मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अभ्यंग स्नान… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. अंगे भिजली जलौघाने सुस्नात झाली वसुंधरा. वारीचे ओहळ धावती मुक्तांगणी सैरावैरा. खळखळ नाद घुमवित जल निघाले भेटाया सागरा. कडाड चा थरार झंकारला तडितेचा… दुहितेची शलाका चमकली भेदून गेली अभंग नभाला… बावरले सारे चराचर भयकंपित तनमन झाले… कुर्निसात करती तरु लता त्या होऊनी नतमस्तक वर्षा पुढे, सांगती फक्त तुझीच सत्ता आम्ही कोण ते बापुडे… आडदांड खटयाळ दगड गोटे  पथा पथावरी येती वाट ती आडविती… असमंजास त्या वळसा घालून प्रवाह दावितो  चातुर्यगती. आले नवे नवे पाणी गाती गाणी बाकिबाबा… तृषार्त झाली धरित्री तृणपातीचा कोंब लवलवे इवला इवलासाबा. शाखा पल्लव तरू लतांचे सचैल न्हाऊन निघाले, हरित लेणीचें दीप उजळले… आज दिवाळीचे साऱ्या सृष्टीला अभ्यंगस्नान घडले…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “

“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा  चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज  प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी  छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू  माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना  ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या  माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत  पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय  कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन  असणारी.. मग ती माय कालची असो वा  आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला  कधीच कळत नसतं..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मी मज हरवून बसले गं… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

कालिंदीची तटी  एकांती असता…

जळी पाहता पाहता मी मजला विसरून गेले गं..

प्रतिबिंबात माझ्या दिसे मज निळा सावळा कान्हा..

जलही झाले निश्चल तन मनात रुतले रूपही सुंदर..

मी तू पणाचे भान हरपले अद्वैताचे निधान गवसले…

कुठली राधा कुठला कृष्ण प्रेमभावनेचे उदीत उष्ण…

धुन मंजुळ बासरीची धुंद झाल्या लहरी लहरी..

श्यामल वर्णाचा शेला नभी पांघरला..

अन आज राधा नाही गेली घराला..

हुंबरती वासरे गोठयाला डोळे लावूनी वाटेला..

सासवेचा राग तो तांबडालाल झाला..

अनयाचे कुंकुमतिलकाचे नाव संसाराला

हद्द झाली  राधेची कान्हाने संसार तो नासला ..

  असे फुकाचे बोल कितीही लाव लाविला… परी

राधेच्या जिवनी तो कृष्ण एकची ठसावला…

राधा दामोदर आले नावरुपाला . .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गणपती बाप्पा मोरया… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हुश्श! कालचा अनंत चतुर्दशी चा दिवस आटोपला.. सगळया भाविकांचा निरोप देता घेता इतकी दमछाक झाली म्हणून काय सांगू… आणि तो गजर गुंजतोय अजूनही माझ्या कानात…

गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या… आजवर कित्येक वर्षे विसर्जनाच्या वेळी तुम्ही मला म्हणता आणि मीही तत्परतेने दरवर्षी न चुकता तुमच्याकडे येतोच येतो… यात तसूभरही बदल झाला नाही… कारण तो होणारच नसतो ना… सगळं कसं यांत्रिकपणे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे ना ही… हां बदल फक्त सण साजरा करण्याच्या पद्धतीत झाला आहे… दर वर्षी मी नित्य चांगल्या गोष्टी देण्यासाठी हिथं मनात योजून येत असतो… पण इथं आल्यावर मला दिसतं कि आधीच सगळ्या  चांगल्या गोष्टींचा फज्जा उडालेला आहे… मग मी नविन काही न देताच निघतो  आणि तुम्ही तुमचं जुनं एकेक सोडून नव नवीन टुकार गोष्टी दाखवता.. तेव्हा माझ्या मनाला कितीतरी क्लेश होतात… अरे मी तो चौसष्ट कला नि चौदा विद्याचां अधिपती ही माझी ख्याती.. पण ऐकेक तुमच्या अंतरीच्या नाना कळा पाहून मलाच म्हणावेसे वाटते कि रे तेथे कर माझे जुळती… दिव्यांची रोषणाई, रंगीबेरंगी सजावट, वाद्यांचा  गजर, लाऊडस्पीकरच्या किंकाळ्या, छमछमत्या छम्मकछल्लूचां   नाचाचा धांगडधिंगा… यालाच खरच  हल्ली गर्दी जमते फार.. हवसे गवसे नि नवसेच फार… भक्तांच्या  अभिरुचीला पैशाचा पाऊस पडे धुंवाधार… आणि माझ्या  पुजाआरती करायच्या वेळी चार टाळकी जमे पर्यंत होतसे  नित्याची मारामार… मी मात्र मखरात बसून अर्धडोळे उन्मलित अवस्थेत पाहत असतो. ओठावर मंदस्मित आणत असतो.. लबाडांची मागण्यांची बाडची बाड भिडभाड न ठेवता  वाढता वाढे होत जातात… बदल्यात मलाही काही  द्यायचं हेच हेतूपुरस्सर विसरून जातात… अशाने होतील  कश्या पूर्ण तुमच्या मनोकामना.. राजाची बिरुदावलीचं लेबल माझ्या माथी मारून तुमचं उखळ पांढरं करून घेतात… तुम्ही बदललात मग मीच मागे का राहू आजकालच्या जमान्यात… मी ही नुसता देखावा करतो तुमचं ऐकून घेतल्यासारखं करतो.. दहा दिवस माझी करमणूक छान होते.. अन जाताना मी आठवतो यावेळेला नवे काय बरं दिसतं होते… बाकी काही असो दहा दिवस तरी मनापासून नसले तरी माझ्या भक्तीचा गुलाल तो उधळता… आपल्या घरातल्या, गल्लीतल्या, गावातल्या माणसांशी हसून खेळून राहता… तेव्हढचं एक बघून माझा उर भरून येतो… आणि केवळ हेच बघण्यासाठी दरवर्षी इथं येण्याचं मनात ठरवून निरोप घेत असतो… बरे वाटतं  तुमचं आपापसातलं त्या दिवसातले प्रेमाचं भरतं पाहून… मला निरोप देताना जड जातयं तुम्हाला हे कळतंय मला… एक मागणं मी ही मागतो तुमच्या जवळ नाही म्हणू नका मला.. जे दहा दिवस प्रेमाने तुम्ही सगळे एकत्र येऊन घालवले माझ्या सहवासात.. ते पुढच्या वर्षीच्या चतुर्थी पर्यंत तसेच ठेवाल का… तर मग दुखाचा कापूर, नैराश्याच्या अगरबत्या पेटवण्याची गरजच तुम्हाला उरणार नाही.. आनंदाचे निरांजन, समाधानाची समई तेवत राहील  अखंडपणे तुमच्या जीवनात.. दोन हस्तक नि एक मस्तक श्रद्धेने मजजवळ  झुकलेले पुरेसे असते मला.. साधी राहणी नि उच्च विचारसरणी पण तुम्ही करतायं ते अगदी उलटं असते उच्च राहणी नि टुकार विचारसरणी… अरे कुठलाच फापट पसाऱ्याचा सोस नको असतो मजला… चिंता करू नका, तरीही मी हो हो नक्की येईन बरं लवकरच पुढच्या वर्षाच्या चतुर्थीला… तो पर्यंत गणपती बाप्पा मोरया…     

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ अस्तासी गेला चंद्र काचेचा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ अस्तासी गेला चंद्र काचेचा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… ‘थांब थांब!… असा करू नकोस अविचार… अधीर मनात उलट सुलट विचारांचे माजलेले तांडव घेऊन,.. मोडल्या शपथा, भाका, आणांचे पोकळ शाब्दिक वासे हाती धरून… ओल्या वाळूवरची कोरलेली आपली जन्माक्षरे पुसली जाताना बघून… आपणच बांधलेल्या किल्लाला ध्वस्त झालेला पाहून… चिडून दाणदाण पाय आपटत याचा अर्थ काय?,असा जाब त्या चंद्राला विचारायला निघालीस!… का तो आता हाताच्या अंतरावर आला आहे म्हणून?…तुझ्या प्रीतीचा एकमेव साक्षीदार होता म्हणून!.. त्यालाच विचारणार अशी का  प्रीती दुभंगली जी अक्षर आणि अमर अशी महती असताना तिची! . मग माझ्या वाटय़ाला हे आलचं कसं.?.. माझं ऐकतेस का थोडं!.. शांत हो शांत हो!..बेचैन मन स्थिर कर… अवघड असतं सुरूवातीला पण प्रयत्न केलास तर सवयीने हळूहळू स्थिरावतयं … मग कर आपुलाच संवादु आपुल्याच मनाशी..तुझ्या एकेक प्रश्नांची भेट घडेल तुझ्याच मनात दडलेल्या उत्तराशी… अविवेकाने करून घेतला असतास सर्वनाश जीवनाचा.. समोर दिसतयं ते क्षितिज त्याला तरी कुठं ठाऊक आहे का पत्ता अंताचा!.. तू जितके चालत निघालीस तसा तसा पावला पावलाने मागे मागे  सरकत निघालेय.. गवसले का ते कधी तुला!.. मनाच्या संभ्रमावस्था तुला कधीच नव्हत्या त्या कळणाऱ्या ,पण नाहक जन्मभर होत्या छळणाऱ्या…गोडगुलाबी रंगाची उधळण भिडली आकाशात.. निळया स्वप्नांचे पक्षी पंख पसरून बसलेत गगनात.. किरमीजी छटेचा काळोख नैराश्याची झालर लावतोय आकाशी मंडपात… अर्थाचे बुडबुडे तरंगले  भ्रामक शब्दांच्या वायूतून… विराणीचे उसासे  झंकारले तुटल्या तारातून…अन तो उदास चंद्र बापुडा पाहतो तुज कडे मान वाकडी करुन… ‘

‘अगं वेडे तो तुला सांगतोय…कालपर्यंत मी सगळ्यांच्या गुजगोष्टी बघता बघता साठवत गेलो.. रुपेरी,चंदेरी लखलखत्या कोंदणी…माझ्या कडून कोणी हिरावून घेणार नाही हा दिला होता विश्र्वास.. कारण मी तेव्हा खूप खुप दूर होतो.. पण काल चांद्रयान ते मजवर उतरले आणि मधले अंतरच नाही उरले गं…  वाटेवरच्या  बागेत जावे तसे आता येथेही वर्दळ वाढली ,अन जो तो  उदर माझे फोडू लागला कुतूहलापोटी.. गुपितं लपविण्याचा खटाटोप  व्यर्थ ठरला..माझा चंद्राचा बाजारभावच घसरला… म्हणून  आलो सांगायला.. सख्यांनो आता मला वगळा नि तुम्ही दुसरा चंद्र शोधा.. झालंगेल़ विसरून जाऊया तोच चंद्रमा नभीचा हवा  हट्ट सोडून द्या…तो एक दूर दूर  काचेचा चंद्र होता, हाती येता खळकन फुटूनी गेला… अस्तासी गेला चंद्र काचेचा… ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ ये रे घना.. ये रे घना.. ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ ये रे घना.. ये रे घना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आजही जेव्हा जेव्हा मी अशी खिडकी जवळ बसुन असते… बाहेर पावसाची रिमझिम रिमझिम सुरू झालेली बघत राहते… मनाला केव्हढं सुख मिळतंय म्हणून सांगू… हवा कुंद झालेली काळ्या ढगांची शाल पांघरलेली बाहेरचं जग पाहते.. व्रात्य मुलासारखे पावसाचे उडणारे तुषार अंगावर पडत जातात अंगावरील  स्वेटरवर इवलसे मोती चमचमताना दिसतात.. मधुनच एखादी थंडगार झुळूक अंगाला लपेटून जाते ,तेव्हा सुरकुतलेल्या कायेवर शिरशिरीचा काटा  थरारतो… झुळूक कानात काही बोलून जाते.. ‘काय कुठे लागलीय तंद्री? तरुणाईतली ऐकू येतेय वाटतं वाजंत्री!’.. तिचा चेष्टेचा सूर झंकारतो..मनात विचारांचा पिंगा घुमू लागतो… गतकाळातील एकेक आठवणींची सर सर ओघळू लागते…दु:खाचे नि आनंदाचे तुषार मनात उडत असतात…घरातले एकाकीपण  वाकुल्या दावतात…पोटच्या पिलांनी पंखातले बळ अजमावण्यासाठी करियरचे क्षितीज लांब लांब विस्तारले,. आणि मायेच्या ओढीला नाईलाजाच्या आवरणाखाली आचवले.. प्रपंचाचा गाडा ओढता ओढता धन्याने जीवनाची इतिकर्तव्यता साधली.. चार सुखाचे दिवस पाहण्यासाठी मला मागेच ठेवली.. भावनेचा कल्लोळ तो उठतो मनात ,पण शब्द जुळवून येता ओठी ते तिथेच अडकतात.. कातर होतो गळा नि हुंदका होई गोळा… पाऊस बाहेर पडत राहतो.. पाऊस मनातही उसळत राहतो.. आठवणींच्या गारा टपटप पडत राहतात.. एकेक गार हळूहळू वितळत जाते… नि माझं मनं विषण्ण विषण्ण होत जाते…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ आभाळाचा वाढदिवस…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ आभाळाचा वाढदिवस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

.. आभाळाचा वाढदिवस.. हो हो तुमच्या आमच्या माणसां सारखाच आभाळाचा वाढदिवस…कितवा वाढदिवस? म्हणून किती कुत्सितपणे शंका काढताय ना… तुमचं सगळयांचं असचं ठरलेलं असतं.. वाढदिवसाला मोजमाप लावयाचं.. त्याची जन्मतारीख कोणती? ते कोणतं वर्ष होतं.. मग आता किती पूर्ण झाली? ( अजुन उरली किती?) किती गणिती प्रश्न उभे कराल… एखाद्याला जन्मतारीख ठाऊकच नसेल… नसेल त्यावेळी तशी नोंद करून ठेवायची पध्दत तर त्याने त्याचा कधी नि कसा साजरा करावा वाढदिवस?.. तुम्हीच सांगा! त्याला वाटत नसेल आपलाही वाढदिवस साजरा करावा म्हणून.. आणि अश्या कितीतरी गोष्टींच्या सहवासात आपण आलेलो असतो… मग घरच्या नित्योपयोगी वस्तू असतील.. संस्था, आस्थापना, प्राणी, वाहन, सारं सारं काही… आपल्या संपर्कात आल्यापासून त्याची कालगणना आपण सुरू करतो… कदाचित त्याची एक्सपायरी डेट सुध्दा आपल्या ठाऊक असते… त्याची वारंटी गारंटी चा कालावधी लक्षात ठेवतो आणि मग अभिमानाने दर वर्षी त्याचा वाढदिवस साजरा  केलाच तर, करण्यात आनंद मानतो… पण चंद्र सूर्य तारे, ग्रहगोल, हवा,पाणी, नद्या, तळी, समुद्र, आकाश ,डोंगर निसर्ग याचं काय.. ते करत असतील का स्व:तापूरता वाढदिवस साजरा.? .. आपल्या नकळत..निसर्गाची पूजा दरवर्षी या ना त्या नावाने  आपण करत असतो तोच दिवस त्याचा वाढदिवस म्हणून साजरा करायला काय हरकत आहे…वसुंधरादिन …काही वेळा वर्षातून दोन तीनदा देखील आपण त्याचे पूजन करतो तेव्हा तेव्हा देखील वाढदिवस करायला काय हरकत आहे… आपण नाही का तारखेने, तिथीने तर वाराने वगैरे वगैरे वाढदिवस एकाहून अधिक वेळा साजरा करतो मग यांचा केला म्हणून बिघडले कुठे. त्या सगळयांनी सतत निरपेक्ष आपल्या सेवेला हजर असावे आणि बदल्यात आपण त्यांना काय देणारं… साधं गिफ्ट पण आपण कधीच देत नाही पण तरीही ते रिटर्न गिफ्ट मात्र भरभरून देत असतात… आपला तो हक्कच आहे असे समजून ते घेत असतो…निळे पांढरे, जांभळे, नारिंगी, सोनेरी, लाल, रूपेरी… रंगांचे आकाश छतासारखे डोक्यावर पसरलेले…हसत प्रसन्न पणे पाहत असते… मग त्याला आनंद होईल, उत्साह दुणावेल, प्रसन्नता वाटेल अशी एक तरी गोष्ट त्याला द्यायला… निदान हवेने भरलेले फुगे अंतराळात सोडून दिले तरी  त्या आकाशाचा बालका सारखा आनंद गगनात मावेनासा झालेला आपल्याला नाही का कळणार…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ उघडले चंद्राने द्वार…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ उघडले चंद्राने द्वार… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… आलास ?  ये ये कधीपासून तुझीच वाट पाहत आहे या इथे… बाकी पुढारलेल्या देशातील मोजकेच जण आतापर्यंत इथं माझा पाहुणचार घेऊन गेले… तर काहीजण माझ्या परीघाभोवती फिरतच राहिले, तर काही जण यानातून उतरले गेलेच नाही.. काही तरी घोळ झाला असावा त्यावेळी… बिचारे अभागी ठरले आणि आपल्या देशी अपयशाचे धनी होऊन परतले… किती म्हणून त्यांच्या देशानी अपेक्षा, आशा बाळगल्या होत्या त्या सर्व फोल ठरल्या गेल्या… पण तू मात्र सगळ्यांच्या मागाहून तयारी करत होतास… पुढच्यास ठेच नि मागचा शहाणा या चालीवर त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करून संभाव्य चुका टाळून या इथे उशीराने का होईना पण व्यवस्थित आलास… मला स्वतःला खूप खूप आनंद झाला… आता तुला काय हवं ते तू कर… माझी कशालाच ना नाही बरं… हवा तितका दिवसाचा मुक्काम कर… संशोधन कर.. जा ये कर… आणखी कुणी तुझ्या बरोबर कुणी येणार असतील तर त्यांनाही बेलाशक आण…आतिथ्य करायला मी सदैव तयार आहे… आगमनाच्या द्वारावर मी स्वतः उभा राहून बरं… तू इथे येउन गेल्याच्या पदचिन्हाबरोबर तुझ्या देशाचा झेंडा येथे लावून जायला विसरू नको.. तुझ्या नंतर जे कोणी इथे येतील त्यांना खुणेच्या गोष्टी पाहून अती आनंद वाटेल… आजवरी तुम्हाला उंच उंच लांब लांबच्या अंतरावरून पाहत होतो पण आपली अशी भेट होईल हे स्वप्नात देखील कल्पिलेले नव्हते… आजवर दूर राहून तुम्ही सगळे जण मला या ना त्या नात्याने बोलवत होतात.. कुणाचा मी चंदामामा, तर कुणाचा मी प्रियतमेचा चंद्रमा, कुणाचा भाऊराया, तर कुणाचा सखा जिवलगा… कितीतरी गुजगोष्टी मी ऐकत आलो आहे.. लिंबोणीच्या झाडामागे दडलो आहे.. पौर्णिमेला खळखळून हसलो आहे नि कधी कधी उगाचच अमावस्येला रूसून अंधारात दडी मारून बसलो आहे… पण पण तो इतिहास आता मागे पडला.. आता तूच माझ्या कडे आलास.. त्या कविंंनां, लेखकांना, गझलकारांना म्हणावं आता खुशाल माझ्या कडे वास्तव्य करून भरभरून लिहा.. तुमची प्रतिभा शारदीय चांदण्या सारखी सतत स्त्रवत राहूदे… भाऊ नसलेल्या बहिणीनां म्हणावं आता हक्कानं माहेरपणाला या.. हा भाऊराया तुम्हाला भरभरून प्रेम देईल.. प्रियकर प्रेयसीनां म्हणावं, आता नारळाच्या, माडाच्या आडोशात बसून प्रिती गुंजन चांदण्यात कशाला करता… चक्क इथे या आणि आपली प्रिती विवाहाची, मधुचंद्राची रात्र साजरी करा… ज्याला जे जे हवं ते ते मी द्यायला तयार आहे… पण पण कलंकित, डागळलेली माणसांना  मी काहीच देऊ शकणार नाही… कारण मी स्वतः एक कलंकित, डागळलेला आहे आणि तशाच माणसांना मी मदत केली तर माझं लांछन अधिक वाढेल… मला त्यातून मुक्त व्हायचं आहे… तेव्हा मी काय सांगितले तेव्हढचं पक्क ध्यानात ठेवा… कलंकित, पापी, डागळलेल्यांना माझ्या इथं प्रवेश निषिद्ध आहे… बाकी स्वच्छ, कलंक विरहित, पुण्यशील लोकांना   हरणाची जोडीची गाडी पाठवून देईन.. तूप रोटीचं सुग्रास भोजन असेल, शेवरीच्या कापसाची मऊ मुलायम गादी निजायला असेल… आल्हाददायक रूपेरी चांदणं, शीतल वायू.. जे स्वप्नात सुद्धा पाहिले नसेल ते ते… पण पण फक्त त्यांना

… अरे अरे हे काय तू आता आला नाहीस तोवर लागलीच परत निघालास… राग आला का माझ्या बोलण्याचा तुला… असा मनुष्य  शोधूनही मिळणार नाही म्हणतोस या त्रिखंडात.. म्हणजे माझी आशा विफल ठरली कि काय… पण काही हरकत नाही पुन्हा येशील तेव्हा या गोष्टीचा नीट अभ्यास करूनच ये… मी तुझी वाट पाहत थांबेन… मेरा घर खुला है… खुलाही रहेगा.. तुम्हारे लिए…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print