☆ सोनेरी शिक्षा… सुश्री संजीवनी बोकील☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
मधली सुट्टी झाली होती. डबे खाणं संपवून काही मुलं खेळायला लागली होती. हॉलच्या पायरीवर बसलेल्या मायाकडून वडापाव घेण्यासाठी गर्दी झाली होती. मुलींचे घोळके कट्ट्यावर बसून गप्पा मारू लागले होते.मधली सुट्टी देते तो आनंदविसावा सगळ्या पटांगणात पसरून राहिला होता.
स्टाफरूममध्ये आम्हा टीचर्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या.चहाच्या कपाबरोबर काही राजकारणाच्या गप्पाही तोंडी लावल्या जात होत्या. मीही चहा संपवून कपाटातल्या माझ्या कप्प्यातून प्रगतीपुस्तके काढून घ्यायला उठले होते एवढ्यात पाचवीतली एक मुलगी रडत रडत आत आली. “बोकील बाई कुठेत?” असं विचारत. तिच्या हातात एक चेपलेला लहानसा अल्युमिनियमचा डबा होता. मी तिला घेऊन बाहेर गेले. बाहेरच्या पायरीवर बसले, तिला शेजारी बसवलं.तिचे हुंदके थांबत नव्हते. तिला शांत करायचा प्रयत्न करीतच मी तिच्या रडण्याचं कारणही विचारायचा प्रयत्न करत होते. पाचवीतली ही मुलगी माझ्याकडे का आलीय ते मला कळत नव्हतं कारण छोट्या वर्गांना मी कधीच शिकवत नव्हते.
हळूहळू तिचे हुंदके थांबले आणि तिने हातातला डबा माझ्यापुढे धरला. तो डबा सगळीकडून चेपला होता. कारण विचारल्यावर मला कळले की ती पटांगणाच्या कडेच्या कट्ट्यावर डबा खायला बसली होती आणि खाऊन झाल्यावर खेळायच्या नादात डबा तिथेच विसरली .नंतर आणायला गेली तेव्हा काही मुले तिच्या डब्याचा फूटबॉल करून खेळत होती. तिच्या डब्याची ही अवस्था ज्यांच्यामुळे झाली होती ती माझ्या वर्गातील ,दहावीतील मुले होती. म्हणून ती तक्रार घेऊन माझ्याकडे आली होती.
हे सांगतानाच तिने तो डबा माझ्या हातात दिला आणि त्याची अवस्था बघून मी खरोखर शहारले. “आता माझी आई मला मारेल बाई, मी आईला काय सांगू?” असं म्हणून ती परत स्फुंदू लागली. मी तो डबा माझ्याकडे घेतला. तिला म्हटले,” आईला सांग की डबा बोकील बाईंकडे आहे आणि जमले तर उद्या संध्याकाळी मला भेटायला या. मग मी त्यांना सगळं सांगेन.”
प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतलेली पाहून पोरीचं टेन्शन सरबतातल्या बर्फासारखं विरघळून गेलं आणि ती डोळे पुसून उड्या मारत जिना चढून तिच्या वर्गात गेली.
माझ्या वर्गावर माझा शेवटचा तास होता. वर्गात जाऊन तो डबा मी टेबलावर ठेवला आणि खुर्चीत बसले. नेहमीप्रमाणे सामूहिक कविता म्हणून झाल्या. आज बाई खुर्चीत कशा बसल्यात याचं आश्चर्य सगळ्या चेह-यांवर दिसत होतं. टेबलवर ठेवलेला डबा पाहून काही मुलं चपापून खाली माना घालून बसलेली माझ्या नजरेला दिसत होती.
कविता संपल्यावर मी डब्याकडे बोट दाखवून म्हटलं ,” हा पराक्रम ज्यांनी केला आहे त्यांनी शाळा सुटल्यावर मला स्टाफ रूमच्या बाहेर भेटायचं आहे. माझा विश्वास आहे की यात सामील असलेले सगळे जण तिथे येतील.”
मुलांच्या हातून घडतात त्या बव्हंशी चुका असतात,गुन्हे नाहीत हा माझा विश्वास होता. योग्य पद्धतीने हाताळले तर चुका सुधारू शकतात हा माझा अनुभव होता आणि अजूनही आहे. कधी कधी चुका अनवधानानेही होतात. मुलांना त्यांची बाजू आधी मांडू द्यायला हवी.मग काय तो न्यायनिवाडा! आवाज चढवून डाफरण्याऎवजी, आपण कुठे चुकलो हे मुलांना आतून स्वत:ला कळायला,पटायला,मान्य व्हायला हवं. ते झालं की मग सुधारणेचा मार्ग आपोआप पायाखाली येतो ही माझी श्रद्धा आहे. मुलांच्या चुकीचा पंचनामा भर वर्गात करण्यासारखी घोडचूक नाही आणि मूठभर मुलांना झापण्यात वर्गाचा वेळ वाया घालवण्यासारखा मूर्खपणा नाही असं माझं दृढ मत आहे.त्यानुसारच सारं काही झालं.
शाळा सुटली.स्टाफरूम ब-यापॆकी रिकामी झाली मग मी बाहेर उभ्या असलेल्या पाच जणांना आत बोलावलं,डबा दाखवला आणि हे तुम्हीच केलंत का विचारलं .ते कबूल झाले पण त्यांचं म्हणणं होतं की डबा तिथे खाली पडला होता. मी म्हटलं,”तुम्ही तो उचलून ऑफिस मध्ये का ठेवला नाहीत? या गोष्टीने मला फार दु: ख झालं की माझ्या वर्गातल्या मुलांनी हे वाईट कृत्य करावं.तुम्ही डब्याला नव्हे, एका गरीब माणसाच्या कष्टांना लाथ मारलीत. हा डबा खरेदी करायला जी रक्कम लागली असेल ती त्याने घाम गाळून मिळवली असेल त्या मेहनतीचा तुम्ही अपमान केलात. अरे,एखाद्या गोष्टीला चुकून पाय लागला तरी नमस्कार करायची आपली पद्धत! आणि इथे अन्नाला लाथा मारल्यात तुम्ही?
मला भीती या गोष्टीची वाटते की आज एका निर्जीव गोष्टीचा असा छळ करणारे तुम्ही उद्या कॉलेजमध्ये एखाद्या सजीव व्यक्तीचाही गंमत म्हणून असा छळ करायला मागेपुढे बघणार नाहीत. तुम्ही रॅगिंग करणारे बनाल याचीच तर ही लक्षणे नाहीत? इतका दुष्टपणा आला कुठून? वर्षभर माझ्या हाताखाली शिकलेली मुलं असं दुष्कृत्य करत असतील तर तुमच्याऎवजी शिक्षा मीच घ्यायला हवी.”
माझं शेवटचं वाक्य ऎकल्यावर मुले हलली. सगळ्यांच्याच तोंडून ‘ सॉरी बाई,तुम्ही आम्हाला वाटेल ती शिक्षा करा पण असं नका म्हणू’ असे पश्चात्तापाचे अस्सल उद्गार निघू लागले.
मी म्हटलं,” तुम्हाला शिक्षा करून त्या बिचारीचा डबा परत मिळणार आहे का?” मुलं क्षणभर गप्प बसली मग एकजण म्हणाला ,
“आम्ही भरून देऊ तिचा डबा.”
” कसा? पालकांकडून पॆसे घेऊन? मग तुमच्या चुकीची शिक्षा पालकांना झाली.”
” नाही बाई आम्ही काम करू काही तरी.”
मी म्हटलं ,” ठीक आहे पण तुम्ही या सगळ्याची कल्पना आधी पालकांना दिली पाहिजे. त्यांची परवानगी घेऊनच पुढे काय ते करायचं. मान्य आहे.?”सगळ्यांनी माना डोलावल्या. ” आणि एक,आठवडाभर माझ्याशी बोलायचं नाही.” त्यांचे चेहरे पार उतरले. ही शिक्षा कदाचित त्यांना मोठी वाटली असावी.
तो शुक्रवारचा दिवस होता. मंगळवारी सकाळी त्या मुलीची आई मला भेटायला आली. सोमवारी मुलांनी त्या मुलीला तिच्या डब्यापेक्षा चांगला डबा छान प्रेझेंटेशन पेपरमध्ये गुंडाळून दिला होता. त्यासाठी पॆसे कुठून आणलेत असे ती त्यांना आज विचारायला आली होती. तिला कळले ते असे की त्यांच्यापॆकी एकाच्या काकांचे जवळच लहानसे घर होते. घराभोवती वाढलेले गवत काढून बाग स्वच्छ करायचे काम माळ्याऎवजी मुलांनी रविवारी केले होते.मुले १५-१६ वर्षांची होती त्यामुळे काही अडचण नव्हती. अल्युमिनियमचा डबा काही फारसा महाग नव्हता. तेवढे पॆसे सहज मिळवता आले होते त्यांना तास- दोन तास काम केल्यावर.
मी वर्गात गेले तर टेबलवर रंगीत कागदात गुंडाळून एक पेन ठेवले होते. ” हे काय आहे “विचारल्यावर एकाने उभे राहून सांगितले की-” डबा घेऊन झाल्यावर पॆसे उरले. मग त्यातून आम्ही तुमच्यासाठी हे पेन आणले.”
“माझ्यासाठी? कशाला? माझा काय संबंध? मला नको बाबा हे.” मी असं झटकून टाकताच पाचांचे चेहरे गोरेमोरे झाले. एकजण उठून हळूच म्हणाला,” मॅम तुम्ही या पेनने रोज प्रेजेंटी मांडा. तुमच्या हातात हे पेन बघून आम्हाला आमच्या चुकीची रोज आठवण येईल आणि परत अशी चूक आमच्या हातून होणार नाही.”मग जरासा धीर चेपला पांडवांचा आणि दुसरा म्हणाला,” बाई,आता तुम्ही आमच्याशी बोलणार ना?”
ते प्रामाणिक,भाबडे शब्द ऎकून मला भरून आले. मग “बाई, उघडा ना पेन.” असा आग्रह सुरू झाला.सोनेरी रंगाच्या त्या पेनने मी रोज हजेरी मांडली.तो प्रत्येक दिवस माझ्यासाठी सोनेरी होऊन गेला
लेखिका :- सुश्री संजीवनी बोकील
प्रस्तुती : श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी… भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
मध्यम वयाची एक अंध ताई. चिंचवड परिसरात एका जागी बसून भीक मागते आणि स्वतःसह आईला जगवते.बरेच दिवसांपासून मी तिला विनंती करत होतो की, ‘ बाई गं, बसून भीक मागतेस, त्याऐवजी तुला एक वजन काटा आणून देतो. लोक येतील, स्वतःचं वजन करतील आणि त्या बदल्यात तुला पैसे देतील. भिकेपेक्षा जास्त पैसे तुला वजन काट्यावर मिळतील…. तेही स्वाभिमानाने…!‘
…. तिला कळत होतं परंतु वळत नव्हतं…! दरवेळी वेगवेगळी कारणं देऊन ती मला टोलवत होती…
आता हिचं काही ऐकायचं नाही, असं म्हणून मग एके दिवशी डायरेक्ट वजन काटा घेऊन गेलो, तिच्या पुढ्यात ठेवला आणि गळ्यात एक पाटी अडकवली…
“डोळ्यातली फक्त ज्योत विझली आहे… मनातला प्रकाश नाही….“
” फक्त सृष्टी हरवली आहे… आत्मविश्वास नाही…“
“आम्हाला भिकेचा चंद्र नको आहे…कष्टाची भाकरी हवीआहे…“
“आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या…“
यानंतर सर्वप्रथम मी माझं वजन करून तिला पन्नासची नोट दिली…. बाजूला उभ्या असणाऱ्या भाविकांनी मग तिच्या गळ्यात अडकवलेली पाटी वाचून, स्वतःचं वजन करून, पैसे द्यायला सुरुवात केली….
बघता बघता… शे दीडशे रुपये पंधरा मिनिटातच जमले…. ! ती प्रचंड खुश झाली….
मला म्हणाली, ‘आदीच सांगायला पायजे हुतं ना तुमी डाक्टर, आदीपस्नच केला आस्ता ना ह्यो धंदा मी …’
.. मी चमकलो, इतक्या वेळा सांगूनही तिने यापूर्वी माझं ऐकलं नव्हतं…. आणि आज ही अशी बोलतेय…. ?
मी तिला म्हणालो, ‘अगं बाई , पन्नास वेळा तुला सांगत होतो, तरी तू माझं त्यावेळी ऐकलं नाहीस, म्हणून आज आता डायरेक्ट हा काटा घेऊन आलो मग मी…’
ती हसत म्हणाली, ‘हां, त्येच तर म्हनतीया मी…. तुमी आदी नुसतेच सांगत व्हते… डायरेक्ट आज आनला तसा तवाच काटा घीवून माझ्यासमुर ठीवायाचा ना…. ??? ‘
‘ होय गं बाई चुकलंच माझं…. आता तो जोडा घे आणि हान माज्या टाळक्यात…’
… माझं वाक्य ऐकून आजूबाजूचे लोक हसायला लागले… पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं…. ती मिळालेले पैसे मोजण्यात व्यस्त होती…. गालातल्या गालात ती हसत होती…. !
हे चित्र मी जपून ठेवलंय माझ्या हृदयात… !!!
मनातलं काही
रस्त्यात पडलेली “ती” …
६ एप्रिलला तिला व्हीलचेअर देऊन, रस्त्यातून उचलून सुस्थितीत ठेवलं…. १२ तारखेला ती अनंतात विलीन झाली…!
६० वर्षे प्रतिकूल परिस्थितीत जगली…मात्र ६ दिवस सुद्धा अनुकूल परिस्थितीत जगू शकली नाही…!
जगण्याने छळले होते…मरणाने सुटका केली, हेच खरं …!!!
मागेही एकदा असंच झालं होतं….
बारा वर्षे फुटपाथवर पडून असलेले बाबा…. त्यांना मुलाने घराबाहेर काढलं होतं ! बाबांना मग आंघोळ घालून, नवे कपडे घालून एका आश्रमात ठेवलं….अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बारा वर्षे ते जगत होते आणि आश्रमात ठेवल्यानंतर पुढील पंधरा दिवसात तेही गेले…. !
मला कळत नव्हतं…. हे असं का ?
एके दिवशी माईला (आदरणीय श्रीमती सिंधुताई सपकाळ) हा प्रश्न विचारला. ‘ माई इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही माणसं जगतात आणि अनुकूल परिस्थिती आल्यानंतर ही माणसं निघून जातात. मला याचं खूप आश्चर्य वाटतं आणि खूप त्रासही होतो…. ! ‘
माईने सांगितलं, ‘अरे वाईट वाटून घेऊ नकोस… “आपलं” कुणीतरी आपल्याला भेटायला, कधीतरी येईल… या आशेवर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःचा जीव जगवत असतात…. परंतु त्यांची “आपली माणसं” कधीच येत नाहीत…. ते शेवटपर्यंत वाट पाहतात. तू जेव्हा त्यांची मायेनं विचारपूस करतोस… जेवू घालतोस, अंघोळ घालतोस आणि त्यांना निवारा देतोस, त्यावेळी त्यांना त्यांचं हे हरवलेलं “आपलं माणूस” परत भेटल्याचा आनंद होतो… .. याच क्षणासाठी तर ते प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जगत होते….
शेवटाला का होईना…. परंतु “आपलं माणूस” मिळालं, या सुखाच्या कल्पनेनं, ते अगदी आनंदानं मग आपला जीव सोडतात…. !
माईचं हे वाक्य ऐकून, माझ्या अंगावर सर्रकन काटा आला होता….!!!
कधी अंगावर काटे आणणारं… कधी रोमांच उभे करणारं…. कधी खळखळून हसवणारं….कधी डोळ्यात पाणी उभं करणारं… तुम्हा सर्वांच्या साथीनं आणि साक्षीनं चालणारं हे काम….!
आपली सुख दुःख आपण आपल्याच माणसांशी शेअर करतो ना ?
आणि म्हणूनच एप्रिल महिन्याचा हा लेखा जोखा आपल्या पायाशी सविनय सादर….!!!
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी… भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
१ . तीन वर्षांपूर्वी अत्यंत वाईट अवस्थेत रस्त्यात पडलेला एक मुलगा… सर्व ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्ववत केले… तीन वर्षात एकदाही भेट झाली नाही आणि अचानक या महिन्यात एका मंगळवारी तो मला भेटला ते एका मोठ्या हॉटेलमधील शेफ म्हणून…!
शाहरुखसारखा दिसणारा हा मुलगा, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे याचं कौतुक आहेच… पण त्याहीपेक्षा जास्त कौतुक वाटलं- जेव्हा तो म्हणाला, ‘लाचारीच्या दलदलीतून मी जरी बाहेर आलो असलो, तरी माझ्यासारखे अनेक जण अजूनही त्या दलदलीत फसले आहेत, मला त्यांना आता हात द्यायचा आहे ‘.
— माझ्या कामात त्याला सक्रिय मदत करायची आहे… “घेता” हात आता “देता” झाला आहे, यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो ?
‘ सलामी ‘ या माझ्या लेखात याच्याविषयी सविस्तर लिहिले आहे. तो भेटला त्यादिवशी तारीख होती ११ एप्रिल.
२. पूर्वी मुलीला सोबत घेऊन भीक मागायला येणारी एक तरुणी. सख्ख्या भावापेक्षा मला ती जास्त मान देते. याच नात्याचा उपयोग करून, तिचे समुपदेशन केले, मुलीचे भीक मागणे नुसते थांबवले नाही…. तर तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सुध्दा आपणा सर्वांच्या सहकार्याने घेतली आहे…. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मुलगी आता दुसऱ्या वर्षात बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे. (BBA). पण मुलीला शिकायला परवानगी दिली, तरी “ती” स्वतः मात्र अजूनही भीकच मागत होती. उद्यापासून भीक मागणार नाही, काहीतरी काम शोधते… असं ती मला हसत तोंडदेखलं म्हणायची आणि परत परत भीक मागतानाच दिसायची. जगातली कोणतीही आई असो, तीला आपल्या मुलांच्या “जेवणाची” आणि संपूर्ण “जीवनाची” काळजी असतेच…!
“मुलीचे लग्न” हा कोणत्याही आईच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय… “ती” माझ्याशी जेव्हा जेव्हा बोलायची त्या वेळेला मुलीच्या लग्नाचा हा विषय बऱ्याचदा तिच्या बोलण्यात यायचा….! एके दिवशी मी बरोबर तोच धागा पकडला….तिला म्हणालो, ‘ मुलगी तर आता शिकते आहे, उद्या शिकून ती मोठी होईल… दिसायला छान आहे, तिला भविष्यात चांगली चांगली स्थळं येतील… पण मला सांग मुलगी कितीही चांगली असली, तरी “भिकाऱ्याच्या मुलीशी” एखादा चांगला मुलगा का लग्न करेल ? इतक्या चांगल्या मुलीचे तुझ्यासारखी भीक मागणाऱ्या एखाद्या मुलाशी लग्न लावून देणार आहेस का ? ‘
“भिकाऱ्याच्या मुलीशी” या शब्दांवर देता येईल तेवढा जोर दिला….! हा घाव तीच्या वर्मी बसला…
ती अंतर्मुख झाली… माझ्याशी काहीही न बोलता, खाली मान घालून तिथून ती निघून गेली.
यानंतर कित्येक दिवस त्या ठिकाणी ती मला भीक मागताना दिसली नाही. मला वाटलं, माझ्या “जाचामुळे” भीक मागण्याची जागा तिने बदलली असेल…
यानंतर, बऱ्याच दिवसांनी ती मला दिसली, त्यावेळी तिच्या पाठीवर भलं मोठं प्लास्टिकचं पांढरं पोतं होतं…
माझ्याजवळ येऊन ती म्हणाली, ‘तुमी म्हनाले व्हते ना ? भिकाऱ्याच्या पोरीसंगं कोन लगीन करंल ? बगा मी भीक मागायची सोडली… आता भंगार येचायचं काम करते… ते इकते…! आता हुईल ना माज्या पोरीचं लगीन ? आता कुनाची हिंमत हाय तिला भिकाऱ्याची पोरगी म्हनायची….? सांगा….’
माझ्या डोळ्यात पाणी दाटलं… एक आई मुलांच्या भवितव्यासाठी…. ठरवलं तर काय काय करू शकते…. याचं हे जिवंत उदाहरण…. ! भंगार वेचून ते विकायचं काम सुरूच ठेव, असा मी तिला सल्ला दिला.
माझे ज्येष्ठ मित्र श्री सुनील नातु यांच्याशी बोलताना हा विषय सहज निघाला, या तरुणीला आणखी एखादा व्यवसाय टाकून द्यावा, या हेतूने त्यांनी विकण्यासाठी इंदोरवरून तिच्यासाठी उत्तम क्वालिटीची आर्टिफिशियल ज्वेलरी आणली. तारीख होती ११ एप्रिल.
ज्वेलरी पाहताच ती म्हणाली, ‘भंगार गोळा करून झाल्यानंतर, झोपडपट्टीत फिरून फिरून तीतल्या पोरीस्नी मी हे दागिने इकीन…’
… यानंतर कृतज्ञतेने नातु सरांचे पाय धरण्यासाठी ती वाकली…. नातु सरांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले…! यानंतर ती माझ्या कानाशी आली आणि हळुच म्हणाली, ‘ यातलं एक कानातलं मला लय आवडलंय, मी घालून बगु का ? ‘ .. माझ्या कोणत्याही उत्तराची वाट न बघता, शेजारी उभ्या असलेल्या गाडीच्या काचेत पाहून, ते कानातलं घालून, ती स्वतःला निरखून निरखून पाहू लागली… जणू आजूबाजूला कुणीच नाही… अख्ख्या विश्वात “ती” एकटीच होती…!
मी नातू सरांकडे पाहिले… ते माझ्याकडे बघून हसत होते…. त्यांच्या हातावर टाळी देत म्हणालो..
‘Sir, Women are Women…!‘
‘पटलं रे बाबा…’ म्हणत, त्यांनी टाळी स्वीकारली आणि आम्ही दोघेही हसत हसत तिथून सटकलो…!!!
जिंकणं हे मोरपिसासारखं हलकं असतं… कुणीही ते हसत हसत झेलू शकतं….
आणि हरण्याइतकं दुसरं ओझं या जगात कशाचंही नसतं….!
हे ओझं पेलता पेलता, जो हसत जगतो तो खरा बलवान…. !
सर्व काही जिंकूनही, जगत जगत मरणारी माणसं रोज भेटतात….
आणि सर्वस्व हरूनही मरता मरता जगणारी माणसंही रोजच भेटतात…!
दोघांकडूनही बरंच शिकायला मिळतं…!
हे शिकत, शिकवत… लाचारीने जगणाऱ्या लोकांना आपल्या साथीने एक हात देत आहे, त्याचाच हा एप्रिल महिन्याचा लेखाजोखा… !!!
वैद्यकीय
वैद्यकीय शिक्षण घेत असताना पुस्तकात अतिशय दुर्धर अगम्य अशा अनेक केसेस वाचलेल्या असतात… परंतु डॉक्टर झाल्यानंतर प्रत्येकाला अशा केसेस आयुष्यात कधीतरी पहायला मिळतीलच याची गॅरंटी नसते.
रस्त्यावर काम करताना, मला मात्र महिन्याभरात किमान एकतरी अशी केस पाहायला मिळते.
अशा केसेस मग हॉस्पिटलमध्ये नेऊन सुपर स्पेशालिस्टना दाखवाव्या लागतात, ऍडमिट करावे लागते.
या महिन्यात असे सहा पेशंट मिळाले. इतर अनेकांबरोबर त्यांनाही ऍडमिट केले आहे.
यातील एकाला अंतिम टप्प्यात असलेला कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले, ‘याला आधी आणलं असतं, तर आपण काहीतरी केलं असतं, आता फक्त याला वेदनामुक्त मरण देणं, इतकंच आपल्या हातात आहे….!’
हा मुलगा खरंतर नेपाळचा. मोठी स्वप्नं घेऊन नोकरीसाठी पुण्यात आला. गावी गरीब, वृद्ध आई-वडील आहेत, लग्न झालेलं नाही. नोकरी मिळाली, गावी पैसे पाठवू लागला, परंतु परिस्थितीच्या विळख्याने सगळंच पालटलं. आजारपण सुरू झालं, नोकरी गेली … होते नव्हते ते पैसे उपचारासाठी गेले. आई-वडिलांना पैसे पाठविणे सोडा, स्वतःच्या जगण्यासाठी सुद्धा याला भीक मागावी लागली. वेळ होती, त्यावेळी कोणीही हात दिला नाही…. आता माझ्या माध्यमातून, “तुमचा हात” त्याच्यापर्यंत पोहोचवायचा म्हटलं, तर वेळ निघून गेलेली आहे… मिनिटा मिनिटाने आयुष्य डोळ्यादेखत संपत चाललंय… मृत्यु
उंबऱ्याबाहेर ताटकळत उभा आहे…! समोर आपल्याशी बोलत असणारा माणूस पंधरा-वीस दिवसानंतर, “तो” आपल्यात नसणार आहे… हे आपल्याला माहित आहे…. परंतु त्याला माहीत नाही…
— हे पाहणं, अनुभवणं आणि पचवणं… वाटतं तितकं सोपं नाही, खूप वेदनादायी आहे हे !
समोरच्या कॉटवर असलेलं, चालतं बोलतं “शरीर”, काही दिवसानंतर “बॉडी” म्हणून पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं जाणार आहे…
श्वास असतात तेव्हा “शरीर”… श्वास थांबले की “बॉडी”, शरीर आणि बॉडी मध्ये अंतर फक्त एका श्वासाचं !
आज पन्नास किलो वजनाचं हे शरीर …काही दिवसानंतर मुठभर राख म्हणून तांब्यात विसावणार आहे…
जिवंत असताना कोणी साथ नाही दिली, सोबत नाही केली, कुणीही पाठीशी नाही… पण, हा गेल्यावर मात्र याच्यामागे चालत पन्नासजण याच्या पाठीशी राहुन याला “पोचवायला” येतील…!
जिवंत असताना याला कोणी घास भरवला नाही…. पण गेल्यावर मात्र दरवर्षी याला “घास” ठेवले जातील, न चुकता…!
“या घासापासून” ते “त्या घासापर्यंत”, मध्ये जे काही असतं, ते आयुष्य !!!
आणि,…. आयुष्यभर तुझं – माझं करत आपण जगत राहतो, झुंजत राहतो….फक्त मुठभर राख होण्यासाठी !
मुठभर राख हेच अंतिम सत्य !!!
असो.
… दरवेळी भेटला की विचारतो, ‘डॉक्टर मैं बचुंगा ना ? बाकी कुछ नही, लेकिन मेरे मा बाप उधर है, उनके लिये मुझे जिंदा रहना पडेगा ‘, हात जोडून तो केविलवाणे जेव्हा बोलू लागतो…. तेव्हा आपल्याच आतड्याला पीळ पडतो.
‘अरे हो रे… तुला काय झालंय मरायला ? अजून खूप काही करायचं आहे तुला… चल, असा विचार करू नकोस…’ अशी खोटी खोटी वाक्यं बोलत, त्याला उरलेले दिवस हिमतीने जगण्याची आशा दाखवत आहे.
सर्वात जास्त वेदनादायी आहे ते हे… खोटं बोलणं…!
कधी वाटतं, खरं खरं सांगून मोकळं व्हावं… पण नकोच, प्रत्येक जण जगतो तो आशेवर…
आपल्यालाही आपल्या मृत्यूची तारीख समजली, तर आपण आज, आत्ता या क्षणापासूनच जगणं सोडून देऊ….!…. असू दे, रोज बोलत राहीन मी खोटं ….रोज वाढवत राहीन मी त्याची आशा…एक जीव वाचला… तर रोज खोटं बोलल्याबद्दल मला मिळतील त्या शंभर शिक्षा घ्यायला मी तयार आहे… तयार आहे… !!!
अन्नपूर्णा प्रकल्प
रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे.
… तुम्हा सर्वांचे माध्यमातून अक्षय्य तृतीयेनिमित्त किमान १००० लोकांना जेवू घातले.
हा यज्ञ आपणा सर्वांच्या साथीने रोजच सुरू आहे.
खराटा पलटण
जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे. ४० आज्यांची स्वच्छता टीम तयार केली आहे. पुण्यातील विविध भाग त्यांच्याकडून स्वच्छ करून घेऊन त्यांनाही शिधा दिला आहे. आमची ही टीम पुण्याच्या स्वच्छता अभियानाची ब्रँड अँबेसिडर आहे.
भीक नको बाई…. शिक
एप्रिल महिना म्हटलं, की परीक्षांचा आणि परीक्षांचे निकाल लागण्याचा महिना….!
पूर्वी भीक मागणाऱ्या ५२ मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. आणि ही सर्व मुलं यावर्षी पास झाली आहेत. कुणी दुसरीतून तिसरीत गेलं…. कुणी तिसरीतून चौथीत गेलं… कोणी चौथीतून पाचवीत गेलं…
त्यापैकी असाच एक यावर्षी इन्स्पेक्टर होणार आहे, आणि येत्या काही वर्षात कुणी सीए, कुणी बीबीए तर कुणी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर होणार आहे…!
☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
माझी फजिती !
सन 1969 मधे 1 मे रोजी अस्मादिक विवाहबद्ध झाले. जागतिक कामगार दिनाचा मुहूर्त साधून, जन्मभरासाठी स्वतःला वेठीला धरून ठेवले.मी एक वेठबिगार झालो. एक आझाद पँछी पिंजडेमें बंद हो गया !
आमचे लग्न म्हणजे, पूरब पश्चिम असा प्रकार होते, कारण मी राजस्थानात कोट्याला नोकरी करत होतो. तर ही छत्तीसगड मधील रायपूरची !
‘नेमेची येतो मग पावसाळा ‘… प्रमाणेच नेमेची येणारा चातुर्मास फार लवकर आला. हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सासू- सासरे आले होते.
‘अभी अभी तो आयीं हो
अभी अभी जाना है ।’
असे सगळे होते.
मग विरह म्हणजे काय असतो, ते कळले. कारण बाईसाहेब गणपतीपर्यंत नसणार होत्या. घरच्या गणपती करता म्हणून ही मुंबईला येणार होती. व मीसुद्धा मुंबईला जाणार होतो. तोपर्यंत हा विरह सहन करावा लागणार होता…. ज्यावर्षी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचवर्षी एक व्याकूळ चकोर, चंद्रमेच्या अमृतकणांकरता प्यासा झाला होता !
थोडेसे विषयांतर ! विरहव्यथेचे व लेखणीचे काय साटेलोटे आहे, देवजाणे ! लेखणी हाती घेतली की ती लगेच झरझरा कागदांवर शब्दांचा पाऊस पाडते.
त्या काळात पत्र लिहिणे हा संपर्कात रहाण्याचा एकमेव पर्याय होता. विरहव्यथा इतकी जबरदस्त होती की, बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली की दहाबारा पाने कधी लिहून संपत ते कळत नसे. एका मोठ्या लिफाफ्यात ते पत्र घालावे लागत असे व वजन जास्त झाल्याने जास्तीची टपाल तिकीटे लावावी लागत. ते पत्र रायपूरला जेव्हा डिलिव्हर होई, तेव्हा ते उघडून पुन्हा बंद केले आहे हे लक्षात येत असे. त्याबाबत फिर्याद केली तेव्हा पोस्ट ऑफिसकडून एक विलक्षण कारण सांगण्यात आले…’ राजस्थानातून अफूची तस्करी करण्यासाठी असे जाडजूड लिफाफे वापरले जातात म्हणून आम्ही ते उघडून पहातो.’ त्या भागात मराठी माणसांची संख्या बरीच जास्त आहे. कुणी मराठी कर्मचारी जर आतला मजकूरही वाचत असेल तर त्याला चंद्रकांत काकोडकरांचे लिखाण वाचण्याचा आनंद मिळाला असेल.
माझे एक चुलत सासरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांनी ह्याला पुष्टी दिली होती. हे काका मुंबईतच रहात होते. व लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नसल्याने, त्यांनी अगदी आग्रहपूर्वक जावयाला व पुतणीला भोजनाचे निमंत्रण दिले होते. चुलत सासूबाई आमच्या चौल अलिबागकडल्या होत्या. त्यामुळे त्यांना जावयाचे जरा जास्त कौतुक होते. त्यांनी जेवणाचा बेत खास ‘अष्टाघरी ‘ केला होता…. जावयास जेवणात ब-याच खोड्या आहेत हे माहीत नसणे स्वाभाविक होते.
भरपूर ओला नारळ वापरून सगळे पदार्थ केले होते. पानगी, खांडवी, व डाळिब्यांची उसळ असा मेनू होता. ह्या डाळिंब्यांना बिरडे असेही म्हणतात. मी आजवरच्या आयुष्यात डाळिंब्या किंवा वाल पानावर घेतले नव्हते. चाखून पहाण्याचा तर प्रश्नच नव्हता ! तर सासूबाईंना शंभर टक्के खात्री होती की, जावयाला त्या डाळिंब्या नक्कीच आवडत असणार !! खरेतर डाळिंब्या खूपच चविष्ट झाल्या होत्या. किंचित गोडसर, गुळचट व भरपूर ओला नारळ घातला होता. भिडस्तपणामुळे आज मला त्या खाणे भाग होते. ‘ पानावर वाढलेले सगळे संपवलेच पाहिजेत ‘ ही घरची शिस्त असल्याने, मी पहिल्या घासातच वाढलेल्या डाळिंब्या खाऊन टाकल्या व इतर आवडीच्या पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. आणि तिथेच ब्रह्म घोटाळा झाला होता…..
…. सासूबाई माझ्या पानावर लक्ष ठेवून होत्या. त्या डाळिंब्यांचा वाडगा घेऊन पुढे सरसावल्या व ” मला खात्री होती की डाळिंब्या तुम्हाला खूप आवडत असतील,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण वाडगा माझ्या पानात रिकामा केला. … ‘ पानात काहीही टाकायचे नाही. शेवटी पान चाटून स्वच्छ करायचे ‘ अशा शिस्तीचे पालन करणे आवश्यक होते. काय करणार ! आलिया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नव्हते.! आयुष्यात मी डाळिंब्या खायला सुरवात अशा जम्बो क्वांटिटीने केली होती.
मंडळी, नंतरच्या आयुष्यात मात्र जे पदार्थ ह्या ‘ आझाद पंछीने ‘ चाखलेही नव्हते ते, पिंजडेके पंछीला न कटकट करता खाण्याची सवय लावली गेली, हे वेगळे सांगायला नकोच !
ह्या आझाद पंछीला जिने पिंज-यात बंद केले, ती काय म्हणते पहा !
(तिचे शिक्षण हिंदीत झाल्याने तिची भाषा अशी झाली आहे)….
“ शादीके लिये श्रमिक दिन फायनल केला
मैने एक लडका हेरून ठेवला
उडता पंछी पिंजडेमे बंद केला
आयुष्यभरच्या आरामाचा मुहूर्त साधला “ ….
– इति मंगल टिल्लू
लेखक : श्री सुहास टिल्लू
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
(काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.) इथून पुढे —
त्याच्या पुतणीचं अॅडमिशन इथं पुण्यातच झालं होतं इंजिनियरींगचं. कॉलेजच्या होस्टेलवर राहणं जवळपास निश्चितच झालेलं असताना यानं तिचा बाडबिस्तरा घरात आणून ठेवला. आणि तिच्यासोबत तो ही इंजिनियर झाला…तिस-यांदा..एकदा तो स्वत:,नंतर चिरंजीव आणि आता ही! कारण तिच्या सर्व अभ्यासात हा पूर्णपणे सहभागी झाला होता. गणित विषय पक्का असल्याने आणि शिकवण्याची प्रचंड हौस आणि आवाका असल्याने नोकरीच्या कामांतून हा नेमका वेळ काढायचाच. थोडक्यात एक मुलगी नसल्याचे शल्य याने भाची,पुतणी आणि सून यांच्यामार्फत सुसह्य करून घेतले होते.
आपला वाढदिवस या ही वेळेस नेहमीसारखा साजरा होणार एवढंच त्याला वाटलं. सोन्याची चेन करून घेतली बळेबळेच. कशाला? हा त्याचा सततचा प्रश्न मी न सोडवताच पुढच्या प्रश्नाला सुरुवात करायचे….असू दे रे….हे उत्तर तर जणू कॉपी पेस्ट करून ठेवले होते मनात. सोनं म्हणजे गुंतवणूक असं सांगितलं त्याला. त्याला शोभेल असा पोशाखही तयार करून घेतला. मुलगा परदेशी…सूनबाईही त्याच्यासोबत…मग कशाला करायचा एवढा थाटमाट? हा त्याचा प्रश्न योग्यच होता. पण मी तो ऑप्शनला टाकला.
मुळात तो एकसष्ट वर्षांचा दिसत नाही…..तो मूळातच उत्तम चालीचा असल्याने वजन नेहमीच आटोक्यात. पण सरकारी खात्याच्या चाकोरीबद्ध कामाच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे समाजात वजन भरपूर. पण हे वजन कुणावरही टाकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही आणि त्याची इच्छाही नसते. त्यामुळे त्याची एकसष्टी होते आहे, हे अनेकांना आश्चर्याचे होते. शिवाय तो हा सोपस्कार करून घ्यायला तयार झालाच कसा? हाही प्रश्न अनेकांना पडला. मग त्यांना सांगावे लागले..यातलं त्याला काहीही माहित नाही…त्याला थेट कार्यक्रम स्थळी आणणार आहे….मंदिरात जायचंय असं खोटं सांगून!
मी सकाळपासून तयारीत. तर साहेब निवांतपणे त्यांच्या लेखनाच्या,संशोधनाच्या कामांत व्यग्र. दुपारचे जेवणही बेताचेच घेतले. रात्री बाहेरच जेवायचं आहे म्हणून दुपारी कमी जेवावे…हा त्याचा विचार. कार्यक्रमात मला त्याच्याविषयी बोलायचंच होतं…पण काय काय सांगणार? ‘तु योग्य तेच करशील याची मला खात्री आहे’ असं तो लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला सांगत आलाय. त्यामुळे मी तसा प्रयत्नही केला. आणि त्यानेही तो गोड मानून घेतला. तु माझ्या या मोठ्या परिवाराचा एक भाग झाली आहेस… या परिवाराची सर्व सुख-दु:खे,अडचणी आता तुझ्याही आहेत’ असं म्हणून त्याने संसार सुरू केला. आपलं एक स्वत:चं घर असावं असं त्यालाही वाटत होतं. पण पगारात भागवा या तत्वावर निष्ठा असल्याने त्याच्या आणि माझ्या पगारात घर नजरेच्या टप्प्यात लवकर आलेच नाही. पण देवाच्या कृपेने डोईवर छप्पर आलं. आणि मग आम्ही ते निगुतीनं सजवलं. एक मुलगा..तो ही बाप से सवाई. वडील एवढे अधिकारी असूनही त्याने कधीही कुठल्या नियमांचा भंग केला नाही…अगदी कुणी पहात नसताना सुद्धा!
संसार सुरू असताना त्याने माझा नवरा,माझ्या आणि त्याच्याही पालकांचा मुलगा, भावाचा आणि बहिणीचा भाऊ, भाच्यांचा मामा, पुतण्यांचा काका, सहका-यांचा मार्गदर्शक, नवोदितांचा प्रशिक्षक, वाचकांचा लेखक, श्रोत्यांचा व्याख्याता, शाळकरी विद्यार्थ्यांचा शिक्षक अशा अनेक भूमिका त्याने लीलया पार पाड्ल्या.
नोकरीत,त्यातून शासकीय नोकरीत अनेक आव्हाने असतातच…व्यवस्था बदलण्याच्या वेळखाऊ कामात वेळ घालवण्यापेक्षा व्यवस्थेत राहून शास्त्रीय, संशोधनाच्या, जनसंपर्काच्या माध्यामातून शक्य ते करीत राहणे त्याने शिकून घेतले होते. त्याच्या कुण्या साहेबांनी दिलेला Love all, Trust a few but do wrong to none अर्थात प्रेम सर्वांवर करा,त्यातला काहींच्यावर विश्वास ठेवा मात्र वाईट कुणाचंच करू नका! हा कानमंत्र त्याने प्रत्यक्ष आचरणात आणला. त्यामुळे निवृत्तीनंतर आजही त्याला देशभरात लोक बोलावतात आणि तो ही न कंटाळता जातो. अर्थात आता मी ही सोबत जातेच. त्याच्या व्याख्यानांना मिळणारा प्रतिसाद पाहते, तेंव्हा मलाही छान वाटतं!
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळपासून मी फोन सायलेंटवर ठेवला होता….चोरून बोलायचं कार्यक्रमाची तयारी करणा-या लोकांशी! चार वाजताच घराबाहेर पडले…म्हटलं जरा मैत्रिणीच्या घरी जाऊन येते…तिच्या घरी पुजेचा कार्यक्रम आहे. मी साडेपाच वाजता तयार रहा…आपण मंदिरात जाऊ आणि मग नंतर जेवायला. मी आलेच..असं म्हणून मी सटकले आणि थेट कार्यालयात गेले. तयारी अंतिम टप्प्यात होती. बोलावलेले सर्वच आलेले होते…तयारीत. घटिका जवळ आली….कार्यालयात शांतता ठेवली होतीच. दिवेही मंद केले होते. फुलांची पायघडी तयार होती. रेडी? मी सर्वांना म्हटले…आणि रिक्षा करून घरी गेले. त्याला नवा ड्रेस, सोन्याची चेन घालायला लावली. ती चेन त्याने लगबगीने शर्टच्या आत घालायचा प्रयत्न सुरू केला. मी म्हटलं ‘असू दे थोडा वेळ! छान दिसतीये! रिक्षा कार्यालयाच्या आत जाऊ लागली तेंव्हा तो चमकला. अगं इथं कुठलं हॉटेल? हे तर कार्यालय दिसतंय! मी त्याला हाताला धरून हॉल मध्ये नेलं. सनईच्या सुरांनी त्याचं स्वागत झालं. त्याच्या गळ्यातली चेन चमकत होती. एवढ्या लोकांना पाहून त्याने ती चेन लगेच शर्टमध्ये लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दिवे प्रखर लागले आणि त्याची अत्यंत प्रेमची माणसं उठून उभी राहिली…टाळ्यांचा गजर झाला. त्याला कुणाकुणाला भेटावं,काय बोलावं हे सुचेना. बालपणीचे मित्र, शाळा-कॉलेजातले मित्र,खात्यातली जुनी जाणती माणसं…..सर्व अगदी जवळचे नातलग…! फुलपाखराला मधाने शिगोशीग भरलेल्या फुलांच्या मोठ्या बगिच्यात सोडून द्यावं तसं झालं… एखाद्या लहान मुलासारखा भांबावून गेला बिचारा.
त्याला हाताला धरून मी मंचावर घेऊन जाऊ लागले…फुलांच्या पायघड्यांवर पाऊल टाकले तर ती कुस्करून जातील म्हणून तो आधी तयारच होईना…पण मग पायांतल्या चपला काढून अलगद चालत गेला…त्यानं त्याच्या सहवासातल्यांना आतापर्यंत या फुलांसारखंच जपलंय.
मग एकसष्ट दिव्यांनी ओवाळणं,केक कापणं,त्याला गोडाची आवड..त्यातल्या त्यात सातारी कंदी पेढ्यांचं जास्त कौतुक म्हणून मित्रांनी आणलेला पेढे-हार….सर्व सर्व मनासारखं झालं..!
मग मी बोलायला उभी राहिले तर मनात असलेलं सर्वच उंचबळून आलं….जमेल तेव्हढं सांगून टाकलं….आणि इतक्या वर्षांत पहिल्यांदाच त्याला सर्वांदेखत,सार्वजनिकरित्या आय लव यू! म्हटलं! त्याच्या चेहरा त्या कंदी पेढ्यांपेक्षाही गोड दिसत होता यावेळी !
– समाप्त –
— एका पत्नीचे मनोगत
(नुकताच हा सोहळा पाहिला आणि प्रत्यक्ष अनुभवला. एका सुशील माणसाच्या पत्नीच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला हा लेख. व्यक्तींची नावे,पदे आणि इतर तपशील महत्त्वाचा नाही म्हणून तो लिहिला नाही. कारण प्रेम एकाच वेळेस वैय्यक्तिकही असते आणि वैश्विकही. आपल्या आसपास अशी माणसं असणं हे आपलं आणि समाजाचं सुदैवच की ! एक नातं असं रूपाला येऊ शकतं, बहरू शकतं हे केवळ गोड… )
शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “एकसष्ट दिव्यांच्या प्रकाशात !!!” — एका पत्नीचे मनोगत – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके☆
त्याची एकसष्टी जवळ आलीये आणि मी त्यादिवशी काहीतरी करू शकते, याचा त्याला अंदाज होताच. हल्ली सरप्राईज देण्याची नाहीतरी पद्धतच पडून गेली आहे. परंतू याला काही सरप्राईज द्यायचं म्हणजे महाकठीण. तो सेवानिवृत्त होण्याआधी ठीक होतं. सतत खात्याच्या कामात गर्क. अंगावर सरकारी आणि अधिकाराची वर्दी होती पण त्याचा रुबाब दिसायचा तो प्रशिक्षक म्हणून. त्यामुळे पायाला भिंगरी बांधलेली असायची त्याच्या. मी ही माझ्या नोकरीत असल्याने दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशातली गत होती. पण आता मात्र असं नव्हतं. आणि मला त्याला त्याच्या एकसष्टीचं सरप्राईज द्यायचंच होतं. पण हा सतत जेथे जातो तेथे तू माझा सांगातीच्या चालीवर सोबत. कदाचित इतक्या वर्षांची भरपाई करण्याचा त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असावा.
याची एकसष्टी म्हणजे एक आंतरराष्ट्रीय कट शिजवण्यासारखी भानगड. आंतरराष्ट्रीय यासाठी की चिरंजीव आणि सूनबाई दूर तिकडे परदेशात. घरातल्या एकाला तरी माझ्या मनसुब्याची कल्पना असावी म्हणून आधी सूनबाईला कारस्थानात सहभागी करून घेणे आले. कारण तिच्याकडे सून आणि लेक अशा दुहेरी भूमिका आहेत. आम्हांला मुलगी नाही म्हणून सुनेलाच मुलगी मानायचं याचं खूप आधीपासून ठरलेलं होतंच. आणि इतक्या वर्षांत सूनबाई आमच्या लेकीच्या भुमिकेत अगदी फिट्ट बसल्यात. पण ही लेक आणि आमचा लेक या दोघांनाही त्यांच्या कामामुळे इथे येणे अशक्य होतं. त्यामुळे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी माझ्याच खांद्यांवर येउन पडली. शहरात कार्यक्रम करण्यातला सर्वांत मोठा टप्पा म्हणजे कार्यालय मिळवणे. शिवाय ते जवळचे,सोईचे आणि परवडणारेही असावे लागते. शिवाय तारीख विशिष्ट असल्याने इतर कार्यक्रमांसारखी कार्यालयाची उपलब्ध तारीख बघून दिवस ठरवणे चालणारे नव्हते. कार्यालय बघायला म्हणून घराबाहेर निघाले तर साहेब सोबत यायला तत्परतेने तयार झाले. काहीतरी कारण सांगून मी एकटीच बाहेर पडले!
याचा मित्रपरिवार अनेक ठिकाणी विखुरलेला. त्यामुळे त्यांचेशी संपर्क साधणे जिकीरीचे होतेच. शिवाय ती मंडळी याच्या सतत संपर्कात असतात. त्या सर्वांना याची जन्मतारीख तोंडपाठ आहे कारण ही तारीखच लक्षात राहिल अशी आहे. पण यातील कोणी फितुर झाला तर गडबड होणार, हे नक्की!
मुळात असा कार्यक्रम करणे हे त्याच्या बुज-या स्वभावात बसेल की नाही,ही मोठीच शंका होती. कारण जबाबदारी आणि रुबाबाचा सरकारी रंगाचा गणवेश असूनही साहेबांनी तो कधी मिरवला नाही कामाव्यतिरिक्त. प्रामाणिकपणा, तत्वनिष्ठा आणि अंगभूत सौजन्यशीलतेच्या हल्ली दुर्गुण भासणा-या गुणांमुळे तो प्रसिद्धीपासून आणि लाभांपासून चार हात दूरच राहिलेला माणूस. तीस पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत फक्त एकदाच प्रमोशन मिळाले त्याला यावरूनच सर्व काही लक्षात यावे खरे तर. पण त्याची त्याला कधी ना खंत ना खेद. लहानपणी म्हणजे तो चौथीला असताना त्याच्या बाबांनी त्याच्याकडून भगवद गीता तोंडपाठ करून घेतलेली होती. पुढे त्यातील काही श्लोकांचं त्याला विस्मरण झाले थोडेसे. मात्र ‘कर्मण्ये वाधिकारस्ते’ तो विसरला नाही. जे काम मिळाले ते जीव ओतून करावे हा एक अर्थ त्याला उमगला होता. त्यामुळे त्याला मानणारा मोठा मित्रपरिवार त्याने जमवून ठेवला होता. त्यामुळे कार्यक्रमाला बोलवायचे तरी कुणाकुणाला असा सवाल उभा राहिला. पाचशे दोनशे दीडशे वरून गाडी सव्वाशेवर स्थिर केली. पाच पंचवीस इकडे तिकडे होतातच.
अगदी मुलीच्या लग्नाची आमंत्रणे करावीत अशी यादी तयार केली लपून छपून. कारण काहींचे संपर्क क्रमांक माझ्यापेक्षा त्यालाच जास्त ठाउक असतात. पण काहीतरी कारण सांगून,त्याच्या फेसबुकमध्ये घुसखोरी करून ते क्रमांक मी मिळवले….त्या सर्वांना कार्यक्रमाला यायचेच होते. पण इतक्या लांबून कार्यक्रमाच्या आधी एक दिवस इथे येणा-या मित्रांनी चुकून इथल्या त्यांच्या कॉमन मित्रांकडे भंडाफोड न केला म्हणजे मिळवली!
जावयाचा कार्यक्रम आणि त्याच्या माहेरच्या म्हणजे माझ्या सासरकडील लोकांना नाही कळवलं तर कसं जमेल? त्यात हा त्यांचा अतिशय लाडका जावई. जावई कम लेक. म्हणजे जावई कमी आणि लेकच जास्त. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या पैकी एकाला जरी वगळलं तर अवघड झाले असते…भावनिकदृष्ट्या! जितकी सेवा त्याने त्याच्या वडिलांची केली तितकीच काळजी माझ्या घरच्यांचीही घेतली आजवर. अहो, नोकरी मुंबईत आणि घर पुण्यात. त्याच्या वडिलांच्या पायांना रोज तेल लावून मालिश करून द्यायचा याचा शिरस्ता. बाबांची मालिश करून देणं वैद्यकीयदृष्ट्या अत्यावश्यक तर होतेच. एखादा पगारी माणूस नेमून हे काम खरे तर त्याला करून घेता आले असते…. पण मुलाचे कर्तव्य म्हणून तो हे काम न कंटाळता करत असे. त्यामुळे साहेब भल्या पहाटे रेल्वेने मुंबापुरीला प्रयाण करायचे आणि रात्री उशीरा पुण्यात परतायचे…असा क्रम थोडाथोडका नव्हे…कित्येक वर्षे चालला. याला भक्त पुंडलीक म्हणावं की श्रावण बाळ असा प्रश्न पडायचा.
माझ्या नणंदेचे म्हणजे याच्या बहिणीचे यजमान अकाली निवर्तले तेंव्हा याने मला ठामपणे सांगितले…दीदीची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आता आपली! आणि त्याने ती आजवर निभावली आहे. कार्यक्रमात दीदीच्या पोरींना म्हणजे भाच्यांना आणि भावाच्या मुलींना सहभागी न करून घेउन कसे भागणार? या भाऊरायाच्या सोहळ्याला बहिण आणि मामाश्रीच्या कार्यक्रमाला भाच्या, आणि पुतण्या तर हव्यातच. म्हणून मग सव्वाशेची निमंत्रण यादी दिडशेच्या घरात सहजच गेली. शिवाय गाणे शिकलेल्या भाचीबाई सूत्रसंचालनासाठी सूत्रे हाती घेण्यास उत्सुक होत्याच. त्यामुळे दीप-प्रज्वलन,स्वागत गीत, प्रार्थना,आभारासह सूत्रसंचलन इत्यादीचा प्रश्न परस्पर मिटला. फ्लेक्स,आमंत्रण पत्रिका, फुलांची सजावट,केक, एकसष्ट दिवे,जेवणाचा मेन्यू फोटोग्राफर,फुलांच्या पायघड्या,रंगमंच इत्यादी शेकडो बाबी पटापट फायनल झाल्या….त्याची माझ्यावर नजर होतीच… काही तरी डाव सुरू आहे हे ओळखायला त्याला वेळ नाही लागला. पण निश्चित डाव काय हे मात्र मी गुलदस्त्यातच ठेवू शकले.
– क्रमशः भाग पहिला
शब्दांकन व प्रस्तुती : श्री संभाजी बबन गायके.
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कुठलीही संवेदनशील व्यक्ती एखाद्या अनोळख्या व्यक्तीचं दुःख बघून हळहळते, मनातून खूप दुःखी होते, बराच वेळ त्याचाच विचार करत राहते, कधीकधी थोडीफार आर्थिक मदत करते आणि शेवटी यापलीकडे आपण काय करू शकतो? असा विचार करून दिनक्रमाला लागते… पण काही लोक जात्याच वेगळे असतात….out of the way जाऊन ते पीडीतांसाठी काम करतात… अशा अनेक गोष्टी आपण वाचतो, अचंबित होतो… पण आता मी सांगणार आहे ती घटना आम्ही अगदी जवळून बघितलेली…. तुम्हा सगळ्यांना share करावीशी वाटली…!!
माझा नवरा आणि त्याच्या तीन मित्रांनी नुकतंच भारताच्या पश्चिम टोकापासून पूर्व टोकापर्यंत ( जवळ जवळ ४००० km) cycling च Expedition पूर्ण केलं त्यात घडलेली ही घटना..!! त्या चौघांना, Young Seniors चे काही सहकारी, गुहाटी ला join झालेत.. त्यात पुण्याचे प्रथितयश Maxillofacial and oral surgeon डॉ. दीपक कुलकर्णी हे सुद्धा होते.. एक दिवस (१३ डिसेंबर २०२२) रोजी ह्या सगळ्यांनी लोहित जिल्ह्यातील सनापुरा येथील विवेकानंद mission च्या शाळेला भेट दिली.. तिथे डॉ. कुलकर्णींना सर्व मुलींमध्ये एक ९-१० वर्षांची मुलगी (तिचं नाव मुस्कान) जरा वेगळी आणि एकटीच बसलेली आढळली… नीट निरखून बघितले तर त्या मुलीची मान पूर्ण वाकडी असलेली आढळली, आणि मानेची नीट हालचाल पण होत नव्हती, त्यामुळे complex येऊन ती मुलगी कुणात मिसळत नसल्याचं कळलं… डॉ. नी अशा केसेस दुरूस्त झालेल्या बघितल्याने, ते प्रिन्सिपॉलना भेटून म्हणाले, ” यावर शस्त्रक्रिया हा उपाय आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. तुम्ही तिला गुहाटी किंवा अरुणाचल प्रदेशात चांगल्या डॉ ना दाखवा..” त्यावर प्रिन्सिपॉल म्हणाल्या ,”आम्ही भरपूर ठिकाणीं दाखवलं पण काही उपयोग झाला नाही..” यावर डॉ. नी ताबडतोब उत्तर दिलं की ,”तुम्ही हिला पुण्याला घेऊन आलात तर मी तिथल्या चांगल्या डॉ. कडून हिच्यावर उपचार करवून घेईन , शिवाय तिच्या जाण्यायेण्याच्या, औषध पाण्याच्या खर्चाची तरतूदही करेन.. तुम्ही हिच्या पालकांशी बोलून घ्या “..!! आणि आपला फोन number देऊन डॉ. पुढे मार्गस्थ झाले..!!
त्यानंतर जानेवारी १० पर्यंत प्रिन्सिपॉल मॅडम डॉक्टरांशी w app वर संपर्कात होत्या… त्यानंतर ४-५ दिवसात डॉ.ना मुस्कानच्या काकांचा फोन आला.. त्यात ऑपरेशनच्या यशापयशाबद्दल विचारलं ( हे साहजिकच होतं कारण ते इतका खर्च करून येणार होते) डॉ. नी त्यांना आश्वस्त केलं…!! त्यानंतर पुढील एक महिना काहीच घडले नाही… डॉ. ना वाटले त्या लोकांना खात्री वाटली नसेल म्हणून येणार नाहीत …
पण २२ फेब्रुवारीला प्रिन्सिपॉल मॅडमचा फोन आला की मुस्कान आणि तिचे नातेवाईक लवकरच पुण्याला येत आहेत.. त्याप्रमाणे ७ एप्रिलला फक्त एकटे काका आणि ८ एप्रिलला इतर सगळे (मुस्कान आणि तिचे जवळचे नातेवाईक) पुण्यात येऊन धडकले.. डॉ. ना भेटले… डॉ. नी त्यांना ससूनमधील सगळी procedure समजावून सांगून admit करून घेतले… दरम्यान मुस्कानची, प्रसिद्ध शल्यचिकित्सक,डॉ. पराग सहस्रबुद्धे ( prof and head, plastic surgery department) यांचेकडून तपासणी करून, १२ एप्रिल ही तारीख operation साठी ठरवली… ठरल्याप्रमाणे, कुठलेही complication न येता , op व्यवस्थित पार पडले…!!
मुस्कान चे काका एक दिवस आधी फक्त डॉ. ना जोखायला आले होते.. एका अनोळखी मुलीला out of the way जाऊन हे इतकी मदत का करत आहेत हे त्यांच्या आकलनापलीकडचं होतं… त्यांनी नंतर डॉ.कडे कबूल केलं की, “ आम्ही जरा साशंक होतो , पण मग आम्ही विचार केला की, ” जे लोक इतक्या दूर सायकलवर येतात ते नक्कीच चांगल्या मनाचे असायला हवेत, म्हणून आम्ही केवळ तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून, फक्त आवश्यक तपासण्या करायला म्हणून इतक्या लांब आलो आणि तुम्ही आम्हाला चक्क ऑपरेशन करूनच परत पाठवत आहात…!! “
ऑपरेशन नंतर जाग येताच मुस्कानचा पहिला प्रश्न होता,” माझी मान सरळ झाली का? “…. डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळलं…” इतका लहानसा जीव, जन्मापासून हे वेगळेपण आणि समाजाच्या विचित्र नजरा झेलतच मोठा झालेला… हा सुखद धक्का तिच्या आयुष्यात किती मोठा बदल घडवून आणणार आहे, याची तिला जाणीव तरी असेल का..??
मुस्कान ला discharge मिळाल्यावर डॉ. नी Young Senior grp शी तिची भेट घडवून आणली… शेवटी या सगळ्या घटनांना जबाबदार YS grp च होता ना..?? (YS grp मधील cyclists नी सुद्धा contribution करून, खारीचा वाटा म्हणून मुस्कानला काही मदत केली )
अगदी वेळेवर ठरून, डॉक्टर दीपक कुलकर्णी, गुहाटीला या चौघांना join होतात काय, मुस्कानला बघून त्यांचं मन द्रवतं काय, ३००० km चा प्रवास करून एक गरीब कुटुंब केवळ त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे येतं काय आणि वेगाने सगळया घटना घडून मुस्कान ठीक होते काय…. सगळं स्वप्नवत भासत होतं…!!
मुस्कान लवकरच आपल्या घरी परत जाईल… op successful झाले असले तरी जादूची कांडी फिरवल्या सारखी मान एका मिनिटात सरळ होणार नाही… तिला काही महिने पट्टा आणि physiotherapy करावी लागेल… मात्र हळुहळू मान नॉर्मल position ला येणार हे नक्की !!
एका सहृदय माणसाने, आपल्या संवेदनशील मनाची हाक ऐकून ही जी कृती केली, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा हा प्रयास…!!
डॉक्टर दीपक कुलकर्णी तुम्हाला सलाम. — संत तुकाराम महाराज यांच्या ,” जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले” या अभंगातील “साधू ” किंवा “देव” अजून वेगळा काय असू शकतो.??
लेखिका : साधना राजहंस टेंभेकर, कोथरूड, पुणे
प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈