मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची !- भाग-2…. संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-2 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित  ☆ 

( तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ पदी निवड होईतोवर.) इथून पुढे —–

त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर दोन फुलांसारख्या मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या, जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया,  चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरूण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. ‘ आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर?’ हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे  विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं  लागतो…मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर  समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपीडितांसाठी केलेल्या कामाचा अनुभव या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते..एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी…शोभली तर  पाहिजेच ना ? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते..आणि ते स्वत: एक स्टार…मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे  दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार…दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलवारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिनसाहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हॅंडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे…पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली…

ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली…आणि मी ती आनंदाने साधतही होते….शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association)ची प्रमुखही झाले होते…साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते…वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती…एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला  मिळत असे..

८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते…आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे..त्यांच्या हातात हात घालून !

(सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहका-यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली !

—-जय हिंद ! जय हिंद की सेना ! )

समाप्त

(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)

लेखक : – संभाजी गायके. ९८८१२९८२६०)

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची !- भाग-1 …. संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-1 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित  ☆ 

”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा! ”  मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच !

आज मी मानसशास्त्रातील डिग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला. मी म्हटलं,”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे,मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात…एखाद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून ! ” बाबा म्हणाले,” आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरूण आहे- तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ”  हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका,पण एक अडचण आहे…त्याचं एक लग्न झालंय आधीच ! ”  माझ्या चेह-यावरचं भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले, 

” अगं आर्मी ऑफिसर आहे तो…तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच. ”  माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो ! ”  त्यावर बाबा म्हणाले,

” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन.डी.ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहराडून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…स्वोर्ड ऑफ ऑनर ! हमने तुम्हारे लिए बात चलायी है….! “  यानंतर बाबा माझ्याशी,आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझं कशातही लक्ष नव्हतं ….मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं ? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं….माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला. मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. (हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रॅंक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या…बाबा म्हणालेच होते…बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे !) बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिन साहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले..वर्ष होते १९८५! साहेबांचं पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. वन्स अ‍ॅन आर्मीमॅन…ऑल्वेज अ‍ॅन आर्मीमॅन च्या चालीवर मीही आर्मीवुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंब-यापेक्षा त्यांचं मन लाईन ऑफ अ‍ॅक्च्युल कंट्रोलवरच्या उंब-यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे ‘ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे सँभालू ? ‘ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत  राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियन मध्ये पहिलं पोस्टिंग झालेलं ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत, म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात ‘ चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर.

क्रमशः….

(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)

लेखक : – संभाजी गायके.

९८८१२९८२६०

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रामा मला दागिने दे… ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

⭐ मा मला दागिने दे—-  ⭐  प्रस्तुती  सौ.अस्मिता इनामदार ⭐

चला विरक्ती आली,

दागिन्यांची आसक्ती संपली…

या बाह्य सौन्दर्यापासून आता,

मुक्ती हवीशी वाटू लागली !

 

पण सुंदर दिसण्याचा 

स्त्रीसुलभ विचार,

डोक्यातून काही जाईना…

आणि दागिन्याची हौस मनाला,

स्वस्थ काही बसू देईना !

 

मग मी रामाकडे घेतली धाव,

म्हणाले, तूच यातून मला सोडव…

तू माझा सोनार हो….आणि

माझे दैवी दागिने घडव !

 

चेहर्‍यासाठी माझ्या घडव

सुहास्याचा दागिना…

मुखावर माझ्या कधी न उमटो

मनातली विवंचना !

 

कानासाठी माझ्या घडव,

तू असे सुंदर झुबे…

माघारीही माझ्याबद्दल,

चांगलंच ऐकू येऊ दे !

 

गळ्याभोवती माझ्या असूदेत,

सतत आप्तजनांचे हात…

काय करायचेत आता मला,

चंद्रहार आणि पोहेहार ?

 

पाटल्या बांगड्या यांनी आजवर,

शोभा वाढवली हाताची…

आता वेळ आलीय, 

हात दानाने मोकळे करण्याची !

 

वेळोवेळी सजली माझी

मेखला कंबरपट्टा यांनी कंबर…

आता तिची खरी शोभा,

ती ताठ आहे तोवर !

 

 जोडवी अशी जड घडव, 

की पाय जमिनीवरच राहतील…

आता सांग हे रामा 

हे सारे दागिने केव्हा देशील,

 

दैवी दागिन्याची माझी मागणी ,

रामचंद्र  सोनारानं नोंदवून घेतली…

“जरा वेळ लागेल” अस म्हणत,

स्वत:ची भूमिका स्पष्ट केली

 

हसतच वदला रामराया……. 

 

“अहो ,हे दागिने तयार नसतात,

कारण त्यांना तेवढी मागणी नसते..

पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत,

घेणाऱ्या भक्ताची, (पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी,

एवढीच माफक अपेक्षा असते !

 

घडणावळीची काळजी नको,

कारण आम्ही ती घेतच नाही.. 

रामनाम चालू ठेव  

दागिने लवकरच घरपोच होतील

 

असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं…खरेतर हाच माझा छंद..

 

त्यासाठीच मी छातीवर हात ठेवून उभा आहे…

तुझ्या सारख्या अनोख्या भक्तांची वाट पहात…

कारण भक्तांच्या इच्छा पुरविणे, भक्तांचे  भय नाहीसे करणे..

 

हेच तर माझे कर्तव्य….?

 

प्रस्तुती : सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 25 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 25– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[११७]

या माझ्या लहानशा जगात

राहतो मी दिवसरात्र जपत

क्षुद्र …क्षुल्लक … क्षीण गोष्टी

उचलून घे ना मला

तुझ्याच जगात

आणि दे स्वातंत्र्य

अगदी आनंदाने

स्वत:लाच हरवून टाकण्याचे

पुसून टाकण्याचे … 

 

[११८]

परिवर्तनाचं वैभव असतो

काळ म्हणजे

पण घड्याळ जेव्हा

विडंबन करतं काळाचं

तेव्हा शिल्लक रहातं

केवळ परिवर्तन

एका क्षणाचं दुसर्‍या क्षणात

वैभवाचा मागमूसही

नसतो त्यात….

 

[११९]

दिवा विझल्यावर

अधिकच मादक बनून

मला बिलगणार्‍या

माझ्या प्रियेसारखी

चारी बाजूंनी

जाणवत रहाते मला

ही काळोखी रात्र

विलक्षण सौंदर्याचा

रेशमी पोत असलेली

 

[१२०]

धुकं पूर्णपणे वितळल्याशिवाय

स्वच्छ प्रकाशात नाही

सकाळचा सूर्य

तशी

माझं नाव पुसून टाकल्याशिवाय

ओसंडत नाही

तुझ्या नामाची माधुरी  

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आक्रोश…..(कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आक्रोश…..(कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

मातीवरचा आक्रोश आता,

आकाशात पण नाही मावत !

बातमी केवढा आघात करते,

“आता नाहीत बिपिन रावत !”

 

नुसतंच शौर्य नव्हते रावत,

तिन्ही दलात समन्वय !

किती वीर रोज जातात,

तरी होत नाही सवय !

 

दर दिवशीच एकेक तारा,

उल्का होऊन पडत आहे !

खरंच गळ्यात हुंदका म्हणून,

एकेक घास अडत आहे !

 

शौर्य तिथेच घात असतो,

गांडुळं काय फिरतात कमी?

त्याना गाठू शकेन अशी,

यमालाही नसते हमी !

 

उंचावरती जाणंच सांगतं,

इंचा-इंचावरती धोके !

लोणी खावून जमिनीवरती,

खादीत निर्धोक,खादाड बोके !

 

चालती बोलती तटबंदीच ही,

“भारत-गड” सुखरुप ठेवते !

हुतात्म्यांच्या माळेमधे,

आपल्या सर्वस्वालाच ओवते !

 

काळालाही हेवा वाटतो,

म्हणून दगा हवेत देतो !

साक्षात् देव आसन सोडून,

असे वीर कवेत घेतो !

 

असह्य नि असहाय म्हणजे,

काय याचा अनुभव क्रूर !

पापणी सोडून एकेक थेंब,

त्यांच्यासोबत चाललाय दूर !

 

 -प्रमोद जोशी.देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्ट्रगलच संपला राव… ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ स्ट्रगलच संपला राव !!! ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

सेल्फ स्टार्टर बाईक आल्यापासून..

हमारा बजाज तिरकी करून स्टार्ट करण्याचा आयुष्यातील  स्ट्रगलच संपला राव …!!

एलईडी टीव्ही आल्यापासून 

वुडन बॉक्स टीव्हीचे प्रक्षेपण बंद झाल्यावर “हमें खेद है ! “ वाचत प्रक्षेपण पुन्हा सुरू होण्याची वाट बघायचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव…!!!

डीटीएच आल्यापासून.. 

कौलावर चढून अँटेना फिरवत ‘ टीव्ही वरले चित्र दिसते का रे भो ? ‘ असे ओरडून विचारण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!!!

मोबाईल फोन आल्यापासून

रात्री दहानंतर एसटीडी बूथसमोर रांगेत उभे राहून आपल्या मुला-  मुलींची खुशाली– काय ..काय –करत विचारण्यात पल्सवर लक्ष ठेवत बिलाची चिंता करण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव …!!!!

पेटीएम आल्यापासून..

हॉस्टेल रूमवर मनीऑर्डरची वाट बघत महिनाअखेरचे दोन दिवस भेळ भत्ता खाऊन काढायचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव !!!

इमेल आल्यापासून..

गावाकडून येणाऱ्या पत्राची वाट बघत आख्खी दुपार लोळून काढण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव ..!!

गुगल आल्यापासून..

एखाद्या संदर्भावर लावलेली पैज जिंकण्यासाठी रात्र रात्र लायब्ररीतले दिवे जाळून पुस्तके चाळून काढण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव !!!

गुगल मॅप आल्यापासून..

जिल्ह्याच्या रस्त्यावर हजार वेळा विचारूनही पत्ता हमखास चुकण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव!!!

व्हाट्सअप आल्यापासून..

कामावरून सुटल्यावर मित्रांच्या कट्टयावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव!!!

खरं सांगू ??

हे ग्लोबलायझेशन आल्यापासून….

माणसं सोडून यंत्राशी जमवून घेण्याचा आयुष्यातील मोठाच स्ट्रगल मात्र सुरू झाला ना राव !!!!

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विश्वविक्रम….उदयन ठक्कर – अनुवाद…अनामिक ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ विश्वविक्रम….उदयन ठक्कर – अनुवाद…अनामिक ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एका कवीने

लिम्का बुक ऑफ वल्ड रेकॉर्डला पत्र लिहिले,

मी नवीन काव्यप्रकाराचा शोध लावला आहे 

त्यात फक्त दोनच ओळी आहेत

पहिल्या ओळीत दोन शब्द व

दुसर्या  ओळीतसुद्धा दोन शब्द आहेत

म्हणून हा काव्यप्रकार  थोडक्यात थोडका आहे

आणि विश्वविक्रम आहे.

माझी विनंती आहे की आपल्या पुस्तकात याची नोंद कराल का?

कवींना उत्तर मिळाले ‘नोंद नाही करणार’

हे उत्तर थोडक्यात थोडके म्हणून उत्तरसुद्धा विश्वविक्रम आहे.

 

मूळ कवी  – उदयन ठक्कर

अनुवाद – अनामिक

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिवाळीच्या फराळाची मैफल – भूपाल पणशीकर ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ दिवाळीच्या फराळाची मैफल – भूपाल पणशीकर ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित 

“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँसाहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते !

फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल, तर तो असा साग्रसंगीत खावा की जणू संगीताची मैफलच आहे.

तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.

शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.

पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात, तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो, तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात, तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते, तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी !

काही राग काफी थाटाचे असतात, तसे इथे देखील ‘ कॉफी ‘ थाट असेल तर मजा कुछ औरच ! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.

काही स्वर आरोहात वर्ज्य असतात, तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.

बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स- ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.

भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला की जशी खुमारी वाढते, तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो. 

यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत, तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा. 

चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगारप्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून ठुमरीचं भावगीत करू नये.

शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी त्यांच्या बरोबर ते ओढे, म्हणजे कट्यारमधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.

करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.

शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.

मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.

 

– भूपाल पणशीकर

संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ MMM ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ MMM – श्री सुनीत मुळे ☆ 

… कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढंच माहीत होतं…

… पुढे कधीतरी MMM म्हणजे मदन मोहन मालवीय हे मला कळले…

… पण गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…

… बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधीपर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर…” मनी मेकिंग मशीन “चा अर्थ कळतो…

… सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटींचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…

… याच देणगीसाठी ते हैदराबादच्या निजामाला भेटले… विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता… पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते…

… समोर बसलेल्या पंडितजींकडे पाहून आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता… नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजींना वहाण दाखवत होता… 

… पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली… नबाबाने दुसरा पाय पुढे केला.  पंडितजींनी तीही मोजडी काढून घेतली आणि ‘ बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो ‘ म्हणून बाहेर पडले…

… आपण पंडितजींना जोडे दिले या आनंदात… नवाब खुशीत गाजरं खात होता…

… आणि तोपर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली… पंडितजी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत… नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…

… आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी नबाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले… लिलावाची बोली सुरू झाली… नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्यावर आपली बोली लावू लागला… पंडितजींचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोलीच्या वर प्रत्येकवेळी बोली लावत होते… अर्थात तशी योजना खुद्द पंडितजींनीच केली होती…

…पंडितजींची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली… बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी… पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला… बोली थांबली… लिलाव संपला…

… आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नबाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो–हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये… जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता, आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होते… 

… “हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा… नबाबाची सगळी गुर्मी मस्ती उतरवून त्याच्याच मोजड्या त्याच्याच गळ्यात मारणारा… भारत मातेचा थोर सुपुत्र… MMM… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन अर्पण करणारा हा आधुनिक महर्षी… स्वातंत्र्यापूर्वी अवघे दहा महिने आधी स्वर्गवासी व्हावा हा काय दैवदुर्विलास…

पंडितजींच्या चरणी शतकोटी वंदन

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असे एकदा तरी म्हण….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ असे एकदा तरी म्हण…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

अरे एकदा तरी म्हण—-

माणसाला हवा सदा आनंद,

पण देवाला देतो काही सेकंद.

विषयांमध्ये जातो  गढून,

देवाची आठवण अधून-मधून.

प्रपंच करतो आवडीने,

परमार्थ  मात्र सवडीने.

नाही पूजा नाही ध्यान, 

मोबाईलशी अनुसंधान.

नामस्मरण boring फार 

त्याने काय होणार यार?? 

देवाने करावी कृपा खास 

गप्पा मारतो तासंतास.

जप करतो माळेवर 

पण खरे प्रेम पैशावर.

खिचडीसाठी करतो उपास,

भक्तीमध्ये पूर्ण नापास.

स्वतःच्या पानात वाटयांची दाटी,

नैवेद्याला छोटी वाटी.

संकट आल्यावर देव आठवतो,

नवस बोलून deal करतो.

अभिषेक मोठ्या थाटात करतो, 

return वरती डोळा असतो.

सर्व करतो स्वतःसाठी,

पण देव हवा सदा पाठी.

 

देवाकडं सारख मागणं,

माणसा तुझं काय हे वागणं ??——

शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे

नोकरी दे, घर दे, बायको दे, मुलं दे

सुख दे, समाधान दे, यश दे, कीर्ती दे 

आणि हे  सारं कायम टिकू दे,  

असाही देवा वर दे ! 

 

हसून देव म्हणतो,

माणसा थकलो तुला देऊन सारखा— 

मागण्या मागतोस फारच मस्त,

पण एवढा मी नाही स्वस्त—-.

 

मागून मागून थकत नाहीस, थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस !

भक्तीमध्ये करतोस लबाडी, अरे चाललीये कुठे तुझी गाडी.

 

एवढं सगळं द्यायचं म्हणतोस, पण माझ्यासाठी काय करतोस?? 

थोडीफार आठवण काढून, मलाच तुझी सेवा सांगतोस..!

 

अरे एकदा तरी म्हण राजा, देवा मला भक्ती दे. 

                                  मनी तुझे प्रेम दे, पायी तुझ्या मुक्ती दे.

 

तुझे गीत गाण्यासाठी कंठामध्ये सूर दे 

तुझे रूप बघण्यासाठी डोळ्यांमध्ये भूक दे 

 

तुझा महिमा ऐकण्याची कानांना या आस दे

                                     तुझे नाम घेण्यासाठी  माझा प्रत्येक श्वास दे. .! 

 

सुटो माझी आसक्ती, लाभो मला विरक्ती.

अंतकाळ साधण्याइतके नामामध्ये प्रेम दे—-

नामामध्ये प्रेम दे—-

 

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares