वाचताना वेचलेले
☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
सोलापुरी भाकरी, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. शेंगा चटणीचा बोलबाला खूप होतो, पण बिचाऱ्या भाकरीला कोणी विचारत नाही. जोंधळ्याची, म्हणजेच ज्वारीची भाकरी ही तब्येतीला खूप चांगली असते, असं काही डॉक्टर सांगतात. इथेही पुन्हा डाव्या विचारसरणीचे डॉक्टर्स ” ज्वारी हा पिष्टमय पदार्थ असल्याने त्या मुळे शुगर वाढते ! ” असं ठणकावून सांगतात.
भाकरी ही पौर्णिमेच्या चंद्रासारखी असावी, तिच्यावर चंद्रावर असलेली हरणांची जोडी असावी ( थोडी जास्त भाजल्यावर ती करपते ).
गोल भाकरी करणे ही सुद्धा एक कला आहे. भाकरी करताना एक प्रकारे तीनताल वाजतो, धा s धा s धा s धा, भाकरी फिरवली जाते पुन्हा धा s धा s धा s धा. धिं हे अक्षर जरी वाजत नसलं तरी, मात्रा मात्र बरोबर असतात. अशा तीनतालात ज्या बायका भाकरी करतात, त्यांच्या भाकऱ्या सुंदर होतात. माझी मोठी बहीण अश्विनी देशपांडे हिने केलेली भाकरी खरंच सुंदर असते.
आमचे जगन्मित्र गुरुसिद्धय्या स्वामी ह्यांची एक बहीण बाळीवेसेत राहते. तिच्याकडे आम्ही एकदा जेवायला ( खास भाकरी खायला ) गेलो होतो. भाकरीतली वाफ आणि त्याच्या पापुद्र्यातले हाताला बसणारे चटके खात, भाकरी खाणे, हा विलक्षण योग तिथे आला. बिचारीचा प्रेमळपणा पण इतका, की पहिली भाकरी खाता खाता ताटात थंड होते, म्हणून ” ती अर्धी बाजूला ठेवा, ही दुसरी खावा ” भावावर असणारी मृदू माया आणि हाताला चटके देणारा हा ‘भाकरी योग’ आयुष्यभर लक्षात राहिला.
तसं सोलापूरच्या लोकांना भाकरीचं फार कौतुक नाहीये, कारण बहुतेक सोलापूरच्या घराघरांतून अशा भाकरी करणाऱ्या खूप माऊली आहेत. भाकऱ्या बडवण्यासाठीच आपला जन्म आहे, अशी सुद्धा काहीजणींची भावना आहे.
दोन वेळची चटणी भाकरी मिळाली की माणूस खूश होतो. खारब्याळी, रोट्टी आणि शेंगा च्यटणी साधं सोप्पं जेवणाचं गणित. त्यामुळे प्रॉपर सोलापुरी माणूस बाहेर फारसा जातही नाही आणि रमत देखील नाही.
” भाकर तुकडा खाल्ला का न्है अजुक ?” म्हणजे ‘जेवण झालं की नाही ?’ असं विचारलं जातं. पोळी म्हणजे ती फक्त पुरणाची, साधी पोळी म्हणजे ” चपाती “
एकंदरीतच पोळी, भाकरी, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ हे पदार्थ, अस्सल तबलावादकाने वाजविलेल्या कायद्यासारखे असतात. एकही मात्रा इकडची तिकडे होत नाही. हळू हळू भाकऱ्या खाणारे ( आता दीड भाकरी सकाळी दीड संध्याकाळी ) कमी होत चालले, तशी बायकांची भाकरी करायची सवयदेखील मोडायला लागली.
पुरुष जे जे काही करू शकतात, ते ते बायका करू शकतात, पण बायका जशी भाकरी करतात तशी भाकरी, पुरुष कधीच करू शकत नाहीत. पोळ्या करणारे पुरुष आहेत. पण ते फक्त भाजण्याची क्रिया करू शकतात. बाकी पोळी लाटणे आणि भाकरी थापणे यावर बायकांची अजूनतरी मक्तेदारी आहे.
आता भारतातून अमेरिकेत गेलेली मुलं, यू ट्यूब बघून किंवा आयांना विचारून पोळ्या करतात, पण भाकरीच्या कुणी मागे लागत नाही. अगदी सांगायचं झालं तर अजून शहरातल्या पोरीसुद्धा भाकरीच्या नादी लागत नाहीत.
मावळात तांदळाची भाकरी करतात, डोसा किंवा दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, (निर डोसा, ज्याला खूप निऱ्या असतात) यांची महाराष्ट्रातील मावस बहीण म्हणजे, मावळातली तांदळाची भाकरी.
जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेला तयार होणारी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी. स्वभावाने खूपच तापट असते, म्हणून फक्त भोगीच्या दिवशीच फक्त तिला वापरतात. पुण्याच्या परिसरात भाकरी म्हणजे बाजरीचीच, ज्वारीची पाहिजे असल्यास सांगावं लागतं, जसं मराठवाड्यात स्टेट बँक म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँकेला इंडिया बँक असं म्हणतात तसं.
भाकरीची अनेक भावंडं आहेत, सगळ्यात लहान आणि खूप खोडकर भाऊ ज्याला आई पाठीत जास्त धपाटे घालते, तो ‘धपाटे’.
आता पुण्या मुंबईत ‘ लोणी धपाटे ‘ या नावाने काहीही विकलं जातं. नुसता तेलात डाळीचा बॅटर घालून तव्यावर भाजणे म्हणजे, धपाटे नसतात रे sss !
धपाटे का करावे ? पूर्वी सोलापूरहून पुण्याला यायचं म्हणजे प्रवासात किमान दोन जेवणं व्हायची ( हीच लाल परी आठ आठ तास घ्यायची पुण्यात पोचायला, विजापुर औरंगाबाद तर सकाळी सहा वाजता विजापुरहून निघाली की, संध्याकाळी सहा वाजता कशीबशी औरंगाबादला पोचायची. दोन ड्राइव्हरच्या झोपा व्हायच्या. त्यामुळे प्रवासात जेवण्यासाठी या धपाट्यांचा शोध लावलाय, आपल्या हुशार पूर्वजांनी. जास्त वेळ टिकावा आणि त्यासोबत शक्यतो तोंडी लावायला कशाची गरज पडू नये, ही त्यावेळची गरज होती.
थालीपीठ हा देखील भाकरीचा भाऊच. करणाऱ्या सुगरणीच्या बोटांचे ठसे आणि चार छिद्रमय थालीपीठ किती लोकांच्या नशिबात आहे काय माहीत ! मला तरी थालीपिठाचा पृष्ठभाग चंद्रावर असलेल्या जमिनीसारखा वाटतो. त्यात तेल आतपर्यंत मुरावं म्हणून केलेली छिद्रे ही चंद्रावरच्या फोटोत दिसलेल्या जमीनीसारखी वाटतात.
पुण्यात हॉटेलात मिळणारी थालीपीठ ही खाद्य वस्तू, म्हणजे मर्तुकडी आणि हडकुळ्या माणसासारखी भासतात. थालीपीठ कसं लुसलुशीत असायला हवं, आता कशाच्याही नावावर काहीही विकतात आणि आपण ते खातो ( घरी करायला नको, म्हणून त्यालाच चांगलं म्हणून मोकळेही होतो. )
आता काही ठिकाणी मल्टिग्रेन नावाचं एक आभूषण ह्या सगळ्या खाद्य पदार्थांवर आलंय. हेल्थ कॉन्शस लोक अशा नवनवीन कल्पना शोधून काढतात. तशी मल्टिग्रेन थालीपीठ मिळतील. गिरणीत सांडलेली सगळी पिठं एकत्र करून त्यांचं थालीपीठ म्हणजे मल्टिग्रेन थालीपीठ.
मक्याची पण भाकरी करतात. ती कधी फारशी खाण्यात आली नाही. ती थोडीफार पंजाबात लग्न होऊन गेलेल्या बहिणीसारखी गलेलठ्ठ आणि तिच्या सोबत ” बरसोंका साग ” बरसो से खाते हैं इसलिये, सरसोंका च्या ऐवजी बरसोंका !
रोठ हा देखील भाकरी सदृश पदार्थ. इकडे विदर्भात तर, एके दिवशी पोळ्याभाकरी करताना नवऱ्याशी भांडण झालं आणि बायको चिडली, ” मी नाही पोळ्याभाकरी करणार ” असं म्हणून, तिने पोळ्या करायला केलेले गोळे, रागारागाने दिले चुलीत फेकून आणि गेली निघून बाहेर. नवऱ्याला लागली होती कडक भूक, त्याने ते चुलीतले गोळे काढले बाहेर आणि त्यावरची राख फुंकून घातले वरणात, ते गोळे झाले कडक म्हणून त्यावर भरमसाठ तूप घातलं, त्याला ते इतकं आवडलं की तो एक नवीन पदार्थ तयार झाला. त्याचं नाव दाल भाटी. खरं तर तो तेव्हा पुटपुटला होता ” दाल भागी ” म्हणजे बायकोने गोळे दाल दिये चुल्हे में और भाग गयी. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि दाल भाटी तयार झाली असावी, असा माझा अंदाज आहे बरं का !
‘वरण फळं ‘, ‘चकोल्या ‘अशा नावाचा पण एक पदार्थ महाराष्ट्र आणि विदर्भात जास्ती दिसतो. ” रोज रोज काय मेलं त्या पोळ्या भाजायच्या, असं म्हणून एखाद्या गृहिणीने, शेजारच्या गॅसवर उकळत्या आमटीत लाटलेल्या पोळ्यांचे तुकडे टाकले आणि झाली वरण फळं तय्यार ! वरून लसणीची फोडणी, खोबरं वगैरे साज शृंगार नंतर केला गेला असावा.
अरेच्या ! भाकरीपासून झालेली सुरुवात बघा कुठे कुठे पोचली, सगळ्यात शेवटी काय ? तर असेल चाकरी तर मिळेल भाकरी, किंवा बहिणाबाईंच्या ओळी तर जगप्रसिद्ध आहेतच,
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.
लेखक : सतीश वैद्य
फोन नं. : 9373109646
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈