सुश्री नीलांबरी शिर्के
☆
आभाळाला हात जोडूनी
केली होती मीच विनवणी
मशागत करूनी जे पेरले
तव येण्याने येई तरारुनी
*
उशीर झाला जरी यायला
धरती मनसोक्त भिजली
पेरलेल्या सशक्त बीजाला
पीकरूपाने देई भरूनी
*
टपोर मोती रास शिवारी
घरदार सारे हरखून गेले
भरून न्यायचे घरात आता
आभाळ ढगांनी भरून गेले
*
हात जोडतो पुन्हा आभाळा
आता मात्र तू पडू नको रे
घरदार राबले इथे रातदिन
इतकी परीक्षा पाहू नको रे
*
पडशील शेतामध्ये जरी तू
डोळ्यातून नित्य वाहशील
प्रामाणिक कष्टाची आमची
सांग परीक्षा कितीदा घेशील
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के