मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चिमुटभर आपुलकी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ चिमूटभर आपुलकी… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

रोजच्याप्रमाणेच आजही तो घाईघाईत कामावर निघाला. आणि दोनच मिनिटांत घरी परतला. बेल वाजल्यावर आईने दार उघडलं, तिला वाटलं – हा बहुधा डबा, किल्ली, पाकीट काहीतरी विसरला धांदरटपणे. पण तो घरात शिरलासुद्धा नाही. दारातूनच आईला म्हणाला, “मी निघालो तेव्हा तू आंघोळीला गेली होतीस. तुला टाटा केला नव्हता, म्हणून परतलो. टाटा. चल, मी पळतो.” म्हणत तो परत गेलापण. आज त्याची रोजची ९:१३ चुकणार होती. पण त्याच्या आईच्या चेहऱ्यावर आज दिवसभर हसू राहणार होतं.

आज ऑफिसासाठी डबा भरताना, तिनं एका छोट्या डबीत लिंबाचं लोणचं घेतलं होतं. तिच्या ऑफिसमधली स्मिता परवा दुसऱ्या कोणाला तरी सांगत होती, तिला सध्या लोणचं खावंसं वाटत होतं म्हणून. 

आज तो ऑफिसहून घरी येताना, गरमागरम बटाटेवडे घेऊन आला होता. त्याचे निवृत्त वडील चाळीतल्या त्यांच्या घरासमोरील व्हरांड्यात बसले होते. याने त्यांना ते वडे देऊ केले. हा शाळकरी असताना, त्याचे वडील ऑफिसमधून येताना, कधीकधी, त्याच्यासाठी असंच काहीतरी चटकमटक आणायचे. त्यांना ते आठवलं आणि मोतीबिंदू झालेले त्यांचे डोळे चष्म्याआडून लुकलुकले. 

त्याच्या गिरणीत – कंपनीत हडताळ चालू होता. खर्च भागवताना तो मेटाकुटीला आला होता. बायकोशी त्याचं यावरूनच बोलणं चाललं होतं. एवढ्यात त्यांचा दुसरीतला मुलगा आपली पिगी बँक घेऊन आला, त्याला दिली आणि म्हणाला, “बाबा, हे घ्या. माझ्याकडे चिक्कार पैसे आहेत.”

लेकीच्या कॉलेजमध्ये आज “साडी डे” होता. हिने आज तिच्या आईची आठवण असलेली तिची सर्वात लाडकी साडी लेकीला दिली.

ऑफिसमध्ये तो तसा कडक शिस्तीचा बॉस म्हणून ओळखला जाई, पण चहा पिऊन परतताना तो रोज वॉचमनसाठी चहा घेऊन येई, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.

त्याचे वडील रस्त्यावरील एका अपघातात अचानक वारले. हा जेमतेम कॉलेजमधून बाहेर पडलेला. दोन वर्षांपूर्वी ज्या मित्राशी भांडण झाल्याने अबोला धरला होता, तो आला, आणि पैशाचं एक पाकीट त्याला देऊन गेला, “राहू देत, लागतील,” म्हणाला. 

आज ती एक नवी रेसिपी ट्राय करत होती. Sugar free टॅब्लेटस् घालून मिठाई करत होती. सासूबाईंना मधुमेह असल्याने, कालच एका बारशाला तिने त्यांना गोडधोड खाऊ दिलं नव्हतं.

माहेरी असताना लाडकं शेंडेफळ म्हणून खूप नखरे होते तिचे. आज ती आई झाली होती, लेकाला सर्दी झाली होती. रात्री झोपला की शेंबडानं नाक चोंदायचं लेकाचं. त्याला कडेवर उभं धरून, ही रात्ररात्र बसून रहायची. 

आज तिचा वाढदिवस होता. हा ऑफिसमधून येताना एक मस्त सुवासिक गजरा घेऊन आला तिच्यासाठी, आणि नाटकाची दोन तिकिटं.

या धकाधकीच्या जीवनात, सुख मिळवण्यासाठी दरवेळी वारेमाप पैसा खर्च करायची गरज नसते. ही चिमूटभर आपुलकी पुरते, घेणाऱ्यालाही आणि देणाऱ्यालाही.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ रामायण… ☆ श्री सुनील काळे 

माझ्या लहानपणी दर श्रावण महिन्यात आमच्या पाचगणीच्या घरी वर्षातून एकदा सत्यनारायणाची पुजा असायची. या संपूर्ण महिन्यात एका धार्मिक ग्रंथाचे रोज रात्री जेवणानंतर अध्यायवाचन व्हायचे. माझे वडील जरा धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांनां फार उत्साह असायचा. एकत्र कुटूंब पद्धतीने आम्ही राहायचो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या भरपूर होती. त्यावेळी जेवणानंतर सगळेच्या सगळे एकत्र बसायचे. कान देऊन माना डोलवत सगळे ऐकत राहायचे. वडील प्रत्येक ओळ वाचली की सर्वानां अर्थ समजून सांगायचे. दरवर्षी कधी हरिविजय, रामायण किंवा नवनाथांच्या कथांचा अध्याय लावला जायचा. त्या प्रत्येक अध्यायावर पहिल्या पानावर ब्लॅक ॲन्ड व्हाईट पेनने काढलेली रेखाचित्रे असायची. मी चित्रे पहात बसायचो. कधी कधी पाचगणीच्या लायब्ररीत चांदोबा किंवा अमर चित्रकथेची कॉमिक्स वाचायला मिळायची. ग्रंथपाल असलेले कमरुद्दीनचाचा आम्हा लहान मुलानां ती पुस्तके  फुकट वाचायला द्यायचे. त्यासाठी एक वेगळे कपाट विद्यार्थी वाचनालयात ठेवलेले असायचे.

बालवयात हाताने काढलेली ती रेखाचित्रे पाहून मी आचंबित व्हायचो. ती चित्रे पाहणे, त्याच्या कॉपी करणे, त्यांचा संग्रह करणे याचे नंतर वेडच लागले. पण आपणही कधी कॉमिक्स करू असे त्यावेळी जराही वाटले नाही.

पुण्यात अभिनव कला महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थी सहाय्यक समिती व महानगरपालीकेच्या घोले रोडवरच्या आंबेडकर वसतिगृहात राहत होतो. त्या रस्त्यावर नेहमी येणे जाणे व्हायचे. कोणी तरी सांगितले अमर चित्रकथा या कॉमिक्स कंपनीची पुस्तकातील चित्रे काढणारे चित्रकार प्रताप मुळीक या रामचंद्र सभामंडपाच्या गल्लीतच राहतात. मग एकदा मोठा धीर एकवटून त्यांच्या पहिल्या मजल्यावरच्या घरी गेलो. मला कामाची गरज तर होतीच पण त्यापेक्षा प्रताप मुळीक दिसतात कसे हे पाहण्याची उत्सुकता खूप होती. अतिशय शांत स्वभावाचे, उंच, सडपातळ शरीरयष्टी, पँट व पांढरा झब्बा घातलेले, बुल्गानिन दाढी व डोक्यावर उलट्या दिशेने फिरवलेले केस व मिस्किल हास्य असलेले मुळीक सर पहिल्याच भेटीत आवडले. आणि त्यांनी कसलीही अट न ठेवता त्यांच्या मुलाच्या मिलींद मुळीकच्या परस्पेक्टीव्ह रेंडरींगच्या कामासाठी स्टुडिओत येण्याची व काम करण्याची परवानगी देखील लगेच दिली.

प्रताप मुळीक एक अफाट अलौकीक बुद्धीचे व्यक्तिमत्व आहे हे लवकरच लक्षात आले. त्यांचा मानवी शरीरशास्त्र व पौराणिक चित्रकथा काढण्यासाठी लागणाऱ्या सर्वच क्षेत्रातील व्यासंगाचा आवाका फार मोठा आहे हे लक्षात आले. उदा. पुरातत्व विभागातील वस्तूंचा, इमारतींचा, यथार्थदर्शनशास्त्राचा (परस्पेक्टीव्हचा ) ऐतिहासिक वस्तूंचा, तलवारी पासून त्या त्या काळातील प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा, प्राण्यांचा, घोडागाडी ते अत्याधुनिक गन्स, रेल्वे, जीप्स, वाहने, झाडे, डोंगरदऱ्या, आभुषणे, वेशभूषा यांचा इतका प्रचंड अभ्यास होता की कॉमिक्सचे स्क्रिप्ट आले की दोन तीन तासातच त्यानां संपूर्ण कॉमिक्सची चित्रे डोळ्यांसमोर दिसत व त्याच्यां मुक्त फटकाऱ्यांच्या शैलीत राम, कृष्ण, बुद्ध, येशू, महावीर, वेगवेगळे संत, महंत, छत्रपती शिवाजी महाराज, अनेक थोर साधुपुरुष, महाराणाप्रताप ते शुजा, इन्स्पेक्टर विक्रम, नागराज, अमिताभ, अशी अनेक दृश्य अदृश्य सजीव, निर्जिव काल्पनिक व वास्तव पात्रे कागदावर पेन्सिलने उमटत. कधी आकाशातून, कधी डोंगरावरून, कधी समोरून, कधी खूप खालून दिसणारी वेगवेगळया प्रतलांवरची त्यांनां चित्ररेखाटने सहज करताना पाहून  पाहणाऱ्या आमच्यासारख्या नवशिक्या चित्रकारांचा मेंदू बधीर व्हायला लागायचा. वाटायचे किती काम करायला पाहीजे. सतत रेखाटने करायला हवीत. समोर दिसते ते  दृश्य मग ते घर, ऑफीस, शाळा, इमारती, दुकाने, रेल्वेस्थानके, बसस्टॉप, झाडे, डोंगर जेजे समोर दिसेल तशी सतत रेखाटने करण्याची सवयच लागली. हात बंद असला तरी मेंदू व स्मरणशक्ती कधी बंद पडू देऊ नका असे बाबा नेहमी सांगायचे. त्यांचा मुलगा मिलिंद साधारण आमच्या वयाचा तो त्यानां बाबा म्हणायचा म्हणून आम्हीसुद्धा त्यांनां बाबा म्हणायचो. स्त्री असो वा पुरुष नुसती ॲक्शन महत्वाची नसते, नुसती शरीराची ठेवण महत्वाची नसते तर माणसे बोलतात कशी ? त्यांचे हातापायाची, बोटांची पेरे, पंजाची ठेवण कशी बदलतात यावर लक्ष द्यावे प्रत्येक चेहरा बोलतो तो नीट पहा असे ते शांतपणे सांगत. मानवी भावभावनांचा अभ्यास करून माणसाचे सुख, दुःख, राग, हास्य, आनंद, क्रौर्य, त्रास अशा भावना चेहऱ्यावर दिसल्या पाहिजेत, प्रत्येक अँगलने त्याचे निरिक्षण करायला पाहिजे यावर त्यांचा भर असे. माणसाची उंची व त्यांच्या आजूबाजूच्या सर्वांचा पोशाख वेगवेगळा असला पाहिजे. समोरचा माणूस साधू असला तर त्याचा सात्विक भाव चेहऱ्यावर आला पाहिजे, दुष्ट वृत्तीचा, गुंड माणूस दाखवायचा असेल तर त्या व्यक्तिरेखेच्या पोशाखातून, त्याच्या ॲक्शनमधून त्याचे कॅरेक्टर दिसले पाहीजे त्यासाठी माणसांचे सतत निरिक्षणे करत राहा असे ते सांगत, पौराणिक मालीकांमध्ये कर्णभूषणे, गळ्यातील हार, हातातली अंगठी असो वा कपाळावरील गंध असो त्याकडे लक्ष द्या. तलवारीची रचना, रथ, त्यांचे घोडे, बैलगाडी, वाघ, सिंह यांचे डोळे त्यातील भाव चित्रात दिसले पाहिजेत अशा अनेक छोट्या गोष्टी स्टुडीओमध्ये रेखाटन करताना ते सांगत असत. ते आमच्यासाठी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते.

आपणही कॉमिक्स क्षेत्रात काम करायचे असे मी ठरवले होते. त्यासाठी रात्ररात्र जागून शिवाजीनगरच्या बसस्टॉपवर आम्ही काही मित्रमंडळी स्केचिंग करत असायचो. पण माझे दुर्देव असे की शिकत असतानाच त्यानां हैदराबाद येथील मोठ्या कॉमिक्स बनवणाऱ्या कंपनीने बोलावून घेतले व प्रताप मुळीक सहकुटूंब हैदराबादला काही वर्षांसाठी शिफ्ट झाले व आमचा कॉमिक्स शिकण्याचा अभ्यासही थंडावला.

१९८७-८८ साली अभिनेता अरुण गोविल, दिपिका यांची रामानंद सागर दिग्दर्शक व निर्माते असलेली ‘ रामायण ‘ ही सिरियल टिव्हीवर खूप प्रसिद्ध झाली, खूप गाजली. त्या कलाकारांना घेऊन अमर चित्रकथा या कंपनीने एक कॉमिक्स केले होते. त्यावेळी मी देखील माझ्या अभ्यासासाठी मुळीकांचे एक हस्तलिखित कॉमिक्स तयार केले होते. त्या संपूर्ण कॉमिक्सची रेखाटने, त्याची कॅलिग्राफी, त्याचे मुखपृष्ठ, अगदी वेळ देऊन मन लावून करताना प्रचंड आनंद मिळाला होता. आज तीन तपानंतर ते हस्तलिखित, हस्तचित्रित, रोटरींग पेनने सुलेखन केलेले  कॉमिक्स बाहेर काढले कारण त्याचा विषय होता ‘ रामायण ‘.

आज वाईला बाजारात गेलो होतो. सगळीकडे रांगोळ्या, भगवे झेंडे, गुढया, लहान मुलांच्या रामायणातील वेशभूषा, रामाची गाणी ऐकून व फेसबुकवरच्या अनेक चित्रकारांची रामायणावरील चित्रे पाहून मी केलेल्या सुनील कॉमिक्सची व मूळ चित्रकार प्रताप मुळीक बाबांची खूपच आठवण आली.

छतीस वर्षांपूर्वीचे एक हस्तलिखित कॉमिक्स माझ्या वडीलांची व प्रताप मुळीकांची आठवण करून गेले.

आता ती ध्यासाने पछाडलेली निरागस ध्येयवेडी माणसे काळाच्या पडद्याआड गेली.

आता उरल्या फक्त त्यांच्या आठवणी…. ‘ रामायण ‘ कॉमिक्सच्या रुपात…….

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृवंदना… ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ मनमंजुषेतून ☆ मातृ वंदना☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

तारखेने 14 जानेवारी, संक्रांत हा माझ्या आईचा जन्मदिन! यावर्षी संक्रांत 15 जानेवारीला आहे म्हणून आज तिचे स्मरण करून वंदन करत आहे…

माझी आई 92 वर्षापर्यंत छान जगली. तिला कोणताही मोठा आजार नव्हता. दोन वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने तिचे निधन झाले- जसे झाडावरून पिकलेले पान गळून पडावे तसे- आत्ता होती, म्हणेपर्यंत ती शांतपणाने गेली… नाही औषध, नाही हॉस्पिटल, काही नाही… ज्या घरात ती 40 वर्षे राहत होती, ज्या कॉटवर झोपत होती, तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला.. त्याही गोष्टीला आता दोन वर्षे होऊन गेली!

संक्रांत आणि आईचा वाढदिवस! या दोन्ही गोष्टी लहानपणापासूनच अपूर्वाईच्या वाटायच्या! मध्यमवर्गीय स्तरातील कुटुंब होते आमचे.. वडील सरकारी नोकरीत शिक्षण खात्यात होते. आई शिवणकाम करायची, शिवण क्लास घ्यायची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या हौशीमौजी  करायची! त्यामुळे कष्टाचे, वेळेचे महत्व आमच्यावर बालपणापासूनच बिंबवले गेले होते तिच्या कर्तृत्वाने! ती कधी वायफळ गप्पा मारत वेळ घालवत नसे. तिच्या हातात सतत काही ना काही काम असे. संक्रांतीच्या दरम्यान तिच्याकडे खूप शिवणकाम असे, पण त्यातूनच वेळ काढून ती हलवा बनवणे, गुळपोळी करणे, तिळगुळ वड्या करणे, हळदीकुंकू करणे हे सगळं साग्रसंगीत करत असे. वाणासाठी वस्तू घेताना सुध्दा त्याची उपयोगिता आणि किंमत बघून  वस्तू घेतली जाई. तिच्याबरोबर बाजार करायला जाणे म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असे. वस्तूचा दर कमी करून घेणे, भाजीपाला घेताना तोही पारखून घेणे, आहे त्या परिस्थितीत कालमानानुसार आमच्यासाठी फळे, भाज्या घेणे, आणि त्यांचे महत्त्व सांगून खायला लावणे हे ती करत असे.रोज दूध देणे जरी परवडणारे नव्हते तरी आम्हाला ती चहा देत नसे. त्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवत असे. गव्हाच्या चिकाची, रव्याची,सातूच्या पिठाची ,

तर कधी तरी खारकेची! ज्यामुळे मुलांना पौष्टिक मिळेल याकडे तिचे लक्ष असे. काजू खायला मिळत नसे, पण शेंगदाणे, हरभरा डाळ रात्री भिजत घालणे आणि सकाळी ते खायला देणे, व्यायाम करायला लावणे यासाठी आई आणि वडिलांचे  लक्ष असे.

ती पूर्वीचे मॅट्रिक होती. तिचे इंग्लिश, अल्जेब्रा- जॉमेट्री, फिजिओलॉजी हायजिन हे विषय चांगले होते.  ती आमचा  अभ्यासही करून घेत असे. वडील एज्युकेशन डिपार्टमेंटला असल्याने महिन्यातील वीस दिवस फिरतीवर असत, त्यामुळे आईच आमच्याकडे सर्वांगीण लक्ष देत असे. अर्थातच वडिलांना घराची काळजी नसे.ती नऊवारी नेसत असे. तिच्याकडे मोजक्याच साड्या असत पण तिचे नेसणे, वापरणे अगदी व्यवस्थित असे.धुतलेल्या साडीची घडी सुद्धा इस्त्री केल्यासारखी नीट करत असे.

माझे लग्न झाल्यावरही ती मला वेळोवेळी मदत करत असे. माझ्यासमोर तिचा चांगला आदर्श असल्यामुळे मी मुलीचे, सुनेचे करताना तिच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला… तिचे बोलणे सुविचारांनी युक्त असे .म्हणींचा वापर सहजगत्या होत असे. चांगला विचार करायला तिने आम्हा भावंडांना शिकवले .आता मी वयाची सत्तरी गाठली तरी अजूनही तिची मला नेहमीच सोबत वाटते. काही संकट, अडचण आली की आत्ता आई असती तर तिने काय केले असते असा विचार आपोआपच मनात येतो. आई हा घरातील नंदादीप असतो, तो आपल्या मनात नेहमीच तेवत राहतो!  ती कायमच आपल्या सोबत असते..संक्रांतीला तिचा वाढदिवस आम्ही  आनंदात साजरा करत असू..

तिळगुळातील तिळाची उष्णता(ऊब), गुळाचा गोडवा आणि तुपाची स्निग्धता तिच्या स्वभावामध्ये उतरली होती. आईचा हा जन्मदिवस संक्रांत सणाला येत असल्याने माझ्या कायमच स्मरणात राहतो!

प्रत्येकालाच आपली आई ही प्रिय असते… तिचे स्मरण व्यक्त करावे म्हणून हा छोटासा लेख लिहिला आहे ! धन्यवाद !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बिझी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

बिझी…” ☆ श्री मंगेश मधुकर

कंपनीत महत्वाची मिटिंग असल्यानं टेंशन होतं. गडबडीत आवराआवर करत असताना बायको म्हणाली,    “ पुढचा सोमवार फ्री ठेव. आत्यांच्या मुलाचं लग्नयं. घरातलंच कार्य असल्यानं तुला यावं लागेल. नेहमीचं ‘बिझी’च कारण देऊ नकोस.”

“अजून चार दिवस आहेत..तेव्हाचं तेव्हा बघू ” 

घराबाहेर पडलो.  नंतर दिवसभर मीटिंग्ज, प्रेझेंटेशन, मोबाईलमध्ये बिझी झालो. रात्री उशिरा घरी आलो. भूक नव्हती पण उपाशी झोपू नये म्हणून दोन घास खाल्ले. 

“ दुपारी काय जेवलास ? ”बायकोनं विचारलं. 

“ जेवलो नाही पण सँडविचेस,वेफर्स आणि कॉफी……”

“ त्रास होतो.मग कशाला असलं खातोस? व्यवस्थित जेवायला काय होतं ? ”

“ अगं,आजचा दिवस खूप पॅक होता. क्लायंटबरोबर पाठोपाठ महत्वाच्या मिटिंग्ज् होत्या. वेळच मिळाला नाही.”

“ हे नेहमीचच झालंय. आठवड्यातले चार दिवस टिफिन न खाता परत आणतोस. दरवेळेस तीच कारणं…”

“ चिडू नकोस. सतत सटरफटर खाणं होतं म्हणून मग जेवायचं लक्षात राहत नाही. डार्लिंग,ऐक ना,आज खूप दमलोय.यावर नंतर बोलू.प्लीज..”–  

“ आज लग्नाला यायला हवं होतसं. सगळे आलेले फक्त तू नव्हतास. प्रत्येकजण विचारत होता.”

“ महत्वाचं काम होतं.”

“ ते कधी नसतं?.”

“ तू,आई,बाबा होता ना… नाहीतरी मी तिथं बोर झालो असतो आणि एक लग्न अटेंड केलं नाही म्हणून काही बिघडत नाही.”

“ नातेसंबंध बिघडतात ”

“ स्पष्ट बोल ”

“ गेल्या दहा वर्षात तू सर्वच समारंभ चुकवलेत. नातेवाईकांशी तुझा कनेक्ट राहिलेला नाही.”

“ सो व्हॉट !! महत्वाची कामं होती म्हणून आलो नाही. त्याचा एवढा इश्यू कशाला? ”

“ कामं तर सगळ्यांनाच असतात. कंपनीच्या पलीकडं सुद्धा आयुष्य आहे.ऑफिसबरोबर घरच्यासुद्धा जबाबदाऱ्या असतात. कशाला महत्व द्यायचे हे समजलं पाहिजे.”

“ ऑफकोर्स, तेवढं समजतं. सध्या करियरचा पीक पिरीयड आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे पर्सनल गोष्टी बाजूलाच ठेवाव्या लागतात.”

“ कंपनीत बाकीचे लोकपण आहेत ना ? ”

“ आहेत. कंपनीत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. सध्यातरी इतर गोष्टींपेक्षा कामाचं महत्व जास्त आहे.”

“ पस्तीशीतच घर, गाडी, बँक बॅलेन्स सर्व मिळवलंस. अजून काय पाहिजे ? थोडा दमानं. जे कमावलयं त्याचा तरी उपभोग घे.” 

“ आराम वगैरे करायला आयुष्य पडलंय. लहानपणापासून पाहिलेल्या स्वप्नाचा एक टप्पा झालाय.  अजून बरंच काही मिळवायचयं. पन्नाशीला कुठं असणार हे ठरलंय.”

“ पन्नाशीचं प्लॅनिंग? बापरे इतक्या लांबचा विचार आताच कशाला? “

“ तुला कळणार नाही. आयुष्य कसं प्लान्ड असावं ”

“ माझ्याशीच लग्न करायचं याचंसुद्धा प्लॅनिंग केलं होतसं का? ”

“ हे बघ उगीच शब्दात पकडू नकोस ”

“ बरं !! गंमत केली.  लगेच चिडू नकोस. एवढंच सांगायचयं की उद्याचा दिवस चांगला करताना ‘आज’ ला  विसरु नकोस.”

“ पुन्हा तेच !! माझ्या प्रायोरीटीज ठरलेल्यात.”

“ तू स्वतःसकट आम्हांलाही खूप गृहीत धरतोस ”

“ म्हणजे ?”

“ प्रत्येकवेळी तुझ्या मनासारखं व्हायला पाहिजे हा हट्ट योग्य नाही. तुला माणसांची किंमत नाही ”

“ असं काही नाही. पैसा असला की माणसाला किंमत येते. आणि सध्या तोच कमावतोय.”

“ बरंच काही गमावतोस सुद्धा. घर, मुली,आईबाबा यांच्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही.”

“ तू आहेस ना ”

“ हो, मला पण आधाराची गरज लागते. मी एकटीच आहे ना. घरात आपण प्रवाशासारखं राहतोय ”

“ पुन्हा तीच रेकॉर्ड नको. अजून काही वर्ष तुला एडजेस्ट करावं लागेल. नो चॉइस !!”

“ आतापर्यंत तेच तर करतेय. आम्हांला नाही निदान स्वतःला तरी वेळ देशील की नाही ? ”

“ काय ते नीट सांग.”

“ आताशा फार चिडचिडा झालायेस. सतत अस्वस्थ, बेचैन, तणावाखाली असतोस. वेळेवर जेवत नाही की झोपत नाहीस. डोळ्याखाली काळी वर्तुळ झालीत. थोड चाललं की धाप लागतीय. तब्येत ठीक नाहीये. कामांच्या नादात दुखणं अंगावर काढू नकोस. मागे ब्लडप्रेशर वाढलं तेव्हाच डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलं..  पण तू साफ दुर्लक्ष केलंस.”

“ आय एम फाइन ”

“ नो,यू आर नॉट. तुला त्रास होतोय पण कामाच्या नादात…..ऐक,डॉक्टरांकडे जाऊ या. सगळया तपासण्या करू.”

“ ओके, नक्की जाऊ. फक्त थोडे दिवस जाऊ दे. आत्ता खूपच बिझी आहे.”

“ कामं कधीच संपणार नाहीत. अजून वेळ गेलेली नाही. शरीरानं इंडिकेअटर्स दिलेत. कामाच्या बाबतीत जेवढा जागरूक आहेस तेवढाच तब्येतीबाबत बेफिकीर आहेस म्हणून काळजी वाटते.”

“ डोन्ट वरी, मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात सुट्टी घेतो तेव्हा डॉक्टरांकडे जाऊ ”

“ प्रॉमिस ? ” .. बायको. 

“ हजार टक्के ” 

बायकोला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळच आली नाही. खरं सांगायच तर दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती. परंतु महत्वाच्या  कामामुळे दुर्लक्ष केलं अन त्याच दिवशी मिटिंगमध्येच कोसळलो. डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो. नंतर कळलं पॅरेलिसिसचा अटॅक आला. जीव वाचला परंतु उजवी बाजू निकामी झाली. जबरदस्त धक्का बसला. वास्तव स्वीकारायला फार त्रास झाला. उतारवयातल्या आजाराला तरुणपणीच गाठल्यानं खूप हताश, निराश झालो. एकांतात भरपूर रडलो, स्वतःला शिव्या घातल्या पण पश्चातापाव्यतिरिक्त हाती काही लागलं नाही. आयुष्य ३६० डिग्री अंशात बदललं. स्वतःला नको इतकं गृहीत धरलं त्याची शिक्षा मिळाली. आधी हॉस्पिटलमध्ये..  नंतर घरात असे दोन महीने काढल्यावर हल्लीच घराबाहेर पडायला लागलोय. संध्याकाळी काठी टेकवत हळूहळू चालतो तेव्हा लोकांच्या नजरेतील सहानभूती आणि कीव करण्याचा फार त्रास होतो. काही दिवसांपूर्वी खूप खूप बिझी असलेला मी आता वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असतो. गॅलरीतून रस्त्यावर पाहताना बहुतेकजण माझ्यासारखेच वाटतात… सो कॉल्ड बिझी ….. उद्यासाठी आज जीव तोडून पळणारे….

…. एक महत्वाचं सांगायचं राहिलं .. .. माझ्या आयुष्यातील घडामोडीचा कंपनीच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. माणसं बदलून काम चालूच आहे. कुठंही अडलं नाही. मला मात्र उगीच वाटत होतं की……. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे  सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच  कारणीभूत आहे.

ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला.

रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे  तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्धगाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.

कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला.  दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.

रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत…

१) कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.

२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी  देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या  रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो  राजमुकुट घेऊन ये.”  राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा , वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.

३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तूदेखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यूयोग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.

४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता.  राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.

५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, “ मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर.” तेव्हा रामाने तिची समजूत घातली. ” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”

…. मग आपण पण तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

संक्रांत असते कुणावर?… लेखक : श्री आनंद देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

संक्रांत ते रथसप्तमी हा कालावधी आमच्या नागरी भागात “ महिला चैतन्य पंधरवडा ” असतो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही. गावभर साड्यांचे चालते बोलते प्रदर्शन असते. आमची माता भगिनी भर दुपारी अंदाजे अडीच तीन वाजता कामाला लागते. अत्यंत उत्साहात भगिनीवर्गाच्या झुंडीच्या झुंडी दुपारी तीन वाजल्यापासून  भन भन,भन भन गावभर फिरत असतात. दररोज नवी साडी, हातात पर्स आणि पायात चपला घातल्या की माउली जे निघते ते पार रात्री आठ वाजता खिचडी टाकायलाच घरी पोहोचते. बरे दुपारी निघतानाचा आविर्भाव ramp (म्हणजे तो नाही का फ्याशन शो मध्ये असतो) वर चालण्याचा असतो. संध्याकाळी घरी परतेपर्यंत कपाळ जगदंबेसारखे कुंकवाने  माखलेले असते. साडी जमिनीला टेकून खराब होवू नये म्हणून उचलून धरताना हात दुखतात तिचे पण वेदना जाणवत नाहीत घरी पोहोंचेपर्यंत. हे साड्या तयार करणारे लोक उंचीप्रमाणे साड्या का तयार करीत नाहीत हे एक आम्हाला पडलेले जुनेच कोडे आहे. साड्यांची जाहिरात करणाऱ्या बहुत्येक सर्व मॉडेल उंचच्या उंच आणि चवळीच्या शेंगेसारख्या आकाराच्या असतात.(लिखाणाला दर्जा प्राप्त होण्यासाठी लेखकाला किती सूक्ष्म निरीक्षण ठेवावे लागते याची नोंद घ्या). तर मग प्रश्न असा उभा राहतो की चवळीला आणि बरणीला एकच वस्त्र कसे चालेल ? असो. तर दरम्यानच्या काळात कुंकवाचा धनी आणि लेकरेबाळे हवालदिल झालेली असतात. ते बिचारे काल परवाच्या आईच्या वाणात काही खायचे आले आहे का याचा निष्फळ शोध घेतात. त्या दिवशीचे हळदी-कुंकू संपवून घरी परत आल्यानंतर बोलून बोलून, बोलून बोलून तिच्या घशाला कोरड पडलेली असते. आपण शांतपणे पिण्यासाठी पाणी आणून द्यावे. हाश-हुश्य झाले की संपूर्ण वृत्तांत ऐकून घ्यावा लागतो. म्हणजे “अमुक एक बाई, किती श्रीमंत पण वाणात लुटले (वाटले) काय तर रुपड्याच्या शाम्पूच्या पुड्या….” किंवा ,”तमुक बाईकडे दिलेले दुध इतके पांचट होते की मला तर  तिथेच कसेतरी होवू लागले…..संपूर्ण पिवूच शकले नाही मी…”  पुढचा डायलॉग संपूर्ण कुटुंबाला सुखावणारा असतो, “कधी एकदा रथसप्तमी येते असे झाले आहे.” त्यामुळे कधी एकदाची रथ-सप्तमी येते असे घरातील मुलांना आणि पुरुषवर्गालापण  झालेले  असते. हे थकव्याचे वैराग्य जेमतेम बारा तास टिकते. नवा दिवस, नवी साडी आणि तोच उत्साह दुसऱ्या दिवशी  असतोच असतो.

त्यात पुन्हा दूर अंतरावरील प्रतिष्ठित घरी हळदी कुंकू असेल तर होयबाला……माफ करा,,,,, नवरोबाला तिला गाडीवर बसवून न्यावे लागते. “तू पटकन हळदी-कुंकू घेवून ये तोवर मी इथे कोपर्यावर उभा राहतो”….यावर “आलेच पाच मिनटात” असे म्हणून ती अदृश्य होते. दहा, पंधरा, वीस मिनिटे होतात. याचे बिचार्याचे व्हाटसअप, फेसबुक पाहून होते तरी हिचा पत्ता नाही.  ‘त्या’ घरात गेलेली आपली माउली कधी बाहेर येते याची वाट पहात तो निरागस जीव  इतका कंटाळतो की इतक्या प्रतीक्षेने तर  विठूमाउलीचे दर्शन सुद्धा झाले असते असे त्याला वाटायला लागते. बरे कोपर्यावर असे आगंतुक उभे राहणाऱ्या पुरुषाला जाणाऱ्या येणाऱ्या महिला विचित्र नजरेने पाहतात त्यामुळे त्याला मेल्याहून मेल्यासारखे होते. आम्हाला साहित्यिक म्हणून ओळखणाऱ्या तर एकमेकीना,”बघ तेच ते…..कसे बेशरम सारखे उभे आहेत, बायका पहात “ असे म्हणत असाव्यात असा आम्हालाच संशय आहे. मग तब्बल चाळीस पंचेचाळीस मिनिटे झाल्यावर आपले ‘मॉडेल’ येतांना दिसते. बायकोच्या भन भन,भन भन फिरण्याला कंटाळलेला पती मग फन फन,फन फन करतो. (किती लयबद्ध वाक्यरचना आहे नाही? यातील संगीत कळण्यासाठी मराठवाड्यातच  जन्म घ्यावा लागतो महाराजा..). “उद्यापासून तुला वाटले तर तू जा , मी अज्जिबात येणार नाही”, अशी युती तोड्ल्यासारखी गर्जना तो करतो यावर ती गालातल्या गालात हसते, कारण तिला माहित असते की आज नाहीतर उद्या पुन्हा युती होणारच आहे.

या दिवसात एखादा मध्यमवयीन (म्हणजे हिंदीमध्ये याला अधेड उम्रका असे म्हणातात, म्हणजे ‘कुणी बाळा म्हणले तरी याला राग येतो आणि कुणी काका’ म्हणले तरी राग येतो.) पुरुष सायंकाळच्या वेळी विमनस्कपणे रस्त्यावर फिरताना दिसला तर हमखास समजावे की,”आज याच्या घरी हळदी-कुंकू आहे” म्हणून. म्हणजे ज्याच्या नावाने कुंकू लावले जाते त्यालाच घराबाहेर काढणारा सण म्हणजे संक्रांत होय. आता कळाले का आपली संस्कृती महान का आहे ते ? आपल्याच घरी जाण्याची सोय नसलेला हा कुटुंब-प्रमुख (?) मग  नियंत्रण सुटलेल्या उपग्रहासारखा भरकटत राहतो. या दिवसात थेटरात संध्याकाळी सहाच्या शो ला आलेले एकटे पुरुष हे असेच “हळदी-कुंकू के मारे” असतात.

अर्थात सगळेच विवाहित पुरुष काही इतके पापभिरू नसतात. चाणाक्ष मंडळी आपल्या घरी हळदी-कुंकू कधी आहे याची अधाश्यासारखी वाट पहात असतात.दिवसभर घरी सहकार्य करणारी  अशी मंडळी  साधारण चार-साडेचार च्या सुमारास जे फरार होतात ते थेट रात्री बारा वाजता, “उगवला चंद्र पुनवेचा”अशा परिपूर्ण अवतारात घरी अवतीर्ण होतात. आपण इकडे हळदी-कुंकू साजरे करीत होतो तेंव्हा आपल्या भाळावरील कुंकवाच्या धन्याने काय रंग उधळले असतील याची माउलीला लगेच कल्पना येते.   पण ती आज नेहमीप्रमाणे सौदामिनीचा अवतार धारण न करता ‘अलका कुबल’ होण्यात धन्यता मानते कारण आज ती तृप्त असते. आज तिच्या नव्या साडीचे, म्याचींग ब्लाउजचे. टिकलीचे, अंगावरील दागीन्यांचे, बैठीकीतील नव्या गालिच्याचे,  फ्लॉवरपॉटमधील फुलांचे, गजर्यातील वेणीचे, केलेल्या पदार्थांचे, लग्न होवून पुण्यात आयटी मधील नोकरी सांभाळून संसार करणाऱ्या आणि  आज संक्रांतीसाठी आलेल्या तिच्या लाडक्या लेकीचे  आणि तिचा जीव की प्राण असणाऱ्या तिच्या घराचे कौतुक झालेले असते. या सगळ्या कौतुकाचा एक ‘ग्लो’ तिच्या चेहऱ्यावर झळकत असतो. एकदाची रथसप्तमी होते आणि ती नव्या उमेदीने पुढच्या संक्रांतीची वाट पहाटते. असो. महानगरातील लोकांच्या नशिबी हे सुख (?) नाही.सुखाचा शोध लागलाच तर इकडेच कुठे तरी लागेल, ग्रामीण नागरी भागात.

लेखक : श्री आनंद देशपांडे, परभणी

संग्राहक : श्री श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ….आणि  फूल  कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ ….आणि  फूल  कोमेजून गळले… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेले वर्षभर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला तोंड देणारी आमची प्राजक्ता गेली…हे जरी कधी तरी घडणार हे अटळ होते, तरी प्रत्यक्षात ती जाणे ही गोष्ट पचवणे खूपच अवघड जात आहे..

प्रकाशभावजी आणि दिप्ती यांच्या संसारात प्राजक्ता म्हणजे तसं उशिरानेच उमललेले हे सुकुमार फूल! सांगलीला आम्ही एकाच ठिकाणी राहत असल्याने ती जन्मल्यापासूनच मी तिला पाहत होते. तिच्याविषयी काय बोलावे? खरोखरच गुणी मुलगी होती ती! लहान होती तेव्हा इतके शांत होती की घरात लहान मुल आहे हे सुद्धा कळू नये! लहानपणापासून अभ्यासात हुशार,देखणी, सर्वांशी मिळून मिसळून वागणारी, भरपूर मित्र-मैत्रिणी असणारी, स्वभावाने शांत पण तरी तितकीच स्वतःची मते ठामपणे मांडणारी अशी प्राजक्ता इंजिनियर झाली! अशी ही सुंदर गुणी मुलगी.

ओंकार आणि तिचा प्रेम विवाह झाला. लग्नानंतर दोघेही जर्मनीला गेले. तिच्या आयुष्यातील परमोच्च सुखाचा काळ असेल तो! दोघेही समरसून उपभोगत होते, पाच सहा वर्षाच्या नोकरीनंतर दोघांनीही भारतात परत येण्याचा निर्णय घेतला आणि इथे आल्यावर दोघांचेही जॉब चालू झाले..

सर्व काही चांगले चालू असताना अकस्मात तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला, हार्टचे आॅपरेशन झाले आणि त्यांचे महिनाभराचे आजारपण चालू असतानाच प्राजक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले. बाबांना हे कळू नये म्हणून तिने आटोकाट प्रयत्न केले. शेवटी बाबा गेल्यावरच तिचे खरे आजारपण सुरू झाले…

ओंकार आणि प्राजक्ताने  प्राजक्ताचे कॅन्सरचे निदान झाल्यापासून शर्थीचे प्रयत्न केले. सर्व प्रकारच्या उपचारांना तिने धैर्याने तोंड दिले. ओंकारची साथ ही खरोखरच प्रचंड होती. त्याच्या आधारावरच तिचे आयुष्य चालू होते.. एलोपथी, होमिओपॅथी, टार्गेट थेरपी ट्रीटमेंट, आयुर्वेदिक सर्व प्रकारचे उपचार तिने

केले. गेले वर्ष  या सर्वांमध्ये तिची आई, बहीण, मेव्हणे सर्व साथ देत होते…. पण कॅन्सर हा असा काही रोग आहे की,  त्याचा शेवट मृत्यूकडेच जातो..काही सुदैवी उपचारानंतर त्यातून बरेही होतात .. किंवा काही काळापुरते आयुष्य ही वाढते. ….

भारतात आल्यावर वाकड येथे त्यांनी मोठा फ्लॅट घेतला होता. हौसेने घराची सजावट केली होती. उमेदीचे वय होते.. पण नशिबात वेगळेच वाढून ठेवले होते. कसेबसे पाच सहा महिने त्या फ्लॅटवर ते राहिले असतील आणि तिचे दुखणे वाढले. 20 नोव्हेंबरला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. अक्षरशः रोगाशी झगडणे चालले होते. शेवटी सात जानेवारीला तिला घरी आणले. स्वतः प्राजक्ताही आपल्या दुखण्याबरोबर खंबीरपणे लढत होती, पण प्रयत्न करणे आपल्या हाती, यश अपयश सगळं परमेश्वराकडे..

हॉस्पिटल मधून घरी आणल्यावरही प्रत्येक श्वासासाठी तिला झगडावे लागत होते. ऑक्सिजन सिलेंडर बिचारा आपले काम करत होता, पण तिचे शरीर साथ देत नव्हते. जगण्याची मनापासून जिद्द होती, उमेद होती, मेंदू कार्यरत होता.. स्वतः आपल्या औषध पाण्याविषयी शेवटपर्यंत जागरूक होती. मृत्यूला चुकवायची निकराची लढाई चालू होती. वय किती तर अवघे पस्तीस पूर्ण! ही काय जायची वेळ होती का? जगेन मी, जगेन मी असा एक एक दिवस जात होता… पण शेवट त्याच्या हातात..

मकर संक्रांतीचा दिवस उजाडला. वाटत होतं, आजचा दिवस तरी जाऊ दे ,अलीकडे तिला बोलता येत नव्हते, पण खुणेने किंवा लिहून सांगू शकत होती, पण आज मात्र सकाळपासून सगळं हळूहळू शांत होत चाललं होतं..  हे आमचं प्राजक्ताचं फुल आता कोमेजायला लागले होते…,.. स्वर्गातून पृथ्वीवर आलेला प्राजक्त हळूहळू पुन्हा स्वर्गाच्या दिशेने वाटचाल करत होता! आपल्या छोट्याशा आयुष्यात मिळेल तेवढे सुख तिने घेतले आणि इतरांनाही आनंद दिला. जसं प्राजक्ताचे फुल जास्त काळ टिकत नाही, एकदा का झाडावरून खाली जमिनीवर पडले की फार कमी काळ राहते. लवकरच सुकते. त्याचे आयुष्यच तेवढे! ‘प्राजक्त’फुलाचा रंग, गंध हे सगळे अल्पकाळ असते. तशीच ही आमची प्राजक्ता! सुंदर, गुणी मुलगी अकाली गेली.. स्वर्गातील आपल्या स्थानी! ते प्राजक्ताचे फुल गळून पडले कायमचे! आम्हाला सुगंध देत राहील! प्राजक्त फुलासारखं नाजूक, निर्मळ, छोटसं आयुष्य संपलं तिचं!ती गेली, पण कायमच हा प्राजक्त आमच्या मनात राहील!

भावपूर्ण श्रद्धांजली !

  उज्वला काकू..

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

? मनमंजुषेतून ?

☆ आठवांच्या हिंदोळ्यातून… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

आमची आत्या जाऊन पंधरा दिवस होऊन गेले.  आत्या ही फक्त नावापुरतीच आत्या होती , ती आम्हा भावंडांसाठी माहेरात असणारी जणू दुसरी आईच. तिच्या लग्नानंतर एका वर्षातच नवर्‍याने मांडलेल्या छळामुळे आमचे चुलते (आबा )यांनी तिला परत आमच्या घरी आणले. पुन्हा तिला परत सासरी नांदायला पाठविलेच नाही. आणि आत्याने पण कधी नांदयला जायची इच्छा व्यक्त केली नाही. तेंव्हा पासून ती माहेरात राहिली.  आपल्या तीन भावांचे संसार आणि त्यांची मुले संभाळण्यात ती रमली. तिने पंचवीस माणसांचे कुटुंब घट्ट मायेच्या मिठीत बांधून ठेवले. नात्यांचे सर्व मोती प्रेमाने एकाच मजबूत धाग्यात गुंफून, त्याची गाठही तितक्याच ओढीने घट्ट आवळली. आज आम्हा भावंडांमध्ये  एकमेकांबद्दल  जिव्हाळा , प्रेम, आपुलकी आहे  ती सर्व माझ्या आत्यानी केलेल्या  संस्कारांमुळे आहेत. आत्या जितकी प्रेमळ होती तितकीच रागीट सुध्दा होती. शाळेत गणिताचे गुरूजी आणि घरात आत्या यांचा मार खाऊनच आम्ही घडलो. 

आत्याला तिच्या स्वतःच्या संसाराचा अनुभव नव्हता. तरीही तिने अनेकांचे संसार उभे केले  आणि चांगल्या रितीने संसार कसा करायचा याची  शिकवणसुध्दा दिली. आत्या जणू अनुभवांचे एक पुस्तक होती. चाली-रीती, संस्कार यांची ती वारसदार होती. ती अशिक्षित होती. संस्कृतीची जपणूक उत्तम करत होती. आमच्या कुटुंबातच नव्हे तर गावात तसेच पै-पाहुण्यांच्यात  कोणतेही मंगलकार्य असले की आत्या तिथे हजर. तिच्या हातूनच सर्व कार्यक्रम पार पडायचे. तिला स्वतःला सुध्दा अशा दगदगीत वाहून द्यायला आवडायचे. 

आत्याच्या स्वतःच्या संसाराची वाताहात झाली पण भावांच्या संसारात येणारे चढउतार याचा तिने कधीच त्रागा केला नाही. तिने कधी कोणतेच नाते तुटण्याइतपत ताणले नाही. पंचवीस माणसाच्या कुटुंबात कधीच तिने नात्या-नात्यात  दुरावा येऊ दिला नाही.  मग जावा-जावा असोत अथवा भाऊ-भाऊ असोत. कधी एकत्र कुटुंबात भांड्याला भांडे लागलेच तर तिच्या काळजाचा थरकाप व्हायचा. तिची चिंता वाढायची. तिने प्रयत्न केले ते पडलेल्या फटींना सांधायचे. मायेचे मलम लावून तिने नात्यांना उभारी दिली. आत्याचे संपुर्ण आयुष्य हे फक्त रांदणे आणि सांधणे यातच गेले. 

आत्याने  आम्हां बहिणींना तिच्या सगळ्या चांगल्या सवयी लावल्या.  तिचेच संस्कार घेऊन आम्ही सासरी नांदायला गेलो. म्हणून मी आज अभिमानानी सांगते, “माझ्यात जे काही चांगले आहे ती आत्याची माझ्याकडे  ठेव आहे. “

आत्याच्या बाबतीत विशेष वाटते ते हे की, स्वतःचे अपत्य नसताना दुसऱ्याच्या लेकरांवर अतोनात प्रेम करणे ,त्यांचे भविष्य चांगले घडावे याकरता सतत  प्रयत्न करणे. दुसर्ऱ्याचे संसार सजविण्यात, सावरण्यात स्वतःचे आयुष्य झिजविणे.  आत्या, हे सारं तूच करू जाणे!  गावात येणारे ग्रामसेवक, तलाठी, शाळेतील शिक्षक, माल विकायला येणारे फिरस्ते यांना कधी आत्यानी उपाशीपोटी जाऊ दिले नाही. हे सगळेजण आत्याला त्यांची मोठी बहीण मानायचे. 

आपले सर्व आयुष्य तिने एकाकी घालविले पण धुतल्या तांदळाप्रमाणे तिचे चारित्र्य आणि मन  होते.

अशी आत्या आज आमच्यात नाही पण तिच्या आठवणी रोज मनास खोलवर हेलावून टाकतात. नकळत डोळे भरून येतात आणि डोळ्यांतून ओघळते ते एका थोर पुण्यवती आईचेच वात्सल्य. “आत्या तू आमच्यात होती म्हणून  पंचवीस माणसाचे कुटुंब चाळीस वर्ष एकत्र होते  “

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ “आठवण” … लेखक : श्री सुधीर रेवणकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

“ मी वर जाईन ना… तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत……. “

‘ दे वो माय ‘ असा शब्द लहानपणी ऐकू आला की आई बोलायची, “ बघ रे काही असेल. एखादी पोळीभाजी देऊन टाक तिला.”

मी नेहमी कंटाळा करायचो.

“ उठतो का आता ? “ मी तणतण करत जे असेल ते द्यायचो. 

“ असे करू नये. आपल्यातला एक घास दुसऱ्याला दिला, तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकून जातो.”

मी उर्मटपणे बोलायचो… “ आई, दोन पोळ्या दिल्यात भिकारणीला. बघू तुझा गणपती बाप्पा किती पोळ्या टाकतो माझ्या ताटात. “

“ आई म्हणायची, मी जिवंत आहे तोपर्यंत टाक. मी गेल्यावर कूण्णाला ही देऊ नको. मी जाईल ना मग आठवतील माझे शब्द.”

दरवेळी भिकारी दारावर आले की जुनी साडी दे, जुनी चादर दे , स्वेटर दे. मग आमचे वादविवाद. वय होत आले, तसे मी तिच्यावर रागावणे कमी केले. दारावरचे भिकारी पण कमी होत गेले. 

मग एक दिवस आई गेली. मी ठरवले तिच्या आवडत्या तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये अस्थीविसर्जन करायचे. नाशिक, पंढरपूर झाले आणि मी काशीला पोहचलो. भर पावसाळा चालू. मी सगळे विधी करून परत निघालो. ट्रेन सकाळी दहा ला, पण चार तास लेट. मी प्लॅटफॉर्म वरूनच एक व्हेज पुलावचे पॅकेट घेतले. थोडे केळं घेतलेत आणि जिन्याच्या पायरीवर बसून राहिलो. 

काही वेळाने एक बाई आणि कडेवरचे पोरगं माझ्याजवळ थांबून काही खायला मागू लागले.  मी नकळतच पुलाव पॅकेट, पाणी, चार पाच केळी पण तिला देऊन टाकली. दोघे ही पुढे निघून गेलीत. वाराणसी ते ठाणे दीड दिवसांचा प्रवास. स्टेशनं भरपूर. मनात म्हटले, खाऊ काहीतरी नंतर. पाचच्या आसपास ट्रेन आली. मी ज्या कंम्पार्टमेंट मध्ये होतो, तिथे तरुण नवरा नवरी आणि त्याची म्हातारी आई आमच्या गप्पा सुरु झाल्या. त्यांना शिर्डीला जायचे होते.

मी सगळी माहिती सांगितली. त्यांनी पण हिंदीतून विचारले मी का आलो वाराणसीला. मी पण सांगितले की अस्थिविसर्जित करायला आलो होतो. सात वाजता चहा वाला आला. मी दोन कप घेतले बॅगमधून अर्धा उरलेला पार्ले G खाल्ला. परत एक कप चहा प्यायलो. 

आठ-साडेआठला बोगीत सगळ्यांनी डब्बे उघडून खायला सुरवात केली. मी पार्लेवरच झोपणार होतो. पुढच्या स्टेशनला घेऊ बिस्कीट म्हणून शान्त बसलो. इकडे सुनबाई मुलाने डब्बा काढला, पांढऱ्या केसांच्या आजीला बघून मला आईची आठवण येतच होती. 

सून, मुलगा आणि म्हातारीने एकमेकांना खूण केली . पोरीने चार प्लास्टिकच्या प्लेट वाढल्या. पुरी भाजी, चटणी ,लोणचे एक स्वीट, काही फ्रुट कापून प्लेट मध्ये सजवले आणि मुलाने आवाज दिला, “ अंकल हात धो लिजीए और खाना खाईए .”

मी नको नको म्हंटले तरी त्यांनी जेवायलाच लावले. मी पोटभर जेवलो. अवांतर गप्पा झाल्या. मी  वरच्या बर्थ वर झोपायला गेलो. सगळे झोपायला लागलेत. लाईट बंद झालेत. मी चादरीच्या कोपऱ्यातून हळूच खाली पाहिले. म्हातारी सेम टू सेम..

डोक्याखाली हाताची उशी घेऊन झोपलेली. अगदी माझ्या आईची आवडती सवय. आपण एक घास कोणाला दिला तर देव कोणत्याही रुपात येऊन आपल्या ताटात दोन घास टाकतो. एक छोटे पॅकेट काय त्या मायलेकाला दिले तर आजीबाईने ताट भरून जेवू घातले. 

बाहेर चिक्कार पाऊस आणि गेले दोन महिने आईच्या आठवणींचा मनात रोखलेला पाऊस दोघेही मग डोळ्यावाटे मुसळधार बरसू लागलेत. 

आई नेहमी म्हणायची…. “ मी जाईन ना वर, तेव्हा आठवतील माझे शब्द. मग बस रडत….. “

लेखक : श्री सुधीर रेवणकर

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘कान’ गोष्ट’…. ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

‘’कान’ गोष्ट…☆ सुश्री नीता कुलकर्णी ☆

आपण आपल्या अवयवांबद्दल कुठली ना कुठली विधानं करत असतो. 

पाणीदार डोळे, धारदार नाक, लांबसडक बोटे,गुलाबी गाल वगैरे…

कान हा जो आपला दर्शनी अवयव आहे त्याच्याकडे आपला कानाडोळा  होतो. 

आणि बोललं तरी चांगलं असं काही कोणी बोलत नाही.

…गुपित सांगायचं असेल तर आपण म्हणतो 

“जरा कान इकडे कर ” – आणि हळू आवाजात ते सांगतो.

अर्थात इतकी गुप्त गोष्ट कोणाच्या पोटात राहात नाही …

कधी एकदा ती दुसऱ्याला सांगतो अस त्याला होतं मग तो दुसऱ्याच्या कानाला लागतो….

लहान मुलींच्या वर्गात बाई येतात. अभ्यासाला सुरुवात करायची असते.

 एक मुलगी दुसरीच्या कानाजवळ हाताचा आडोसा करून म्हणते

 “आज बाई किती छान दिसत आहेत.”..

बाई विचारतात 

“काय कान गोष्टी चालल्या आहेत ?” – मुली नुसत्या हसतात…

एखादा आपली साक्ष काढतो म्हणतो..  ” त्या दिवशी काय झालं तुला माहित आहे ना?”

आपण कान झाकून घेत ” मला काही माहीत नाही ” – असं म्हणून त्या प्रसंगातून आपली सुटका करून घेतो… वर त्याला म्हणतो – 

“तसं माझ्या कानावरून गेल आहे, पण कान आणि डोळे यात चार बोटाचे अंतर असतं .. मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही .तुला ते शपथेवर काही सांगू शकत नाही.”

…. म्हणजे पुराव्याच्या बाबतीत नुसत्या कानाची साक्ष ग्राह्य धरली जात नाही.

तसंच एखाद्याचं कानफाट्या नाव पडलं की तो कितीही चांगला वागला तरी उपयोग नसतो …

तो कानफाट्याच —

इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत

“ लिसन आणि हियर “

हियरचा अर्थ कानावर जे पडले ते नुसते  ऐकणे  असा आहे.आणि लिसनचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणे असा आहे .– लिसन हे कानातून मेंदूपर्यंत जाते, तेथून ते हृदयापर्यंत पोहोचते आणि योग्य कृती होते.

मैत्रिणीची तरुण मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसते .आपण मैत्रिणीला फोन करून तिच्या हे कानावर घालतो .— म्हणजे पुढे काय करायचे ते तिने बघावं .लेक चुकत असेल तर मैत्रिणीनी तिचा कान धरावा असं आपल्याला वाटतं.

थोड्या दिवसात एखादीचं महत्त्व वाढलं किंवा जास्त शहाणपणा करायला लागली की आपण म्हणतो “कानामागून आली आणि तिखट झाली…”

काहीवेळा आपलं बोलणं दुसऱ्याच्या कानावर जावं असं वाटत असतं.–  त्यावेळी ती  व्यक्ती आसपास आहे याची खात्री करून आपण मुद्दाम मोठ्यांदा बोलतो आणि आपला उद्देश सफल करून घेतो.

लिहिता लिहिता एक गाणं आठवलं —- 

‘रानात सांग कानात ,आपुले नाते

मी भल्या पहाटे येते ‘

खरं तर भल्या पहाटे त्यांचं बोलणं ऐकायला तिथं कोण येणार आहे? – तरी तो तिला कानातच सांगायला सांगतो ….

तसं ऐकण्यात जवळीक आहे ..  प्रेम आहे .. त्याला स्पर्शाची साथ आहे आणि अजून बरंच  काही आहे…..

कानात सांगितलेलं मनात ठेवायचं असतं .. .प्रेमिकांचं ते गोड गुपीत असतं.

नवीन लग्न झालेली जोडपी बघा .. एकमेकात रमून गेलेली असतात. एकमेकांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत असतात..

काही लोक मात्र फार हुशार असतात. त्यांची काम कशी या कानाची त्या कानाला कळत नाहीत.

कानाखाली जाळ काढीन किंवा  कानाखाली आवाज काढीन असं  म्हणतात… पण हा आवाज कुठे आणि कसा काढला जातो हे मात्र मला माहीत नाही. 

पूर्वी आजोबा नातवंडांना सांगायचे — ” मी काय सांगतो ते कान देऊन ऐका.  उगीच कानामागे टाकू नका”

मुलही आजोबांचा ऐकत असत.— कारण त्यावेळी कानाचा उपयोग शिक्षा देण्यासाठी सर्रास केला जात असे .आजोबांच ऐकलं नाही तर ते कान धरतील नाहीतर पीरगाळतील ही भीती असायची.

आजही एखाद्याकडून चूक झाली तर तो म्हणतो 

” वाटलं तर कान पकडून माफी मागतो मग तर झालं…”

म्हणजे अप्रत्यक्षरीत्या शिक्षेसाठी अजूनही प्रतीकात्मक का होईना कान धरला जातो …

वर तो म्हणतो … “आता कानाला खडा…परत अस होणार नाही.”

एखाद्यावेळेस अ ब च्या कानात क विषयी विष ओततो .त्याचे कान भरतो. क जर विचारी असेल तर तो त्याचे ऐकत नाही, पण तसा नसेल आणि अ च्या विचाराने क शी बोलला तर त्याचे नुकसान होते.

— अशा लोकांकडे कानाडोळाच करायला पाहिजे. नाहीतर त्यांची चांगलीच कानउघाडणी केली पाहिजे .हलक्या कानाच्या लोकांपासून सावध राहायला हवं.

एखाद्याचा स्वभाव सारखा तक्रार करण्याचा असतो .त्याचं बोलणं आपण या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो.

समाजात ‘ बळी तो कान पिळी ‘ असतो. याचं प्रत्यंतर आपल्याला रोजच्या जीवनात येत असते.

कान ही खरं तर मोठी देणगी आहे…पण त्याचं आपल्याला काही विशेष वाटत नाही. 

मुकबधिरांकडे बघितलं की…त्यांच्याबरोबर अर्धा तास जरी थांबलो  तरी —  आपल्याला कान आहेत .. 

ऐकू येत आहे …  हे किती भाग्य आहे हे नीट समजेल…

तर असं  हे कान महात्म्य…

रामदास स्वामींनी लिहिले आहे — 

श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम्

अर्चनं वंदनं दास्य सख्यमात्मनिवेदनम् – 

म्हणजे नवविधा भक्तीचं वर्णन करताना त्यांनी  श्रवणभक्तीला प्रथम स्थान दिलं आहे.

आपल्याला नको असते ते  पण आपल्या कानावर पडतच असते.–  पण आपण आपल्याला जे योग्य  वाटते ते ऐकावे ….तात्पर्य काय कानाचा चांगला उपयोग केला तर वागणे नीट होते.

 सुदृढ विचार वाढीस लागतात. आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो…

 कानाचा कसा उपयोग करायचा हे आपल्या हातात आहे.

आपण कसे ऐकावे ते समर्थ दासबोधात सांगतात…

ऐसे हे अवघेची ऐकावे

परंतु सार शोधून घ्यावे

असार ते जाणोनी त्यागावे

या नाव श्रवणभक्ती…

समर्थांचे ऐकू या — शहाणे होऊ या… 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print