मला ‘महिला दिन’ आला की दडपण येते… महिला दिनी मला काय वाटले पाहिजे, मी काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे म्हणजे महिला दिनाचा आनंद मला आहे असे प्रतीत होईल, हे मला कळत नाही. एकाहून एक सुंदर आणि कलात्मक banners, भावनेला हात घालणारे संदेश, स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारे लेख, ह्यांनी फोन भरून गेलेला असतो. ह्या दिवसाच्या निमित्ताने गोष्टींचा व्यापक आढावा घेणे, सिंहावलोकन करणे, हे कुठेच दिसत नाही. फक्त उत्सवी प्रक्षेपण दिसते.
वास्तविक भारत हा खूप मोठा देश आहे आणि ज्याला जसा पाहिजे तसा तो त्याला दिसतो. म्हणजे देशातल्या सर्व महिला आपल्या सारख्याच आहेत, असा भाबडा समज होऊ शकतो. खरं तर आपला देश म्हणजे वीसेक युरोपीय देशांचा ऐवज होय. तर मग वीस प्रदेश, त्यांच्या भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था – आणि ओघानेच तितक्याच प्रकारात मोडणाऱ्या महिला. त्यात भर म्हणून प्रत्येक प्रांतातले विविध स्तर – प्रिविलेज्ड क्लास, एन्टायटल्ड क्लास, अंडर प्रिव्हिलेज्ड क्लास, असे अनेक. शिवाय धर्म, जात इत्यादी वर्गीकरणं, ती तर आहेतच. ह्या व इतर प्रकारात मोडणाऱ्या महिला, त्यांच्या समस्या, कसोट्या, अडचणी एका सूत्रात बांधता येतील का? मग महिला दिन हा सगळ्यांसाठी एकच प्रकारात मोडेल का? मला जे वाटते तेच माझ्यापासून शंभर किलोमीटरवर राहणाऱ्या महिलेला वाटेल का? मग महिला दिन सामान्यकृत असू शकतो का?
काय केले किंवा कसे वागले म्हणजे आपण योग्य अर्थाने स्त्री म्हणून स्वाभिमानाने आणि आनंदाने जगू शकू? काय विचार केल्याने आपण खऱ्या अर्थाने मुक्त पण जबाबदारपणे आयुष्य जगू शकू? कुठल्या दिशेने आपल्याला ‘स्व’चा शोध होऊ शकेल? महिला म्हणून आपल्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत? त्याचप्रमाणे महिला म्हणून इतरांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?—- अनेक वर्षं शोषण व अन्याय सहन करणाऱ्या वर्गाच्या हातात अधिकाराचे बळ आले की तोच वर्ग तसेच शोषण आणि अन्याय करू लागतो हा अनुभव खरं तर बऱ्याचदा येणारा. मग आता स्त्रीच्या बाबतीतही ही अशीच व्याख्या होणार नाहीये ना? आपल्याला स्त्री म्हणून विशेषाधिकार हवा आहे का समानाधिकार? —– ह्या व अश्या अनेक गोष्टींचे विचार महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या डोक्यामध्ये येतात. त्यामधे एक भीती देखील वाटते….. स्त्रीची खरी अस्मिता आणि भावना या ‘ महिला दिना ‘च्या गलक्यात हरवत जात नाहीये ना? नाहीतर स्त्री समानता, स्त्रीमुक्ती, महिला सशक्तीकरण या चळवळी, फक्त दिसायला सुरेख असणाऱ्या banners आणि भाषिक सौंदर्य असणार्या संदेशापलीकडे जाऊच शकणार नाहीत !… असेही होऊ शकते की …
नवरा बायको, दोन मुलं वा एक मूल अशी साधारण कुटुंबाची हल्ली रचना आढळते. संयुक्त कुटुंब पद्धती आता कमी होऊ लागली आहे. या आगोदर कोणत्याही कारणाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सर्वस्वी सासरच्या किंवा माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागत असे. एका बाजूला तिची ते त्यांच्या परीने जबाबदारी उचलताना दिसत होते. दूसऱ्या बाजूला तिला कुणाकडूनही मदत न मिळाल्याने तिची खूप वाईट अवस्था होत असे. आता ही काही ठिकाणी हे पाहावयास मिळत आहे. सावित्रीजोतीबांनी शाळेची सुरुवात केली त्या काळात जे स्त्रीयांचे हाल होते ते आता कमी झाले आहे. तेव्हा पेक्षा बराच बदल झालेला आहे. त्यावेळी मुलींचे शिक्षण खूपच कमी असायचे अगदी वाचायला येण्या इतपतच होते. हल्ली मुलींचे माध्यमिक तसेत उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. त्यांचे स्वाभिमान, आत्मभान जागृत होताना दिसत आहे. अडथळे कमी झालेले नाहीत वा पुरुषसत्ताक/ पितृसत्ताक व्यवस्थेत खूप काही अफलातून बदल झालेले दिसून येत नाहीत, तरीही शिक्षणाने इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढला आहे असे म्हणता येईल. सावित्रीजोतीबांच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे हे फलित आहे. हे विसरुन चालणार नाही. कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची इच्छा प्रबळ होताना दिसते आहे. त्या प्रबळ ईच्छाशक्तीला सहकार्याची जोड म्हणावी तशी मिळत नाही. सगळेच अलबेला आहे असे नाही पण जात्यापासून काॕम्पुटर, स्मार्ट फोन पर्यंतचा तिचा प्रवास अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतही उठावदार झाला आहे.
बायका स्वबळावर कुणाचाही आधार नसताना खूप घडपडताना दिसतात. यात सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेद होऊ शकत नाही. करुच नये. प्रत्येक स्त्री स्वतःच्या कौशल्याचा कुटुंबासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
जोडीदाराचा अचानक मृत्यू झाल्यावर अथवा शेतकरी कुटुंबात व इतर व्यवसायात जोडीदाराने अनेक अडचणींना तोंड देताना आलेल्या मानसिक तणावाने स्वतःचे जीवन संपवलेले असले तरी या महिला हिंमतीने जगणं उभे करताना दिसतात. कोविडच्या काळात अनेक जणींनी जोडीदार गमावला. अशा एकल स्त्रीया न खचता पुर्णांगीनी होऊन आई व बापाची भूमिका निभावताना दिसतात. अजूनही पुनर्रविवाह म्हणावे इतके होत नाही. शिवाय विधूर पुनर्विवाहासाठी कुमारीच शोधताना दिसतात. विधवांच्या पर्यायाचा विचार पुनर्विवाहासाठी विधूर करीत नसतील तर त्यांना त्या अगोदरच्या आपत्यासहित स्विकारणे तर दूरची गोष्ट. अगदीच अपवाद म्हणून कुठेतरी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपत्यासहित विधवेशी लग्न करणारे दिसतात. फुलेंनी त्यांच्या काळात सुरु केलेले विधवा पुनर्रविवाह अजूनही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. पण विधवा बायका स्वबळावर ताठ मानेने जगताना दिसतात. किंवा काही महिला लग्न न करता अथवा लग्न राहून गेलेल्या स्वतःच्या हिंमतीवर जगताना दिसतात. हे चित्र माणूस म्हणून आनंदादायी आहे. अशांनाच मला पूर्णांगिनी म्हणायचे आहे.
माझ्या मते कर्तव्यतत्पर, निस्पृह, निष्कपट, निःस्वार्थी, परोपकारी, धेय्याला समर्पित, जगण्याची आस असलेले, मृदू पण तितकेच कठोर आणि कणखर ते नेहमी सुंदर…!
माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुंदर असलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. यांचे जोडीदार तसे नावापुरतेच जोडीला होते. काही करकोळ गोष्टी सोडल्या तर मुलं जन्माला घालण्यातच जोडीदाराचा काय तो सहभाग. अन्यथा संसाराचा गाडा या माऊलींनीच पुढे ओढत नेला. जोडीदार सोडून गेल्यावरही कोणत्याही प्रसंगाला बळी न पडता, सामाजिक व्यवस्थेला शरण न जाता, प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ जगण्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले. अतिशय कष्टाने, परिश्रमाने जीवनाची वाट चालत त्या जगण्यावर स्वार झाल्या. माणूस म्हणून अनेक प्रसंगाशी दोन हात करत स्वतःला जिंकत आल्या. अशा सखींचा मला खूप अभिमान आहे..! त्या खऱ्या अर्थाने पूर्णांगिनी आहेत. असे मला वाटते.
खरंतर शेतीचा शोध लावणारी, मातृत्व पेलणारी, संगोपन करणारी, समर्पणाने मानवी मुल्ये पेरणारी, शिवबा घडवणारी, वेळप्रसंगी युद्धात लढणारी, आणि युद्धापेक्षा बुद्ध मानणारी ती कधीच दुर्बल नव्हती. पण व्यवस्थेने तिला एकीकडे देवीचा दर्जा दिला त्याचवेळी तिला अबला, दुर्बल, दुय्यम ठरविले आणि तिच्यावर अन्याय होत गेला. सत्ता संपत्तीला खूप महत्त्व आले. क्रांती प्रतिक्रांती आणि परत क्रांती होत महिला सबलीकरण सुरु झाले. आता प्रत्येक जण महिलांना सक्षम करण्यात गर्क आहे. पण या सक्षम झालेल्या महिलांशी पुरुषांनी योग्य रीतीने वागावे यासाठी त्यांची मानसिकता घडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. ही आजची खंत आहे. म्हणून पुरुष सबलिकरणाची गरज भासू लागली आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमपणे उभी आहे. तिच्या शिवाय जन्मच नाही. पण तिची तारेवरची कसरत चालू आहे. मदतीचा हात तिला कुणाकडून मिळत नाही. तिच्या मनात दाटलेले काळे ढग कुणाला दिसतील का? तिने पापण्यांपर्यंत आडविलेला पाऊस कुणाला जाणवेल का ? वादळातही मन सावरुन इतरांसाठी झटणारी ती कधी कुणाला उमगेल का ? आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला वेळीच साथ मिळेल का ? का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे? मुक्त वावरावे अनिर्बध, स्वतःला शोधण्यासाठी?…..
ती म्हणेल कधीतरी तळमळून “नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण.” मग काय कराल ? माणूसपणाच्या सागरात तिलाही डुंबायचे आहे. त्यामुळे वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा नाहीतर विपरीत घडेल ! आई, आईपण दोन्ही गोठून जाईल !
ग्रामीण भागातील सखी तर कुणी कितीही पसरो, ती मुकाट्याने आवरत असते. काबाड कष्ट करून मुलांना वाढवते. जगण्याच्या शोधात कामानिमित्त रानोरान भटकते. अनेक संकटांना निमूटपणे सहन करते. मध्येच जोडीदाराचा साथ सुटला तरी हिंमतीनं पोटच्या मुलांसाठी झटते. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करताना दिसते. वेळप्रसंगी अनेकांच्या समोर पदर पसरते. पण हार मानत नाही. मनातली घुसमट कोंबून ठेवते. ठेच लागली तरी एकाचवेळी डोक्यावरील घागर आणि कडेवरचं तान्हुलं बाळ अलगद सावरताना दिसते. अनेक वेदना घेऊन हसणं जपून ठेवते. तिच्या समर्पणाची, कष्टाची, आणि सहनशीलतेची कला कुणाला कधीच जमणार नाही, असे मला वाटते. अशा माणसातील पूर्णांगिनी आईला मी मनापासून मनापासून सलाम् करते. शेवटी जाताजाता माझ्याच कवितेतून मला एवढेच म्हणावेसे वाटते की ……
☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
सर्व फ्यूज उडालेले बल्ब एक सारखेच असतात !……
एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महालासारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले. ते सेवा निवृत्त असले तरी, अजूनही स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं. ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतांनासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.
एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.
प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत.
ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे.” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.
बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.
ते म्हणाले, “सेवानिवृत्त झाल्यावर, आपण सगळेच फ्यूज उडालेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॅट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला.”
पुढे ते म्हणाले, “मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.
— आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, अगदी मलासुद्धा, पण मला माहीत आहे—-
“सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत – त्यांची वॅट क्षमता काहीही असो – 0, 10, 40, 60, 100 वॅट – आता त्याने काहीही फरक पडत नाही. आणि यामुळेसुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.
— आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते—
ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल.
उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात.
परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे.”
आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात.
या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो.
— लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.
— आज, आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा .
लेखक : जोशी काका
प्रस्तुती : सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. … आता पुढे)
त्याचदिवशी आमच्या गिरगावातल्या ठाकूरद्वार नाक्यावरचे इराणी हॉटेल ” सनशाईन ” चा शेवटचा दिवस होता. त्यानंतर ते हॉटेल कायमचे बंद होणार होते. आमच्या लहानपणीच्या कडक ब्रून मस्का पाव आणि मावा सामोसाच्या आठवणी त्या हॉटेलशी निगडित होत्या त्यामुळे माझ्या मित्रांबरोबर मॅरेथॉन मेडल मिळाल्याचे सेलिब्रेशन हे ठाकूरद्वारच्या सनशाइन इराण्याकडेच झाले.
४८ व्या मेडल साठी १० डिसेंबर २०२२ अभिजित भोसले, निखिल पोवार आणि मी असे आम्ही तिघे जण गोव्याला गेलो. ज्या ठिकाणी मी माझे पहिले मॅरेथॉन मेडल कमविले होते तेथे मधली कोरोनाची २ वर्षे सोडली तर दरवर्षी मी धावायला जात आलो आहे. अभिजित आणि निखिल पोवार ह्यांनी १० कि मी मध्ये भाग घेतला होता तर. मी २१ कि मी मॅरेथॉन धावलो. गोव्याचा धावण्याचा मार्ग हा चढ उताराचा असल्याने आणि तेथील हवेतली आद्रता जास्त असल्याने, तेथे धावताना चांगली वेळ देणं खूप कठीण असते तरीही मी ती मॅरेथॉन २ तास ५२ मिनिटात धाऊन पुरी करून माझे ४८ वे मॅरेथॉन मेडल मिळविले.
आता पुढची मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ ला होती ती, आपल्या भारतातली १ नंबरची मॅरेथॉन म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनसाठी धावायला खूप जण उत्सुक असतात पण सगळ्यांनाच धावायला मिळतेच असे नसते. त्याचे रजिस्ट्रेशन खूप आधी करायला लागते. ह्या नावाजलेल्या मॅरेथॉनसाठी ह्यावर्षी जवळ जवळ ५५००० जणांनी भाग घेतला होता. ह्या मॅरेथॉन मार्गात एक केम्प्स कॉर्नरचा ब्रिज काय तो चढ लागतो बाकी सरळ रस्ता, समुद्र किनारा, वांद्रे सी लिंक आणि हवेतील गारठा ह्यामुळे ह्या मॅरेथॉनला धावायला खूप मजा येते. धावण्याच्या मार्गात आम्हा रनर्सना चिअर अप करायला दुतर्फा खूप माणसे उभी असतात त्यामुळे धावायला जोर ही येतो. ह्यावर्षी वातावरणात अती थंडावा असल्याने आम्हां सगळ्या रनर्सना ह्या मॅरेथॉनचा चांगल्या तऱ्हेने आनंद घेता आला त्यामुळे हे माझे २१ कि मी धाऊन ४९ वे मॅरेथॉन मेडल मी २ तास ३२ मिनटात मिळविले. तेथेच गिरगांव चौपाटीच्या आयडियल हॉटेल मध्ये नेहमी प्रमाणेच माझ्या काही गिरगावातल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करून माझ्या ५० व्या मॅरेथॉन मेडल साठी सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा घेतल्या.
आता वेध लागले ते माझ्या ५० व्या मॅरेथॉनचे. १२ फेब्रुवारी २०२३ ला हिरानंदानी ठाणे हाल्फ मॅरेथॉन होती. माझे होम पीच. ह्यावेळेला गेल्या महिन्यांत माझ्याबरोबर गोव्याला धावलेला माझा मित्र निखिल पोवार हा ही धावणार होता. गोव्याला त्याची पहिलीच मॅरेथॉन तो दहा कि मी धावला होता पण हिरानंदानी मॅरेथॉनसाठी त्यांनी माझ्या आग्रहात्सव २१ कि. मी.मध्ये सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन हिरानंदानी इस्टेट पासून चालू होऊन ब्रह्माण्ड वरून हायवे क्रॉस करून खेवरा सर्कल, उपवन ते थेट येऊर डोंगरच्या पायथ्याशी जाऊन परत फिरते. तसे बघायला गेलो तर ह्या मॅरेथॉनचा मार्ग चढणीचा असल्याने मॅरेथॉनची चांगली वेळ नोंदवणे कठीण असते. पहाटे ५.३० ला मिलिंद सोमण ह्याने मॅरेथॉनला फ्लॅग दाखवून धावायला सुरवात झाली. निखिल आणि मी बरोबरीने धावत होतो. दोघेही एकमेकांना साथ देत होतो. काही वेळेला मी पुढे गेलो तर निखिल मागून त्याचा वेग वाढवून माझ्या बरोबर धावत होता. आम्ही दोघेही १६ कि मी पर्यंत पुरते दमलो होतो. निखिल तरुण वयाचा तिशीतला जरी असला तरी त्याच्याकडे धावण्याचा अनुभव कमी होता तर माझ्याकडे धावण्याचा दांडगा अनुभव जरी असला तरी वाढीव वयाचा अडसर होत होता. शेवटचे दोन किमी खूप थकायला झाले होते तरीही ही माझी ५० वी मॅरेथॉन मी २ तास २९ मिनिटांत पूर्ण केली आणि माझे ५० वे मेडल माझ्या गळ्यात पडले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला आला तरच जिंकला असे नसते तर स्वतःचा चांगला परफॉर्मन्स देणे म्हणजे जिंकल्यासारखेच असते आणि तो मी माझ्या ५० व्या मॅरेथॉनला दिला होता.
हे ५० वे मेडल म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. माझी ही सगळी ५० मेडल म्हणजे माझ्या तिजोरीतली नाही तर भिंतीवर प्रदर्शित केलेली माझी अनमोल संपत्ती आहे, जिची कधीही, कोणीही किंमत करू शकत नाही तसेच ती कोणीही माझ्यापासून चोरून किंवा हिरावून घेऊ शकत नाही. मॅरेथॉनचा ५० मेडलचा एक टप्पा मी पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १३ फेब्रुवारील मला ६२ वर्षे पूर्ण होणार होती त्याच्या एक दिवस आधी देवानेच मला मोठे बक्षीस मिळवून दिले होते, अर्थात ह्या मध्ये माझे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि रेषा चा हातभार खूप आहे. तुमचे माझ्यावरचे प्रेम आणि तुम्ही मला देत असलेले प्रोत्साहन, ह्यामुळेच मला धावायला अजून ऊर्जा मिळते.
… असेच माझ्यावरचे प्रेम तुमचे द्विगुणित होऊ दे आणि माझ्या धावण्यासाठी तुम्ही देत असलेले प्रोत्साहन मला मिळत राहिले तर पुढच्या पाच वर्षात माझे १०० वे मॅरेथॉन मेडल नक्की माझ्या गळ्यात असेल ह्याची मला खात्री आहे.
☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
२०२२ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच लिखाण बंद करून मॅरेथॉनसाठी धावायचा सराव चालू केला. एक महिन्यापूर्वीच डेंगू आजारातून बाहेर आल्याने धावतांना जरा अशक्तपणा जाणवत होता. सुरवातीला खूपच कठीण वाटत होते. लिखाणासाठी रात्रीचे जागरण करायची सवय झाल्याने पहाटे पाच वाजता उठून धावायला जाणे जरा कठीणच जात होते, धावायला सुरवात केल्यावर जरा २०० मिटर ते ३०० मिटर धावल्यावर दमायला होत होते. पहिला आठवडा जरा तणावातच गेला. १६ फेब्रुवारी २०२० ला ठाण्यामध्ये ठाणे हिरानंदानी ही शेवटची २१.०२ किलोमीटर ची मॅरेथॉन धावलो होतो, त्यांनतर मार्चपासून लॉकडाऊन चालू झाले आणि आणि पुढची अडीच वर्षे म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकही मॅरेथॉन झाली नाही आणि मॅरेथॉन नसल्याने धावायची सवयही गेली होती. ह्या लॉकडाऊन काळात खूप लिखाणआणि चालणे झाले, तरी धावणे मात्र बंद झाले होते.
ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला, २० नोव्हेंबर २०२२ ला नेव्ही मॅरेथॉन मुंबईचा मेसेज आला आणि डोक्यात परत मॅरेथॉन धावायचे चक्र चालू झाले. मनात मॅरेथॉन धावायचे येणे आणि प्रत्यक्षात मॅरेथॉन धावणे ह्यातले अंतर कितीतरी कोसाचे आहे. तरीही दुसऱ्याच दिवशी पहाटे ५ वाजता उठून साडेपाचला धावण्याच्या सरावाला सुरवात केली. वाटले होते तेवढे सोप्पे नव्हते. जरा धावलो तरी थकायला होत होते. धावायचा सराव नसल्याने सगळेच अवघड वाटत होते. सुरवातीचा आठवडा असाच, नुसते सकाळच्या चालण्यातच गेला.
रोज डोळ्यासमोर आधी मिळालेली मॅरेथॉन मेडल्स दिसत होती. वयाच्या ५४ व्या वर्षी धावायला सुरवात करून डिसेंबर २०१४ ला गोव्याला १० किलोमीटर धाऊन मिळालेले माझे पहिले मॅरेथॉन मेडल मला खुणावत होते. त्याच्या बाजूला असलेले जानेवारी २०१५ ला स्टॅंडर्ड चार्टर्ड २१ किलोमीटर धावलेले मेडल मला स्फूर्ती देत होते. गेली दोन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा झाल्या नसल्यातरी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळालेली सगळी मिळून ४६ मेडल्स आणि दोन ट्रॉफी ह्यांचे प्रत्येकाचे एक स्वतःचे वजन होते, स्वतःचा संघर्ष होता, स्वतःची अशी एक गोष्ट होती. त्या प्रत्येक मेडल्सनी त्यांच्यासाठी मी घेतलेली मेहनत जवळून नुसती बघितली नव्हती तर त्यांनी माझ्या बरोबर ती अनुभवली होती आणि माझ्या प्रत्येक सेलिब्रेशनला माझ्या गळ्यात राहून मला साथ दिली होती. ती मेडल्स मला जोशात सांगत होती, “थांबू नकोस, हार मानू नकोस अजून ४ मेडल्ससाठी मेहनत घे म्हणजे आमचा ५० चा अर्ध शतकाचा टप्पा गाठल्याचे आम्हांला समाधान मिळेल.”
मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी धावायला निघालो पण गती काही मिळत नव्हती. एखादे किलोमीटर धावलो तरी थकायला होत होते. ऑक्टोबर २०२२ महिन्याच्या मध्यावर आलो तरी मनासारखे धावणे होत नव्हते. २० नोव्हेंबरला आता एकच महिना उरला होता. २१ किलोमीटर मॅरेथॉन न करता १० किलोमीटर धावावे आणि एक मेडल घेऊन यावे असे मनात आले होते पण त्याच वेळी एकदा का १० किलोमीटर धाऊन खालच्या पायरीवर आलो तर परत २१ किलोमीटर धावणे कधीच जमणार नाही ह्याची भीती होती आणि… आणि शक्य होईल का नाही ह्याचा काहीही विचार न करता, जो वेड्यासारखा विचार, वयाच्या ५४ व्या वर्षी २०१४ ला केला होता त्याचेच पुन्हा अनुकरण करून नेव्ही मॅरेथॉन २१ किमी धावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. आता काहीही झाले तरी २१ किलोमीटर धावयाचेच असे मनाशी पक्के केले आणि दुसऱ्या दिवशीपासून जोमाने सरावाला सुरवात केली.
२०१४ ला धावणे जसे चालू केले होते तसेच म्हणजे हळूहळू दर दोन दिवसांनी, एक तर किलोमीटरमध्ये एक एक किलोमीटरची वाढ करायची किंवा किलोमीटर सारखे ठेवून, कमी वेळेत ते पार करायचे. असे करत पुढच्या १५ दिवसांत मी १० किलोमीटर पर्यंत पोचलो आणि माझा २१ कि मी धावण्याचा हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला. पहिल्यासारखे जलद धावणे जमत नसले तरी २१ कि मी मॅरेथॉन मी पुरी करू शकतो ह्याची मला खात्री आली.
२० नोव्हेंबरला २०२२ नेव्ही मॅरेथॉन मुंबई, मी २१ कि मी धावायला सुरवात केली. सुरुवातीचे काही कि.मी. मी जोरात न पळता मध्यम गतीने धावत होतो. शक्तीचा जोर लाऊन धावायचे मी टाळत होतो. १५ किलोमीटर पर्यंत मला कसलाही त्रास नव्हता. थकायला झाले होते पण जिद्दीने मी स्वतःला पुढे नेत होतो पण १६ व्या कि मी नंतर अंगातली शक्ती गेली आणि पुढचा ५ कि मी चा रस्ता मला खुप कठीण गेला. कसे बसे मी २१ किलोमीटरची अंतिम रेषा गाठली तेव्हा वेळ नोंदवली गेली, २ तास ५५ मिनिट्स. आत्तापर्यंतच्या माझ्या मॅरेथॉन धाऊन नोंदविलेल्या वेळेचा तो नीचांक होता. माझे ४७ वे मॅरेथॉन मेडल माझ्या गळ्यात घातले गेले. ह्या ४७ व्या मेडलचे महत्व माझ्यासाठी, माझ्या २०१४ च्या पहिल्या मेडल सारखेच होते, फरक फक्त वयाचा होता आणि वयानुसार मिळालेल्या टायमिंगचा होता. माझे पहिले २१ कि मी मॅरेथॉन मी २ तास १४ मिनिटात पुरे केले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण कसे धावतो ह्याला महत्व नसते तर तेथे जायचे, धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते.
☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
माणसाचे नाव आणि माणसाचा पोशाख ही त्या व्यक्तीची पहिली ओळख असते. केवळ पोशाखावरूनच त्याची जात, भाषा, प्रांत राष्ट्रीयत्व तसेच जीवन पद्धतीचाही अंदाज बांधता येतो.
भारतामध्ये विविध पोशाख परिधान केले जातात. पुरुषांचे वेगळे, स्त्रियांचे वेगळे. सदरा लेंगा किंवा धोतर आणि नऊवारी साडी म्हटलं की लगेच पारंपारिक महाराष्ट्रीयन स्त्री— पुरुष नजरेसमोर येतात. सलवार-खमीस, घागरा—ओढणी, उलट्या पद्धतीची गुजराती साडी, दाक्षिणात्य पद्धतीचे विशिष्ट पोशाख, काठीयावाडी, राजस्थानी कितीतरी प्रकार! अनेक रंगी, कलाकुसरींचे. वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख.पोशाख हा नुसता कपड्यांपुरताच मर्यादित नसतो, तर त्या त्या पोशाखावर साजेसे असे अलंकारही त्यानिमित्ताने घातले जातात. आणि त्यामुळे अंगावर घातलेल्या कपड्यांची शोभा, लज्जत ही वाढते. अशा परिपूर्ण पोशाखातील व्यक्ती ही आकर्षक, प्रसन्न भासते. नीटनेटक्या पोशाखातल्या व्यक्तीचा सामाजिक प्रभाव हा लक्षवेधी असतो.
कुणी कुठला पोशाख घालावा याबद्दलही आपले अगदी पूर्वापार संकेत आहेत. नेत्यांचा वेश, समाजसेवकांचे कपडे, कलाकारांचे कपडे, संगीतकाराचा पोशाख, कचेरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेश, क्वचित कधीतरी ड्रेस कोड,(शर्ट,पँट,टाय किंवा पारंपारिक पोशाख),शेतकरी,गुराखी, सणासमारंभाचे पोशाख, शाळेत जाणाऱ्या मुलांचे गणवेष हे सारे ढोबळ मनाने ठरलेलेच असतात. आणि सर्वसाधारणपणे याच प्रकारची वेशभूषा सामाजिक स्तरावर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, परिधान केली जाते.
पोशाख आणि वय याचाही संबंध आहेच.कुमारवय, तरुण, वृद्ध अशी विभागणी पोशाखाच्या बाबतीतही होतेच. आणि व्हायलाही हवी. जे कपडे तरुणपणी शोभतात ते म्हातारपणी अशोभनीय वाटू शकतात. सहजच आपण बोलतोच की “असे कपडे वापरताना जरा वयाचा तरी विचार करायचा ना?
काहीजण मात्र बिनधास्त, बेलाशक पणे भडक, चित्रविचित्र कपडे घालण्यास मागेपुढे पहात नाहीत. वयाचा विचार करत नाहीत. पण कधी कधी या लोकांना अशाच वेशात बघण्याची, बघणाऱ्यांना ही सवय होऊन जाते.
खरोखरच विशिष्ट पोशाखावरून माणसाची एक विशिष्ट प्रतिमाही निर्माण होत असते. जागतिकीकरणामुळे मात्र आता “ड्रेसेस” या विषयात प्रचंड उलथापालथ झालेली आहे.
पाश्चिमात्य कपड्यांचा दिमाख, सुटसुटीतपणाच्या नावाखाली सर्रास दिसू लागला आहे. बदलत्या काळा नुसार, जीवनपद्धतीनुसार पोशाखातला बदलही तसा स्वीकृतच आहे. पण त्यात केवळ अनुकरण नको. जो वेश आपण घालू, तो तितकाच सहजपणे आपल्याला निभवताही आला पाहिजे याचेही भान ठेवायला हवे.
स्त्रियांमध्ये पारंपारिक नऊवारी साडी हा आता कधीतरी हौसेने, खास प्रसंगी नेसण्याचाच प्रकार उरला आहे. फार कशाला?.. साडीची जागा सलवार-कमीसने अगदी सहजपणे बळकावली आहे. टाॅप आणि जीन्स वरचढ झालेत.
आजकाल विनोदी ,हसवणुकीचे कार्यक्रम म्हटले की पुरुषांनी स्त्रियांच्या वेशातच पेश होणे. हे विडंबनही नकोसेच वाटते.विकृत,अतिरंजीत ,अश्लील वाटते.
पोशाखातले विविध बदल आता समाजाच्या अंगवळणी पडूच लागलेत. त्याविषयी हरकत घेण्याचे ही काही कारण संभवत नाही. पण गैर एका गोष्टीचं वाटतं— ज्यात केवळ परदेशी अनुकरण आहे, ते म्हणजे उद्युक्त करणारे, लांडेबांडे, तोकडे, शरीर प्रदर्शन करणारे अपुरे पोशाख! कितीही डोळे झाक करायची म्हटली तरीही यामुळे आपल्या संस्कृतीतले काहीतरी घसरत चालल्यासारखे वाटते या पोशाखांमुळे. “शेवटी ज्याची त्याची निवड”,” ज्याची त्याची मर्जी” किंवा “उगीच काकू बाईचा शिक्का नको बसायला” म्हणून हट्टाने केलेला उपद्व्याप असेही असेल. दृष्टीचा ही दोष असेल. ज्या पोशाखात, आपण एखाद्या युरोपियन स्त्रीला बघू शकतो तर भारतीय नारीला का नाही? असा प्रश्न येऊच शकतो. कशासाठी या संस्कृतीच्या भिंती?—-
—— पण तसं नाही. या नुसत्याच संस्कृतीच्या भिंती नाहीत, तर ती सभ्यतेची कवच कुंडले ही आहेत.
नेहमीच दूरचे डोंगर साजरे दिसतात का?
मी अमेरिकेत असताना तिथली एक तरुणी मला म्हणाली होती,
” आंटी ! मला तुझ्यासारखी साडी नेसायला शिकवशील का? मला तुझा हा ड्रेस (साडी) फार आवडतो. तू यात किती सुंदर दिसतेस !”
—- नेमकं मला हेच म्हणायचे आहे. कपडे घाला कोणतेही ! पण समोरच्या व्यक्तीने अगदी सहज, मनापासून म्हटलं पाहिजे,
☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
‘रघुवंश’ काव्यात कालिदासानं शरद ऋतूच्या आगमनाची खूण सांगितली आहे. शरद ऋतू सुरू झाला. त्याने पुंडरीकरूपी छत्र आणि काशतृणरूपी चामरे धारण केली.. पुंडरीक हे कमळ पावसाळा संपला की फुलू लागते. काश नावाच्या तृणास फुले येतात.
कवी अनिलांच्या तोंडून ‘शरदागम’ ही कविता मी अनेकदा ऐकली आहे. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा, या शरदागमाच्या खुणा आहेत. साचून राहिलेल्या गढूळ पाण्याचे हळूहळू निर्मळ जळात रूपांतर होतंय आणि त्या आरशात डोकावून बाभळी आपलं सावळं रूप पाहतात. ज्वारी टवटवली आहे. काळी आता काळजी करते, की अजून कापूस का फुलत नाही? त्यासंबंधी अधिक चौकशी करायला निळे तास पक्षी खाली उतरतात. कुणीतरी शेवंतीच्या कानात सांगतं, अजून तुझी वेळ आलेली नाही. गवत अजून हिरवे आहे. त्याचे पिकून सोने होण्याआधी पिवळ्या फुलांची घाई करू नकोस. अनिलांच्या कवितेतली ही चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली की समजायचे, ऋतुराज शरदाचे आगमन झाले.
मोगरा आणि कुंद यांनी बरोबर सहा-सहा महिने वाटून घेतले आहेत. जानेवारी ते जून हे मोगर्याचे दिवस. जुलै ते डिसेंबर हे कुंदाचे दिवस. शरद ऋतू हा कुंद, शेवंतींच्या बहरण्याचा ऋतू आहे. काश या गवताची ओळख करून घ्यायला मी उत्सुक आहे. उसासारखे सुंदर तुरे येणारे ते गवत असले पाहिजे.
शरद ऋतूचे वर्णन असलेल्या वसंत बापटांच्या ‘निचिंत’ या कवितेत काश फुलांचा उल्लेख आहे. बापट असतानाच त्यांना विचारायला हवे होते. बापटांची ‘सेतू’ ही प्रसिद्ध कविता शरद ऋतूची आहे. तिच्यातल्या प्रतिमा एकावेळी निसर्ग आणि प्रेयसी दोहोंनाही लागू पडणार्या आहेत. किंबहुना शरद ऋतूतील पहाटच सेतू होऊन कवीला ‘तिच्या’कडे घेऊन जात आहे. …..
‘ही शरदातील पहाट…. की…. तेव्हाची तू?
तुझीया माझीया मध्ये पहाटच झाली सेतू’
….‘सेतू’ ही माझ्या वाचनातील शरद ऋतूवरील सर्वांत सुंदर मराठी कविता आहे.
जिला मी दुसरा क्रमांक देईन ती इंदिरा संतांची कविता शरदातली दुपार चित्रांकित करते. ही निळी पांढरी शरदातली दुपार कशी आहे? तर तिचे ऊन तापलेल्या दुधासारखे हळूवार आहे. सव्वीस ओळींच्या मोठय़ा कवितेत शरदातील निसर्गाचे सुंदर तपशील आहेत. आणि हा शेवट…..
‘का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी?
का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी?
का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती?
रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती?
दिस भरलेली ही काय तरी गर्भार
टाकीत पावले चाले रम्य दुपार!’
मराठी कवींप्रमाणे संस्कृत कवींनाही शरद ऋतू तितकाच प्रिय आहे. महाकवी कालिदासाला तो ‘रूपरम्या नववधु’सारखा सुंदर, टवटवीत वाटतो. ‘किरातार्जुनीय’ या भारवीच्या महाकाव्यात यक्ष अर्जुनाला म्हणतो, ‘हे अर्जुना, हा शरद ऋतू फलदायक असून तो परिश्रमांचा मोबदला फुलांच्या रूपाने देतो. या ऋतूत नद्या, सरोवर यांचे जल स्वच्छ व नितळ असते. मेघ शुभ्र असतात. असा हा शरद ऋतू तुझ्या सफलतेचे व्रत वृद्धिंगत करो !’
पूर्णता आणि परिपक्वता यांची प्रतिमा होऊन शरदातले मेघांनी धुतलेले आकाश रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक कवितांतून येते. पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या ‘मुक्काम शांतिनिकेतन’ मध्ये आश्रमातल्या शरद ऋतूचे वर्णन केले आहे, तेही रवींद्रनाथांच्या पत्राद्वारा. भानूसिंहेर पत्रावलीच्या अकरा क्रमांकाच्या पत्रात गुरुदेव लिहितात, ‘आज बागेत हिंडताना मालती फुलांचे हे ‘अनुप्रास’ पाहायला मिळाले.’
शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. आकाशातली निळाई हळूहळू स्पष्ट आणि गडद होते. तारांगण निरखावे शरदाच्या रात्रीच. या रात्रीही मोठय़ा असतात. इतर कोणत्याही ऋतूंना रात्रीच्या सौंदर्याचं हे वरदान नाही, म्हणून तर कालिदासाने या ऋतूतील रात्रींना ‘ज्योतिष्मती रात्र’ म्हटलं आहे. शरदात येणारे सणदेखील रात्रींशी निगडित आहेत. कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळी हे रात्रीचेच उत्सव आहेत.
चकोर पक्ष्याचं मला भारी आकर्षण वाटायचं; पण तो म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू किंवा परीस यांसारखी कवीकल्पनाच असावी, असा समज. शरद ऋतूच्या चंद्रकलेचे कोवळे अमृतकण चकोर खातो. याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात येते.
मारुती चितमपल्लींनी चकोर नाकारला तर नाहीच; पण त्याचे विज्ञान सांगून कवीकल्पनेला शास्त्रीय पुस्ती जोडली आहे. शरद ऋतूत चकोरीची पिल्ले तिच्याबरोबर जंगलात फिरत असतात. वाळवीच्या किड्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून वारुळातून वाळवी रात्री बाहेर पडते. आपल्या पिलांची जलद वाढ व्हावी म्हणून चकोरी पिलांना वाळवी चारते. शरद ऋतूतल्या चंद्राच्या प्रकाशात चकोराला वाळवी सहज दिसते. हे दृश्य पाहून कवींना वाटते, की चकोर चांदणेच टिपत आहेत ! मी ग्रंथप्रेमी असल्याने वाळवी खाणार्या चकोरांबद्दल आता कृतज्ञता वाटते.
शरदातल्या चंदेरी रात्री जेवढय़ा सुंदर, तेवढाच शारद रात्रींतला अंधारही प्रियतम आणि मोहमयी असतो. अंधार ही प्रेम करण्यासारखीच गोष्ट आहे हे शरदातल्या रात्रीच पटते, हे अरुणा ढेरे यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी खरे आहे….
‘पर्वतों के पेडों पर शाम का बसेरा है.
चंपई उजाला है, सुरमई अंधेरा है !’
…. हे साहिरचं वर्णन एखाद्या शारद सुंदर रात्रीलाच उद्देशून असलं पाहिजे. सुरम्यासारखा अंधार ! व्वा ! कोजागिरीची रात्र म्हणजे चंपई उजाला आणि दिवाळीची रात्र म्हणजे सुरमई अंधेरा !
शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हींव’ शिलंगणावरून परत येताना आपल्यासोबत गावात, घरात येतं आणि हिवाळा सुरू होतो. याच शरदऋतूत विश्वामित्राचा उन्हाळाही होऊन जातो, त्यालाच अलीकडे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतू.
लेखक : -प्रा. विश्वास वसेकर
लेखक साहित्यिक आहेत.
प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
मराठी मातृभाषादिनाच्या निमित्ताने…..
फेसबुक, व्हाॕटस् अॕपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी, तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.
स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे.
आतपुढ (आले तसे पुढे ढकलले) ही व्हाॕटस् अॕप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात.
आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हेही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे.
आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल, त्यांना याविषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.
त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते !
याला काय करायचे ! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो, इंग्रजी असो, वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा.
लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते !
समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘काॕपी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे.
लेख लिहिताना, ‘घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते’ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे’ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे, हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजीकाट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर’, ‘उसमे क्या है’, ‘उससे क्या फरक पडता है’, ‘चलता है याsर’, ‘टेक इट ईझी’ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचूकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य आहे.
अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.
मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही किती परकीय शब्द, किती ऊर्दू , किती इंग्रजी शब्द!
इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’ , please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?
आपली दैनंदिन विचारविनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी, येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?
एका हिंदी लेखातील अवतरण…
… ‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोगमें लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजीके शब्द बोलते है। हर हिंदीप्रेमी इस लेखको पढ़नेके बाद अपने मित्रोंके साथ साझा अवश्य करे। ‘
अवतरण समाप्त
आपण मराठीतही अनेक उर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का, की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा, ह्या सूचनेचा.
अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, अभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग?
समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेवून आता इथेच थांबणे उचित समजतो.
व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर ! तो पर्यंत नमस्कार !!
लेखक:- दिवाकर बुरसे, पुणे
व्हाॕटस् अॕपः ९२८४३००१२५
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मूलभूत पायर्या.
एकाच जोकवर आपण परत परत हसत नाही. तर मग एकाच दुःखावर आपण परत परत का रडतो?
कधी विचारलं आहे आपण स्वतः ला की आपण एकाच दुःखावर वारंवार का विचार करतो, आणि जर करतोय हे जाणवते आहे तर मग त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः ची मदत कशी आणि किती करतोय?
मानसोपचाराच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे सतत काम करताना मला ही गोष्ट नेहमीच जाणवत राहिली की आपण सगळेच आपल्याला किती आणि कसा त्रास होतोय, कोणामुळे होतोय हे पुनःपुन्हा बोलत असतो आणि त्या प्रत्येक वेळी पुनःपुन्हा स्वतः ला नकारात्मक विचारांमधे घेऊन जात असतो. हे अगदी नकळतच होते, पण त्याने त्या प्रत्येक वेळी होणारा त्रास मात्र अधिकाधिक वाढतच राहतो हे लक्षात येत नाही.
भावनिक त्रास कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण किती दुर्दैवी आहोत, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे, कोणी आपला किती छळ केलाय, आपणच किती भोगलय, किती असह्य झालय आणि आपला कसा बळी गेलाय किंवा आयुष्याची कशी माती झालीय त्यामुळे आता काही होऊ शकणार नाही इत्यादी…… सगळे स्वतः ला सांगणे पुर्णपणे बंद करणे.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला हेच तर जमत नाही, हे विचार बंद करणं इतक सोपं असतं तर मी केव्हाच केलं असतं ना असेही स्वतः ला सांगणे थांबवले तरच एक पाऊल पुढे म्हणजेच प्रगतीच्या, भावनिक सौख्याच्या दिशेने जाता येईल.
स्वतः ला आपणच देत असलेले नकारात्मक संदेश बंद करणे ही उपचाराची पहिली पायरी म्हणूया.
मग दुसर्या पायरीवर काय येईल तर आपण स्वतः ला काय सांगावे याचा सराव करणे. हा सराव तुम्हाला रोज काही सकारात्मक तार्किक विचार लिहून करता येतो आणि दीर्घ श्वसन करून शांत झालेल्या मनालाही स्वयं सूचना देऊन करता येतो.
१. मी एक सामान्य व्यक्ति आहे जी नकारात्मकतेकडे जाऊ शकते, खचू शकते, दुखावली जाऊ शकते. पण तरीदेखील हे दुःख म्हणजे माझे सर्व आयुष्य नसून हा माझ्या आयुष्यातला एक छोटासा हिस्सा आहे, ज्यातून मी अगदी सहजपणे बाहेर पडू शकेन.
२. माझा स्वतः वर ठाम विश्वास आहे की मी प्रत्येक संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू शकेन.
३. कोणत्याही दुःखाचा माझ्यावर अंमल चढू न देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची मानसिक शारीरिक ताकद माझ्यात आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे.
४. ज्या गोष्टी चे दुःख, त्रास आहे ती सोडून माझ्या आयुष्यात इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि प्राधान्य आहेत ज्यावर मी माझे लक्ष केंद्रित करून तिथे माझी शक्ति वापरून त्यातला आनंद वाढवू शकेन.
५. कोणी माझ्याशी कसे वागले याचा विचार करण्यापेक्षा मी नको असलेल्या, इतरांच्या नकारात्मक वागण्याला महत्व न देणे यावर माझा पूर्ण ताबा आहे.
६. भूतकाळात जे काही घडले त्यावर मात करून वर्तमानात जगण्याची आणि त्यातून आनंद मिळवण्याची क्षमता माझ्यात आहे.
आता तिसरी पायरी म्हणजे या विचारांचा लिहून आणि स्वयंसूचना देऊन अगदी नियमितपणे श्रद्धेने सराव करणे. करताना मात्र याचा कधी फायदा होईल, होईल की नाही, किती दिवस करावे लागेल असे जर पुन्हा नकारात्मक विचार केले, तर मग जे काही कराल त्याचा फायदा मिळत नाही. खूप प्रयत्न केले पण आमचा त्रास कमी होत नाही असे जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा त्यामागे मूळ कारण हे आहे की प्रयत्नांमध्ये सातत्य नसते, विश्वासाचा अभाव असतो आणि जे प्रयत्न आहेत त्याबद्दल साशंकता असते.
जर योग्य दिशेने, योग्य प्रमाणात, संपूर्ण सकारात्मकतेने प्रयत्न केले तर नक्किच आहे त्या भावनिक त्रासातून बाहेर पडता येईल हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे या प्रामाणिक उद्देशाने लिहिलेला हा लेख.
धन्यवाद .
लेखिका : सुश्री पल्लवी पाटणकर
(Psychotherapist)
संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈