लंडनला प्रथमच लेकीकडे चाललेल्या वर्षाने मला भेटायला बोलावले होते म्हणून गेले होते तिच्याकडे. तिची मुलगी गेली सात आठ वर्षे लंडनला आहे.सगळी तयारी दाखवताना वर्षाने मला स्वतः दळून आणलेली शिकेकाई दाखवली. म्हणाली, “ बघ मी ही गव्हला कचरा, नागरमोथा असं घालून सुगंधी शिकेकाई करून आणलीय. माझ्या नातीचे, लेकीचे केस खूप सुंदर आणि लांबसडक आहेत. छान न्हायला घालीन मी त्यांना या शिकेकाईने.”
मनात खूप शंका आल्या पण न बोलता घरी परत आले मी. पण मनातून मात्र ती सुगंधी शिकेकाई जाईना. आमची आई अशीच आम्हाला तिने स्वतः केलेल्या सुगंधी शिकेकाईने दर रविवारी न्हायला घालायची. शिकेकाईत नाना वस्तू घालून ती स्वतः गिरणीतून दळून आणायची. डोक्याला लावायचे तेलही ती घरीच तयार करायची. माका आवळा ब्राह्मी असं ते हिरवेगार सुगंधी तेल किती छान असायचे. रविवारचे नहाणे हा मोठा कार्येक्रमच असायचा.
गरम कडकडीत पाण्याने आणि त्या शिकेकाईने आई आम्हाला न्हायला घालायची. टॉवेलने खसखसून केस पुसून मग केस वाळले की ते हिरवे तेल लावून छान वेण्या घालून द्यायची. त्या तेलाने आणि डोक्याच्या मालिशने गुंगी येऊन झोपच यायची मग आम्हाला. त्या सोहळ्याची फार आठवण झाली मला. आता वर्षा लंडनला लेकीला आणि नातीला कशी न्हायला घालते याची खूप उत्सुकता होती मला.
वर्षा परत आल्याचे समजले आणि मग मी निवांत गेले तिला भेटायला. गप्पा झाल्यावर सहज बघितले तर ते शिकेकाईचे पुडके तसेच पडले होते टेबलावर. न उघडताच. “ काय ग बाई? हे परत कसे आले ? “ मी विचारलं. खिन्न होऊन वर्षा म्हणाली, “ काय सांगू बाई तुला. नात म्हणाली, आजी प्लीज.मी असल्या पावडरने नाही हं केस वॉश करणार. माझा वेगळा शाम्पू असतो तोच चालतो मला. सॉरी ग आजी पण माझा बाथ टब पण किती खराब होईल ना या पावडरने.” तिला दुजोरा देत लेक म्हणाली “ हो ग आई.आता कसली ग शिकेकाई आणि काय. नुकतेच आम्ही घर रिनोव्हेट केलंय ना. या कार्पेटवर शिकेकाईचे डाग पडले तर? आणि मी आता बॉयकटच केलाय की. काय उपयोग या शिकेकाईचा मला. डाग पडले तर नसता व्याप व्हायचा.” … म्हणून हे बापडे पुडके आले परत माझ्याबरोबर.” उदास होऊन वर्षा मला सांगत होती.
मी म्हटले, “ सखे रागावू नको रुसू नको. दुःखी तर मुळीच होऊ नको बाई . पुढच्या महिन्यात आपण जाणार आहोत ना आदिवासी मुलींच्या कॅम्पला? तिथे दे ही शिकेकाई. अगदी सुस्थळी पडेल बरं ती.” वर्षाच्या चेहऱ्यावर आनंद दाटला. लंडनचा प्रवास करून आलेली शिकेकाई पुढच्याच महिन्यात ठाण्याच्या आदिवासी पाड्यावर सुखाने रवाना झाली.
आणि अशी ही शिकेकाईची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.
नकार ही एक प्रतिक्रिया आहे. ‘हो’ म्हणजे होकार आणि ‘नाही’ म्हणजे नकार इतकी साधी या शब्दांची व्याख्या असली तरी या एका शब्दाने होणारे परिणाम हे खूप व्यापक आहेत. नाही, नको म्हणण्याने कदाचित संपूर्ण जीवनाच्या वाटाही बदलू शकतात. कधी त्या सकारात्मक असू शकतात तर कधी कडवट, बोचऱ्या, दुःखदही असू शकतात.
काही वेळा नाही म्हणणं फारसं कठीण नसतं पण आयुष्यात अशा काही प्रसंगांना सामोरे जावं लागतं की त्यावेळी नकार देण्यासाठी हवं असतं बळ, एक ठामपणा, निश्चित भूमिका आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामासाठी लागणारी जबरदस्त सहनशीलता, खंबीरपणा आणि तितकाच तटस्थपणाही. विचलित होणारं मन अथवा द्विधा मनस्थितीत घेतलेल्या निर्णयाची फलश्रुती ‘आपण चुकलो, आपण उगीच नाही म्हणालो’ या मानसिकतेतही घेऊन जाऊ शकते. म्हणूनच नकार द्यायला बळ लागतं.
नकार द्यायची वेळ वेगवेगळ्या आघाड्यांवर येऊ शकते. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय. आपल्या भोवताली वावरणाऱ्या जवळच्या, दूरच्या नात्यांतल्या, मैत्रीतल्या माणसांच्या बाबतीतही ही वेळ येऊ शकते.
सर्वप्रथम ‘नकार’ हा शब्द उच्चारल्यावर मनात येते ते म्हणजे विवाह ठरण्यापूर्वी मुलीने मुलाला अथवा मुलाने मुलीला दिलेला नकार. बऱ्याच वेळा नापसंतीचे खरे कारण देणं अवघड असतं. अशावेळी पत्रिका जमत नाही किंवा आपण एकमेकांना कंपॅटीबल नाही होऊ शकत, थोडक्यात आपली क्षेत्र वेगळी आहेत, स्वभाव वेगळे आहेत, आवडीनिवडी वेगळ्या आहेत वगैरे वगैरे पण आडवळणाने दिलेला,समोरच्या व्यक्तीला न दुखावता दिलेला हा नकारच असतो. या ठिकाणी दिलेला नकार म्हणजे वेळीच घेतलेला योग्य निर्णय ठरू शकतो. नाहीतर आई-वडिलांच्या, इतरांच्या दबावाखाली येऊन जर कुठला निर्णय घेतला गेला तर “आयुष्यात दुःखाचे दार उघडले” असेच होऊ शकते.
माझ्या एका मैत्रिणीचं लग्न जमत नव्हतं. पाच मुलींचे आई वडील फार चिंतेत होते. धाकट्या बहिणीही रांगेत होत्या. त्यामुळे आई-वडिलांना हीचं लग्न जमवण्याची अत्यंत घाई झाली होती. अखेर एका मुलासाठी मोठ्या कष्टाने त्यांनी माझ्या मैत्रिणीकडून होकार मिळवला. पण मनातून माझी मैत्रीण नाराज होती.
पहिल्याच भेटीत त्या मुलाने तिला विचारले होते,” तुला मच्छरदाणीत झोपायला आवडते का?”
हा काय प्रश्न झाला? तोही एकमेकांशी अजिबात ओळख नसताना… माझ्या मैत्रिणीजवळ लग्नाळू भांडवल नसेल कदाचित पण तिची योग्यता सर्वसाधारण पातळीपेक्षा अनेक पटीने जास्त होती. तिने जेव्हां मला हे सांगितले तेव्हा मी तिला म्हणाले,” तू ठाम रहा. कुठल्याच दबावाखाली मुळीच येऊ नकोस. फार तर काय होईल थोडे दिवस तुझ्या कुटुंबात अशांती राहील पण तू या मुलाला नकारच दे. तुझं आयुष्य तू असं पणाला लावू नकोस.”
आणि शेवटी तिने त्या मुलाला नकार दिला. वादळ झाले. त्या वादळात मी तिची मैत्रीण म्हणूनही भरडले गेले पण कालांतराने झाले सारे शांत. आज माझी मैत्रीण एक सन्मानित सुखी जीवन जगत आहे याचा मला अभिमान आहे.
बँक गॅरंटी हा एक अत्यंत धोक्याचा प्रकार आहे. मी ४० वर्षे बँकेत नोकरी केली. कर्ज खात्यात काम करत असताना मला अनेक अनुभव आले. कित्येक गॅरंटीयरना मी उध्वस्त झालेले पाहिले आहे. त्यामुळे कर्जाचे फॉर्म भरून घेताना मी कर्जासाठी गॅरंटी देणाऱ्या प्रत्येकाला सावध करत असे.
“ही व्यक्ती कोण लागते तुमची? तुम्हाला खरोखरच भरवसा आहे का यांच्याविषयी? कुठल्याही कारणाने ही व्यक्ती जर कर्ज फेडू शकली नाही तर कायद्याने बँक तुमच्याकडून कर्जाची वसुली करून घेऊ शकते. तेव्हा विचार करा. नकार द्यायला मुळीच घाबरू नका.”
माझ्या या चांगुलपणाचे बक्षीस म्हणून काही दिवसांनी माझी या खात्यातून हकालपट्टी झाली. मुळातच कर्ज वाटपामध्ये अनेक राजकीय संबंध गुंतलेले असतात. माझ्या या,आणि इतर गैरवर्तणुकीच्या नकारात्मक भूमिकेमुळे मला डावलण्यात आले अर्थात त्याचे मला अजिबात दुःख नाही.
नकार आणि व्यवहार याचा खूप जवळचा संबंध आहे.” ताट द्यावे पण पाट देऊ नये” असे म्हणतात. बाप आणि मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद होतात. मुलांवरील प्रेमासाठी आई-बाप मुलांना सर्वस्व देऊन टाकतात. सगळीच मुले वाईट नसतात पण बहुतांशी अशा आई-वडिलांची झालेली दुर्दशा आपण पाहतोच की. वेळीच नाही म्हणणे हे म्हणून गरजेचे असते.
“नाही कशी म्हणू तुला” या भावनेपायी अनेकांना खूप सोसावं लागलंय. फार जवळचं नातं असतं. केवळ एका नकारापायी मैत्रीचं अगदी रक्ताचं नातंही तुटण्याचा संभव असतो.
कधी कधी समोरचा माणूस इतका लाचार असतो की दयेपोटी किंवा एक संधी याला देऊन बघूया या भावनेने “नाही” म्हणायला मन धजावत नाही पण अशावेळी भविष्यात “उगीच मदत केली” अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच जसे पूजेत आपण जे अर्पण करतो त्यावर पाणी सोडतो तद्वत, केलेल्या शारीरिक, आर्थिक कुठल्याही मदतीवर पाणी सोडण्याची वृत्ती जरूर बाळगावी. जेणेकरून नंतरचे मन:स्ताप टळू शकतात.
दान देणं, देणाऱ्याचे हातच घ्यावेत, अडचणीत सापडलेल्यास सहकार्य करावे,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपुले” ही आपली संस्कृती आहे. आपला धर्म. आहे तो पाळणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे नेहमीच नकार देणं हे योग्य नाही. तो आत्मकेंद्रीपणा ठरू शकतो. स्वतःपुरतं जगणं,” बाकी जगाचं काहीही होऊ दे’ ही भावना मात्र जोपासली जाऊ नये. कधीकधी आपलं बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते अशावेळी माघार घेणं हा मात्र पुरुषार्थ नाही.
मात्र आपली शेजारीण, जिच्याशी आपले संबंध खूप चांगले आहेत, मैत्रीचे आहेत पण रोज रोज ती हातात वाटी घेऊन काही ना काही मागायला आपल्या दारी येते. कधी साखर, कधी चहा पावडर, कधी कोथिंबीर आणि असेच काही बाही.. पण कधीतरी आपण तिला नाही म्हणावे ते याकरिता की त्यातूनच तिला तिचा स्वाभिमान टिकवण्याची शिकवण मिळावी अथवा स्वावलंबनाचा धडा मिळावा.
मला एक प्रसंग आठवतो. माझ्या एका जिवलग मैत्रिणीने माझ्याकडे एक दिवस माझ्या सासूने मला दिलेली सोन्याची बोरमाळ मागितली. त्याचे कारण तिने असे सांगितले की,” या लग्नात मला सर्वांसमोर चांगलेच नाकावर टिच्चून मिरवायचे आहे”
ती माझी इतकी जवळची मैत्रीण होती की तिला मी नाही म्हणणं म्हणजे तिच्यात आणि माझ्यात दुरावा निर्माण होण्यासारखं होतं. तिच्यापेक्षा जास्त मीच निर्णय न घेऊ शकल्यामुळे बेचैन झाले होते. तेव्हा मला माझ्या नवऱ्याने मदत केली. तो म्हणाला,” तुला नक्की कशाची भीती वाटत आहे? तुझी आणि तिची तू नाही म्हटल्यामुळे मैत्री तुटेल की इतकी मौल्यवान वस्तू दुसऱ्याच्या हाती सोपवण्याचे भय तुला वाटत आहे? कारणं काहीही असू दे पण तू यावेळी ठामपणे नकारच द्यायला हवा आहेस. तू तिला फार तर अशा बेगडी देखाव्यापासून परावृत्त करण्याचा मैत्रीच्या माध्यमातून समंजसपणे प्रयत्न करावास म्हणजे ती ही दुखावली जाणार नाही.”
थोडक्यात नकार देऊ नये आणि नकार देता आला पाहिजे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र केव्हां नकार द्यावा आणि केव्हां देऊ नये हे त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते. केवळ भिडस्तपणा, मुखदुर्बलपणा अथवा संकोचाने चुकीचा निर्णय कधीही घेऊ नये. योग्य वेळी नकार देण्याचा निर्णय हा फायद्याचा ठरतो असे म्हणण्यापेक्षा तो बरोबर असतो असे मी म्हणेन.
माझ्या मनात नेहमी येतं युधिष्ठराने त्याच वेळी द्युत खेळण्यास प्रतिस्पर्ध्याला नकार दिला असता तर …
कैकयीने मंथरेचा कपटी उपदेश डावलला असता तर…
सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडण्यास नकार दिला असता तर….
तर कितीतरी अनर्थ टळले असते ना. आपली पुराणे, आपला इतिहास वाचताना वेळोवेळी हा प्रश्न मनात येतो. त्यावेळी मात्र आपण म्हणतो जे व्हायचे ते होतेच. या ईश्वरी योजना असतात, विधीलिखित असते. पण तरीही एक संधी आपल्याजवळ असते. डावलण्याची, वेळीच नकार देण्याची. आणि तो देता आला पाहिजे इतकं मात्र मनापासून वाटतं…
मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्याऐंशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरुवातीला मला तिच्या या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळूहळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं. माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटा वळणे शरीराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले. काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा. पण एकंदरीने तेव्हा बाबा, वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा. बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं. जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ, प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या. हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी ‘बाजुला व्हा रे, किती अंगचटीला येता? जरा मोकळी राहू द्या ना मला ! ” असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर, मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता. तो घरी आला की मला भरतं यायचं. मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते, गळामिठी घालते. अशावेळी स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील, मोकळेपणे बोलतील, जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत. त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मीहून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत, मला त्यांचे लाड करू देतात पण…. जाणवतंच काहीतरी..आतल्या आत…!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली, ”किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं ! ”
तिच्या त्या उद्गारात अर्थांचे डोंगर सामावले होते. मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्रदिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ, वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे, मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते. तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.
मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमीप्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.
सकाळी माझ्या अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया (ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी, मित्र यांनीही भरभरून दाद दिली. हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.
पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.
काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले, सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.
अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता. एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की, माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.
कोणाला दूर असलेला भाऊ आठवला, कोणाला लाड करणारा मामा आठवला. कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला. जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले. विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरुषांची संख्या जास्त होती.
हेही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण… अजून…
आज सकाळी पावणेआठचा सुमार. बेल वाजली म्हणून दार उघडलं. तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमला घामेजलेला. श्वास फुललेला.
”तुम्ही वैशाली पंडित का?” तिने विचारलं.
”हो. आपण? या ना.. ” मी.
यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?
” प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ”
नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं. एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना, हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.
शेवटी आवाज चढवला.
” बाई गं, माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे. कोण तू? का रडतेस?”
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाक डोळे पुसले.
” मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले, मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो, नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्याजवळ थांबत नव्हतो. तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची. सतत पाणी वहायचं. हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो. एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली, या गं जवळ बसा. मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळे पण उघडेना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं. तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते. शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती. आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती. आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग केला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो. भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ”
अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई, माफ कर गं मला म्हणत मला कवळत होती.
मी सुन्न.
थोड्या वेळाने ती सावरली.
जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवा गाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.— ‘ मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.’
ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला, काय बोलले नाही आठवत. इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते. तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही, एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही. खरंच कुठे ठेवू तरी मी हे संचित ?
लेखिका : सुश्री वैशाली पंडित
संग्राहिका आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
साडीचे टेक्श्चर थोडं कडकच होतं…निऱ्या नीट बसेनात, माझी आपली कसरत चालूच…खाली मान घालून मोडायची वेळ आली तरी साडी काही मनासारखी नेसली जाईना. कॉलमध्ये व्यग्र असलेली लेक…कानात हेडफोन्स् घालून धावत आली..हाताने खूण करत तिने पटकन निऱ्यांच्या चुण्या हातात घेतल्या आणि मांडी घालून मस्तपैकी खाली बसली. एक एक चुणी दोन बोटांच्या चिमटीत धरुन एकसारखी निरीवर निरी घालत तिने सगळ्या निऱ्या सेफ्टीपिनेत अडकवून दोन मिनिटांत नेटकी साडी नेसायला मला मदत केली.
हुश्श…मी एकदम रिलॅक्स झाले. क्षणभर या आवडलेल्या साडीऐवजी दुसरी साडी नेसून मोकळं व्हावं असंही वाटून गेलं. पण शेवटी लेकच ती…मनातलं सगळं जाणणारी… अगदी ऐनवेळी मदत करुन नामानिराळी होणारी…
तिचा कॉल म्यूट करत तिने, मी बांधलेल्या पोनीवर ही आक्षेप घेतला. “ इतकी छान साडी नेसलीस तर ते केस का आवळून बांधतेस…सोड जरा मोकळे….मी छानपैकी क्लचर लावून देते.” तिने डोक्याचा देखील ताबा घेतला. मी अगदी दहा वर्षाच्या पोरीसारखी तिच्यापुढं उभी राहिले, “ कर बाई तुला माझं काय करायचं आहे ते. ऑफिस चालू आहे हे मात्र विसरु नकोस,म्हणजे झालं !”
तिने मॅचिंग क्लचर मध्ये केस सैलसर अडकवून दिले…हलकीशी लिपस्टिक ओठावर ओढली…आणि माझी हनुवटी दोन बाजूस फिरवून…’ हं नाऊ ओके…जा आता…’ चा इशारा दिला.
तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसून गेलं.आणि ती … “ मोठी गबाळी पर्स खांद्यावर टांगून जाऊ नकोस, एखादी वन साईड नाजुक पर्स घे, पैसे मोबाईल बसतील अशी.. तू म्हणजे ना कशावर काहीही करत असतेस.”
कोण कुणाची आई आहे हेच क्षणभर मला विसरायला झालं. “ आई छान रहावं ग…तू अशी छान असलीस की मलाही छान वाटतं…”
“अग गधडे…हेच लहानपणी मला तुमच्याकडून अपेक्षित असायचं..पण आम्हाला धुडकावून तुम्ही कधी ऐकलंत का आमचं?”
मला एकदम लहानपणीची हीच ती लेक आठवून गेली. खेळ,शाळा, अभ्यासातून वेळ मिळत नसताना, तिला असं आवरून देताना, माझ्या आईपणाला असंच भरतं येत असे. ती वैतागायची…बाहेर मैत्रिणी उभ्या असायच्या…” तू बाहेर जाताना टोकत जाऊ नकोस ना आई… “ तिचा सूर चिडका व्हायचा. “ नीट आवरून सावरून जावं ग बाहेर पडताना…” मी आपली सूचनावजा एखादं वाक्य टाकायची.पण त्या फटकुऱ्या जुनाट जीन्स् अन् वर ते टिचभर झबलं अडकवून, त्यांना धावायची कोण घाई असायची.
“ नको ग घालूस त्या रंग उडालेल्या जीन्स ,कसं दिसतं ते जुन्या बाजारातून आल्यासारखं….!”
“ आई हीच फॅशन आहे…आणि कंफर्टेबल पण असतात. तुमचा आणि आमचा फॅशन सेन्स फार वेगळा आहे… “ आपली बोलती बंदच !
सवयीने जुनीच, समोर असलेली चप्पल पायात अडकवली…तिचं लक्ष होतंच ….
“ नवीन घेतलेल्या मोजड्या घाल पायात…ते जुनं पादत्राण फेकून दे आता…!”
जाता जाता…एक बाण आलाच.
मी बाहेर पडताना…हळूच तिच्या कानाशी कुजबुजले… “ समजलं…कसं वाटतं ते ! माझीही अशीच चिडचिड होते, तुझा जीन्समधला अवतार बघून….कर्मा रिटर्न्स हं !”
ती मनापासून हसली…” आई तू पण ना….. “
लेखिका : सुश्री सौ विदुला जोगळेकर
संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रविवारची संध्याकाळ मला नेहमीच अस्वस्थ करते.उगीचच उदास वाटतं.आजसुद्धा परिस्थिती वेगळी नव्हती. टीव्हीत मन रमलं नाही.मोबईलचा कंटाळा आला.काय करावं सुचत नव्हतं.एकदम ब्लॅंक झालो.टेरेसवर जाण्याची लहर आली.सौंना आश्चर्य वाटलं.तसंही बऱ्याच महिन्यात गेलो नव्हतो.दोन मजले चढून टेरेसवर आलो.आजूबाजूला नव्या-जुन्या बिल्डिंग्जची गर्दीच गर्दी वायरचं पसरलेलं जाळं त्यावर बसलेले कावळे,कबुतरं नेहमीपेक्षा वेगळ्या गोष्टी पाहून जरा बरं वाटलं.टेरेसवर शांतता होती.कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून सहज दिसणार नाही अशी जागा पाहून बसलो.बेचैनी कमी झाली तरी मनात वेगवेगळे विचार सुरूच होते.इतक्यात बारीक आवाजात बोलण्याचा आवाज आला…..
“ए,काल संध्याकाळी काय झालं.”
“काही नाही”
“बोल की,येस की नो”
“अजून मी फायनल सांगितलं नाही.”
“लवकर सांग.आधीच उशीर झालाय.”
“तुलाच जास्त घाई झालेली दिसतेय”.
“उगाच भाव खाऊ नकोस.मी मधे नसते तर काहीच झालं नसतं”
“फुकट केलं नाहीस.दोघांकडून गिफ्ट घेतलय.तेव्हा जास्त उडू नकोस.”
“ओ हो!!बॉयफ्रेंड काय मिळाला लगेच बेस्ट फ्रेंड उडायला लागली.”
“मार खाशील.गप बस.ममीचा मोबाईल आणलाय.तिला कळायच्या आत त्याच्याशी बोलू दे”
“लवकर फोन लाव.स्पीकरवर टाक”
“गावजेवण नाहीये.कुणी ऐकलं तर..कान इकडं कर.दोघी मिळून ऐकू”नंतर फक्त दबक्या आवाजात बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज येत होता.फोन बंद झाल्यावर पुन्हा नॉर्मल बोलणं सुरू झालं.
“आता पार्टी पाहिजे”
“कशाबद्दल”
“बॉयफ्रेंड मिळाला”
“तो तर मिळणारच होता.बघितलं ना कसला पागल झालाय.नुसता बघत रहायचा.”
“हा तू तर ब्युटी क्वीनच ना”
“जळतेस का?”
“माझा ही आहेच की..”
“तोंड पाहिलं का?ज्याच्यावर मरतेस तो तर बघत पण नाही आणि तू उगाच …”
“माझं मी बघेन.जास्त शायनिंग मारू नकोस.बॉयफ्रेंड टेंपररी पण मैत्री परमनंट आहे.लक्षात ठेव.”
“ए गपयं.सेंटी मारू नको.”
“अजून काय म्हणाला सांग ना”
“तुला कशाला सांगू.आमचं सिक्रेट आहे”
“ते फोडायला एक मिनिट लागणार नाही.आता सांगतेस की ………..”
“तो फार अडव्हान्स आहे”
“असं काय केलं”
“करायला अजून नीट भेटलोय कुठं?”
“मग नुसती पोपटपंची”
“ती सुद्धा जाम एक्सयटिंग आणि अंगावर काटा आणणारी”
“मामला अंगापर्यंत पोचला.लकी आहेस”
“सालं,माझ्याकडे मोबाईल नाही त्यामुळे सगळा लोचा होतो.आमचं नीट बोलणं होत नाही.”
“त्यालाच सांग की घेऊन द्यायला”
“त्याच्याकडे आईचा जुना फोन आहे.मागितला तर आधी किस दे म्हणाला”
“अय्यो..”खी खी हसण्याचा आवाज आला.तितक्यात खालच्या मजल्यावरून जोरजोरात हाका सुरू झाल्या तेव्हा घाबरून ताडकन उभ्या राहीलेल्या दोघी स्पष्ट दिसल्या पण त्यांना मी दिसलो नाही.दोघी धावत खाली गेल्या.टेरेसवर मी एकटाच होतो.खरं सांगायचं तर मुलींचं इतकं ‘बोल्ड’ बोलणं माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला पचनी पडलं नाही.नवीन पिढी खूप फास्ट आहे याची कल्पना होती तरीही एवढी फास्ट असेल असं वाटलं नाही.जे ऐकलं त्यावर विश्वास बसत नव्हता कारण एक सहावीत शिकणारी अन दुसरी सातवीत.
नकळत नव्वदच्या दशकातले शाळेतले दिवस आठवले अन हसायला आलं.ते लहानपण म्हणजे मित्र,मित्र आणि मित्र यापलीकडे काही नव्हतं.भरपूर खेळायचं अन अधे-मधे अभ्यास असं चालायचं.‘प्रेम’ वगैरे गोष्टींची जाणीव नववीत गेल्यावर व्हायची.एखादी आवडायची मग स्वप्नं गुलाबी व्हायची.तिच्यावरून चिडवणं,त्यावर मित्रांमध्ये नुसत्याच चर्चा.कृती काही नाही.लपून छ्पून बघणं चालायचं.खूप इच्छा असूनही बोलायची हिंमत नव्हती.मुलींशी बोलताना भीती वाटायची.तिथं प्रेम व्यक्त करणं तर फार लांबची गोष्ट.त्यावेळची परिस्थितीच वेगळी होती.वडीलधारे,शिक्षकांचा धाक,दरारा होता.मार पडेल याची भीती वाटायची.आता मात्र सगळंच खूप सोपं आणि सहज झालंय.” अशा विचारांची लागलेली तंद्री सौंच्या आवाजानं तुटली.
“काय झालं” तिनं विचारलं. तेव्हा नुकताच घडलेला प्रसंग सांगितला.
“मग यात विशेष काही नाही हा वणवा सगळीकडेच पेटलाय.घर घर की कहानी.थॅंक्स टू मोबाईल आणि इंटरनेट.”
“मुलं अकाली प्रौढ होतायेत हे चांगलं नाही.”
“कारट्यांना,अजून धड नाक पुसता येत नाही अन प्रेम करतायेत”सौं हसत म्हणाली.
☆ …बाळा, निवृत्त हॊ… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
(आई बाबांचे पन्नाशीच्या मुलाला पत्र)
प्रिय बाळा.. शुभाशीर्वाद.
‘आईबाबा मी voluntary रिटायरमेंट घेऊ कां ?’ हा तुझा प्रश्न आणि आमच्याकडून तुला हवं असलेलं उत्तर आणि अनुभवाचा सल्ला विचारण्याचा तुझा हेतू लक्षात आला. तू भविष्याच्या विचाराने गोंधळून न जाता अवश्य रिटायरमेंट घे. आतापर्यंत धावपळीच्या सर्कशीत कितीतरी मोलाचे, सोन्यासारखे क्षण तुम्ही गमावलेत. तुला नोकरी लागल्यापासून सारखा पळतोयसच तु त्यापुढे तुला बायका,मुले,आई वडील यांच्यासाठी द्यायला जराही वेळ नाहीये.इतकं धाऊन-धाऊन काय मिळवता रे तुम्ही? पैसाच नां? अरे तो कितीही मिळवलास ना तरी अपुराच ठरतो. आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघ. हा गरीब वर्ग एका खोलीतच आपला स्वर्ग सजवतो. तेच स्वयंपाक घर.तिथेच हॉल आणि तिथेच बेडरूम . तुझे मात्र हिल स्टेशनवर दोन बंगले, फार्म हाऊस राहता प्रशस्त प्लॅट आहे .एवढी जागा, बंगले, खरंच लागतात का रे ? आणि तिथल्या शांततेचा अनुभव घ्यायला वेळ तरी मिळालाय का तुम्हाला?या सगळ्या धावपळीच्या चक्रातून तू बाहेर पड. आता पन्नाशी उलटलीय तुझी . कुठेतरी थांबायलाच हवं. मिळवलेल्या पैशाचा उपभोग घेण्याची हीच योग्य वेळ आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करून रोग बळावले तर पुढील आयुष्यात कसा उपभोग घेणार तुम्ही या ऐश्वर्याचा? सेवानिवृत्त होऊन मोकळ्या हवेतला मोकळा श्वास घ्यायला तुझ्या फार्म हाऊस मध्ये जाण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि कुणासाठी सांठवताय रे इतका पैसा ? मुलांना शिक्षण दिलेस. त्यांच्यासाठी भरपूर पैसा खर्च केलास. पण सहज मिळालेलं आयत सुख मुलांना आळशी बनवतं . त्यांना त्यांच्या हाताने काहीतरी करू दे ना जरा ! स्वावलंबी होण्याची सवय लागू दे त्यांना .तुझ्या बरोबर सुनबाई घरच्या राम रगाड्यात भरडली गेली. तिलाही मोकळी हवा मिळू दे.तिच्याही कष्टी मनाला तुझ्या प्रेमाचा शिडकावा हवाच की रे!आपल्या खानदेशात तुझ्या जन्मगावी तिला घेऊन जा.तापी काठची भरताची वांगी, मेहरूंणची बोरं, उडीद ज्वारी घालून केलेली कळण्याची पौष्टिक भाकरी, भाकरीवरचा झणझणीत ठेचा, तो खातांना ठेच्याच्या झणझणीतपणा बरोबरच आनंदाचे अश्रू पण येतिल तिच्या डोळ्यातून ., ते बघ.
आता बेकारी, महागाई आभाळाला पोचलीय. ज्यांना नोकरी नाही अशांसाठी तू काहीतरी कर.तू तुझी जागा खाली कर म्हणजे नवतरुणांना नवीन जागा मिळेल.सूर्य नाही होता येणार तुला. पण त्यांच्यासाठी आशेचा प्रकाशदिप तर होउ शकतोस ना तू?
तेव्हा बाळा आता निवृत्ती घे. आमच्या अनुभवाची शिदोरी घेऊन खऱ्या अर्थाने शांत,निवांत, निरामय आयुष्याचा आस्वाद घे. लहानपणीच्या आठवणीत रंगून जा. वर्तमानाचा आनंद घेऊन भविष्यकाळाची स्वप्न उज्वल कर.
सौ सुनबाईंना आणि आमच्या गोड नातंवंडांना शुभाशीर्वाद
☆ या जगण्यावर शतदा प्रेम करावे — लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
मी आणि आजार ह्यांची ‘दोस्ती ‘ऐन तिशीतली.
‘दोस्ती’ शब्दाने चमकलात? आजार बरोबर घेऊन जगायचं म्हटलं कि दोस्ती होते. .
वयाच्या अडतिसाव्या वर्षी आमच्या दादरच्या शिवाजी पार्कला धावत फेऱ्या मारत असताना मला ह्रृदयविकाराचा गंभीर धक्का जाणवला. माझा भाऊ डाॅक्टर प्रकाश संझगिरीने मला वाचवलं. मी आठवड्याने दक्षिण कोरियातल्या ‘सोल’ ला ऑलिंपिक कव्हर करायला जाणार होतो. तो थेट आयसीसीयूत जाऊन झोपलो. आयुष्य प्रथम तिथे बदललं. पण आधुनिक औषध, भावाची ट्रीटमेंट, जेवण्यातली शिस्त, बायकोचा देवावरचा विश्र्वास, मित्रांचा आधार, सकारात्मक विचार, एन्जियोप्लास्टी आणि ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही वृत्ती त्यामुळे मी जवळपास नाॅर्मल झालो.
त्यानंतर ३४ वर्ष भूरर्कन निघून गेली. त्यात अनंत कलात्मक उद्योग मी माझं इंजिनिअरिंग सांभाळून केले. जग फिरलो. मनाच्या एका कोपऱ्यात मृत्यूची भीती होती. पण मनाचा इतर भाग मध्यान्हासारखा उजळला होता. विविध गोष्टी करण्यासाठी मनाला नवी पालवी फुटत होती. नवा मोहर येत होता.
इतक्यात एक दिवस असा आला की सारा मोहरा फिरून गेला.
ती तारीख होती २२ ऑक्टोबर २०२२. मी निघालो होतो ऑस्ट्रेलियाला, टी २० विश्वकपासाठी. त्यावेळची दिवाळी संपता संपता निघणार होतो. बरोबर धनत्रयोदशीला कॅन्सर नावाच्या नरकासुराने गाठलं मला. अचानक रक्ताळलेली लघवी झाली आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्य अस्ताला जायच्या आत, किडणीच्या चौथ्या टप्प्यातल्या कॅन्सरचं निदान झालं.
मी हादरलो. पण स्वतःला सावरलं. सर्व विसरून तीन दिवस मुलाबाळांसह दिवाळी साजरी केली. दिवाळी संपल्यावर मी एकटाच शिवाजी पार्कच्या एका गल्लीत गेलो. रड रड रडलो. मनात साठलेलं दुःख, भीती, अश्रुतून बाहेर फेकून दिलं. अश्रु पुसले. कुसुमाग्रजांच्या कवितेतले शब्द आठवले. “सर, पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा.” आणि लढायला सज्ज झालो.
डॉक्टर स्मृतीच्या इम्युनो थेरपिने ८ सेंटिमीटरची गाठ, वर्षभरात ५.४ सेंटिमीटर वर आली. त्याकाळात औषधांचे फार वाईट परिणाम मी सहन केले.
कधी कधी वाटायचं, “बस झाले उपचार. थांबवावं सगळं. जे काही आयुष्य त्यानंतर उरेल ते तरी नीट जगावं.”
कधी अतिसार, कधी बध्दकोष्ट, त्यामुळे भगंदरचा त्रास. त्वचेवर लाल व्रण, जिभेची चव पूर्ण गेलेली. इडली सांबारचं सांबारही तिखट लागायचं.
भूक नाही, खाणं कमी, त्यामुळे वजन कमी होत गेलं. मला स्वतःला आरशात पाहणं कठीण जात होतं.
डॉक्टर स्मृतीचं म्हणणं होतं, “आता ऑपरेशन करून ट्युमरग्रस्त किडनी काढून टाकावी” पण माझ्या हृदयरोग तज्ञ भावाने ती कल्पना स्वीकारली नाही. माझी ३५ वर्षाची हृदय रोगाबरोबरची मैत्री काहीतरी परिणाम हृदयावर करणार होती. माझ्या हृदयाच्या पंपाची ताकद कमी झाली होती. ज्याला इजेक्शन रेशो म्हणतात तो ३५ वर आला होता. माझं शरीर माझ्या भावाइतकं कुणालाच ठाऊक नाही.
पण देवाच्या मनात वेगळंच होतं. त्यानेच बोटं धरून मला ऑपरेशन थिएटरकडे नेलं.
पुन्हा दिवाळी जवळ आलेली. क्रिकेटचा विश्वकप सुरू होता. माझं लिखाण सुरू होतं. आणि एक दिवस पोटात दुखायला लागलं. आणि निदान झालं. माझ्या पित्ताशयात खडे आहेत.:
मी स्वतःशी हसलो. कारण विविध आजार माझ्या शरीरावर हल्ला करायला उत्सुक असतात. काय काय आजारांनी ३५ वर्षात माझ्या शरीराचा पाहुणचार घेतलाय! तुम्ही नाव सुध्धा ऐकली नसतील.
‘पायलोनायडल सायनस’ ऐकलंय?
एपिडीडीमायटीस, आय टीपी, वगैरे… सर्जन, डॉ हितेश मेहतांनी माझ्या भावाला सांगून टाकलं, पित्ताशय काढायलाच हवं. म्हणजे ऑपरेशन आलं.
पित्ताशय नाही काढलं तर….
तर ते आत फुटण्याचं भय मोठं. ते फुटलं तर परिणाम भयानक. म्हणजे बहुदा “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा.” ऑपरेशनची जोखीम घ्यायलाच लागणार होती.
माझा भाऊ डॉ. प्रकाश संझगिरी हा अत्यंत हुशार डॉक्टर आहे. तो हृदयरोग तज्ञ असला तरी त्याचं इतर वैद्यकीय क्षेत्रातलं ज्ञान अद्ययावत असतं. त्याची बौध्दीक चक्र फिरायला लागली. पित्ताशय काढायला ऑपरेशनची जोखीम घ्यायची मग त्याच वेळी उजवी, ट्यूमरग्रस्त किडनी काढायला काय हरकत आहे.? त्याने विचार मांडला.
पण विचार मांडणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो उतरवणं वेगळं. तो सर्जीकल स्ट्रायिक असतो. त्याचं यश वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अत्यंत कुशलतेने आखणी करावी लागते. प्रत्येक टप्प्यावर एक नवी अडचण येते आणि त्यावर मात करून पुढे जायचं असतं.
डॉ प्रकाशने त्याचा उत्कृष्ठ संघ निवडला. ॲनेस्थेटिस्ट सर्वात महत्वाचा. बदलत्या परीस्थितिनुसार योग्य निर्णय घेणारा हवा. डॉ प्रकाशने त्याच्या विश्र्वासातला निवडला. डॉ फाल्गुनीची टीम होती. डॉ हितेश मेहता हे पित्ताशय काढणार होते. डॉ हेमंत पाठक किडनी काढणार होते. आखणी अशी होती. आधी पित्ताशय काढायचं. आणि त्यावेळेला इतर महत्वाची (vital) प्यारामिटर्स व्यवस्थित असतील तर किडनी काढायची.
ते विश्वचषकाचे दिवस होते. मी लीलावती हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून सामने पाहत होतो. लिहित होतो. ऑपरेशन पासून मन दुसरीकडे नेत होतो.
पण एकाक्षणी मी भाऊक झालो. मी भावाला म्हटलं, “दिवाळी नंतर ऑपरेशन करूया का?”
तो म्हणाला, “ऑपरेशन शिवाय मी तुला लीलावती बाहेर पाऊल ठेवायला देणार नाही.”
मी म्हटलं, “बरं मला तीन तास सोड. मी माझं जन्मस्थळ, माझी शाळा किंग जॉर्ज, कॉलेज रुईया, व्हि जे टी आय, शिवाजी पार्क, सावरकर स्मारकाचं स्टेज, शिवाजी पार्कचा गणपती (गणेश उद्यान) सिध्दीविनायक, वानखेडे, आणि माउंट मेरीलां जाऊन येतो.” लहानपणी मला वडील खांद्यावर घेऊन माउंट मेरीला जात असत. ते मला डोळे भरून पाहायचं होतं.
तो म्हणाला, “तू काळजी करू नकोस. ह्या सर्व ठिकाणी तू नंतर स्वतःच्या पायाने जाशील.” ह्या शब्दांनी मला धीर दिला. मनातली ऑपरेशन थिएटर मध्ये आयुष्य संपू शकतं ही भावना दूर पळाली.
ऑपरेशनच्या दिवशी माझी रवानगी आ य सी सी यू मध्ये झाली. लग्नापूर्वी वधूला नटवतात, तसं माझं नटणं झालं.
वेगवेगळ्या नळ्या शरीरात गेल्या. माझी धाकटी सून हेमांगी हळूच पडदा सरकवून आत आली आणि म्हणाली, “बाबा, काय ऐकायचंय?”
मी म्हटलं, “माझा सी रामचंद्र ह्यांचा कार्यक्रम ऐकव.”
मी संगीतात त्या ‘नटण्याच्या’ वेदना विसरून गेलो. नव्या आयुष्याशी लग्न करायला सज्ज होऊन मी ऑपरेशन थिएटर नावाच्या स्टेजवर उभा राहिलो.
आठ तास ती मंगलाष्टकं चालली. शेवटच्या शुभ मंगल सावधानने सर्वांनी निःश्वास सोडला. नव्या आयुष्याच्या उंबरठयावरचं माप मी ओलांडलं होतं.
पण हे इतकं सहज घडलं नव्हतं. माझी अँजिओप्लास्टी आणि एक प्रोसिजर आधी झालेली असली तरी मेजर ऑपरेशनचा अनुभव पहिलाच होता.
जवळचे नातेवाईक, आणि मित्र ह्यांचे हात हातात घेत ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना, त्यांच्या स्पर्शातून प्रेम आणि काळजी जाणवत होती. माझ्या अनंत मित्रांनी, चाहत्यांनी देवाकडे केलेल्या प्रार्थनेची ताकद घेऊन मी आत गेलो. आत देवाचं अस्तित्व डॉक्टरांच्या रूपात होतं. हे डॉक्टर्स त्या परमेश्वराचे दूत होते.
युरोलॉजिस्ट डॉ हेमंत पाठक, अनेस्थेटिस्ट डॉ फाल्गुनी, आणि गॅसस्ट्रो इंटेस्टाईनल सर्जन डॉ हितेश मेहता, यांची टीम माझ्याशी अत्यंत हसून बोलले, माझ्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. एक सुई टोचली, आणि जवळपास काही सेकंदात मी झोपेच्या अधीन झालो. अशी झोप, ज्यात स्वप्न नव्हतं, वेदना नव्हत्या, जेंव्हा झोपेतून जागं करण्यात आलं तेंव्हा मधल्या आठ तासातलं काहीही आठवत नव्हतं. मी अशी झोप एकदाच अनुभवली होती. हार्ट ॲटॅकच्या वेळी मला माॅर्फिंनचं इंजेक्शन दिलं होतं तेव्हा.
माझ्या ऑपरेशनचं वैद्यकीय भाषेतल वर्णन Laparoscopic cholecystectomy and right radical nephrectomy असं होतं. डॉ मेहतांनी जेंव्हा पित्ताशयावर हल्ला केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की पित्ताशयात पस झाला होता. गँगरीन झाल्याचं लक्षण होतं. प्रत्येक अवयवाला एक आवरण असतं त्या आवरणाला आणि यकृताला ते चिकटलं होतं.
चांगल्या शल्य विशारदाचे हात हे कलावंताचे हात असतात. डॉ मेहतांनी हा गुंता, अत्यंत सुंदरपणे आणि अचूक सोडवला. डॉक्टरी ज्ञान, अनुभव आणि कलेचा त्यांच्या हातात अपूर्व संगम होता. डॉ पाठकांनी त्यांना मदत केली.
त्यांनी नुसतं पित्ताशय बाहेर काढलं नाही. पोटातला टाईम बॉम्ब बाहेर काढला. माझा भाऊ हॉस्पिटलच्या बाहेर मला क्षणभरही सोडायला का तयार नव्हता, हे मला कळलं. अपेक्षेपेक्षा जास्त रक्त गेलं होतं. अत्यंत गुंतागुंतीचं ऑपरेशन पार पडलं होतं. जीव वाचला होता.
आणि मग माझ्या भावाने मास्टर स्ट्रोक मारला. माझा भाऊ आणि दोन सर्जन ह्यात चर्चा झाली. पुढे जायचं आणि किडनी काढायची का? माझे इतर पॅरामीटर्स चांगले होते. किडनी काढून टाकायची ही उत्तम संधी होती. हे माझ्या भावाने ताडलं, आणि निर्णय घेतला, जायचं पुढे.
हा निर्णय अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा होता.
मग डॉ पाठकना डॉ मेहतांनी किडनी काढायला मदत केली. ऑपरेशन थिएटर मध्ये वैद्यकीय ज्ञान आणि कसब पणाला लागलं होतं. बाहेर बसलेली रक्ताची आणि मैत्रीची नाती, देवाचा धावा करत होती. आणि मी शांतपणे दोन जगाच्या सीमारेषेवर गाढ झोपलो होतो.
त्याच वेळेला वानखेडेवर अफगाणिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलियाचा सामना अटीतटीने खेळला जात होता. ग्लेन मॅक्सवेल जिवाच्या आकांताने खेळत होता. आमचे डॉक्टर्स तसेच खेळले. आणि जिंकलें. दोघंही जवळपास एकाचवेळी जिंकले.
डॉ स्नेहाने मला जागं करून तो स्कोअर सांगायचा प्रयत्न केला. पण शुध्दी आली नव्हती. नीट शुध्द मी पुन्हा आय सी सी यू त आल्यावर आली. तेंव्हा पाहिलं लक्षात असलेलं वाक्य बायको कानात कुजबुजली, “ऑपरेशन चांगलं झालं. पित्ताशय, किडनी दोन्ही काढलं.”
भारतीय संघ विश्वचषक ऐन मोक्याच्या वेळी दबावाखाली हरला.
माझ्या आयुष्यातला हा मोठा विश्वचषक डॉक्टरांनी दबावाखाली जिंकून दिला. माझा भाऊ डॉ प्रकाश संझगिरी ह्याने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स सारखं नेतृत्त्व केलं.
देवाने आजार दिले, पण त्यातून बाहेर काढण्यासाठी भाऊही दिला. लढाई संपलेली नाही, पण पुन्हा नवी उमेद मिळाली आहे. या जगण्यावर शतदा प्रेम करण्यासाठी.
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “माझ्या चुका…” – लेखक : सुश्री उन्नती गाडगीळ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
“पुढील महिन्यात माझ्याकडे वृद्ध आईबाबा येणार आहेत. तुम्ही तुमच्या आईसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करत होतात. आणि असं बरचं काही माझी आई नेहमीच सांगायची. तर काय करु?
जरा pl. टिप्स द्या..” सुलक्षणा विचारत होती.–
तेव्हा मी तिला बरेच पदार्थ लिहून दिलेच. आणि वृद्ध,आजारी व्यक्ती संभाळताना माझ्या हातून झालेल्या बऱ्याच चुका सांगितल्या — म्हणजे तिने सावध रहावे.. खूप खूप चुका झाल्या-
** *** अहमदाबादला आमच्या घरी माझे वृद्ध सासु..सासरे अगदी आनंदात असायचे .पण..
एकदा सासरे फिरायला गेले.. ” नीट सावकाश जा हं !काँलनीबाहेर जाऊ नका …” या सूचना मी दिल्या.
पण.. आमच्या घराचा नंबर व पत्ता द्यायला विसरले, ते भटकतच राहिले .त्यांना वयोमानानुसार घरनंबर आठवलाच नाही. ते सैरभैर झाले. अर्थातच मी अर्ध्या तासात त्यांना शोधत गेलेच.. दाखवलेच नाही त्यांना काही…. पण.. वयोवृद्धांना आपला पत्ता बरोबर लिहून देणे, हे महत्त्वाचे..
वयोमानानुसार त्यांना पोथी वाचन अवघड होते. हे माझ्या बऱ्याच उशिरा ..आठदहा दिवसांनी लक्षात आले..मग चूक सुधारली..रोज सकाळी वृत्तपत्रे वाचून दाखवणे. व दुपारी.. माझ्या लेकीला मांडीवर घेऊन थोपटत..अंगाई ऐवजी..त्यांच्यासाठी पोथी वाचन केले.
माझ्या सासूबाई.. हाँस्पिटलमधे होत्या. मी रोज रात्रभर असायची. हाँस्पिटल सुसज्ज होते. तरीही –.बेडपॅन देतात.. निघून जातात. असा अनुभव आला..शारीरिक स्वच्छता करत नाहीत.. हे मला दुसऱ्या दिवशी कळले. माझी चूक झाली… मग सेवेकरींवर अवलंबून रहायचे नाही. रुग्णांची आंतर्बाह्य शारीरिक स्वच्छता, शुश्रूषा आपल्यालाच करायची आहे. हे लक्षात घेऊन .. रोज रात्री कडूलिंब पाणी व सकाळी उठल्यावर गुलाबपाणी त्या जागेवर शिंपून..बेबी पावडर लावून ठेवणे.. हे केले. नारळपाणी हे तर अंतर्गत शुद्धीकरण करतेच. मी पुढे सर्व रुग्णांबाबत ते पाळले.
— ती चूक वेळेवर लक्षात आली म्हणून त्या जवळजवळ दोन महिने हाँस्पिटलमधे असूनही त्यांना bed sores झाले नाहीत. माझ्या सासूबाईनी त्यांच्या बहिणीला सांगितले —
” संपूर्ण शरीराची स्वच्छता किळस वा आळस न करता उन्नती सतत करत होती. म्हणून बोटभर सुद्धा जखम झाली नाही.”
पहिल्याच दिवशी मी नर्सवर भरोसा ठेवला ही चूक लक्षात आली, म्हणून बरे झाले. धडा घेतला.. कुणावरही अवलंबून रहायचे नाही, स्वतः रुग्णसेवा करायची.
**** माझी आई आजारी असताना..(स्मृती भ्रंशाने तिला बोलता येत नव्हते) अल्झायमर पराकोटीचा होता. ती माझ्याकडे येऊन दोनच दिवस झाले होते. तिला आईस्क्रीम भरवताच… एकदम ती किंचाळली.. चवताळली..मला मारत सुटली..माझे केस उपटले. कडकडून चावली. चूक तिची नव्हती.(तिला स्मृती भ्रंश होता. या भयंकर आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर..रुग्ण हिंसक बनतो. चवताळतो, बेदम मारतो. नाते विसरतो. जवळच्या व्यक्तीला सहन करावेच लागते. व मार खाणे असह्य झाले तर दूर ठेवावेच लागते.नाईलाजाने. )
— तिला तो गार स्पर्श सहन झाला नाही. चूक माझी होती. मग लक्षात आले.. वार्धक्यात आईसक्रीम खूप खूप गार चालत नाही.. जरा वेळाने.. तिने आवडीने खाल्ले..आणि पुढे नंतरही मी ती चूक सुधारली..अति गार काही दिले नाही. व तिनेही आनंदाने चाटून पुसून खाल्ले…. प्रत्येक क्षण कसोटीचा होता.
**माझे वडील…. त्यांना नागीण झाली होती. त्यामुळे व वाढत्या वयानुसार थकल्याने हातात जोर नव्हता. त्यामुळे त्यांना आंघोळ घालणे, कपडे घालणे, जेवताना.. पोळीचे तुकडे करून देणे, मुख्य म्हणजे पाठीला ,पायांना मालीश करणे हे सर्व मी करत होतेच…
*वडिलांना आंघोळ घालून त्यांचे अंग पुसताना लक्षात आले की म्हातारपणात कातडी नाजूक होते. म्हणून टर्कीश टाँवेल, V.I.P. Shorts वापरणे योग्य नाही. नाजूक कातडी दुखावते… आपले वडील हेच मुळात आपल्या साठी.. V.I.P. असतात. हे लक्षात आल्यावर पंचा, कोपऱ्या, लुंगी मागवून ती सुखद वस्त्रे वापरली.
* कवळीची डबी उघडून कवळी घासण्यासाठी हातात घेतली तेव्हा लक्षात आले.. छी.. छी.. छी–
दात किती अस्वच्छ.. कवळीतील तीन दात तुटलेले.. काही दात झिजलेले.बघून मी स्वतःला लाखो दुषणे देऊ लागले. दर महिना वडील माझ्या घरी येतात. किमान पाचसहा दिवस राहतात. त्यांची कवळी वीस वर्षांपूर्वीची होती. बदलायला हवी, हे माझ्या लक्षात कसे आले नाही?
केवढी मोठी चूक झाली माझी !!!
मी लगेचच डेंटिस्टला फोन करुन.. ‘ ते रुग्ण आहेत. आपण येऊन बघता का? नवी कवळी करुन देता का?’ विचारले. माझ्या विनंतीवरून ते बहुमल्य वेळ खर्चून आले. माप वगैरे घेऊन.. अर्ज़ंट कवळी बनवून दिली. माझे वडील जेव्हा जेव्हा आमच्या घरी येत, ..तेव्हा..त्यांना चष्मा पुसून देत होते..नखे कापून देत होते.. डोळ्यात औषध घालून देत होते. तेल लावून देत होते, तेव्हा दात/कवळी स्वच्छ आहे की नाही, हे पहाणे मी कशी विसरले बर? खरच मोठी चूक झाली होती–माझी !!!
आणि खरं म्हणजे मी अगदी माझ्या नवव्या वर्षीपासून माझ्या आजोबांची कवळी घासून पुसून लख्ख करणे, पायांना, पाठीला मालीश करणे.. हे संस्कार आमच्यावर बालपणापासून आहेतच…तरीही माझ्या लक्षात आले नाही? चुकलेच माझे !!! अस्वच्छ दात मुखात असताना.. मी काळजीपूर्वक केलेले पदार्थ पचणार कसे??? डॉ.नी माझी समजूत घातली.. तुम्ही रोज खीर/दुध,आणि सार/सूप्स /नारळ पाणी ,आणि मऊ पातळ खिचडी वगैरे देत होतात तेव्हा ते दात लावत नव्हते. खरं म्हणजे..तेव्हढेच पुरेसे असते.जास्त खायचेच नसते इतके आजार असणाऱ्यांनी !!!…. वगैरे. पण चूक ती चूकच होती.
ते पुण्यात गेल्यावर रोज फोनवर सांगायचे..
आंघोळ घालणे, कवळी साफ करणे, बूटसाफ करून घालणे. गरमागरम पौष्टिक आहार वेळेवर देणे…प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. येथे काही नीट कुणी करत नाही… वगैरे.. मी हसत असे.
कारण काही व्यक्तींना सवय असते–प्रत्येकाला तोंडावर.. “तू किती माझी काळजी घेतेस,नाही तर ती..
हे प्रत्येकाला म्हणणे. हा मनुष्य स्वभाव असतो.त्यामुळे स्वतःच्याच मुलांच्यात भांडणे होतात. हे त्यांच्या लक्षात येत नाही.
— हे मी पूर्णपणे लक्षात ठेऊन ती चूक आम्ही पुढे करणार नाही..असे मनाशी ठरवले आहे.
****माझ्या मोठ्या नणंदताई रूग्ण म्हणून माझेकडे होत्या. दोन्ही डोळ्यांना पट्टी होती.
सेवा करायला बाई ठेवली की नीट करत नाही.. हा अनुभव गाठी होता. म्हणून त्यांचे सर्वकाही मी करत होते. दुखणे डोळ्यात होते. बाकी त्या हसून खेळून मजेत होत्या. गप्पा, टप्पा, गाणी-गोष्टी चालू असत.
त्यांच्या डोळ्यांवर पट्टी आहे म्हणून मी खरतर त्यांना आंघोळ घालणे, वगैरे सर्व काही करत होते.तरीही अनावधानाने..मी–एकदा..'””ताईवन्सं ,या लवकर ! तुमच्या आवडीचे गाणे लागले आहे. बघायला या””
असे बोलले. असेच एकदा..”‘ताई वन्सं, बेल वाजली. दार उघडता का? मी कणीक भिजवत आहे. आणि मला दुसऱ्या अधू हाताने दार उघडता येत नाही !” असे मी चुकून बोलले
त्यांना किती वाईट वाटले असेल ना..नंतर आम्ही दोघी खूप खूप हासलो..आंधळ्या–पांगळ्याची जोडी !
त्या समजून घेणाऱ्या होत्या म्हणून.. माझ्या चुकीवर हासून पांघरूण घातले.
— ते सर्व झाले. पण जी चूक झाली ती चूकच असते..
— आणि प्रत्येकावर अशी आबालवृद्धांचे संगोपन करण्याची वेळ येतेच. .. जागृत रहावे..
लेखिका : सुश्री उन्नती गाडगीळ
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈