मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

मी जेव्हा जेव्हा माझ्या मिस्टरांना घेऊन अंबानी हाॅस्पिटलला जाते तेव्हा माझे मन नैराश्यानी ग्रासून जाते.

जातानाच मन उदास असते. माझ्याच नशीबी या वा-रा 

का?

पण तिथे पोचल्यावर जेव्हा आजूबाजूचे पेशन्टस् बघते 

तेव्हा वाटतं माझा नवरा या कॅन्सरवर मात करून 

नाॅर्मल आयूष्य जगतोय तरी. 

किती तरुण मुले, किती लहान मुले, अजून त्यांनी जगही पाहिले नाही.त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात तरळणारे दुःख मन पिळवटून टाकते.

कितीतरी वयस्क, त्यांची हतबलता, त्यांना सावरणारी अर्धांगिनी, ती ही कापणा-रा हातानी, मनातली भीती 

न दाखवणारी. 

त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा मुलगा, तोही पन्नाशीजवळ 

आलेला, ऑफीसला रजा टाकून. मधे मधे तो ऑफीसचे फोन अटेन्ड करतोय. तो ही या युगातला श्रावणच. 

कुणाच्या हाताला सलाईनच्या नळ्या,कुणी यूरीनची बॅग 

सांभाळत,कुणी व्हीलचेअर वर 

प्रत्येकाचे दुःख वेगळे पण डोळ्यात तेच केविलवाणे भाव. 

अशावेळी मलाही पसायदान आठवते. 

देवा तू सर्वांना सुखी का नाही ठेवत.?

या शारीरिक वेदना कशासाठी?

आणि गरीबांनी काय करायचे  ?

त्यांना तर या महागड्या ट्रीटमेन्टस् कशा परवडणार?

या खेळात तुला कसली गंमत वाटते.?

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की “आपण ग्रामीण भागकडे जास्त लक्ष द्यावे.”

बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठीच  काढायचे.

लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही भाग डोंगराळ व जंगली  होते.

एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले, की एका डोंगराळ भागात ‘बडेरी’ नावाचे एक गांव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटर्सचे अंतर डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे.

मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे.

तिथे कोणीतरी पी. के. व्यास नांवाचे मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि कां कोण जाणे, ते पद  सोडतही नव्हते. मी आदेश दिला की “त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये.  ही अचानक भेट असेल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहन चालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जावे लागेल.

मी आणि माझे दोन सहकारी, चालत निघालो. जवळजवळ दीड तास होऊन गेला असेल. डोंगराळ, कच्च्या रस्त्यावरून आम्ही वरती गावात जाऊन पोहोचलो.

समोरच शाळेची पक्की इमारत होती आणि जवळ जवळ दोनशे कच्ची घरे होती.

शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त तीनच वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा. चारी बाजूंनी हिरवीगार वनराई.

वर्गात गेलो तर तिन्ही वर्गात जवळपास दीडशेमुलं अभ्यासात गर्क होती. खरं तर तिथे कोणीही शिक्षक नव्हता. एक वयस्क गृहस्थ व्हरान्ड्यात उभे होते. ते तिथे बहुधा शिपायाचे काम करीत असावेत.

त्याने सांगितलं की मुख्याध्यापक गुरुजी एव्हढ्यातच येतील.

आम्ही व्हरांड्यात जाऊन बसलो, तेव्हा बघितलं की एक चाळीस-बेचाळीस वर्षांचे सद्गृहस्थ, आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता.

त्यांनी येताच आपला परिचय दिला, “मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचे पाणी जरा खालून विहिरीतून आणावे लागते. आमचे शिपाई दादा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही म्हणून मीच घेऊन येतो. कसरतही होते.” ते हसून म्हणाले.

त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला व नांव ही ओळखीचे वाटले. मी त्यांच्याकडे पाहून विचारले, “तुम्ही प्रशांत व्यास म्हणजे इंदूरच्या गुजराती कॉलेजमध्ये होते तेच कां?”

त्यांनी सुद्धा ओळखल्यासारखे  आश्चर्याने विचारले, “आपण अभिनव आहात कां? अभिनव श्रीवास्तव !” मी म्हणालो, “होय भाऊ, मी तोच आहे.”

वीस-बावीस वर्षांपूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत होतो. तो खूप हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होता. खूप मेहनत करूनही, कधी तरीच मला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील.

आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची. ज्यात तोच नेहमी पुढे असायचा.

आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा- शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचे, जिंकल्याचे समाधान वाटत होते. आणि खरं सांगायचं तर, मनांतूनही मी खूप खुष  होतो.

मी सहजच विचारलं की “इथे कसा काय आणि घरी कोण कोण आहे?”

त्याने सविस्तर सांगायला सुरुवात केली, “एम. कॉमच्या वेळेस वडिलांची मालवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. कसं तरी शिक्षण पूर्ण केलं. मार्क चांगले असले, तरी सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. पण नोकरी सोडूही शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशाही नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. या गांवात बदली मिळाली.  आई-वडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोड कमी पैशात  निभावून जाईल.

मग तो हसत म्हणाला, “अशा दुर्गम गांवात बदली, म्हातारे, आजारी आई-वडील, यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना. म्हणून लग्नही नाही झालं. आणि बरोबरच आहे. कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती?

माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून घेऊ. मग इथेच स्थायिक झालो.

इथे आल्यानंतर काही वर्षांनी आई-वडील दोघेही देवाघरी गेले. जेव्हढी जमेल तशी त्यांची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.”

“आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमून गेले. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्षारोपण करायला जातो. 

रोज संध्याकाळी शाळेच्या व्हरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गांवात कोणीही निरीक्षर नाही. नशा मुक्तीचे अभियान ही चालवतो.

स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि पुस्तके वाचतो. मुलांना चांगले मूल्य शिक्षण मिळावे, चांगले संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी, बस एवढेच माझे ध्येय आहे.

मनांत होतं, पण मी सी. ए. करूच शकलो नाही. पण माझे दोन विद्यार्थी सी.ए. आहेत ! आणि काही जण चांगल्या नोकरीतही आहेत.”

“माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो. माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी व शाळेसाठी खर्च होतो.

तुला तर माहीतच आहे. कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. ती, या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटते.”

मी मधेच म्हणालो, “आई वडील गेल्यानंतर लग्नाचा विचार केला नाही का?”

तो हसून म्हणाला, “मला कळतं की जगातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. म्हणून जे समोर येते, ते चांगले बनवण्याचा प्रयत्न मी करीत असतो.”

त्याच्या त्या सहज हसण्याने मला आत खोलवर चिंब भिजवून टाकले.

निघतांना मी त्याला म्हणालो “प्रशांत! जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन”.

तो हसून म्हणाला “आता खूप उशीर झाला आहे. आता इथेच, या लोकांमध्ये मी आनंदात आहे.” असे म्हणून त्याने हात जोडले.

नोकरीत त्याच्यापेक्षा वरच्या पदावर आपली नियुक्ती झाल्याच्या यशामुळे माझ्या मनांत निर्माण झालेला अहंकार, गर्व 

हे सारे भ्रम एका क्षणांतच विरून  गेले !!

तो आपल्या जीवनात, त्रुटी, कष्ट  आणि  असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचे हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकीत  झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता.

आपण माणसांची पारख, सुख – सुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो. परंतु तो, या सर्वांशिवाय सुद्धा, परत मला मागे टाकून पुढे निघून गेला.

निघताना, त्या ‘कर्मऋषी’ला हात जोडून, भारावलेल्या मनाने मी एवढेच म्हणू शकलो, “तुझ्या या पुण्य कामात, कधी माझी आवश्यकता वाटली, तर माझी आठवण जरूर ठेव, मित्रा!”

सारांश: 

आपले प्रशासकीय पद काय आहे किंवा काय होते, हे खरोखरच महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे हे असते की, माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि कसे बनत आहोत.

मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव 

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

माॅर्निग वाॅकला बाहेर पडले की ट्रॅकवर विविध वयाची, विविध तऱ्हेची माणसं भेटतात.तसाच तिथला निसर्ग ही वेळ काळानुसार बदलता दिसतो. 

अत्ता अत्ता पर्यंत हिरवेगार दिसणारे वृक्ष शिशिराच्या पानगळतीमुळे कसे उघडे बोडके दिसू लागले ते लक्षातच येत नाही. गुलमोहराची लांब लांब छोट्या छोट्या पर्णिका असलेली पाने चवऱ्या ढाळत असतात तर त्यावरील वाळलेल्या शेंगा तुटून खाली पडत असतात.त्यांच्यावर पाय पडला की कट्कन मोडतील इतक्या वाळक्या असतात. जणू निसर्ग कसा वाळत,सुकत चाललाय याची जाणीव करून देत असतात.

आंबा,फणस,वड यासारखी छाया आणि फळे देणारी झाडे जवळपास दिसत नाहीत,पण गुलमोहर,कॅकेशिया सारखी रंगीबेरंगी केशरी,जांभळी, गुलाबी रंगांची फुले असणारी झाडे मात्र रस्तोरस्ती दिसतात ! गंध नसला तरी त्यांची रंगांची विविधता डोळ्यांना सुखवते.थंडीची ऊब गेली रे गेली की सकाळच्या वेळी सूर्याचे आगमन प्रसन्न वाटते.इथल्या झाडांवर भारद्वाज आणि कोकिळा आपले अस्तित्व दाखवू लागतात.राखाडी रंगाच्या चिवचिव चिमण्या अंगणात दाणे टिपताना दिसत नाहीत पण चिमणीसारखाच एक छोटा पक्षी सगळीकडे झाडांवर दिसतो..

होळी जसजशी जवळ येते तसा निसर्गातील बदल अगदी स्पष्ट दिसायला लागतो. वाळकी झाडे, फांद्या होळीच्या ज्वाळेत टाकून सगळं वाईट नष्ट करून नवीन जगण्याला सुरूवात करावी त्याचेच हे प्रतीक म्हणजे निसर्गातील झाडेझुडपे असतात.

आता पंधरा दिवसांतच चैत्र येईल.चैत्राची सुरुवात म्हणजे सृजनाची चाहुल ! मग सुरू होईल खरा वसंतोत्सव ! रंगपंचमीला विविध रंग आणि पाणी उडवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते.सूर्याच्या वाढत्या झळांपासून संरक्षणासाठी निसर्ग आपल्याला छान फळे पुरवतो. कोकम, कैरी यांचे पन्हे शीतल असते तर कलिंगड, खरबूज सारखी फळे थंडावा देतात.आपली संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे हे तर माहिती आहे आपल्याला ! चैत्रामध्ये चैत्र गौरीची पूजा करून आपण तिचा उत्सव साजरा करतो. घराघरातून पन्हं, कैरीची डाळ करून हळदीकुंकू केले जाते.देवीला झोपाळ्यावर बसून झुलवले जाते.देवीची आरास करायची, गुलाब पाण्याचे सिंचन करायचे, वाळा, मोगरा घालून माठातील पाणी सुगंधित ठेवायचे … किती किती तऱ्हांनी आपण चैत्र वैशाखाचा वणवा सौम्य करण्याचा प्रयत्न करतो.

फाल्गुन पौर्णिमा झाली की पुढचे पंधरा दिवस म्हणजे संधीकाल वाटतो मला! उन्हाळ्याची सुरुवात आणि थंडीचा शेवट! सकाळचा गारवा अजून सुखद वाटतो.पहिल्यातून अजून मन बाहेर पडत असते, तर दुसऱ्यामध्ये अजून पदार्पण व्हायचं असतं! असा हा संधीकाल! मन आणि शरीर थोडे अस्थिर होणारच! नवीन वातावरणाला अनुकूल होण्यासाठी शरीरही थोडे कुरकुरत असतेच!

असा हा संधीकाल आयुष्यातही खूपदा डोकावतो. शाळा संपवून पुढील शिक्षणात पदार्पण करताना, शिक्षण संपवून नोकरी, उद्योगात प्रवेश करताना, गृहस्थाश्रम स्वीकारताना आणि नंतर संसारातून मुक्तता घेऊन ज्येष्ठत्त्व स्वीकारताना ! प्रत्येक स्थित्यंतराच्यावेळी थोडेतरी पाऊल अडखळतेच! मन ठेचकाळतं, पुढच्या आशा खुणावत असतात, मन मागेच रेंगाळत असते. असाही एक संधीकाल असतो. जो माणसाला सुखदुःखाच्या उंबरठ्यावर ठेवतो.त्यामुळे वाटते,संधीकाल म्हणजे हुरहूर लावणारा काळ! जो प्रत्येक क्षणाला लंबकासारखा हेलकावे असतो.कधी भूतकाळात तर कधी भविष्यात! वर्तमानाच्या उंबरठ्यावर क्षणभरच टेकतो तो, दोन्हीची सांगड घालीत!

निसर्ग हा नेहमी आशावादी असतो.पडलेल्या बी तून नवीन निर्माण करणारा! झाडाच्या वठत चाललेल्या खोडातही कुठूनतरी कोंब निर्माण करणारा! काही काळ तो सुप्तावस्थेत असेलही पण अनुकूल परिस्थिती येताच तरारून वर येणारा! निसर्गाचा चमत्कार वसंत ऋतूतील पालवीत दिसतो,गुलमोहराच्या केशरी फुलांत दिसतो, तर मोगरीच्या छोट्या कळीत दिसतो.

असा हा संधीकाल मी अनुभवते आहे.-निसर्गात आणि मनात! निसर्ग चिरंतन आहे.तो बदलत्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे.त्याच्यापुढे आपण  तर नगण्य आहोत.छोट्या आयुष्यातले छोटे छोटे बदल स्वीकारताना सुध्दा संधीकालात अडकून पडणारे! पुढे पाऊल टाकू की नको या संभ्रमात असणारे! शेवटी प्रेरणा देणारा तोच आहे, त्यामुळे प्रत्येक संक्रमणात तोच आपल्याला अलगद नेतो.

या संधीकालातून पुढे नेणारा .. आपल्या प्रत्येक पावलावर आशेचा किरण दाखवणाऱ्या नियंत्याला नमन करून सकाळचे प्रत्येक पाऊल मला अधिक ऊर्जा देऊ दे अशी प्रार्थना करत मी सकाळची फेरी संपवते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

आत्तापर्यंतच्या एकूण नऊ लेखांपासून मी माझ्या मतदानाविषयीच्या गोंधळाबद्दल आणि कन्फ्यूजन बद्दल लिहिले आहे. या लेखाद्वारे एक अंतिम गोंधळ आपल्यासमोर मांडतो आहे.

आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता जे दिसते आहे तीच परिस्थिती घटनाकारांना अपेक्षित होती का ? लोकशाही म्हणजे हीच परिस्थिती का ? तसे असेल तर आपल्याला खरेच लोकशाही योग्य आहे का ? नसेल तर आपण लोकशाही योग्य पद्धतीने राबवली नाही असे म्हणावे काय ? शेवटी लहान मुलाच्या हातात एखादे छान, कितीही चांगले आणि भारी खेळणे दिले तरी तो त्याची मोडतोडच करतो. त्याप्रमाणे लोकशाही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये, वृत्तीमध्ये नीट रुजलीच नाही, त्यांच्या हातात घटनाकारांनी ही राज्यघटना देऊन, तसेच तर केले नाही ना ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताची लढाई सुरू केली होती. आज ७५ वर्षाने जाती संघर्षाची लढाई आणि जाती विभाजनाची लढाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हेच अपेक्षित होतं ? प्रजा हीच सार्वभौम ? खरंच तसं आहे ? सर्व समाज घटकांचा समतोल विकास, खरंच होतो आहे ? सर्वांना समान संधी खरच मिळते आहे ? शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व खरंच आज आहे ? समता आणि बंधूभाव हा कुठे दिसतो आहे ?

सत्तर वर्षांपूर्वीची लोकशाही बाबत पाहिलेली स्वप्ने आम्हालाही माहित आहेत. आमच्यापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी मोठे असलेल्यांनी ती आमच्याही डोक्यात भरवली होती. त्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला पाहताना आनंद होईल ?

अशीच परिस्थिती. मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर …….

मी मत का द्यावं ?

मी मत द्यावं का ?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी सातवी आठवीत असतानाची गोष्ट. आम्ही गुजरातमध्ये उंबरगावला राहायचो तेव्हा, तालुक्याचं ठिकाण असलेलं छोटंसं गाव. बाबा तिथल्या एका को ऑपरेटिव्ह बँकेत होते. 

संध्याकाळी घरी आले की तडक ते परसदारातल्या त्यांच्या छोट्याश्या बागेत जायचे. गुलाबाभोवतीचं तण काढ, तुळशीला पाणी दे, अबोलीभोवतीची माती उकर, कडीपत्त्याकडे लक्ष दे – काही ना काहीतरी खुडबुड करायचे ते. 

सुट्टीचा दिवस असला किंवा शनिवारी अर्धा दिवस असला की मग घरात काहीतरी काम काढून बसायचे ते. 

एखाद्या खुर्चीचा डुगडुगता पाय दुरुस्त कर, आरामखुर्चीचं कापड शिवून घे, कंदिलाच्या काचा स्वच्छ कर, झोपाळ्याला varnish लाव, पितळ्याचे कडी कोयंडे ब्रासो लावून घासून पुसून चकचकीत कर – काही ना काही उद्योग चालू असायचे त्यांचे. 

किंवा काहीच नाही तर त्यांनीच बनवलेल्या लाकडी बाकावर बसून सूर्यास्त बघत बसायचे ते, कधी एकटे – कधी आई निवांत असली तर तिच्याबरोबर. 

बाबा घरी यायचे, त्यासुमारास मी खेळून परत आलेलो असायचो. शनिवारी रविवारी घरात कुठेतरी पसरलेला असायचो – चांदोबा, चंपक, किशोर काहीतरी वाचत बसलेलो असायचो. 

ते मला हटकून बोलवायचे. बागेत मदत करायला बोलवायचे, किंवा ते डुगडुगतं स्टूल धरायला बोलवायचे, किंवा काहीच नाही तर बाकावर बसले की सूर्यास्त बघायला शेजारच्या जागी बसायला बोलवायचे. 

मला ते कंटाळवाणं वाटायचं, मी शक्यतो काही ना काही बहाणा काढून टाळायचो, तेही फार आग्रह धरायचे नाहीत.

आज या गोष्टीला तीस चाळीस वर्षे होऊन गेली. आज बाबा नाहीत. ते गावही कधीच सुटलं.

आज मी चिंचवडला एका फ्लॅटमध्ये राहतो, गॅलरीत थोड्याफार कुंड्या आहेत, दुसऱ्या गॅलरीतून संध्याकाळी सूर्यास्त दिसतो. आता कुंड्यांशी खुडबुड मी करतो, गॅलरीतून सूर्यास्त मी बघतो.

पण आता माझी लेक शिक्षणासाठी मुंबईला गेली आहे. 

आज जाणवतं आहे.  आपल्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, बाबांनी काय किंवा मी काय, मुलांना जास्त ठामपणे सांगायला हवं होतं – आग्रह धरायला हवा होता. वरवर जरी त्यांनी नाराजी दाखवली, तरी तुमच्या वागण्या – बोलण्याला ते बघत असतात, त्याने प्रभावित होत असतात, ते आत्मसात करत असतात. 

तुमचा ठसा त्यांच्यावर उमटत असतो.

आणि माझ्या मुलीला आणि तिच्या वयाच्या मुलांना मी म्हणेन, आईबाबा जेव्हा केव्हा तुम्हाला असं बोलावतील, तेव्हा त्यांना प्रतिसाद देत जा, आज नाही म्हणालात तर, माझ्यासारखा, उद्या हा आठवणींचा खजिना तुम्हीही गमावून बसाल.

(आधारित)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ९ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ९ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

एका बाबतीत माझा खूप गोंधळ उडतो.

असं बघा, समजा एक उमेदवार आहे. आपल्या मतदारसंघात उभा आहे. त्याने आपल्या मतदारसंघासाठी खूप कामे केली आहेत. त्याचप्रमाणे त्याने आपली वैयक्तिक कामे सुद्धा केली आहेत. आपले आणि त्याचे संबंध खूप चांगले आहेत. अशावेळी आपण त्यालाच मत देणार ना ?

पण वस्तुस्थिती जर अशी असेल, की आपल्याला माहित आहे, पूर्वी तो नगरसेवक होता, मागील टर्म मध्ये आमदारही होता. त्याचा प्रवास आपण आपल्या गल्लीतून कफल्लक पासून कोट्याधीश होण्यापर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यांने पैसा कशा मार्गाने कमावला आहे हे कित्येक वर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. तो आपल्या मतदारसंघात चांगला असला तरी इतर ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार सगळ्या गोष्टी करतो आहे. मग मी त्याला मत द्यावं का ? जर तो माझ्या मतदारसंघाचे भलं करत असेल आणि मला वैयक्तिकही उपयोगाला पडत असेल, माझ्या सगळ्या अडचणीतून कायम मार्ग काढत असेल, तर मी त्याला का मत देऊ नये ?

पण जर मी त्याला मत दिलं तर पाचशे रुपये आणि दारूची बाटली घेऊन मत देणाऱ्या भणंग मतदाराच्या पेक्षा मी किती वेगळा आहे ?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– २००१ सालची एक आनंददायी आठवण — ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – २००१ सालची एक आनंददायी आठवण – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. ☆

दि. २७ मार्च …. महान तबला वादक आदरणीय श्री. पंढरीनाथ नागेशकर यांची जयंती ! 

त्यानिमित्त त्यांची सुखद आठवण तुम्हां सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते…

माटुंग्याच्या कर्नाटक संघ हॉलमध्ये मी, सुनील आणि आदित्य – एका तबला वादकाच्या कार्यक्रमास निमंत्रणावरून ऐकावयास गेलो. तत्पूर्वी घरी एका कार्यक्रमाची रिहर्सल चालल्यामुळे, कार्यक्रमाला पोहोचण्यास आम्हाला उशीर झाला. आम्ही गेल्यावेळी कार्यक्रम जवळजवळ संपतच आला होता. उशिरा पोहोचल्याबद्दल मला जरा अपराधीच वाटत होतं. त्यामुळे आम्ही शेवटच्या खुर्च्यांवर जरी बसलो, तरी बरेच ओळखीचे चेहरे आम्हाला पाहत होते, येऊन भेटत होते. कार्यक्रम संपल्यावर, त्या तबलजींचे  आभार मानून, तसंच त्यांचे गुरू पंडित सुरेशजी तळवलकर यांना भेटून, आम्ही तिथंच थोडा वेळ गप्पा मारत उभे होतो. तिथं सभागृहाच्या मध्यभागी एक तपस्वी (साधारण ऐंशी-एक वर्षांचे), अनेक शिष्यगणांना आशीर्वाद देत होते. मी सर्वांच्या मधेच जाऊन लुडबुड करणं, मला शिष्टसंमत वाटेना. मी त्या तबलजींना विचारलं, “ते वयस्कर सद्गृहस्थ कोण?” ते उत्तरले, “वे तो हमारे गुरुजी पंडित तळवलकर जी के गुरू हैं – तबला नवाझ पंडित पंढरीनाथ नागेशकर जी!” एकदा मनात आलं, जाऊन त्यांना नमस्कार करावा. पण आपणहून सर्वांच्या पुढं पुढं करणं, हा माझा स्वभाव नसल्याने, मला तिथली काही मंडळी जरी ओळखत असली, तरी मी एका कोपर्‍यात सुनील व आदित्यसवे शांतपणे उभी होते. इतक्यात पंडित नागेशकरजी, नेमके मी उभी असलेल्या कोपर्‍यात त्यांची चप्पल असल्याने, तिथेच आले. त्यांना प्रत्यक्ष समोर  पाहून मात्र ते मला ओळखोत वा न ओळखो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना वाकून नमस्कार केला व म्हटले, “नमस्कार, मी पद्मजा फेणाणी जोगळेकर.” एवढ्यात त्यांनी मला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. ते म्हणाले, “अरे, मी ओळखतो की तुम्हाला. तुम्ही तर केवढ्या मोठ्या कलाकार! तुमचं फार चांगलं आणि मोठं नाव होतंय, हे पाहून मला खूप आनंद होतो. तुम्ही गोव्याला आमच्या घरी येऊन माझ्यासमोर, माझ्या मुलाबरोबर – विभवबरोबर तबल्यावर, शांतादुर्गेच्या कवळे मठाच्या मंदिरात क्लासिकल कॉन्फरन्सची रिहर्सल केलीत.” नंतर काही काळ ते आमच्या कोंकणीतून सुनीलची व आदित्यची चौकशी करत होते. आतापावेतो मी केवळ लाजेने चूर-चूर झाले होते. बापरे, मी त्या तपस्व्याला चेहऱ्याने ओळखू शकले नाही परंतु त्यांनी तर २० वर्षांपूर्वीचे सर्व कथन केले!

एवढ्यात त्यांनी आणखीन एक बॉम्ब टाकला. त्यांचे शिष्यगण त्यांना जेवायला बोलावण्यास आले व म्हणाले, “गुरुजी, लवकर चला, नाहीतर जेवायला मिळणार नाही..!” परंतु गुरुजी कसचे मिश्कील! त्यांनी म्हटले, “जेवण नाही मिळाले तरी चालेल, कारण आता पद्मजा भेटली, पुरे झाले!” यावर आम्ही सगळे दिलखुलासपणे हसलो…. 

या वयातही त्यांची अफाट स्मरणशक्ती, त्यादिवशी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शिष्यांचे प्रेमाने ऐकून घेत, खाली मांडी घालून बसण्याची सहनशक्ती, मिश्कीलपणा, बुद्धिचातुर्य व कमालीचा प्रांजळपणा पाहून मी, माझी बोटे केवळ तोंडात घालायची बाकी होते!! ही मंडळी माझ्यासारख्या लहानांना किती जबरदस्त प्रोत्साहन देतात हे खरेच शिकण्यासारखे होते. 

कार्यक्रम जरी फारसा ऐकायला मिळाला नाही तरी एका अत्यंत गुणी, महान साधू पुरुषाची भेट झाली आणि या दिग्गज कलाकाराकडून प्रेमपूर्वक आशीर्वाद तसंच प्रचंड ऊर्जा मिळाल्याच्या अवर्णनीय आनंदात होते मी!

© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मत कुणाला द्यायचं याबाबतीत माझा गोंधळ होतो आहे. मला आगामी निवडणुकांच्या आत हे ठरवायचं आहे. पण कसं ठरवायचं ? इतक्या वर्षात पाहतो आहे बऱ्याच वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येऊन गेली. पण कुठल्याही सरकारमुळे फार मोठा फरक किंवा बदल झाला असे दिसत नाही. हा थोड्याफार किरकोळ गोष्टी अधिक आणि उणे दोन्ही बाजूने होतात. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असणारे, सरकार किती चांगले आहे हे सांगत असतात. विरोधी पक्षाची मंडळी हे सरकार किती वाईट आहे हे सांगत असतात. सरकार बदललं की माणसं इकडची तिकडे होतात परंतु सत्ताधारी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात विरोधी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात. काहीच फरक नाही. कुठलंही बजेट आलं की हे बजेट कसं चांगलं आहे हे सत्ताधारी पक्ष सांगतात. हे बजेट कसं वाईट आहे हे विरोधी पक्ष सांगतात. विरोधी पक्षातील सत्तेत गेले आणि सत्तेतले पक्ष विरोधात आले तरी विरोधी पक्ष म्हणून जे मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं तेच त्यांच्या विरोधी लोक बोलतात. अधिवेशनाच्या आधी चहापानावर बहिष्कार घालणं हे तर विरोधी पक्षांचे कामच. सतत तीच बातमी. कशासाठी ते चहापान ठेवतात ? आणि माध्यमे तरी या बातम्या जशाच्या तशा का सादर करतात? या सगळ्या गोष्टी पाहिल्या की सत्ताधारी पक्ष कुचकामाचा आणि विरोधी पक्ष मात्र ग्रेट आणि विरोधी पक्ष जेव्हा सत्ताधारी बनतो त्यावेळी तो कुचकामाचा ठरतो. शेवटी वेगवेगळे पुढारी वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात. एकूण विचार केला तर कुठल्याही राजकीय व्यक्तीला सामान्य माणसाच्या प्रॉब्लेम्स मध्ये फार मोठा इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट फक्त स्वतःबद्दल प्रसिद्धी मिळवणे आणि एक विशिष्ट दिशेने समाजमनावर प्रभाव टाकण्याचा म्हणजेच नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणे. एवढेच गरजेचं असतं असं वाटतं. भ्रष्टाचार तसाच चालू असतो. गुन्हेगारी तशीच चालू असते. आत्महत्या तशाच चालू असतात. बलात्कार तसेच चालू असतात. सरकारचं नुकसान तशाच पद्धतीने चालू असतं. दरडी कोसळत असतात. पुरामध्ये हानी होत असते. पुन्हा पुन्हा सगळ्या आपत्ती तशाच पद्धतीने येत असतात जात असतात. कॉपी करून परीक्षा पास होणे हे तसेच वर्षानुवर्षे चालू असते. कोणत्याही सरकारी कार्यालयात कोणतेही काम सहजासहजी न होणे हे तसेच चालू आहे. सरकारी काम आणि चार महिने थांब कधी कधी चार वर्षे थांब. परंतु असेच चालू आहे. न्यायव्यवस्था या नावाची जी व्यवस्था आहे त्याचा न्यायाशी फारसा संबंध आहे असे दिसत नाही. न्याय या नावाखाली जो निकाल मिळतो तो सुद्धा योग्य वेळी कधीच मिळत नाही. सच्चरित्र लोकांचा अपमान करणे. विरोधी पक्ष्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणे. या सगळ्या गोष्टी कुणाकडूनच चुकलेल्या नाहीत. शेवटी कधी कधी असे वाटते की कुणालाही मत दिले तरी आपल्या परिस्थितीत काय फरक पडणार आहे ? जाऊदे कुणी का निवडून येईना. मत द्यावे का मग? का न द्यावे?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी रंगावली… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ सखी रंगावली… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

दोन बोटांच्या चिमटीत अलवारपणे रांगोळी घ्यायची आणि मुक्तपणे जमिनीच्या अंगांगावर, फक्त तिच्यासाठी विविध रंग ढंगाचे, सुरेख, सुबक,कोरीव अमाप अलंकार आपण स्वतः घडवायचे,तिच्या सौदर्यासाठी आपल्या आत्म्याचा आविष्कार करायचा आणि तिला मनभावन करायचं! अहाहा! यातील अत्युच्य आनंद काय वर्णावा…

रांगोळी…अस नुसतं म्हटलं तरी अनेक आकार, आकृत्या, रंग, रेषा,ठिपके सगळं डोळ्यासमोर येऊ लागतं. 

मी कुठेही गेले तरी माझं लक्ष प्रथम दर्शनी रांगोळीकडे जात, त्यात काय नावीन्य आहे, त्यातील कलात्मकता, कल्पकता, सर्जनशीलता माझं लक्ष आपोआपच वेधून घेते. 

खर तर प्राचीन काळापासून घराच्या भिंतींवर, दारात विविध आकार, आकृत्या, सांकेतिक चिन्ह रेखाटून लिंपन केलं जात असे, पण तेव्हा  त्याला रांगोळी  म्हणत नसत. अशी चिन्ह ,आकृत्या शुभसुचक असल्याचं प्राचीन काळी मानत असत.

आपल्या संस्कृतीतही रोज देवघरात, दारात  रांगोळी काढली जाते. रांगोळी  नकारात्मक शक्तीला घरात प्रवेश करू देत नाही अशी समजूत आहे.

रांगोळीची शुभचिन्ह, स्वस्तिक, कमळ, गोपद्म, शंख, देवीची पावलं, ठिपक्यांच्या विविध रांगोळ्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत.विविध सण, समारंभ,  कार्यक्रम, उदघाटन, रांगोळी,स्पर्धा, उत्सव अशा अनेक प्रसंगी मोठं मोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्षवेधी ठरत आहेत.

कुणी फुलापानांची, कुणी धान्याची रांगोळी काढत. कुणी पायघड्यांची तर कुणी पाण्यावर, तेलावरही रांगोळी काढतात.  दक्षिणेकडे तांदुळाच्या पीठाने रांगोळी काढतात. कुणी थ्रीडी रांगोळी काढतात तर कुणी पोर्ट्रेट रांगोळी काढतं.  कुणी देवदेवतांची  थोर व्यक्तीची रांगोळी काढतात. रांगोळीकार, कलाकार, रसिक त्या त्या ठराविक प्रसंगी अशा आपल्या कला, हौस  रांगोळीच्या माध्यमातून सादर करतात आणि प्रसंगाला शोभा आणतात. 

रांगोळी हाती आली की मला काय काढू नी काय नको असं होऊ लागतं. वेगळं काही काढावं अस वाटू लागतं!

अगदी नव्या वर्षारंभी, गुढीपाडव्याची उंच ऐटीत उभी असलेली गुढी, तिला नेसवलेलं हिरवं ,लाल काठाच रेशमी वस्त्र, झेंडूच्या फुलांचा हार आणि साखरेची केशरी माळ,वरचा उपडा केलेला कलश…जसच्या तस माझ्या रांगोळीत अवतरत! चैत्रगौरीची आरास करून झोपाळ्यातील गौरीसमोर तेहतीस प्रतिकांची रांगोळी म्हणजेच चैत्रागण काढताना त्या रेषा नाजूक, सुबक  रेखीव हुबेहूब दिसावीत असा प्रयत्न असतो. आता तर असे मोठं मोठ्या रांगोळ्यांचे तयार छाप ही मिळतात. पण मला ते छाप मारणं म्हणजे आळशीपणा,कामचलावूपणा केल्यासारखं वाटत. 

माझ्या रांगोळी रेखाटन प्रक्रियेतच आषाढी वारीही होते. या वारीतून साक्षात पांडुरंग अवतरतो. त्यासाठी तासनतास गेले तरी त्या पांडुरंगाच मुखकमल तयार होताच उच्च कोटीचा परमानंद मिळतो.

हिरव्या सरींचा श्रावण ,घरात आणि दारातही हिरवीगार रांगोळी माझ्याकडून काढून घेतोच. गणपतीत, रोज एक वेगळी गणपतीची रांगोळी! गौरी आगमनाला, तांब्याच्या गौरी..कलशावर बसवलेले त्यांचे मुखवटे,त्यांचे अलंकार, डोळ्यातील भाव, लाल ओठ,केस, हसरा चेहरा किती किती म्हणून त्यांना रांगोळीने मोहक करू अस होत मला! 

नवरात्रीत ठरलेल्या रंगांप्रमाणे रोज ठरलेल्या रंगाची रांगोळी, पण वैविध्यपूर्ण ,त्यात अमूर्त कलेचाही भाग येतो. अष्टमीला देवीचा मुखवटा रेखाटण्यात खरोखर एक आव्हान असत!

दसऱ्याला आपट्याची हृदयाच्या आकाराची हिरवीगार पानं काढताना, त्यातील शाखा ,उपशाखा तंतोतंत दिसल्या तर ते पान जीवंत वाटू लागतं! 

दिवाळीत, प्रत्येक दिवशी  रांगोळीची  वेगळी नक्षी ! कमळात विराजमान असलेल्या, आशीर्वाद देणाऱ्या महालक्ष्मी आणि गजलक्ष्मी यांची सुबकता ,मोहकता रेखाटताना… माझी आई नेहमी म्हणते आपण कोण काढणारे? ती जगन्माता आपल्याकडून करवुन घेत असते. 

या देवीच्या सेवेसाठी तिच्यासमोर रांगोळीचा पैठणीचा पदर,काठ, त्यातील नाजूक सोनेरी बुट्टे, पैठणीचा ठराविक रंग लक्ष्मीपूजनाच्या भाव भक्ती आणि  हर्षासोबत मनही सौदर्य भावनेने तुडुंब भरून जात.  शेजारी ठेवलेल्या दिव्यांच, पणत्यांच तेज, मनामनात आणि  वातावरणात पसरत असतानाच… त्या पैठणीच्या काठातील जरीची वीण मधूनच सोन्यासारखी चमचमत असते. 

ह्या दिवाळीच्या तेजोमय आठवणी सरत असतात तोपर्यंत येते संक्रांत!

दोन बाय दोन च्या चौकोनात  राखाडी रंगाच्या आकाशाच संध्याकाळीच दृश्य, खाली  हिरवळीवर हलव्याचे दागिने, मंगळसूत्र, कानातले, हळदी कुंकवाचे करंडे, वाटीभरून रंगीत तिळगुळ हलवा…सगळं रांगोळीच्या टपोऱ्या हलव्याचं ह! ” तिळगूळ घ्या गोड बोला” म्हणून सवाष्णींची ओटी भरून वाण देताना ,प्रत्येक मैत्रिणीने माझ्या रांगोळीच कौतुक केलेलं असत. कौतुकाने मूठभर मांस चढलेल असत आणि आनंदाने आतल्या आत ‘मोतीचुर के लड्डू फूटतात!’

मी  कित्येकदा रांगोळी प्रदर्शन बघायला आवर्जून जाते. तिकडे  हुबेहूब वाटणारी व्यक्तिचित्र, रेल्वेगाडी, पक्षी, अनेक निसर्गचित्र सगळं मनाला भावणारं! एके ठिकाणी तर घडी घातलेल वर्तमानपत्र जमिनीवर पडलंय अस वाटत होतं,इतकी सूक्ष्म, रेखीव हुबेहूब, त्यातील प्रिंट अक्षरही जबरदस्त  बारीक रेखाटली होती. खरच अशा महान कलाकारांना, त्यांच्या कलेला सलाम करावासा वाटतो.

मला अगदी सर्व प्रकारच्या रांगोळ्या येतात अस नाही पण हौस म्हणून  मनापासून प्रयत्न मात्र असतो. ठिपक्यांच्या रांगोळ्यापेक्षा  मुक्त, स्वैर  रांगोळ्या काढणं आणि त्यात माझ्या हृदयातील रंगांचं सौदर्य भरण मला फार आवडत. रांगोळीचे विविध रंग तिच्यात ‘जीव’ आणतात. मला तासनतास स्वतःजवळ थांबवून ,स्वतःला माझ्याकडून घडवून घेणारी, माझ्या रोमारोमाला आनंद देणारी, माझ्यात सर्जनशीलतेचे विचार जागृत करणारी माझी सखी रंगावली! तिच्या कायमच्या सोबतीने माझा प्रत्येक दिवस मंगलमय सण होतो! 

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ७ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ७ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी मत देतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्या व्यक्तीच्या विचारांनी आणि त्याच्या वक्तव्याने भारावलेला असतो म्हणून.

मी जेव्हा एखाद्या पक्षाला मत देतो तेव्हा त्या पक्षाच्या वैचारिक आणि राजकीय भूमिकेला माझे विचार अनुरुप असतात म्हणून.

परंतु निवडून आल्यानंतर पुढील काळात वैयक्तिक स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी किंवा तात्पुरत्या काळासाठी का होईना त्या काळाची गरज म्हणून स्वतःच्या अथवा पक्षाच्या पूर्वी जाहीर केलेल्या भूमिकांच्या संपूर्ण विरोधी भूमिकेत शिरतो. तेव्हा मतदार म्हणून मी गोंधळून जातो. या माणसाला मी मत दिले ते योग्य की अयोग्य याबाबत मीच निश्चित काही माझ्या मनाशी ठरवू शकत नाही. अशा परिस्थितीत काय व्हायला पाहिजे?

पक्षांतर बंदी कायद्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही असे दिसून येते. त्या कायद्यातील पळवटांचा यथेच्छ गैरवापर होत असतो असे दिसते. मला असे वाटते जर एखाद्या व्यक्तीने एका विशिष्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली असेल तर त्या पक्षाच्या विरोधी भूमिका असलेल्या पक्षाशी हात मिळवणी करायची असेल तर त्याने राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे आवश्यक आहे. अशी कायद्यामध्ये तरतूदच हवी. मग जरी सगळेच्या सगळे निवडून आलेले व्यक्ती दुसऱ्या पक्षात जाणार असतील तरी त्या सगळ्यांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडून यावे. जर पुन्हा निवडून यायचे नसेल तर ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्याच पक्षामध्ये पुढील निवडणूक होईपर्यंत त्याने असले पाहिजे. अपक्ष आमदाराने सुद्धा जेव्हा सभागृहामध्ये सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाशी हात मिळवणी केली असेल तर पूर्ण पाच वर्षे त्याच पक्षाबरोबर राहावे. अन्यथा त्यानेही राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावे. आपली नवी भूमिका मतदारांना पुन्हा समजावून सांगून त्यांची मते मिळवावीत.

एखादी व्यक्ती बहुमताने निवडून आली असेल तर क्वचित १५ टक्के मते मिळवून सुद्धा निवडून आली असेल. आठ दहा उमेदवारांची यादी ज्यावेळेला असेल त्यावेळेला काही डमी उमेदवार मुद्दाम मते खाण्यासाठी उभे केलेले असतात हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. साधारण दोन माणसांच्यातच लढत होणे आवश्यक आहे. अनेक माणसांच्यात लढत होत असेल तर ती निवडणूक दोन वेळेला घ्यावी. पहिल्या निवडणुकीत त्या उमेदवारांना जी मते पडतील त्यापैकी पहिल्या दोन मतसंख्येतील क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी म्हणजे जरी ६०% मतदान होत असेल तरी किमान त्यातल्या तरी ५० टक्के पेक्षा जास्त लोकांनी निवडून दिलेला उमेदवार हाच बहुमताने निवडून आलेला उमेदवार म्हणण्यास तरी हरकत नाही.

असे होत नसेल तर माझे मत हे योग्य माणसाला दिले असे होणार नाही. मग मी मतदान करावे का न करावे? मतदानावरचा हक्क सोडावा का? पण का सोडावा?

काहीच कळत नाही.

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print