मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कालनिर्णय ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? मनमंजुषेतून ?

☆ कालनिर्णय ☆ सौ राधिका भांडारकर ☆

—बारा पाने..

वर्ष संपलं. काळाचं एक पाऊल पुढे गेलं. ३१ डिसेंबर २०२१—शेवटचा दिवस. काळाच्या फडफडणार्‍या पानांबरोबर भिंतीवरचं कॅलेंडरही फडफडलं !!

खरं म्हणजे “भिंतीवरी कालनिर्णय असावे….!!”

या माध्यमातील काव्यपंक्तीनेच आपलं नव वर्षं सुरु होतं…….

” कालनिर्णय ” हा घरातला पाहुणा नव्हे, तर तो आपल्या परिवाराचा महत्वाचा घटक आहे !!

वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा सहभाग असतो.

सुट्ट्या ,सोहळे, व्रते, उपवास, प्रवास, जयंत्या, पुण्यतिथ्या, वैयक्तिक टिपणे —-.

अशा अनेक बाबींची स्मरण यादी म्हणजे कालनिर्णय— वर्षभर तो दिनविशेष सांगतो. शुभअशुभाचे ‘ सावधान ’ इशारेही देतो. “माझा नाही बुवा विश्वास..”” असं म्हणत, कालनिर्णयमधील राशीभविष्य गंमत म्हणून का होईना वाचलं जातंच. पाककृतीसाठी विविध माध्यमे उपलब्ध असली तरीही कालनिर्णयच्या महिन्यामागचं पान वाचणं हा गृहिणींचा आनंदच…!! 

संपूर्ण साहित्यमित्र— ३६५ व्या दिवशी या मित्राचा सहवास संपतो….

भिंतीवरच्या खिळ्यातून कालनिर्णय काढलं, नव्या कोर्‍या ,नववर्षाच्या कालनिर्णयाची घट्ट गुंडाळी उलगडली आणि त्याच जागी ही नवी दिनदर्शिका लावली—-

जुनं काढतांना मनात आलं, “या वर्षानं खूप सतावलं—शिकवणही दिली….नवं लावताना मनांत आशा पालवली—’ सारी इडा पीडा जुन्याबरोबर जाऊदे…’

हातातल्या जुन्याची पानं फडफडली.. क्षणांत अनेक चौकोनात केलेले शाईचे गोल दिसले. स्वअक्षरांतील टिपणे दिसली. खरं म्हणजे सारं काही होऊन गेलेलं होतं !! आता होती ती रद्दी !!   —उगीच भास झाला—-चुरगळलेली पानं म्हणत होती—” गरज सरो वैद्य मरो..!! हेच ना शेवटी—

वर्षभर तुझ्या पावलांबरोबर चाललो—साधं धन्यवादही नाही? कचर्‍याच्या टोपलीतला पुढचा गलिच्छ प्रवास सुरू होण्यापूर्वी थोडं मनांतल.!– वाईट नक्की कसलं वाटतंय् ? या घरातलं वास्तव्य संपल्याचं, की खड्यासारखं दूर भिरकावून दिल्याचं…? “

पण शेवटचं पान धीर गंभीर होतं. अधिक परिपक्व ,गंभीर ,विचारी —-त्यानं दिलासा दिला—- 

“ आग!मी कालनिर्णय आहे. कालाचे निर्णय ठरलेलेच असतात. कुठलीही स्थिती स्थिर नसते.जुनं जातं—

नवं त्या जागेवर येतं..झाडावरची पानं नाही का गळत? तेव्हांच नवी पालवी फुटते. अन् जीवन 

पुन्हा बहरतं !! नव्या आशा – नवी उमेद – जुन्याला निरोप ,नव्याचे स्वागत..!!

तुझी भिंत सोडून जाताना मीही उदास आहेच ! All partings in life are sad indeed—

पण मी तुझ्या स्मृतीत असेनच—निरोपाचा हात हलवताना इतकंच म्हणेन,” नव वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !! 

“ शुभास्ते पंथान:….!!!  धन्यवाद “कालनिर्णय २०२१ ” !!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ -पदर- ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

? मनमंजुषेतून ?

☆ पदर ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

रविवार होता त्या दिवशी, मी प्रथमच पाहिले होते त्यांना..

त्या घरात प्रवेश करीत होत्या..आबांसोबत विवेक व विलासदादांसोबत..

पहायला आल्या होत्या त्या आमच्या बिंबाला–अदबीनं सावरत होत्या त्या– 

डोईवरला तो आपला पदर..!

 

मग पसंती..शकुनाची देणी-घेणी..वाडःनिश्चय-विवाहाची बोलणी

संबंधित नातेवाईकांची यादी– मी पाहिलं डोळ्यांच्या कडेनं,

जराशा झटक्यानंच लगबगीनं ओढून घेतला होता—

माईंनी तेव्हाही आपला पदर..!

 

नंतर आमंत्रणं..लगीनघाई–मिरवल्या होत्या मनसोक्त

थोरल्या लेकाच्या लग्नात..ठसक्यात,सासूबाईंच्या तोर्‍यात..

आठवणीत राहिला झळाळणारा—

तो रुंद काठाचा जरतारी पदर..!

 

ढग्यांची बिंबा आता राधिका झाली–

राधिका राधिका म्हणून माईंच्या सावलीत वावरू लागली..

मग सासूरवाशीणीला जवळचा,आधाराचा वाटला होता तो

माईंचाच…मायेचा पदर..!

 

अमळनेरच्या भल्या मोठ्या घरात–घर कसलं हो–चिरेबंदी वाडाच तो..

माणसांचा रगाडा..होता दबदबा–होते नोकर-चाकर फार–कधी शेतकामाचा भार

कामे वाटून सांगतांना..सूचना-सल्ले देतांना–खोचलेला असायचा

कमरेला तो माईंचा पदर..!

 

मग कधी समारंभ–पूजा-अर्चा..लग्न सोहळे–प्रसंगोत्तर माई भेटत..

दरवेळी वयाची बेरीज होतांना दिसलेल्या–काहीशा पाठीत झुकत चाललेल्या..

पण माईंच्या डोक्यावर डौलात दिसायचा मात्र..

तो सोनेरी भरजरी पदर..!

 

माईंच्या घट्ट बांध्याला, मोहक हसर्‍या गौरवर्णी रुपाला..

खानदानी घरंदाज व्यक्तिमत्वात भर घालणारा साजेसाच होता,

नेहमीच त्यांच्या डोईवरला तो पदर..!

 

लेका-बाळांच्या,सुना-नातवंडांच्या अखंड स्मरणात राहील

तो हरवलेला……तरीही ममतेचा वात्सल्याचा जिव्हाळ्याचा

माईंचा तोच मायेचा ऊबदार पदर..!!!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत- भाग- दुसरा … बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग दुसरा… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(‘तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतात’.) — इथून पुढे —– 

वस्तू जागच्या जागी हव्यात, अंधारातही हात घातला तर ती वस्तू तिथेच सापडली पाहिजे ‘ हे  बरोबरच आहे. पण कधी कधी पसाराही हवासा वाटायला लागला आहे. नाही, खरंतर कधीतरी आळस करणंही ठीक आहे हे पटायला लागलंय. 

ज्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केलं, आपल्या गरजा बाजूला ठेऊन, स्वतः पलिकडे जाऊन ज्यांच्यासाठी केलं ती माणसं आपली आठवणही काढत नाहीत हे बघून पूर्वी त्रास व्हायचा. नंतर नंतर बाबांच्या ‘ करावं आणि रस्त्यावर ठेवावं. नाही तर घेणाऱ्याच्या डोळ्यातली लाचारी आपला अहंकार फुलवते ‘ या वाक्याचा अर्थ कळला. खरंच आपण आदर, सन्मानाच्या आधीन होत जातो, demanding होत जातो. मग तो नाही मिळाला की त्रास होतो. आता सत्पात्री दानाबरोबरच गुप्त दानाचा अर्थ आणि त्यातला निरपेक्ष आनंदही कळलाय. कारण मदत आपण दिलीये हे नकळता मदत मिळाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या डोळ्यात आपली मदत घ्यावी लागल्याची लाचारी दिसत नाही. 

मी सहसा कुठल्याही भौतिक सुखात अडकणारी नाही. सकाळीच काय कित्येक दिवस चहा कॉफी नाही मिळाली तरी माझं डोकं दुखत नाही. हौसेनी जमवलेल्या क्रोकरी सेटमधलं काही फुटलं तरी समोरच्याला लागलं नाही न हे मला कायमच महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. असं कितीतरी. 

पण तीन मोह मात्र अजून सुटता सुटत नाहियेत. भाजी, क्रोकरी आणि पुस्तकं हे माझे weak points. कपड़े, दागिन्यांच्या दुकानात न्या, सहसा फरक नाही पडत. पण साठी झाली तरीही एकटी असून भाजीचा, घरात जागा नसूनही क्रोकरीचा आणि हातात मोबाईल असला तरी पुस्तकांचा नाद काही सुटता सुटत नाहिये. तो तेवढा कसा सोडवावा हे कळत नाहीये, खरं तर सोडावासा वाटत नाहीये. कारण तो निरुपद्रवी आहे. असो. ते एक माझ्या माणूस असण्याचं, जिवंतपणाचं लक्षणच समजू या. थोडक्यात स्वतः पलिकडे जाऊन दुसऱ्याला प्लीज करण्याच्या अट्टाहासातला फोलपणा लक्षात आला आहे. 

वादातला निरर्थकपणा लक्षात आलाय. कलेतल्या स्वानंदधनाचा ठेवा सापडलाय. त्यामुळे लोकं ज्या वयात हातातून सगळं निसटतंय म्हणून खंतावतात, त्या वयात मी आनंदी आहे. 

हे सगळं अंगी बाणताना त्रास झाला, हो झालाच. पण आज मागे वळून बघताना समाधान वाटतंय. कारण त्यानी मला जसं निर्माण केलंय त्या माझ्या अस्तित्वाशी मी प्रामाणिक आहे.  एवढंच नव्हे तर तर वेळोवेळी त्यात चांगल्या गोष्टींची भर घालत स्वतःला समृध्द करत जगतेय. उठसूट त्याच्याकडे मागण्या, तक्रारी घेऊन जात नाही. पण त्याला ‘Thank you’ म्हणायला मात्र कधीच विसरत नाही. 

आता निवृत्ती घेतेय म्हणजे सगळ्यातून संन्यास घेणार का? तर तसं मुळीच नाहीये. उलट काही बंधनं शिथिल करून मजेत आयुष्य जगणार आहे . गेली कित्येक वर्षं बंद केलेलं socialization परत सुरू केलंच आहे, ते वाढवणार आहे . ( पण कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतः पलिकडे जाऊन मदत करणार नाही ). मग टपरीवर वडापाव खाणं असो की five star मधे जाणं असो, की आप्त इष्ट जमवून, गप्पा छाटत, midnight snacks, चहा कॉफी घेत रात्रभर धमाल करणं असो.

कोणी सांगितलं. याच्याशी बोलू नको, अमुक करू नको, तर म्हणेन, तू सांगितलंस म्हणून बोलीन किंवा नाही बोलणार; करीन किंवा नाही करणार असं काहीही होणार नाहीये. कारण दोन्ही प्रकारात मी कुठे असेन? तुलाच किंमत दिल्यासारखं होईल. मला वाटेल तिथपर्यंत बोलीन, करीन, मला वाटलं की थांबीन.

तसंच, कोणाचा गैरसमज झालाय असं दिसलं तर २-३ वेळा स्वतःहून बोलायचा प्रयत्न करीन. त्यानंतर ‘Leave it, Forget it’.  मी कोणाला emotional blackmail केलं नाही, आणि आता मीही होणार नाही. अपना फंडा तो भई ‘ Live, and Let Live ‘. ‘ Enjoy and let Enjoy ‘ वाला है —–

समाप्त.

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत – भाग-पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग पहिला… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

नोकरी नसणारी मी कशातून निवृत्ती घेणार आहे असा प्रश्न पडला नं ! पण तुम्हीच विचार करा, नोकरी व्यतिरिक्तही आपण नात्यातील, समाजातील कितीतरी जणांची वैचारिक ताबेदारी करत असतो. 

‘My Life, My Rules’ हा फंडा उशिरा कळला. आणि साठी पूर्ण होतेय, तेंव्हा निवृत्तीचे विचार घोळायला लागले. कशा कशातून निवृत्ती बरं?—-

सगळ्यात पहिली निवृत्ती वैचारिक ताबेदारीतून. विचार मांडणारा कितीही महान असला तरीही त्याचा विचार मनाला रुचला, प्रकृतीला पचला, प्रवृत्तीला झेपला तर आणि तरच स्वीकारायचा. अन्यथा ‘Sorry Boss’ 

आपल्या आजूबाजूचे लोक, मीडिया ‘ह्या वयात अमुक खा, त्या वयात तमुक होतं’, असं सांगायला लागले, की मी माझ्या मनाला ‘Cancel, Cancel, Cancel’– ‘इदम् न मम’- ‘हे माझं नाही, माझ्यासाठी नाही’ असा संदेश ठळकपणे पाठवत रहाते. कितीतरी ८०-९० वर्षाची माणसं fit n fine असतातच की. मी त्यांच्याकडे बघते. 

बरेच जण आपला हेतू साध्य करण्यासाठी खोटी कारणं दाखवून emotional blackmail करतात. आता अशी माणसं ओळखू येऊ लागली आहेत. त्यांच्यापासून जरा लांब. दुसऱ्यासाठी निर्णय घेऊन स्वतःवर कलंक घेणं बंद. 

आपल्या कपड्यांवरून, sophisticated वागणुकीवरून कोणी जज करू लागलं तर समजावण्यात वेळ घालवत बसायचं नाही आणि आपले कपडे, वागणंही बदलायचंं नाही. ठसठशीत कुंकू आणि ५-१० तोळ्याचं मंगळसूत्र घालणारी बाई पतिव्रता असतेच असं नाही, हे कळण्याएवढा अनुभव आता नक्कीच गाठीशी आहे. 

पुर्वी कोणी नमस्कार केला तर सांगत असे, ‘ निव्वळ वयानी मोठी आहे म्हणुन वाकू नकोस, ज्या दिवशी ‘ नमस्कारासाठी मी योग्य आहे ‘ असं मनापासून पटेल त्या दिवशीच वाक ‘. कारण त्यातला फोलपणा आणि कधी कधी असलेला दांभिकपणा समजायला लागला होता. पण आता कोणी कशाही भावनेनी वाकलं तरी मनापासून शुभाशीर्वाद देते. वाकणाऱ्याची भावना काही का असेना, माझा ताबा माझ्या भावनेवर. ती स्वच्छ असली म्हणजे झालं.

लोकं नाही नाही ते आरोप करतात, मागे बोलतात, समोर येऊन विचारत नाहीत. अशावेळी पूर्वी स्वतः जाऊन स्पष्टीकरण देत असे. पण ‘ तुमचा खरेपणा अगर चांगुलपणा सिद्ध होण्यापेक्षाही लोकांचं स्वतःच्या मतावर जास्त प्रेम असतं. ते चुकीचं ठरणं त्यांना परवडणारं नसतं ‘, हे कळल्यावर, ‘ Don’t give explanation. Your friends don’t need it and others don’t believe it ‘ हे स्वानुभवाने तंतोतंत पटलं. 

मला गॉसिप कधीच करता आलं नाही. मागे जर काही बोललेच तर ते त्या त्या माणसाच्या समोर बोलू शकेन असंच असतं. त्यामुळे कोणी मला निरस समजतात, ‘ गॉसिप नाही तर काही मजा नाही. तू रिस्क घेत नाहीस ‘, असं म्हणतात. पूर्वी असं ऐकलं की चिडचिड व्हायची, वाईट वाटायचं. पण लवकरच त्यातली मजा कळायला लागली. कोणी चुकून जरी माझ्या नावावर काही बिलं फाडायचा प्रयत्न केला तरी त्याचा तोच तोंडघशी पडतो. 

पूर्वी गैरसमज पोसत बसलेल्या माणसाशी वाद घालायची, कधी त्या माणसाकडेच पाठ फिरवत असे, ग्रुपमधे असले तर ग्रुप सोडून देत असे. नंतर आपला राग थोडा शांत झाल्यावर सारासार विचार करून त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करत असे. आता माझं मत मांडते आणि बाजूला होते. कोणी समजून घ्यायला, चर्चा करायला आलं तर बोलते. मात्र कोणी गैरसमज करून घेतले, ओढवून घेतलं, तर चक्क ‘Carry on’ चा green signal देते. 

‘ मला एक से एक शिव्या येतात ‘ हे गर्वानी बोलणारे पुरुषच नव्हे तर स्त्रियाही बघितल्या, तेव्हा 

‘ तू पुस्तकी बोलतेस ‘ ह्या हिणवणाऱ्या वाक्याचं वैषम्य वाटणं बंद झालं. आता ठासून सांगते,

 ‘ तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या    कुबड्या घ्याव्या लागतात ‘. 

क्रमशः,,,,

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कांदा….शिरीष लाटकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

कांदा….शिरीष लाटकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

“ मित्रा .. जरा कांदा घेतोस .. ?”

आमच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या माणसाने आवाज दिला ..

तसा वेटर विनम्रपणे त्याच्याजवळ आला …” सर … चॉप करून देऊ की पिसेस मध्ये … ?”

तसा तो बेफिकीर स्वरात म्हणाला …” आण कसा ही ….” 

आणि पुढच्याच क्षणी माझी मान गर्र्कन वळली ..चेहऱ्यावर कमालीची नापसंती … कपाळावर ठळक आठी …

समोर बसलेल्या दीपाने माझा नूर अचूक ओळखला …हातावर हात ठेवत म्हणाली …” असू देत … जेव शांतपणे …सगळ्यांचे तुझ्यासारखे नखरे नसतात …”

आता मी तिच्याकडे रोखून पाहिलं .. तशी ती गालात हसली …स्त्री धर्माला अनुसरून तिने टोमणा मारायची अचूक संधी साधली होती ..

मी दबक्या पण ठाम आवाजात म्हणालो …“ नखरे नाही .. ह्याला रसिकता असं म्हणतात …” 

दीपाने नुसतीच मान हलवली … पटलं होतं की नाही .. कुणास ठाऊक .. ?

अर्थात तिच्यासाठी हे नेहमीचं होतं म्हणा …खाण्यापिण्याच्या बाबतीतला माझा चोखंदळपणा तिला पुरेपूर माहितीय ..उगाचच ‘जाणिजे यज्ञकर्म’ म्हणून खाणाऱ्यांमधला मी नाही … उलट ‘आधी रसने भुलविले – मग उदर शमविले’ (हा माझाच श्लोक आहे .. वेदपुराणात शोधू नये) या कॅटेगिरीमधला मी आहे …  ‘ खाण्याच्या बाबतीत चवीशी तडजोड होऊ शकत नाही …’ असं माझं ‘भीष्ममत’ आहे ..

आणि कांदा हा चव वाढवणाऱ्या समस्त गोष्टींमध्ये अग्रस्थानी आहे … यात शंका नाही .. कांदा हा जगातला असा एकमेव पदार्थ आहे .. जो कसा चिरलाय, यावरून तो कशाबरोबर खायचा हे ठरतं.

नाही कळलं … ? एक मिनिट … समजावून सांगतो …

एकच कांदा वेगवेगळ्या पद्धतीने चिरला की त्याची चव वेगवेगळी लागते ..

म्हणजे बघा .. पावभाजी सोबतच कांदा …हा साधारण पाव सेंटीमीटरच्या आकारात एकसारखा चिरलेला हवा ..कांदा असा चिरला की त्याला हलकासा रस सुटतो …. हा रस भाजीच्या तिखटपणाला अचूक छेद देत तिची गंमत वाढवतो …  

मिसळीचा कांदा .. तो ही खरंतर बारीक चिरलेला …. पण त्यात वरच्यासारखी एकसंधता असता कामा नये ..काही तुकडे लहान हवेत … काही किंचित मोठे हवेत .. !मिसळीत असूनही कांद्याने आपली आयडेंटिटी टिकवली पाहिजे … तर मजा आहे …. तर्रीत तरंगणारी मिसळ खाताना कांद्याचा एखादा किंचित मोठा तुकडा दाताखाली येतो तेव्हा जी अनुभूती येते ती निव्वळ अवर्णनीय.

बऱ्याचदा जेवणात आपण गोल चकत्या केलेला कांदा घेतो …दातांना चाळा आणि जिभेला ब्रेक म्हणून ठीक आहे …पण माझ्या दृष्टीने त्याची फार मोठी ओळख नाही ..म्हणजे भारताच्या राजकारणात अण्णा हजारेंच्या उपोषणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व या कांद्याला जेवणात असतं .,.

त्यापेक्षा मद्यपान करत असताना सॅलडमध्ये असलेला हाच गोल चकतीचा कांदा जास्त रंगत आणतो …. मद्याची कडवट चव जिभेवर असताना हा कांदा जिभेवर चुरचुरला की पिण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं …

ताटात वाढली जाणारी कांद्याची अजून एक पद्धत म्हणजे ‘कंटाळकांदा’…. जेवणाची ताटं वाढलेली असताना नवऱ्याने ऐनवेळी कांदा मागितला की बायको रागाने कांद्यावर वार करून त्याच्या चार फोडी करते आणि वाढते .. त्याला ‘कंटाळकांदा’ असं म्हणतात …हा प्रकार आपल्याकडे विशेष लोकप्रिय आहे … कारण तो सोपा आहे ..पण मला तो केविलवाणा वाटतो …एखादा नको असलेला मुलगा आपल्या ग्रुपमध्ये शिरला की कसं फिलिंग येतं .. अगदी तसं फिलिंग हा कांदा देतो … अशा प्रकारे चार तुकडे करून कांदा देणारी हॉटेल्सही मला फार रुचत नाहीत …कारण त्यात प्रेमाने खाऊ घालण्यापेक्षा कर्तव्य उरकल्याची भावनाच जास्त असते ..

ताटातलं खाद्य बदलेल … तसं कांद्याचं रूप बदलून वाढतो .. तो खरा …. म्हणजे कधी कधी तुम्ही तंदूर ऑर्डर करता आणि त्या सोबत एक विलक्षण इंटरेस्टिंग कांदा येतो …. हा कांदा पाकळी पाकळी वेगळी करून सर्व्ह केला जातॊ ….. तंदूरमधल्या बटाट्यापासून .. पनीरपर्यंत आणि चिकनपासून शीख कबाबपर्यंत प्रत्येकाशी याची सलगी असते … अर्धवट खरपूस भाजलेला .. तंदूरच्या मसाल्यात चिंब झालेला आणि आपल्या सोबत्याला (पनीर / चिकन) घट्ट बिलगलेला पाकळीचा कांदा म्हणजे स्वर्गसुख … ! तो टाळून इतर कुठलाही कांदा तंदूरसोबत खाणारे खाद्यनगरीचे गुन्हेगार आहेत .. असं माझं स्पष्ट मत आहे …

अर्थात तंदूरबरोबरचा हा कांदा बटर चिकनबरोबर अजिबात शोभत नाही …किंबहुना कुठल्याच पंजाबी डिशसोबत शोभत नाही …तिथे व्हिनेगर मध्ये बुडवलेला हलकासा लालसर झालेला आंबटसर अख्खा कांदाच हवा …घी मध्ये शब्दशः न्हायलेली बटर चिकनची डिश .. गरम गरम नानच्या तुकड्यासोबत तिचा घास घ्यायचा आणि मग एकच चावा घेऊन अर्धा कांदा फस्त करायचा …

देवा … सुखाची परमोच्च कल्पना … त्या क्षणी देवाने उचललं तरी मोक्ष मिळेल अशी स्थिती ..

हो पण … याच बटर चिकनची जागा जेव्हा कोल्हापुरी मटण घेतं .. तेव्हा कांद्याचं रूप ही निर्विवादपणे बदलतं … तिथे झणझणीत पांढऱ्या तांबड्याबरोबर गोड दह्यात सराबोर असलेला उभा चिरलेला कांदाच तोंडी लावायला हवा .. आणि कोल्हापूरचं मालवण झालं की हाच गोल चिरलेला कांदा लिंबाच्या रसात कुस्करून खोबऱ्याच्या हिरव्या चटणीबरोबर वाढला जायला हवा.  …

आणखी एक महत्वाचं …… 

जेव्हा चुलीवरची भाकरी … भरली वांगी आणि झुणका ताटात सजतो .. तेव्हा कांदा चिरण्या – कापण्याच्या आणि सोलण्याच्या फंदात पडूच नये … जमिनीवर ठेवावा नि हाताने उभा चेचावा ..

हो .. पण यातल्या बाहेरच्या पाकळ्या खायच्या नाहीत हां …मधली कोवळी पाकळी खायची फक्त ….. तुम्हाला सांगतो .. शहाळ्यातली मलई झक मारेल ..

एकूण काय … ‘ जैसा देस वैसा भेस ‘च्या धर्तीवर … जसं जेवण तसा कांदा !  

तेव्हा यापुढे हॉटेलात काय किंवा घरी काय– ‘आण कसाही ‘ म्हणायची चूक करू नका ..

चोखंदळ रहा … अहो … शास्त्र असतं ते … !

 

– शिरीष लाटकर

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

दर वर्षी अमेरिकेचा दौरा होतोच. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातीच्या शाळेला सुट्टी असली तरी मुलीला जावयाला ऑफिस असतेच. मग मी नातीला बघायला, तिची शाळा सुरू होईपर्यंत USA मुक्कामी असते.

ते दिवस मोठे सुंदर असतात.  उन्हाळा सुरू झालेला, पण उबदार उन्हाळा. झाडे नव्याने हळूहळू छान फुलून येतात.

एकदा फिरताना मुलीच्या कम्युनिटीमध्ये काही घरांसमोर निळे फुगे लावलेले दिसले. कुतूहलाने विचारले, ” हे कसले ग फुगे?” 

मुलगी म्हणाली, ” अग पुढच्या आठवड्यात गराज सेल आहे ना–त्याची खूण आहे, की लोकांना समजावे–इथे आहेत सेलच्या वस्तू.” 

मी हरखून गेले आणि म्हटले, ” अदिती मला  केव्हाचा बघायचाय ग हा सेल. खूप ऐकलंय याविषयी.” 

अदिती हसायलाच लागली. म्हणाली, ” आई, मागच्या खेपेला वृद्धाश्रम बघून झाला.  आता या वेळी गराज सेल ? ” 

” हो, अनायसे आलेच आहे, तर नेच मला. “

 ती कबूल झाली. छोट्या आद्याला जावयाने सांभाळायचे कबूल केले आणि त्या रविवारी आम्ही गराज सेल बघायला निघालो.

तिच्या कम्युनिटीत जवळजवळ आठशे बंगले आहेत. आम्ही कारने जिथे फुगे दिसतील तेथे थांबत होतो—प्रत्येक ठिकाणी किती व्यवस्थित सामान लावले होते–गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकाच्या गराजमध्ये आणि समोरही खूप जागा असते. तिथे नको असलेले सामान ठेवले होते. समोर खुर्ची टाकून मालक किंवा मालकीण बाई बसल्या होत्या. किती प्रकारचे सामान  हो।

मुलांची खेळणी-अगदी नवी चकचकीत असावी अशी, पुस्तके, क्रोकरी, काय नव्हते तिथे ?  अगदी  फ्रीज-टी.व्ही. सुद्धा बघितले. मला इतकी मजा वाटत होती.

हा सेल शनिवार-रविवार असतो. त्यासाठी आधी  कम्युनिटीची नाममात्र फी भरावी लागते, मगच ते विशिष्ठ फुगे देतात. दोन्ही दिवस ९ ते १ पर्यंत वेळ असते. १ वाजता सेल बंद होतो.

खूप लोक या सेलमधून  संसारोपयोगी वस्तू घेतात. कोणीही मोडके तोडके असे काहीही ठेवत नाही. आणि अगदी नाममात्र किमतीत हे मिळते. 

उद्देश फक्त एकच —आपल्या वस्तू  हलवणे,  ज्यांचा आता घरमालकाला उपयोग नसतो. मुले मोठी झाली की खेळणी पडून राहतात. मोठा tv घ्यायचा तर आधीचा कुठे ठेवणार? आपल्या इकडच्यासारखा exchange तिकडे नाही.

अशीच फिरताना मला माझ्या खूप आवडत्या, सिडने शेल्डनची कोरी पुस्तके दिसली. मोठे खोके भरून बाहेर ठेवली होती. केवढा आनंद झाला सांगू—लेक म्हणाली,” बाई ग ही सगळी घेणारेस की काय ? बॅगेचे वजन माहीत आहे ना ?”

मी सरळ खाली वाकून ती बघू लागले. किंमत फक्त 1 डॉलर लिहिली होती. मला इतका आनंद झाला. जवळ आरामखुर्चीवर एक खूप म्हाताऱ्या बाई विणत बसल्या होत्या.

मी त्यांना ‘ हलो ‘ म्हटले आणि विचारले,” बघू ना ही मी पुस्तके?”

त्या म्हणाल्या ,” बघ की. कुठून आलीस ? इंडियातून का ? ” मी ‘ हो ‘म्हटले. माझ्या खांद्याला लोकरीची विणलेली सुंदर स्लिंग बॅग होती–माझ्या आईने विणलेली.  त्यांनी ती बघितली आणि म्हणाल्या, ” मी ही बॅग बघू का ?”

मी म्हटले, ” हो,बघा ना. माझ्या आईने विणलीय. तिला खूप हौस आहे विणायची. तुमच्या एवढीच आहे ती आता. “

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “ मी ८९ वर्षाची आहे. माझ्या मुलाचे हे घर आहे. तोही आता ६५ वर्षाचा आहे. कोण कोणाला सांभाळणार ? मी आपली  वृद्धाश्रमात राहते. इकडे अशीच पद्धत आहे. तेच बरेही पडते. चांगला आहे मी राहते तो वृद्धाश्रम. “ 

त्यांनी माझी स्लिंग बॅग नीट बघितली– “ छानच विणली आहे “ म्हणाल्या.

मी पटकन ती रिकामी केली. अदितीच्या purse मध्ये माझे सामान टाकले आणि त्यांना म्हणाले, “ घ्या ही तुम्हाला .नवीनच आहे हं. मी इकडे येणार म्हणून आईने नवीन विणून दिली.”  त्या खूप संकोचल्या..  ‘नको नको. मी सहजच म्हटले अगदी.’ असं म्हणत राहिल्या. 

“ पण तुम्हालाही आवडते ना विणायला, म्हणून देतेय,”

त्या खुश झाल्या.  म्हणाल्या “ थँक्स डिअर. आता मी अगदी अशाच विणून माझ्या वृद्धाश्रमातल्या मैत्रिणींना देईन.: मला सांग, तू  इकडे का आली आहेस ? “

“ ही माझी मुलगी. तिला छोटी मुलगी आहे ४ वर्षाची. तिला सुट्टीमध्ये सांभाळायला  मी आलेय.” 

“  थांब हं जरा “ असं म्हणत त्या तुरुतुरु आत गेल्या आणि एक भलेमोठ्ठे  टेडी बेअर घेऊन आल्या. अदितीच्या हातात देऊन म्हणाल्या, “ नवीनच आहे हं हे. माझा नातू मोठा झाला त्याचे आहे. घे तुझ्या बेबीला. खेळेल ती याच्याशी. याचे नाव ब्लु बेरी आहे बरं का–माझ्या नातवाने ठेवलंय ते. “ 

आम्ही संकोचलो आणि म्हणालो, “ नको हो. उगीच कशाला ? “ 

पण त्यांनी ते परत घेतले नाही. उलट म्हणाल्या, ”तुझ्या आईला सांग, खूप छान विणतात त्या. मला एक गोड गिफ्ट मिळाली इंडियातून–थँक् यू सो मच–हे कसे म्हणतात तुमच्या भाषेत?” 

मी म्हटले,” आभारी आहे “ 

त्या म्हणाल्या, “ आईला सांग आभारी आहे “ 

आम्ही त्यांचा निरोप घेतला. अदितीने त्यांचा फोन नंबर घेतलाच होता. 

म्हणाल्या,” कधी जमले तर ये ग मला भेटायला आईला घेऊन माझ्या वृद्धाश्रमात. “ 

आम्ही घरी आलो. आद्याने  टेडी बघताक्षणीच कडेवर घेतले. त्याचे नाव विचारले.आणि त्या ब्लु बेरीशी जी काय दोस्ती तिने केली की विचारू नका. २४ तास ते तिच्या बरोबर।–अगदी 

झोपताना जेवतानासुद्धा. 

मी भारतात परत आले. एकदा फोनवर बोलताना अदिति म्हणाली, 

“ आई,त्या जेनी आजी गेल्या ग. मी त्यांना भेटायला गेले होते एकदा तेव्हा तुझी चौकशी करत होत्या. झोपेतच गेल्या म्हणे. त्यांच्या मुलाने कळवले मला. “ 

–मला वाईट वाटले. त्यानंतर जेव्हा केव्हा मी गराज सेल बघते, तेव्हा त्या गोड, निळे डोळे असलेल्या, पांढरेशुभ्र कापसासारखे  केस असलेल्या, बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जेनी आजीची आठवण येते.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी रिटायर होते… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ मी रिटायर होते… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

न स्त्री-स्वातंत्र्यमर्हति

एकविसाव्या शतकातही स्त्रिया हेच भोगती

पण मी मात्र ठरवलं—

आपण रिटायर व्हायचंच  (1)

 

सासुबाई म्हणाल्या, काय हा अगोचरपणा,

नात सून आली तरी ताठ त्यांचा कणा

तू सून माझी झालीस आता “सासू”

रिटायरपणाचं तुझ्या येतंय मला हासू (2)

 

दीर जाऊ म्हणाले दिवाळी तर होऊ दे

फराळ तुमचा असतो खमंग

स्तुतीने त्यांच्या भुलले नाही

साऱ्याचाच मला आला आहे उबग (3)

 

नणंद म्हणाली “थांब ग वहिनी “

तुझ्याविना सुने आहे माहेर

पेलवत नाहीत बाई आता 

तिचे शालजोडीतले आहेर (4)

 

भाचा भाची म्हणाले “मामी 

येतेस नेहमी कामी धामी “

नका देवू उसना सन्मान

निर्णय पक्का उघडा कान (5)

 

लेक आली, जावई म्हणाले

तुमच्या हातची चवच आगळी

पाऊल थोsडस्स अडखळलं

दारात उभी पाहून सगळी (6)

 

मुलगा आला सून म्हणाली

काय चुकलं ते तर सांगा

नका करू घाई फार

थोडे दिवस आणखी थांबा (7)

 

हयांना देखील बधले नाही, 

मागे वळून पाहिले नाही

सर्वांसाठी झिजले आजवर

अंगाची होते लाही लाही (8)

 

धापा टाकत “नात” आली

“आजी” म्हणून मिठी मारली

सोडून मला गेलीस तर

शपथ तुला आहे म्हणाली (9)

 

खाणार नाही पिणार नाही

गोष्टींवाचून झोपणार नाही

आळीमिळी गुपचिळी

मुळीसुद्धा बोलणार नाही (10)

 

शहाणी माझी आजी

मला म्हणते हट्टी

शपथ नाही सुटली तर 

तुझी माझी कायम कट्टी (11)

 

निरागस अश्रूंनी तिच्या 

मन माझं विरघळलं

पापे घेता “शप्पथ सुटली”

नकळत पाऊल मागे वळलं (12)

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लोककथा ७८ ☆ सुलू साबणे – जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ लोककथा ७८ ☆ सुलू साबणे – जोशी ☆

“लोककथा ७८” 

शोषितांच्या व्यथा मांडणारं – एका घटनेवर आधारित – “लोककथा ७८” हे श्री.रत्नाकर मतकरी लिखित नाटक ‘बालगंधर्व रंगमंदिरा ‘त होणार होतं. मी आणि अशोक डेक्कन जिमखाना बस-स्टँडवर उतरून ‘बालगंधर्व’ कडे चालत निघालो.  रंगमंदिराच्या बरंचसं अलिकडेपासून भिकार लोकं ठिकठिकाणी अर्धेउघडे, कळकट, हातात गाठोडी, अलमिनची भगोली, काठ्याबिठ्या असं किडुकमिडुक सामान घेऊन – खूप चालून आल्यावर दमून अंग टाकतात, तशी दिसू लागली. असे पोटासाठी भटकत फिरणारे तांडे दिसायचे/ दिसतातही अजून अधूनमधून ! तर ही माणसे पार रंगमंदिरांतसुद्धा आडवारलेली दिसली. त्यांचं अवतीभंवती लक्षच नव्हतं. तेवढं त्राणही त्यांच्या अंगात दिसत नव्हतं. समजेचना काही. अशा राजरस्त्याला असा तांडा कधी थांबत नाही. हे लोक कसे, मोकळ्या जागेत, तेही पाणवठ्याकाठी, पण एकत्र दिसत. मनात आलं, यांना कुणी हटकलं कसं नाही? एकीकडे त्यांची अवस्था बघवत नव्हती. पहिली घंटा झाली. आम्ही अस्वस्थ मनाने आत जाऊन बसलो. तिसरी घंटा झाली, पडदा सरकत गेला— आणि मागच्या दारांमधून हे सर्व ‘भिकार’ लोक  आवाज न करता प्रेक्षकांतून चालत रंगमंचावर पोहोचले– आणि नाट्यप्रयोग सुरू झाला. प्रयोग तर  जीवघेणा सुंदर झाला. संपल्यावर सर्व प्रेक्षागृह खिन्नमनस्क,  सुन्नमनस्क अवस्थेत बुडून गेलं होतं. लेखक मतकरींनी दिग्दर्शनातही बाजी मारली होती. या नाट्यप्रयोगाने ठराविक साचा मोडला, रंगमंच आणि प्रेक्षागृहातल्या अदृष्य भिंती नष्ट केल्या– आणि हे नाटक अंगावरच आलं. मनाचा ठाव घेऊन ‘गेलं’, असं म्हणणार नाही, पण ते तिथं ठाव मांडून बसलंय, हे इतक्या वर्षांनीसुद्धा जाणवतं आहे – अशा वयांत, जेव्हा नावं, संदर्भ, सगळं सगळं पुसट होऊ लागतं – तेव्हा श्री. मतकरी आपल्याला किती विविध गोष्टींशी कायमचे जोडून गेलेत आणि आपल्या जाणिवा आणि आयुष्य समृद्ध करून गेलेत, हे लक्षांत घेऊन नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली !!!

 

— सुलू साबणे – जोशी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आठवणींचा कलश ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ आठवणींचा कलश  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आयुष्य जसं वाढतंय तसतसा हा आठवणींचा कलश भरत चाललाय ! मला तर  पाण्याच्या रांजणात खडे टाकणाऱ्या कावळ्याच्या गोष्टीची आठवण येते ! रोजचा प्रत्येक क्षण आपण जगतो आणि ते क्षणरत्न या कलशात जमा होते ! काही अनमोल क्षणांची रत्ने त्या कलशात साठून राहतात ! माझ्या मनाच्या अवकाशात त्यातील काही प्रसंग कायमचे चितारलेले राहिले आहेत. तसाच हाही एक प्रसंग मनात अनमोल म्हणून राहिला आहे ! जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्या क्षणाला !

माहेर आणि तिथली माणसं- आई -वडील, भाऊ- बहिणी नेहमीच आपल्याला जवळचे असतात.  सुखदुःखात काळजी घेणारे, साथ सोबत करणारे ! लग्न होईपर्यंत आपण त्या कुटुंबाचे घटक असतो, पण लग्नानंतर स्त्रीचे विश्व बदलते. आई चे घर ‘ माहेर ‘ बनते. विसावा देणारे ! आज मला माझ्या पाठीराख्या भावाची आठवण येतेय ! 

पहिले बाळंतपण माहेरी, या प्रघाताप्रमाणे माझं पहिलं बाळंतपण आईकडे पार पडले. दोनच वर्षांनी पुन्हा अपत्याची चाहूल लागली आणि यावेळेस आपल्याच घरी बाळंतपण करुया असं ठरलं ! सासुबाई आणि आई आलटून पालटून मदतीला येणार होत्या. पण आपण ठरवतो तसं होतंच असे नाही. खरं तर आपल्या ठरवण्यापेक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार गोष्टी घडत असतात ! तसंच झालं ! मला नववा महिना लागला आणि अचानक ह्यांच्या बदलीची ऑर्डर आली ! आम्हाला एकदम प्रश्नच पडला ! आता ह्यांना हजर व्हावे लागणार, तसेच लवकरच क्वाॅर्टरही सोडावा लागणार ! डिलिव्हरी तर अगदी जवळ आलेली काय करायचं? असा  प्रश्न पडला. मोठा प्रवास करणे शक्यच नव्हते. बदलीचे  गाव लांब होते. तसेच तिथे क्वार्टरही लगेच मिळणार नव्हता. पण देवालाच काळजी ! दिवाळी जवळ आली होती. भाऊबीजेला भाऊ आला होता. त्याचदरम्यान या बदलीच्या गोष्टी झाल्या ! तेव्हा त्याने एका क्षणात प्रश्न सोडवला ! तू माझ्याकडे फलटणला ये बाळंतपणाला ! काहीच प्रश्न नाही. त्याची छोटी मुलगी आणि वहिनीची नोकरी यामुळे आई तिथेच होती. मोठ्या वहिनींचे बाळंतपणही नुकतेच तिथे झाले होते. दोन महिने झाले होते आणि ती आता माहेरी जाणार होती. त्यामुळे भाऊ म्हणाला, ‘अगं, तिथं बाळंतपणाचा सगळा सेटअप आहे, तेव्हा तू तिथंच ये !’ त्याच्या या सांगण्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. मन भरून आलं ! याहून भावाची भाऊबीज ती कोणती !

तीन चार तासाचा प्रवास होता, पण रस्ता अगदीच खडबडीत ! ह्यांच्या एका डॉक्टर मित्राच्या सहकार्याने आम्ही भावाकडे पोहोचलो. त्यानंतर अक्षरशः आठवड्याच्या आतच माझी डिलिव्हरी झाली. इतक्या अवघडलेल्या अवस्थेत मी तिथे गेले होते ! पण आई, भाऊ, वहिनी सर्वांनी माझी बडदास्त ठेवली ! बाळंतपण पार पडले. तिथून आम्ही दोनच महिन्यात पुणे मार्गे शिरपूरला , बदलीच्या गावी जाणार होतो. आई पोचवायला येणार होती. माझा पहिला मुलगा जेमतेम दोन सव्वा दोन वर्षाचा आणि छोटं बाळ दोन महिन्याचं ! तेव्हा स्पेशल गाडी करणे हा प्रकार नव्हता. आमच्याबरोबर भाऊ फलटण ते पुणे आला. आम्ही रात्रीच्या गाडीने निघणार होतो. दोन लहान मुले आणि खूप सारे सामान घेऊन आम्ही दोघी कशा जाणार? असा भावाला प्रश्न पडला. त्याने लगेच निर्णय घेतला. दोन दिवसाची सुट्टी घेतली आणि केवळ आमच्यासाठी, बहीण आणि भाचरे यांच्या काळजीने तो शिरपूरला पोचवायला आला.

आम्हाला तिथे सुखरूप पोहोचवून लगेच त्याच रात्रीच्या गाडीने तो परत पुण्याला आला ! तिथून फलटण आणि लगेच ऑफिस जॉईन केले ! आता मुलीने चाळीशी ओलांडली! खूप वर्षे गेली, पण तिच्या वेळचे बाळंतपण आठवलं की ते सर्व क्षण आठवणींच्या कलशातून बाहेर उचंबळून येतात ! अशा मौक्तिक क्षणांच्या आधारावरच तर नाती टिकून राहतात ! आता निवांत आयुष्याचा हा खेळ अनुभवत असताना त्या आठवणींच्या क्षणांची रत्ने पहात राहते मी ! त्या क्षणांनी आपले आयुष्य किती समृद्ध केले आहे ते जाणवत राहतं ! हा कलश आपले जेवढे आयुष्य आहे तोपर्यंत अशा *क्षण- रत्नांनी *भरत राहणार आहे, आणि त्या रत्नक्षणांची आठवण मनाच्या तळात कायमच राहील हे मात्र नक्की!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशीही शाळा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? मनमंजुषेतून ?

☆ अशीही शाळा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

जीवनाच्या वाटचालीत अनेक नाती जुळली. काही टिकली काही कालांतराने विरली. कळत नकळत अनेकांनी शिकवण दिली .संस्कार केले जे मनावर कायम कोरले गेले…पण आज लिहावसं वाटतंय् ते माझ्या सासुबाईंबद्दल—नवर्‍याची आई म्हणून माझ्या सासुबाई—हे माझं आणि त्यांचं धार्मिक नातं. पण त्या पलीकडे आमचं एक वेगळं नातं होतं—एक सांगते,मी त्यांना आई म्हणत असले, तरी सासू  ही आईच असते वगैरे आमच्या बाबतीत नव्हतं—आणि ही आमची सून नसून मुलगीच आहे बरं का—असंही त्या कधी म्हणाल्या नाहीत—

घराचा उंबरठा ओलांडला तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “ये आत सुनबाई. आता हे तुझंही घर—”

डोईवरुन घेतलेला नऊवारी साडीचा ऐसपैस पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकु, अंगावर चमचमणारी पारंपारिक भारदस्त सौभाग्यलेणी, गौर वर्ण, मध्यम पण ताठ अंगकाठी, आणि नजरेतला एक करारीपणा—-

सुरुवातीला नातं जुळवायला खूप कठीण गेलं—सगळंच वेगळं होतं—

मी स्वतंत्र कुटुंबात वाढलेली. मुक्त. मोकळी. स्वत:ची मतं असणारी. शिक्षित, नोकरी करणारी—

इथे वेगळं होतं—मोठ्ठं कुटुंब–चार भिंतीतली निराळी संस्कृती–नात्यांचा गोतावळा–परंपरा–आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी असलेलं आईंचं प्रभावी व्यक्तीमत्व ! दरारा—त्यांचं सपासप आणि फटकारुन बोलणं—

पण व्यवसायाच्या  निमित्ताने आम्ही गावापासून काही अंतरावरच्या शहरात रहात होतो—त्यामुळे त्या घराचा आणि संस्कृतीचा मी दूरचा भाग होते—

पण हे असं वाटणं, भय, तुटणं, वैवाहिक जीवनाची अनिश्चितता, हे सर्व सुरुवातीला होतं—-

पण इतक्या विसंगतीतही आमचं नातं एका वेगळ्या स्तरावर घडत गेलं, जुळत गेलं, हे विशेष होतं—दोघींनाही आपले किनारे सोडणं सुरवातीला कठीण होतं— पण हळुहळु मी त्यांच्यात वसलेल्या एका स्त्रीचं स्वरुप पाहू लागले..आणि मला ते आवडायला लागलं—

एकदा म्हणाल्या, ” अग्गो आठ मुलं झाली मला…रात्रीचा दिवस करुन वाढवलं…पण यांनी कधी हातही लावला नाही…रडलं म्हणून थोपटलंही नाही…कुटुंबाच्या रगाड्यात मुलांकडे बघायलाही वेळ नसायचा—-सीताकाकु म्हणायची हो–” माई उचल ग लेकराला. घे पदराखाली. मरो ते काम…”

पुढे म्हणाल्या, ” तुझं बरं आहे–दादा किती मदत करतो तुला—पण मी म्हणते कां करु नये त्याने तुला मदत—-संसार दोघांचाही असतो ना…”

घट्ट अटकळी असलेल्या त्यांच्या मनातल्या या उदारमतवादांनीही मी चकीत व्हायची…

कळत नकळत मीही त्यांच्याकडून खूप काही शिकत होते. वैवाहिक जीवनाच्या कविकल्पना जिथे संपतात, तिथून सुरु होतो संघर्ष. एक कांटेरी सत्याची वाट. हे काटे बोथट कसे करायचे हे मी आईंकडून  शिकले.

एक प्रकारे त्या माझ्या वैवाहिक जीवनाच्या गुरुच ठरल्या—त्यांच्याकडून मी खूप धडे घेतले—

एकदा त्या मला म्हणाल्या होत्या, ” तुझं बराय. तू मनातलं स्पष्टपणे बोलून मोकळी होतेस..आमचं आपलं ,ओठातलं ओठात आणि पोटातलं पोटातच राहिलं… पण असं बघ, नाती सुद्धा टिकवावी लागतात ग….”

एकत्र कुटुंबातले अनेक पडझडीचे किस्से त्या मला सांगत…त्यावेळीही त्यांच्यातली एक जबरदस्त निर्णयक्षम, धडाडीची स्त्री मला दिसायची…कधी विद्रोही ,कधी भेलकांडलेली ,कधी हताश, परावलंबी, स्वप्नं असणारी स्त्रीपण मी त्यांच्यात पाहिली—त्यांच्या या वेगवेगळ्या रुपांमुळे मीही एक स्त्री म्हणून घडत होते—

मी कशी असावे आणि मी कशी नसावे हे त्यांच्यामुळे मला समजत होतं—मला हेही जाणवत होतं की त्यांना माझ्यातल्या अनेक गोष्टी पटत नव्हत्या ,त्या त्यांनी स्वीकारल्या असंही नव्हे. पण विरोध नाही केला— मी कधी नवर्‍याच्या बाबतीत तक्रार केली तर त्यांचे मुलाविषयी ऐकताना डोळे गळायचे…पण म्हणायच्या—” बयो स्त्री होणं सोपं नसतं….”

आईंशी गप्पा मारताना वाटायचं आई म्हणजे एक स्त्री शिक्षण देणारी शाळाच आहे….

परातीत सरसर भाकरी थापणारे त्यांचे गोरे गोंडस हात तर मला आवडायचेच. पण त्याबद्दल त्या जे बोलायच्या ते खूपच महत्वाचं होतं—

“बघ गोळा घट्ट नको ,सैल नको, एका हातानं थापत दुसर्‍या हातानं अलगद आकार द्यायचा बरं का—थापताना परातीत पीठ नीट नाही ना पसरलं तर भाकरी वसरत नाही–आणि हे बघ, हलकेच मनगट वर करुन तिला उचलून तव्यावर ठेवायचं. तापलेल्या भाकरीला पाण्यानं सारवून थंड करावी लागते, म्हणजे मग ती टिचत नाही ..सुकत नाही…..”

त्या सहज बोलायच्या .बोलता बोलता चुलीतली लाकडं मागे पुढे करुन जाळ जुळवायच्या. पण भाकरीच्या निमित्ताने जीवनातलं संतुलन, संयम, चढउतार, या सर्व स्थानकांवरचा प्रवास घडायचा–

किती लिहू—-

त्यांच्यात वेळोवेळी  दिसलेलं ‘ जुनं ते सोनं ‘ मला खूप भावलं—

नव्वद वर्षाचं परिपूर्ण आयुष्य जगून त्यांनी जगाचा निरोप घेतला..

आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा गादीवर एक क्षीण देह होता. काहीच उरलं नव्हतं..

नवर्‍याने जवळ जाऊन फक्त ‘आई ’ म्हटलं—हळूहळू त्यांनी हात उचलले, आणि त्यांच्या गालावर फिरवून एक थरथरता मुका घेतला—-

तेव्हा वाटलं, सगळं संपलं. पण त्यांच्यातील आई नव्हती संपली—-ती कधीच संपणार नव्हती—-

आज त्या नाहीत–पण त्यांचं अस्तित्व आहे—

आज त्यांच्या आठवणी मी मुलींना सांगते—-

कळत नकळत त्यांनाही “ याला जीवन ऐसे नाव “ हे कळावे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print