श्री संभाजी बबन गायके
☆ हरीणकाळजातील हळवी भीती! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
गीतकार आनंद बख्शी
किसी राहमें किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर ! .. मेरे हमसफर…मेरे हमसफर !
सृष्टी अव्याहतपणे सृजनाची,नवनिर्माणाची,चैतन्याची वाट चालावी म्हणून स्त्री-पुरुषांमधील नातेसंबंधांना नियतीने एकमेकांच्या हातात हात गुंफून एकपावलाने वाटचाल करण्याची प्रेरणा दिली असावी! अन्यथा हा केवळ देहव्यवहार उरला असता प्राणीजगतातला!
मराठीतल्या एकांड्या ‘मी’ चं अनेकवचन म्हणजे आपण… हिंदीतल्या मैं चं बहुवचन म्हणजे हम! या अनेकवचनांत एकापेक्षा अधिकजणही असू शकत असले तरी याचा ‘आपण दोघं’ हा अर्थ गृहस्थाश्रमी माणसांना अधिक भावणारा!
माणसं व्यवहारानं,प्रेमानं,योगायोगानं आयुष्यभरासाठी एकत्र येतात आणि मग चार पावलं असली तरी वाट आणि चाल एक होऊन जाणं साहजिक,सहज होऊन जातं. आणि मग जसजसा रस्ता पावलांना पुढे पुढे नेत राहतो तसतशी पावलांना एकमेकांची मोहिनी पडत जाते..हाताच्या बोटांना गुंफलेले राहण्याची गोडी अनुभवण्याचे सुख सोडवत नाही….जसा जीव देहाला बिलगून रहावा तसंच की हे!
वाटेत ठेचा लागूही शकतात,नव्हे लागतातच. पण सावरायला सोबत असतं आपलं माणूस. क्षणिक रागाचे खाचखळगे एखाद्या अंधा-या वळणावर दबा धरून बसलेले असतात आणि पावलं त्यांच्या जाळ्यात अडकतातही कधीकधी नकळतपणे….पण जाणती मनं हात सोडत नाहीत सहजी! यातूनच हातांची आणि काळजांची गुंफण अधिकाधिक घट्ट होत जाते.
पण….मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात ते का असंच? संसारसुखाचा चषक ओठांना स्पर्शत राहून प्रेमरस जिव्हेला तृप्ततेचा अभिषेक घालीत देहात उतरत जात असताना हा अमृतचषक रिता होत जातो आहे, याची नकोशी जाणीवही उभी असते आतल्या मनातल्या अंगणात अंग चोरून. आपण माळरानावर उभे असावं आणि बोचरा वारा वाहू लागावं मधूनच…या बोचरेपणातून देहाची सुटका नाही. पण हा बोचरा वारा काही सतत येत-जात नाही….अगदी विसर पडून जातो त्याचा. आणि मग तो हळूच अवतरतो.
जगण्याच्या या प्रवासातल्या सोबतीला हमसफर,हमराह म्हणतात हिंदीत,ऊर्दुत. यातला हम मात्र सोबती अशा अर्थानं आणि सफर म्हणजे अर्थातच प्रवास! अखेरच्या श्वासापर्यंत सोबत करण्याच्या आणाभाका घेतलेल्या असल्या तरीही ही प्रेमसरिता मध्येच खंडीत होऊ नये असं वाटतंच….जगातल्या इतर कोरड्या नद्या पाहून. शेवटी इतरांच्याही अनुभवांची गोळाबेरीज करत असतंच हृदय. विरह म्हणजे दुसरं मरणच. म्हणून ती दोघं एकमेकांना हळुवारपणे सांगू पाहताहेत…रस्त्यात कुठलं वळण कधी येईल याचा भरवसा नाही…..
किसी राह में…किसी मोड पर…कहीं चल न देना तू छोडकर…मेरे हमसफर…मेरे हमसफर!
तु एखाद्या आंधळ्या वळणावर हात सोडून जाणार नाहीस ना माझा हात सोडवून घेऊन?
किसी हाल में किसी बात पर…..कहीं चल न दे ना तू छोडकर!
विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी,एखाद्या गोष्टीवरून तु मला गमावणार तर नाही ना?
मेरा दिल कहे कहीं ये न हो, नहीं ये ना हो
किसी रोज तुझसे बिछड के मैं तुझे ढुंढती फिरूं दर-बदर.
माझं मन सतत आशंकित असतं…असं नाही ना होणार? नकोच तसं व्हायला….आपण एकमेकांना पारखे झालोत आणि मग एकमेकांना शोधत रानोमाळ भटकत आहोत…असं नको व्हायला.
तेरा रंग साया बहार का तेरा रूप आईना प्यार का
तुझ्या मनाचा रंग जणू चैत्रपालवीची ओली सावली आणि तुझं दृश्यरूप म्हणजे प्रेमाचं दर्पण…विविध रंगछटा उभं करणारं.
तुझे आ नजर में छुपा लूं मैं तुझे लग न जाये कहीं नजर!
तुला जगाच्या अप्रिय नजरेपासून लपवून ठेवण्यासारखी एकमेव जागा म्हणजे माझ्या डोळ्यांच्या पापण्या…त्यांच्या आड तु सुखरूप.
तेरा साथ है तो है जिंदगी तेरा प्यार है तो है रोशनी.
जीवनाचं दुसरं नाव म्हणजे तुझा सहवास. तुझी प्रीती म्हणजे या वाटेवरलं प्रकाशाचं झाड. श्वास क्षितीजापल्याड जायला केंव्हा निघतील काही सांगता येत नाही मर्त्य मानवाला.
कहॉं रात हो जाए क्या खबर..
या जाण्यादरम्यान अंधार गाठेल तेंव्हा तुझ्या निरंजनातील ज्योतीचा स्निग्ध उजेड पुरेसा होईल!
आनंद बख्शी! सामान्यांच्या असामान्य भावनांना शब्दरूप देणारे कवी. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी मातृसुखाला पारखे झालेल्या या माणसाला आपल्या वडिलांचं पत्नी-विरहदु:ख त्यावेळी समजलं असेल की नाही ठाऊक नाही.पण विरहवेदनेची जाणीव त्यांना पुढील आयुष्यात कुठे न कुठे अनुभवायला निश्चित मिळाली असावी. त्याशिवाय नेमके आणि तरीही साधे शब्द लेखणीतून प्रसवत नाहीत. प्रारंभीच्या उमेदीच्या काळात ब्रिटीश नौदलात कनिष्ठ साहाय्यकाची नोकरी, ब्रिटीशांविरोधी उठावत सहभागी झाल्याने झालेली अपमानास्पद हकालपट्टी,स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय फौजेत केलेली अल्पकाळ सेवा यानंतर आनंद बख्शी (बक्षी नव्हे!) सिनेसृष्टीत आले आणि रमले! मदनमोहन यांच्या नंतर सैनिकाचा संगीतकार झालेला कदाचित दुसराच माणूस. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगिकारलेल्या या कवीने शेकडो गाणी लिहिली. आनंदजींसारखी, केवळ आठ मिनिटांत एखादे संपूर्ण गाणे लिहिण्याची हातोटी फार कमी कवींना लाभलेली असेल!
मेरे हमसफर (१९७०) हिंदी चित्रपटासाठी आनंदजींनी लिहिलेल्या या गीताला लतादीदींशिवाय अन्य कुणी न्याय देऊ शकलं असतं का ही शंकाच आहे. मुकेशजींना हे गाणं देण्याचा आग्रह धरणा-या आनंदजींना मुकेश यांच्या साध्या,सरळ स्वरांचं सामर्थ्य माहीत होतं….कारण सर्वसामान्यांचं भावजीवन नजरेसमोर उभे करणारे शब्द सर्वसामान्यांनाही गुणगुणता यावेत असं गायलं जावं असं त्यांना वाटत होतं आणि यासाठी मुकेशच हवे होते.
आनंदजींच्या या शब्दांना चालीचं कोंदण द्यायला आणखी एक आनंदजी होते आणि त्यांच्यासोबतीला कल्याणजी! मनात भक्तीभावना निर्माण करण्याचं सामर्थ्य असलेला कर्नाटकी संगीतातला राग चारूकेशी त्यांनी निवडला आणि ताल रूपक. अतिशय हळूवारपणे संतुर श्रवणेद्रिंयाला साद घालत येते….सोबतीला नाजूक परंतु तितकाच स्पष्ट तबला…आणि बासुरी! आणि लगेच लता नावाच्या स्वरपालखीत विराजमान होऊन शब्द उमटतात…किसी राहे में..किसी मोड पर! यानंतर येणा-या कहीं शब्दाची तर मोठी खुमारी. एकच शब्द तीन अर्थाने ऐकवणं म्हणजे स्वरांची पूजा केल्यावरच प्राप्त होणारा कृपाप्रसाद! एक ‘कहीं’ म्हणजे कुठेतरी किंवा कुठेही..अर्थात स्थान निश्चित नसलेलं स्थळ. तु मला सोडून तर जाणार नाहीस ना? दुसरा ‘कहीं’ म्हणजे शक्यता,शंका,आशंका अशा अर्थाने..प्रश्नार्थक! या ‘कहीं’ ला ‘नहीं’ चं गोड यमक म्हणजे गुलाबावर शिंपडलेलं कस्तुरी अत्तर. या कहीं चं उत्तर नकारार्थीच यावं अशी वेडी आशा असतेच मनात कहीं न कहीं ! सतार हळूच डोकावून जाते ओघात. एका कडव्यानंतर तेरा रंग साया बहार का म्हणत मुकेशजींनी गाण्यात केलेला पुन:प्रवेश सुखावणारा आहे.
हे गाणं संपावंसं वाटत नाही…जसा आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास संपावा असं वाटत नाही तसं. कुणाचं जाणं न जाणं आपल्या हाती नाही ठेवलं विधात्यानं. पण जाऊ नकोस असं आर्जव करण्याची ताकद मात्र ठेवली आहे. कुणी सांगावं मनाच्या या आर्ततेमुळं एखाद्याचा इथला मुक्काम आणखी थोडा वाढू शकेल!
५४ वर्षे हे गाणं हळव्या माणसांच्या मनाचा ठाव घेत आलं आहे…आणि जोपर्यंत मानवी जीवनात आत्मिक प्रेमाला जागा असेल तोवर अशी गाणी ऐकली,गायली,गुणगुणली जातीलच. या गाण्यासाठी आनंद बख्शींना अगणित हृदयं तळापासून धन्यवाद देत असतील, यात शंका नाही.
(मनात येतं ते शब्दांत उतरवण्याची ऊर्मी दाटून येते आणि मग असं काहीबाही लिहिलं जातं. यानिमित्तानं आपल्याही भावनांची उजळणी होते हा स्वार्थ!)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈