श्री सतीश मोघे
मनमंजुषेतून
☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-२ ☆ श्री सतीश मोघे ☆
(तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.) – इथून पुढे —-
कुणीतरी आपल्याला निमंत्रण देतो, घरी बोलावतो, आपण जातो. यजमानांचा मुलगा दहावीला असतो. परीक्षेला अजून ५ महिने बाकी असतात. मुलगा त्याच्या बेडरुममध्ये असतो. आई त्याला बोलवायला जाते. हेतू हा, की बाहेर येऊन आपल्याला त्याने भेटून मग जावे. आई, दारावर हळूच टकटक करते. “काका-काकू आले आहेत, थोडावेळ बाहेर येवून भेट त्यांना”. आतून नकार येतो. आई नाराज होऊन बाहेर येते. “उद्या क्लासमध्ये त्याची परीक्षा आहे, अभ्यास झालेला नाही “, असे सांगून, वेळ मारुन नेते. दुसरा असाच प्रसंग. आपण नातवाईकांकडे जातो. चहा-पोहे, गप्पा सर्व होतात. एक तासाने आपण जायला निघतो. त्यावेळी सहजच त्यांच्या दहा वर्षाच्या मुलाची, अमितची आठवण होते. आपण सहजच म्हणतो, “अमित शाळेत असेल ना! त्याला सांगा ,आठवण काढली काकांनी.” असे म्हटल्यावर अमितचे बाबा म्हणतात, “अरे सॉरी, त्याला आज सुट्टीच आहे.त्याला बोलवायला विसरलो. आहे त्याच्या रुममध्ये, बोलवतो” आणि ते त्याला हाक मारतात. “अरे काका निघाले आहेत, लवकर ये” तो येतो. तोपर्यंत आपण लिफ्टच्या दारात असतो. या दोन्ही प्रसंगात प्रश्न निर्माण होतात की, आई-बाबा या मुलांना, “ते काही नाही. दोन मिनिटे बाहेर ये, नमस्कार कर आणि पुन्हा जा”, असे दटावून का सांगू शकत नाहीत? त्यांचा त्यांच्या मुलावरचा हक्क गमावला गेला आहे? की ही नाती पुढच्या पिढीने सांभाळायची आवश्यकता नाही, असेच संस्कार त्यांना करायचे आहेत ? की मुलांना स्पेसमधून बाहेर काढले की ते उगाच नाराज होतील, ही भीती त्यांना सतावते आहे?
या आणि याला आनुषंगिक अशा असंख्य प्रश्नांची गर्दी डोक्यात होत असते.याची उत्तरे आपल्याला आणि त्या मुलांच्या आईबाबांनाही ठाऊक असतात.आपल्या पेक्षा त्यांना त्यांच्या मुलांची मने जपणे,ती दुखवू न देणे हे प्राथम्याचे असते,हे आपल्याला समजून घ्यावे लागते. त्यांच्यात आणि आपल्यात मोठी स्पेस आहे,हे सत्य स्वीकारावे लागते.
कुटुंबात परस्परांना इतकी स्पेस दिली जाते, घेतली जाते की, नात्यात नकळत भावनिक अंतर पडायला लागते आणि एकमेकांवरचे प्रेमाचे हक्क गमावले जावू लागतात. घरी कोणीही नातेवाईक, कुटुंबातील कुणाचेही मित्र, मैत्रिण आले आहेत समजल्यावर खरे तर प्रत्येकाने आपली स्पेस सोडून स्वतःहून बाहेर येऊन त्या व्यक्तीला अल्पवेळ का होईना भेटणे, बोलणे आवश्यक आहे. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे या सवयी बालवयातच लावणे आवश्यक आहे.
पूर्वीच्या आणि आताच्या कुटुंबसंस्थेतील नातेसंबंधावर, व्यवहारांवर एका हिंदी विचारवंताचे खूप छान भाष्य आहे. ते म्हणतात, “पहले सबकुछ दिलसे होता था, क्योंकि दिल को दिमाख नही था… अब दिल को दिमाख आ गया है”. हदयाला स्वार्थी बुद्धीचे कोंब फुटले आहेत. माझे अस्तित्व, माझे हक्क, माझे विचार, माझे सुख या केंद्राभोवती ज्याची त्याची स्वतः ची वर्तुळे तयार होत आहेत. ही वर्तुळे कुटुंबाच्या वर्तुळात
गुण्यागोविंदाने राहतात तोपर्यंत ठिक आहे. पण त्यापलिकडे ती विस्तारायला लागली की नात्यात सुवर्णमध्य गाठणे कठिण होऊन बसते. हदयाला बुद्धीचे कोंब फुटणे हे डोळसपणा म्हणून चांगलेच.पण ते केवळ स्वार्थबुध्दीचे कोंब नकोत स्वार्थबुद्धीबरोबरच विवेकबुद्धीचेही त्याला कोंब फुटावेत आणि हे विवेकबुद्धीचे कोंब स्वार्थबुद्धीपेक्षा मोठे असावेत. तरच स्पेस घेतांना सुवर्णमध्य साधला जातो. कुटुंबाची सोनेरी झळाळी आणि नात्यातली ओल, हिरवेपण टिकून राहते.
नात्यात अधिकाधिक वेळ स्पेस घ्यायला मोबाईलचे आक्रमण हेही एक कारण आहे.हातात मोबाईल आल्यापासून तर प्रत्येक जण त्याला हवी तेव्हा हवी तेवढी स्पेस घेत असल्याचे दिसते. याला मी, तुम्ही कुणीही अपवाद नाही. पण याचा सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. संध्याकाळी सर्वजण कामावरुन, शाळेतून, व्यवसायाच्या ठिकाणाहून घरी येतात, एकत्र जमतात. अशावेळी तरी थोडा वेळ दिवसभरातल्या गंमतीजमती, घडामोडी यावर गप्पा व्हायला हव्यात. तेव्हाही दिवाणखान्यात बसून सर्वजण मोबाईलमध्ये डोके घालून बसली असतील तर ही स्पेस नात्यात, अंतराळात असते तशी पोकळी निर्माण करणारी ठरते. कुछ ऐसे हो गए इस दौर के रिश्ते…आवाज अगर तुम न दो तो बोलते वह भी नही.. अशावेळी कुटुंबात एकतरी जागरुक सदस्य असावा की जो सर्वांना “मोबाईल खाली ठेवा, आता थोडे बोलू या”, असा आवाज देईल. नाहीतर घराचे घरपण संपून त्याला लॉजिंग बोर्डींगचेच स्वरुप येईल.
स्पेस घेण्यावरच्या मर्यादा या कुटुंबव्यवस्था, आपापसातले प्रेम, आपुलकी, संवाद टिकविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहेत.म्हणून त्या ठळकपणे सांगितल्या. पण मुलांचे करियर, उज्वल भविष्य घडायला हवे असेल आणि त्यासाठी त्यांना घडवायचे असेल तर त्यांना स्पेस द्यावीच लागेल आणि ती देणे योग्यही. मूले म्हणतात, “तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले आहे. फक्त तसे करायला थोडा स्पेस द्या आम्हाला” इथे स्पेस म्हणजे ‘वेळ’ ते मागत असतात. ही स्पेस त्यांना द्यायला हवी. कधी ती म्हणतात, “तुम्ही सांगता ते योग्य आहे. ते करेनही मी. पण तुम्ही म्हणता त्याच पद्धतीने करायचा आग्रह धरु नका. मला थोडी स्पेस द्या”. इथे ते स्पेस म्हणजे करण्याच्या पद्धतीचे स्वातंत्र्य मागत असतात. ही स्पेसही त्यांना द्यायला हवी. बऱ्याचदा एखादी गोष्ट त्यांना करायची नसते. पण ती करण्याचा आग्रह होण्याची शक्यता जिथे असते, तिथे जाणे ते टाळतात. तिथे त्यांना ही स्पेस म्हणजेच न येण्याचे स्वातंत्र्य घेऊ द्यावे. त्यांचे करियर,जीवनाच्या वाटा, मूल्ये याबाबत घरातल्या मोठ्यांच्या सांगण्याशी तत्वतः सहमत होऊन वाटचाल करताना त्यांनी त्यांना हवा तेव्हढा वेळ घेतला,हवी तशी पद्धत अंगिकारली तर त्यांचे हे स्पेस घेणे सुवर्णमध्य साधणारे होते. कोणीही दुखावले जात नाही.दोघानाही वेळ आली तर सहजपणे एक पाऊल मागे म्हणजेच बॅकस्पेसला सहज येता येते. नात्यांची वीण घट्ट राहते. अतिप्रेमाने नाती गुदमरत नाहीत वा कमी प्रेम मिळाले, अशी नात्यांत तक्रारही राहत नाही. एका मोठ्या वर्तुळात प्रत्येकाची वर्तुळे हातात हात घालून सुखात राहतात.
स्पेस तर प्रत्येकालाच हवी. पण ती अशी घ्यावी की, तेवढ्या काळात ताजेतवाने होऊन, उत्साहित होऊन पुन्हा बॅकस्पेसला जावून, उमटलेल्या नकारात्मक गोष्ट डिलीट करुन तिथे नवीन प्रेमाची, आपुलकीची अक्षर उमटविणे सहज शक्य होईल.स्पेस हवी,असे कोणी म्हटला,तर त्याला सांगू या,स्पेस जरूर घे..पण एकच अट..दूर रहकर भी दूरियां न लगे ,बस इतनासा रिश्ता बनाए रखना…
– समाप्त –
© श्री सतीश मोघे
मो – +91 9167558555
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈