सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ माझी आई… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
आई ! तुझ्यावर काहीतरी लिहावं असे भाचीने सांगितल्यावर तुझ्याविषयी काय काय लिहू असा प्रश्न मनाला पडला ! कळायला लागल्यापासून तू डोळ्यासमोर येतेस ती अशीच कर्तृत्ववान, सतत कामात असणारी आणि स्वाभिमानाने जगणारी, कष्ट करणारी आई ! संसारासाठी सतत दादांच्या पगारात आपला तिखट मिठाचा आणि भाजीपाल्याचा खर्च निघावा म्हणून धडपड करणारी आई !
तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल सांगण्यापूर्वी तिचे लग्न कसे ठरले हे सांगणे मला महत्त्वाचे वाटते. कारण पेंडसे कुटुंब कराचीला राहत होते तर आईचं माहेर बेळगावला घाणेकरांच्याकडचे ! इतक्या लांबच्या ठिकाणी राहणारी ही दोन्ही कुटुंबे एकत्र कशी आली हा प्रश्न मला पडत असे. नंतर कळले की आमचे आजोबा शिकायला असताना घाणेकरांच्या घरी राहत होते. नंतर नोकरी निमित्ताने ते कराचीला गेले. व त्यांचा संसार तिथे सुरू झाला.. वडिलांच्या वयाच्या 22व्या वर्षी आजोबा काही कारणानिमित्ताने बेळगावला आले होते, त्यावेळी माझ्या आईचे पण लग्नाचे बघतच होते. त्यामुळे मोठ्यांच्यात बोलणी झाली आणि त्यांचे लग्न ठरवले गेले. आईने दादांना तर पाहिलेच नव्हते. पण त्याकाळी मोठ्यांनी लग्न ठरवले की मुलगा -मुलगी यांच्या पसंतीचा प्रश्न गौण ठरवला जाई. १९४५ साली लग्न झाल्यानंतर माझी आई बेळगावहून कराचीला आली. त्याकाळी बेळगाव ते कराची या प्रवासाला एकूण पाच दिवस लागत ! माहेर सोडून आई एवढ्या लांब प्रथमच जात होती आणि तेही इतक्या दूरदेशी परक्या राज्यात ! त्या काळात आईने कसे निभावले असेल असे आता वाटते ! अचानकपणे लग्न ठरवण्याचा परिणाम तिच्या शिक्षणावर झाला. केवळ एका विषयात मार्क कमी मिळाल्यामुळे आई मॅट्रिकला फेल झाली. आजोबांना शिक्षणाचा प्रचंड ध्यास.. त्यांनी आईला पुन्हा बेळगावला पाठवले आणि मॅट्रिकचे वर्ष चांगल्या तऱ्हेने पूर्ण करून आई कराचीला परत आली ! पुढे फाळणीनंतर भारतात येऊन त्यांचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला.
तिला शिवणकामाची आवड होती. त्यामुळे वडिलांनी तिला शिवणकामाचा कोर्स करायला प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिने शिवण शिवायला सुरुवात केली. शिवणकामाचा वर्ग सुरू केला. विशेष करून ती फ्रॉक, स्कर्ट- ब्लाऊज, परकर यासारख्या लेडीज शिवणकामात पारंगत झाली. रत्नागिरीत ती रमली होती. पण मग ती. दादांची बदली प्रमोशन वर मराठवाड्यातील नांदेडजवळील खेड्यात झाली. ती. दादांच्या तब्येतीमुळे त्यांना एकटे राहणे अवघड होते. त्यांना खोकला, दम्याचा त्रास होता, तरीही ते सतत काम करत असत. त्या दरम्यान आम्ही तिन्ही मुले कॉलेज शिक्षण करत होतो. तेव्हा आईने मन घट्ट करून आम्हाला सांगलीला शिकायला ठेवले. पैशाच्या दृष्टीनेही सर्व अवघडच होते, पण मुलांचे शिक्षण करणे हे आई दादांचे ध्येय होते.
नांदेडजवळ बेटमोगरा या लहान ठिकाणी वडिलांची सरकारी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून बदली झाली होती. तेथील वातावरण वेगळेच होते. पण तिथे गेल्यावर आईने तेथील परिस्थितीशी जुळवून घेतले .पाणी लांबून आणावे लागत असे.त्यामुळे पाणी आणण्यासाठी पैसे देऊन माणूस ठेवावा लागत असे. मोजक्या पाण्यामध्ये सर्व कामे करावी लागत असत. आईने तिथे राहून तेथील बायकांशी ओळखी करून त्यांच्याकडून काही शिकून घेतले, तसेच त्यांनाही नवीन गोष्टी शिकवल्या. तेव्हा रेडिओ हाच विरंगुळा होता. रेडिओवरील कार्यक्रम ऐकणे, त्यावर प्रतिक्रिया पाठवणे, वाचन करणे, शिवणकाम करणे आणि दादांच्या वेळा सांभाळणे यात तिचा दिवस जाई.
मी आणि माझा भाऊ तेव्हा सांगलीला होतो. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही मराठवाड्यात गेलो की आमचे सगळे विश्वच बदलत असे. आई मला सुट्टीच्या पूर्वीच पत्र लिहून सांगत असे की, ‘काहीतरी भरत काम, विणकाम करायला घेऊन ये’. शाळेची लायब्ररी होती त्यामुळे वाचायला पुस्तकं मात्र भरपूर मिळत असत. सुट्टीत गेले की अधूनमधून आवड म्हणून स्वयंपाक करणे यात माझा वेळ जाई.आई-दादानाही खूप छान वाटत असे. सुट्टीचे दिवस संपत आले की आईची माझ्याबरोबर द्यायच्या पदार्थांची तयारी सुरू होई. नकळत ती थोडी अबोल होत असे आम्ही जाणार या कल्पनेने !
कालक्रमानुसार आम्हा तिघांची शिक्षणं झाली. आणि नंतर भावांच्या नोकऱ्या सुरू झाल्या. आईने स्वतःच्या हिमतीवर आमच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. नुसती लग्न केली म्हणजे संपत नाही, त्यानंतर सणवार, बाळंतपण, नातवंडांबरोबर संवाद ठेवणे या सर्व गोष्टी ती जाणीवपूर्वक उत्साहाने आणि जबाबदारीने करीत होती. तीर्थरूप दादांचे तिला प्रोत्साहन असे. पण तब्येतीमुळे ते जास्त काही करू शकत नव्हते. आकुर्डी येथे भावाने घर बांधले आणि आईची ‘घरघर’ थांबवली. तिला आपल्याला घर नाही ही गोष्ट फार जाणवत असे. भावाच्या घराने -विश्वास च्या ‘पारंबी’ ने सर्वांनाच आधार दिला. तिथे तिचे स्वास्थ्यपूर्ण जीवन चालू झाले. गरजेनुसार ती आमच्याकडे येई. पण आकुर्डीला सरोज वहिनीची नोकरी व नातवंडे यामध्ये तिने राहण्याचे ठरवले. आकुर्डीत भजनी मंडळात तिचा सक्रिय सहभाग होता. भजन- भोजन यात तिचा वेळ छान जात असे.आकुर्डीच्या नातवंडांसाठी तिने इतके केले की मी तिला म्हणायची, “तुझी आणखी दोन मुले वाढवायची हौस राहिली बहुतेक !”
ती. दादांच्या निधनानंतर ती आकुर्डीतच रमून राहिली. पुढे नातवंडांचे लग्न, बाळंतपण यात तिने जमेल तेवढी मदत केली. आज तीन मुले, सात नातवंडे आणि अकरा पंतवंडे असा तिचा वंश विस्तार आहे !
आताआतापर्यंत ती स्वयंपाकघरात भरपूर लुडबुड करत असे. आपलं वय झालंय हेच तिला पटत नाही. मला आता काही काम होत नाही असं म्हणत तिचं काम चालू असे. वयाच्या साठीच्या दरम्यान तिने उत्तर भारत, दक्षिण भारत या यात्रा केल्या. त्यानंतर नेपाळ ट्रिप करून आपण परदेश प्रवासही करू शकतो असा तिला कॉन्फिडन्स आला. वयाच्या ७३ व्या वर्षी तिने दुबई ,अमेरिका या ट्रिप केल्या. नायगारा फॉल्स, न्यूयॉर्क सगळे बघून ती खुश झाली. तिचा स्वभाव अतिशय उत्साही,! नवीन गोष्टी शिकण्याची, पाहण्याची आवड असल्यामुळे ती सतत कार्यरत असे. विणकाम हे तर तिचे फार आवडते ! सगळ्या नातवंडांना,पंतवंडांना स्वतःच्या हाताने विणून स्वेटर, टोपी ती बनवत असे. रोजचे वर्तमानपत्र पूर्ण वाचायची. चांगल्या पुस्तकाचे वाचनही तिचे बरेच होते. टीव्ही जागरुकतेने बघत असे. तिला काळाबरोबर सर्व गोष्टी माहीत असत. तिचे डोळे अजून चांगले होते. जगण्याची उमेद होती. वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत ती चांगले आयुष्य जगली. आम्ही तर तिची शंभरी साजरी करू अशी आशा करत होतो. परंतु ईश्वरी इच्छेपुढे इलाज नसतो. तिला फारसा कोणताही मोठा आजार नव्हता. तिचे खाणे पिणे अतिशय मोजके होते. त्यामुळे तिची तब्येतही ती राखून असे. आईच्या सहवासात चार दिवस राहावे या हेतूने मी आकुर्डीला गेले होते. भाऊ-वहिनींचाही मला राहण्यासाठी आग्रह होता. फारसे काहीही निमित्त न होता एके दिवशी
सकाळी माझ्याकडून तिने नाश्ता घेतला आणि गरम चहा पिण्यासाठी मागितला. तेच तिचे शेवटचे खाणे माझ्या हातून दिले गेले. दोन-तीन तासानंतर सहज म्हणून तिच्याजवळ गेले तेव्हा ती शांत झोपल्याप्रमाणे
दिसली, पण नुकताच तिचा देहांत झाला होता ! इतकं शांत मरण तिला आले ! आजही तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि आईची तीव्रतेने आठवण येते. ती उणीव भरून येत नाही
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈