श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ एकटेपणा: एक अतिज्येष्ठ नागरिक – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
( त्याला आत्ता जशी चांगली भलेलट्ठ पगाराची नोकरी आहे तशी काही मुंबईत मिळणार नाही ह्या कारणाने तो प्रस्ताव बासनात गुंडाळावा लागला.) इथून पुढे —–
मुलगी तिच्या संसारात तिच्या बछड्यांबरोबर मग्न असते. कधीतरी आठवड्यातून एकदा तिला वडिलांना फोन करायची आठवण होते, तेव्हां ती न विसरता तब्येतीची चौकशी करते. बाकी खूप वर्षे मी एकटा माझ्या ह्या बंगल्यात असतो. गेले दहा वर्षे बाहेरून दुपारच्या जेवणाचा डबा येत होता. सकाळी आलेला डबा मला रात्रीच्या जेवणालाही पुरत होता. जिथपर्यंत सकाळचे फिरणे होते तिथपर्यंत तब्येतीची काही तक्रार नव्हती. पण गेल्या दोन वर्षांपासून जास्त चालवत नसल्याने तब्येत ढासळत चालली आहे. एक दोनदा तोल जाऊन पडल्यामुळे चालताना हातात कायमची काठी आली आहे. ती निर्जीव लाकडाची असली तरी सध्या तरी खूप जवळची झाली आहे. काही ना काही आजाराने अधूनमधून बाजूच्यांची किंवा कोणा ओळखीच्यांची मदत घेऊन ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतो.
सध्या घोडबंदर येथील एका वृद्धाश्रमात स्वतःला मी दाखल करून घेतले आहे. तब्येतीची चौकशी करायला माझ्या मुलाचे आणि मुलीचे दोन दिवसाआड फोन कॉल्स येतात. बरे वाटते त्यांचे कॉल्स आले की. शरीराला नाही पण जरा मनाला उभारी मिळते. त्यांनी फोन केलेला काही कारणास्तव माझ्याकडून उचलला गेला नाही तर लगेच घाबरतात दोघेही. लगेच वृध्दाश्रमाच्या मॅनेजरला फोन करतात. माझ्या तब्येतीपोटी फोन करतात– की मी जिवंत आहे का नाही हे कन्फर्म करतात– काही कळत नाही.
माझा बँक बॅलन्स खूप आहे. मुलांना सगळे देऊनही खूप काही जमा आहे. पण एक गोष्ट खरी आहे. ह्या नवीन तरुण पिढीला आपल्या मागील पिढीकडून काही अपेक्षा नाही. त्यांच्या पंखांत मागच्या पिढीने त्यांना चांगले शिक्षण दिल्यामुळे खूप बळ आलेले असते. त्यांची अपेक्षा एवढीच असते की, आपण म्हातारे झालो आहोत तर स्वतःला आपण व्यवस्थित सांभाळावे. त्यांना आपण कमविलेल्या पैशात अजिबात इंटरेस्ट नसतो. त्यांचे एकच म्हणणे असते की तुम्ही तुमचा पैसा स्वतःवर खर्च करून स्वतःला सांभाळा. मनाने ते कायम आपल्या जवळ असतात म्हणे. फक्त नी फक्त त्यांच्याकडे आपल्यासाठी नसते ती म्हणजे फुरसतीची वेळ. त्यांच्याकडे तुमच्याशी अर्धा तास बोलण्यासाठी वेळ नसतो. वेळेला तुमच्यासाठी ते पैसे खर्च करू शकतात, पण तुमच्यासाठी त्यांचा बहुमोल असा वेळ काढणे त्यांना शक्य होत नाही. —-
शेवटचे वेध लागले आहेत. बघू कुठपर्यंत मजल मारू शकतो. सगळे आयुष्य चांगले काढले. आता काही दिवसांचा तर प्रश्न आहे. एक मात्र खरं आहे, मुलांना शिकवून उडायला शिकविल्यानंतर ते परत आपल्या घरट्यात येतील अशी अपेक्षा करत आयुष्य काढणे चुकीचे ठरते. जेव्हा आपण त्यांना उच्च शिक्षण देऊन मोकळ्या आकाशात सोडतो, तेव्हाच आपल्या मनाची तयारी करून ठेवली पाहिजे की ते आपल्या घरट्यात परत येणार नाहीत. परत येणारे काही अपवाद असतात. पण त्याचे प्रमाण एकदम कमी आहे. त्यांचे चुकते आहे असेही मला वाटत नाही. पण एक मात्र खरं आहे, आई किंवा वडिलांची सेवा करणे हे सगळ्या मुलांच्या आणि मुलींच्या नशिबात लिहिलेले नसते. काही नशीबवान मुलांना आणि मुलींनाच ते करण्याचे भाग्य मिळते. सध्यातरी आपले म्हातारपण चांगले जाण्यासाठी त्याची तरतूद स्वतःच आधी करून, आपल्याला नंतर एकटे रहायचे आहे अशी मनाची तयारी करणे जरुरीचे आहे.
सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो, जेव्हा एकांतात आपण मोकळ्या हवेत किंवा चार भिंतीच्या आड बसल्यावर, एकटे का बसलोय हे विचारायलाही कोणी नसते. एकटेपणात खरं तर आपण एकटे नसतो. आपल्या सोबत असतात आपल्या मनाला सलत असणाऱ्या काही कटू आठवणी, आणि आपल्या मनाला सुखावणाऱ्या खूप गोड आठवणी. सोबत नसतो तो फक्त नि फक्त एक हक्काचा आपला माणूस—-
समाप्त
– एक अति ज्येष्ठ नागरिक
शब्दांकन —श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈