मनमंजुषेतून
☆ घाई करताना… – सौ.विदुला जोगळेकर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆
फार घाई होते हल्ली… प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई… क्षण फुकट वाया गेला म्हणून… लगेच गळे काढायची पण घाई…माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…ते पटकन जगाला दाखवायची घाई….जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….
नजरेत दृश्य येताक्षणी कँमेऱ्यात बंद करायची घाई…विचाराचा कोंब फुटता क्षणी, कृतीत उतरायची घाई…
फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….
मे मधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!…. चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई….. बालांना किशोर व्हायची घाई…किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर….. काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई… दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई… प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई… श्वास थांबताक्षणी श्रद्धांजली वाहायची सुद्धा घाई…! …. मुक्कामाला पोहचायची घाई….कामावरुन निघायची घाई… सिग्नल संपायची घाई….पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…सगळंच पटकन उरकायची घाई…आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई… आठ दिवसांत वजन कमी करायची घाई… महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….! पाच मिनिटात गोरं व्हायची घाई… पंधरा मिनिटात केस लांब व्हायची घाई… एक मिनिटात वेदना शमवायची घाई… एनर्जी ड्रिंक पिऊन वडीलधाऱ्यांना दमवायची घाई…….
साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई… .. भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….
.. मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!
घाईघाईने मारलेल्या उड्या
कमी कर रे माणसा थोड्या
बुद्धीपेक्षाही आहे काळ मोठा
कधीतरी जाण वेड्या…
लेखिका : सौ विदुला जोगळेकर
संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈