सुखावतोस तू जेव्हा श्रावणातील सर होऊन, मग तिही सावळते भिजून तृप्त झालेली वसुंधरा होऊन, आणि मग गीत गाते तुझ्या सोबतच्या क्षणासोबत आपल्या सहवासाचे…
आणि मग वेडावतात या वेली, लता, तरु अगदीच भान हरपून.. लवलवणारी गवताची पाती, मध्येच डोकं वर काढून चिडवणारी रानफुलं सगळं कसं हिरवं हिरवं! जणू तुझ्या माझ्या मनाचं चांदणं होऊन एक एक करीत समोर यावं तसं!अशाच मंतरलेल्या सायंकाळी एक दोन करीत प्राजक्त आपल्या फुलांचा वर्षाव माझ्या आठवणीतील साठवणीवर करून पुन्हा त्यांना नव्याने गंधीत करीत असतो. आणि पहाटेच्या सुखस्वप्नातून जागे होऊन पुन्हा साखरझोपेत त्या गोड आठवणींना लपेटून घेऊन पावसाळी गारव्याचा आस्वाद घेण्याचा मोह सुटता सुटत नाही.
सूर्याची एक दोन किरणे जेव्हा कृष्णधवल नभातून वाट काढीत जेव्हा गवाक्षातून आत येऊन तुझा निरोप देण्यासाठी कानात कुजबुजतात तेव्हा कुठे दिवसाची सुरुवात करावी वाटते. आणि उठून दरवाजा उघडावा तर काय, समोर प्राजक्ताने आपले सर्व सुमनभांडार रितं करून अंगणात बेभान करणारी अस्तित्वरुपी सुगंधी कुपीच बहाल केली आहे याची जाणीव होते आणि हाच दरवळ संपूर्ण तिचा दिवस अगदी सुगंधी होऊन श्वासात घर करून राहतो जाणींवातला उधाणलेला किनारा होऊन !
… आणि विश्वास पटवून देतो गारव्याच्या रुपाने कर्तव्यातील पुनर्जन्माचा…
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
अन्नपूर्णेची परिक्षा-
माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा. “अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.
लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे… असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला….. मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. सौ. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची.
एकदा शाळेत जाताना सौ. आईने मला त्या ब्राह्मणाला “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पुजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी मानगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय. ” गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी… तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली. ” ते काय पुटपुटले ते मला काहीच कळले नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरे.
इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरुजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.
आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या, ‘ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर….. ”
गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो.. उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो. ” तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. “ साडेबाराला नक्की जेवायला या. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल. ”
आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्हते. आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली, आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता.
“बसा नं जेवायला. माझ्यामुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला. ” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे. आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, चवीष्ट होतं जेवण. खरं सांगू माई, आमची मंडळी गेल्यापासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.
आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरुजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी. इकडे सौ. आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होता. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.
त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला माझी मोठी बहिण कु. लीला ने गाठले आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्यामुळे बघ आईला केवढा त्रास झाला, ‘ असं म्हणून भरपूर झापलं.
मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. माझ्या क्षमाशिल आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले….. “
तर, असा सकारात्मक विचारांचा धडा सौ. आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणूं.
कोजागरी पौर्णिमेच्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मी व ऐरावतावर बसलेला इंद्र यांची पूजा करतात. उपोषण, पूजन आणि जागरण करतात. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी चंद्रलोकातून भूतलावर उतरते आणि “ को जागर्ति ?” म्हणजे कोण जागे आहे असे विचारते.
नुसते शरीराने जागे नव्हे, तर शरीराची व परिसराची स्वच्छता पाळण्यात, आरोग्याची काळजी घेण्यात, योग्य दिशेने अथक परिश्रम करण्यात, नीती-कर्तव्याचे पालन करण्यात कोण जागा आहे असा ह्याचा अर्थ.
जो जागृत असेल त्याच्यावर ती प्रसन्न होऊन त्याला उत्तम आरोग्य व धनसंपत्ती देते असे सांगण्यात आले आहे.
आश्विन महिन्यात पावसाळा संपून गेल्याने आकाश निरभ्र असते. त्या चांदण्यात आपल्या मित्र – आप्तेष्टांसह मौज मजा करता यावी त्यासाठी हा उत्सव प्रचारात आला असावा. या दिवशी रात्री आप्तेष्ट मित्रांना केशरी मसाला दूध किंवा पोहे देण्याची पद्धत आहे. शरद ऋतूमध्ये या गोष्टी आरोग्यास उपयुक्त असतात.
कोजागरी म्हटली की आमच्या लहान पणाचे दिवस आठवतात.. लहानपणी आम्ही सगळ्या मैत्रिणी रात्री जागरण करून कोजागरी साजरी करायचो. आधी सगळ्या मैत्रिणी एकत्र येवून कोजागरीचा कार्यक्रम कसा करायचा हे ठरवायचो. मग वर्गळी गोळा करणे व मग सामानाची खरेदी अशी एक दोन दिवस आधी पासून तयारी असायची. कोणाची आई नाहीतर आजी प्रेमाने एखादा पदार्थ करून द्यायची.
सगळ्यात आधी आम्ही सगळ्या मैत्रिणी आमच्या घरासमोरचे अंगण साफ करायचो. ह्याच अंगणात रात्री आम्ही सगळे खूप मैदानी खेळ खेळायचो. खेळून दमल्यावर बैठे खेळ खेळायचो. मधेच मध्यरात्री मसाला दूध प्यायचो. मग नाचं, गाणी, भेंड्या, पत्ते, कानगोष्टी असे कार्यक्रम असायचे.. ह्यात कुणाच्या आई, काकू व आजीचाही सहभाग असायचा. थोडे दमल्यावर कोणी चुटकुले सांगायचे तर कोणी आपल्याला आलेले वेगळे अनुभव सांगायचे.
पहाटे पहाटे सगळ्यांनी मिळून केलेली भेळ, पोहे, बटाटावडा नाहीतर विकत आणलेला सामोसा असा काहीसा बेत असायचा. नंतर सगळ्यांनी अंगणात गोल करून ते सगळे खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आनंदात भर म्हणून कधी कधी कोणाचे काका नाहीतर बाबा यांच्याकडून पेप्सीकोला नाहीतर आइस्क्रीम चा कप ही मिळायचा.
त्यानंतर सगळे आवरून पहाटे पहाटे भटकंती म्हणजे फिरायला जायचो. रस्त्यावर थोडी रहदारी वाढली की सगळे आपापल्या घरी छान आठवणी घेवून परतायचो.
लहानपणीच्या ह्या कोजागिरीच्या आठवणी अजूनही इतक्या ताज्या वाटतात की आत्ता एखादी मैत्रीण येईल व आपल्याला खेळायला येतेस का ग म्हणेल असा भास होतो.
आत्ताच्या आणि पूर्वीची कोजागरी साजरी करण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असायचा समाधान वाटायचे. सगळी मैत्रीची नाती निर्मळ व निरपेक्ष असायची अगदी घट्ट.
आजकालच्या आभासी आयुष्यात सगळ्याच गोष्टीमध्ये कृत्रिमपणा, दिखावा आला आहे …. मग तो नात्यांमध्ये असो किंवा मैत्रीमध्ये … अथवा साजरे करण्यामध्ये.
लहानपणीच्या कोजागरीच्या आठवणींची मनात एक विशेष जागा आहे.. नेहमीच लक्षात राहील अशी एक गोड आठवण.
… मैत्रिणी एकमेकांना जणू विचारात आहेत ‘ को जागर्ति ‘ कोण जागर्ती…
माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.
काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकुर बघुन माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.
मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”
ती म्हणाली, “ नाही. “बडी बेंच” नवा नाही. मागच्या बाजुला होता तो फक्त पुढे आणलाय. “
“बडी बेंच??”माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं” तिनं उलगडा केला.
“अगबाई ! हो का?” मी चकित होऊन म्हणाले.
… किती सुरेख कल्पना आहे ! केवढाली ओझी असतात या लहान जीवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे, एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!
“पण कुणी आलच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.
तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “ का नाही येणार? एकजण तरी येतच कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच. ” या बाईला इतके साधे कसे कळत नाही असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.
एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळभाबड्या जगात सुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं.
“किती छान माहिती सांगितलीस ग ! तू कधी बसली आहेस बडी बेंच वर?” माझ्या तोंडून गेलंच.
“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खुप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या. ” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालु लागले.
मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे, डॉक्टरकडे, वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?
… कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी, समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?
त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहल्या होत्या..
…. “चल.. बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न,
उदात्त हेतू मनी ठेवुनी होऊ buddy, यार, सखा, मित्र ! … “
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
प्रस्तुती : सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
देवीच नवरात्र आलं आलं म्हणता म्हणता आता संपलं सुध्दा…. दिवस कसे भुर्रकन उडून गेले..
किती तयारी आणि गडबड चालली होती…. माती आणायची, सप्त धान्य पेरायचं आणि मग….. ती वर उगवून आलेली हिरवीगार लुसलुशीत पात… त्याचा अलवार स्पर्श… तो सुंदर असा सृजनाचा सोहळा डोळे भरून पाहायचा.. घट बसवायचे, कडकण्या करायच्या, रोज एक माळ अर्पण करायची..
श्री सूक्ताची एकवीस आर्वतन… सप्तशतीचा पाठ..
धागरा घालून केलेला गरबा…. भोंडल्याची गाणी म्हणत धरलेला फेर.. नंतर खिरापतीची मजा…
भजनाचे कार्यक्रम.. त्यात गोंधळ, जागरण हवाच…. कुंकूम् आर्चन, सवाष्णीच्या ओट्या नि कुमारीपुजन…
रोज रंगीबेरंगी जरीच्या साड्या.. दागिने… बाहेर जाणं… सर्वांना भेटणं मग गप्पा……
टाळ घेऊन आरत्या म्हणायच्या… घरी गोंधळी बोलवायचा. डफ तुंतुण्यावर म्हटलेली देवीची गाणी ऐकायची..
निरनिराळे उपवासाचे पदार्थ.. आरास, रांगोळ्या.. नऊ दिवस रोज देवीदर्शनाला जायची गडबड..
नवरात्री पुरतीच देवी आई आली होती का?….. ती जगतजननी आहे …. ती इथेच असते.. तिच्या देवळात…. आपली वाट बघत उभीच असते … आपण मात्र फक्त त्या त्या दिवसापुरतं जातो तिच्याकडे…
गर्दीत, गोंधळात हारा फुलांच्या राशीत एक मिनिट तिला बघतो…
आता एक कर.. शांतपणे उद्या परवा जा तिच्याकडे… देऊळ रिकामं असेल.. सजावट काढली असेल…
कुठलाही भपका नसेल…. बसावं तिच्या समोर..
… इतर वेळेस पण भेटावं ग देवी आईला…. नवरात्र नसताना सुद्धा … सहज आठवण आली म्हणून……
अचानक पण जावं ग…. किती बरं वाटेल तिला…. आणि आपल्यालाही…
— वाचता वाचता तिचे डोळे भरून आले……. मध्यंतरी फोनवर आई पण हेच म्हणत होती……
सवड काढून येत जा ग… बघावसं वाटतं तुला…
वाट बघणारी आई आहे तोपर्यंत भेटत जा ग तिला …. आईला तर कुठल्याच भारी साड्या, साज शृंगार, दागिने काही नको…… तुमचे दोन हात गळ्यात पडले आणि तुमच्या मिठीत सामावलं की ती तृप्त असते … स्पर्शाचं सुख वेगळंच असतं… आईला ते मनातून फार सुखावतं… आता तिला लेकीकडून फक्त एवढंच तर हव असतं…
तेवढचं तीच मागणं आहे ग….. आठवणीनं तुमच्या आईला आणि वडिलांनाही भेटायला जाऊन या….
☆ नकाशात केंब्रिज शोधताना… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे☆
पुण्यात असतानाची गोष्ट आहे. एकटाच बॅचलर म्हणून राहत होतो. भाजीपाला विकायचे बंद झाले होते. एका चांगल्या कंपनीत मी वॉचमन म्हणून पर्मनंट झालो होतो. आणि त्याच कंपनीत राहत होतो. राहण्याची आणि खाण्याची माझी सोय फुकटात झालेली असल्यामुळे माझं चांगलं चाललेलं होतं.
मला आठवतंय त्या दिवशी तेरा मे तारीख होती. त्या दिवशी गावाकडून वडिलांचा मला फोन आला आणि वडील म्हणाले, “ हे बघ, येत्या सतरा तारखेला म्हणजे अजून चार दिवसांनी तुझं लग्न ठरवलेलं आहे. तयार रहा. ” एवढं बोलून डायरेक्ट वडिलांनी फोन कट केला. पुढं बोलायची संधी जरी मिळाली असती तरी त्याचा काही उपयोग नव्हता. वडिलांचे ठरले की ठरले. त्यात बदल होत नसतो. हे मला माहीत होतं.
चार दिवसांनी आपलं लग्न. कुणासोबत, मुलगी कोण? कशी आहे? कुठं असते. ?असे असंख्य प्रश्न मनात. मी ड्युटी वर होतो. माझी चाललेली तडफड मी कुणालाही सांगू शकतं नव्हतो. कारण मी वॉचमन होतो. माझी केबिन गेटवर होती. त्या केबिन मध्ये मी एकटाच असायचो.
ड्युटी संपल्यावर रात्री आईला फोन केला. मग आईने सांगितले, “मुलगी पिंपरी मध्ये असते. आपल्या खूप जवळच्या नात्यातील आहेत. आम्ही सर्वांनी मुलगी बघितली आहे. तुझी आजी आणि तिचे आजोबा ही सख्खे बहिण भाऊ आहेत. मुलगी चांगली शिकलेली आहे. उद्या पिंपरीत जा. तिथं भाजी मंडई मध्ये त्यांचा भाजीपाल्याचा गाळा आहे. त्यांचं आडनाव रूपटक्के. सुखदेव रूपटक्के म्हणून विचारत जा सापडतील. ” मी होय म्हणून फोन बंद केला.
दुसऱ्या दिवशी शिफ्ट बदलून घेतली. आणि सकाळी दहा वाजता पिंपरी गाठली. पिंपरीची ती भली मोठी भाजी मंडई बघून जीवात कालवा कालव झाली. त्याच गर्दीत आता नाव विचारत विचारत चालू लागलो. भांबावून गेलो होतो. आयुष्याचा जोडीदार पहिल्यांदा बघणार होतो. उत्सुकता होतीच पण त्याहून जास्त भिती. विचारात दंग होऊन माझी नजर गर्दी चिरत होती. एवढ्यात चालता चालता एका पोरीला माझा धक्का लागला. तिच्या डोक्यावर कोथंबिरीचं पोतं होतं. तिच्या गालावर कोथंबिरीची पाने चिकटली होती. जसा माझा धक्का लागला तसं तिने रागाने माझ्याकडे बघितलं आणि म्हणली, “ ये बाबा बघून चाल की जरा नीट.. ? डोळ्यात काय माती गेली का.. ? ” अजून काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबड करून ती गर्दीत नाहीशी झाली.
भाजीवाले रूपटक्के हे नाव विचारत विचारत मी योग्य जागी पोहचलो. तिथं आजोबा आणि आजी दोघेजण मांडी घालून बसलेले होते. ज्या पोरीला धक्का लागला होता तीच पोरगी तिथं बाजूला खाली वाकून मक्याची कणसे रचत होती. मी आजोबांना आवाज दिला. “ ओ आजोबा, मी कवठेमहांकाळचा. चंदनशिवे यांचा मुलगा. हिराबाईचा नातू. तुमच्या बहिणीचा नातू. ” आजोबा ताडकन उभे राहिले. खाली बसलेल्या आजीने डोक्यावरचा पदर नीट केला. आणि माझ्या हातात हात देत बाजूच्या कणसे रचणाऱ्या त्या पोरीला आजोबा म्हणाले, “ दीपा अगं तुझा नवरा आलाय की, कंबरेत वाकलेली ती एका सेकंदात ताठ झाली. आणि माझ्याकडे एकटक बघायला लागली. तिच्या अंगावर मळलेला पांढरा फुल्ल शर्ट. त्याच्या आत तिने पंजाबी ड्रेस घातलेला होता. डोक्याला रुमाल गुंडाळून उभी राहिलेली ती. माझी नजर काही नजरेला मिळाली नाही. ती काहीच बोलली नाही. पसंत नापसंत या असल्या भानगडींची ओळख दोघांनाही नव्हती. आमच्या दोघांची कुटुंबे त्यावेळी मध्यम वर्गातही मोडत नव्हती. हातावर पोट असणारी गरीब माणसं आम्ही.
सतरा मे या दिवशी आमचं लग्न थाटामाटात झालं. मी पिंपळे निलख मध्ये भाड्याने खोली घेतली. आमचा संसार सुरू झाला. नंतर एकमेकांना आम्ही ओळखू लागलो. मी कवी आहे हे तिला कळलं. माझ्या कविता तिला ऐकवू लागलो. हळूहळू माझी कविता पसरू लागली. नोकरीतून वेळ काढून संमेलनात जाऊ लागलो. पण बऱ्याचवेळा नोकरी महत्वाची मानून अनेक संमेलने रद्द करावी लागत होती. अगदी महाराष्ट्र राज्यातून सगळीकडून मागणी यायला सुरवात झाली. पण नोकरी मुळे जाता येत नव्हते. कवितेचा कार्यक्रम नोकरीमुळे रद्द केला की डोळ्यातून पाणी सांडत राहायचं. आणि त्या पाण्यातून कविता ही ओघळून जायच्या.
नोकरीत मन रमत नव्हतं. सगळा जीव कवितेत अडकला होता. आतल्या आत घुसमट वाढत चालली होती. रोज कुणाचा तरी फोन यायचाच. कार्यक्रमाचे आमंत्रण असायचेच. पण नकार द्यावा लागायचा. एके दिवशी हिला मनातली घुसमट बोलून दाखवली. आणि एका क्षणात तिने मला उत्तर दिलं. “ द्या सोडून नोकरी.. मन रमत नाही तिथं थांबायचं कशाला.. माझं घर चालेल एवढं जर तुमच्या कवितेने मला दिलं तरी मी आनंदी राहीन.. ” मी तिच्याकडे एकटक बघतच राहिलो. आणि त्याच दिवशी मी राजीनामा दिला. नोकरी सोडली. आता नाही तर कधीच नाही. असा विचार करून राजीनामा लिहिला. विनाकारण इथ राहून घरभाडे भरावे लागणार. कार्यक्रम करतच फिरायचे आहे तर पुण्यात राहण्यापेक्षा गावी जाऊ तिथच राहू. आई वडील ही सोबत असतील. हे ही तिनेच सुचवले. आणि ज्या दिवशी नोकरी सोडली त्याच दिवशी पुण्याचा निरोप घेतला. आणि गावी आलो.. पर्मनंट नोकरी सोडून गावी आल्यामुळे मला अनेकांची बोलणी ऐकावी लागली. कित्येक नातेवाईकांनी तर मला नावे ठेवताना कसलीही कसर केली नाही.
या गोष्टीला आता दहा वर्षे झाली. माझी कविता दूरवर पोहचली. कार्यक्रम सुरू आहेत. तिने ही गावी येऊन शांत न राहता किराणा दुकान सुरू केले आहे. टेलरिंग व्यवसाय ही वाढला आहे. नाही म्हणले तरी आम्ही मध्यम वर्गाच्या यादीच्या शेवटच्या पानावर का होईना पण पोहचलो आहोत. आणि दोन मुले आमच्या पदरात आहेत. ती आई आणि मी वडील आहे.
हा सगळा प्रवास आज डोळ्यांसमोर उभा राहण्याचे कारण म्हणजे, आजच इंग्लड मधल्या केंब्रिज वरून मला फोन आला आहे. पंचवीस डिसेंबर या दिवशी केंब्रिज मध्ये मी माझी कविता घेऊन उभा राहणार आहे. आणि आयोजकांनी आम्हाला जोडीने बोलावले आहे. दोघांचाही तिकीट खर्च ते करणार आहेत. म्हणजे आम्ही दोघेही केंब्रिज मध्ये जाणार आहोत. ती पहिल्यांदाच विमानात बसणार आहे.
तिला जेव्हा हे सांगितले तेव्हापासून ती, गुगलवर केंब्रिज हे नाव सर्च करत आहे. आणि मी आमचा सगळा प्रवास आठवत तिच्याकडे एकटक पाहत आहे. तिने त्या क्षणाला माझ्या मनाची घुसमट ओळखून जर निर्णय घेतला नसता तर आज या क्षणाला मी केंब्रिजचे स्वप्न न पाहता त्याच केबिन मध्ये वॉचमन म्हणून बसलेलो असतो.
एखादा कलावंत असला तरी तो कलंदर असतो. त्याच्यातला माणूस विसरून त्याच्या आतला कलावंत सांभाळणारा जोडीदार जर त्याला भेटला तरच तो कलेला न्याय देऊ शकतो. मला हे मिळालं. म्हणूनच माझ्या घराच्या उंबरठयावर माझी कविता माझं स्वागत करण्यासाठी नेहमी उभी असते.
आयुष्यात आलेल्या या जोडीदाराची कविता, कथा, कादंबरी कधीच लिहिता येणार नाही. पण माझ्या कलाकृतीची प्रस्तावना मात्र तिच्याच काळजातून येत राहणार आहे.
पुणे मराठी ग्रंथालय या नामवंत ग्रंथालयातर्फे पुस्तक – परीक्षणासाठी नुकतीच एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री विभावरी कुलकर्णी यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध लेखक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या “ अष्टदीप “ या पुस्तकाचे त्यांनी केलेले परीक्षण पुरस्कार प्राप्त ठरले. आपल्या सर्वांतर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करणारा त्यांचा हा लेख – –
अविस्मरणीय दिवस…..
२ ऑक्टोबर २०२४ माझ्या आयुष्यातील दिवस!
साधारण जून महिन्यात एक मेसेज प्राप्त झाला. पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम या कडे दुर्लक्ष केले. कारण असे बरेच मेसेज असतात. पण पुणे मराठी ग्रंथालय यांचा मेसेज असल्याने आणि तेथील माझे अनुभव व आठवणी फार महत्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागेची अडचण असायची त्यांना हे ग्रंथालय म्हणजे फार आपुलकी व जिव्हाळ्याचे वाटायचे. कारण पुण्यातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. सायकलवर अगदी ५/७ मिनिटात पोहोचता यायचे. आणि या ग्रंथालयात अत्यंत शांत व अभ्यास पूरक वातावरण असणारी अभ्यासिका होती. मी व माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य तेथे अभ्यास करून घडवले आहे. त्यामुळे या संस्थेची पोस्ट असल्याने थोडे लक्ष दिले. त्या नंतर तीच पोस्ट ३/४ लोकांच्या कडून आली. त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्याचा विषय होता पुस्तक परीक्षण. तसे मी मला वाटले तसे म्हणजे पुस्तक वाचून जे जे विचार मनात येतात ते पूर्वी पासून माझ्या डायरीत लिहून ठेवत असे. पण ते म्हणजे पुस्तक परीक्षण नव्हे! मग काही पुस्तक परीक्षणे बघितली आणि यात मला रंग उगवतीचे ग्रुप व हा ग्रुप ज्यांच्या साहित्य वाचनासाठी तयार करण्यात आला ते आदरणीय श्री देशपांडे सर यांची फार मोलाची मदत झाली. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे पुस्तक परीक्षण कसे लिहावे हे समजले. मी पहिले पुस्तक परीक्षण लिहिले ते पुस्तक होते आकाशझुला अर्थात सर्वांचे आवडते व सरांचेच पुस्तक. आणि हे परीक्षण आपल्या गृप वर पाठवले. आणि आश्चर्य म्हणजे ते बऱ्याच जाणकार मंडळींना आवडले. आणि मग पुस्तक परीक्षण लिहिण्याचा छंदच लागला. आत्ता पर्यंत वाचता वाचता २०/२५ पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. हे सांगण्याचे कारण म्हणजे या सगळ्याचे फळ, सरांचे अनमोल मार्गदर्शन आणि आपल्या गृप वर जे कौतुक केले जाते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. या सगळ्या मुळे मी स्पर्धेत भाग घेतला आणि अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे. या पुस्तकाचे परीक्षण केले. आणि ८/१० दिवसा पूर्वी एक पत्र मिळाले. त्यात त्यांनी माझ्या परिक्षणासाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे असा उल्लेख केला होता. या ग्रंथालयाच्या परीक्षकांनी नंबर देणे म्हणजे आपण काही लिहू शकतो याची पावतीच! आणि चक्क ती मला प्राप्त झाली.
२ ऑक्टोबर २०२४ या दिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुणे मराठी ग्रंथालय या संस्थेचा या दिवशी वर्धापनदिन असतो. काल ११३ वा वर्धापनदिन होता. आणि त्यात आम्हाला सहभागी होता आले. अतिशय मंगल व पवित्र वातावरणात हा सोहळा पार पडला. अगदी संस्थेच्या दरवाजातच प्रत्येकाचे पेढा देऊन स्वागत केले जात होते. आणि सगळी मंडळी लग्न कार्याला यावे तशी आली होती. फार सुंदर वातावरणात बक्षीस स्वीकारताना फार समाधान व आनंद अनुभवला. हा आनंद आपल्या माणसांच्या बरोबर वाटावा असे वाटले, म्हणून हा लिखाणाचा प्रपंच! आता आवरते घेते नाहीतर पुरस्कार मिळाला म्हणून लिही, असे व्हायला नको.
☆ कृतज्ञता… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
मंडळी !!
आपली सनातन संस्कृती महान आहे याबद्दल आपल्या मनात शंका नसेलच. पण आपली संस्कृती महान आहे याचि प्रचिती कशी यावी?
गुढी पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो.
त्यानंतर पावसाळ्याच्या आधी वडाची पूजा. पर्यावरण समतोल राखण्यासाठी…..
त्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे संगोपन व्हावे, रक्षण व्हावे म्हणून नागपूजा….
त्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा…
… इथे परत पर्यावरणाचे रक्षण हा भाव…
त्यानंतर गणपतीचे आगमन
त्यानंतर पितृ पंधरवडा….. !!
साधी कोणी आपल्याला क्षुल्लक मदत केली तर आपण त्याला किमान धन्यवाद देतो….
मग इथे तर आपले आईवडील आपल्याला तळहातावरील फोडासारखे जपतात, फुलझाडांसारखे वाढवतात, जगायला सक्षम करतात…. आज जे आईबापाच्या भूमिकेत आहेत, त्यांना कळेल की त्यांच्या आई बाबांनी त्यांच्यासाठी काय काय केले असेल….
आपल्याला चांगल्या कुळात जन्म मिळाला. ते कूळ चांगले ठेवण्यासाठी ( शुद्ध ) अनेकांनी आपल्याला मोह आणि माया बाजूला ठेवल्या असतील… अनेकांनी अनेक व्रते केली असतील, अनेक नियम पाळले असतील, तेव्हा कुठे ते शुद्ध राहिले असतील……
थोडा गांभीर्याने विचार करावा….
आज आपण कदाचित मुलाच्या भूमिकेत असू, तर उद्या आपण आई बाबांच्या भूमिकेत जाणार आहोत…..
आपला धर्म कर्म सिद्धांत मानणारा आहे. त्यामुळे मेल्यानंतर मनुष्याला दुसरा जन्म मिळतो यात शंका नाही. तसेच इथून पाठवलेले पैसे चलन बदलून अमेरिकेतील मिळू शकतात. इथून फोन केला तर परदेशातील आपल्या नातेवाईकांशी आपण बोलू शकतो, तर श्रध्देने केलेलं श्राद्ध आपल्या पित्रांपर्यंत पोचू शकते असा तर्क आपण करू शकतो….
मूळ मुद्दा असा आहे की आपल्या कृतज्ञ रहावेसे वाटते की नाही ?
आपल्या शास्त्रकारांनी याचा अभ्यास केला आणि विशिष्ट काळ निवडून, त्याला विशिष्ट पद्धती निर्माण केली.
एक उदा. पाहू. पंतप्रधान येणार असतील तर वेगळा शिष्टाचार असतो, पण अमेरिकेचे अध्यक्ष येणार असतील तर….. ?
श्राद्ध करून काय होते असे म्हणणारे लग्नात ज्या विधीला शास्त्रीय आधार नाही असे अनेक विधी खर्चाचा विचार न करताच करतात, तेव्हा नवल वाटते…
आपला धर्म सांगतो म्हणून आपल्याला योग्य वाटतील ती काही कर्मकांडे अगदी अट्टाहासाने करावी……… आधी करून पहावे आणि अनुभव घ्यावा.
महान तत्त्ववेत्ता रेने देकार्त म्हणतात त्याप्रमाणे “जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. त्याची कडूगोड फळे आपण सध्या चाखत आहोत. सध्या आपल्याकडे प्रचलित असलेल्या शिक्षणपध्दतीचे ‘पुनरावलोकन’ करण्याची नितांत गरज आहे.
आपण सर्वजण जाणते आहोत. विवेकाने निर्णय करावा.
निव्वळ आपले पूर्वज नाही तर आजपर्यंत आपल्या, आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञ असलेच पाहिजे.
उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत. आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य करण्या आधी नांदी श्राद्ध करण्याची पद्धती आहे. (थोडक्यात thanks giving)
पूर्वजांचे स्मरण करून, स्मरण ठेवून आपण उद्यापासून शक्तीची उपासना केली तर ती अधिक फलदायी होऊ शकेल…. !
☆ “तुम्ही निर्लज्ज असू शकता.. मी नाही…” – अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
– – – रतन टाटा
२६/११ च्या घटनेनंतर काही महिन्यांनी टाटा उद्योग समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी त्यांच्या देश विदेशातील हॉटेल्सचे नुतनीकरण व पुनर्रचना करण्याच्या कामाचे त्यांचे सर्वात मोठे टेंडर काढले. काही पाकिस्तानी कंपन्यांनी हे टेंडर भरले होते.
आपले टेंडर प्रभावशाली ठरावे म्हणून पाकिस्तानातील दोन मोठ्या उद्योगपतींनी रतन टाटा भेटीसाठी पूर्व नियोजित वेळ देत नाहीत हे पाहून मुंबईतील “बॉम्बे हाऊस” या टाटाच्या मुख्यालयास समक्ष भेट दिली.
त्या पाकिस्तानी उद्योगपतींना बॉम्बे हाऊसच्या स्वागत कक्षात ताटकळत ठेवण्यात आले. काही तासांनी त्यांना कळविण्यात आले की, रतन टाटा कामात व्यस्त असल्याने पूर्व परवानगीशिवाय ते कोणालाही भेटत नाहीत.
निराश, त्रस्त, वैतागलेले पाकिस्तानी उद्योगपती दिल्लीला गेले. आणि त्यांच्या हायकमिशन मार्फत केंद्रीय व्यापार मंत्र्याला भेटले. या मंत्र्याने लगेच रतन टाटा यांना फोन करून विनंती केली की, त्या दोन पाकिस्तानी उद्योगपतींना आपण भेट द्यावी आणि त्यांच्या टेंडरचा आस्थापूर्वक विचार करावा.
….. त्यावर रतन टाटा ताडकन म्हणाले, ” तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही “.
त्यानंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी सरकारने टाटा उद्योग समूहाला “टाटा सुमो” या वाहनाची खूप मोठी खरेदीची ऑर्डर दिली, मात्र रतन टाटा यांनी ती खरेदीची ऑर्डर स्पष्टपणे धुडकावून लावली …।
पैसा, उद्योग, आणि व्यवसाय यापेक्षा रतन टाटा यांनी देशाला सर्वोच्च महत्व दिले …
प्रखर राष्ट्रवाद, मातृभूमीविषयी नितांत आदर आणि देशाविषयी निस्सीम प्रेम या रतन टाटांच्या गुणवैशिष्ट्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगून येते ….
रतन टाटांना सलाम !!!
महान उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली…
(फेसबुकवरील श्री कुंतल चक्रवर्ती यांच्या इंग्रजी पोस्टचे भाषांतर)
अनुवादक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सर तुम्ही मेल्यावर… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
“ती”… पूर्वी मागून खायची…
आता ” तिला ” एका मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम मिळवून दिले आहे.
तिच्या मुलाला “आपण” दत्तक घेतलं आहे, सर्व शैक्षणिक खर्च गेल्या चार वर्षांपासून “आपणच” करत आहात. (मी नाही… !)
कामावर जाताना आज बुधवारी सकाळी ती चुकुन भेटली.
पर्वती पासून सदाशिव पेठेपर्यंत ती चालत जायची, घरातलं सगळं आवरून जाताना कामाला उशीर व्हायचा, केवळ या कारणासाठी तिला काढायला नको, म्हणून “आपण” तिला नवीन सायकल सुद्धा घेऊन दिली आहे.
मला रस्त्यावर भिक्षेकर्यांमध्ये बसलेला बघून ती सायकल थांबवून घाई घाईने माझ्याजवळ आली, म्हणाली; ‘सर राकी बांदायची होती, पन कामावर खाडा झाला आसता… म्हनून मी रकशा बंदनाला यीवू शकले न्हायी… स्वारी सर… ! तिच्या नजरेत अजीजी होती.
मी म्हटलं हरकत नाही; भाऊ बहिणीच्या नात्याला औचित्य किंवा मुहूर्त लागत नाही…. आत्ता बांद राकी… !
‘मी आनलीच न्हायी की वो सर, मला काय म्हाईत तूमी आता भेटताल म्हनून… ‘ ती पुन्हा खजील झाली.
मी सुद्धा इकडे तिकडे पाहिलं… माझ्याकडे ड्रेसिंग चे सामान होतं, त्यातली चिकटपट्टी घेऊन तिला म्हटलं, ‘हि घे चिकटपट्टी आणि बांद मला “राकी”… ‘
बोलू का नको ? सांगू का नको ? सांगितलं तर यांना राग येईल का ? या अविर्भावात चाचरत ती बोलली… !
मला माझी चूक लक्षात आली… शाळेची फी भरली… वह्या पुस्तकं घेतली… सॉक्स आणि बुट घेतले…. मग युनिफॉर्म कोण घेणार ? याचा युनिफॉर्म घ्यायचा कसा काय राहिला माझ्याकडून ? मी मनाशी विचार करत राहिलो…
‘मग आधी का नाही माझ्या लक्षात आणून दिलंस ?’ मी जरा वैतागून बोललो.
‘आवो सर आदीच ह्येवढं करता आमच्यासाटी, त्यात आजून किती तरास द्येयचा, आसं वाटलं म्हनुन न्हायी बोलले आदी… ‘
तिच्या या वाक्यानं मी खरं तर सुखावलो…
कुणाच्या करण्याची काही “किंमत” समजली तरच “मूल्य” समजते !
खर्च झाल्याचं दुःख नसतंच, हिशोब लागला पाहिजे… !
‘बया, कुटं हरवले तुमी… ?’ माझे खांदे हलवत तीने विचारलं…
मी भानावर आलो…
‘साळेचा डीरेस नसंल तर झेंडावंदलाला येऊ नगोस म्हणून त्याला साळेत सांगितलं हुतं सर… आनी म्हनून त्यो गेला पन न्हाय सर झेंडावंदलाला…. !’
‘साळेचा डीरेस नव्हता, म्हनुन त्याला वर्गाच्या भायर पन हुबं केलं सर… म्हनुन मंग आज तुमाला बोलले सर… ‘.. लहान मुलीने आपल्या वडिलांना काही तक्रार करावी, या स्वरात ती बोलत होती… !
युनीफॉर्म नव्हता म्हणून झेंडावंदन करू दिले नाही… ? देशभक्ती युनिफॉर्मवर ठरते का ??
या विषयावर खूप काही लिहायचं आहे, पण पुन्हा कधीतरी… !
माझ्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित बदलले असावेत…. हे भाव बघून ती म्हणाली….
‘जावू द्या सर मी बगते… डीरेसचं काय तरी.. ‘
तिच्या या वाक्याने मी भानावर आलो…
मी म्हणालो, ‘ आता आणखी काही बगु नकोस…. घरी जाऊन पोराला घे आणि शाळेचा डीरेस घे…. कामावर आजचा खाडा पडला तर पडू दे… त्याचे पैशे मी देईन तुला… !’
ती चटकन उठली….
‘मला ववाळणी नगो…. पण माज्या पोराला शिकू द्या…. त्येला शाळेचा डीरेस घ्या… त्येला झेंडावंदनाला जाऊ द्या ‘ हे म्हणणाऱ्या अशिक्षित परंतु सुसंस्कारित माऊली मध्ये मला खरी “भारतमाता” दिसली.. !
मला ववाळणी नगो…. पण माज्या पोराला शिकू द्या…. त्येला शाळेचा डीरेस घ्या… या दोनच वाक्यात मला माझी “जीत” झाल्यासारखं वाटतं….
कारण लहान मुलांना दिवसाला साधारण एक हजार रुपये भीक मिळते, म्हणजे महिन्याभरात तीस हजार रुपये…
शिका रे, म्हणणाऱ्या मला मग कोणते पालक भीक घालतील… ?
तरीही यांच्याशी झालेल्या नात्यांच्या जीवावर मुलं दत्तक घेतो आहे आणि त्यांना शिकवतो आहे…
असो, तर आजच दुपारी शाळेचा “डीरेस” विकत घिवून ती आली आणि म्हणाली, ‘सर किती करताल ओ माज्यासाटी… मी लय त्रास देती तुमाला…. स्वारी सर…. !’
काय बोलू मी यावर…. ?
मी तिला म्हणालो, ‘माझ्या मूर्खपणामुळे 15 ऑगस्टच्या अगोदर त्याला युनिफॉर्म घ्यायचं मला सुचलं नाही…. आणि त्यामुळे तो झेंडावंदनाला हजर राहू शकला नाही… वर्गातून त्याला बाहेर राहावं लागलं….
त्याबद्दल आज मीच, तुझी आणि त्याची माफी मागतो गं माऊली, “स्वारी गं… !!!
‘बया… तुमि नगा स्वारी म्हणू सर…. ‘ असं म्हणत, डोळ्यातून पाणी काढत, तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं…
मी पोराकडे पाहिलं… नवीन कपड्याचे तीन जोड पाहून पोरगं “हरखून टूम्म” झालं होतं…
इस्त्री केलेल्या कपड्याचा एक जोड त्याने अंगावर घातला होता….
मी इंटरनॅशनल संस्थेत काम करताना असेच मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालायचो… मला माझीच आठवण झाली….
आता मी नाही असे इस्त्री चे कपडे घालत, इच्छाच होत नाही… पण, मला त्याच्यामध्ये अभिजीत दिसला… !
पूर्वी तो आईबरोबर याचना करायचा… आज तो इस्त्रीचे कपडे घालून शाळेत जाईल…
मी त्याला सहज गमतीने विचारलं, , ‘बाळा शिकून पुढे मोठा होऊन काय करशील ?’
तो म्हणाला सर, ‘मला डॉक्टर व्हायचं आहे… ‘
मी म्हटलं, ‘बाळा, डॉक्टर होऊन काय करशील पण ?’
तो निरागसपणे हसला आणि म्हणाला, “सर तुम्ही मेल्यावर मी डॉक्टर होऊन, भिकाऱ्यांची सेवा करीन…. !!!”