मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायिचं पातेलं…योगिया ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ सायिचं पातेलं…योगिया ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

गेले काही वर्ष हे जाणवतं आहेच आणि वाढतच चाललं आहे. आधीच सांगतो की माझं बालपण छानपैकी गेलं.  दरवर्षी नवीन पुस्तक, दिवाळीला नवीन कपडे , फटाके. सगळ्या सणांना भरपूर पाहुणे आणि गोड-धोड. दारिद्रय वगैरे काही खास सोसावं लागलं नाही. पण तरीही गेल्या २-३ आठवड्यात असे प्रसंग घडले की हे लिहावं वाटू लागलं. 

प्रसंग १ :

हा.. तर परवा एका मित्राकडे गेलो होतो. रात्री सहज गप्पा मारायला. त्याच्या बायकोने छान हापूस आंबे चिरले. अगदी बाठीला लागून चिरले. गोड होते आंबे. आंब्याच्या फोडी खाऊन झाल्या आणि ती ते सगळं टाकायला उठली. 

“अहो वाहिनी त्या बाठी राहिल्या आहेत अजून” 

“राहू दे हो भाऊजी इतकी काही गरिबी आली नाही आहे, जाऊदे ते आता. अजून आंबे चिरू का?”

“अहो गरिबीचा प्रश्न नाही, पण अजून गर आहे त्याला. आपल्याला नको पण मुलांना बोलवा. मजेत चोखतील.”  

तेवढ्यात दुसऱ्या मित्राची बायको म्हणाली “नको  ..सगळं तोंड बरबटून ठेवतील…मग उठा ..त्यांना धुवा..जाऊ  देना…छान गप्पा रंगल्या आहेत”

मला पुढच्या गप्पा नीट ऐकूच आल्या नाहीत. 

प्रसंग २:

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून आम्ही चार मित्र फॅमिलीसहित महाबळेश्वरला गेलो होतो. हॉटेलमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो. मित्र त्याच्या मुलाला सांगत होता. “सगळं भरभरून घेऊन ठेव, मी परत परत उठून रांगेत उभा रहाणार नाही” त्याचं ८ वर्षाचं कार्ट दोन हातात दोन डिश घेऊन चालत होतं आणि मित्र आपल्याबरोबर त्याची डिश भरून देत होता. टेबलावर तो मुलगा आला तेव्हा त्याच्या डिशमध्ये पुरीभाजी, मेदूवडा , चिकन सॉसेज , फ्रुटस , ऑम्लेटपाव , अमूल बटर , कॉर्नफ्लेक्स , मंचुरियन होते. मित्राने त्याला बसवले आणि हातातला ग्लासभर ज्यूस त्याच्यासमोर ठेवला. 

अजून दहा मिनिटात त्या मित्राची बायको शेजारच्या टेबलावरून त्यांच्या मुलाला ओरडत होती. “जाईल तेवढंच खा, बाकीचं टाकून दे”

आमच्याकडे वळून म्हणाली ..”नाहीतर खा-खा खातील आणि मग पोट धरून बसतील. दोन दिवस सुट्टी मिळालीये त्यात यांच्यामागे धावायची माझी अजिबात इच्छा नाही आहे.” 

तसंही आम्ही आराम करायला गेलो होतो. पुढचा काही प्लॅन नव्हता. मुलाला २-३ वेळा हवं तेवढच घेऊन दिलं असतं  तर काही बिघडलं नसतं. वाया तरी गेलं नसतं.. असो. 

प्रसंग ३ :

पिझ्झा पार्टी होती. तुडुंब पिझ्झा खाऊन झाला. मी खोकी गोळा करायला उठलो तर प्रत्येक खोक्यात पिझ्य्यांच्या कडांचा गोल केलेला होता. मागवलेल्या ६ पिझ्झानपैकी सगळे गोल पूर्ण करायला ५ कडा कमी होत्या. (त्यातल्या दोन माझ्या पोटात होत्या आणि अजून ३ कडांना माझ्यासारखा कोणीतरी धनी होता). म्हणजे बहुतेकांनी कडा खाल्ल्या नव्हत्या. खरं तर..घरापासून ५ मि. वर पिझ्झ्याचं दुकान आहे आणि आम्ही पण आल्याआल्या खाल्ला होता त्यामुळे कडा कडक वगैरे होण्याचा पण चान्स नव्हता. 

प्रसंग  ४ :

परवा दोन मित्र घरी राहायला आले होते. बायकोने सकाळचा चहा केला आणि सवयीने तिने दुधाचं रिकामं पातेलं आणि बारीक कड असलेला चमचा माझ्या पुढ्यात ठेवला. 

एका मित्राने विचारलं “हे काय”

“विचारू नका भाऊजी. तुमच्या मित्राच्या घरची परंपरा आहे. सकाळी साय वाडग्यात काढायची. मग ते नुसतं दूध दुसऱ्या पातेल्यात गाळायचं. गाळणीत आलेली थोडीशी साय पण सायीच्या वाडग्यात टाकायची आणि मग कर्त्या पुरुषाच्या पुढ्यात दुधाचं रिकामं पातेलं खरवडायला द्यायचं…. . मी आहे म्हणून या परंपरा पाळत टिकली आहे . दुसरी असती तर कधीच कंटाळून सोडून गेली असती”

सगळे हसले. 

एका मित्राच्या बायकोने विचारले. “पण मग तुम्ही सायीचे काय करता?”

“दही -लोणी – तूप”. “मग ती बेरी खायचा पण एक कार्यक्रम असतो..सुंठ…पिठीसाखर ….  काही विचारू नको”

माझ्या बायकोने विचारलं “तुम्ही काय करता सायीचं?”

“आम्ही चहाच्या गाळण्यातच दूध गाळतो मग साय पडते त्या गाळण्यातच..उगाच दोन गाळणी कोण करणार”

“आणि मग तूप ?”

“चितळ्यांचं”

तोपर्यंत सायीचं पातेलं खरवडण्यात माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. अशी साय खरवडताना माझी समाधी लागते. त्या चमच्या पातेल्याचा होणार कुर -कुर आवाज माझ्या कानी पडतच नाही. 

साय खरवडता खरवडता मी भूतकाळात गेलो होतो. माझे आजोबा सायीचं पातेलं खायचे, मग बाबा आणि आता मी (मी नसेन तर मुलं खातात आता).  घरात दूध-दुभतं कधीच कमी नव्हतं पण काहीही टाकायचं नाही. पूर्णपणे संपवायचं हे संस्कार अशा सायीच्या पातेल्यातूनच झाले. आजी तर बेरीचं रिकामं पातेलं पाणी घालून तापवायची, पाण्यावर तुपाचा तवंग दाटून यायचा तो काढून आजीचं निरांजन त्यावर दोन दिवस तेवायचं . 

उन्हाळ्याच्या सुट्टीत आमरस काढून झाला की मामा सगळ्यांना बाठी चोखायला द्यायचा. ज्याची सगळ्यात स्वच्छ त्याला १ वाटी एक्सट्रा आमरस ठरलेला. 

रिझल्ट लागला की सगळ्या जुन्या वह्यातील कोरी पाने फाडायची. बाबांना दाखवायची आणि मग त्याच्या बाइंडिंगच्या वह्या करायच्या. पुढच्यावर्षी शाळेला सगळ्या नवीन मिळायच्या पण बाइंडिंगच्या वह्या रफ वर्क / शुद्धलेखन यासाठी वापरायच्या.   

घरी किराणाच्या पुड्या किंवा फुलपुडी यायची. आजीचं दोऱ्याचं एक बंडल होतं. कुठलीही पुडी आली की आजी त्याचा दोरा सोडून त्या बंडलाबरोबर गुंडाळून टाकायची आणि आजोबा तो पेपर परत व्यवस्थित घडी करून रद्दीच्या पेपरात ठेवून द्यायचे. दोऱ्याचं बंडल नंतर हार/माळ  करायला कामाला यायचे. 

Reuse-recycle साठी आम्हाला कधी शाळेत प्रोजेक्ट करावेच लागले नाहीत. टाकू नये –  हवं तेवढंच घ्यावं  ,  कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करावा हा संस्कार आहे. त्याचा तुमच्या पैशाशी, गरिबीशी , स्टेटसशी, शिक्षणाशी काही संबंध नाही. असं वागणं म्हणजे चिंधीगिरी, कंजूषपणा नव्हे.  हा श्रीमंत “मध्यमवर्गीय”  संस्कार आहे आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच श्रीमंत होतो. 

टाकलेली साय , आंब्याची बाठ , पिझ्झ्याच्या कडा, अर्ध टाकलेलं ताट आणि मग हळूहळू टाकून देण्याचं काहीच वाटेनासं होतं.  पुढे जाऊन  ड्रॉईंग चुकलं म्हणून न खोडता सरळ चुरगळून टाकलेला कागद, सोल झिजला तर तो न चिकटवता टाकून दिलेला बूट , दर २-३ वर्षांनी बोर झालं म्हणून बदललेल्या गाड्या  आणि थोडंसं नाही पटलं तर लगेच बदललेले बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड. आणि मग तक्रार ” ही आजकालची पिढी म्हणजे ….” 

“अहो- आता बास …त्या पातेल्याला भोक पडेल” –  बायको सांगत होती. सगळे माझ्याकडे बघून हसत होते. मी माझ्या ध्यानातून बाहेर आलो. चमचाभरून सायीचा बोकाणा भरला… आहाहा …सुख!

मग …उद्यापासून सायीचं पातेलं खायला सुरवात करताय ना? ती गरिबी नाही ..चिंधीगिरी नाही ..तो संस्कार आहे.  

-योगिया    

१७/०५/२०२२

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”) –इथून पुढे…. 

बापरे… मी हा विचार ऐकून हादरलो…. केवळ शील जपण्यासाठी जाणुनबुजुन ही घाणीत राहते… 

आपण कुठल्या समाजात राहतो ? स्वतःला जपण्यासाठी इथं स्वतःला आधी घाणीत लोळवावं लागतं… दुर्गंधाला आपलं कवचकुंडल बनवावं लागतं… 

या आज्जीनं नवऱ्यामागं स्वतःला जपण्यासाठी अंगावर घाण चढवून घेतली होती. मुद्दाम दुर्गंधित झाली होती. गंमत पहा कशी, एका घाणीनं आणि दुर्गंधानं कुणाचं तरी पावित्र्य जपलं होतं..  काटे बोचतात, पण फुलाला जपतात तसं… 

मी मनोमन या माऊलीला नमस्कार केला. आता तिच्या अंगावरची एक इंचाची घाण म्हणजे तिनं अंगावर चोपडुन घेतलेलं पवित्र भस्म आहे असं मला वाटायला लागलं, आणि तिच्यातून येणारा दुर्गंध म्हणजे सुगंधी कापराचा वास…!!! 

या आजीला मी डोळ्याच्या आॕपरेशनसाठी घेऊन आलो 27 तारखेला. अंगावर तीच अर्धीमुर्धी साडी आणि तोच वास…! 

दवाखान्यात बसलेल्या इतर सगळ्यांनीच हिला पाहुन नाक मुरडलं. नाकाला पदर लावले. कुणी कुणी चक्क उठुन निघून गेले. बरोबरच आहे, चिखलात फुललेलं हे कमळ आहे, याची कुणालाच जाण नव्हती… इतरांसाठी हा वास होता… आणि माझ्यासाठी सुगंध… संदर्भ कसे झटक्यात बदलतात ना ? बाळाच्या शी शु चा “आईला” कधीच “वास” येत नाही… दुर्गंधीत असूनही…. 

जवळचं कुणी माणूस गेल्यावर, पार्थिवाशेजारी ठेवलेल्या अगरबत्तीचा वासही नकोसा वाटतो मग… सुगंधित असूनही….! 

वास आणि सुगंध आपल्या मनाच्या कल्पना आहेत. समोरच्याविषयी आपली भावना महत्वाची. चांगली भावना असेल तर सुगंधच सुगंध- नाहीतर फक्त घाणेरडा वास…!!!

मी आज्जीच्या अर्ध्या घातलेल्या साडीकडं पाहिलं आणि मूक नजरेनं आमच्या भुवडताईकडं पाहिलं… 

भुवडताईने त्याच मुक्या नजरेनं भुवडबाबांकडं पाहिलं. कुणीच कुणाशी काही बोललं नाही. 

बाबा उठले आणि झटक्यात बाहेर गेले. बरोबर 20 मिनिटांनी परत आले. हातात दोन साड्या, एक गाउन, मोती साबण, अंग घासण्याची घासणी आणि टाॕवेल…!

मला हेच सांगायचं होतं भुवडताईंना. न बोलताही त्यांना कळलं. मुक्या नजराही किती बोलक्या असतात ना काहीवेळा …?

भुवडताईंनी मग या माऊलीला दवाखान्यातल्याच बाथरुममध्ये नेलं. बाळाला चोळुन घालावी तशी पावणे दोन तास आंघोळ घातली… 

भुवडताई या वेळी मला एका लेकराची माय वाटली. कुठल्याही वासाची लागण न झालेली…! जे आहे ते सारं सुगंधीच आहे असं समजून तो सुगंध अनुभवणारी…. आणि ती आज्जी झाली होती एक छोटं निरागस बाळ… 

बाथरुममधून दोघी बाहेर आल्या तेव्हा सगळ्यात जास्त सुगंध आला माझ्या भुवडताईच्या हाताचा. जगातले सर्वात सुंदर हात होते ते, आणि तितकेच सुगंधी….! शुचिर्भुत झालेल्या आजीचं नवं रुप पाहुन मी स्तिमित झालो…

आजीचं 27 तारखेलाच डोळ्याचं आॕपरेशनही करुन घेतलं. आता तिला दिसायला लागेल ! 

आॕपरेशननंतर मी तिचे हात हातात घेऊन म्हटलं, “आज्जी, तुझ्या अंगावरचं “भस्म” आणि “कापराचा वास”  आज आम्ही काढून टाकलाय. तुझी ही कवचकुंडलं काढून घेतली आहेत, पण काळजी करु नकोस. तुला आजपासून अशा कवचकुंडलांची गरज पडणार नाही….” 

“म्हणजे?” आज्जी बोलली….

मी म्हटलं…. “आता जिथं तुला सन्मानानं सांभाळतील अशा ठिकाणी मी तुझी व्यवस्था करणार आहे. इथून पुढं तु गटारीत घाणीत फुटपाथवर राहणार नाहीस. मी ठेवेन तुला चांगल्या ठिकाणी ….!”

“पण तू हे का करतोयस माझ्यासाठी ?” तिनं निरागसपणे विचारलं…. 

“मी ही तितक्याच निरागसतेनं सांगितलं, ” तू मला सांगितलं होतंस ना ? तुझं बाळ दोन वेळा पोटातच गेलं…. अगं ते गेलं नव्हतंच कधी…. डाॕक्टरांनी खोटंच सांगितलं होतं तुला… मी तेच बाळ आहे तुझं….!! फिरुनी पुन्हा जन्मलो मी….!!!” 

तिचे डोळे डबडबले…. माझ्या गालावरुन हात फिरवत, ती प्रसन्न हसली… म्हणाली “श्लोक म्हणू…?” नेहमीसारखीच उत्तराची अपेक्षा न ठेवता तिनं डोळे मिटले. माझे हात हाती घेतले. ते हात तसेच हातात ठेऊन तिने स्वतःचेही हात जोडले… आणि विश्वप्रार्थना सुरु केली…. माझे हात हाती घेऊन…. “सर्वांना चांगली बुद्धी दे…सर्वांचं भलं कर, सर्वांना आनंदात, ऐश्वर्यात, सुखात ठेव, कल्याण कर, रक्षण कर… आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू  दे….!” 

मी तिच्याकडे एकटक पाहत होतो. स्वतः जळत राहून दुसऱ्याला सुगंध देणारी ती एक सुवासिक अगरबत्ती आहे असा मला त्यावेळी भास झाला….!!!

आणि सारा आसमंत चक्क सुगंधी झाला…..!!! 

समाप्त 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अगरबत्ती …!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ती…!

मला भेटली फुटपाथवरच… भीक मागत…! वय वर्षे 70 च्या आसपास… दिसायला काळीसावळी आणि अंगावर अक्षरशः अर्धा इंचाची घाण…

तीन फुटांच्या अंतरावर गेलो तरी विचित्र, अतिशय घाणेरडा एक वास येतो… 

अंगावर नाही म्हणायला एक मळकी साडी… (मळकी हा शब्द खूप थिटा आहे)

याला साडी का म्हणावं ? हाच मुळात प्रश्न आहे… अक्षरशः पाच साडेपाच फुटाचं हे कापड ती अंगावर गुंडाळते… जे झाकायला जावं तेच उघडं पडतं… आणि दुर्दैव असं की तिला ते कळत नाही… जाणवत नाही… कारण डोळ्याच्या कसल्याशा प्राॕब्लेममुळे तिला काही दिसतच नाही…! 

एकूण अवस्था अशी, की या आज्जीजवळ कुणी जावुच नये… तिच्याजवळ कुणी बसूच नये…! तरीही मी जातो, बसतो तिच्याजवळ .. याचं कारण तिचं लाघवी बोलणं… 

हिच्या गोबऱ्या गालातुन एक एक शब्द असा बाहेर पडतो, जसा शंकराच्या पिंडीवर टांगलेल्या अभिषेकपात्रातुन थेंब थेंब अभिषेक व्हावा, त्या पिंडीवर  …! अतिशय शुद्ध आणि सात्त्विक ! 

भीक मागतांना  म्हणते… “बाळा तुला जमलं काही तर मला दे, स्वतःला अडचणीत टाकून मला काही देवु नकोस… आधी तू  घे, प्रसन्न हो, त्यातून काही उरलं आणि तुला जर मला द्यावंसं वाटलं तरच दे… अन्यथा नको !” 

गोळ्या मागतांना म्हणते, “डाॕक्टरसाहेब, मला देणं शक्य असेल तरच गोळ्या द्या. अहो माझ्यापेक्षा जास्त त्रास असणारे खूप आहेत अजून, त्यांना आधी द्या… मी काय, करेन थोडं सहन… !”

दुस-याचा विचार करण्याच्या तिच्या या वृत्तीमुळे मी हिच्याकडं आपसुकच ओढला गेलो होतो… 

तिच्याजवळ बसलं की, तिचं बोलणं ऐकता ऐकता बोलण्यातूनच सुगंध इतका घमघमायला लागतो की अंगावरुन येणाऱ्या घाण वासाची जाणिवच होत नाही आपल्याला… 

शेजारी बसलं की विचारते, “मी एक श्लोक म्हणू … ?” आणि आपल्या उत्तराची वाट न पाहता, ही “विश्वप्रार्थना” म्हणायला सुरुवात करते… “सर्वांना चांगली बुद्धी दे… आरोग्य दे…..आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!”

या विश्वात ज्याच्याकडे सर्व काही आहे, तो स्वतःला अजून काही तरी मिळू दे म्हणून “लाचार” होतोय… आणि सर्वस्व गमावून बसलेली ही आज्जी ‘दुसऱ्याला सुखात ठेव’ म्हणून “प्रार्थना” करत्येय…! 

स्वतःसाठी मागणं ही झाली लाचारी, आणि दुस-यासाठी मागणं ही झाली प्रार्थना… दोन्हीतला फरक मला या आज्जीमुळेच समजला…! 

ही आज्जी, एका मॕनेजरची बायको. भरपूर श्रीमंती आणि खानदानी संस्कार. रास्ता पेठेत यांचा जुना बंगला होता. सगळं काही होतं, पण घरात कुणी चिमुकलं नव्हतं. दोन वेळा पोटातच बाळ गेलं. मरता मरता वाचली. तिसऱ्या वेळी डाॕक्टरांनी सांगितलं, “आता तुम्हाला बाळ होणे नाही. दत्तक घ्या.” 

मधल्या काळात यजमान गेले. इतके दिवस “दूर” असलेले सगळे नातेवाईक “जवळ” आले. आठवतील ती नाती सांगून घराची वीट न् वीट घेऊन गेले.

सगळी “नाती” बरोबर येताना “पोती”  घेऊन आली होती. या पोत्यांतुन सर्वस्व वाहून नेलं हिचं… हिच्याच डोळ्यांदेखत… 

असलेली सगळी “नाती” हिंदकाळत “गोती” खात गेली, आणि वाड्याची ही खानदानी मालकीण आता फुटपाथची राणी म्हणून जगत्येय, गेली १५ वर्षे… विश्वप्रार्थना गात… ‘सर्वांना सुखी ठेव’ म्हणत…! आपल्या अंगावर धड कापड नसतांनाही गात असते… ‘सर्वांना ऐश्वर्यात ठेव…!’ सगळ्यांनी लुबाडून घेतलं तरी आर्त प्रार्थना करते…. ‘सर्वांचं भलं कर…कल्याण कर….’ 

ऐकणारा “तो” तिचं ऐकतोय की नाही माहित नाही… तरीही गोबऱ्या गालांतुन हसत, वर बघत विश्वासानं म्हणत असते ‘आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे…!’

मी एकदा चाचरत हिला म्हटलं, “मावशी तू मनानं इतकी सुंदर आहेस पण इतकी अस्वच्छ का राहतेस?” 

ती म्हटली, “अस्वच्छ …? मी कुठंय अस्वच्छ …???” 

“अगं हा वास…?” मी आवंढा गिळत, नजर चोरत बोललो….

ती म्हटली, “हा वास घाणेरडा वाटतो का रे बाळा तुला ? लहान आहेस तू बाळा अजुन…. अरे रस्त्यावर या घाणेरड्या वासानंच माझ्या, रक्षण केलंय माझं… !” ती हसत बोलली…!!! 

“म्हणजे…?” 

कानाजवळ येऊन बोलली, “तुला माहीत आहे ? कापूर पेटवला की आजुबाजुला किडे येत नाहीत… मच्छरची अगरबत्ती पेटवली की मच्छर आसपास येऊन चावत नाहीत… 

ही घाण नाही बाळा, हे माझं कापूर आहे… माझी अगरबत्ती आहे… या कापरामुळंच आणि अगरबत्तीमुळं समाजातले किडे आणि डास माझ्या वाऱ्यालाही येत नाहीत…”

क्रमशः… 

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुझं संरक्षण..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ तुझं संरक्षण..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

तिच्यावर अत्याचार होतो 

तिच्यावर बलात्कार होतो

ती मारली जाते

जिवंत जाळली आहे 

कुणी मोठी सभा घेत नाही

माणसं गोळा करुन आणत नाही

कुणी “राज” येत नाही 

ना “राणा” धावत नाही

मुके होतात सगळे

पुरोगामी म्हणवणारे 

चळवळीला वाहून घेतल्याचं सांगणारे

विकृतीला ना धडा शिकविला जातो

ना हद्दपार केले जाते

अनेक इथल्या अरुणा शानभाग !

लोक पेटत नाहीत

जाब विचारत नाहीत

देशातील लेकीसाठी 

 “नवनीत” काही घडत नाही.

 भोंग्यासम लेकींचा आक्रोश होतो

कोणालाही हनुमान कधी वाचवत नाही..

कुठे प्रकाश दिसत नाही..

कुणाला काही आठवले असे नाही

हे कळावं तुला, मला, सगळ्यांना

तुझं संरक्षण तुझी जबाबदारी..

तूच हो ढाल आता

तुच तुझी तलवार हो

तुझं संरक्षण तुझी जबाबदारी

मतदाना वेळी हे विसरु नको

तुझं संरक्षण तुझी जबाबदारी—-

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अस्थायी सूर… सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

??

☆ अस्थायी सूर… सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

कोणालाही हेवा वाटेल अशी चाळीस वर्षांची आमची घट्ट मैत्री .जीवश्च कंठश्च अशा आम्ही दहा मैत्रिणी महिन्यातून एकदा अख्खा दिवस एकत्र घालवतो. गप्पांना उधाण येतं. हास्याचे फवारे उडत असतात .सुखदुःखाची देवाणघेवाण होते .. डाएट,डायबेटीस रक्तदाब सगळं त्या दिवसा पुरतं थोडं शिथिल करीत जेवणावर ताव मारला जातो ..पुन्हा भेटण्याची तारीख ठरवून ताज्यातवान्या होऊन घरी परततो .

 गप्पांचा फड जमवताना आम्हाला एकही विषय वर्ज्य नसतो .सासू ,नवरा ,मुलं,घरातले वाद,असे टिपिकल बायकी विषय ..तोंडी लावण्यापुरतेच ..

गाॅसिपिंगला तर थाराच नाही .

पण प्रवासातले अनुभव ,पाहिलेलं नाटक किंवा सिनेमा ,वाचलेलं काहीही ..खवय्या असल्यामुळे रेसिपीज् ..भटकंती …कश्शा कश्शावरही बोलायला वेळ पुरत नाही आम्हाला. 

गेल्या दोन तीन भेटीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आमचा एक सूर अस्थायी लागतोय का ..?

हसत हसत ,सहजपणे आमच्या तोंडून यायला लागलय ..”ए ..आपल्याला आता पाच सहा वर्षच बास आहेत हं ..” सत्तर परफेक्ट आहे बाय बाय करायला ..”

खरं तर आर्थिकद्रृष्ट्या सुस्थितीत ,खूप काही गंभीर आजार नाहीत ,मुलं सेटल्ड ..जबाबदाऱ्या  संपलेल्या ….

असं असताना आम्ही हा सूर का आळवतो ..

शिक्षक असलेले माझे वडील नव्वदाव्या वर्षी निवर्तले . गरीबी ..वारावर जेवण .शिक्षणासाठी अपार कष्ट …अंगावर बऱ्याच जबाबदाऱ्या..अशात मध्यम वय संपलं, तरी एकही दिवस मी त्यांच्या तोंडून नव्वदाव्या वर्षी सुद्धा “बास झालं आता जगणं “असं ऐकलं नाही ..

मग आम्ही का अशा कंटाळलो ?

अडीअडचणी ,संकटं ,चढउतार, काळज्या ,तणाव हे सर्व जरी प्रत्येकीच्या आयुष्यात असलं, तरी संघर्षमय जीवन नव्हतं ..मग तरी सुद्धा ..?

काय असेल कारण ?

ऐंशीच्या घरातली जवळची माणसं विकलांग होताना पहावी लागली म्हणून ?

की तसं धावपळीचं दगदगीचं जीवन जगावं लागलं ..लागतय म्हणून??

स्त्रीने घर सांभाळायचं आणि पुरूषांनी कमाई आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या उचलायच्या , अशी कामाची विभागणी वडिलांच्या पिढीत होती .म्हणून दोघंही थकले नाहीत का ?

आम्ही हिरीरीने ,मनापासून घरची – दारची जबाबदारी उचलून थकलो ?

की त्यांच्या ठायी असलेलं समाधान,.संतुष्टता आमच्यात नाही .?

की त्यांची मुलंबाळं त्यांच्याजवळ असल्यामुळे उत्साहाचा झरा अखंड वाहता होता .रोज काहीतरी उद्देश असायचाच तो दिवस पार पडायला ?.

या विचाराशी येऊन मात्र मी थोडीशी चमकले .

दहाजणींपैकी  आम्हा आठ जणींची मुलं नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात किंवा परदेशी आहेत .हे तर कारण नसेल ..?

दोघं दोघं रहातो म्हणून कंटाळतो?

…कारण मुलांबरोबरअसतो तेव्हा “सत्तरी बास “काय ..दुखणं खुपणं ही आठवत नाही … 

थोडी सटपटले …असला रडा सूर लावणं म्हणजे जरा self pity त जाणं वाटलं मला.

 माझाच मला राग आला ..हे कसलं भरल्या ताटावरचं रडणं ..

इतकं मजेत आयुष्य जगण्याचं भाग्य लाभलय .आणि कसले हे “सत्तरी बास चे डोहाळे “

पुढच्या वेळेला भेटू तेव्हा एकीलाही असा “अस्थायी “सूर लावू द्यायचा नाही ..बजावूनच टाकलं मी स्वतःला ..

 

लेखिका : नीलिमा जोशी

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोणता रंग घेऊ हाती… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

? कोणता रंग घेऊ हाती ? सौ राधिका भांडारकर ☆

“द स्काय इज पिंक”, या चित्रपटातला तो मुलगा, मला सहज आठवला.  त्याने एक चित्र काढले होते आणि त्या चित्रातले आकाश त्यांनी गुलाबी रंगाने रंगवले होते. त्यावेळी त्याची शिक्षिका त्याला रागावली होती. म्हणाली होती…

…”तुला कळत नाही का? आकाश निळे असते गुलाबी नसते”

मुलाचे म्हणणे सूर्य उगवतांना आणि सूर्य मावळतांना आकाश गुलाबीच असते ना? पण तरीही त्याने काढलेले ते चित्र रद्द ठरले.

त्याच्या आईने त्याला समजावले आणि म्हटले “तुला आकाश गुलाबी दिसते ना मग तू ते गुलाबी रंगानेच रंगव, बक्षिस नाही मिळाले तरी चालेल.”

मनात पटकन विचार आला की खरंच आपल्या दृष्टीला जे रंग दिसतात तेच खरे. कुणी कोणता रंग हाती घ्यावा ही ज्याची त्याची मर्जी.

कधी वाटतं, आयुष्य म्हणजे रंगपंचमी आहे.  जन्माला येतानाच ईश्वराने आपल्यासोबत एक रंग पेटी दिली आहे.

“ता ना पि ही नि पां जा” — या सप्तरंगाची पेटी घेऊनच आपण या पृथ्वीतलावर आलो. या सप्तरंगांच्या मिश्रणाने आणखी कितीतरी रंगांच्या छटा नकळत आपल्या आयुष्यासोबत झिरपत असतात का?

“पानी रे पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिला दो लगे उस जैसा।

गंगा से जब मिले तो बनता गंगाजल ।बादल से तू मिले तो रिमझिम बरसे सावन।।”

जन्मतः  कुठलाच रंग नसतो जीवनाला,  ते असते पाण्यासारखे नितळ, रंगहीन पण निर्मळ जगण्याच्या प्रक्रियेमध्ये मग रंग भरत जातात. कधी नकळत कधी आपण ते जाणीवपूर्वक भरत राहतो. मग त्यात प्रेमाचा गुलाबी रंग असतो, मनाच्या ताजेपणाचा हिरवा रंग असतो, कधी  लाल रंगाचा अंगार असतो, तर कधी शौर्याची नारिंगी छटा असते, भक्तीचा निळा शांत प्रकाश असतो, पांढऱ्या रंगाची स्थिरता असते, तर पिवळ्या रंगातला आनंद असतो. पण कधी द्वेष मत्सर यांचा हेवा दाव्याचा, तीव्र स्पर्धेचा, मान  अपमानाचा भयानक काळाभोर रंग व्यापून उरलेला असतो.

कधी अंतरंगात डोकावून पाहिलंय का? कोणता रंग दिसतो? काळाच काळा. मग बाकीचे पेटीतले इतके सुंदर रंग गेले कुठे? का पण ते कधी हाती घेतलेच नाही? या काळ्या रंगातच रेघोट्या मारत बसलो? असं म्हणतात कावीळ झालेल्या माणसाला सगळे जगचं पिवळे दिसते तसं झालं का आपलं? फक्त या काळ्या रंगाने आपल्यावर कुरघोडी केली का ? इंद्रधनुष्यातील सात रंग  कुठे हरवले? आनंदाने नाचणाऱ्या मोराचा निळा रंग, वर्षा ऋतूतील धरेचा हिरवा रंग, बहाव्याचा पिवळा सुखद रंग, पिकलेल्या रानाचा सुवर्ण रंग, याने कां नाही भुलवले आपल्याला?

बरं !!काळ्या रंगातही आपण पाहिला तो कावळा…

…विठ्ठल नाही पाहिला, पाणी देणारा मेघ नाही पाहिला. आपण रंग पाहिला तो अंधाराचा. या काळ्या रंंगाने आपल्या आयुष्याला भीषण केलं, गढूळ केलं. मुळातच कुठला रंग हाती घ्यावा हे ठरवायच्या आधीच या काळ्या रंगाने प्रवेश केला अन मग सारंच काळवंडलं कां?

सुरेश भट यांची एक गझल आठवते—

।।  रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.

गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा.

माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,

माझियासाठी न माझा, पेटण्याचा सोहळा.

रंग माझा वेगळा ।।”

एका कलंदर माणसाच्या आयुष्याचं व्यक्तिमत्व कसं असतं तर साऱ्या रंगांच्या, दुःखाच्या, अपमानाच्या, फसवणुकीच्या झळा सोसूनही तो सूर्यासारखा तळपतो आणि वेगळ्या रंगाचा सोहळा साजरा करतो आणि म्हणतो रंग माझा वेगळा. —  कोणता रंग घेऊ हाती याचे उत्तर जणू या काव्यपंक्तीत सापडतं.

चला तर मग ईश्वराने दिलेली रंगपेटी उघडू या. सप्तरंगांनी आपले जीवनचित्र रंगवूया. हा काळा रंग पार बाजूलाच ठेवूया—

— असा रंग हाती घेऊ या की, ज्याने “ अवघा रंग एक झाला,” ही भावना मनावर स्वार होईल.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आणि पसारा करायचाच असेल तर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ आणि पसारा करायचाच असेल तर…. अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्‍याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्‍याच गोष्टी. 

कधीतरी त्या हव्या होत्या पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला. सगळं उरकल्यावर ती वस्तू सापडली. पण मग काय उपयोग??

आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…

आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.

माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.  पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं असं वाटून गेलं.

ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही. 

खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार हे समजायला लागतं.

एक ओळखीच्या आजी होत्या, मुलबाळ काही नव्हते . एकट्या राहायच्या एका वाड्यात. 

पुतणे वगैरे होते पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात. 

गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून. असंही उदाहरण आहे, 

एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं. 

जी बाई त्यांची सेवा सुश्रुषा जाईपर्यंत करत होती तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या. साड्या बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.

देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.

नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण. 

तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फीडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.

चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी– असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर. 

खूप पाहुणे येतील कधी म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले आणि पाहुणे येतंच नाहीत, आले तरी एकदिवस मुक्काम. घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल खूप भांडी पडली तर म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको. पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही. कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला  आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही. 

पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात—-

असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून…

एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे. 

पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतः मधे पण. 

रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.. आपण काही सुधारणार नाही.

— दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तू पुन्हा काढायच्या- पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.

खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी … पण मन ऐकत नाही.. 

ये मोह मोह के धागे…….मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही…

निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.

पण आम्ही नाही शिकत …

— थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं..

— आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात— आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा… दिसू द्यावा तो आपल्या माघारी– आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रूंच्या बांधात…

— जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा— आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा—–

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साहसे श्री ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆साहसे श्री ।। ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

लग्न होऊन, नीरा कोकणात गेली,तेव्हा तिला परके किंवा वेगळे काहीच वाटले नाही. कोकणातल्याच खेडची मुलगी आता गुहागरला गेली, हाच काय तो बदल.

तेच आयुष्य,तेच कुळागर,तेच माड आणि तेच आंबे.

खरं तर नीराला मनापासून शहरी नवरा हवा होता. तिच्या मावश्या,आत्या राहायच्या ना पुण्यामुंबईकडे.

पण तिकडची मुले कुठली कोकणातल्या मुलींना हो म्हणायला.

नीरा आपली पायरी ओळखून होती. वडिलांची बेताची परिस्थिती, आणखी दोघी बहिणी लग्नाच्या.

कोणीतरी हे स्थळ सुचवले,आणि योग जुळून आले म्हणायचे— साधेसुधे घर ,बेताचीच परिस्थिती,

अशी नीरा गुहागरला सासरी गेली.

 तिच्या सासूबाई अतिशय कष्टाळू होत्या. निरनिराळे छोटे मोठे उद्योग करून चार पैसे गाठीला लावायच्या.

नीराचा चुणचुणीतपणा केव्हाच हेरला त्यांनी.

नव्या नवलाईचे दिवस सरले, आणि हळूहळू नीराच्या लक्षात काहीकाही गोष्टी येऊ लागल्या. सासूबाई कर्तृत्वाच्या,तर सासरे एकदम विरुद्ध. काय जे आंबे फणस,शेतातले धान्य विकले जाईल, त्यावरच गुजारा.

नीराने नवऱ्याचेही गुण बघितले. व्यसन बिसन नव्हते,पण आळशीच एकूण. नोकरी करता का असे तिने सुचवून बघितलेही. पण याला कोण देणार नोकरी आणि कसली. नुसते बसण्याची सवय,आणि आयुष्यात ध्येय लागते,हेच ठाऊक नाही.

नीरा हळूहळू रुळायला लागली. मुलगा झाल्यावर,  त्याला वाढवण्यात काही दिवस गेले.

पण तिला असेच निष्क्रिय आयुष्य नव्हते काढायचे. सुदैवाने त्यांची जागा मोक्याच्या जागी आणि मोठीही होती.

नीराने सासूबाईंना विश्वासात घेतले. म्हणाली,” सासूबाई,मागे एवढी मोठी जागा रिकामी आहे, आपण सध्या 3 खोल्या  बांधूया का? थोडा खर्च होईल, पण आपल्याला उत्पन्न सुरू होईल. आपण जरा शहरी लोकांना लागतात,तशा सोईच्या खोल्या  बांधूया. तुम्ही बाबांची परवानगी घ्याल का ?” 

सासूबाई भीतभीत म्हणाल्या,” हो, पण बांधकामाला पैसे? “

नीरा म्हणाली,” आपण बँकेचे कर्ज काढूया.”

सासूबाई सासरे तयार झाले. नीराने नवऱ्याला स्पष्ट सांगितले,“ हे बघा,हे जे आम्ही करतोय, त्यात तुम्हीही

सहभागी व्हा. नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका. मी सांगेन ,ते  तुम्हाला करावे लागेल.” 

कुरकुर करत का होईना,तयार झाला तो.

 समुद्रकिनारीच त्यांचे घर होते, तिथे टुमदार 3 खोल्या तयार झाल्या, अगदी शहरी सोयी सुविधा सकट.

नीरा एकदा पुण्याला मावशीकडे जाऊन आली. तिला आपले हे नवीन फार्महाऊस दाखवायला घेऊन आली.

मावशीला ते अतिशय आवडले. तिने आणखीही काही छान सूचना केल्या.  त्या फार्म हाऊससमोर झोपाळे बसले.

रंगीत खुर्च्या आल्या.

“ मावशी,होईल ना ग हे नीट.कर्ज फेडू शकू ना आम्ही?” 

“ नीरे,वेडे,बघ तू. जागा पुरायची नाही बघ तुम्हाला. कष्ट करणाऱ्याला लक्ष्मी प्रसन्न का होणार नाही ग?

मला आता ती कार्ड्स दे. मीही देते ओळखी पाळखीत.” 

 पहिला ग्रुप,मावशीच्या ओळखीतूनच आला.नीराने त्यांची अतिशय सुंदर सरबराई केली—खास कोकणी  नाश्ता, मोदक, सोलकढी– पाहुणे खुश होऊनच गेले. ही पहिली कमाई बघून सासूबाईंना गहिवरून आले.

नीराने आता हाताखाली दोन बायका ठेवल्या.सासू सुनांना आता दिवसाचे चोवीस तास पुरेनात. नीराचा माधव आळस झटकून कामाला भिडला. बाहेरची खरेदी,नोकरवर्गावर  लक्ष ठेवणे, आलेल्या पाहुण्यांची नीट व्यवस्था बघणे

त्याने अंगावर घेतले. नीराच्या घरगुती फार्म हाऊसची आपोआपच प्रसिद्धी होऊ लागली. नीराने बँकेचे कर्ज लवकरच फेडले. मॅनेजर म्हणाले,” नीराताई, आणखी कर्ज घ्या आणि खोल्या वाढवा. आणखी करा तुमचे farmhouse मोठे सुसज्ज. बँक देईल की कर्ज. आम्हाला असे चोख गिऱ्हाईक हवेच असते. “

नीराने सासू सासऱ्यांना विचारून आणखी खोल्या वाढवल्या, पण त्याला शहरी रूप नाही येऊ दिले.

 नीराने आपल्या मुलाला मुंबईला, हॉटेल management साठी पाठवले. लवकरच, तो ते शिक्षण पूर्ण करून

आपल्या आईवडील आजीच्या मदतीसाठी येईल–आणखी नवनवीन कल्पना घेऊन.

मागच्याच महिन्यात नीराच्या फार्महाउसला भेट दिली आम्ही.

अतिशय सुंदर केलेय तिने सगळे. तिच्या सासूबाईची माझी  थोडी ओळख होती. माझ्याजवळ येऊन बसल्या आणि 

कौतुकाने म्हणाल्या,” काय हो कर्तृत्वाची सून माझी!! हे आम्हाला नव्हते सुचले, आणि सुचले असते, तरी धैर्य नसते  झाले हो. बघा कसे नंदनवन फुलवलेय आमच्या सुनेने. अहोरात्र कष्टत असते हो पोर. आणि ,आमच्या मुलालाही बघा कसा छान कामाला लावलाय. तेही गोड बोलून. मला धन्य वाटते हो, आमच्या नुसत्या पडीक जमिनीचा असा सोन्याचा घास आम्हाला मिळाला. सगळे श्रेय नीराला जाते. कधी अंगाला सोने नव्हते लागले, पण बघा, नीराने दिवाळीत मला कशा पाटल्या बांगड्या केल्यात.” 

थोडी सवड मिळताच, नीरा आम्हाला तिच्या बागेत घेऊन गेली. म्हणाली, “ माझा मुलगा हॉटेल management करून येईल 2 वर्षात. मग आमचा कॅनिंग फॅक्टरी सुरू करायचा विचार आहे. शिवाय इथे मासळी भरपूर मिळते.

कोल्ड storage करायचाही विचार करतोय तो. म्हणजे एक्स्पोर्ट बिझिनेस सुरू करता येईल.”—-

या  साध्या सरळ, खेड्याबाहेरचे जग न बघितलेल्या मुलीची ही गरुड झेप बघून थक्क झालो आम्ही. तिच्या पाठीवर शाबासकीची थाप तर दिलीच, पण सासूबाईंचेही कौतुक केल्याशिवाय राहवेना आम्हाला. सासूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

एक साधीसुधी मुलगी,आपल्या जिद्दीने, श्रमांनी, हे वैभव उभे करू शकली, याचे आम्हा सर्वांना अतिशय कौतुक वाटले.

“ साहसे श्री प्रतिवसति ।। “ ही उक्ती नीराने आपल्या जिद्दीने खरी करून दाखवली होती . 

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ पिक्चर रस्त्यावरचा…अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

आमच्या मित्राने रस्त्यावरच्या पिक्चरच्या पडद्याचा फोटो टाकला आणि मन जवळ जवळ 40 वर्षं मागे भूतकाळात गेलं. असंख्य आठवणींचा कल्लोळ  झाला. साले काय दिवस होते. माझे जे अनुभव आहेत, तसेच माझ्या पिढीतील अनेकांचे असतील!  त्यांच्यासाठी खास हा लेख.

आमच्या लहानपणी  तर सार्वजनिक सत्यनारायण पूजा, गणपती उत्सव व नवरात्रोत्सव  हे रस्त्यावरच्या पांढऱ्या पडद्यावर  बघितलेल्या पिक्चरशिवाय पूर्णच होऊ शकत नसत. मंडळांमध्ये स्पर्धा असायच्या कोण लेटेस्ट सिनेमा लावतो त्याच्या. त्याकाळी रात्री रस्त्यावर किंवा मैदानात  बांबूंना पांढरा पडदा बांधून प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवले जात असत. मुख्य म्हणजे फुकट असायचे. खर्च मंडळातर्फे केला जायचा. दिवसा सायकलवर  फिरून कुठे पिक्चर आहे ते बघायचे, फळ्यावर खडूने लिहून ठेवलेले वाचायचे. आठ दहा दिवस अगोदर मित्रांमध्ये पण बातम्या मिळायच्या. मग तारीख लक्षात ठेऊन जायचो. कधी विसरलो की हळहळ वाटायची. एकाच दिवशी दोन तीन ठिकाणी पूजा असली, तर मग चांगला सिनेमा जिथे असेल तिथे जायचे. तो संपला की दुसरीकडे जायच। तिकडे जेवढा मिळेल तेवढा बघायचा. गणपतीमधे 10 दिवस रोज सिनेमा असायचा. सिनेमा बघतांना मधेच पाऊस यायचा. मग आडोशाला पळायचं. प्रोजेक्टर वर छत्री नाहीतर ताडपत्री धरली जायची. त्याकाळी गणपतीत फार पाऊस असायचा. पण एखादी सर आली की थांबायचा. सत्यनारायणाच्या पूजा असतील तिथे जायचे. 

आम्ही कुठे कुठे जायचो, कसेही कुठेही बसायचो, रस्त्यावर बसायचो गोणपाट घेऊन, नाहीतर टॉवेल टाकून. अगदीच काही मिळालं नाही तर वर्तमानपत्र टाकून. किंवा नुसतेच डायरेक्ट रस्त्यावर बसायचो! त्यामध्ये कधीही लाज किंवा कमीपणा वाटला नाही आणि कोणी वाटून घेतला नाही. घरच्यांनीही कधी विरोध केला नाही.

प्रोजेक्टरचा सिनेमा बघणे ही खूप मजेशीर गोष्ट असायची! गंमत म्हणजे पडद्याच्या  एका  बाजूला लेडीज बसायच्या. तिथेच नेहमी प्रोजेक्टर असायचा आणि सगळे  जेन्टस नेहमी अपोझिट साईडला!  त्यामुळे सगळे उलटे दिसायचे, हिरोईनची साडी गुजराथी पद्धतीने नेसल्यासारखी वाटायची. सगळ्या ऍक्शन उलट्या दिसायच्या, फायटिंग उलट्या हाताची बघायची. हे सगळं नको असेल, तर बायकांच्या साईडला सर्वात शेवटी उभं राहून बघायचं. नाहीतर कडेला रेतीवर नाही तर खडीवर बसून बघावं लागायचं. ती खडी खाली टोचायची. जेवढं लांब बसू, तेवढा सिनेमा छोटा दिसायचा. म्हणून पुढे बसायचं सिनेमा बघतांना भरपूर डास चावायचे, मुंग्या चावायच्या. तरी सुद्धा नेटानं बसायचं. प्रोजेक्टर वाल्याची बडदास्त ठेवावी लागायची. त्याला चहा नाष्टा असायचा. मंडळाचे पदाधिकारी आणि पाहुणे यांच्यासाठी खुर्च्या मांडायच्या. त्यांना  टेबल फॅन असायचा. त्यांचा खूप हेवा वाटायचा!

त्यावेळी सिनेमा चालू असतांना कधी प्रोजेक्टर खराब व्हायचा तर कधी लाईट जायचे.  मग बोंबाबोंब. मधेच उंदीर किंवा घूस घुसायची, नाहीतर कुत्रे घुसायचे. मग नुसती पळापळ. स्थानिक पोरांच्या मारामाऱ्या व्हायच्या.आजूबाजूचे लाईट बंद करायला लागायचे. पिक्चर स्टार्ट करतांना रीळ लावल्यावर 6/5/4/3/2/1असे आकडे स्क्रीनवर यायचे. तेव्हा ते आकडे मोजत ओरडायचो. एक रीळ संपलं की दुसरं लावायचं… काही वेळा पिक्चरचा आवाज आणि चित्र यांचा मेळ जमत नसे. तेव्हा विचित्रच वाटायचं  ऍक्शन आधी आणि आवाज नंतर! तरी तसाच सिनेमा बघायचो.  

सिनेमांत चांगल्या डायलॉगला, फायटिंगला, गाण्याला टाळ्या शिट्ट्या मिळायच्या! मग परत रिवाइंड करून वन्स मोअर! इन्कार सिनेमातील मुंगळा गाण्याला तर तीन चार वन्स मोअर मिळायचे. तेवढ्या वेळा रिवाइंड. पडद्यावर लव्ह सीन आला की पोर बोंब मारीत … सोड सोड म्हणून ओरडत!!

केश्तो, असित सेन, मेहमूद, असरानी, जगदीप, राजेंद्रनाथ, यांच्या कॉमेडीला जाम दाद मिळायची. गाण्यावर लोक रस्त्यात नाचायचे. शम्मी, देव,  ऋषीं, अमिताभ, जितेंद्र, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या पिक्चरला खूप गर्दी व्हायची. सगळे डायलॉग पाठ असायचे लोकांचे. शोले, जंजीर, दीवार, रोटी कपडा और मकान, ज्वेलथीफ, जंगली, अदालत, दामाद, चितचोर, जॉनी मेरा नाम, तिसरी मंझिल, वो कौन थी, कालीचरण — किती नांवं घेऊ! हे सिनेमे थिएटरमध्ये एक-दोनदा आणि रस्त्यावर  असंख्य वेळा बघितले!

मराठी पिक्चर ब्लॅक व्हाईट असायचे. दामुअण्णा, शरद तळवलकर, राजा गोसावी, निळू फुले, सूर्यकांत, रमेश देव, अशोक सराफ, दादा कोंडके, रवींद्र महाजनी, सीमा, चित्रा, रेखा, जयश्री गडकर, रंजना, उमा  यांचे पिक्चर असायचे. सासुरवाशीण सिनेमा बघतांना ललिता पवार आणि निळू फुले यांना बायका चक्क शिव्या द्यायच्या. त्यावेळी ती दोघं तिथे आली असती तर त्यांनी नक्कीच मार खाल्ला असता, अशी परिस्थिती असायची.

आठवणीत रमायला झाले की मन उचंबळून येते डोळे पाणावतात. कितीतरी सिनेमे बघितलेले आठवतात.

गेले ते दिन गेले — !!

रस्त्यावर बघितलेल्या पिक्चरची मजा आता मल्टिप्लेक्सला शेकडो रुपये मोजून पण येणार नाही. आणि खिशातून पांच पैशाचे चणे दाणे खाण्याची चव फ्रेंच फ्राईजला, बर्गर आणि पॉप कॉर्नला सुद्धा येणार नाही.आताच्या मुलांना ही मजा अनुभवायला कधीच मिळणार नाही.

गेले ते दिवस. राहिल्या फक्त आठवणी !!

लेखक – अनामिक

संग्राहक – सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न पिंपळ… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

पिंपळा !

पानगळीच्या रुपानं 

तुला वरदान लाभलंय 

न पुरी होऊ शकणारी स्वप्नं 

आपोआप गळून पडण्याचं  

आणि —

काही काळानं 

पुनः नव्या असोशीनं 

स्वप्नांचं मातृत्व ल्यायण्याचं 

पण —

या तुझ्या लेकराचं काय.. 

उभ्या आयुष्यात एखादाच बहर  

अखेरचीच पानगळ .. 

त्यामुळे .. 

मी वृद्ध होण्याआधी 

माझी स्वप्नं पूर्ण कर .. 

नाहीतर .. 

नाहीतर इतक्या सगळ्या 

स्वप्नांना पुरुन उरणारं 

वृद्धत्व कुठून आणू मी ——— 

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print