डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ झंकारलेली तार ऐकू मात्र यायला हवी… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
संगीत ऐकायला ते दरवेळी कळावंच लागतं असं काही नाही…. मैफिल जमली की, गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते, ती ऐकू आली म्हणजे झालं…!
मला रस्त्यावर जमलेल्या अशा अनेक मूक मैफिलींचा साक्षीदार होता आलं…!
…. एखाद्याला छातीशी लावलं…तेव्हा त्याच्या हृदयाच्या धडधडीत, तबल्याचा ताल जाणवला… !
…. कसे आहात ? बरे आहात ना …? यावर खाली मान घालून त्यांनी दिलेले उत्तर, ‘होय आम्ही बरे आहोत’… यानंतर ढोलकी वर मारलेली “थाप” आठवली… !!
…. नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या पतीची कहाणी सांगता सांगता, फुटलेल्या बांगड्यांची किणकिण, सतारीशी स्पर्धा करतात…. !!!
…. आणि हुंदके देत शब्द बाहेर पडतात त्यावेळी, बीन तालासुरांचं हे गाणं हृदय भेदत जातं…
…. ढोलकी गत दोन्ही बाजूंनी थपडा खाणारी ही माणसं… आयुष्याचा “तमाशा” कधी होतो तेच कळत नाही….!
गाण्यातला सूर हरवला की ते गाणं बेसूर होतं…. परंतु आयुष्यातला सूर हरवला की आयुष्य भेसूर होतं…
अशीच काही फसलेली गाणी आणि कविता या महिन्यात हाती आल्या….
आपल्याच साथीने… अशा काही बेसूर गाण्यांना सुरात बांधून चाली लावण्याचा प्रयत्न केला…
ज्या कवितांतून शब्द निसटले होते… तिथे योग्य ते शब्द टाकून, त्या कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला….
…. जे काही घडलं, ते आपल्या साथीनं…. आपल्यामुळेच….
वैद्यकीय
१. भीक मागणाऱ्या लोकांच्या नेमक्या समस्या ओळखण्यासाठी, त्यांच्या अंगातले कलागुण शोधण्यासाठी, वैद्यकीय सेवा देण्याच्या निमित्ताने जेव्हा त्यांच्यात बसून जेवतो खातो, त्यावेळी परकेपणा आपोआप संपुष्टात येतो. यावेळी आपोआपच सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या गोष्टींच्या आधाराने काही आराखडे बांधून त्यांना आपल्या सर्वांच्या साथीने छोटे मोठे व्यवसाय टाकून देत आहे.
डॉक्टर म्हणून रस्त्यावर जे काही करणे मला शक्य नाही, अशा सर्व बाबींसाठीआपण इतर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना ऍडमिट करत आहोत. यामागे हेतू हाच की आजारपणाचे निमित्त करून त्यांनी भीक मागू नये, आजार बरा झाल्यानंतर त्यांना जो जमेल तो व्यवसाय त्यांनी सन्मानाने करावा.
भिक्षेकरी नाही .. तर कष्टकरी होऊन, गावकरी म्हणून जगावे… !
या महिन्यात जवळपास ६०० रुग्णांवर रस्त्यावर उपचार केले आहेत. अति गंभीर अशा रस्त्यावरील ३ निराधारांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांचे प्राण वाचले आहेत.
.. गंमत अशी की या तिघांच्याही नातेवाईकांशी, मोठ्या ऑपरेशनपूर्वी त्यांची संमती घेण्यासाठी /सहीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला… परंतु कोणीही पुढे आले नाही.
झाल्या असतील यांच्याही काही चुका….
…. पण, माणसाची चूक म्हणजे पुस्तकातलं एक पान आहे….नातं म्हणजे आख्खे पुस्तक आहे…. चुकलं असेल काही तर ते एक पान फाडावं ना … आख्खे पुस्तक फाडण्यात कोणता शहाणपणा आहे ???
.. असो, सर्व संमती पत्रावर पालक म्हणून माझी सही आहे…. ! एकाच महिन्यात तीन वयस्क आणि जीर्ण पोरांना जन्माला घालताना, बाप म्हणून, किती आनंद होतो ? शब्दात कसं सांगू…. ???
२. रस्त्यावरच रक्त लघवी तपासण्या, वॉकर, कुबड्या, काठी, मानेचे, पायाचे पट्टे यासारखी वैद्यकीय साधने देतच आहोत. पुन्हा हेतू एकच… व्यंगावर मात करत यांनी , माझ्या कुबड्या सोडून, स्वतःच्या पायावर सन्मानानं उभं राहावं… !!!
अन्नपूर्णा प्रकल्प
रस्त्यावर असहायपणे पडून असलेले गोरगरीब आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे गोरगरीब यांना आपण दररोज जेवणाचे डबे देत आहोत. (दिसेल त्याला सरसकट आम्ही डबे देत नाही)
जेवण तयार करणे, त्याचे पॅकिंग करणे, आणि ते योग्य त्या व्यक्तींपर्यंत वितरित करणे, हे सर्व काम आमचे सहकारी श्री अमोल शेरेकर हे त्यांच्या पत्नीच्या साथीने करत आहेत.
अन्नपूर्णा हा संपूर्ण उपक्रम डॉ मनीषा यांच्या देखरेखी खाली सुरु आहे.
आमचे हात हा प्रकल्प राबवत असले, तरीही देणारे हात मात्र तुम्हा सर्वांचे आहेत.
एक बाबा… यांना आम्ही जेव्हा डबा द्यायचो, त्यावेळी हात जोडून, ते छताकडे पाहून, तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचे… एकदा गमतीने मी त्यांना म्हणालो ‘ काय मागताय बाबा ? ‘
.. यावर ते म्हणाले, ‘अरे बाळा, ज्यांनी माझ्या मुखात आज हा घास घातला…त्याला आणि त्याच्या पोरा बाळांना सुख, शांती, समृद्धी आणि समाधान दे… अशी देवाकडे प्रार्थना करतोय… ! ‘
.. हे बाबा स्वतः इतक्या त्रासात आहेत, परंतु मागणे मागताना त्यांनी इतरांसाठी मागितले….
शेवटी काय ? स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी… पण दुसऱ्यासाठी मागणं ही खरी प्रार्थना… !!!
त्यांची ही प्रार्थना आपणा सर्वांसाठी होती…
त्यांच्या मुखात घास खरंतर आपण सर्वांनी घातले आहेत मी फक्त पोस्टमनचं काम केलं…. तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपणा सर्वांना लाभू देत हीच माझी शुभेच्छा !
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈