस्टाने माझ्या हातून एक मोठ्ठी ‘संगीत सेवा’ करण्याची मला संधी दिली!

भारतरत्न पं. रविशंकर आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी तसंच सर्व पद्मविभूषण सन्मानप्राप्त – उ. अली अकबर खाँसाहेब, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. कुमार गंधर्व, पंडिता डी. के. पट्टमल, गंगुबाई हनगल आणि पद्मभूषण उ. विलायत खाँसाहेब अशा संगीतातील थोर विभूतींचे स्टॅम्प्स (पोस्टाची तिकिटे) आज माझ्या हस्ते प्रकाशित झाले आणि या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली, हाच मी माझा मोठा सन्मान समजते. 

स्वरसम्राज्ञी ‘भारतरत्न’ लतादीदींच्या पंच्याहत्तरीनिमित्त त्यांच्याच गाण्यांचा ‘तेरे सूर और मेरे गीत’ हा कार्यक्रम मी त्यांना मानवंदना म्हणून जेव्हा अर्पण करायचा ठरवला, त्या वेळी गंमत म्हणजे ‘जाने कैसे सपनों में खो गईं अखियाँ’ तसंच ‘कैसे दिन बीते’ व ‘हाये रे वो दिन’ ही अनुराधा चित्रपटातली तीन गाणी, माझी अत्यंत आवडती गाणी म्हणून सर्वांत प्रथम निवडली गेली… ज्याचे संगीतकार पं. रविशंकरजी होते. नृत्याचे बालपणीच धडे घेतलेल्या रवीजींच्या रक्तात जशी झुळझुळ झर्‍यासारखी लय वाहत होती, तशीच ती त्यांच्या शास्त्रीय सतार वादनात आणि स्वरबद्ध केलेल्या सुगम संगीतातही होती. त्यांनी अनेक सुंदर रागांचे मिश्रण करून राग सादर केले…. उदा. श्यामतिलक या रागातील ‘जाने कैसे सपनों में’ (श्यामकल्याण + तिलककामोद). शास्त्रीय संगीत काय किंवा सुगम संगीत काय, दोन्हींत त्यांनी अत्युच्च दर्जाचं काम केलंय. ‘कैसे दिन बीते’ या गाण्यातली सौंदर्यस्थळं तर, काश्मीरच्या सौंदर्य स्थळांपेक्षा कितीतरी सरस आहेत. उदा. ‘हायेऽऽऽ कैसे दिन बीते, कैसे बीती रतियाँ, पिया जाने ना’ यातील तीव्र आणि शुद्ध या दोन्ही मध्यमांचा (म॑धम॑, मगरेगऽसा) असा उपयोग रवीजींनी अफाट सुंदर केला आहे.

यानंतर मी पं. भीमसेनजींची एक छोटीशी आठवण सांगितली. १९८२ मध्ये मुंबई दूरदर्शनच्या ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात लतादीदींनी आणि माझे गुरू पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी माझ्याकडून ‘तरुण आहे रात्र अजुनी’ ही गझल गाऊन घेतली होती. हे गाणं ऐकून पं. भीमसेनजींनी त्यांचे संवादिनीवादक, थोर कलावंत पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्यामार्फत “अप्पा, काल टीव्हीवर बाळच्या कार्यक्रमात ही मुलगी फाऽऽरच सुंदर गायली!” असा मला निरोप पाठवून खूप मोठा आशीर्वाद दिला. वास्तविक शास्त्रीय संगीतात अत्युच्च स्थानावर असूनही, पंडितजींनी माझ्यासारख्या नवोदित गायिकेचं कौतुक केलं. असं कौतुक कोणत्याही कलावंताला कारकीर्दीच्या सुरुवातीला उंच भरारीचं बळ देतं!

अशीच एक सुंदर आठवण उस्ताद अली अकबर खाँसाहेबांची, १९८५ सालची! पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खाँसाहेब यांनी संपूर्ण विश्वभर हिंदुस्तानी संगीताचा प्रचार आणि प्रसार केला. यात त्यांचा फार मोठा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे. मी उस्ताद अली अकबर खाँसाहेबांच्या सॅनफ्रान्सिस्कोमधील अकॅडमीला भेट द्यायला गेल्यावेळी, त्यांनी मला कौतुकानं एक गोष्ट खिलवली…. काय बरं असेल ती चीज? आश्चर्याची गोष्ट म्हणजे… ती होती ‘चिकन जिलेबी’! अगदी वेगळा, पण खरंच खूप छान प्रकार त्यांनी मला प्रेमानं खिलवला..

पं. मल्लिकार्जुनजींची ही आठवण सांगताना मला खूप गंमत आली. मी आणि सुनील जोगळेकर १९८८ मध्ये, साखरपुड्याच्या बंधनात अडकलो आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी आम्ही एकत्र बाहेर जायचं ठरवलं. कुठं बरं गेलो असू? काही अंदाज? गेलो ते चक्क वानखेडे स्टेडियममध्ये सुरू असलेल्या, पंडित मल्लिकार्जुनजींच्या मैफिलीला! अवघ्या १५ ते २० मिनिटांत एक राग संपूर्णपणे, सक्षम उभा करण्याची त्यांची हातोटी! ती ‘मैफील’ आम्ही दोघांनीही अतिशय मनापासून, समरसून आनंद घेत ऐकली.

‘स्त्रियांनी गाणं’ हे ज्या काळात शिष्टसंमत नव्हतं, त्या काळात पंडिता डी. के. पट्टमल यांनी, बालपणापासून मैफिली गाजवल्या आणि स्त्रियांच्या गाण्याला उच्च स्थान व दर्जा मिळवून दिला. म्हणूनच मला वाटतं, आजच्या सर्व गायिकांनी त्यांच्याप्रती उतराई व्हायला हवं! मुख्यत्वे, त्यांनी गायलेली कृष्ण भजनं ऐकताना रसिकांचे डोळे नेहमी पाणवायचे, इतकी त्यात भक्ती होती, भाव होता, आवाजात सणसणीत ताकद आणि खर्ज होता, तेज होतं! हीच बाब, पंडिता गंगुबाई हनगल यांच्याविषयी खरी ठरते. नागपूरमध्ये झालेल्या ‘सप्तक’ या संस्थेच्या शास्त्रीय संगीताच्या संमेलनात मी ‘राग बिहाग’ गायले. माझ्यानंतर लगेचच गंगुबाईंचं गाणं होतं. मी स्टेजवरून उतरताना गंगुबाईंना नमस्कार केला. त्यांनी प्रेमभराने, माझ्या पाठीवरून हात फिरवत माझं कौतुक केलं व भरभरून आशीर्वाद दिले!

पं. कुमार गंधर्व यांनी वयाच्या आठव्या वर्षी अनेक दिग्गज गायकांची शैली आत्मसात करून ‘चमत्कार’ सादर केला. पं. कुमार गंधर्व यांची जशी ‘शास्त्रीय’ संगीताला देणगी आहे तशीच त्यांनी ‘लोकसंगीताचा’ उपयोग करून, संगीतबद्ध करून गायलेली निर्गुणी भजनं, ही देखील त्यांचीच ‘किमया’ आहे. तसंच नवनवीन राग, बंदिशी आणि रचना यांची त्यांनी केलेली निर्मिती ही भारतीय संगीताला मिळालेली अमूल्य ‘देणगी’ आहे. उदा. लगनगंधार, शिवभटियार इ…

उ. विलायत खाँसाहेबांचंही असंच भारतीय शास्त्रीय व सुगम संगीतातही मोठं योगदान आहे. ‘जलसाघर’सारख्या सुप्रसिद्ध बंगाली चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिलं होतं, जे खूप गाजलं. सत्यजित रे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी, सुगम संगीतातही अपूर्व असं काम केलं.

संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ज्या मंडळींनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केलं, तसंच तळागाळातल्या रसिकांपासून ते जगभरातील हिंदुस्थानी अभिजात संगीतावर प्रेम करणार्‍या रसिकांचं आयुष्यही समृद्ध केलं, अशा या सर्वश्रेष्ठ संगीततज्ज्ञांच्या नावे आज पोस्टाची तिकिटे ‘प्रकाशित’ झाली.

आज पोस्ट खात्याने अशा दिग्गजांचं स्मरण करून त्यांना मानवंदना दिली, ही संगीत क्षेत्रासाठी कितीतरी आनंदाची नि अभिमानाची गोष्ट आहे! त्यासाठी पोस्ट खात्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे! आपल्या भारतीय एकशे चाळीस कोटी जनतेला आपण शासकीय खात्यातील सर्वांत चांगलं खातं कोणतं? हा प्रश्न विचारला तर, एकमुखानं चांगलं बोललं जाईल, ते म्हणजे केवळ ‘पोस्टखात्या’बद्दलच!

मनीऑर्डर, instant money transfers, ATM, बचत खातं, पोस्टाचा बटवडा, इ. प्रचंड मोठी जबाबदारी पोस्टखात्यावर आहे. इतका जनतेचा आणि सरकारचाही पोस्टावर विश्वास आहे.

आजच्या इंटरनेट आणि एसएमएसच्या युगात, पोस्टानं आलेलं आणि हाती लिहिलेलं पत्र काय आनंद देऊन जातं, हे त्या पत्र घेणार्‍याला आणि वाचणाऱ्यालाच ठाऊक! गावोगावी तर अशिक्षितांसाठी पत्र वाचणारा आणि लिहूनही देणारा ‘पोस्टमन’ म्हणजे देवदूतच जणू!

आजही माझ्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ या शाळेत मातृदिनाला आपल्या आईला, तिच्याबद्दलचं ऋण व्यक्त करताना विद्यार्थी अन्तर्देशीय पत्र / पोस्ट कार्ड लिहितो. ते पत्र वाचताना, प्रत्येक आईला किती अमाप आनंद होत असेल?

आज मला २७ वर्षांपूर्वीची आसामच्या, कोक्राझारमधील चाळीस हजार रसिकांसमोर, मी सादर केलेली शास्त्रीय संगीताची मैफिल आठवते. त्यात एक विशेष व्यक्ती होती आणि ती म्हणजे शिलाँगचे ‘पोस्टमास्टर जनरल’! त्यांची नी माझी कधीच भेट झाली नाही परंतु त्यानंतर, त्यांचं मला कौतुकाचं एक सुरेख पत्र आलं! त्यावर केवळ पत्ता होता…. पद्मजा फेणाणी, माहीम, मुंबई. आणि…… चक्क पत्र पोहोचलं! त्यावेळी “तू स्वतःला काय महात्मा गांधीजी समजतेस?” अशी घरच्यांनी गंमतीने माझी चेष्टा केली. त्या काळात गूगल मॅप नसतानाही पोस्टाची ही विश्वासार्हता आणि चोख काम…. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!

बालपणी आम्ही भावंडं एकत्र खेळताना, “मोठेपणी तू कोण होणार?” हा प्रश्न विचारला जाई. कुणी कंडक्टर, कुणी पोलीस, कुणी काही सांगे. पण स्टॅम्प्स गोळा करण्याचा छंद असलेला माझा एक चुलत भाऊ म्हणाला, “मी कोण होणार ठाऊक नाही, पण मी असं काम करीन की, माझ्या नावे पोस्टाचं तिकीट कधीतरी निघेल!” यावरून ‘स्टॅम्प’वर फोटो असण्याचं महत्त्व आणि प्रतिष्ठा कळते! या जन्मात, आम्ही राम आणि कृष्ण काही पाहिले नाहीत, परंतु संगीतातल्या अशा या सर्व दिग्गज मंडळींना मी पाहिलं, त्यांचं संगीत अभ्यासलं, त्यातल्या काहींचा आशीर्वादही लाभला, हे मी माझं भाग्यच समजते! या व्यक्ती स्टॅम्प्सच्या रूपाने आम्हाला व पुढच्या पिढ्यांना कायम स्फूर्ती देत राहतील, हे फार मोठं कार्य पोस्टाने केल्याबद्दल आणि माझ्या हस्ते या स्टॅम्प्सचे लोकार्पण करण्याचा मान मला दिल्याबद्दल, मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈