1

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ ते तिघे…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

🍁🍁

👨‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स 👨‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ ते तिघे…!!! ☆ 

(अति लघु व्यथा  (अलव्य) )

@doctorforbeggars

शनिवार… भिक्षेकरी तपासत एका स्पॉटवरून दुसऱ्या स्पॉटकडे जात असताना सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं.

तिथं एक माणूस दयनीय अवस्थेत पडला होता, पडल्या पडल्या वारंवार गुडघ्याला हात लावून विव्हळत होता… रडत होता. 

मी नीट पाहिलं, अर्रे… हा तर तोच… पूर्वी वाढपी म्हणून एका ठिकाणी काम करायचा… कोविड काळात नोकरी गेली… रस्त्यावर आला…. अन्नपूर्णा प्रकल्पात याला डबे वाटण्याचं काम देऊन पगार सुरू केला होता. 

मागच्या वर्षी केवळ वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण गेले होते. 

हा तसा धट्टाकट्टा…! — मी याला म्हटलं होतं, ‘समाज आपल्याला ‘भीक’ देऊन जगवत आहे—चल, आज समाजाला गरज आहे—- आपण समाजाला “रक्त” देऊन “दान” करू— समाजाला परतफेड करू…

हा चटकन तयार झाला होता. याने माझ्या शब्दावर तेव्हा रक्तदान केले होते.

कोरोनाने आजारी असलेले तीन अतिगंभीर रुग्ण, ज्यांना रक्ताची आत्यंतिक गरज होती, परंतु कुठेही रक्त उपलब्ध होत नव्हतं…. हे तीनही रुग्ण याने केलेल्या रक्तदानामुळे तेव्हा वाचले होते. 

मी गडबडीने उतरून त्याच्याजवळ गेलो. मला पाहून त्याने हंबरडा फोडला… मी गुडघा पाहिला… गुडघ्याचा आकार चित्रविचित्र झाला होता… गुडघ्याच्या हाडांचे तुकडे तुकडे झाले असणार, हे लगेच लक्षात आलं.

‘गाडीनं उडवलं सर, मी दोन दिवस इथेच पडून आहे, मला वाचवा सर… खूप दुखतंय हो , या दुखण्यातून मला मोकळं करा सर…’– त्याला भयानक यातना होत असणार…  त्याच्या ओरडण्यातून, रडण्यातून या सर्व वेदना प्रत्यक्ष दिसत होत्या…. कागदावर चित्र दिसते तसे !

त्याच्याकडे बघवत नव्हतं…. तो गुडघा पकडून रडत होता. मोठी माणसं रडताना खूप भेसूर दिसतात…. ! 

आपलं काही दुखत असतं.. आपण कळवळतो … तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु दुसऱ्याचं दुखणं पाहून जेव्हा आपण कळवळतो ती “संवेदना”… ! 

आज जरी हा स्वतःच्या वेदनांनी तळमळत होता… तरी कधी एकेकाळी… दुसऱ्यांच्या वेदना समजून घेऊन, याने रक्तदान करत, तीन जणांना जीवदान देऊन “ संवेदना “ जपली होती…

आज याच्या वेदनेवर फुंकर मारणे हे माझं काम होतं… ! 

आणखी उशीर न करता, रिक्षात घालून त्याला मॉडर्न ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं .

उपचार सुरु झाल्यानंतर, काही वेळातच वेदना थांबल्या. पायाला प्लास्टर घातलं गेलं… आता त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. 

त्याला भेटायला गेलो… डोळ्यात पाणी… चेहर्‍यावर हसू…

दोन्ही हात जोडत म्हणाला, “ सर, तुम्ही मला वाचवलं… नाय तर मेलो असतो रस्त्यावर.  “

जोडलेले त्याचे दोन्ही हात हातात घेऊन त्याच्या कानाजवळ जात म्हणालो, “ तुला एक गंमत सांगू का ?  तुला मी वाचवलं नाही… तुला वाचवलं त्या तिघांनी… ज्यांना कधी काळी तू तुझं रक्त देऊन वाचवलं होतंस… ! “ 

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत गेले…. जणू अविश्वासाने तो माझ्याकडे पाहत होता…

गालावर हळूच चापटी मारत त्याला म्हटलं, “ बघतोस काय असा येड्या माझ्याकडं ? दुसऱ्याला जगवणारा, स्वतः कधी मरत नसतो… ! “ 

त्याने शून्यात कुठेतरी पाहत पुन्हा हात जोडले—- हा नमस्कार  होता, त्या “तिघांना” !!!

२४ ऑक्टोबर २०२१

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ चारिका वारी … आतंरिक नाते ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

गौतम बुद्धांनी संघाला चारिका करण्याचा उपदेश केला. “भिक्खुंनो, बहुजनांच्या हितासाठी ,सुखा- -साठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी आणि देवमनुष्याचे साफल्य, हित, सुख यांसाठी तुम्ही चालत रहा. “— “ सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम ”—-(लेखक आ.ह.साळुंखे )– या पुस्तकातील हा उतारा वाचला आणि मला  वारीची सुरुवात का झाली असेल याचा थोडासा अंदाज आला. नेहमी वाटायचं “का सुरू केली असेल ही वारी ?”

आपल्याकडे तीर्थयात्रा करणे तसे होतेच. पुण्यप्राप्ती व्हावी म्हणून, मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून तीर्थ यात्रा करायचे. पण ठराविकच  काळ किंवा तोच मार्ग असं काही नसतं. वारीला मात्र ठराविक काळ, ठराविक मार्ग, ठराविक मुक्काम, सगळं काही ठरलेलं असतं.  (वारीचं  व्यवस्थापन जबरदस्त असते. अतिशय शिस्तबद्ध , काटेकोर असते.)  सगळ्यांनी एकत्र पायी जाणं, असं का असावं असं नेहमी वाटायचं.

तुकोबांची पालखी देहूवरून अगदी अलीकडच्या काळात का निघत असेल ??  वाटतं तुकारामांनी हा मनातला विचार नारायणाला तर सांगितला नसेल ??? त्यांची इच्छापूर्ती करण्यासाठी नारायणाने देहूवरून इतर वारीबरोबर तुकोबांची वारी सुरू केली असावी . तशी वारी कधी सुरु झाली याचा स्पष्ट , ठाम काळ सांगता येणार नाही . नामदेव , ज्ञानेश्वरांच्याही आधी वारी असावी असं अभ्यासकांचं मत आहे . देहू वरून मात्र तुकोबानंतर नारायणाने तुकोबांची पालखी पंढरपूरला वारीबरोबर नेण्यास सुरवात केली असावी. कारण तुकोबांचे विचार बुद्धासारखेच होते, आहेत.  बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्देशाने चारिका करा. चालण्यामुळे लोकांना धर्म सांगता येतो. त्यांचं कल्याण करता येते. म्हणून एका दिशेला एकजणाने जाऊन लोकांच्या कल्याणासाठी उपदेश करावा. भिक्खुंनी चारिका करावी असं त्यांनी सांगितले. स्वतःही चार दशकांहून अधिक काळ त्यांनी चारिका केली. वारकरी संप्रदायाचे विचार, आचार बघितले तर बुद्धाच्या विचारांचा हा आधुनिक अवतार वाटतो. ठाम मत मांडण्यासाठी माझा तेवढा अभ्यास नाही. इतरांनी लिहिले आहे तेच मांडण्याचा हा प्रयत्न.

विठ्ठल हा बुद्धाचा अवतार आहे असं संतांच्या अनेक  अभंगातून रामचंद्र ढेरे  वगैरेंनी दाखवले आहे.

बुद्ध धम्म जेव्हा भारताबाहेर घालवून दिला, तेव्हा सगळाच्यासगळा जाणे शक्य नसते. काही अंश राहतो, उरतो. सुप्त अवस्थेत, गुप्तपणे कुठेतरी वाढ विस्तार, विकास होत राहतो. उजळ माथ्याने नसेल वावरत पण वेष बदलून धम्म टिकवून ठेवण्याचा प्रयत्न झाला नसेल कशावरून….

चारिकाबद्दल वाचल्यावर तर खात्रीच वाटली. लोकांचे कल्याण करायचे असेल तर चालले पाहिजे. हे असे विचार तुकोबा घरात, मुलांजवळ  बोलत असणार. जिवंतपणी ते साध्य झालं नाही की मागे राहणारे त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक कष्ट घेतात. तसंच हे वारीचे असावे. असं माझे वैयक्तिक मत आहे..

॥ ॥ ॥

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ कोतमीर ☆ मेहबूब जमादार

साधारण 1980 च्या आसपासचे दिवस होते.स्वस्ताई होती. मुबलक भाजीपाल्यांची उधळण होती. शेजारी शेजार धर्माला जागत होता. माणूसकीची जाण होती. दिवस अगदी सुखाचे होते.

नुकतीच सुगी आटपली होती. रानांतली ज्वारी, देशी भूईमूग काढला होता. कोतमीरीला धनं आलं होतं. ते भी पिक शेतक-यानीं काढलं होतं. सगळी रानं मोकळीच निपचीप पडली होती. नेहमीप्रमाणे कार्तिक महिन्यात हलकासा पाऊस पडला होता.

मी अन वसंता सहज ओढ्याकडे फिरायला गेलो. ओढयाला स्वच्छ पाणी वहात होतं. काटावरल्या झाडांची सावली पाण्यात पडली होती. आंम्ही ओढ्याकडे सिताफळ, मोराचे पीस गोळा करणेस नेहमी जात असू. आमच्यात तसा थोरला म्हणजे शंकर आबा होता. फिरतानां आमच्या एक गोष्ट लक्षात आली. आमच्या मळ्यात सगळीकडे पालेदार कोतमीर ऊगवली होती. ती पेरली नव्हती पण झडलेल्या धन्यांच्या बियांमूळे ती सा-या रानांत पेरल्यासारखी ऊगवून आली होती.हिरवीगार कोतमीर पहातानां डोळं ठरत नव्हतं.

त्याच दिवशी शंकरआबाला सांगितलं तसं तो म्हणाला,

“ऊद्याच सगळी कोतमीर उपटून गोळा करू.दहा पैशाला एक अशा पेंड्या बांधू.परवा गुरूवार आहे.येरवाळी जाऊ अन बाजारात विकून चैनी करू”

हे ऐकल्यावर आमचे चेहरे खुलले.बेत चांगला होता. त्याला खर्च कांहीच नव्हता. बरं कोतमीर घेवून जायला तिघांच्याही सायकली होत्या.

बुधवारी सायंकाळीच आंम्ही तिघानीं कोतमीर उपटली. त्यात कुठं तण आलं तर ते वेगळं केलं. पानमळ्यांतनं वाळलेल्या केळांच सोपट आणलं. त्याच्या पेंड्या बांधता येतील अशा बारीक वाद्या केल्या. राती जेवनांआधी त्या सगळ्या पेंड्या एकसारख्या बांधल्या. एका पोत्यावर पाणी मारून त्या बैजवार ठेवल्या. पेंड्या मोजल्या जवळ जवळ अडीचशे पेंड्या भरल्या.

दुसऱ्या दिवशीं येरवाळी ऊटून त्याच्या तीन वाटण्या केल्या. त्या सायकलच्या क्यरेजवर बैजवार बांधल्या. पडू नयेत म्हणून त्या दोरींन बांधल्या. तिघांची जेवनं एका पिशवीत घेतली. ऊजाडताच निघालो. कांहीवेळा चालत तर कांही वेळा सायकलवर बसून इस्लांमपूरची गणेश मंडई गाटली. खाली शंकरआबाची लुंगी अंथरली. त्याच्यावर सगळ्या पेंड्या ठेवल्या. आसपास सगळीकडं पाहीलं. सगळीकडं कोतमीर विकायला आली होती. मला तरं वाटलं अख्खा तालुका कोतमीर विकायला तिथं आला होता.

तास गेला. दोन तास गेले. पण कोतमीर ला गि-हाईक काय भेटनां. चार दोन यायची पण कोतमीर न घेताच हसत निघून जायची. हिच परिस्थिती सगळीकडे होती.

आंम्ही तिघं कोतमीरकडं मोठ्यां आशेनं बघत होतो. कोतमीर आमच्याकडं दिनदुबळ्या नजरेनं पहात होती.

आंम्ही कोतमीर जवळ बसून होतो. तोवर वाडीतला म्हादण्णा आला. आमच्याकडं बघून तो म्हणाला,

“गड्या,तुमची वेळ चूकली”

“कावं आण्णा?”

“आरं मी पानं विकायला बाजारातच असतु. तुम्ही हे कोतमीरीचं बोलला असता तर तुमचं याप तरी वाचलं असतं. एक सांगू आज कोतमीर ला कोण इचारत नाय. तरीभी बघा थोडं थांबून”

हे सारं ऐकून आंम्हाला दरदरून घाम फूटला.vकाल केलेल्या कामांवर पाणी पडणार होतं.बरं आम्ही काय सराईत बाजारकरी नव्हतो त्यामूळे कायच अंदाज नव्हता.

दुपारचे बारा वाजले. सकाळी नुसत्या चहावर आलो होतो. कोतमीरीचं चार पैसं मिळाल्यावर भाकरीबरोबर ताजी भजी घेवून जेवणार होतो. तरी बरं आंम्ही तिघानीं बरोबर जेवन आणलं होतं. पण कोतमीर विकल्याबिगर खायाचं कसं? म्हणून दम धरून होतो.

बाराचे एक झाले. दोन झाले. तरी एक पेंडीचा खप झाला नाय. सारा बाजार कोतमीरीवर रूसून होता. सगळ्यानीं शेतात अनावधानांन उगवलेली कोतमीर बाजारात आणली होती. सगळा बाजार कोतमीरनं भरला होता. त्यामूळे मालाला आजिबात उठाव नव्हता. पुढंपण काय सुधरलं असं काय दिसून येत नव्हतं.

दोन वाजल्यानंतर शंकरआबानं एक काम केलं, कोतमीरीच्या पेंड्याखाली टाकलेली लूंगी हळूवार काढून घेतली. त्यो आंम्हाला म्हणाला,

“चला लुंगी तरी घेवूया,नायतर ती भी जायाची.”

आंम्ही काय बोललो नाय. मूळात बोलण्यासारखे काय राहिलंच नव्हतं. गुमान सायकली घेतल्या अन पुढं चालू लागलो. कोतमीरीच्या पेंड्याकडं बघायचं धाडस झालं नाय. शंकरआबा अन वसंतानं सायकलवर केंव्हाच टांग मारलीवती. मी सायकलवर टांग मारण्याआधी कोतमीरीकडं बघितलं. एक गाय ती कोतमीर निवांतपणे खात ऊभी होती……!

© मेहबूब जमादार

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 2- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

(उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या.) इथून पुढे —-

संध्याला राहावलंच नाही. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आपल्या बहिणीकडे जाऊन तिनं विचारलं, ‘‘तू  शानूला सांगितला नव्हतास का आजचा आपला प्लॅन?’’

‘‘ताई, सांगितलं होतं गं. सगळ्यांबरोबर तू असायलाच हवीस, असंही म्हटलं होतं. पण हल्ली मुलींना त्यांच्या प्रोग्रॅममध्ये अडवलेलं आवडत नाही. ‘आमच्या मैत्रिणींच्या गेट टुगेदरचं काय?’ असं म्हणाली.’’

‘‘तू नक्की आईच आहेस ना तिची? घरातल्या कार्यक्रमांसाठी आपण घरी असलंच पाहिजे, शेवटी सगळी आपली माणसं आहेत, हे ठणकावून सांगायची हिंमत होत नाही का तुझी? की  मुलांसमोर आपली ‘इमेज’ सांभाळायच्या नादात संस्कार आणि शिस्त गुंडाळून ठेवलीय माळ्यावर? तिच्या बाहेर जाण्याला माझा विरोध नाहीये. दोन कार्यक्रमांचं वेगवेगळ्या दिवशी नियोजन करणं, इतकं साधं आहे ना हे! तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मुलांशी बोला ना घडाघडा.’’ संध्याचं म्हणणं बहिणीला पटलं होतं, पण… हा ‘पण’च फार अवघड होता.

——————————————————————————————————–

‘‘पप्पा, आनंदाची बातमी आहे. आम्ही नवीन ‘एस.यू.व्ही.’ घेतली काल. येतो दुपारी दाखवायला.’’ मनोजरावांचा जावई शंतनू फोनवर सांगत होता. त्यांनी जावयाचं अभिनंदन तर केलं, पण नंतर चिंतेत पडले. नुकताच नव्वद लाख रुपयांचा फ्लॅट घेतलाय, घरात दोन स्कूटर आणि चक्क दोन कारही आहेत. मग पुन्हा ही गाडी का घेतली असावी? त्याच्या आईवडिलांशी किंवा आपल्याशी न बोलता इतका मोठा खर्च?

‘‘तुम्ही का त्रास करून घेताय? तो जावई आहे, त्यांचा त्यांचा संसार आहे. आपण नको बाई बोलायला!’’ सासूबाई बोलल्याच.

‘‘मुलगी-जावई काय फक्त कौतुक करवून घ्यायलाच आहेत का? मुलासारखं मानतो ना आपण त्याला? ढळढळीत दिसतंय की अवाजवी खर्च चुकीचे आहेत. मग हक्कानं आपलं मत सांगायला नको? गरज जेव्हा लालसेचं रूप घेते ना, तेव्हा अनिर्बंध वर्तणुकीला प्रारंभ होतो बघ. फ्लॅटसाठी दहा लाख ज्या हक्कानं दिले आपण त्यांना, त्याच हक्कानं त्यांच्याशी बोलायला हवं. नको तिथे मूग गिळून बसल्यावर त्यांचं चुकतंय हे त्यांना कोण ऐकवणार?’’ मनोजराव म्हणाले.

तनया असो, शानू असो किंवा मनोजरावांचे जावई आणि मुलगी… घरातील मोठ्या मंडळींना आता आपण बोलावं की नाही, असं वाटणं चुकीचं नाही का? जीव तोडून प्रेम करणाऱ्या ज्येष्ठांची जीभ शिस्त आणि संस्कारांच्या बाबतीत अडखळणं, हे बेलगाम जीवनशैलीला खतपाणी घालणारं आहे.

लग्नानंतर मुलांच्या संसारात ढवळाढवळ करायची नसते… अगदी मान्य! पण समोरचा चुकतोय हे दिसत असूनही न बोलणं हा अतिरेक ठरेल. ही वेळ येऊच नये, म्हणून उधळणाऱ्या घोड्यांचे लगाम त्याआधीच आवळले गेले पाहिजेत.

मुलीनं एखाद्या विशिष्ट पार्टीला जाणं अजिबात पटत नसताना आईचं तिला नकार देताना चाचरणं वाईट नाहीये का? ठोंब्या मुलांना ‘बाब्या’ बनवत लोळत पडू देणं आणि बापानं त्यांची कामं करणंही वाईटच. खर्चाला दिलेल्या पैशांचा हिशेब विचारताना वडिलांची जीभ अडखळणंही वाईट. ‘मी तुझ्यावर मुळीच अविश्वास दाखवत नाहीये, पण तू या रकमेचा कसा विनियोग केलास ते मला सांग,’ असंही म्हणता येतं की! ‘पहिला मोबाइल उत्तम चालतोय ना, मग दुसऱ्या मोबाइलचा विषय आता अजिबात काढायचा नाही. त्यापेक्षा हवा तर एखादा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग लाव, मी पैसे देतो.’ हे कमावत्या मुलाला सांगताना वडिलांना अवघडल्यासारखं वाटणं चुकीचं. ‘मैत्रिणीशी फोनवर नंतर बोल. आधी मला या कामात मदत कर,’ हे सांगायला आईनं का कचरावं? करोनामुळे निदान स्वच्छतेच्या बाबतीत बरीच जागरूकता आलीय. नाहीतर महाविद्यालयातून आलेली मुलं न चुकता आल्याबरोबर हातपाय धूत होती का? जर उत्तर ‘नाही’ असेल तर त्याला जबाबदार कोण? नुकतंच शाळेतून आलेलं पोर आल्या आल्या मित्राला फोन करून आजचा गृहपाठ विचारत असे, तर ‘सोन्या, तुझं शाळेत बाईंच्या बोलण्याकडे लक्ष नसतं का? अजिबात असं मित्राला फोनवर विचारायचं नाही. वर्गात नीट लक्ष द्यायचं,’ हे आई-बाबा सांगत नसतील तर ते चुकीचंच नाही का? 

मुलं आपलं ऐकत नाहीयेत किंवा आपल्याला अजिबात न विचारता निर्णय घेत आहेत, हे जेव्हा पहिल्यांदा जाणवतं, तेव्हाच त्यांच्याशी निवांत बोलण्याची गरज असते. ‘तू हे करायचं नाही म्हणजे नाही!’ असं बिनबुडाचं वाक्य फेकल्यास मुलं तात्त्विक मुद्द्यांवर वाद घालून पालकांना नक्कीच निरुत्तर करू शकतात. त्यासाठी त्यांना समजेल, रुचेल, अशा पद्धतीनं समजावून सांगणं गरजेचं आहे. पूर्वी मुलांना सांभाळणं किती सोपं होतं नाही? वडिलांची नुसती चाहूल लागली तरी असतील नसतील तिथून येऊन पुस्तक हातात घेऊन बसत. ‘तोंड वर करून’ बोलायची हिम्मत नसायची (अर्थात त्यामुळे फार कमी घरांमध्ये पितापुत्रात मैत्रीचे संबंध होते हेही मान्य करावं लागेल). पूर्वी मिळतंय त्यात हवी तेवढी मजामस्ती चालायची, पण अवाजवी मागण्यांना थारा नसे. करंजी-लाडूला लज्जत होती! कष्टाची किंमत होती. नात्यांची कदर होती. दिनचर्येला आकार होता. ‘नाही’चा आदरयुक्त धाक होता.  पण आज मैत्रीचे संबंध राखताना तो ‘बडगा’, पालकांचा वाटणारा एक प्रकारचा धाक मिळमिळीत झालाय असं नाही वाटत?

आपल्याच मुलांशी वागताना आपण अत्यंत सुधारलेल्या, नवीन विचारांचे पालक आहोत, मुलांना संपूर्ण मोकळीक देणारे आहोत, त्यांना स्वतंत्र विचारांचे पंख देणारे आहोत, मग आता काही गोष्टींना विरोध केल्यास आपलं दुटप्पीपण उघडं पडेल, अशी भीती वाटते का पालकांना? मग वाटू देत की! पण जिथे हस्तक्षेपाची गरज आहे तिथे बोललंच पाहिजे.

आजच्या मुलांच्या वागण्यातला सगळा समतोल बिघडलाय असं जर वाटत असेल, तर नक्कीच त्याला कारणीभूत आहे पालकांचा चाचरता संस्कार आणि परिणामी ओशाळलेली शिस्त! तुम्हाला काय वाटतं?

समाप्त 

ले: अपर्णा देशपांडे  

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ चाचरता संस्कार नि ओशाळलेली शिस्त!…भाग 1- अपर्णा देशपांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

आईवडिलांनी मुलांचे मित्र व्हावं, असं म्हणता म्हणता आई-वडील म्हणूनच त्यांच्या असण्यात जो आदरयुक्त धाक असतो, तो हरवला. मुलांना मोकळीक देणं, घरात खुलं वातावरण असणं योग्यच. पण त्याचा अर्थ असा नाही, की मुलांची एखादी गोष्ट खटकल्यावर पालकांनी आपली नापसंतीही व्यक्त करू नये. मुलांशी नेमकं  कसं वागावं याविषयी पालकांमध्ये जास्त गोंधळ आहे? की त्यांचं वागणं दुटप्पी आहे? पालकांनी यावर गंभीरपणे विचार करायला हवाय…

उंच स्टुलावर चढून भिंतीवरचं कोळ्याचं जाळं काढणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे बघून शोभाताई ओरडल्या, ‘‘अहो, काय करताय हे? खाली उतरा आधी! तरुण पोरं आहेत घरात. त्यांना सांगू ना! उगाच पडलात बिडलात, हाड मोडलं, तर केवढ्याला पडेल ते?’’

‘‘अगं होतंय तोवर करायचं! पोरांना कशाला सांगतेस लगेच? दिवाळी आलीय तोंडावर. आणि तू शंभर वेळा ओरडशील तेव्हा कुठे मुलं ऐकतील कदाचित. वर्षही संपेल तोपर्यंत!’’ नाइलाजानं खाली उतरत, हात झटकत शरदराव म्हणाले.

नवऱ्याचे हे शब्द दिवसभर शोभाताईंच्या मनात घुमत राहिले. त्या विचार करू लागल्या, खरंच, हे असंच होतं हल्ली. मुलं पटकन ऐकत नाहीत, मग आपणच काम हातावेगळं करून टाकू म्हणत पालकच सगळी कामं उरकतात. मुलांपर्यंत जातच नाहीत. परवाचीच गोष्ट- मुलांना सांगितलं होतं, ‘आज मुंबईहून मामा येणार आहेत. उद्या  सकाळी लवकर उठून तयार राहा. त्यांना एका ठिकाणी नेऊन सोडायचं आहे.’ पण मुलं रात्री जागत बसली आणि सकाळी वेळेवर उठलीच नाहीत. शेवटी शरदरावांनीच गाडी काढली. कडक शिस्तीच्या मामांसमोर आपल्यालाच ओशाळल्यासारखं झालं होतं. आणि शिस्तीचं म्हणावं, तर मामाच का, आपले आईवडीलसुद्धा किती शिस्तीचे होते! पहाटे उठणं, रात्री लवकर झोपणं, संध्याकाळी हात-पाय धुवून देवासमोर पसायदान म्हणणं, अशा गोष्टी अंगी भिनलेल्या सहजप्रवृत्ती म्हणून आपण करत होतो. कधी चांगल्या सवयी लागल्या हे समजलंच नाही. पाढे पाठ केल्याशिवाय जेवणाचं ताट मिळत नसे लहानपणी. आपण किती शिस्तीत वाढलो नाही? आपल्या पालकांनी घालून दिलेले नियम आणि शिस्तच आज स्थिर आयुष्य जगण्यास कारणीभूत आहे…’ हा विचार आला आणि शोभाताई चमकल्या. आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या आयुष्यभराच्या पुंजीत नेमकं कोणतं दान टाकणार आहोत? आपण त्यांना योग्य ती शिस्त लावण्यात कमी पडतोय का? या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या.

‘‘मॉम, आम्ही या वीकेंडला विकीच्या फार्महाऊसवर जातोय. शनिवारी दुपारीच निघू.’’ तनयानं सरळ आपला कार्यक्रम जाहीर केला. आईची परवानगी नाही मागितली. आईला अर्थातच ते खटकलं. आज निदान आपली मुलं न लपवता, सांगून सगळं करतात हे जरी योग्य वाटत असलं, तरी मुलीनं असं कुणाच्या फार्महाऊसवर जाणं आपल्याला अजिबात पटलेलं नाहीये, हे चेहऱ्यावर न जाणवू देता मीनाताईंनी विचारायला सुरुवात के ली, ‘‘मुक्कामी का जाताय? कोण कोण आहे? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणं नाही जमणार का? मुली किती आहेत? ’’

‘‘आता तूपण प्रियाच्या आईसारखे ‘ऑर्थोडॉक्स’ प्रश्न विचारणार आहेस का? आमचं ठरलंय गं सगळं. सांगते रात्री क्लासवरून आल्यावर.’’ हे बोलत तिनं स्कूटर सुरू केली आणि आई काही बोलण्याआधीच वेगात निघूनही गेली.

लहानपणापासूनच मनाप्रमाणे वागण्याची मोकळीक दिल्यानं आता नेमक्या कोणत्या शब्दांत मुलीला ‘जाऊ नकोस’ म्हणावं याचा विचार करत मीनाताई तिथेच उभ्या होत्या. ‘हल्ली हे असं का होतंय? का आपण पटकन तनयाला विरोध नाही केला? मुलांना फटकारताना आपली जीभ का चाचरते? ती दुरावतील किंवा दुखावली जातील, असं वाटून आपण गप्प बसतो का? आपणच घेतलेल्या सुधारणावादी भूमिकेमुळे आता आपण अचानक जुन्या मतांचे वाटू अशी भीती आपल्याला वाटते का? बदललेल्या जगण्याशी हातमिळवणी करताना आपणच ओढून घेतलेल्या नव्या कातड्याखाली आपले संस्कार गाडले जात आहेत. हे बरोबर नाही. वागण्यातील कृत्रिमता कधीच मनाला भिडत नसते. आता लेक घरी आली की कडक शब्दात तिला ‘नाही’ म्हणायचं. काय महाभारत व्हायचंय ते होऊ देत.’ असा विचार करत मीनाताई घरात आल्या तर खऱ्या, पण आपल्या कडक शब्दांची धार केव्हाच बोथट झाली आहे, हे जाणवून त्यांना खूप अगतिक वाटत होतं.

मीनाताईंच्या आईनं त्यांना वेळोवेळी जाणीव दिली होती, ‘‘मीने, पोरांना वेळच्या वेळी ठामपणे नाही म्हणायची सवय लाव तू! लहानपणीच थोडं नियमात बसवावं. पाक घट्ट झालेले लाडूही वळत नाहीत गं! मग ही तर स्वतंत्र विचारांची पोरं आहेत. नको तिथे ढील दिली की पतंगही भरकटतोच.’’ आईनं सल्ला दिला होता, पण मीनाताईंना वाटायचं, की जुन्या काळातल्या शिस्तीचे नियम आज कसे लागू होतील? मुलांशी मित्रत्वानं वागायचं, तर थोडं त्यांच्या कलानं घ्यावंच लागतं. पण आता वाटतंय, की  कोणत्या विषयात किती कलानं घ्यावं, याचं गणित जरासं बिघडलंच.

संध्यासमोर तिची भाची बाहेर जाण्याची तयारी करत होती. खरंतर त्या दिवशी घरात सगळ्या मावस-मामे भावंडांचा मेळावा होता, काही भाचेमंडळीही येणार होती. ‘‘शानू, तू बाहेर निघालीस? आज सगळे येत आहेत ना घरी?’’ संध्यानं विचारलं.

‘‘हो गं मावशी, पण आमच्या इंजिनीअरिंगच्या फ्रेंड्सचं ‘जी.टी.’ (गेट टुगेदर) आहे आज. मी येईन रात्री अकरापर्यंत.’’

‘‘अगं, तुझ्या घरी जमतायत ना सगळे? महिनाभर आधीच ठरलं होतं ना हे?’’ आवाजात शक्य तितकं मार्दव आणत मावशीनं विचारलं.

‘‘चिल मावशी ! धिस इझ लाईफ.’’ ओठांवरून लिपस्टिक फिरवत शानूबाई बोलल्या आणि पर्स उचलून उंच टाचेच्या बुटांचा टॉक टॉक आवाज करत बाहेर पडल्या. 

 क्रमशः….

ले: अपर्णा देशपांडे  

प्रस्तुती :  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ स्वप्नाची दुनिया ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

माझ्या व्यवसायात,मला इतके विविध अनुभव येत असतात, नाना प्रकारची  माणसेही भेटतात.

माझे आयुष्य अगदी समृद्ध केलेय ,या अनुभवांनी. कसे जगावे,संकटातही कसे आनंदी राहावे,

हे या निम्न स्तरातील बायकांकडून मी शिकले. 

 माझ्या कडे आया म्हणून  काम करणारी शकू—

फार आनंदी,उत्साही. सतत नवीन शिकायची हौस, आणि  गप्पा मारण्याची तर प्रचंड हौस.

शकू धडपडीही होती. एकदा,तिच्या वस्तीतली एक बाई,कशी कोण जाणे  दुबईला,घरकामासाठी नेली कोणीतरी–झाले–शकू च्या डोक्यातही तेच—

” बाई, दुबईला जायला काय लागते हो करायला ? मी पण जाते की.लै पैसा भेटतो म्हणे.

चार वर्ष गेले, तर जन्माचे कल्याण होते. शेजारची रेखा गेलीय बघा. माजी बी लै विच्छा हाये.

इथे किती राबा, काय चव न्हया बघा. पुरतच नाही पैसा.” 

रोज रोज शकू हेच बोलायची. आमच्या इतर स्टाफचा, चेष्टेचा विषय झाली होती शकू.

रोज विचारायच्या तिला बाकीच्या आया–

” काय शकू,झाली का तयारी दुबईची ?’

मी रागवायची त्यांना–” नका ग असं बोलू. जाऊ दे ना मिळाली संधी तर. ” 

 एक दिवस नवऱ्याला घेऊन आली. तो उर्मटपणे म्हणाला, ” बाई,आत्तापर्यंत झालेला पगार द्या शकीचा–ब्यांकेत टाकत होतात तो–तिचा पासपोर्ट करतोय मी.”

मी हादरलेच हे ऐकून—” अहो, कोण नेणारे तिला? सगळी नीट चौकशी केलीत का.”

” हा.केलीय. आमचा गाववाला हाये. समदं करतोय तो. वीस हजार द्यायचे की तो दुबईला जाब लावून देणारे.” —-मी कपाळाला हात लावला. ” अहो,असे नसते, नीट करा चौकशी.”

” बाई, तेवढे पैशे द्या. मी बघीन बाकीचे.”

दुसऱ्या दिवशी शकू सगळे पैसे घेऊन गेली. आम्ही सगळे हळहळलो. तो उर्मट माणूस डोक्यात गेला आमच्या. दरम्यान,शकूने केव्हाच काम सोडले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. खूप वर्षे झाली ,मीही अनेक गोष्टीत गढून गेले होते.

मध्ये एकदा मंडईत गेले होते. एकदम हाक ऐकू आली—” बाई –बाई, अहो डॉक्टरबाई ” 

मी चमकून बघितले. कैरीच्या मोठ्या ढिगाजवळ बसलेली बाई मला हाका मारत होती–

” बाई,ओळखलं नाही न्हवं. “

” मी शकू नाही का.” 

” अरे हो की–शकू,तू इथे काय करते आहेस? दुबईला ना गेली होतीस? “

“कर्म माझं व.कसली दुबई. या मेल्याने सगळे पैसे खाल्ले.”

मी बघितले, शेजारीच,शकुचा नवरा मान खाली घालून बसला होता. सगळी  गुर्मी उतरलेली दिसत होती. गप गरिबा सारखा बसला होता.

शकू म्हणाली, ” तुम्ही सांगत होतात, तेच खरे होतं हो बाई. कोणी पासपोर्ट नाही केला,न काय न्हाय. पण मग एका  बाईबरोबर मला मुंबईचे काम आले.–घरकाम–ती बाई10 हजार पगार देणार होती राहून. तिची जुळी मुले सांभाळायची. सगळे सगळे काम,करायचे. माझा पिट्ट्या पडायचा हो कामाने. पण बाई चांगल्या होत्या. माझे सगळे पैसे त्या बँकेत टाकायच्या.

मी महिन्यातून  एकदा पुण्याला येऊन भेटून जायची. सासूने बघितले हो लेकरांकडे. या मेल्याला  दिले होते घरातून हाकलून तीन वेळा, मग सुतासारखा सरळ आला बघा. दारू सोडवली मी केंद्रात नेऊन. बाई,चार वर्षे लै राबले बघा. मग इकडे परत आले. त्या 

माऊलीने माझे ४ लाख साठवून दिले बघा. इथे आले,तर शेजारीण घर विकतेय समजले.

मी तिला रोख पैसे देऊन घर घेतले. या बाबाला गाळा घेऊन दिला बघा. आता मस्त जातोय पहाटे ४ ला उठून.” 

 शकुचा नवरा म्हणाला, ” बाईंना घरी नेशील,का न्ह्याय–का नुसतीच माजी गाऱ्हाणी गाशील. 

चा पाज त्यांना.” 

माझ्या हाताला  धरून शकू म्हणाली, ” चला चला,गरीबाच घर बघा चला.” 

जवळच होते शकुचे घर. मला इतके आश्चर्य वाटले, चांगला 3 खोल्यांचा फ्लॅटच  होता की तो.

शकूने घर सुंदरच ठेवले होते. म्हणाली आधी 2 खोल्या घेतल्या, मग या दोन पण घेतल्या.” 

शकुचा मुलगा अभ्यास करत होता. म्हणाला,” बाई,पोलीसात जाणार मी.” दुसरा मुलगा कॉलेज करत होता. शकू  म्हणाली,” लै मस्त चाललंय आमचं. आता बघितला ना,मालक कसा नीट वागतोय ते. आणला वठणीवर बघा.” 

–आम्ही दोघीही हसायला लागलो. तिच्या गाळ्याजवळच माझी गाडी मी लावली होती.

शकूने, मी नकोनको म्हणत असताना,पिशवी भरून कैऱ्या गाडीत ठेवल्या–

” बाई,येत जा.  गरीबांनी, स्वप्ने बघूच नयेत का हो? काय चुकले,मी दुबईची स्वप्ने बघितली त्यात– मला हे  दरिद्री जिणे नको होते हो. आणि  दुबई नाही, पण मुंबई तर भेटली.

मिळाले भरपूर पैसे. राबलेही खूप हो बाई चोवीस तास.”  शकूच्या डोळ्यात पाणी आले.

मी म्हटले,” शकू,आहेस खरी ग बाई जिद्दीची.किती सुंदर मांडला आहेस संसार.”

मी purse मध्ये होत्या , त्या सगळ्या नोटा तिच्या हाती ठेवल्या.तिचा नवरा ही गाडी जवळ आला—-

” बाई,मी खूप चुकलो,पण शकूने  मला साथ दिली. आज हे दिवस तिच्या मुळे दिसत आहेत. ” .

दोघांनी मला हसून निरोप दिला.

—–समाजात अशा अनेक शकू आहेत, की त्यांच्या जिद्दीला आपण सलाम करायला हवा 

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दादा नावाचं रसायन !!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

🍁 मनमंजुषेतून 🍁

☆ दादा नावाचं रसायन !!!! ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

लहानपणी घरात असताना 

माझ्यावर दादागिरी करणारा 

माझ्या प्रत्येक लहानसहान गोष्टीत 

माझ्यापेक्षा लहान होऊन 

आपला हक्क बजावणारा 

दादा…

 

घराबाहेर पडलो की आपोआपच मोठा होतो

माझा हात घट्ट धरून गर्दीमधून सुखरूप नेतो

कधी मी हरवले तर ? म्हणून 

माझ्या फ्रॉकच्या खिशात पत्ता लिहून ठेवतो

तर कधी रस्ता क्रॉस करताना 

माझ्यावर ओरडून मला पळत पळत पैलतीरी नेतो 

हा दादा मला वेगळाच वाटतो

 

आम्ही दोघंही एकत्र वाढू लागतो

कालांतराने चपलांचे साईज बदलतात 

पोशाखाच्या पद्धती बदलतात

दादा जगाला ओळखू लागतो

टक्केटोणपे खाऊ लागतो

तेव्हा जरासा अबोल अंतर्मुख होणारा दादा 

आणखीनच वेगळा वाटतो.

 

काही चुकलंमाकलं तर

पूर्वीसारखा ओरडत नाही

भांडाभांडी करत नाही

उलट जगातल्या चार वेगळ्याच गोष्टी 

हळुवारपणे समजावून सांगतो…

आई-बाबांपेक्षाही,  माझं मोठं होणं

हे दादाच अधिक समजावून घेतो.

 

घरी यायला उशीर झाला की

बाबांच्याही आधी त्याची पावलं चालू लागतात

प्रसंगी हाताची मूठ वळवून 

समोरच्याला कसं शहाणं करता येतं

याचे धडे त्यानंच गिरवून घेतलेले असतात…

माझ्याआधीच दादाला समजलेली असते

बाहेरच्या पुरुषाची नजर

आणि तीच कशी ओळखायची 

हे दादाच समजावून देतो

 

माझं सुरक्षित, स्वाभाविक मोठं होणं

घडू शकतं ते दादाच्या भरभक्कम पाठिंब्यामुळेच

माझं शिकणं, स्वावलंबी होणं…

या सगळ्यात आई-बाबांइतकाच 

मोठा सहभाग असतो दादाचा

 

लग्नानंतर तर बदलतंच जातं 

दादा आणि बहिणीचं नातं

तो समजावून सांगतो बहिणीला 

वैवाहिक जीवनातल्या कालौघात 

बदलत जाणाऱ्या चार गोष्टी 

आणि तशाच समजून घेतो बहिणीकडूनही

चार कानगोष्टी

 

तेव्हाचा दादा तर फारच वेगळा दिसतो. 

आता सहजपणे जमतं त्याला 

घरी असो वा बाहेर 

माझ्या प्रत्येक कृतीकडे 

एकाच वेळी समवयस्क म्हणून पाहणं 

आणि मोठेपणही पेलणं.

 

कुठून आणि कसा शिकतो हे दादा

मला कधीच कळत नाही 

दादा नावाचं रसायन 

काही केल्या उलगडत नाही.

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

☆ मनमंजुषेतून ☆ गाणं नेमकं कसं सुचतं?….गुरू ठाकूर ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆ 

2019 ची कोजागरी पौर्णिमा मला आजही आठवते.तारीख होती 13 October 2019 कोजागिरी निमित्त मी आणि राहुल रानडे “मैफिल शब्द सुरांची ” हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात  करत होतो. गाणं सुचण्याची प्रक्रिया आणि त्याला चाल लावण्याची प्रक्रिया यावर चर्चा झाल्यानंतर राहुल रसिकप्रेक्षकांना  म्हणाला , ” आपण आता गाणं नेमकं कसं सुचतं याचं प्रात्यक्षिकच पाहू, म्हणजे तुम्ही एक विषय आणि शब्द गुरूला द्यायचे आणि तो इथल्या इथे तुम्हाला गाणं लिहून दाखवेल” . रसिक अर्थातच उत्साही. त्यांनी विषय निवडला रोमॅण्टिक साँग..  दिलेल्या शब्दात  मुक्त छंदात कविता लिहिणे सोपे पण गाणे ते देखीलछंद आणि वृत्त सांभाळून  कारण पुढे राहुल त्याला चाल ही लावतो त्या मुळे  धुवपद म्हणजे मुखडा आणि शिवाय एक कडवे असं गाणं बसवणं म्हणजे सत्वपरीक्षा . तरीदेखील रोमॅंटिक सॉंग आहे म्हटल्यावर होईल असा एक विचार डोक्यात आला  तेवढ्यात प्रेक्षकातून कोणीतरी म्हणालं की आज कोजागिरी आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला जे शब्द देऊ त्यात कोजागिरीच्या रात्रीचे रोमांटिक सॉंग लिहा. इथे माझ्या पोटात गोळा आला. कारण या सगळ्या करता वेळ जास्तीत जास्त दहा मिनिटांची असते.

यावर मी काही बोलण्या आधीच राहुल म्हणाला , “हो हरकत नाही सांगा शब्द.” आणि मग रसिकांकडून शब्द येऊ लागले. आणि माझ्या लक्षात आले की रसिक हे खरेच मराठी रसिक आहेत. त्यांनी दिलेले शब्द आशय विषयाला धरुन आणि गेय होते. ते असे होते..

मिठी ,चांदणे, स्पर्श, हुरहूर, कोजागिरी,सूर,

 डोळे, मधुरात्र, सागराची गाज, ओढ,रात्र,

मी शब्द कागदावर उतरवता उतरवता डोक्यात त्यांची जुळवाजुळव करत होतो.. इतक्यात कोणीतरी म्हणाला फितूर.. आणि मला नाहीच सापडणार असं वाटता वाटता सेलोटेपचं टोक सापडावं तसं गाणं सापडलं..  अतिशय अवघड वाटणारा पेपर त्यादिवशी पाच मिनिटातच सोडवून झाला..हेच ते गाणं——  

                              फितुर डोळे गुंतता ,

                                                मधुरात्र झाली बावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                साजरी कोजागिरी —-

                              कोवळी हुरहूर आहे 

                                                 स्पर्शवेडा सूर आहे 

                              या रुपेरीशा घडीला 

                                                 प्रीतीचे काहूर आहे —-

                              वाजू दे प्राणात 

                                                  आता मिलनाची पावरी 

                              ये मिठीतच होऊ दे 

                                                   साजरी कोजागिरी —–

— गुरू ठाकूर

संग्राहक :- सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

 🌸  मनमंजुषेतून  🌸

☆ अल्लड अवखळ मन ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

मायेच्या हळव्या स्पर्शाने फुलते

नात्याच्या गंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे

का होते बेभान कधी गहिवरते—-

मन…कधीच न उलगडणारे कोडे… शब्दात न मांडता येणारे मन वेडे.. आकाशासारखे अथांग… सागरासारखे गहिरे.. क्षणात फुलणारे… क्षणात कोमेजणारे .. सावरणारे …अडखळणारे,

तर कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे मन….

किती  सांगावी महती या मनाची.. मन चंगा तो कटोती  मे गंगा असे म्हणतात म्हणूनच उत्तम शरीराबरोबरच मनही निरोगी असणे तितकेच गरजेचे आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर असते. यासाठी मनाला नेहमी चांगल्या गोष्टीत गुंतवायला हवे.

आपण इतरांची मने जपण्यासाठी खूप काही करतो. स्वतःच्या आशा अपेक्षांना मुरड घालतो पण या सर्वांची मने जिंकताना आपल्यालाही एक मन आहे हे साफ विसरून जातो. कधीतरी आपलेच मन आपल्याला विचारेल की, माझ्यासाठी तू काय केलेस? आहे उत्तर?….

योग्य आहार ,विहार, व्यायाम याने जसे शरीर चांगले राहते तसेच छंदाची जपणूक, चांगले मित्र, छान पुस्तक वाचन, गायन, वादन, बागकाम … मनापासून आवडणारे कोणतेही काम हे भरभरून आणि आनंदाने करायला हवे. थकलेल्या शरीराला जसे स्फूर्ती येण्यासाठी टॉनिक देतात तसेच आपले छंद आपल्या मनासाठी टॉनिक म्हणून काम करतात…

स्वतःचे ही मन जपा. त्याला काय हवे-नको ते बघा. त्याचेही कोड कौतुक करा.सकारात्मक विचारांनी त्याला फुलवा.आनंदी क्षणात भुलवा ..मग बघा जीवनाचे इंद्रधनुष्य कसे सप्तरंगानी बहरून येते…

    नजर को बदलो

नजारे बदल जायेंगे

    मन को बदलो

धूप मे भी छांवको पाओगे—–

 

© सौ. स्वाती रामचंद्र कोरे

खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 🌸  मनमंजुषेतून  🌸

☆ दिवाळी  कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

दिवाळी गोवत्स द्वादशी पासूनही साजरी करतात. गुरुद्वादशी असंही म्हटलं जातं. खेड्यात  गोधनाला खूप महत्त्व असल्याने पूर्वीपासून आताही गाय-वासराची किंवा त्याच्या फोटोची पूजा करतात. शिष्य गुरूंचे पूजन करायचे. मात्र आज ही प्रथा फारशी दिसत नाही.

धनत्रयोदशी दिवशी पूर्वी आणि आताही व्यापारी वह्या आणि तिजोर्यांची पूजा करतात. धन्वंतरी जयंती असल्याने वैद्य डॉक्टर त्याची पूजा करतात. पूर्वी आणि आताही. पूर्वीची आणखी एक प्रथा कणकेच्या तेलाचा दिवा घराबाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जायचा. आणि सर्वजण मिळून सूर्याला प्रार्थना करायचे मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह त्रयोदश्यां  दीपदानात सूर्यज प्रियतां मम . आज क्वचित ठिकाणी हे दिसते. पूर्व परंपरेनुसार   क्वचित  ठिकाणी ब्रह्मास्त्राच्या  प्रतिमेची , निर्जळी उपास  करून, पुरणाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. ही प्रथा आज फारशी माहित नाही पाण्याचे हांडे  घासूनपुसून तेही पूजले जायचे.आज गिझर आणि गॅस असल्याने हांडे कोठे दिसत नाहीत. नरक चतुर्दशी दिवशी चे अभ्यंगस्नान आजही आहे. पण पूर्वी इतका मसाज करणे होत नाही. पूर्वी तीळ, खसखस, वाटून ते उटणे अंगाला लावत. आज उटण्याची तयार पावडर मिळते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जायचे. आज कारिट कोणाला माहित असेल असे वाटत नाही. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णू आणि कुबेर आणि घरातील दागदागिने यांची पूजा केली जायची.तसेच अलक्ष्मीचा नाश व्हावा म्हणून घरातला कचरा काढणारी केरसुणीची पूजा करून दमडी आणि सुपे वाजवून बाहेर टाकला जायचा. आजही काही ठिकाणी हे चित्र दिसते. काही घरात, घरातली स्त्री समाधानी, आनंदी रहावी , म्हणून गृहलक्ष्मी  म्हणून तिची पूजा केली जाते. पूर्वीचे फटाके आणि आता चे फटाके यातही खूप फरक पडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री जागवत असत. पगडी पट मांडला जायचा .खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. आता नवीन पिढीला पगडी पट हा खेळ आणि ते नावही माहीत नसावे. पाडव्यादिवशी खेड्यात लव्हाळीची दिवटी करून त्याने गायी वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे . यादिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत करून, त्यावर दुर्वा फुले  खोचून , कृष्ण गाई वासरे यांची चित्रे त्यावर मांडून पूजा आणि मिरवणूक काढण्याची  प्रथा होती ही प्रथा आज फारशी दिसत नाही. पत्नी पतीला ओवाळण्याची पद्धत पुर्वापार आहे.फक्त देणे-घेणे वाढले आहे. भाऊबीज, या दिवशी भावाने घरी न जेवता बहिणीकडे जेवावे, आणि तिने भावा प्रति प्रार्थना करून कुशल चिंतावे.”हातजोडी ते उगवत्या नारायणा, जतन कर देवा ,माझा बंधूजी  राणा”. असे म्हणून ओवाळावे. ही प्रथा आज आहे . फक्त भेटवस्तू देण्यात फरक पडलाय.

दिवाळी हा सण नात्या नात्यांशी इतकंच काय पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीशी भाव बंधनांनी आणि आत्मीयतेने जवळीक आणणारा असा  हा सण !कालच्या दिवाळीतला आनंद, चैतन्य ,उत्साह, यात बदल होतच राहणार. काल आणि आज प्रमाणे उद्याच्या दिवाळीतही फरक पडणारच. लाईटच्या माळा, भडक सजावटी, मिठाया ही सगळी आनंदाची बाह्यरूप. खरी दिवाळी मनांकडून  मनाकडे. एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम जिव्हाळा आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची.

   “सर्वांना दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, शांतीची आणि आरोग्यदायी जावो”

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈