☆ हरवलेला मधुचंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆
मी तीस वर्षांनंतर पुन्हा महाबळेश्वरला चाललो होतो. मी गाडी चालवत होतो व माझ्या शेजारी प्रतिमा बसलेली होती. कात्रजचा घाट सुरु झाला होता.. घाटातील प्रत्येक वळणावर, मला तीस वर्षांपूर्वीचा आमचा मोटरसायकलवरचा पहिला प्रवास आठवू लागला..
मी खेड्यातून शहरात येऊन शिक्षण घेतले. पुणे विद्यार्थी गृहात आश्रमवासी म्हणून राहून ते पूर्ण केले. तेथीलच प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीचा अभ्यासक्रम पूर्ण करुन डिप्लोमा घेतला. माझ्या सरांच्या ओळखीने मला एका प्रेसमध्ये नोकरी मिळाली. दोन वर्षांतच माझं प्रिंटींगमधलं कौशल्य पाहून प्रेसच्या मालकांनी मला स्वतंत्र प्रेस थाटून दिला. माझ्याकडे दोन ट्रेडल मशीन होती. मी रात्रंदिवस काम करुन या व्यवसायात यश प्राप्त केले..
मालकांशी माझे कौटुंबिक संबंध होते. सणावाराला ते मला घरी बोलवायचे. त्यांना प्रतिमा नावाची एकुलती एक मुलगी होती. तिचं काॅलेजचं शिक्षण चालू होतं..
पाच वर्षातच मालकांनी देऊ केलेल्या प्रेसची सर्व रक्कम मी आलेल्या कमाईतून फेडून टाकली. आता याच व्यवसायात मला उत्तुंग यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती.
एके दिवशी मला मालकांनी घरी बोलावलं. मी गेल्यावर दोघा उभयतांनी मला लग्नाबद्दल विचारलं. मी अजून तसा विचारच केला नव्हता. त्यांनी, आमच्या प्रतिमाशी तू लग्न करशील का? असं विचारल्यावर मी तर निशब्दच झालो.. खरं तर प्रतिमाला पाहिल्यापासून, मी तिच्या प्रेमातच पडलो होतो मात्र मालकांना काय वाटेल, या विचाराने शांत राहिलो.. आज तर त्यांनीच तिच्याविषयी विचारुन मला आनंदाच्या लाटेवरच ढकलून दिलं होतं..
महिन्याभरातच आमचं लग्न झालं. मी नुकतीच नवीन मोटरसायकल घेतलेली होती. त्यावरुनच आम्ही मधुचंद्रासाठी महाबळेश्वरला जायचं ठरवलं..
कात्रज घाटातून जाताना प्रत्येक वळणावर प्रतिमा घाबरुन मला घट्ट बिलगत होती.. आणि मी रोमांचित होत होतो.. रमत गमत आम्ही चार तासांनी महाबळेश्वरला पोहोचलो.. तिथं हाॅटेल मिळवून देणारी काही माणसं आमच्या मागे लागली. त्यातील एका बारा चौदा वर्षांच्या मुलाला मी जवळ बोलावून तुझं हाॅटेल कुठं आहे हे विचारलं. ते बाजारपेठेतच असल्याने तिथंच उतरायचं मी नक्की केलं.. हाॅटेलच्या काऊंटरमागे एक पारशी मालक बसला होता. हाॅटेलमधील रुम ताब्यात घेतली व सामान ठेऊन फ्रेश झालो.. त्या मुलाच्या हातावर पाच रुपये ठेवल्यावर तो खुष झाला..
त्याला नाव विचारल्यावर त्यानं ‘सलीम’ असं सांगितलं.. तो गाईडचंही काम करीत होता.. मी त्याच्यासोबत महाबळेश्वरमधील सर्व पाॅईंट्स व प्रेक्षणीय ठिकाणं पहाण्याचा निर्णय घेतला.. साडेचार वाजले होते, आम्ही सनसेट पाॅईंटला जायचं ठरवलं..
तिथं पोहोचल्यावर पाहिलं, तर पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढू लागली होती.. आम्ही दोघांनीही घोड्यावरुन रपेट मारण्याचा आनंद घेतला..
प्रतिमा एका उंच टेकाडावर, लाल टोपी घालून बसलेली होती. मी तिचे क्लिक थ्री कॅमेऱ्याने फोटो काढत होतो.. तेवढ्यात एक स्केचिंग करणारा चित्रकार माझ्याजवळ आला व म्हणाला, ‘तुमची हरकत नसेल तर मी यांचं एक स्केच करु का?’ मी होकार देऊन, तो स्केच कसे काढतो ते पाहू लागलो.. अवघ्या दहा मिनिटात त्याने लाल टोपी घातलेल्या प्रतिमाचे व समोर पसरलेल्या निसर्गाचे अप्रतिम स्केच, कलर पेन्सिलीने पूर्ण केले..
प्रतिमा तर ते चित्र पाहून बेहद खुष झाली. तिनं न राहवून त्याला विचारलं, ‘हे चित्र, तुम्ही मला द्याल का?’ तो कलाकार फारच संवेदनशील होता, त्याने त्यावर ‘शुभेच्छा’ लिहिले व खाली सही करुन तिच्या हातात दिले. मी त्या दोघांचा, एक आठवण म्हणून फोटो काढला…
सनसेट डोळ्यात साठवून आम्ही परतलो.. ते चार दिवस आम्ही खूप भटकलो. तेथील काही ठिकाणं हिंदी चित्रपटातील गाण्यांतून अनेकदा पाहिलेली होती.. जुनं महाबळेश्वर पाहिलं.. बाजारपेठेत खरेदी केली. त्या चार दिवसांत हाॅटेलच्या, पारशी मालकाशी माझी चांगलीच ओळख झाली होती..
महाबळेश्वरहून आम्ही स्वर्गीय आनंद उपभोगून, परतताना हाॅटेल मालकाचा निरोप घेतला. त्यांनी पुन्हा कधीही आलात तर इथेच या असं आम्हाला आपुलकीनं सांगितलं…
आम्ही दोघेही संध्याकाळी घरी पोहोचलो. आमचा संसार सुरु झाला. मी पुन्हा प्रेसच्या कामात गुंतलो.. कामं वाढली होती. नवीन प्रिंटींगची मशीनरी घेतली. स्टाफ वाढला. आम्हाला मुलगा झाला. त्याचं सगळं करण्यात प्रतिमा गुंतून गेली..
वीस वर्षे हा हा म्हणता निघून गेली. मुलांचं शिक्षण पूर्ण झालं. माझा प्रेस हा शहरातील सर्वोत्तम प्रिंटींगची सेवा देणारा म्हणून सर्वांना परिचित झाला..
बंगला, कार, बॅंक बॅलन्स सर्व काही प्राप्त झालं. मुलाचं लग्न झालं. त्यांचा संसार सुरु झाला. आता आम्ही जबाबदारीतून मुक्त झालो होतो..
इतक्या वर्षांत आम्हा दोघांना बाहेर पडता आलं नव्हतं, म्हणूनच पुन्हा एकदा महाबळेश्वरला निघालो होतो.. खेडशिवापूरला जिथं तीस वर्षांपूर्वी ‘कैलास भेळ’ नावाची साधी शेड होती, तिथं आता मोठी पाॅश इमारत उभी होती. महाराष्ट्रीयन व दाक्षिणात्य पदार्थांसाठी प्रवाशांनी गर्दी होती. आम्ही तिथं मिसळचा आस्वाद घेतला व पुढे निघालो..
सुमारे तीन तासांनी आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो. महाबळेश्वर ओळखू न येण्याइतपत बदलून गेलेलं होतं.. आम्ही पूर्वीचं हाॅटेल शोधत होतो.. तेवढ्यात एक चाळीशीतला तरुण माझ्याकडे निरखून पाहू लागला.. मी सलीम पुटपुटताच त्यानं मला ओळखलं.. माझ्या रुपेरी केसांमुळे तो साशंक होता.. त्याने ते पूर्वीचं हाॅटेल दाखवलं.. हाॅटेलचं काऊंटर आता फर्निश्ड होतं. मालक मागील बाजूस हार लावलेल्या फोटोमध्ये गेले होते.. त्यांचा मुलगा काऊंटरवर होता.. आम्ही गेल्या वेळचीच रुम त्याला मागितली..
फ्रेश होऊन आम्ही दोघेही बाहेर पडलो. सनसेट पाॅईंटला गेलो. पाॅईंटवर गर्दी भरपूर होती. घोडेवाले फिरत होते, मी प्रतिमाला विचारलं, ‘मी रपेट मारु का?’ तिनं मला हात जोडले.. सनसेट पाहून आम्ही परतलो.. वाटेतच जेवण केलं. चार दिवसांचा प्लॅन करुनही दोन दिवसांतच दोघेही कंटाळून गेलो. प्रत्येक ठिकाणं पुन्हा पहाताना दोघांनाही भूतकाळ आठवत होता.. पूर्वीचा निसर्ग आता आधुनिकीकरणामुळे राहिलेला नव्हता.. बाजारपेठ आता शहरासारखीच गजबजलेली होती. रात्री मुलानं व्हिडिओ काॅल करुन चौकशी केली. इकडची काळजी करु नका, आणखी दोन दिवस रहा.. असं म्हणाला..
रात्री मी विचार करीत होतो, तीस वर्षांपूर्वी जो आनंद मिळाला.. तसा आता मिळत नाही.. तेव्हा जी स्वप्नं पाहिली, ती आज सत्यात अनुभवतो आहे.. काळ हा कधीच थांबत नाही.. आज मी तोच आहे, मात्र सभोवतालचं जग बदललं आहे.. हा बदल मान्य करायलाच हवा… प्रतिमाला गाढ झोप लागली होती.. मी तिच्या अंगावर ब्लॅंकेट घातले व झोपी गेलो…
सकाळी आवरुन आम्ही निघालो.. हाॅटेलचं बिल पेड केलं.. गाडी स्टार्ट केली.. तेवढ्यात सलीम पुढे आला, प्रतिमानं त्याला बक्षिसी दिली व आम्ही रस्त्याला लागलो.. या तीस वर्षांत जग जरी बदललं असलं तरी एक गोष्ट अजिबात बदलली नव्हती.. ती म्हणजे प्रतिमा !! आज या प्रतिमेमुळेच जनमानसात माझी ‘प्रतिमा’ उंचावलेली आहे…
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈