☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
ठराविक वयाच्या टप्प्यावर नाही म्हटले तरी…तीच ती घरकामे करून करून,नकोशी वाटू शकतात…. सर्वांनाच नाही लागू पडणार….पण मला तरी वाटत…..कुठे थांबावं हे समजणे आवश्यक….पूर्णपणे नाहीच.. अडीअडचणीला आपण निभावून नेलंच पाहिजे….
पण काही जणींचा अट्टाहास असेच पाहिजे तसेच पाहिजे.माझ्याच हाताला चव…माझे मलाच आवडते…
कामे,घरातील टापटीप मलाच त्यातच रस वाटतो…. त्यानिमित्ताने व्यायाम होतो….
पण घरासाठी कितीही करा कमीच..पण खरच आपण घरासाठी की घर आपल्यासाठी….किती जीवापाड जपावं….स्वतःला मात्र गुंतवून त्याच त्या कामात कितपत योग्य आहे….स्वतःसाठी जगणे होते का? बरे खूप वर्ष मनलावून कामे केली…कुणी घरातील व्यक्ती शाब्बास,तरी म्हटलेले आठवत नाही…की घरकामासाठी पुरस्कार पण देण्यात येत नाही….का करावी मनाची ओढाताण का घ्यावं इतके टापटीप , स्वच्छ्ता ह्यांचे वेड…जे मनास पटले नाही तरी करीत राहणार…कधीतरी ह्यावर विचार करण्याची गरज आहे….
काय बाई दोन तीन पोळ्या तर करायच्या म्हणून स्वतःच करतात….तीच ती कामे डोक्यात आज काय स्वयंपाक करायचा…पुन्हा रात्री भाजी काय करायची….
दुसऱ्या कुणाच्या कामाला नावे ठेवणे….काय बाई लगेच भांडी घासली कि हाता सरशी लगेच साफ होऊन जातात…तीच ती कामे त्यातच अडकून पडतात….
कितीतरी अजून जगण्याला वाव द्यायचा असतो इकडे लक्षच नसतं….. सार आयुष्य ह्यातच घालून पुन्हा वर म्हणायचं आता बाई होत नाही,पूर्वीसारखं…. शरीर पण कुरकुर करत असत…मन पण नको म्हणून सांगत असत…..पण सरळ दुर्लक्ष करत करण्याची तयारी दाखवतात….पण कुठेतरी थांबले पाहिजे हे कळतच नाही….मीच राबराब राहते …..माझी कदर नाही कुणाला.तूच कर ना तुझीच कदर….घे मोकळा श्वास कधीतरी….दे सोडून मनातील विचार माझ्याशिवाय घराचे कसे होईल……मस्त चालत आपण नसलो तरी ,हा विश्वास हवा…..
किती करणार तीच ती कामे…..नकोच गुंतवून घेऊ ना…केलीत की आतापर्यंत … तूच वाहिलीस घरकामाची धुरा….. मान नाही का दुखत, दे झुगारून आता तरी…..हो घरकामातून रिक्त…..असेल आर्थिक स्थिती संपन्न तर मोलानी करवून घे ना.की त्यातही मला नाही आवडत बाई.कस ग सोड ना आता हट्ट…
कर वेगळे हट्ट जगेन तर मस्तच… माझ्यावर नितांत प्रेम करणार…….मस्तच वेगळे काहीतरी जगणार नकोच तीच ती चाकोरी…..म्हण स्वतःला थांब ग बाई आतातरी….
जीवन जगायचं कसं तर भरभरून स्वतःला वेळ राखून ठेवला की मग स्वतः खरच जगलो म्हणून भारी वाटतं…..घरकामे करावीत ज्यांना आवड आहे त्यांनी…पण कामाचे योग्य नियोजन केले की त्यात अडकून न पडता…..अजून बरेचसे आवडीचे जगणे होते….फिरणे….मस्त रमतगमत, मैत्रिणी – त्यांच्यात रमणे….गप्पागोष्टी हक्काचे स्थान मन मोकळे मनमुराद जगणे होते…..
मैत्रिणी जमवणे ती मैत्री जोपासणे, टिकवणे ही सुध्दा कलाच आहे….ती अवगत करून, मस्त जीवन जगण्याचा आनंद मिळतो….मस्त आयोजन, नियोजन केले की स्वतः आनंदी असलो की घरदार पण आनंदी राहणार यात वादच नाही…..चला तर मस्त स्वतःसाठी वेळ राखून ठेवू आणि मस्त आनंदी आनंद घेत राहू…..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
संध्याकाळी पाच साडेपाचची वेळ. मुंबईहून नाशिकला येतांना जो टोलनाका आहे त्यावर गाड्यांची गर्दी होती. या टोलनाक्यावर काही तृतीयपंथी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांपाशी थांबून पैसे मागत असतात. गाडीच्या काचा बंदच असतात बहुतेकांच्या. ज्यांच्या उघड्या असतात त्यांच्याकडे ही मंडळी थांबतात.
त्या दिवशी टोलनाक्यावर गर्दी आणि हे पैसे मागणारे तृतीयपंथी. मी बघत होते..शेजारीच असणाऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक सुंदर तरुण मुलगी एकटीच बसली होती..काहीतरी वाचत असावी. तिचं लक्ष बाहेर नव्हतं, म्हणून इतर लोकं ज्यावेळी त्यांना बघून पटापट आपल्या गाडीच्या काचा बंद करत होते पण ती मात्र या सगळ्यापासून आपल्याच विश्वात गुंग होती..
एक हिरवी साडी नेसलेला तृतीयपंथी त्या गाडीच्या जवळ गेला..तिथेच एक गजरेवाला होता..त्याच्यापाशी थांबून त्याने टपोऱ्या मोगऱ्याच्या फुलांचा भरगच्च गजरा घेतला..खरंतर गजरा घ्यावा असे मलाही वाटले होते. पण ‘त्याच्या’ समोर पूर्ण काच खाली करायला नको म्हणून जराशी काच खाली करून निदान फुलांचा वास तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते बघत होते.
गजरा घेऊन तो त्या मुलीच्या दिशेने वळला आणि तितक्यात त्या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले..
तिचं देखणं रूप आणि अचानक झालेली नजरानजर…. त्याने एकदम तिला विचारले..” हे अनारकली…, किधर चली..?”
एक सेकंदही वेळ न लावता ती मुलगी तितक्याच मिश्किलपणे पटकन त्याला म्हणाली..” डिस्को चली..!!!”
त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू..अचानक आलेल्या या उत्तराने तो क्षणभर चपापला..त्याला अनपेक्षितच होते तिचे उत्तर..त्यालाच काय मलाही हसू आले ऐकून..खूप मनापासून..एकदम गंमत वाटली तिच्या या उत्तराची.
तो इतका इतका खुश झाला की त्याने सेकंदाचाही वेळ न लावता आपल्या हातातला मोगऱ्याच्या फुलांचा ओंजळभर गजरा तिला देण्यासाठी हात पुढे केला..एक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तो घेऊ की नको असे भाव आले..पण क्षणभरच… तिनेही तो गजरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला..तिची गाडी पुढे सरकली..
त्याने दुरूनच तिला म्हटले “ऐसेही खुश रहो बेटा..!” आणि तो दुसऱ्या गाडीकडे वळला..
माझ्या समोर नुकत्याच आणि अचानक घडलेल्या त्या घटनेचा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की मी नखशिखांत थरथरून गेले !
एका हजरजबाबी उत्तराला इतकी दिलखुलास दाद मनापासून देणारा ‘तो’ आणि त्याला एक ‘माणूस’ म्हणून समजून घेणारी ‘ती’… मला त्या वेळेला जगातली अत्यंत सुंदर माणसं वाटली..
आपले किती गैरसमज आणि पूर्वग्रह असतात तृतीयपंथीय लोकांसाठी..पण माणसाची वृत्ती काही लिंगभेदावर अवलंबून नसते. मन सुंदर हवं..जे त्या हिरव्या साडीतल्या व्यक्तीचं होतं..नुसतं सुंदरच नाही तर दिलदार आणि रसिक सुद्धा ! — आणि त्या सुंदर मुलीचे मनदेखील अत्यंत सुंदर आणि पूर्वग्रह विरहित स्वच्छ होते..
छोट्याशा क्षणात घडलेल्या त्या माणुसकीच्या आणि कलात्म रसिकतेच्या मनोज्ञ दर्शनाने माझ्या मनातली जळमटं कायमसाठी स्वच्छ पुसली गेली आणि आजही माझ्यासाठी ती आठवण एक सगळ्यात सुंदर आठवण आहे !
लेखिका : डॉ. अंजली औटी.
(#कॅलिडोस्कोप )
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चार दिवसांपूर्वी झाडांची माती बदलण्यासाठी वेळ काढला. सगळी झाडं झाली, एक वेल राहिला- गोकर्णचा. त्याला फुलं कमी यायला लागलेली, पण वेल काढायचा म्हणजे रिस्कच. त्यात एकाच कुंडीत पाच बिया लावून त्या एकाच दोऱ्याने वर गेलेल्या. एकात एक गुंतलेल्या पाच वेलींना बाहेर काढून परत मातीत रुजवायचं म्हणजे दिव्यच वाटलं. फुलं नाही दिली तरी जिव्हाळा जमला होता त्यांच्यासोबत. काढून परत लावल्याने त्या वेली जगतील की नाही समजत नव्हतं. रिस्क घेतली आणि बदलली माती.
संध्याकाळपर्यंत वेल सुकल्यासारखी झाली. जीव झुरझुरला. सकाळी उठल्या उठल्या वेलीकडे गेले. बघितलं तर वेल पूर्ण सुकला, जीव गेल्यासारखा वाकला होता. खूप वाईट वाटलं.पण पाणी घालत राहिले, आणि आज चार दिवसांनी त्याच्यात हिरवेपण दिसू लागलं.
त्यावरून असं वाटलं की आपण बायका पण त्या झाडासारख्याच असतो .काही वेलीसारख्या नाजूक, तर काही डेरेदार – काही रुक्ष, तर काही अल्लड, सुबक, सुंदर – काही नुसताच दिखावा, तर काही दिसायला बेढब पण उपयुक्त – काही लाजऱ्या -बुजऱ्या, तर काही स्वतःच्या अस्तित्वाने आकर्षित करणाऱ्या – काही बोचऱ्या तर काही मुलायम.
आपणही लहानपणी माहेरी रुजतो, फुलतो, बहरतो. लग्नानंतर आपली पाळेमुळे उखडून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रुजवलं जातं. आपणही या वेलीसारखं थोडं सुकतो, बिचकतो ,नवीन बदल पचवतो आणि आपली मुळे रोवायला सुरुवात करतो, बहरायला लागतो. तिथं आपल्याला खत,पाणी, वातावरण कसं मिळतं त्यावर प्रत्येकीचं बहरणं वेगवेगळे होतं. काहींना खूप खत, पाणी, काळजी मिळते, त्या खूप बहरतात, फुलतात. काहींना मिळतं पाणी खत, पण त्या दुर्लक्षित असतात. अशावेळी त्या फक्त वाढतात. पण फुलण्याची, बहरण्याची उमेद नसते. त्या स्वतःला हरवून बसतात. काहींना काहीच मिळत नाही. त्या हळूहळू एक एक पान गळून गळून जातात.
असे हे झाडांशी बाईपण जुळतं-
लेखक : सुश्री प्रिया कोल्हापुरे
मो. -9762154497
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रमायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात न, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —
पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.
पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवरा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.
दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठेतरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.
दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,
आता मला सुट्टी मिळणार मिळणार
खूप खूप मज्जा मी करणार करणार.
आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावर नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.
आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.
आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.
आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-
इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मिटूनच घ्यायचा.
तर असं हे माझं सुट्टीपुराण. . . . . जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.
आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.
२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.
इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.
एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.
साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.
☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
भारतीय सनातन परंपरेतील विविध देवतांची नावे ही गुणदर्शक आहेत. शं म्हणजे शुभ; शुभ करणारा तो शंकर, तर वर्णाने काळा असणारा तो कृष्ण , सुंदर व मोहक गर्दन असणारा तो सुग्रीव आणि रमविणारा तो राम. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. शंकरांचे वर्णन कर्पूरगौरा म्हणजे कापरासारखा गोरा असे असून देखील काही चित्रकारांनी महादेवाला काळे दाखवून त्याचा कृष्ण वर्ण प्रचलित केला आहे.
तसेच पांडु म्हणजे पांढरा किंवा गोरा; पांडुरंग या संज्ञेचाच अर्थ जो रंगाने गोरा आहे असा होतो. असे असतांना आजकालच्या बहुतेक साहित्यिकांनी विट्ठलाचे सावळा किंवा काळा असे वर्णन का केले आहे हेच समजत नाही ! पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणातून बनविलेली असल्याने कदाचित हा अपप्रचार झाला असावा. तथापि तशा अनेक देवतांच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्याच असतात की !
माझे स्पष्ट मत आहे की विट्ठल ऊर्फ पांडुरंग ही देवता गोऱ्या रंगाचीच आहे.
जेवणात जर मीठ बरोबर असलं तर मिठाची आठवण कोणालाच येत नाही. परंतू हेच मीठ मात्र कमी पडलं की च्च…च्च…म्हणत सगळ्यांची मीठ शोधायची धांदल सुरू होते….!
आपलं आयुष्यही या मिठासारखंच असावं…!
…. आपल्या असण्याची जाणीव कोणाला असो किंवा नसो, परंतु आपल्या नसण्याची उणीव कोणाला तरी भासणे हे खरं सुख !…… मात्र, ज्यांच्या असण्या आणि नसण्याचं सोयर सुतक कोणालाच नाही….असे अनेक जण मला या महिन्यात भेटले…!
त्यापैकीच या चौघी….
१. एक अंध ताई, डोळ्यातील ज्योत पूर्णपणे विझली आहे, परंतु मनातला अंगार मात्र विझलेला नाही….
—शिवाजीनगर परिसरात भीक मागायची. जिथे ती भीक मागायची, तिथेच तिला खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.
२. दुसरी एक दिव्यांग ताई… तिचे पती सुद्धा दिव्यांग आहेत. एकमेकांच्या साथीने आयुष्याचं ओझं डोक्यावर पेलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू दरवेळी ते शक्य होत नाही, म्हणून ही ताई भीक मागायची…..
— हिला एक wheel chair दिली आहे. Artificial Jewellery त्याचप्रमाणे स्त्रियांची इतर प्रसाधन साधने तिला विक्रीसाठी घेऊन दिली आहेत. नानावाडा परिसर, तसेच शनिवार वाडा परिसर येथे ती आता हा व्यवसाय करू लागली आहे.
३. भवानी मातेसमोर जोगवा मागणारी ही तिसरी मावशी… कोणाच्याही आधाराशिवाय जगते आहे. तिला आपण भाजी, तसेच फळं विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे–= त्यासाठी तराजू, वजन काटे, इत्यादी सर्व साहित्य घेवून दिले आहे. कॅम्प, भवानी पेठ, तसेच पुण्यातील राजेवाडी परिसर येथे तिने फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
४. एक तरुण महिला शनिपार मंदिर, बाजीराव रस्ता येथे भीक मागत होती, त्याच परिसरात तिला खेळणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.
…… या महिन्यात “महिला दिन” होता हा फक्त योगायोग !
“दीन” असणाऱ्या महिलांना, तुम्ही सुद्धा “माणसं” आहात याची जाणीव करून देत, आम्ही रोजच महिला दिन साजरा करत आहोत.
कोणताही समारंभ नाही… “हार – तुरे” नाहीत…!
…. आयुष्यात जगताना, कायम ज्यांची “हार” झाली, अशा दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांना… पुन्हा गळ्यात “हार” घालण्याचं प्रयोजन काय…?
…. खाली झुकलेली मान, जेव्हा सन्मानाने ताठ होते, त्यावेळी आमच्यासाठी तोच सण असतो… समारंभ असतो… महिला दिन तोच असतो….! आठ मार्चला आम्ही महिला दिन साजरा करत नाही…. तर तो रोज रोज जगतो…!!!
५. याच महिन्यात रंगपंचमी येवून गेली…! आयुष्य रंगपंचमी सारखंच आहे…. कितीकदा चेहऱ्यावर रंग चढतो आणि कितिकदा परिस्थिती तो उतरवून टाकते…
…… असेच रंग उडालेले… पाय मोडून रस्त्यात खितपत पडलेले ते दोघे….!
यांच्यावर आधी उपचार केले, दोघांनाही व्हीलचेअर दिल्या. त्यातील एकाच्या अंगी दाढी कटिंग करण्याचे कसब होते, त्याला लागणारे सर्व साहित्य घेऊन दिले. दुर्गंधीत असणाऱ्या आमच्या भिक्षेकर्यांचीही दाढी कटिंग करायला कोणी पुढे येत नाही…. मग यालाच आम्ही आमच्या भिक्षेकर्यांची दाढी कटिंग करायला लावून पगार द्यायला सुरुवात केली… !
…. इकडे “याला” रोजगार मिळाला तिकडे “ते” स्वच्छ झाले…
It’s our Win – Win situation….!!!
६. दुसऱ्या एका व्यक्तीचा पूर्वी पायपुसणी विकायचा व्यवसाय होता… एक्सीडेंट होऊन, रस्त्यावर आल्यानंतर तो स्वतःच “पायपुसणं” होऊन बसला…
…. आता, पायपुसणी विकायचा व्यवसाय याला पूर्ववत टाकून दिला आहे…. ! पर्वती पायथा परिसरात तो फिरून हा व्यवसाय करत आहे….
…. या रंगपंचमीत आम्ही त्या अर्थाने जरी रंग खेळलो नाही… तरी, ज्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले आहेत, अशांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचा एक तेजस्वी रंग मात्र नक्की लावला आहे…. !
“भिकारी” या शब्दांची लक्तरं आम्ही होळीच्या आगीत अर्पण केली आहेत…. !
७. एक अपंग आजी... जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भीक मागते…!
….. या महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर… तिला एक व्हीलचेअर आणून दिली…. त्यावर तिला व्यवस्थित बसवलं, आणि तिच्या पायाशी वजन काटा ठेवला… तिला सांगितलं, ‘ लोक येतील, यावर आपलं वजन करतील आणि तुला पैसे देतील ‘…… अर्थातच बोहनी (भवानी) करण्याचा मान मला मिळाला…. !
८. पूर्वी पती असतांना सुस्थितीत असणारी एक मावशी…. पती अचानक गेल्यानंतर, सर्व काही बिघडले…. शनिपार येथे मग गळ्यात माळा घालून भीक मागायला सुरुवात केली… तिला स्वतःला भीक मागायची लाज वाटत असे… परंतु उपाशी पोटाला कुठं लाज असते ? अनेकांनी तिला अनेक सल्ले दिले…. परंतू भरल्या पोटानं दिलेला सल्ला, उपाशी पोटाला कधीही पचत नाही…! गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात या सर्व वस्तू, सणाअगोदरच या मावशीला घेऊन दिल्या आहेत… जेणेकरून ती या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करू शकेल…. !
या विक्रीतून जमा झालेल्या भांडवलातून आम्ही आता दुसरा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू करणार आहोत.
९. नवऱ्याने सोडून दिलेली बाळासह रस्त्यावर राहणारी एक ताई…. !
…. आमचा अन्नपूर्णा प्रकल्प चालवणारे, श्री अमोल शेरेकर यांचा मला एके दिवशी फोन आला, ‘ सर, या ताईचं काय करू ? ‘
.. मी विचार करून उत्तर देईपर्यंत ते म्हणाले, ‘ मी जिथे राहतो त्याशेजारी एक रूम खाली आहे. आपल्याला फक्त डिपॉझिट आणि या महिन्याचे भाडे आणि किराणा भरून द्यावे लागेल. माझ्या नजरेत एक काम आहे, मी या ताईला तिथे कामाला लावतो…. मार्च नंतर एकदा का हिला पगार मिळायला लागला, की मग आपल्यावर आर्थिक जबाबदारी राहणार नाही.’
…. मी काहीही बोलण्याअगोदर माझा होकार गृहीत धरून श्री अमोल शेरेकर कामाला लागले….
त्या रूमचे डिपॉझिट, मार्च महिन्याचे भाडे आणि किराणामाल भरून दिला आहे…. !
…. ही ताई स्वाभिमानाने एका कंपनीत आता छोटा जॉब करते, आज ३१ मार्चला तिचा पगार होईल…. !
कोणाच्याही आधाराशिवाय ती ताई तिच्या बाळासह स्वयंपूर्ण होईल….!
.. या ताईला मी सांगून ठेवलं आहे, बाळ जेव्हा शाळेत जायच्या वयाचं होईल, तेव्हा मला सांग. संपूर्ण शाळेची जबाबदारी आमची…. !
… कृतज्ञतापूर्वक ती म्हणाली, ‘ उद्या एक तारीख आहे. आज माझा पगार होईल, आता माझा बोजा कोणावर पडणार नाही. मी खूप खूष आहे…’ असं म्हणून ती ओक्साबोक्षी रडायला लागली… !
…. आज प्रथमच कोणीतरी रडत होतं आणि तरी मी मनापासून हसत होतो…. ! अर्थात हे सर्व श्रेय श्री. अमोल शेरेकर यांचं, मी फक्त माध्यम होतो…. श्री अमोल शेरेकर यांचा मला अभिमान आणि कौतुक आहे !
…. या तिघींच्याही मनात “आत्मविश्वासाचा ध्वज” उभारून दिला आहे….
…. “प्रतिष्ठेच्या पताका” दारात नाही… पण मनात लावल्या आहेत…
…. नवीन जोमानं आयुष्य जगण्याची “गुढी” आम्ही उभारून दिली आहे….
…. नुसतं “नवीन वर्ष” नाही तर त्यांना “नवीन आयुष्य” सुरू करून दिलं आहे…
…. त्यांच्या आयुष्यातल्या “कडू आठवणी”…. कडुनिंबाचं पान चावता चावता, कधी गोड होऊन गेलं कळलंच नाही…. !
अशात भर दुपारी आईचा फोन आला, ‘अरे, येतो आहेस ना ? किती उशीर ? आज गुढीपाडवा आहे… घरची पूजा तुझ्या वाचून खोळंबली आहे…! ‘
…. पूजा माझ्या वाचून खोळंबली आहे…??? मला गंमत वाटली….
‘अजून कुठली पूजा राहिली आहे ?’ मी आईला हसत म्हणालो.
‘ म्हणजे ?’ तिने भाबडेपणाने विचारले….
पूजा…पूजा…. म्हणजे काय असतं…. ?
पूजा ज्यावेळी भुकेत शिरते त्यावेळी ती “उपवास” होते….
पूजा ज्यावेळी अन्नात शिरते, त्यावेळी ती “प्रसाद” होते….
पूजा ज्यावेळी पाण्यात शिरते, त्यावेळी ती “तीर्थ” होते…
पूजा प्रवास करते, तेव्हा ती “वारी” होते….
पूजा घरात येते, तेव्हा ते घर “मंदिर” होतं….
पूजा जेव्हा डोक्यात शिरते तेव्हा ती “नामस्मरण” होते…
पूजा जेव्हा हृदयात शिरते तेव्हा ती “अध्यात्म” होते…
आणि पूजा जेव्हा हातात शिरते, तेव्हा ती “सेवा” होते… !!!
— आता अजून कुठली पूजा मांडू… ???
माझ्या या पुजेमध्ये आपण दिलेल्या समिधाच अर्पण केल्या आहेत…. आणि म्हणून भिकेच्या आणि लाचारीच्या दलदलीमधून बाहेर निघालेल्या, “त्या” जीवांनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रसाद, लेखाजोखाच्या रुपाने आपल्या पायाशी अर्पण करतो…. गोड मानून घ्यावा !
कोणत्याही आजारावर औषध नकोच….फक्त योग आसन….विश्वास ठेवा…..
सप्रेम नमस्कार….
मी डॉ .मनिषा सोनवणे…! मेडिकल डॉक्टर …. आणि योग शिक्षिकाही ……!!!
1999 साली डॉक्टर झाले तेव्हा असं वाटलं, की चला आता भराभर सगळे पेशंटस् बरे करण्याची आपल्याला जादुची छडी मिळाली….मी हवेत होते….
पण दवाखान्यात प्रत्यक्ष पेशंटस् चेक करायला सुरुवात केल्यावर माझे पाय जमीनीवर आले….
कित्येक आजारांवर allopathy मध्ये औषधं उपलब्धच नाहीत…. जी औषधे आहेत त्यांचे साईड इफेक्ट्स इतके की भी क नको पण…..! कितीही औषधं दिली तरी तात्पुरतं बरं वाटून पेंशंट पुन्हा काही दिवसांनी दारात हजर…. देणेक-यांसारखा….
मी खूप विचार करायचे, यावर काय उपाय करता येईल… ?
मी स्वतः आयुर्वेद पारंगत असल्यामुळे allopathy च्या जोडीला आयुर्वेदिक औषधंही देवू लागले….
आता फरक थोडा जास्त होता… पण चिवट आजार म्हणावे तसे काही पिच्छा सोडत नव्हते… पेशंटस्चा आणि माझाही….!
मग मी योगाचा आधार घेऊ लागले…. प्रत्येक आजारावर योगाचे एक आसन देऊ लागले… आणि काय आश्चर्य…. चिवट आजाराचा प्रत्येक पेशंट पुन्हा तोच आजार घेऊन यायचा बंद झाला की…. !
मग मी उलटा प्रयोग चालू केला… आजारांवर औषधी देण्याऐवजी मी फक्त योगाचे आसन सांगू लागले… आणि जवळपास प्रत्येक आजार हळुहळु बरा होऊ लागला… कुठल्याही गोळी औषधांशिवाय…
तशी मी डॉक्टर असूनही योग शास्त्रातली पदवी घेतली आहे, त्यानिमित्ताने या विषयाचा माझा ब-यापैकी अभ्यास झालाय. शिवाय मुळात डॉक्टर असल्यामुळे योग आणि शरीर शास्त्र यांची मी सांगड घालायला लागले….
मी प्रयोग करत गेले, आणि १० वर्षांच्या माझ्या या प्रयोगातून मी माझ्यापुरतं एक टेक्निक डेव्हलप केलंय Disease wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने ….
मग मी माझ्या पुण्यातल्या पाषाणच्या योगा सेंटरमध्ये केवळ Disease Wise Yoga किंवा आजारांनुसार योगासने घेवू लागले…. एकही औषध न देता…..
… डायबेटीस, हृदयाचे आजार, ब्लड प्रेशर, गुडघेदुखी, कंबरदुखी, सायटिका, फ्रोझन शोल्डर, अती चिंता, तणाव, डिप्रेशन, पी. सी. ओ.डी., महिलांचे इतर आजार यावर एकही गोळी न देता केवळ योगाची ठराविक आसनं घेऊन हे आजार बरे होतात यावर कुणाचाच विश्वास बसत नाही…. पण हे १०० टक्के खरंय…!!!
योगासन ट्रीटमेंटपूर्वीचे रिपोर्टस् आणि योगासन ट्रीटमेंटनंतरचे रिपोर्टस् यात जमीन अस्मानाचा फरक असतो…. आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे पेशंटस् च्या चेह-यावर रोगमुक्त झाल्याचं समाधान…. एका डॉक्टरला आणखी काय हवं असतं….?
आपल्या या प्राचीन योगशास्त्राला अनुसरुन आपण आपली जीवनशैली ठेवली तर, कदाचित कोणत्याही आॕपरेशनची भिती भविष्यात उरणार नाही….!
जुनाट सर्दी, दमा, वजन वाढवणं किंवा कमी करणं, थायराॕइड … हे फक्त योगासनाने शक्य आहे. ? होय आहे….यामागे शास्त्रीय कारणं आहेत…. म्हणून हे आजार फक्त आणि फक्त योग्य पद्धतीने करवून घेतलेल्या योगाच्या आसनाने बरे होतात….. १०० टक्के नाही… ११० टक्के …!!!
लोकांनी गोळ्या औषधींच्या नादी लागून हजारो रुपये घालवू नये….
गोळ्या औषधी घेऊन स्वतःच्या शरीराला प्रयोगशाळा बनवू नये…
एक आजार बरा करण्यासाठी इतर १० आजार मागे लावून घेऊ नयेत ….
याचसाठी हा सर्व लेखन प्रपंच …. !!!
तेव्हा चला …. योगासनाने सर्व आजार घालवू आणि तुमच्या सध्याच्या चालू असलेल्या गोळ्या औषधींना करु बाय बाय….कायमचा…..!!!
कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, ‘ माझी शेपूट हलवून बाजूला कर ‘ म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले. — — मी एकदा सोलापूर रस्त्याने संत श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटातून चिंचवडला इनोव्हा गाडीतून एकटाच परत येत होतो. संध्याकाळी ६ चा सुमार होता. हायवेला भांडगावच्या सोनाक्षी मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपत आले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता.
in न केलेला काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामीशी शबनम छाप झोळी.
म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार ? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू आणि तो हडपसरला भाड्याने रहात होता.
“ काय काय विकता ?”
“ बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.”
“ दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात ?”
“ तीन एकशे. पाच रुपयाला एक.”
“ ते कसे बनवतात ?”
— मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात. वगैरे वगैरे.
२ किलो साखर म्हणजे फार तर १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा .. दिवसाला. म्हणजे महिन्याला ??? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.
“ आणि बुडबुडे व फुगे कुठेत ?”
“ संपले.”
त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूपच मोठा होत चालला होता.
– “ इथे कसे काय ?”
“ लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉन्ट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. .”.. उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २-३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.
“ पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग ? तुम्ही तर एकाच ठिकाणी जाऊ शकता.” माझा चाणाक्ष सवाल.
“ मुलं ठेवली आहेत ना…” त्याचं शांत उत्तर. “ गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२,००० पगार देतो ….”
— मला यातून दोनच आकडे डोळ्यांसमोर नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०,००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. .. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा लाख्खो रुपयांच्यावर जातो.—
“ दिल्लीजवळ ७० किलोमीटरवर मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने तीन मजली इमारत आहे, ४ गाड्या आहेत ….”. बबलू सांगत होता, मी गाडी चालवत होतो. — —
या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच एक मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.
मी त्याच्याजवळ गेलो, विचारलं , “कुठे रहातोस ?”
तो म्हणाला : “हडपसरला.”
“ बबलूकडे का ?”
तो चकित. हो म्हणाला.
“ त्याला सांग काल तो ज्या गाडीने आला त्याचा “ड्रायव्हर” भेटला होता.”