☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆3
☆
एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी वेळ देतो. प्रेम आणि माया वाटतो. तो खरोखरच श्रीमंत असतो. ह्या श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो, तर अंतःकरणाच्या समृद्धीशी असतो.
कधी कधी वाटते, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी? पैसा नाही, मोठं घर नाही, भरगच्च वस्त्रालंकार नाहीत. पण या गोष्टींचा खरा अभाव नसतो. अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा. ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही.
मला आठवतेय, माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची. कुणाच्या घरी अडचण आली, की ती कधी डबा पाठवायची, कधी धीर द्यायची, कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सूनबाईंना हसवत राहायची. तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी मानायचा.
मी एकदा आजीला विचारलं, “आजी, तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं?”
ती हसली आणि म्हणाली, “बाळा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत. परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो. जशी विहीर पाणी देते, पण कधी कोरडी पडत नाही. अगदी तशीच माझीही ओंजळ आहे. “
मी विचार करत राहिलो. खरंच. आनंद, प्रेम, माया ही अशी संपत नसतात. उलट, जितकी जास्त वाटली, तितकी वाढत जातात.
संपन्नता ही केवळ गोष्टींमध्ये नसते. ती मनात असते. आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात, ती आयुष्यभर कधीच रिकामी होत नाहीत!
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ Be cool आई ! – लेखिका: सौ. योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆
☆
लॅपटॉप आहे तो आई..! एवढ्या जोरात बटनं दाबायची गरज नाहीए त्याला….
ठक काय आई? किती वर्ष झाली माॅलला येतेस! तरी काय त्या एस्कलेटरजवळ घुटमळतेस….?
नेट बॅंकिग करत जा ग. किती सेफ आहे आई…
स्मार्टफोन फक्त फेसबुक आणि व्हॉटस अॅप साठीच बनलाय असं वाटतं का तुला..?
अशी वाक्ये फक्त माझ्याच घरात ऐकू येतात, असं नाही, तर सगळ्यांच्याच घरात ऐकू येतात…कारण हल्लीची मुलं टेक्नोस्मार्ट आहेत आणि आपण टेक्नो ढं.
पण डरने का नहीं. Cool रहनेका.
……आणि यांना तर एवढंच येतं, मला तर काय काय येतं! अख्खं घर चालवते मी !
अशी स्वतःचीच समजूत काढायची……
मुलांची काही काही मतं ऐकली की खूप मज्जा येते…..कधी त्यांचे फोटो काढले की लगेच म्हणणार….cool हां आई..टाकू नको लगेच फेसबूकवर किंवा लावू नको स्टेटसला…का रे…?असा प्रश्न आपण विचारला की उत्तर ठरलेलं असतं..Be cool, आई….आपले फोटो आपल्या साठीच असतात…..दुसर्यांसाठी नाही..
परवा एक ओळखीच्यांचं लग्न होतं
भरपूर मंडळी नाचून आनंद घेत होती..म्हणून मुलालाही म्हटलं, नाचला का नाही तू?..नाचायचं थोडं…तर म्हणाला, Be cool आई….लग्न करताना एवढं नाचण्यासारखं काय आहे…त्याचं लग्न होतंय….मी का एवढं नाचू…..?
आपली मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्याला लहानच वाटतात….
मुलगी परीक्षेला निघाली तेव्हा हे घेतलं का, ते घेतलं का…? असं विचारताना मला आलेलं टेन्शन बघून तीच मला म्हणाली….Coooooool आई….सगळं घेतलंय…….
गाडी चालवताना पण तेच होतं..
मी शक्यतो मुलांच्या मागे बसत नाही..त्यामुळे कुठे जाताना मुलगा मागे असेल तर म्हणतो….आजच पोचायचंय ना आपल्याला…..? नाही, सायकलवाले पण ओव्हरटेक करुन चाललेत म्हणून म्हटलं…..
हाॅटेलमध्ये गेलं की अन्न गरमागरम असावं, असं सगळ्यांना वाटतं..त्यासाठी त्या वेटरची जास्त ये-जा व्हायला लागली की मी म्हणते जाऊ दे रे. नको बोलावूस आता…हे ऐकलं की मुलं नक्की म्हणतात chill, आई. आपण थंड खाण्यासाठी एवढे पैसे भरणार का..?
आणि तो तुला दहा पैसेतरी सोडणार आहे का..?
फेसबुकवर फ्रेंडशिपबद्दलच्या खुप सार्या पोस्ट फिरत असतात. ते वाचून अशा फ्रेंड रिक्वेस्ट घेऊ नका, असं सांगितलं की मुलं म्हणतात, Cool आई! सगळेच काही आतंकवादी नसतात…
मुलगी तर कुठेही जाणार असेल, तर मी नेहमी सांगते कुणाही अनोळखी व्यक्तीशी बोलू नको..कुणी काही दिलं तर खाऊ नको….या सगळ्या सूचना तिला आता पाठ झाल्यात. त्यामुळे मी सांगायच्या आधीच ती म्हणते…हो..कळलं…Chill, आई! कुण्ण्णाशी नाही बोलणार….काही नाही खाणार..
एकंदर असं आहे..हल्लीची मुलं खुप clear आणि smart आहेत आणि आपली पिढी खूप मायाळू आणि सर्वांना सामावून घेणारी…
आणि या दोन्हीचा समन्वय साधून अजूनतरी दोन्ही पिढ्या मस्त मजेत चालत आहेत….चालत रहातीलच…
आपण फक्त एकच मंत्र जपायचा…
Be Cool, आई….
☆
लेखिका: श्रीमती योगिता कुलकर्णी
प्रस्तुती : सौ. दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈