कविराज विजय यशवंत सातपुते
*कविताच माझी*
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा “विश्व कविता दिवस – 21 मार्च” पर वीणावादिनी देवी माँ सरस्वती को नमन करती हुई कवि-हृदय के उद्गारों से परिपूर्ण कविता “कविताच माझी “। )
वृत्त भुजंग प्रयात.
गणेशा प्रती रे सदा लीन राहू
मनी शारदेचे, चला गीत गाऊ.
पहा लेक माझी, तिचे गाव पाहू
गुणी ही कवीता, नवे विश्व साहू. . . . !
कवीता मनाची, तिचे विश्व मोठे
तिथे अक्षरांचे, किती भव्य साठे
पहा वास्तवाने, मना गांजलेले
तरी कल्पनेने, तया जिंकलेले. . . . !
अशी ही कवीता तिचे हे पवाडे
खुली आज झाली, मनाची कवाडे.
जिथे काव्ययात्री, सदा होत गोळा
तिथे सोहळा हा, पहा रंगलेला. . . . !
असे ज्ञानदाते, असे ज्ञानदान
कवीता प्रभावी, करे योगदान
मनाचीच बोली, जिथे जन्म घेते
तिथे ही कवीता, करी काम मोठे. . . . . !
कुणा जाणिवांची, कुणा नेणिवांची
इथे जोड लाभे, मतीला गतीची
विचारी मनाला, हवी साथ जेथे
तिथे काव्ययात्री, करी काम साचे. . . . !
मिळे मेजवानी, मनाची मनाला
अहो भाग्य माझे, असे स्वागताला
इथे ना कुणाला, अपेक्षा धनाची
मिळे मान मोठा, कृपा शारदेची . . . !
कधी वेदनेच्या, उरी स्वार व्हावे
कधी भावनेच्या, जगी यार व्हावे
मनाने मनाला, असे पारखावे
जसे सावलीने, उन्हा खेळवावे. . . . !
अशी काव्य बोली, कवीता ठरावी
तिथे शब्द शैली, कमी ना पडावी.
कवीताच माझी, तिचा दूर डंका
नमस्कार माझा, तुम्हा ज्ञानवंता . . . . !
© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे.
मोबाईल 9371319798