मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आठवतंय ना…… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आठवतंय ना… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेटसाठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता…. आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद….. आठवतंय ना..

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो, कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते,

“अरे बाबांनो.. दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे…. ! “ 

असो…. !! 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “धुक्यात हरवलेली ही पहाट…” – लेखक : श्री विलास कुमार ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “धुक्यात हरवलेली ही पहाट…” – लेखक : श्री विलास कुमार ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

धुक्यात हरवलेली ही पहाट…

 अज्ञाताकडे घेऊन जाणारी ती वाट…

अशी धुक्याच्या दुलईमध्ये लपेटलेली पहाट ही पाहण्याची नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. परतीचा पाऊस येऊन गेलेला असतो… थंडीची चाहूल लागण्यापूर्वीचा हा काळ… हवेत एक प्रकारचा उबदार गारवा असतो. आपल्या समोरचा काही भाग फक्त दृश्यमान असतो. जणू काही

नूतन जोडप्यामधील एकमेकांबद्दल समज! अजून एकमेकांच्या स्वभावाची पुरेशी ओळख झालेली नसते. नुसते काही ठोकताळे बांधलेले असतात. ते समज गैरसमज हळूहळू कळत जातात. खरे झाल्यावर कधी आनंद होतो, तर चुकल्यावर कधी किंचित निराशाही येते…. एकमेकांना समजून घेत संसाराच्या वाटेवर प्रवास सुरूच असतो.

कधी कधी वाट चुकू शकते…. धुक्यामध्ये हरवल्यासारखे अर्ध्या वाटेवर जोडीदाराला टाकून पुढे जावे लागते… नियतीच्या चकव्यापुढे कधी कधी शरण जावे लागते.

एकमेकांबद्दलचे गैरसमज नंतर हळूहळू वितळून जातात…. जणू काही धुके सरून लख्ख ऊन पडतं. भविष्यातील मार्ग स्वच्छ दिसायला लागतो. संसाररूपी उन्हाचा कडाका सहन करत जीवन प्रवास चालू होतो…. सहजीवनाच्या पहाटेस अनुभवलेल्या या धुक्याला मात्र कुणी विसरू शकत नाही…

पहाटेच्या ह्या स्वप्नाची कुपी जोडीदाराची ताटातूट झाल्यावरही मनपटलावर कायमची दिसत राहते…

धुक्या सारखीच…

 अंधुक…

 विरळ….

लेखक : श्री. विलास कुमार

प्स्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘खूप बोला’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘खूप बोला’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

 वृद्ध लोक जेव्हा जास्त बोलतात तेव्हा त्यांची थट्टा केली जाते, परंतु डॉक्टर त्याकडे आशीर्वाद म्हणून पाहतात.

डॉक्टर म्हणतात की सेवानिवृत्तांनी (ज्येष्ठ नागरिकांनी) अधिक बोलले पाहिजे, कारण सध्या स्मरणशक्ती कमी होण्यापासून रोखण्याचा कोणताही मार्ग नाही. अधिक बोलणे हा एकमेव मार्ग आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अधिक बोलण्याचे किमान तीन फायदे आहेत:

  1. बोलण्याने मेंदू सक्रिय होतो, कारण भाषा आणि विचार एकमेकांशी संवाद साधतात. विशेषत: पटकन बोलत असताना. यामुळे स्वाभाविकपणे विचारांना गती मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते. गैर-मौखिक ज्येष्ठ नागरिकांची स्मरणशक्ती कमी होण्याची शक्यता असते. 
  2. जास्त बोलल्याने तणाव कमी होतो, मानसिक आजार टाळता येतो आणि त्यामुळेही तणाव कमी होतो. अनेकदा काहीही न बोलता सर्व काही हृदयात ठेवणे, गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थ वाटणे असे होऊ शकते. म्हणूनच, प्रौढांना अधिक बोलण्याची संधी देणे चांगले आहे.
  3. भाषणामुळे चेहऱ्याच्या सक्रिय स्नायूंचा व्यायाम होतो, घशाचा व्यायाम होतो, फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि डोळा आणि कानांना इजा पोहोचवणारे चक्कर आणि बहिरेपणाचे छुपे धोके कमी होतात.

 थोडक्यात एक सेवानिवृत्त, म्हणजेच ज्येष्ठ नागरिक म्हणून, अल्झायमरपासून बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जास्तीत जास्त लोकांशी बोलणे आणि सक्रियपणे संवाद साधणे. यावर दुसरा उपाय नाही.

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ या प्रकारची औषधे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

या प्रकारची औषधे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

या प्रकारची औषधे जगातील कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीत आणि भविष्यातही मिळणार नाहीत. जर तुम्ही ही औषधे नीट वाचून समजून घेतलीत आणि तुमच्या जीवनात अंमलात आणलीत, तर तुम्हाला बाकीसाठी कोणत्याही गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.

  1. लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे.
  2. ॐ कारचा आवाज हे औषध आहे.
  3. योग प्राणायाम आणि व्यायाम हे औषध आहेत.
  4. सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे.
  5. उपवास हा सर्व रोगांवर उपाय आहे.
  6. सूर्यप्रकाशदेखील औषध आहे.
  7. माठातील पाणी पिणे हेदेखील औषध आहे.
  8. शिस्तबद्ध टाळ्या वाजवणे हेदेखील औषध आहे.
  9. अन्न भरपूर चघळणे हे औषध आहे.
  10. अन्नाप्रमाणे पाणी चघळणे आणि पिणे हे देखील औषध आहे.
  11. जेवल्यानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे.
  12. आनंदी राहण्याचा निर्णयदेखील औषध आहे.
  13. कधीकधी मौन हे औषध असते.
  14. हास्य आणि विनोद हे औषध आहेत.
  15. समाधान हेदेखील औषध आहे.
  16. मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे.
  17. मनातील सकारात्मकता हे औषध आहे.
  18. निस्वार्थी प्रेम, भावनादेखील औषध आहे.
  19. सर्वांचे भले करणे हेदेखील औषध आहे.
  20. कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे करणे हे औषध आहे.
  21. सर्वांसोबत राहणे हे औषध आहे.
  22. कुटुंबासोबत खाणे आणि जोडले जाणे हे देखील औषध आहे.
  23. तुमचा प्रत्येक सच्चा आणि चांगला मित्रसुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.
  24. मस्त राहा, व्यस्त राहा, निरोगी राहा आणि आनंदी राहा. हेदेखील एक औषध आहे.
  25. प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या. हेदेखील एक औषध आहे.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे अगदी मोफत उपलब्ध आहेत आणि ती सर्व कशी आणि कुठे मिळतील याची कल्पना आली की, त्याची अंमलबजावणी करणे हेदेखील औषधासारखेच असते!

निसर्गावर विश्वास ठेवा.

निसर्ग हा सर्वोत्तम उपचार करणारा आहे.

लेखक: अज्ञात

प्रस्तुती:सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गोष्ट मोक्षाची…” – कवी : श्री वासुदेव महादेवराव खोपडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “गोष्ट मोक्षाची…” – कवी : श्री वासुदेव महादेवराव खोपडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

नको मले खीर पूरी

नको देऊ भजा वळा

गोष्ट मोक्षाचिच सांगे

दारी एकाक्ष कावळा !!

 *

दारी एकाक्ष कावळा

कसा काव काव बोले

मानवाचे कटू सत्य

पट अंतरीचे खोले !!

 *

पट अंतरीचे खोले

एकाक्ष बहुजनांत

तुमचाच बाप कैसा

येतो पित्तरपाठात !!

 *

येतो पित्तरपाठात

आत्मा हा स्वर्गातूनी

आत्म्याचा प्रवास सांगा

पाहिलायकारे कुणी ?

 *

पाहिलायकारे कुणी ?

रस्ता स्वर्ग नरकाचा

सारा कल्पना विलास

धंदा धनाचा पोटाचा !!

 *

धंदा धनाचा पोटाचा

भट शास्त्री पंडिताचा

कधी कळेल रे तुला

खेळ डोळस श्रद्धेचा !!

 *

खेळं डोळस श्रद्धेचा

खेळ होऊन माणूस

मायबापाच्या मुखात

घाल जित्तेपणी घासं !!

 *

घाल जित्तेपणी घासं

नको वृद्धाश्रम गळा

नको करू रे साजरा

अंधश्रद्धेचा सोहळा !!

 *

अंधश्रद्धेचा सोहळा

भीती धर्माची ग्रहाची

आत्म मोक्षासाठी फक्त

भीती असावी कर्माची !!

 *

भीती असावी कर्माची

कर्म सोडीना कुणाला

सांगे मोक्षाचिच गोठ

दारी एकाक्ष कावळा !!

कवी : श्री वासुदेव महादेवराव खोपडे

 सहा पोलीस उपनिरीक्षक (से. नि.), अकोला 9923488556

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दाम्पत्य…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “दाम्पत्य” –  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

प्रत्येकाच्या नशिबात

एक बायको असते

आपणास कळतही नसते

डोक्यावर ती केव्हा बसते

 

बायको इतरांशी बोलताना

गोड, मृदू स्वरात बोलते

अजून ब्रह्मदेवालाही कळले नाही

नवऱ्याने काय पाप केलेले असते

 

ज्ञानेश्वराने भिंत चालवली

बायको त्यांचं कौतुक करते

सालं नवरा अख्खं घर चालवितो

तेव्हा मात्र बायको गप्प असते

 

वस्तू कुठे ठेवली हे

बायको विसरते

दिवसभर नवऱ्यावर

उगीचच डाफरते

 

लग्नात पाचवारी बायकोला

खूप होत होती मोठी

आता नऊवारी गोल नेसतानाही

बायकोला होतेय खूपच छोटी

 

बायकोच्या प्रेमाची गड्यांनो

तर्‍हाच खूप न्यारी असते

पाहिजे तेव्हा रेशन लागते

नको तेव्हा उतू जाते

 

वयाच्या साठीनंतर

एक मात्र बरं असतं

बायको ओरडली तरी

नवऱ्याला ऐकू येत नसतं

 

 काट्याकुट्याच्या रस्त्यातून

 नवरा किती मस्तीत चालतो

 याला कारण खरं बायकोचा

 मस्त, धुंद सहवास असतो

 

 बायको गावाला गेली की

 देवाशपथ, करमत नसतं

 क्षणाक्षणाला रुसणारं

 घरात कुणीच नसतं

 

 नवरा-बायकोचं

 वेगळंच नातं असतं

 एकमेकांचं चुकलं तरी

 एकमेकांच्याच मिठीत जातं

 

 बायकोवर रागावलो तरी

 तिचं नेहमी काम पडतं

 थोडा वेळ जवळ नसली तर

 आपलं सर्वच काही अडत असतं

 

 अव्यवस्थित संसाराला

 व्यवस्थित वळण लागतं

 त्यासाठी अधूनमधून

 बायकोचं ऐकावंच लागतं

 

 बायकोशी भांडताना

 मन कलुषित नसावं

 दोघांचं भांडण

 खेळातलंच असावं

 

 नाती असतात पुष्कळ

 पण कुणी कुणाचं नसतं

 खरं फक्त एकच

 नवराबायकोचं नातं असतं

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायरमेंटनंतरचं आयुष्य… लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

रिटायरमेंटनंतरचं आयुष्य… लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆

रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेकांना वेळ देता येतो. आपण म्हणतो पण, काही क्षण हे त्या दोघांनीच स्वतःसाठी जगले पाहिजे. कशी गंमत असते, लग्नाच्या बेडीत अडकलं की जबाबदाऱ्यांमधून दोघांचीही सुटका नसते. नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे रुसवेफुगवे होतात, कितीतरी वेळा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ या वरुन तात्त्विक वाद होतात. पण, दोघांपैकी एक जण जरी घरी नसलं तरी आठवणींनी मन व्याकूळ होते. संसार करताना किती तडजोडी कराव्या लागल्या, काही नवीन अनुभव गाठीशी आले याचा हिशोब हा रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात समजतो. पण हे वय खरंच एकमेकांना सांभाळण्याचे असते ना!कारण, दोघे संसारात लोणच्यासारखे मुरलेले असतात. भाळणं संपलेलं असतं, आता जपणूक सुरू झालेली असते. म्हणून तर व. पु. म्हणतात, “आयुष्यात एक क्षण भाळण्याचा, उरलेले सगळे सांभाळण्याचे..”

 हे लिहिण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी ” शुक्रतारा मंद वारा.. ” या गीताला पन्नास वर्षे पूर्ण झाली. आणि मुख्य म्हणजे प्रेम, निर्मळ प्रेम काय असते त्याचा अर्थ सांगणारे हे भावगीत आहे. ज्याची मोहिनी आपल्या सर्वांच्या मनावर अजूनही आहे. व. पु. म्हणतात, ” प्रेम म्हणजे नेमके काय तर समोरच्याच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं.. ” या गाण्यातील नायकाची इच्छा काय आहे तर, बाहेर इतके सुंदर वातावरण आहे, मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली प्रेमाची स्पंदने ही तिच्याजवळ व्यक्त करताना, तिने डोळ्यातील भाव जाणून घेताना त्याचे डोळेच सारं काही सांगतील. तसंच, तिची साथ ही कायम त्याला हवी आहे. म्हणून तर गाण्याच्या ओळी आहेत,

 ” आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा.. “

 तारुण्यात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत कितीही वाद झाले तरी त्यांच्यापासून फार काळ दूर राहणे शक्य नसते. एकदा का वयाची पन्नाशी ओलांडली की खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. पण प्रेम कमी होते का? अजिबात नाही. व. पु. म्हणतात, ” भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे.. ” प्रेमाची कबुली द्यायला वयाचं बंधन नसतं. स्त्री ही जन्मतः लाजरी असते. मनात आलेले प्रेमाचे हळुवार बंध जोडीदार समजून घेईल असे तिला वाटत असते, किंबहुना खात्री असते. पण हा जीव एकमेकांच्या सहवासाने इतका भारावून गेला आहे की, त्या प्रेमाचा, मुरलेल्या प्रेमाचा सुगंध वाऱ्यासारखा पसरला आहे. ही मनातली भावना आतादेखील ओठांवर आणताना थोडासा बुजरेपणा अजून आहे. पण एक मात्र नक्की, जसं व. पु. म्हणतात, ” सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.. ” त्याप्रमाणे हा जन्म मात्र तिच्या असण्यामुळे, तिच्या साथीमुळे सार्थकी लागला हे खरं. म्हणून तर म्हटलं आहे,

 ” भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा,

 तू अशी जवळी रहा.. ”

 हे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खरंच बोनस लाईफ म्हटले पाहिजे. आपल्याला जोडीदार कसा हवा आहे याची स्वप्नं आपण प्रत्येक जण बघतोच. आणि जेव्हा तसाच जोडीदार आपली साथ देतो तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. बघा ना, जेव्हा ही दोघं मिळून प्रवास करत असतात तेव्हा समोरची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी तो धरलेला हात हा न सुटणारा आहे, ही भावना मनात असते. आणि जेव्हा संसाराला अनेक वर्ष पूर्ण होतात, तेव्हा हाच प्रवास जेव्हा डोळ्यासमोर येतो, तेव्हा डोळ्यांतून येणारे अश्रू हे आनंदाचे असतात. कारण, सोबतीचा हात हा काही वेगळाच असतो. हेच व. पु. म्हणतात, ” पाऊलवाटेवरच सोबतीचा हात हवा असतो.. ” या गीतात आयुष्याचा कृतार्थ भाव फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण म्हणतो, “जा, मला तुझी गरज नाही. ” पण जेव्हा गात्रं क्षीण होत जातात तेव्हा काळजी घेणारी आपली व्यक्ती समोर असावी हाच मनाचा हट्ट असतो. किती बदल होतो ना!

 ” वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा,

 तू असा जवळी रहा.. ”

 एकमेकांची झालेली सवय, एकत्र घालवलेले क्षण हे आठवून खरंच वाटतं, किती मोठा प्रवास होता हा! या वयात जी जपणूक सुरू होते ती काही वेगळीच असते. कारण, हे वयच असे असते की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते, तर मनाला झालेली जखम सहन करण्याची क्षमताच उरलेली नसते. मी आधी देखील लिहिले होते, साठी, सत्तरी पार केलेल्या तसेच कोणालाही परावलंबित्व नको असते. आपल्या सवयी या जोडीदाराला माहित असतात आणि त्याच्या आपल्याला माहीत असतात. म्हणून तर हे सांभाळणं याचसाठी महत्त्वाचे असते. ज्येष्ठ गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी हे गीत इतकं सुंदर गायलं आहे की, जेव्हा ते म्हणतात, तू अशी जवळी रहा. तेव्हा डोळ्यांसमोर झोपाळ्यावर बसलेले आजी आजोबा दिसतात. ज्यांना फक्त सहवास हवाहवासा आहे. म्हणून तर, या गाण्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली, पण कधीही कानावर पडले तरी कर्णसुख मिळाल्याशिवाय राहत नाही.  

लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे

प्रस्तुती :सौ. उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगायचं राहून जाता कामा नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ जगायचं राहून जाता कामा नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल, याची काहीच खबर नाही कोणालाच. आयुष्य जातं रुसण्या फुगण्यात, अबोला पकडण्यात, बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्षं निघून जातात. जीवनाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच पर्मनंट नाही, मित्रांनो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त फोटोरुपी आठवणीच राहतात. जगून घ्या, बोलून घ्या, मनमुराद हसून घ्या, आलंच रडायला तर रडूनही घ्या. रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. वय, नोकरी, व्यवसाय, प्रतिष्ठा, जात पात, धर्म यापलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या. लहानपणी वाटतं, मोठं व्हावं. मोठेपणी वाटतं, श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतं, परत लहान व्हावं. या सगळ्या चक्रव्युहात जगायचं मात्र राहून जातं. ज्याला जे आवडतं, त्यासाठी स्वतः वेळ काढावा. खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे? आणि समजा कमवलं, तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे, यावरही आपला अभ्यास हवा. आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय ? पैसे नक्कीच कमवा, पण स्वतःसाठी ही थोडं जगा, मित्रांनो. खूप काही कमवालही. पण स्वतःचे छंद, स्वतःची आवड, स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत. म्हणून मित्रांनो, जगायचं राहून जाता कामा नये असं जगा.

कवी :अज्ञात

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मैत्री – तारुण्यातील आणि पन्नाशीनंतरची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

तारुण्यातील मैत्री व पन्नाशी पार नंतर ची मैत्री यात बराच फरक असतो.

तारुण्यातल्या मैत्रीत खूप मजा असते, आपण तारुण्यात कोणाची कदर करत नसतो कारण तेव्हां मैत्रीचा खरा अर्थच कळलेला नसतो…. मैत्री टिकली तर टिकली नाहीतर उडत गेली. कधी आपण पुढचा विचार करत नाही व पाठीमागे वळून पण पाहात नाही. आपण आपल्या विश्वात खूप रमून जातो आणि आपलं विश्व त्या बेडकाच्या डबक्यासारखे असते. डबकं सोडून कधी विशाल सागराचा विचारच केलेला नसतो पण जेव्हां पन्नाशीला पोहचतो तेव्हां कधी डबकं सोडून सागराला मिळालेलो असतो ते कळत सुध्दा नाही…

जेव्हा पन्नाशीच्या सागरात मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हां सगळ्या नात्यात ते मैत्रीचे नाते इतकं आपलसं वाटत असते कि, ती मैत्री खूपखूप हवी हवीशी वाटत असते.

नात्यापेक्षा मैत्रीचा आधार खूप हवासा वाटत असतो. मैत्रीत खूप मोकळेपणा असतो, त्यात भेद अजिबात नसतो. आपली विचारांची तार जर जुळत असेल तर सर्व गोष्टी पडद्या आड न ठेवता आपण मनसोक्त गप्पा – गोष्टी करतो आणि आपलं कोणी ऐकून घेतं किंवा आपल्यासाठी वेळ काढतो, आपल्याला समजावून जो घेतो, सुखादु:खात सहभागी होतो व चुकलं तर बोलतात व माफ ही करतात असे मिळालेले मित्र म्हणजे ‘नवरत्ना’ तल्या रत्नातले कोहिनूर हिरेच म्हटंल तर वावगे ठरणार नाही.

आपण कोणाचे कोणीच नसतो पण आपलं मात्र काहीतरी ऋणानुबंध असतात म्हणूनच आपली भेट कोणत्या ना कोणत्या रुपात ही नक्कीच होते.

आत्ता आयुष्याची पन्नाशी ओलांडल्यावर पुढचे आयुष्य हे बोनस आयुष्य आहे तेव्हां या वळणावर जेवढे मित्र मैत्रिणी भेटतात त्यांना भेटूया….

कोणाला काय माहीत की आपला प्रवास हा कुठे पर्यंत आहे? प्रत्येकाचे स्टेशन वेगळे आहे…

ते आले की उतरावेच लागते…

म्हणून जो पर्यंत प्रवास आपला चालू आहे त्या प्रवासात सगळे मनातल्या तक्रारींना काढून टाकूया. माहीत नाही परत आपण कधी, कुठे आणि कसे भेटू ? म्हणून मैत्रिची ही साथ खूप आधाराची व समाधानाची वाटते हे मात्र नक्की!!

पण अशी मैत्री समजुन घेणारे फार कमी असतात. ज्याला खरे निस्वार्थी मित्र लाभले ते भाग्यवान…

Friends Forever…

लेखक: अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘यत्र तत्र सर्वत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘यत्र तत्र सर्वत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

सकाळचा सुगंधी चहा टाटा…

जेवणातले चिमुटभर मीठ टाटा…

वेळेचे गणित टायटन टाटा…

वास्तू भक्कम आधार स्टील टाटा…

अखंड उर्जा निर्मिती टाटा…

गरीबांना विमा आधार टाटा…

असाध्य रोगावर इलाज टाटा…

मध्यमवर्गीय स्वप्न नॅनो टाटा…

श्रमिकांचा आधार ट्रक टाटा…

श्रीमंतांचे उड्डाण एअर इंडिया टाटा…

बोलण्याचे माध्यम संचार टाटा…

तंत्रज्ञान विकास टिसीएस टाटा…

ऐशोरामी स्वप्नवस्तु ताज हॉटेल टाटा…

चित्त्याच्या वेगाचे जॅग्वार टाटा…

देशाचे दिशादर्शक, आधार, विश्वास, शोअभिमानाचे नाव, सामाजिक भानाचे नाव, सुरक्षित गुंतवणुकीचे नाव, देश विकासात सिंहाचा वाटा, तत्त्व, स्वत्व, अस्तित्व, यत्र तत्र सर्वत्र साम्राज्य तरीही विनम्र आणि साधेपणाचे नाव, अनमोल रत्न, अजातशत्रू, घराघरात आणि जनसामान्यांच्या मनात असे हे रतनजी टाटा यांना अखेरचा टाटा.

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares