सुश्री ज्योति हसबनीस
(सुश्री ज्योति हसबनीस जीअपने “साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी ” के माध्यम से वे मराठी साहित्य के विभिन्न स्तरीय साहित्यकारों की रचनाओं पर विमर्श करेंगी. आज प्रस्तुत है उनका आलेख “माझ्या पाठच्या बहिणी – कवयित्री पद्मा गोळे ” । इस क्रम में आप प्रत्येक मंगलवार को सुश्री ज्योति हसबनीस जी का साहित्यिक विमर्श पढ़ सकेंगे.)
☆साप्ताहिक स्तम्भ – काव्य दिंडी # 3 ☆
☆ माझ्या पाठच्या बहिणी – कवयित्री पद्मा गोळे ☆
काव्यदिंडीच्या निमित्ताने कवयित्री पद्मा गोळेंच्या अनेक कवितांची सौंदर्ययात्रा झाली. ‘ चाफ्याच्या झाडा’शी साधलेला सुरेल तरल संवाद मनाला भिडला, अफाट आकाशाला डोळ्यांत सामावून घेत गगनभेदी निळया स्वप्नांचा वेध घेणारी ‘आकाशवेडी’ची झेप डोळे दीपवून गेली, शब्दाच्या सामर्थ्याची प्रचीति ‘मौना’ तून आली ‘बकुळीची फुलं’ गंधभारल्या आठवणी पालवून गेलीत, तर ‘स्वप्न, रात्र, निद्रा’ गोड समर्पणभाव मनात जागवून गेली. पद्मा गोळेंच्या हळुवार स्त्री मनाची स्पंदनं टिपतांनाच माझं लक्ष वेधून घेतलं लोभस रूपड्यातल्या ‘ माझ्या पाठच्या बहिणी’ ने. मोठ्या बहिणीच्या अंतरीच्या जिव्हाळ्यात आरपार भिजलेली, हळुवार भावनांच्या साजाने नटलेली ही पाठची बहिण!
*माझ्या पाठच्या बहिणी*
माझ्या पाठच्या बहिणी
तुझ्या संगती सोबती
आठवणी पालवती
शैशवाच्या
तुझ्या संगती सोबती
मज माहेर भेटले
आणि मनात दाटले
काहीतरी
गडे आलीस पाहुणी
ग्रीष्मी झुळुक वाऱ्याची
आसावल्या मानसाची
तृप्ती झाली
बाळपणीची ममता
आंबा पाडाचा मधुर
अजुनही जिव्हेवर
रूची त्याची
तुझे माझे घरकुल
उभे अजून माहेरी
जणू पऱ्यांची नगरी
शोभिवंत
आज भिन्न तुझे गांव
भिन्न तुझे माझे नांव
परि ह्रदयीचा भाव
तोच राही
तुझे दाट मऊ केस
विंचरले माझे हाती
सुवासिक त्यांची स्मृति
अजूनही
तुझ्या संगती सोबती
भांडलेही कितीकदा
वाढे भांडून ममता
पटे अाज
चार दिवस बोललो
आठवणी उजळीत
चिंचा आवळे चाखीत
शैशवीचे
चार दिवस हिंडलो
वेष सारखा करूनी
पुन्हा कुणीही बहिणी
ओळखाव्या
चार दिस विसरलो
तू, मी, माता नि गृहिणी
विनोदाने हूडपणी
बोलतांना
तुझी माझी गं ममता
वेळ गोड पहाटेची
मना तजेला द्यायची
निरंतर
घरी निघाली पाहुणी
टाळते मी तुझी दृष्टी
वाटे अवेळीच वृष्टी
होईल की…..
पाठीला पाठ लावून आलेल्या, बरोबरीने लहानाच्या मोठ्या होणाऱ्या बहिणींचे भावबंध म्हणजे सुबक वीणीची, आकर्षक रंगसंगतीची मऊ सूत शालच नव्हे काय ? अविरत मायेची शिंपण करत, फुलवणारं, जोपासणारं दोघींचं लडिवाळ माहेरही एक आणि रुणझुणत्या संवादाच्या गळामिठीला, कुरकुरत्या वादाच्या कट्टी बट्टीला साक्षी असलेलं अंगणही एकच !
शैशव, किशोरावस्थेचा टप्पा बरोबरीने पार करतांना तारूण्यात पदार्पण होतं, माहेरचा उंबरा ओलांडतांना जडशीळ झालेली पावलं, सासरच्या उंबऱ्यावरचं माप ओलांडायला अधीर होतात, सासरी हळूहळू स्थिरावतात, रमतात. कधी तरी सय येते थोरल्या बहिणीची धाकलीला आणि पावलं वळतात तिच्या घरट्याच्या दिशेला. भेटीला आलेल्या धाकट्या बहिणीबरोबर, पुन: बालपणीचे सुखद स्मृतींचे शंखशिंपले वेचतांना, संपन्न माहेराची चांदणझूल पांघरतांना, शैशवीच्या आंबटगोड आठवणींचा आस्वाद घेतांना, थोरलीच्या आयुष्यातला तोच तो पणा, मनाला आलेली मरगळ कुठल्या कुठे पळून जाते. जणू धाकलीचं तिच्या घरी येणं म्हणजे..जणू ऐन ग्रीष्मातली शीतल वाऱ्याची झुळुकच…आसावल्या मनाला शांतवणारी..सुखविणारी !
आज दोघींची ओळख नावगावासकट जरी बदलली असली तरी दोघींच्या मनीचा ओढाळ ममत्वभाव अगदी तस्साच आहे..अगदी मधुर पाडासारखा ! कर्तेपणाची, मोठेपणाची झूल उतरवत, मनात दडलेल्या मुलाला हाकारत, एकमेकींच्या संगती खळखळून हंसतांना, बालपणीचं झुळझुळतं वारं पुन्हा एकदा अंगावर घेतांना वास्तवाचा विसर दोघींना पडतो ! लहानपणीच्या रूसव्या फुगव्यांनी जणू एकमेकींना अधिकच जवळ आणलंय याची खूणगाठ अंतरी पक्की होते, बहिणीचे दाट मऊ केस विंचरल्याच्या सुवासिक स्मृतींभोवती मन भिरभिरतं. पुन: एकदा बालपण जागवत सारखा वेष करत बहिणी बहिणी म्हणून मिरवण्याचा मोह होतो. आपलं घट्ट नातं आपण दिमाखात मिरवावं, जगानेदेखील कौतुकाने बघावं असा मोह ह्या मायेच्या बहिणी बहिणींना नाही झाला तरच नवल !
काळ वेळ आणि वास्तवाचं भान करून देणारा निरोपाचा अटळ क्षण शेवटी येऊन ठेपतो. मन अधिकच हळवं होतं. पुन: कधी भेट…?
..अशी ओठावरच्या शब्दांची जागा घेणारी व्याकूळ नजर..नजरानजर होताच बांध फुटेल की काय अशी अवस्था..!
बहिणी बहिणींचं प्रेमाचं नातं खुलवतांना विविध उपमांतून किती सुरेख रंग भरलेत कवयित्रीने ! बालपणीच्या निरागस लळ्याला, पाडाला आलेल्या मधुर आंब्याची उपमा देणं, तिच्या येण्याला ग्रीष्मात अवचित आलेली सुखावणारी शीतल वाऱ्याची झुळुक मानणं, त्यांचा आपसातला जिव्हाळा म्हणजे मनाला टवटवी देणारी पहाटवेळ मानणं ! अशा समर्पक उपमांनी ह्या नात्याचे रंग अधिकच गहिरे होतात आणि नजरेत भरतात.
जरी काळ बदलला, संदर्भ बदलले तरी बहिणी बहिणींचा आपसातला अनेक पदरी जिव्हाळा खरंच फारच लोभस असतो. आणि त्याच्या छटा आपल्या विलोभनीय रूपाने मनाला भुरळ घालतातच, अगदी पद्मा गोळेंनी शब्दरूपाने साकारलेल्या ‘माझ्या पाठच्या बहिणी’ सारख्याच !
© ज्योति हसबनीस,
नागपुर (महाराष्ट्र)