मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ तिकीट ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ तिकीट… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. इच्छुक माणूस उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नरत आहे. काहींनी तर देव पाण्यात घालून ठेवले असतील…… असो, समजा एखाद्या मनुष्याला एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली आणि तो निवडून आला. तर तो पक्षांतर करणार नाही असे आपण सांगू शकत नाही….. तसेच त्याने दिलेली आश्वासने पूर्ण करेलच असे नाही…….

तिकीट….

अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय….

एक महामंडळ आहे, ज्याने अनेकांचे जीवन घडवले, ते सुध्दा आपल्या ग्राहकांना तिकीट देते आणि मुख्य म्हणजे ते तिकीट अहस्तांतरणीय असते…..

आपल्या लक्षात आलेच असेल….. आपल्या सर्वांच्या जिवाभावाची एस. टी.

एस. टी. ने अनेकांची आयुष्ये उजळली. पूर्वी ग्रामीण भागात एस. टी. शिवाय पर्याय नव्हता…. आणि एस. टी. शिवाय अन्य पर्याय नव्हता आणि एस. टी. लाही पर्याय नव्हता…..

विद्यार्थी, चाकरमानी (नोकरदार), रुग्ण, अन्य प्रवासी यांना वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन असे घोष वाक्य न लावता, लोकं लाल रंगाची पिवळा पट्टा असलेल्या एस. टी. ची चातका सारखी वाट पाहत असतं…

अनेक गावात अमुक वेळेची बस आली की लोकं त्यावर आपली घड्याळे लावत असतं…..

कमीतकमी पैशात योग्य स्थानावर सुरक्षित प्रवास घडवणारे प्रवासाचे एकेमव माध्यम एस टी हेच होते……

महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणता येईल अशी एस. टी.

एस. टी. गावात आली नाही तर त्यादिवशी गावांसाठी ती बातमी असे…..

ज्यांनी एस. टी. ला विश्वासाहर्यता मिळवून तमाम कर्मचारी बंधू भगिनींना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच पडतील……

तर….. अशी तिकीट देऊन तिकीट घेणाऱ्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे हीत जपणारी आपली सर्वांची जिवाभावाची #एश्टी#…… !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “कशी करू स्वागता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “कशी करू स्वागता…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“हे रे काय शशांक !आज तू पुन्हा विसरलोस म्हणतोस!तूझ्या घरच्यांना तू सांगणार सांगणार म्हणालास आपल्या दोघांच्या प्रेमाबद्दल आणि आपल्या लग्नाबद्दल… आठवडा उलटून गेला तरी अजूनही तुला घरी तुझ्या आईबाबांना सांगता आलं नाही… का त्यांचा आपल्या प्रेमाला, लग्नाला विरोध होईल याची भीती वाटतेय का?… पण त्यांनी नकार देण्याचं एक तरी ठोस कारण त्यांच्या कडे असेल असं तुला तरी वाटतयं का?.. नाकीडोळी नीट, गौर वर्ण, तुझ्या इतकीच उच्च विद्याविभूषित, सुखवस्तू कुटुंबातील, बॅंकेत अधिकारी पदावर नोकरीत… आणि मुख्य म्हणजे दोघेही कोब्रा.. मग त्यांना अडचण कसली येतेय!.. का तुला घरी सांगायला धीर होत नाही!… अजूनही या वयात त्यांना घाबरतोस. !. तु घेतलेला निर्णय त्यांना मान्य होणार नाही असं वाटतयं!.. मग हा विचार आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा नाही तुझ्या डोक्यात आला?… आता माझे घरचे तर कधीचे वाट पाहत खोळबंलेत तुझ्याकडचा हिरवा कंदील दिसल्यावर रितसर तुझ्या घरी येऊन आईबाबांशी बोलयला ठरवायला येण्यासाठी… आणि आणि तू अजून साधं घरी बोलला देखील नाहीस!… काय म्हणावं तुझ्या या डरपोक स्वभावाला!… कधी ? कशी ? तड गाठणार आपण!… तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहेना? का ते देखील वरवरचं आहे… तसं काही असेल तर आताच सांग बरं.. मग आपल्याला आपले मार्ग बदलायचे म्हटले तर तसा विचार करता येईल… गेली दोन तीन वर्षे आपण याच ठिकाणी रोजचं भेटत आलो आहोत आणि इथेच व्हायची असेल कायमस्वरूपी ताटातूट तर ती देखील इथेच होउन जाऊ दे… काय होईल मनाला फार लागेल… हिरमोड होईल काही दिवस… पण हळूहळू नंतर मन स्थिर होत जाईल… प्रेमभंगाचं दुख तसं विसरू म्हणता कधीच विसरता येत नाही हेही तितकंच खरं.. पण असं एकट्यानं पुढचं आयुष्य कसं काढणार नाही का?.. तेव्हा मीच आता पुढाकार घेते आणि सांगते आतापासूनच आपण दूर होणं चांगलं होईल… जे झालं ते कधी घडलचं नव्हतं असं समजूया आणि पुढे आपण वेगवेगळ्या वाटेने जाऊया. !.. तुला माझ्या कडून प्रेमपूर्वकशुभेच्छा. !.. चल मी आता इथं फार वेळ थांबत नाही निघतेय… “

. “.. अरे हे काय ?ते कोण बरं आपल्या कडे येतायेत? माझ्यातर ओळखीचे कोणी दिसत नाहीत… शशांक तू ओळखतोस काय त्यांना?.. ते आता आपल्या दोघांना इथं बघूनच आणखी जवळ येऊ लागलेत!…. आपल्या दोघांना ते ओळखत तर नसावेत ना?.. मग तर टांगा गावभर फिरलाच म्हणायला हवा!… “

. “.. तेजश्री अगं ते माझे आई बाबाच आलेले दिसतायेत!… बापरे म्हणजे ज्याला मी घाबरत होतो तेच मी आता रंगे हाथ पकडला गेलो. !.. तेजू आता माझी काही धडगत दिसत नाही गं. !.. ते काय बोलतील कसं वागतील याचा काही अंदाज येत नाही!… पण तु काही घाबरून जाऊ नकोस ते तुला काही बोलणार नाहीत.. बोलतील ते मलाच… हं आता काय आलीया भोगासी असावे सादर… जे जे काय होईल ते ते पाहत राहावे… आणि जो निर्णय देतात तो स्विकारणे हेच बरे!… काहीही न बोलता उभे राहणे हेच इष्ट… “

… ‘अरे शशांक तू इथे काय करतो आहेस? आणि हि कोण आहे तुझ्या बरोबर? ऑफिस सुटल्यावर तू रोज गाण्याच्या क्लासला जातो असं सांगून घरी उशीरापर्यंत येत असतोस तर हाच आहे वाटतं तुझा गाण्याचा क्लास… अगदी हिंदी सिनेमातील गाण्यातून दिसणारा हिरो हिराॅईन झाडाझुडपातून लपून छपून गाणी म्हणत असतात तसाच चालत असतो काय इथं रोजचा क्लास?. आणि काय रे काय नाव आहे तुझ्या या गाणं शिकविणाऱ्या देवीचं?… रोजचा रियाज इथचं होतो कि आणखी कुठं बैठक होते… आम्ही दोघं आज जरा आमच्या पूर्वीच्या जुन्या आठवणींच्या ठिकाणी जाऊन त्यावेळेच्या… म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीच्या आठवणीना उजाळा द्यावा म्हणून इकडे आलो होतो.. ते झाडं आम्ही शोधत असताना नेमके दोघं त्याच झाडाखाली दिसले… क्षणभर आम्हीच आम्हाला त्यावेळेचे दिसून आले… कोण आहेत ते आणि कसे दिसतात… त्यांना आपला अनुभव सांगावा कि या झाडाखाली प्रेम करणाऱ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतात असं हे शुभ शकुनाचं झाडं आहे… तुमचं देखील प्रेम सफल होवो असं शुभ चिंतन पर बोलावं महणून झाडाजवळ जाऊ लागलो तर तो तू दिसलास या देवी बरोबर… तुमचे सुर तर चांगलेच जुळलेले दिसतात शिवाय तालही छान धरलेला दिसतोय… मग देवींनी आपल्या बंद्याला गंडा कधी बांधायचं ठरवलयं?… का अजूनही आरोह अवरोहात गाणं गुंतून पडणार आहे… आम्हाला बोलवा बरं गंडाबंधनाच्या मुहूर्ताला… ‘

‘ आई बाबा तुम्हाला सांगणार होतोच!… पण सागंयाचचं कसं?… असो आता तुम्ही दोघही इथं अचानक येऊन मला पकडलतं तर सांगूनच टाकतो… हि तेजश्री… आम्ही दोघं दोन तीन वर्षापासून एकमेकांना भेटत आलो आहोत.. आणि आता आम्ही लग्न करण्याचं निर्णय घेतला आहे… तेव्हा तुमची संमती… “. ती तर आम्ही तेजश्रीच्या आईबाबांना मघाशीच कळवली आहे… तेव्हा तुला काय वेगळी द्यायला नको… आणि काय रे शशांक या गोष्टी आपल्या घरी वेळीच सांगायच्या असतात!… प्रेमात माणसानं निर्भीड असावं लागतं… डरपोक, बुळ्या असून चालत नाही.. वेळेवर निर्णय घेणं जास्त महत्त्वाचं नाहीतर चौदहवी का चाॅंद झालाच म्हणून समजा… “

“पण आई बाबा आज अचानक इथचं येण्यामागचं प्रयोजन कसं ठरलं.. ?”.

“अरे शशांक तेजश्रीचे आई बाबा आज आपल्या घरी आले होते आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा सुखद धक्का तुम्हाला देण्याचा ठरवला… आणि तुमचं येत्या आठवड्यात गंडाबंधनाचा मुहूर्त आम्ही काढलाय बरं.. तेव्हा लागा आता तुमच्या नव्या मैफिलीच्या तयारीला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासी ☆ भूनंदनवन काश्मीर – भाग – १ ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 मी प्रवासी 🌸

☆ भूनंदनवन काश्मीर – भाग – १ ☆ प्रा. भरत खैरकर 

 फिरायची आवड असल्याने दरवर्षी दिवाळी उन्हाळा आला की फॅमिली टूर किंवा कॉलेज टूर काढल्या वाचून करमत नाही. स्वतःचा खर्च आणि स्वतःचा कंट्रोल त्यामुळे कमी पैशात भरपूर मज्जा म्हणजेच इकॉनोमिकल टूर करायची सवय सुरुवातीपासूनच आहे. ह्यावेळी मात्र ठरवूनही नक्की करता येईना कारण डेस्टिनेशन होतं भू नंदनवन काश्मीर!

उगाच रिस्क नको शिवाय तिथलं वातावरण वगैरे वगैरे विचार डोक्यात फिरत होते.. पण नाही असं भिऊन कसं चालेल? येवढे लोक जातातच की!! मग आपल्याला कोण खातंय? शिवाय आपला नचिकेत अजून सहा महिन्यानंतर पाच वर्षाचा होईल. त्यामुळे बच्चेकंपनी त्याचा समावेश होऊन तिकीटही काढावे लागणार! तेव्हा आत्ताच जो काय जोर लावायचा तो लावूया म्हणून टूर बुक केली.

बुक करताना आता फक्त चार पाच जागा शिल्लक आहेत वगैरेसारखे टिपिकल उत्तर मिळाली. तरीही आम्ही जून 7 ते 18 अशी बुकिंग केली. सूचनेनुसार पाच दिवस आधी सर्व सहप्रवाशांची ओळख ठरली मिटींगला फक्त तीनच कपल होते त्यात दोन कपल व्हीआरएस घेतलेले होते. वाटलं दूर वाले आपल्याला खोटं सांगत आहे तेवीस-चोवीस लोकांचा ग्रुप आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आलिया भोगासी असावे सादर आता बोलून काय उपयोग? म्हणून आम्ही सात तारखेची वाट पाहत होतो.

दिनांक सात ला “झेलम” साठी पुणे स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि सुरू झाला प्रवास. दौंड.. नगर मनमाड.. भोपाळ… इटारसी… आग्रा.. दिल्ली.. लुधियाना आणि जम्मू!

जम्मूचं तीन मजली स्टेशन !आमचा टूर मॅनेजर ज्या बोगीत होता, तिथे सगळे फलाटावर जमले. जमता जमता जमले की 24 जण!! आता मात्र हाय असं वाटायला लागलं !चार तरुण जोडपी होती. कुली मार्फत सामान उचलून सुमो गाडीमध्ये पोचवलं तिथून आम्ही प्रीमियर ह्या रघुनाथमंदिर परिसरात असलेल्या थ्री स्टार हॉटेल कडे गेलो. आमच्यासोबतच सामानही पोहोचलं. दोन दिवसाचा रेल्वे प्रवास… भूक लागलेली होती…

पटापट आंघोळीआधी आवरून किचनकडे पाऊल गेली तर तिथे स्वयंपाक तयार! गरमागरम जेवणानंतर दोन तास विश्रांती व दुपारी रघुनाथ मंदिर दर्शन असा कार्यक्रम ठरला. जमले तर मार्केटिंग सुद्धा! पण सूचनेप्रमाणे पहेलगाम सोडून कुठेही मार्केटिंग करायचे नाही त्यामुळे नुसतं फिरायचं ठरविले.

दुसऱ्या दिवशी जम्मू-श्रीनगर प्रवास होता पेट्रोल डिझेल भाव वाढीमुळे चार दिवस काश्मीर बंद असं कानावर आलं अन् गेले पैसे पाण्यात! म्हणून आतन् आवाज आला. पण क्षणभरच! उद्या आपली बस वेळेवर सकाळी साडेसातला येणार आहे तेव्हा सगळ्यांनी सात वाजता चेक आउट करा असा निरोप आला म्हटलं देव पावला वर निदान 300 किलोमीटर अंतर सरकू श्रीनगर पर्यंत!

दुसऱ्या दिवशीचा प्रवास म्हणजे जन्नतची सफर होती. चिनाब नदीच्या किनाऱ्यावर.. किनार्‍यावरुन जाणारा तो’ एन एच वन ए ‘हायवे ‘हाय हाय’ नेत होता.

मात्र खाली बघितल्यावर ड्रायव्हरची एक चूकही हाय हाय म्हणायला पुरेशी ठरेल ! असं वाटलं. पण नाही, दुपारी जवाहर टनेल जवळ आम्ही सुखरूप पोहोचलो.

तीन किलोमीटर लांब असलेली जवाहर टनेल जम्मू आणि काश्मीर ला जोडणारा दुवा आहे. बोगदा जाम झाल्यास श्रीनगर चा संपर्क तुटतो. बोगदा पार केल्यावर खर्‍या अर्थाने व्हॅलीमध्ये आल्याचा आनंद होता लिहिलं होतं “फर्स्ट व्ह्यू ऑफ काश्मीर व्ह्याली!”

… आणि खरच कॅमेरा सरसावला नाही तरच नवल इथून पुढे कॅमेरा कधीच बंद झाला नाही फक्त तो थांबायचा रोल घेण्यासाठी सायंकाळी पावणे आठ वाजता आजवर सिनेमात पाहिलेल्या.. ऐकलेल्या.. “दल झील” च्या किनाऱ्यावर आम्ही होतो. सर्वांत सामान अलग अलग शिका-यामध्ये लोड झालं व सर्वजण निघाले आपापल्या हाऊसबोट कडे! बोटींवर एवढं सुंदर इंटेरियर, नक्षीकाम वा मस्त आहे! आणि इथे राहायचं धमाल होणार! हाऊस बोटीवर तयार होऊन आम्ही जेवणासाठी निघालो रूम लॉक करायचे म्हणून थोडासा धडपडलो पण पण रूम बंद होईना.. शेवटी तसंच सोडून

किचन गाठलं तेव्हा कुणाच्या रूम बंद होत नव्हत्या असं समजलं. लाकडी दाराच्या खाचा झिजून झिजून मोठ्या झाल्याने लॉकिंग मेकॅनिझम बिघडलेलं दिसलं. असो.

सर्विस बॉय ला याबद्दल विचारलं तर तो म्हणतो कसा ” ये काश्मीर है साब यहा पे हिंदुस्तान जैसा कोई चोरी नही करता!” मी एकदम सरकलो ‘काश्मीर है म्हणजे काय ?’ भारतात नाही की काय काश्मीर? माझी देशभक्ती त्याला ऐकवणारच होती. पण म्हटलं त्याचं मत आहे.. जनसामान्यांचे मत जाणून घेऊया! चोरीला गेलं तर काय जाणार आहे. जेवायला गेलो तेव्हा सगळ्यांचा एकच सुर होता आमचं लॉक लागत नाही.

मी म्हटलं चला ” एक से भले 24″ मग समजलं की चोरी वगैरे प्रकार हाऊस बोटीवर नसतो.

दुसऱ्या दिवशी आम्हाला खरं तर गुलमर्गला जायचं होतं पण ‘पेट्रोल डिझेल बंद’ त्यामुळे त्यादिवशी ‘श्रीनगर दर्शन’ ठरलं ! सकाळी शिकारा राईड मध्ये छान शम्मी कपूर स्टाईलने शिका- यात गादीला रेलून गाणं ऐकायचं आणि वल्हवणारा गाईड सांगेल ते ऐकायचं त्याला बोलतं करायचं म्हणून मी गुलाब नबी आजाद, फारूक अब्दुल्ला वगैरे बाबत प्रश्न विचारले तर ‘वो सब मर गए ‘ म्हणून त्यानं उत्तर दिलं. मी पुन्हा गप्प! म्हटलं उगाच नको डिवचायला, पण नंतरच्या प्रवासात लक्षात आलं की काश्मिरी लोकांचं तिथल्या राजकारणी, पोलीस व सीआरपीएफ आदिबद्दल मत काहीसं निगेटिव आहे. आपल्याला काय? म्हणून पुढचे प्रश्न विचारत राईड सुरू ठेवली.

झील मध्ये तरंगणारी कमळं, फ्लोटिंग गार्डन, शेती सारं-सारं पाण्यावर होतं! एक बाई तर तिथून भोपळे तोडून आमच्या शिका-यावर ठेवत होती. आमचा शिकारा पुढे पुढे जाताना त्याला समांतर अगदी खेटून खेटून छोटे छोटे शिकारेही यायचे.. त्यामध्ये केशर विकणारे, बायकांच्या गळ्यातील, कानातील, दागिने विकणारे, आइस्क्रीम कुल्फी विकणारे होते..

हळूहळू आम्ही “चारचिनार “ला पोहोचलो. सरोवराच्या मध्यभागी असलेल्या छोट्या बेटावर ही चार चिनार वृक्षाची झाडं आहेत. ती शहाजहानने लावली असे सांगतात. इथून सारं दल सभोवताली न्याहाळता येत. फोटो तर मस्तच येतात. इथे काश्मिरी पेहराव शंभर ते दीडशे रुपयाला भाड्याने मिळतात. तो घालून छान छान फोटो काढले. हाऊसबोटकडे परततांना ‘कबुतरखाना’ मार्गे निघालो. वाटेत म्हणजे पाण्यातच त्यांचा शॉपिंग मॉल आहे. जाणून बुजून हे लोक विविध दुकानात आपणास थांबवितात, त्यांचं कमिशन असतं, तिथे जायला जवळ-जवळ आपणास ते भागच पडतात. त्यांच्या समाधानासाठी दुकानातून राऊंड मारून घ्यायचा ठरवलं. वस्तूची किंमत 70 टक्के कमी करून मागायची.

दुपारच्या जेवणानंतर चष्मेशाही, निशांत गार्डन, मुगल गार्डन, शालीमार गार्डन, वगैरेंची सैर झाली. एका कार्पेट फॅक्टरीमध्ये सुद्धा आम्हाला नेलं. पण ते शोरूम होतं. सायंकाळी 5 नंतर दल शेजारी मोठ-मोठ्या वाहनांना बंदी असल्याने आमची बस दलगेट मार्गे आली. तत्पूर्वी आम्ही शंकराचार्य टेकडी वर गेलो. 240 पायऱ्या असलेल्या त्या मंदिरावरून श्रीनगर चा देखावा अप्रतिम दिसतो नागमोडी वळण घेत वाहणारी झेलम नदी दिसते. वरून दिसणारा दल लेक तर काही विचारुच नका!! डोळ्याचं पारणं फेडणारा तो देखावा हृदयात फ्रेम करून ठेवावा असाच होता.

राजा हरिसिंग महल आता हॉटेलमध्ये बदलला आहे. बॉटनिकल गार्डन, तुलिप गार्डन, राज भवन, सेंटर हॉटेल, ओबेराय हॉटेल, वगैरे बसमधून गाईडने दाखविले.

आमच्या नचिकेतची मात्र अजून बर्फाचा पर्वत न दिसल्याने काश्मिरात येऊन तीन दिवस झाले तरी “पप्पा काश्मीर कधी येणार?” म्हणून विचारणा होत होती.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पौर्णिमेचं  शशीबिंब आज माझ्या गवाक्षाशी बराच वेळ थबकलं.. तिथून न्याहाळलं होतं त्याला मी त्या गवाक्षात उभी असताना… आणि पुढे जाताना एक मंद स्मित रेषा आपल्या चेहऱ्यावर फुलवून निघायचं ठरवलं… अन मी नकळतपणे  आलेही… नव्हे नव्हे ओढले गेले.. त्या गवाक्षापाशी… हळूच मान लवून बघत राहीले… रस्त्यावरती सांडलेला चांदणचुरा चमचमताना किती गोड नि मोहक दिसत होता… हरपून बसले भान माझं..वेडं लावलं मला त्यानं स्वत:चं… नजर मिटता मिटत नव्हती नि कितीही पाहिलं तरी तृप्ती होत नव्हती… तरी बरं त्यावेळी आजुबाजूला.. खाली रस्त्यावर कुणी कुणीच नव्हते.. माझ्याकडे पाहत.. प्रेमात पडलीस वाटतं असचं एखाद्याला मला चिडवायला मिळालं असतं…

मी पण छे.. काही तरीच काय तुमचं…नुसत्या नजरेने पाहिलं तर ते का प्रेम असतं… असं मी स्वतःशीच म्हणाले… हो स्वतःशीच.. तिथं माझं ऐकायला तरी कोण होतं… पण मी ते सांगताना खूप लाजले तेव्हा गालावरची खळी खट्याळपणानं सारं काही सुचवून गेली… असा किती वेळ माझा.. माझाच का आम्हा दोघांचाही.. गेला.. नंतर रोजचा तसाच जात राहिला… भेटण्याची वेळ नि भेटण्याचं ठिकाणं ठरून गेलेलं….

नंतर हळूहळू त्याचं येणं उशीरा उशीरानं होऊ लागलं… माझी चिडचिड होऊ लागली… आधीच भेटायचा वेळ तो किती थोडा .. त्यात याच्या उशीरानं येण्यानं भेटीचा क्षण संपून जाई…तो नुसता जात नसे तर माझ्या मनाला चुटपूट लावून जाई.. हुरहुर लागे जीवाला ..  उद्यातरी  भेटायला वेळ भरपूर मिळेल नं… छे तसं कुठं घडायला दोन प्रेमी जीवांच्या आयुष्यात… नाही का…

आणि एक दिवस त्याचं येणचं झालं नाही… विरहाचं दुख काय असतं ते त्या दिवशी कळलं… मी गवाक्षात उभी होते नेहमी सारखी.. पण आज चंद्र प्रकाश नव्हता ..  होता तो काळोख सभोवताली… डोळे भिरभिरत होते त्याची वाट पाहताना…रस्त्यावरचा मर्क्युरी दिव्याचा प्रकाश माझी छेड काढू पाहताना  नारळाच्या झावळीतून तिरकस नजरेने बघत होता… आमच्या आठवणींच्या सावल्यांचा खेळ माझ्या नजरेसमोर मांडताना.. इतकंच कानात सांगून गेला…’ वो जब याद आये बहूत याद आये…’  आणि आणि माझं वेडं मन गुणगुणत होतं… ‘ रूला के गया सपना मेरा.. ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे… गाता गळा असणारे सुस्वर सुरात नि भक्ती माधुर्यात तो आळवून आळवून म्हणतात… कानाला ऐकायला देखील तो गोड वाटतो… आणि आणि अभंग तुकयांचे हे साहित्याचे अभिजात लेणं आहे असं नि असचं आपण प्रशंसोग्दार काढतो… बस्स इतकं नि इतकच संत तुकाराम महाराजांच्या प्रती नि त्यांच्या अभंगाप्रती आमचा आदर व्यक्त होतो.. फार फार तर त्यांच्या भक्तीमय जीवनाचा नि त्यांच्या अभंगगाथेचा आम्ही वाड्मयीन दृष्टीने सखोल अभ्यासही करतो.. आपल्याला उच्च विद्याविभूषिताचं प्रमाणपत्र मिळतं आणि आणि कालांतराने विस्मृतीत जातं… पण पण संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनात आत्मसात करतो काय?.. त्यातल्या एकातरी अभंगातील ओळीची उक्ती आपण प्रत्यक्ष जीवनात उतरवतो काय? त्यावर खेदानं नाही हेच उत्तर आपल्या मिळतं… काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी प्रसिद्धी परांङगमुख मंडळी आहेत त्यांना या तुकाराम महाराज कोण आहेत किंवा त्यांची अभंगगाथा म्हणजे काय आहे माहीत नसताना वा निरक्षर सामान्य मंडळीतील एखादाचं स्वतःचं जगणचं तुकाराम महाराजांच्या जीवन शिकवणीनुसार घडत जाताना दिसतं.. मला या ठिकाणी अभंगगाथेच्या तपशीलात न शिरता फक्त वरील वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… या अभंगांबाबत बोलणार आहे… संत तुकारामांच्या काळात त्यांनी विठ्ठल भक्ती करताना माणसातला देव जसा पाहिला तसा आजूबाजूच्या भोवतालातही देव त्यांना दिसला.. निसर्गाच्या सानिध्यातही देवाचं स्वरूप त्यांना आकळत होतं… आपण जशी आपल्या कुटुंबाची आपल्या गणगोतांची, शेजारीपाजारी, मैत्र यांच्याशी जन्माने बांधले जातो.. आपला ऋणानुबंध जपतो, वाढवतो.. त्यात असते ती माया, प्रेम स्नेह.. यातून मोहपाशात बद्ध होतो.. ऐहिक, भौतिक, सांसारिक गरजांच्या परिपूर्तीसाठी आपलं जगणं इतरांवर तसचं निसर्गावरही अवलंबून असतचं असतं… एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ… अगदी त्याच धर्तीवर… यात दिले घेतले या व्यावहारीक अटळ गोष्टी येतातच त्या माणसांच्या जीवनाशी निगडीत असतात.. निसर्गाच्या बाबतीत आपलं काय योगदान.. आपण फक्त त्याच्याकडून घेतो घेतो आणि घेतो… देत तर काहीच नाही… उलट जीवनातील अती हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास करण्याकडे कलाकलाने विकृती पछाडली गेलीय.. लोकसंख्येचा उद्रेक, त्याचा पडणारा भूमीवरचा भार, त्यातून वाढलेल्या वाजवी अवाजवी गरजांची कुऱ्हाड निसर्गाच्या अंगोपांगावर पडली… झाडांच्या कत्तली बरोबर जंगल संपत्ती स्वार्थीपणा ने ओरबाडून नामशेष करण्यात धन्यता वाटू लागली… याचा परिणाम पर्यावरणाचा समतोल बिघडत बिघडत आज अशी परिस्थिती आहे कि संपूर्ण र्हास झाला आहे… सुख समृद्धी मानवी जीवनात आली ती निर्सागाचा बळी देऊन… निर्सागाने मात्र याबाबत कुणाकडे तक्रार करावी… मुक्याने सारे सहन केले काहीही दोष नसतात.. सगळे आपले मुक्त हस्ताने लूटून देत असताना त्याला अस्तित्वहिनता आली… जमिनीची धूप, पाण्याचे स्त्रोत, लाकूड, वनौषधी, जंगलातले पशू पक्षी सारे सारे काही नाहीसे झाले.. मानवी जीवाला साह्यभूत होत असलेली हि संपत्ती नामषेश झाली… उष्णता वाढली, पाऊस रोडावला, या सारख्या धोक्याच्या संकेताने निसर्गाने मानवाला सांगून बघितले… पण ऐकण्याच्या मनस्थितीत तो असेल तर ना… मग प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सांसर्गिक लागण असलेले आपण नेहमीचं येतो पावसाळा त्यावेळी वृक्षारोपण करण्याचा सामाजिक मानसिकतेचा आजार फैलावतो.. माणसांच्या झुंडीच्या झुंडी वृक्षारोपण करताना फोटोत दिसतात.. संकल्पाचे लाखातले आकडे ओक्याबोक्या वसुंधरेला हिरवाईची शाल पांघरू पाहतात.. आजचा वृक्षलागवडीचा उत्सव संपला की उद्या तिथचं सगळे वृक्ष माना टाकून पडलेले दिसतात… मगं परत पुढच्या वर्षी याच वेळी हाच खेळ… पैश्याचा चुराडा, वेळेचा अपव्यय, फक्त प्रसिद्ध चा तरू फुलून येण्यासाठी… राजा बोले नि दल डोले अशी बुद्धिची दिवाळखोरी असल्यावर हेच घडत असते…. पण थोडं इथं थांबा काही माणसं जन्माला येतात तेव्हा त्याचं विधिलिखित काही वेगळं असतं.. सामान्यातील सामान्या सारखे प्रतिकुल परिस्थिती जगताना दारिद्र्य, अज्ञाना बरोबर परंपरेच्या सामाजिक साखळ्यांच्या जाचातून जात असताना नि दुःखाच्या उन्हात कुठेतरी सुखाची शलाका चमचमताना पाहताना त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ नकळतपणे गवसतो.. तेव्हा त्यांच्या हातून नियतीने जगाला अचंबित करणारं कार्य घडवून आणते… कर्नाटक राज्यातील थिम्माक्का दगडाच्या खाणीत काम करणारी.. चारचौघी सारखी लग्न संसाराची, मुलाबाळांची छोटी छोटी स्वप्न पाहणारी.. पण मातृत्व तिच्या नशिबातच लिहिलेले नव्हते.. घरचे, दारचे, समाजातले तिला वांझोटी म्हणून सतत पैरण्याने ढोसत जीवन नकोसं करणारे.. तिलाही मनातून खूपणारा आपण आई होऊ शकत नसल्याचा सल… खूपच उदास करून सोडे… पण तिनं त्यावर मार्ग शोधून काढला.. आपल्या घरापासून ते खाणीच्या जाणाऱ्या महामार्गावर चार कि. मी. च्या परिसरात वडाची झाडं लावायला सुरुवात केली… रोज जाता येता थोडा वेळ थांबून त्या झाडांची निगराणी, पाणी वगेरे बघत गेली.. बरोबरीच्या लोकांनी तिच्या या छंदाची कुचेष्टा केली… काही विघ्नसंतोषीनीं तर तिच्या पश्चात त्यातील काही झाडांना उखडून सुद्धा टाकले… तरीही थिम्माक्का डगमगली नाही कुणावर रागावली नाही आपली झाडं लावत गेली वाढवत गेली… आपला वंशवेल तिने असा वृक्षवेलातून वाढवत नेला…. आज त्या चार कि. मी. च्या रस्त्यावर या वडाच्या झाडांचे डेरेदार वृक्ष डौलाने उभे असून थंडगार सावली पसरुन बसलेत… थोडी थोडकी नव्हेत तर तीनशे च्या जवळपास तिने लावली हि वडाची झाडं आज दिमाखात उभी आहेत.. आणि गमंत म्हणजे तिची कुचेष्टा करणारेच जाता येता त्याच झाडाच्या सावलीत क्षणभराचा विसावा घेतायेत… थिम्मक्काच्या अलौकिक कार्याची दखल सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या एका पर्यावरणविषयक संस्थेने घेतली नि आपल्या संस्थेच ‘थिम्माक्का रिसोर्सेस फाॅर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ‘ असं चक्क नामकरण केलयं… आणि आपल्या इथे.. खरंच… मिडियावाले, शासन, प्रशासन, किती आंधळे आणि बहिरे असतात याच सत्याला नेहमी प्रमाणे जागले… असो… माझे त्या थिम्मक्काच्यासाठी विशेष कृतज्ञतेपोटी निशब्द होउन विनम्रतेने कर माझे जुळून येतात…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “रबने बना दी जोडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रबने बना दी जोडी…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… हे बघ ना सुधीर ! या पुस्तकातलं ताजमहालाचं चित्र किती भारी वाटतयं.. अगदी खराखरा ताजमहाल दिसतोय… आणि त्याच्या खाली.. शहेनशहा शहाॅंजान ने आपल्या सौंदर्यवती बिवी मुमताजच्या आठवणी प्रित्यर्थ बांधला असं दिलयं… त्या दोघांचं प्रेमाचं प्रतिक चिरकाल तसचं उभं आहे… खरचं दोन प्रेमिकांनी प्रेम करावं तर असं असावं.. मला हा ताजमहाल खुप आवडतो.. हवाहवासा वाटतो.. सुधीर तु एक शिल्पकार आहेस ना मग आपल्यासाठी या ताजमहालाची प्रतिकृती करुन आण की… आपणही प्रेम अगदी तसंच करायचं हं… कधीही एकमेकांशी बिल्कुल भांडण तंडण, राग, रूसवा करायचा नाही… अगदी मी जरी हट्टाला पडले, चिडले तरी तू मात्र मला प्रेमानं समजूत घालायची, माझा हट्ट उशिराने का होईना पण पुरवावास.. म्हणजे आपलं प्रेम अधिक दृढ होईल… तुला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनवर न्यायला रोज येत जाईन मग फिरत फिरत कधी ड्रेस, टाॅप, जीन, मेक अपचं सामान असं किरकोळ खरेदी करून घरी येऊ.. घरी आल्यावर स्विगीवरून मागवलेलं जेवणं जेऊन घेऊ.. रात्री मग मी माझ्याआईला फोन करेन त्यावेळी तू वाॅशिंग मशीन लाव नि दिवसभराची पडलेली दोन चार भांडी तेव्हढी घासून काढ… आईशी फोन वरचं बोलणं झालं कि मग दोघं मिळून काॅटवरचं बेडशीट बदलुन झोपी जाऊया… जानू तू सकाळी एकदा ऑफिसला गेल्यावर घर मला खायला उठतं बघ… चैन कसली पडत नाही.. इतकं बोर होतं म्हणून सांगू.. टि. व्ही. वरच्या सगळ्या सिरियल्स नि मोबाईल वरचे नेटफ्लिक्स, प्राईम, च्या वेब सिरीज बघून देखील कंटाळा दूर होत नाही.. वेळ जाता जात नाही.. मग घरातलं कुठलचं काम करायचा मुड लागत नाही.. मग तू येण्याची आतुरतेने वाट पाहत बसते… घरातलं पडलेलं काम तसच टाकून देते.. ऑफिसमधून तू घरी आल्यावर तु हि कामं न सांगता करणारच हा माझा विश्वास असतो… कारण आपल्या खऱ्या प्रेमाची तर ती ओळख आहे…

सगळ्यांनीच काही शहाजहानसारखा मुमताजसाठी बांधलेल्या सारखाच ताजमहाल बांधायला हवा असं नाही.. तर अगदी घरची धुणी भांडी, झाडू पोछा आपल्या बायको च्या प्रेमाखातर इतकं केलं तरी पुरेसे आहे… दुसऱ्याला आनंद देण्यात खरा आनंद आपल्यालाच मिळतो.. नाही का?. मग जानू माझ्यासाठी तुझ्या लाडक्या सुधासाठी छोटीशी मदत करणार नाही का… मग मी दरवर्षी वट सावित्रीच्या पूजेच्या वेळी सात जन्मच काय जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून मागून घेईन नि दोन तासाचा उपवास करीन… आपल्या माणसासाठी ईतकं तरी मला करायलाच हवं नाही का. ?.. मगं शेजारचे पाजारचे, सगेसोयरे आपल्यावर जळफळतील.. म्हणतील क्या रब ने बनायी जोडी…! ”

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “बाप्पा मोरया रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

 बाप्पा तुझा आमच्याकडे यायचा टाईम कि रे झाला…

दरवर्षाला सांगत असतो ना लवकर येशील पुढच्या टायेमाला..

अन तसा तू येत असतोच न विसरता दर वर्षाला… लालचावलास तू सारखा सारखा इथं यायला… भलामोठा मंडपात, सुशोभित मखरात, बसतोस ऐषआरामात… घरच्या, दारच्या यजमानांची उडते किती त्रेधातिरपिट… तूझ्या आगमनाच्या आधीपासून ते तुला निरोपाचा विडा देईपर्यंत.. असते का काही तुला त्याची कल्पना… फक्त भिरभिरते डोळे तुझे शोधती नैवेद्याचे मोदक ताट भरून आहेत ना.. सुपाएवढे कान तुझे आरत्या, पूजाअर्चा, तारस्वरातल्या ऐकून घेती… छचोर गाण्याचा शंख कर्णा त्या फुंकती.. नवल वाटे मजला अजूनही बहिरेपण तुजला कसे न आले… आल्यापासून जाईपर्यंत डोळे टक्क उघडे ठेवशी… साधुचे नि भोंदूचे भाव अंतरीचे जवळूनी पाहशी.. जसा ज्याचा भाव तसा त्याला पावशी… मिस्किल हसू आणून गोबरे गाल फुगवून बसशी… तथास्तू चा हात आशिर्वादाचा तव मात्र सगळ्यांच्या मस्तकी ठेवशी… ज्याची त्याची मनातली मागण्यांची माळेची मोजदाद तरी तु किती करशी… करोडोंची होतसे इथे उलाढाल ती दिखाऊ भक्तीचा भंडारा उधळून देण्यास.. देखल्या देवा दंडवताच्या उक्ती नि कृतीला तूही आजवरी ना विटलास… चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा तू अधिपती… कसा विसरलास भक्तांना अंतर्यामी खऱ्या भक्तीची, सश्रद्ध बुद्धी देण्यास ती… दहा दिवसाचा तो सोहळा रात्रंदिन आमचाच कोलाहलाचा गलका… कधीही चुकूनही नाही तू सोडले मौनाला शब्दाने एका.. जे चालले ते सगळेच चांगलेच होते भावले आहे का तुला?… निदान हे तरी सांगशील का मला!……

.. आणि आणि हो.. माझं ना तुझ्या जवळ एक मागणं आहे!.. या वर्षी तू इथं आलास कि तू मौन बाळगून बसू नकोस… जे जे तुला दिसतयं ते तुला आवडतयं, नावडतयं ते स्पष्ट सांगायचं!.. घडाघडा बोलायचं!… मनात काही ठेवायचं नाही.. नि पोटात तर काहीच लपवायचं देखिल नाही!… तुला काय हवयं ते तू मागायचं.. अगदी हट्ट धरून… आम्ही नाही का तुला नवस सायास करतो तुझ्या कडे हक्कानं!.. मग तु देखील आमच्याकडे मागणी करण्याचा हक्क आहेच कि… टेक ॲन्ड गिव्ह हि पाॅलिसी चालतेय ना श्रध्देच्या बाजारात… मगं कसं सगळा व्यवहार पारदर्शी होईल…. पण त्यासाठी तुला बोलावेच लागेल… मौन धरून गप्प बसण्यात काही मतलब नाही.. आणि आम्हालाही कळेल कि आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत कि नाहीत… आणि समजा मागुनही मिळणार नसेल तर तर दोन हस्तक नि एक मस्तक तुझ्या पायी ठेवून.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. चित्ती असु द्यावे समाधान अशी मनाची समजूत घालून पुढे चालू लागू… तरी पण यावेळे पासून तू आमच्या बरोबर बोलणार, संवाद साधणार आहेस… अरे तु दिलेल्या चौदा विद्या नि चौसष्ट कलांचा आम्ही मानवांनी काय आविष्कार केलाय हे तु पाहिलसं पण ते तुला जसं हवं होतं त्याच अपेक्षेप्रमाणे झालयं का कसं… का तुला काही वेगळचं अपेक्षित होतं.. हे तुला आता सांगावच लागेल… निदान उशीर होण्यापूर्वी चुक दुरुस्ती तर करता येईल…. नाहीतर नाहीतर आम्ही पण तुझ्याशी बोलणार नाही.. एकाही शब्दांनं… कट्टी कट्टी घेणार तुझ्याशी… आणि आणि आरतीच्या, पूजाअर्चाच्या वेळेला तुला दाखवलेला नैवेद्य, प्रसाद आम्ही सगळाच खाऊन टाकू… तुला बिल्कुल देणार नाही… हिच तुला आमच्याकडून पेनल्टी… कितीही गाल फुगवून रूसून बसलास तरी… मग मनात आणूही नकोस फिलिंग स्वत:ची गिल्टी वाटल्यावरी…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “मायेचं मोल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “मायेचं मोल…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

हे हवं तेव्हढं पैकी घ्या तुमास्नी पर माझ्या लेकराला आपल्या मायची माया तेव्हढी तुमच्या देशात इकत घेऊन द्या…. आता तो लै मोठा सायेब झालाय न्हवं..

पार तिकडं सातासमुद्राच्या पल्याड… तिथं त्येला समंधी हायती घरची दारची गोतावळ्याची… घरात लक्ष्मीवानी बायकू दोन पोरं हायती… आनी बाकी मस हायती पैश्याला पासरी असल्यावानी… अन हिकडं म्या त्येची एकच आय हाय… तळहाताच्या फोडावानी जपला, वाढवला मोठा केला… त्यो चार वरसाचा असताना त्येचा बा ॲक्सिडंट मधी खपला.. तवापासून म्या एकटीनचं या माझ्या पोराचं केलं… तो दिसा माजी मोठा बापय गडी होत गेला नि म्या साडेतीन हाताचं मुटकुळं होऊन इथं एकलीच पडलेय… तुमच्या सारखी त्याचे मैतर येत जात असतात घराकडं त्याच्यकडनं सांगावा नि पैक्याची चवड आणून देतात… परं पोरगं एकदा बी नदरंला पडाया न्हाई… आपल्या अडानी, काळ्या रंगाच्या खेडूत आयची त्येला आता लाज वाटतीया… त्या गोऱ्या कातडीच्या बाईनं त्याच्यावर चेटू केलया.. त्यामुळं त्येला आपली आय, आपलं घर, आपलं गावं समध्याचा इसर पडलाया… त्येचा मैतर मला एकदा म्हनला मावशे रघुनाथ आता तिकडं घरजावई झालाय आनि इकडं कंदीच आयेला, गावाला भेटायला जायाचं न्हाई अशी शपथ घातलीया… तवा कुठं त्येला पैश्यापरी महलाची सुखं मिळतात… रघुनाथ सासूला नि सासऱ्यालाच आई बा मानतो… पन तुला अजून इसरला न्हाई म्हनून पैसंं तरी धाडतो… एव्हढी तरी काळजी घेतोय हे काय कमी हाय का… रघुनाथच्या मायन्ं त्या आलेल्या मैतराला त्यानं दिलेल्या पैश्यातलं एक बिंडोळं परत त्याच्या हाती देत म्हटलं तुमच्या तिकडं मायची माया जर इकत मिळत असलं तर तेव्हढी त्येला तुम्हीच इकत घेऊन देयाल का… एक आईचं तुटणारं आतडं तेव्हढ्यानं तरी कायमचं शांत होईल…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “ना मातीची माणसं… ना तिची माणसं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “ना मातीची माणसं… ना तिची माणसं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

बया बया ! अगं इमले काय गं हि  इमारत म्हनायची.. . किती झकपक  लाईटीनी उजळलीया.. . दिवाळीच्या कंदीलावानी रंगीबेरंगी दिसतीया कि.. . अन उच तरी किती हाय म्हनतीस, आभाळालाच टेकली कि काय?.. . तिथनं म्होरं स्वरग दोनचं बोटं उरला असलं कि.. . बाई बाई!मानसानं  मान तरी वर कर करून बघायची म्हटली तर डोईवरचा पदर खाली जमिनीवर पडला कि गं.. . चारीबाजूनं खिडक्या नि खिडक्याच दिसत्यात काय दारं बिरं ह्याला हायती का न्हाई काय कळंना कि.. . कुठूनशान जातात नि येतात गं या इमारतीतनं.. .  कशी खुराड्यावानी घरं दिसत्यात.. . मानसंच राहत असत्याल नव्हं त्यात.. . का कोंबडा कोंबडीच.. . अन एव्हढ्या उचावर राहायचं भ्या कसं वाटंत नसंल.. . खाली बघून डोळं गरगरत नसत्याल त्याचं.. अन इमले मला सांग एकाच येळेला समंध सामान घरात आणत असतील का गं?.. . का आपल्यावानी  साखरं राहिली जा पटाकन दुकानाकडं, , दुध आणायला पळ, मोहरी राहीली जा धावत.. . असं धा धा येळा येडताकपट्टीनं माणूस नि  त्यो इजेचा पाळणा थकत नसंल.. आनि इतकी बिर्हाडांच्या ये जा नी बंद पडत नसलं.. अन कधी बंद पडलाच तर हाय का आली बैदा मगं.. . वरची माणसं वरचं लटकलेली आनि खालची खोळंबलेली.. . जिनं चढून जायच़ खायचं काम असेल का ते.. . एखादा धाप लागून फुकाफुकी मरायचा बी.. . इमले आपून नाय बा तुझ्या बरुर त्या परश्याच्या घराकडं जानार.. . त्याला म्हनावं आईला भेटायला तू खाली उतरून ये.. . माझ्या छातीत बगं हे समंध बघूनच लकलक व्हायला लागलयं.. . रातच्याला इतका उजेड पडलाय मगं सकाळी कसं दिसत असेल गं.. . अन खुळे त्या इमारतीच्या खालच्या अंगाला किती मोटारी उभ्या केल्या हायती बघ जरा.. . अगं मोटार इकायचं दुकानच काढल्यागत वाटाया लागलयं.. . काळी, पांढरी, लाल, निळी, मोरपिशी.. . रंगाची उधळण केल्यासारखी.. . बापय बी चालवितो नि बाई बी.. . सुसाट सुटतात मोटारी कानावर हाॅर्न जोराचा वाजवूनवाजवून बहिरं केलं बघ.. . या दिव्याच्या झगमगटानं डोळं दिपलं कि गं वेडे.. . इमले मला लै भ्या वाटाया लागलया.. आपून आपल्या गावाकडं माघारी जाऊया.. . परश्याला सांगावा धाडू अन त्येला तूच गावाकडं ये बाबा  भेटायला असं सांगू.. . माझ्या सारखीची हि दुनिया न्हाई.. . इथं जल्माची लगिन घाई.. . कोन कुनाची चवकशी बी करीत न्हाई.. गेटवरचा वाॅचमेन लै आगाऊ.. आम्हालाच इचारतू अंदर आया काय कू.. . माझ्याच लेकराला भेटाया त्याची परमिशन लागती.. आरं म्या त्याची आय हायं धा वेळा सांगून झालं तरी बी  मलाच गुरगुरतो हमे क्यू बताती.. . परश्याला द्यायचा व्हता आक्रिताचा धक्का.. आयेला अडानी समजू नकु एकलीच शेहरात येऊन सायेबालाच येडं करील बरं का.. . परं इथं आल्यावर कळल़ वाटलं तेव्हढं सोपं न्हाई.. . आपलीच माणसं आपल्याला भेटाण्याला झाली पराई.. . गावं ते गावचं असतया.. येशीपासून ते म्हसोबा पतूर समंध्यास्नी पिरमानं पुसतया.. . शेहरात कोन कुनाची फुकापरी करील सरबराई.. . इमले आपला गावचं बरा बाई.. स्वर्गच खाली उतरून इथं आला बाई.. . आपल्या मातीशी नगं गं बेईमानी.. .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “अनंत आमुची ध्येयासक्ती…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “अनंत आमुची ध्येयासक्ती…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

जून महिना उजाडला तरी पावसाचा अजून पत्ता नव्हता..कडक उन्हाने मवाळपण धारण केले आणि आमच्या सावल्या आशेने शाळेला चालत निघाल्या… आम्ही जसे एकेक पाऊल पुढे पुढे टाकत निघालो तश्या तश्या त्या आमच्या पुढे पुढे चार पावलं पुढेच निघाल्या.. जणूकाही आमच्या पेक्षा त्यानांच जास्त शाळेला जाण्याची घाई लागली होती.. आनंद झाला होता.. आनंदाने त्या नाचत बागडत निघाल्या  होत्या.. आमच्या पायाला गुदगुल्या करून त्या म्हणत होत्या, …. ‘पोरावो  पायं उचला कि रे जरा पटापट.. करा जरा घाई बिगी बिगी जाण्याची… अजून शाळा बघा किती लांब राहिली ती मैला मैलाच्या अंतरावरती… ठावं हायं मला पायात तुमच्या पायताणं न्हाईत ते…उलंसं कुठं तरी पोळत असतील ते.. चुकार बारीक खडं नि वांड बाभळीचा काटा खुपत असणारं तुमची नदर चुकवून.. मगं कळ येउन शान आई गं म्हणाशाल कि भुलवलं तुम्हाला त्यांनी शाळेचा रस्ता चुकवाया… नगं शाळंत आज जायाला ,जाऊ उद्याला नाहीतर परवाला… शाळा कुठं पळून जातीया.. आम्ही पोरचं जर शाळंला गेलो न्हाई तर ती कुणाला बरं शिकवितीया… पाठीवर नि खाकंला पिशवीत ठूलेली पाटी नि पेन्सल.. पुस्ताकाची पुढची चार आणि मागची पाच पानंच कवाची फाटलेली  असलं मिळालेलं पुस्तक आमहास्नी त्या गरजू मदत केंद्राकडनं…योकच वही बानं घेउन दिल्याली  वरसाचा आभ्यास लिवायला.. अन वरनं दमात बोलला लै पैका खरच झालाय तुमच्या शाळंच्या शिक्षनाला.. खताला नि वैरणीला इथं पैका नसं द्यायला.. अन तुम्ही कुठं हुताय एव्हढं शिकून बॅरिस्टर नि फॅरिस्टर व्हायला.. गडी मिळनातं अव्वाच्या सव्वा पैका मोजून रानात राबायला… चारं पैसं तेव्हढचं शिलकीत राहत्यालं तुम्ही आलात रानात मदतीला…बालमजुरी हा कडक कायदा हाये कायद्याच्या पुस्तकात लिवलेला… तो कुठं घालतो पोटाला लेकराबाळांचा बारदाना असलेल्या घराला… आई जेऊ घालिना अन बा भिक मागू देईना असं सरकार डांबिस हाये.. तिकडं गुरूजी दारोदारी हिंडत्यात आईबांच्या पाया पडत्यात पोराला पोरीला शाळंत पाठवा महनत्यात माझ्या नोकरीचा सवाल हाये.. उगा गरीबाला उपाशी पाडू नगासा.. चारकच्चीबच्ची बी हायती मला… महिन्यानं फकस्त दोन येळा शाळंला येऊ द्या हाजरीला.. इन्स्पेक्टर होईल खूष पटावरची लिहिलेली हजेरी बघून… शाळा फसक्लास चालू हायं असा शेरा जाईल लिवून…बाकी सगळे दिस पोरं पोरी शाळंला नाही आली तरी चालंल… अ आ ई नि ग म भ न याच्या पलिकडं गाडी गेली नाही तरी चाललं…चौथीच्या पुढे शाळा वाढली नाही तरी चालंल…एक गुरूजी शाळा नि खडू फळा…बाकीचे गुरूजी शेहरातनं असत्यात.  पोकळ घोषणाबाजीत पुढाकार घेऊन म्हनत्यात शेहरातून खेड्याकडं वळा…शेतीप्रधान देश आपला… शेतकरी जगेल तर देश प्रगती करेल…तरच तरच आमची ध्येयासक्ती साध्य होईल..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares