मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जिजाऊं’च्या लेकींसाठी… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ जिजाऊं’च्या लेकींसाठी… ☆ श्री संदीप काळे ☆

सकाळी, सकाळी रमेश चित्ते आणि दिलीप माहुरे दाजी यांचा फोन आला  म्हणाले, “दाजी एक वाईट बातमी आहे, अविनाश कदम यांची आई गेली.’’ मला एकदम धस्स झाले. “मी परवा येतो” असे सांगून फोन ठेवला. अविनाश कदम पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते. गेल्या बावीस वर्षांपासून त्यांचे आणि माझे नातेसंबध.

मी अविनाशला भेटायला ठरल्याप्रमाणे नांदेडला गेलो. चित्ते, माहुरे दाजी माझ्यासोबत होते. नांदेडमध्ये हनुमानगडजवळ जानकीनगर येथे अविनाश यांच्या घरी आम्ही पोहचलो. घरात अविनाश यांच्या आई कमलबाई यांच्या फोटोला मोठा हार घातला होता. काकूंचा फोटो पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. 

घरात अविनाशचे वडील नामदेव कदम गुरुजी, काका होते. आम्ही घरात बसलो. काकू कशा गेल्या हे काकांनी सांगितले. बोलता-बोलता काका म्हणाले, “अविनाशला त्याच्या आईपेक्षा प्रिय जिजाऊ स्मृती सृष्टी होती. त्याची आई कित्येक महिने दवाखान्यात पडून होती, त्याने आईची सेवा केली नाही.’’

काकांच्या बोलण्यातून सतत जिजाऊ सृष्टी, जिजाऊ सृष्टी, असे सारखे माझ्या ऐकण्यात येते होते. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्न पाहून माहुरे दाजी म्हणाले, “गेल्या २० वर्षांपासून याच भागात असलेला ‘राजमाता जिजाऊ सृष्टी’ असा मोठा प्रकल्प शासन, प्रशासन, लोकसहभाग यांच्या मदतीने अविनाश उभे करीत आहेत. या ‘जिजाऊ सृष्टी’ने नांदेडच्या वैभवामध्ये मोठी भर घातली. जसा नांदेडमध्ये गुरुद्वारा सर्वांना प्रिय आहे, तसे या जिजाऊ सृष्टीचे सर्वांना आकर्षण झाले आहे.” माहुरे, चित्ते आणि कदम काका तिघेही ‘जिजाऊ सृष्टी’ बाबत भरभरून बोलत होते. 

मी काकांना म्हणालो, “अविनाश जिजाऊ सृष्टीकडेच गेलेत का?’’ काका म्हणाले, `हो’. आम्ही उठलो आणि `जिजाऊ सृष्टी’च्या दिशेने चालायला लागलो. 

अविनाश यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर भव्य `जिजाऊ सृष्टी’ साकारली होती. बाहेरून वाटत होते आपण एखाद्या किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. आम्ही आतमध्ये गेलो, दूर नजर टाकली तर अविनाश तिथल्या झाडांना पाणी टाकत होते. काकांनी अविनाशला आवाज दिला. अविनाशचे लक्ष आमच्याकडे गेले. हातातला पाईप बाजूला फेकत अविनाश आमच्याकडे आले. 

माझ्याजवळ येताच अविनाशने मला मिठी मारली. आमच्याकडे पाहून काकांच्या डोळ्यात पाणी आले. आई गेल्याचे दु:ख आणि खूप वर्षांची भेट अशी दोन्ही कारणे त्या मिठीमागे होती.

आईविषयी बोलावे का जिजाऊ सृष्टीविषयी बोलावे, अशी गडबड अविनाशच्या मनामध्ये सुरू होती. अविनाशने माझ्यासोबत बोलायला सुरुवात केली ती `जिजाऊ सृष्टी’पासूनच. जिजाऊ सृष्टी, ती उभी करण्याची भूमिका, त्यातून मोठे काय होणार आहे. आईने सर्वांचा घेतलेला निरोप हे सर्व काही अविनाश सांगत होते.

पुरोगामी चळवळीमध्ये काम केलेल्या माणसांचे काम आकाशाला गवसणी घातल्यासारखे असते. अविनाशचेही तसेच होते. वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये काम केल्याचे अंग असलेल्या अविनाशने त्यांच्या `राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान’च्या माध्यमातून `जिजाऊ सृष्टी’चे स्वप्न साकारण्यासाठी पुढाकार घेतला. २० वर्षांच्या मेहनतीने अविनाशने `जिजाऊ सृष्टी’ अंतिम टप्प्याकडे नेण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. 

अविनाशचे वडील नामदेवराव एक आदर्श शिक्षक म्हणून सर्वपरिचित. जे काय उभे करायचे, ते पुढे चिरंतर टिकले पाहिजे, हीच शिकवण अविनाशला वडिलांकडून मिळाली. त्या शिकवणीतून उभी राहिलेली वास्तू `जिजाऊ सृष्टी’च्या रूपाने समोर दिसत होती. 

जिजाऊंच्या जन्मापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकापर्यंत सारा इतिहास इथे चित्राच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या दाखवण्यात आला होता. या चित्राचे स्केच काढले होते चित्रकार दिलीप कदम यांनी. चित्र बनवली शिल्पकार व्यंकट पाटील यांनी. प्रत्येक चित्राच्या खाली जे ऐतिहासिक प्रसंग लिहिले होते ते श्रीमंत कोकाटे यांनी. `जिजाऊ सृष्टी’बद्दल काय सांगू आणि काय नाही, असे अविनाशला झाले होते.

अविनाशने माझा हात पकडला आणि सारी ‘जिजाऊ सृष्टी’ तो मला दाखवत होता. ती ‘जिजाऊ सृष्टी’ मला अशी सांगत होती जणू तिथल्या प्रत्येक वीट आणि वस्तूला अविनाशचा स्पर्श झाला आहे.

जिजाऊ चरित्राचा अभ्यासक असणाऱ्या अविनाशला जिजाऊ यांच्याप्रमाणे अनेक स्त्रिया, मुली घडल्या तर चिरंतर टिकणारे समाज परिवर्तन घडेल हे माहिती होते. त्यातूनच `जिजाऊ सृष्टी’ची निर्मिती समोर आली. प्रत्येक मुलगी, महिला जिजाऊ बनू शकते, या भावनेतून या सृष्टीची निर्मिती झाली. जिजाऊंची शौर्यगाथा, जिजाऊंनी घडवलेले शिवाजी महाराज, जिजाऊंची रणनीती, सामाजिकता, मूल्यधारणा, हे सर्व काही चित्रांच्या, देखाव्यांच्या  माध्यमातून दाखवण्यात आले होते.

महिला, मुली ज्यांना कुणाला राजमाता जिजाऊंच्या सच्च्या पाईक बनायचे आहे त्यांनी ‘जिजाऊ सृष्टी’त जाऊन तिथला अंगावर काटे आणणारा इतिहास एकदा डोळ्यांखालून घाला, तिथे असणाऱ्या जिजाऊंच्या पायावर डोके ठेवा, म्हणजे त्यांच्या मोठेपणाचे कण तुमच्या मेंदूला चिकटतील. अशी खासियत त्या ‘जिजाऊ सृष्टी’ची होती, हे मी अनुभवत होतो.   

एका मोठ्या हॉलकडे आमचे लक्ष वेधत काका म्हणाले, ही मुलींची अभ्यासिका आहे. या ‘जिजाऊ सृष्टी’चे सगळ्यात वैशिष्ट्य काय असेल तर ही मुलींची अभ्यासिका आहे. या अभ्यासिकेसाठी माझा खूप आग्रह होता. या अभ्यासिकेमध्ये दीडशे मुली एकावेळी अभ्यास, जिजाऊ चरित्राचे पारायण करणार आहेत. जिजाऊ, सावित्री, रमाई असा सर्वांची आई म्हणून भूमिका बजावणाऱ्या मातांचे आत्मचरित्र, त्यांची माहिती देणारी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके येथे असतील. किमान पंधरा हजार पुस्तकांचा ‘गोतावळा’ इथे असणार आहे.

अविनाश कदम ( ७९७२३७८०८४) म्हणाले, मी जे जे विषय या जिजाऊ सृष्टीच्या अनुषंगाने हेरले होते, ते ते विषय मला प्रत्यक्षात आणायचे होते. ते सर्व विषय मी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सर यांना सातत्याने सांगत गेलो. चव्हाण सर यांनी जिजाऊ सृष्टीसाठी माझ्याइतकीच जीव ओतून मला मदत केली. शासन, प्रशासन, नांदेड मनपा आणि लोकसहभाग या सगळ्यांच्या माध्यमातून या ‘जिजाऊ सृष्टी’ला हातभार लागला. काम पूर्णत्वास नेण्यासाठी आजही मदतीची गरज आहे. केवळ दिखावा नाही तर या जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून खूप काळ टिकणारी संस्कृती उभी राहावी. अनेक महिला, मुली येथे घडाव्यात हा उद्देश आहे, असे अविनाश मला सांगत होते.

`जिजाऊ सृष्टी’मधल्या एका झाडाखाली आम्ही जाऊन सगळेजण बसलो. मी हळूच आईचा विषय काढला, अविनाश कमालीचे हळवे, डोळे पुसत मला सांगत होते. माझी आई तिकडे दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिचा आजार हाताच्या बाहेर गेलाय आणि ती आज ना उद्या सोडून मला जाणार आहे, याची कल्पना मला होती. तिच्या आजारपणाच्या काळामध्ये मी तिच्याजवळ थांबणे अपेक्षित होते, पण त्याच वेळेला `जिजाऊ सृष्टी’चे काम अधिक गती घेत होते. `जिजाऊ सृष्टी’ उभी करताना काय पाहिजे. त्याचे स्वरूप काय असले पाहिजे. ते जोपर्यंत आपण समोर उभे राहून करून घेत नाही तोपर्यंत ते निर्माण होऊ शकत नाही. हे माझ्या अनेक वर्षांच्या कामातून लक्षात आले होते. त्यामुळे आजारपणात मला आईला अजिबात वेळ देत आला नाही. एक जिजाऊ मला तिकडे सोडून जात होती आणि दुसरी जिजाऊ इकडे `जिजाऊ सृष्टी’च्या माध्यमातून निर्माण होत होती. 

आजारपणाच्या काळामध्ये आईने मी भेटावे, जवळ राहावे असा ध्यास घेतला. माझा ध्यास मात्र जिजाऊ सृष्टी होती. आई आणि `जिजाऊ सृष्टी’ हे दोन टोक होते. इकडे `जिजाऊ सृष्टी’ उभी राहिली. तिकडे आई जात राहिली. 

आई जाण्यागोदर दोन दिवस अगोदर मी आईला भेटायला गेलो. मी परत निघताना आईने माझा हात तिच्या हातामध्ये घेतला. माझ्या डोळ्यात डोळे टाकून ती म्हणाली, अविनाश सगळ्यांचे चांगले होईल असे बघ. स्वतःची काळजी घे. तुझी `जिजाऊ सृष्टी’ पाहायला मी खाली नसले तरी ती जिजाऊ सृष्टी मी वरतून नक्की पाहीन. तिच्या डोळ्यांतले पाणी खाली पडायच्या अगोदरच तिने ते पाणी पुसले. तिला वाटले असेल ती रडली तर मी कमकुवत होईन. मी `जिजाऊ सृष्टी’चे काम सोडून तिच्याकडेच बसेन.

मी आईपासून निघालो आणि तिसऱ्या दिवशीच आई गेली. भावुक झालेल्या अविनाशची माहुरे आणि चित्ते दाजी समज काढत होते. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. आम्ही अश्रूंभरले डोळे पुसून पुन्हा डोळे उघडल्यावर समोर `जिजाऊ सृष्टी’ होती. आम्ही जिजाऊ सृष्टीमध्ये अजून एक चक्कर मारली. 

रडून मोकळे झालेले अविनाश काळजीच्या मुद्रेमध्ये गेले होते. अविनाश म्हणाले, आतापर्यंत दोन कोटी रुपयांच्यावर यासाठी खर्च झालाय. पदरमोड, शासन, राजकीय मंडळी, नांदेड मनपा, अनेक दाते यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. ते काम अजून पुढे जाण्यासाठी किमान एक कोटी रुपयांची गरज आहे. हे एक कोटी रुपये गोळा कसे करायचे, हा माझ्यासमोर प्रश्न आहे.

मी अविनाशच्या खांद्यावर हात टाकत म्हणालो, “सुरुवात करत असताना तुमच्याकडे दोन रुपये नव्हते. झाले ना दोन कोटी रुपये जमा. हेही एक कोटी जमा होतील. नका काळजी करू, धडपड सुरू ठेवा. तुमच्या धडपडीतून पुढचे चारशे वर्षे हेवा वाटावा, असा इतिहास निर्माण होणार आहे.”

`जिजाऊ सृष्टी’त काढलेले प्रत्येक चित्र पाहिल्यावर, त्या चित्राच्या खाली लिहिलेला प्रत्येक संदेश वाचल्यावर अंगावर काटा उभा राहत होता. असे वाटत होते की किमान अजून पाच-सहा तास तिथेच बसून राहावे.

खूप मोठे काहीतरी निर्माण केले, याचा अभिमान जसा अविनाश यांच्या रोमारोमात होता तसा तिथली कलाकृती पाहताना आपण काहीतरी वेगळे अनुभवतोय याची जाणीव पावलोपावली होत होती.

अविनाश, नामदेव गुरुजी, काका यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. चळवळीत राहून आपण वेगळे काहीतरी केले पाहिजे आणि त्या वेगळेपणाला चिरंतर टिकणारी झालर लागली पाहिजे. असे काम प्रत्यक्षामध्ये साकार करणारा अविनाश माझ्यासमोर एक उत्तम उदाहरण होते. आपण काहीतरी शिकलो आणि त्यामधून पुढच्या पिढीसमोर एक वेगळा आदर्श आपण ठेवून जाणार आहोत. हे सारे काही अविनाश यांच्या कामांमधून पुढे आले होते. हल्ली आपल्याकडे पुतळे आणि स्मारक उभारण्याची स्पर्धा लागलेली आहे, पण त्या पुतळ्याने स्मारकाच्या माध्यमातून चिरंतर टिकणारे काहीतरी उभारणार आहोत, याचे उदाहरण फक्त नांदेडच्या अविनाश यांच्यासारखे एखादे सापडू शकते. बरोबर ना…!

© श्री संदीप काळे

९८९००९८८६८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “२०२४ मध्ये…” ☆ श्री मंगेश मधुकर

अजून एक वर्ष संपलं .. .. 

सरत्या वर्षाला निरोप देताना,

नवीन वर्षातसुद्धा आजूबाजूला, 

भावनांवर ताबा नसणारे,

कशानंही ‘ईगो’ दुखावणारे,

रागावर कंट्रोल नसणारे,

कायम अस्वस्थ असणारे,  

विचार न करता वागणारे,

जाईल तिथं स्वार्थ पाहणारे,

मुखवटे घालून बोलणारे,

नात्यांपेक्षा व्यवहाराला महत्व देणारे, 

स्वतःच्या आगाऊपणाचं कौतुक वाटणारे,

नेहमीच दुसऱ्यांच्या चुका दाखवणारे,

ईएमआय, इंटरनेट, इमोशन्स यात गुरफटून 

वर्षातले ३६५ दिवस टेंशनसोबत जगणारे,

सुशिक्षित असूनही अडाण्यासारखं वागणारे,

पैशाचा माज दाखवणारे,

फालतू गोष्टीवर वारेमाप खर्च करणारे,

सेलिब्रेशनसाठी निमित्त शोधणारे,

उथळ गोष्टीत आनंद मानणारे,

सार्वजनिक ठिकाणी मूर्खासारखं वागणारे,

निर्लज्जपणे वाहतुकीचे नियम तोडणारे,

गर्दीत बेफाम गाडी चालवणारे,

फोनवर बोलत ड्रायव्हिंग करणारे, 

स्वतःबरोबर दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणारे,

कुठंही वेडयावाकड्या गाड्या पार्क करणारे,

रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानं थाटणारे,

अशा दुकानातून खरेदी करणारे,

रस्त्यावर कचरा टाकणारे,

कुठंही पचकन थुंकणारे, 

अन्न फेकून देणारे,

डॉक्टर असूनही व्यापाऱ्यासारखं वागणारे,

दुकानासारखं हॉस्पिटल चालवणारे, 

वाढदिवस सार्वजनिक साजरा करणारे,

जागोजागी फ्लेक्स लावून स्वतःची टिमकी वाजवणारे,

फुटकळ कामाचे वारेमाप प्रदर्शन करणारे,

शोभत नसताना विचित्र फॅशन करणारे,

सोयीनुसार रूढी-परंपरा पाळणारे,

‘आमच्यावेळी असं नव्हतं’ हे सतत ऐकवणारे,

वेळ कसा घालवावा या विवंचनेत असणारे,

वय वाढलं तरी हेका न सोडणारे,

माणसांपेक्षा मोबाईलला जवळचा मानणारे, 

सतत फोनवर बोलणारे,

हेडफोडवर गाणी ऐकत चालणारे,

सोशल मीडियाला भुलणारे,

खाजगी गोष्टी चव्हाट्यावर मांडणारे, 

लाईक्स,कमेंट हेच आयुष्य मानणारे,

चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणारे,

राजकारणाचे खेळ आणि 

खेळातले राजकारण पाहत गप्प बसणारे,

अजूनही नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणारे,

आणि आपसात भांडणं करणारे,

आणि 

नव्या वर्षात यंव करायचं, त्यांव करायचं 

असं नित्य नियमानं ठरवणारे आरंभशूर,

 

…… असे मी, तुम्ही, आम्ही, आपण सारे एकाच माळेचे मणी……..

 

सो कॉल्ड मॉडर्न लाईफमध्ये 

अस्वस्थता, बेचैनी आणि मोबाईल सतत सोबत,

जावं तिथं गर्दी आणि गोंगाट, 

सगळी सुखं आहेत तरी मन शांत नाही 

माणसं असूनही किडा-मुंगीसारखं जगणं.

त्याच त्या चक्रात फिरत राहणं.  

स्वप्न,अपेक्षा पूर्ण करण्याच्या धावपळीत 

तब्येतीला फारच गृहीत धरलं जातयं.

डायबेटिस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक हे कायमचे सोबती 

फार लवकर आयुष्यात येऊ लागलेत… वेळीच काहीतरी करायला हवं.

नाहीतर दिवसेंदिवस हे वाढत जाणार.

जीव तोडून कमावलेला पैसा, 

जीव टिकवण्यासाठीच खर्च होणार, 

तेव्हा …… 

नंतरचा पश्चात्ताप टाळण्यासाठी थोडा विचार करा…  

नक्की काय चुकतंय हे शोधा….. 

 

समाजासाठी, घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी…… 

2024 मध्ये…….फक्त कॅलेंडरच नाही …. तर काही सवयीसुद्धा बदलू या.

‼सर्व वाचकांना नवीन वर्षातला प्रत्येक दिवस मनासारखा, आरोग्य संपन्न जावो हीच सदिच्छा‼

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागे होऊ या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ जागे होऊ या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मला आज पहाटे ४ वाजता स्वप्न पडून जाग आली.  मी भारतातील सर्वात मोठ्या DLF मॉलमध्ये मोजे आणि  टाय खरेदी करू पाहत होतो.

 _मी आत गेल्यावर मला एक स्वेटर दिसला ज्याची किंमत 9000 रुपये  .स्वेटरच्या शेजारी एक जीन्सची जोडी होती 10000 रुपये .मोजे 8000 रुपये  !  आणि आश्चर्य  टाय ची किंमत चक्क 16,000/- 

मी विक्रेत्याच्या शोधात गेलो आणि घड्याळ विभागात एक सापडला

_तो एका माणसाला घड्याळ दाखवत होता.  225/- रोलेक्स घड्याळ.   4 कॅरेटची हिऱ्याची अंगठी.. रु. 95/- 

आश्चर्यचकित होऊन मी विक्रेत्याला विचारले “रोलेक्स घड्याळ रु. 225/- मध्ये कसे विकले जाऊ शकते? आणि  स्वस्त मोजे रु. 8000/- ला कसे विकले जाऊ शकतात”? 

तो म्हणाला “काल रात्री कोणीतरी दुकानात घुसले आणि त्याने प्रत्येक गोष्टीचे price tag बदलले”.

“आपले पण बहुधा असेच झालेले आहे…प्रत्येकजण गोंधळलेला आहे.  “ते कमी किमतीच्या गोष्टींसाठी खूप किंमत द्यायला तयार असतात आणि मोठ्या किमतीच्या गोष्टींसाठी खूप कमी पैसे देतात”

“खरंच काय मौल्यवान आहे आणि काय नाही हे त्यांना कळत नाही” .  मला आशा आहे की आम्हाला लवकरच योग्य किंमतीचे टॅग परत मिळतील …. “

मी चकित होऊन उठलो आणि गोंधळलो आणि तेव्हापासून विचार केला…

_कदाचित आपलं आयुष्य या स्वप्नासारखं असेल.

_कदाचित कोणीतरी, काहीतरी आपल्या आयुष्यात शिरले आणि प्रत्येक गोष्टीची किंमत (VALUE) बदलली.

कदाचित  स्पर्धा, पद, पदव्या, प्रसिद्धी, पदोन्नती, शो-ऑफ, पैसा आणि शक्ती यांचे मूल्य खूप अधिक !

…आणि आनंद, कौटुंबिक, नातेसंबंध, मन:शांती, समाधान, प्रेम, ज्ञान, दयाळूपणा, मैत्री, संस्कृती धर्म ईश्वर स्वतःचे दिव्यत्व… यांची किंमत कवडी इतकी ….

कदाचित आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात हे स्वप्न जगत आहोत…

जिथे खरी किंमत चुकवायला पाहिजे तिथे आपण खूप कंजूसपणा करीत आहोत आणि ज्याला कवडीची पण किंमत नाही त्याच्यावर आपले सर्वस्व उधळित आहोत

मला आशा आहे…… आपण जागे होऊ,….  योग्य वेळेत.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते. 

पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.

“बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना” आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले. 

एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.

“ओ आजोबा नीट घेऊन खा की?” मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. 

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला. 

“काळजी करू नकोस, बाबा सापडले!!” कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!

त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली. 

“काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???”

त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले. 

“हे आजोबा कोण आहेत तुमचे?” मी विचारले.

“वडील आहेत माझे.” त्याचे उत्तर.

“त्यांना काही त्रास आहे का?” माझा पुढचा प्रश्न.

“हो त्यांना अल्झायमर आहे.”

अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. 

” मग हे आजोबा असे कुठेही जातात का?” 

” हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत.”

मी शॉकच झालो. 

“मग तुम्ही यांना शोधता कसे?”मी विचारले.

“आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी.”

“असे वारंवार होत असेल” मी आश्चर्याने विचारले. 

तो स्मितहास्य करून म्हणाला “महिन्याला एक दोन वेळेस”

“काळजी घ्याआजोबांची ! बाप रे काय हा वैताग” मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, “बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं.”

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.              

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.

उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो…                 

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चीssssssssअsssssर्सssss-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चीsssssssssssssर्सssss…”🍾 ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला 

“हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही

आपलं वर्ष गुडीपाडव्याचं “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो

“ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

मला रोजची तारीख माहिती

माझं सगळं नियोजन तारखेवर

म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

मग पाडवा? 

तो ही माझा आहेच.

मी आनंदाचा प्रवासी,

जिथे आनंद तिथं मी.

शादी कीसीकी हो, अपना दिल गाता है.

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड.

खरं तर प्रत्येक सकाळ ही,

एका नववर्षाची सुरुवात असते.

सवेरेका सूरज हमारे लिये है,

असं म्हणणारा कलंदर मी.

पण रोज साजरा करायला

जमतंय कुठं? जमलं तर ते ही करावं.

कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.

म्हणूनच,

आनंदाचे डोही आनंद तरंग…

असं म्हणत मित्रांनो साजरा करूया

निखळ आनंद, 

मग तो कुणाचा का असेना,

आणि कधीही का असेना !!!

तर चीssssssssअsssssर्सssss

हॅप्पी    न्यू    इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सकाळी साडेसहाची वेळ .

शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले.

 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा……….

कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले.

हळूहळू आवाज बंद झाला.

 

दुसरी दिवशी पण

 सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले… ऐकू आले

तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले.

 

 एक पंचावन्न.. साठ वर्षाच्या बाई रस्ता झाडत होत्या.

 त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. 

आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या.

 

“ ताई तुम्ही नवीन आलात का? “

“ हो बदलीवर आले आहे आठ दिवसाच्या.. माझी मैत्रिण इथं काम करायची तिला बरं नाही म्हणून मी येत आहे. “

 

“ असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. नीट झाडलं जातंय ना? “

 “ हो हो त्याचं काही नाही देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”

 

“ अहो मुलीनी मोबाईल मध्ये गाणी  भरून दिली आहेत. कसं लावायचं ते शिकवलं आहे 

 विठुरायाची गाणी ऐकतं.. काम कधी होतंय समजतच नाही बघा …..आणि शीण पण वाटत नाही……”

“ भजनाला जाता का?”

“ कुठलं  हो…..मला खूप आवड आहे पण वेळच भेटत नाही बघा…माझी आई गाणी  म्हणायची..

 आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात ..”

 

“ हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगल  सुचलं….” त्या हसल्या आणि कामाला लागल्या..

मला जनाबाईचा अभंग आठवला

 

झाड लोट करी जनी

केरभरी चक्रपाणी 

पाटी घेऊन या शिरी

नेऊन  टाकी दूरी 

ऐसा भक्तिसी  भुलला

नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला

काय उतराई होऊ तुला

 

विठुराया तु जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहित आहे.

पण खरं सांगू इतकी वर्ष लोटली तरी आजही तू भक्तांच्या  तनामनात आहेसच…

नाम रूपानी…

 

तुझे अभंग आजही मनाला उभारी देत आहेत. 

संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट  जाणवत नाहीत …

तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे या ताईंमध्ये….

 

खरंच  ….विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल..

 

असं होतच असेल…. 

फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा ….. जनी इतका…

मग तो येतोच मदतीला…  सगळं सोपं करतो .नीट लक्ष दिल की ध्यानात येते की प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते … त्याची रूपे वेगवेगळी असतात. ती एकदा दिसायला लागली की मग सगळीकडेच तो दिसतो….

….. आता ठरवलं आहे सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची…

…. मग  तो विठुराया  दिसेल….. पंढरपूरला न जाता पण…… आपल्या आसपास…

…. आज  कशी मला जनी भेटली तसाच….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२३ सरत चालले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात.

व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे, ” आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण, परके कोण, ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही? एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.

नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पुर्णत्वास जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी. कारण, घरची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. कारण, पुन्हा व.पु. म्हणतात तसं, ” समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..” मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच.

असो, सुर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतच, तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या.. गुरू ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहेत,

“आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे

ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे…”

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण -…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण …” ☆ श्री सुनील देशपांडे

आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !

आज त्यांची पुण्यतिथी 

त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये  गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.

आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या  कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात. 

पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर  रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा  ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.  

आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच. 

परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’  खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?

या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’

असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी  म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती  त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….

म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी

“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान

मातीला हे मिळणारच. 

झाड कधी कण्हतं का?

कधी काही म्हणतं का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान!

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप

बोरकर एकदा म्हणाले

सिगारेटचा सोडीत धूर 

“सत्तर संपली तरी माझ्या

गळ्यात तरुणताजा सूर!

तीन मजले चढून आलो

असा दम अजून श्वासात

– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”

कवितांतून

रंग रंग झरू लागले

प्रत्येक क्षण

आनंदाने भरू लागले!

घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,

धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!

पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस

पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत

उभा होता किती वेळ,

रंगून जाऊन बघत होता

बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!

रस्त्यावरच उभं राहून दोघांनी

मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!

मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,

जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!

खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! 

आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?

नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?

अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?

थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?

तुम्ही काय घ्यायचं

ते तुम्ही ठरवा,

तुम्ही काय प्यायचं

ते तुम्ही ठरवा!

त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:

वय तुमचं साठ असो, सत्तर असो,

तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;

मोरासारखा अंधार फुलून आल्यावर

मजा आणते थोडीशी काजूफेणी!

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

 

आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता  रसिकार्पण.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा

 

डोळे भरत त्यांची आठवण

आपण आज काढतोच ना?

दोन कविता आठवून आठवून

त्यांच्यासाठी म्हणतोच ना ?

डोळे गाळत बसायचं की कविता म्हणत बसायचं

तुम्हीच ठरवा

 

सरत्या वर्षाच्या काळोखात 

अंधार गडद होत असतो

नव्या वर्षाच्या प्रकाशात

त्यांचं काव्य उजळत असतं

अंधारात गडप व्हायचं की काव्यानंदात उजळायचं

तुम्हीच ठरवा

 

पाडगांवकर हयात नाहीत

असंही म्हणता येतं

पाडगांवकर मनात आहेत

असं सुद्धा म्हणता येतं

हयात नाहीत म्हणायचं की मनात आहेत म्हणायचं

तुम्हीच ठरवा.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा. 

 

———- श्रद्धापूर्वक  — सुनील देशपांडे.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

माझी दत्तोपासना

आपण एखाद्या दैवताची उपासना का करतो याचं कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण दत्तगुरूंच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे सांगावीशी वाटते. अर्थात प्रत्येकाची  यामागची भूमिका वेगळी असू शकेल आणि तिचे स्वागत आहे. पण मला भावलेलं हे दत्ततत्व या प्रकारचं आहे. 

दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं एकत्रित सात्विक रूप. आणि ही तिन्ही दैवतं म्हणजे उत्पत्ति, स्थिती(जतन) आणि विलय या तिन्हीचं प्रतीक.

हे प्रतीक… म्हणजे ह्या तीन अवस्था आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात. 

आपल्या शरीराची निर्मिती होते, मग आपण त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ते शरीर विलीनही होतं. पृथ्वीवरील कुठल्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टीलादेखील या तीन अवस्थांमधून जावंच लागतं. हे झालं शारीरिक, भौतिक पातळीवर.

विचारांच्या बाबतीतसुद्धा हाच क्रम लागू होतो. बुद्धीने विचार निर्माण होतात. ते आपल्या मनात स्थिरावतात. आणि कालांतराने विशिष्ट कृती करून किंवा न करताही आपोआप नाहीसे होतात, किंवा त्यांचं दुसऱ्या विचारांमध्ये रूपांतर होतं…..  पण विचारांच्या बाबतीत आणखी काही घडतं. एखादा विचार आपल्या मनात निर्माण झाला आणि तो जर चांगला, सद्विचार असेल तर आपली स्थितीही चांगली राहते. आपण त्या विचाराला धरून ठेवल्यावर आपली प्रगतीच होते. आणि आपला तो विचार नष्ट झाला तर सद्विचारांच्या अभावामुळे लवकरच सगळ्याचा नाशही होतो. 

कोणत्याही प्रतिभावान/ कलाकार माणसाचा तर दत्ततत्वाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. 

त्याच्या मनात कल्पनेची, विचारांची निर्मिती होते. ती धरून ठेवल्यावर उत्तम कलाकृती साकार होते आणि जर ती कल्पना धरून ठेवली नाही तर ती निघून जाते. म्हणजे काहीच घडत नाही. इथं घडण्याची शक्यता असतानासुद्धा काही न घडणं म्हणजेही एक प्रकारे विलयच. किंवा विचारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे त्या कलाकृतीचा एक प्रकारे विलयच.

त्यामुळे हे असं दत्ततत्त्व आपला रोजच्या जगण्यात आपण हरेक वेळी अनुभवतो. म्हणून दत्तगुरूंची उपासना सर्वसामान्य माणूस म्हणून मला जास्त जवळची वाटते. 

निर्मिती कशी असली पाहिजे , दृढता, स्थिरता कशी असली पाहिजे आणि योग्य वेळ येताक्षणीच त्या निर्मितीपासून स्वतःला अलिप्त कसे ठेवता यायला पाहिजे…… कारण कधी कधी विलय हासुद्धा नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा असतो. म्हणून तोही महत्त्वाचा. हे सगळं सहजतेने, सरळ सोप्या पद्धतीने आणि सगुण रूपातून सांगणाऱ्या दत्तगुरूंचे महत्त्व, त्यांची उपासना, ही माझ्यासाठी महत्त्वाची…

या दत्ततत्वाचं कायम स्मरण रहावं ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना !!! 

तुम्ही एखाद्या दैवताची उपासना करत असाल तर त्यामागे तुमची स्वतःची अशी काय भूमिका आहे ती या निमित्ताने जाणून घेणं मला आवडेल. 

||श्री गुरुदेव दत्त||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares