श्री संभाजी बबन गायके
मनमंजुषेतून
☆ “अनंतकाळच्या माता !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
ती त्याच्यापेक्षा सुमारे बारा वर्षांनी धाकटी. त्याची पहिली बायको वारली म्हणून हीची आणि त्याची लग्नगाठ बांधली गेली. खरं तर असं दुसरेपणावर तिला कुणाच्या घरात जायचं नव्हतं. पण त्याला नववधूच पाहिजे होती. पण हिच्या घरात तिच्या मागे लग्नाच्या प्रतीक्षा यादीत आणखी दोघी होत्या. ही गेल्याशिवाय त्यांना पुढे येता येत नव्हते. आणि तो तर एका कारखान्यात पर्मनंट! हा शब्द म्हणजे आर्थिक स्थैर्य हमी. शिवाय तो एक बरे, त्याला प्रथम विवाहातून काही अपत्य नव्हते. यातून ती त्याची बायको झाली. आणि एक adjustment संसार सुरू झाला! आधीच बायकोला पायीची वहाण समजण्याची वृत्ती त्यातून ती वयाने लहान असल्याने तो तिचा नवरा कमी आणि मालक किंवा पालक अशा भूमिकांत जास्त जाई. तरी पण त्याने तिला भरपूर सुख दिलं असं ती आज तिच्या सत्तरीतही हसून सांगत असते. सुख म्हणजे काय.. तर पाणी भरण्याचे! तिच्या वस्तीत पाणी येत नसे. तो रात्री कामावरून आल्यानंतर दूरवरून कॅन भर भरून पाणी आणून देई. आणि येताना त्याचेही ‘पाणी’ग्रहण करून येई. तसं वस्तीत एक नळकोंडाळे होते… पण आपली आपल्यापेक्षा तरुण बायको लोकांच्यात जाणे त्याला पसंत नसे! तिने कुणाशी बोललेलं त्याला खपत नसे.. पदर डोक्यावरून जराही ढळता कामा नये! डोक्यावर खिळा ठोकून ठेवीन पदर अडकवून ठेवायला.. असा दम तो तिला द्यायचा! पण तशातही ती राहिली. चार घरची कामं धरली आणि वर्षानुवर्षे टिकवली.. त्यातून संसाराला जोड मिळाली.
मद्यपान आणि धूम्रपान ही खाण्याच्या पाना सारखी किरकोळ व्यसनं वाटून घेतात लोक. त्याचे दुष्परिणाम थेट रक्तवाहिन्या निरूपयोगी होण्यापर्यंत होतो.. हे पाय amput केल्यावरच समजते अनेकांना. कारण तोपर्यंत रक्तात स्वभावात नसलेला गोडवा रुतून बसलेला असतो!
त्याचे पायाचे एक बोट काढले आरंभी आणि पुढे गुडघ्यापर्यंत प्रकरण गेले. आता सर्वकाही बिछान्यावर. दुसरे बालपण सुरू झाले होते. ती मात्र लहान होऊ शकत नव्हती. किंबहुना महिलांना आणि विवाहित महिलांना उतारवयात लहान होण्याची परवानगी नसते आपल्याकडे. मुलगी, सून, नात इत्यादी नाती रुग्णाची ‘ ती ‘ सेवा नाही करू शकत सहजपणे. हल्ली मेल नर्स, डायपर इत्यादी सेवा सशुल्क उपलब्ध आहेत. पण हे शुल्क ज्यांना देता येत नाही, तिथे ही क्षणाची पत्नी अनंतकाळच्या मातेच्या भूमिकेत जाते.. असे दृश्य सर्व रुग्णालयांत सर्रास दिसते! काय असेल ते असो… पण क्षणाचा पती अनंतकाळचा पिता झाला आहे.. असे अभावाने दिसते! स्त्रीच्या या वर्तनात तिच्या हृदयात तिच्या जन्मापासून घर केलेलं मातृत्व असतं. आयुष्यभर किमान सार्वजनिक जीवनात राखलेलं शारीरिक अंतर, लज्जा इत्यादी इत्यादी रुग्णालयात विस्मृतीत टाकले जाते. आपल्या माणसाची कसली लाज? अशी विचारणा एक बाईच करू जाणे! यात वेदनेमुळे, पुरुषी अहंकारामुळे आणि सवयीने पुरुष या ‘ मातां ‘ वर खेकसतना आढळतात… माता मात्र वरवर हसून आणि मनातून खट्टू होऊन वेळ मारून नेते! अर्थात ही बाब सर्वच जोड्याना लागू होत नाही. काही अनंत काळचे बाबा मी पाहतो आहे आजही.
आपली ही कथा नायिका त्याच्या शिव्या, ओरडा खाते आहे आजही. पण आपले कुंकू शाबूत राखण्यात तिला जास्त रस आहे. आजवर प्रेमाचा एक शब्द कानावर न पडलेली ही अजून आशेवर आहे. तो तिला मर म्हणतो.. त्यावर ती म्हणते.. मग तुमचं कोण करणार? त्यावर तो मौनी बाबा होतो! ती insulin टोचायला शिकली आहे. तिचे पहिले टोचणे त्याला अजिबात टोचले नाही, त्यावेळी तो कधी नव्हे तो गालात हसला होता!
यापुढील पिढ्या हे मातृत्व स्वीकारतील का? हा प्रश्न आहेच. पण पुरुष अजूनही आपल्या मनोवृत्तीत बदल करून बाईला ताई आणि आई या भूमिकेतही पाहू लागला तर… प्रत्येक स्त्रीला माता व्हायचं असतंच की…!
सबंध प्राणिसृष्टीत एकमेकांची सुश्रुषा करण्याची क्षमता इतर प्राण्यांच्या तुलनेत मानव प्राण्याला जास्त लाभली आहे. सर्वच बाबतीत आईवर अवलंबून राहण्यात माणसांची अपत्ये आघाडीवर आहेत! आणि मानवी शरीराची निगा राखणे सर्वांत अवघड बाब असावी. बालकास आहार देणे, शरीर धर्मातून बाहेर पडणाऱ्या त्याज्य पदार्थांची विल्हेवाट लावणे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या घाणीची स्वच्छता करणे, शरीर स्वच्छ करणे या गोष्टी आईशिवाय इतर कुणी अधिक प्रेमाने, सफाईदारपणे करीत असेल तर ती व्यक्ती खूपच मोठी म्हणावी लागेल.. अन्यथा आईला पर्याय नाही!
पण अडचण अशी आहे की आई शेवटपर्यंत पुरत नाही!
आई जन्माची शिदोरी… सरतही नाही आणि उरतही असं फ. मु. शिंदे म्हणत असले तरी
ही शिदोरी संपते! पण एक मात्र खरे… ही शिदोरी एक नवे नाते घेऊन जीवनात येते.. पत्नी!
मानवी आयुष्याची उत्तरायुष्यातील लांबी लक्षात घेतली तर पत्नीच सर्वाधिक काळ पुरुषाची सोबत करते!
या सर्व मातांना सादर वंदन!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈