मनात येणारा प्रत्येक सकारात्मक विचार ही प्रार्थना असते. या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळत असतं. म्हणून आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर नियंत्रण असणं आवश्यक आहे.
प्रत्येक विचारानं आपल्या मनात आणि बाहेर तरंग निर्माण होतात. ते सर्वत्र पसरत असतात. प्रत्येक प्रार्थना म्हटली जाताच ती ऐकली जाते, आणि जशी ती ऐकली जाते तसं तिला उत्तरही मिळतं. यासाठी मनातला प्रत्येक विचार सकारात्मक असावा या हेतूनं प्रयत्न करणं अगत्याचेच आहे.
एका दिवाळी अंकात एका ज्येष्ठाने केलेली प्रार्थना वाचली. ” हे प्रभो… आता या वयात, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक विषयावर मी मतप्रदर्शन केले पाहिजे असे नाही. सर्वांना सरळ करण्याच्या सवयीपासून मला सावर…. मला विचारशीलतेचे वरदान दे. प्रभुत्व न गाजविता मी सेवातत्पर असावे. काथ्याकूट न करता मी नेटकेपणाने प्रश्नाला भिडावे. एखाद्या गोष्टीबद्दल दुमत होईल तेव्हा नमते घेण्याची सुबुद्धी मला दे. कधी कधी माझंही चुकतं, हा जीवनाचा मंत्र मान्य करायला शिकव. अनपेक्षित ठिकाणी चांगुलपणा पाहण्याची आणि तिऱ्हाईत व्यक्तीमधील गुणांचा गुणाकार करण्याची निर्मळ नजर दे आणि हे प्रभो, सदा सर्वांबरोबर शुभ बोलण्यासाठी प्रेरणा दे !”
आत्मचिंतनातून स्फुरलेल्या अशा प्रार्थना जीवनाचे सौंदर्य आणि सामर्थ्य वाढवितात.
“श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” नामस्मरण करीत आनंदात असावे.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आजी आणि व्हाट्सअप : सुखांतिका की शोकांतिका ? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)☆
आजीला गाव सोडून कुठेही जाण्याची इच्छा होत नसे. शेतीवाडीत तिचे मन रमत असे. मुलगा शहरात एका कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याचा अनेक दिवसांपासून आग्रह होता, “आई, इकडे येऊन रहा. सध्या शाळेला सुट्टी आहे. मुलं पण विचारत असतात आजी कधी येणार आहे.” तिलाही नातवंडांना भेटण्याची इच्छा होती. आठ दिवसांसाठी येईन असे मुलाला कळवले. रविवार असल्यामुळे सर्वजण एकत्र भेटीला म्हणून शनिवारी रात्री उशीरा आजी मुलाकडे आली.
रविवारी सकाळी उठल्यावर आजीला प्रत्येकजण वेगवेगळ्या रूममध्ये असल्याचे दिसले. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली 10 वर्षांची पिंकी आजीला बघताच ‘हाय आजी’ चित्कारली. मोबाईलमध्ये डोके घालून बसलेल्या 7 वर्षाच्या पिंटूने आजीला हाय केले. आजीने दोघांनाही जवळ घेतले व नाश्त्याला काय करू असे विचारले. पिंकीने चौघांच्या व्हाट्सऍप ग्रुपवर आजीचे म्हणणे सेंड केले. झोमॅटोने मागवून घेऊया असा आईचा मेसेज आला. ‘मला सिझलर पाहिजे’ पिंट्याने मेसेज पाठवला. पिंकीने मेसेजवर बर्गरची ऑर्डर दिली. आईने सिझलर, बर्गर व त्यांच्यासाठी पोहे व शिरा यांची ऑर्डर प्लेस केली. पंधरा मिनिटांनी नाश्ता आला. सगळं कसं सुरळीत व शांतपणे पार पडल्याचं बघून आजी आश्चर्यचकित झाली.
मुलाने अमॅझॉनवरून नवीन मोबाईल मागवला. पिंकीने नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले व आजीला ग्रुपमध्ये ऍड केले. तिने आजीला मेसेज वाचणे, त्याला रिप्लाय देणे, ई.फंक्शनस समजून सांगितली. एका दिवसात आजी सर्व फंक्शन शिकली व प्ले स्टोअरमधून आवश्यक असलेली ऍप्स डाउनलोड केली. मुलाने आईची भेट घेऊन म्हटले, “आई तुला काही हवे असल्यास ग्रुपवर मेसेज टाकत जा. आम्ही सर्वजण तूझ्या सेवेला हजर आहोत.”
अशा प्रकारची पुनरावृत्ती रोजच होऊ लागली. दिवसभरात सर्वांच्या गाठीभेटी क्वचितच होत असे. खरे तर तिला मुलांच्या सहवासात राहायचे होते. परंतु सर्वजण मोबाईलवर बोलत असत म्हणून तिनेही ही सवय लावून घेतली. फारसे बोलणे नाही म्हणून वाद विवाद नाहीत, त्यामुळे आजी मनोमन सुखावली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मुलगा व सून दिवसभर लॅपटॉपवर काम करत असत. रोज नातवंडांचे गुड मॉर्निंग, गुड नाईटचे मेसेज बघून आजी भांबावून जात असे. जसे काही नियतीने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व काही यंत्रवत चाललं होतं. आठ दिवसात आजी या यांत्रिक जीवनाला कंटाळली व परत गावी जाण्याचे ठरवले.
आजीने ग्रुपवर ‘मी उद्या जाणार आहे’ असा मेसेज टाकला. सर्वांनी आजीला मोबाईलवर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. सुनेने आईला पुढील वेळेस आल्यावर महिनाभर रहा असा मेसेज पाठवला. मुलाने मोबाईलवर ई-तिकीट पाठवले. पिंकीने आजी सकाळी लवकर जाणार म्हणून उबेर टॅक्सी बुक केली. निघताना मुलांनी आजीच्या मोबाईलवर मेसेज पाठवला, “बाय आजी, तु गेल्यावर आम्हाला करमणार नाही. लवकर परत ये.” तत्पूर्वी पिंकीने आजीचा मोबाईल घेऊन तिचे लाईव्ह लोकेशन स्वतःच्या मोबाईलवर सेंड केले. तेच लोकेशन तिने बाबांना फॉरवर्ड केले. आजीचे मन कृतककोपाने भरून आले.
आजी निघाली म्हटल्यावर प्रथमच मुले आजीला येऊन बिलगली. आजीने आपले अश्रू आवरले. टॅक्सीत बसल्यानंतर आजीने मुलाला व सुनेला आशीर्वादाचा ईमोजी पाठवला. पिंकी आणि पिंटूला 501 रुपयांचा गुगल पे केला. टॅक्सी ड्रायव्हरला प्लॅटफॉर्म क्र. दोनच्या गेटवर सोड असा मेसेज पाठवला. मागच्या सीटवर आजीने हताशपणे डोळे मिटले. काही वेळाने ड्रायव्हरचा मेसेज टोन ऐकून आजी जागी झाली. ड्रायव्हरचा स्टेशन आल्याचा मेसेज वाचून आजी टॅक्सीच्या बाहेर आली. रेल्वे अधिकाऱ्याचा नंबर घेऊन आजीने त्याला ट्रेन नं. 2301 कधी येणार असा मेसेज पाठवला. काही वेळाने गाडी प्लॅटफॉर्म क्र दोनवर आल्याचा आजीला मेसेज आला. संध्याकाळी आजी स्टेशन बाहेर आल्यानंतर सुखरूपपणे पोहोचल्याचा मेसेज ग्रुपवर पाठवला.
घरी आल्यावर आजीने ctrl चे बटण दाबून स्वतःवर कंट्रोल केला. नंतर व्हाट्सऍप सर्चमध्ये जाऊन ‘My Life My Family’ हा ग्रुप ओपन करून डीपीवरील दोन्ही नातवंडांना डोळे भरून बघितले. सर्वांना बायचा मेसेज टाकून आजी ग्रुपमधून एक्झिट झाली. हे कसलं मोबाइलग्रस्त जीवन. कौटुंबिक गप्पा नाहीत, सुख-दुःखाच्या गोष्टी नाहीत, मुलांचा धांगडधिंगा नाही. आजीला हुंदका अनावर झाला. पतीच्या निधनानंतर आजी पहिल्यांदाच इतकं मुसमुसून रडली. ज्यांनी लिहिले त्यांनी खूप छान लिहिले.
या मध्ये चुकीचे कोणी आहे असे वाटते का????
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘देवाचे लक्ष आहे बरं का !’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, “बोला! काय काम आहे?”
ते म्हणाला, “भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता, म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ.” मी म्हटले, “माफ करा, मी तुम्हाला ओळखले नाही.”
तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे.”
मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”
“अहो, ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस. तुझ्याशिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!”
काही बोलणार इतक्यात मागून आई आली…
“एकटा काय उभा आहेस? इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे, आत येऊन चहा पी. “ आईला काही तो दिसला नाही.
आईच्या या बोलण्यामुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्याबरोबर मी रागाने ओरडलो, “अग आई, चहामध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस?”
एवढे बोलल्यानंतर मनात विचार आला, जर आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आईवर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले, “अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे.”
“बस् मी जिथं असेन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्यासोबत आले. थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा माझ्यापुढे… मी म्हटले, ” प्रभू, इथे तरी एकट्याला जाऊ दे.”
आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायचा होता.
ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभूची नजर आहे. गाडी बाजूला थांबवली. फोनवर बोललो, आणि बोलत असताना म्हणणार होतो की या कामाचे पैसे लागतील. पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज.
ऑफिसमध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफवर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्याबरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्याकडून विनाकारण अपशब्द बोलले जायचे. पण त्यादिवशी तसे काही न बोलता, “काही हरकत नाही, ठीक आहे, होऊन जाईल काम” असे म्हणत सहजपणे सर्व कामे केली.
आयुष्यातील हा पहिला दिवस होता, ज्या दिवशी माझ्या दिनचर्येत राग, लोभ,अभिमान, दृष्टता, अपशब्द, अप्रामाणिकपणा, खोटेपणा कुठेही नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून निघून घरी जायला निघालो. कारमध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो, “भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते.
घरी पोहोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो आणि, “प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या.” मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला.
जेवण झाल्यानंतर आई म्हणाली, “आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास! काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?”
मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला. माता आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”
थोडा वेळ शतपावली केल्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिंत व शांत मनाने उशीवर डोके टेकवले. झोपी जाण्यासाठी.
प्रभूनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. म्हणाले, “आज तुला झोप येण्यासाठी, संगीत, औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.” खरोखर, मला गाढ झोप लागली.
ज्या दिवशी आपणास कळेल की, “तो पहात आहे”, त्या दिवशीपासून आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे… – लेखक / संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
त्रिलोकेकर सोमण गुप्ते च्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.
असा मी असा मी मधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.
लग्नातल्या जेवणावळी श्लोक आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नांव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.
कोकणातल्या अंतू बर्वा सुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.
मुलाच्या घरची सगळी अपसव्य त्याला आता मान्य झाली आहेत, ना जातीची ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.
नामू परटान् आता लौंड्रि घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.
नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायण देखिल त्याला एटिकेट्स शिकवित असतो.
हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.
लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.
आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखिल पटकावतो.
सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नितीमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.
नंदा प्रधान पहिल्या पासून जरा फॉरवर्डच होता, त्यानेही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.
नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.
बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅनसेलर सुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.
पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहित आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहित.
नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.
ऑनलाईन टिचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टिचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.
भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांच्या वेश चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.
दोन तत्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणा बरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.
पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.
त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असा मी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते.
त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते कि आज मी स्वीकारलेली हि आधुनिक संस्कृती सुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.
पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला.
बदलत्या काळाची पाऊले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.
काळ बदलला, संस्कृती बदलली, वेशभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.
त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.
भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे.
नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.
पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.
पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरक हि दाखवून दिला.
आणिबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.
खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.
त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
या व्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं नाटकं पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहिच शंका नाही.
☆ “थोरात म्हणजे मराठा का ?” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
(हसून हसून रडायचे की रडून रडून हसायचे? हे तुमचं तुम्हीच ठरवा..)
मित्राच्या गावच्या जत्रे साठी त्याच्या बरोबर त्याच्या गावाकडे गेलो होतो. जत्रा झाल्यावर दोन दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघांनी त्याच्या शेतावर चक्कर टाकली.
साठी पार केलेला म्हातारा पलीकडच्या ऊसाच्या बांदावर ऊन खात थांबलेला. मित्राकडे पाव्हणे कोण कुठले चौकशी झाली. पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझ्या बद्दल आदर वाटला असावा. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच…..
☆ मित्र का असावेत ? … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆
एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.
सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले?
स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?
माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.
सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?
माकड : नाही महाराज.
सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.
माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.
सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.
या कथेचे सार.
एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.
म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.
विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.
Dont worry
Be happy
मित्र श्रीमंत किंवा गरीब नसतो, मित्र शिकलेला असावा असे काही नसते. मित्र अडाणी पण चालतो …..
कारण मित्र हा मित्रच असतो।
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काळाप्रमाणे आपल्या आवडीनिवडी सोयी गैरसोयी बदलत जातात. आणि जे हौसेने सोसाने बदलले ते सुद्धा, काही दिवसानंतर पुन्हा बदलावे वाटते. कोणे एकेकाळी पितळेचे डबे रांगेने चकाचक घासून फळीवर मांडले की, घर कसे झळाळून उठायचे.
वय पुढे सरकले, मग प्रत्येक वेळी तो डबा जड खाली काढणे, आत काय आहे?ते बघणे, हे जड जाऊ लागते, अशावेळी ते डबे घासण्याची ताकदही राहिली नाही, तेव्हा भांडे गल्लीत मोडीत गेले ,काचेच्या बरण्या सोयीच्या वाटू लागल्या. त्या बरण्यांमधून साखर मीठ तांदूळ सगळे पारदर्शीपणाने दिसत असल्याने बरण्याच आवडीच्या, सफाईला सोयीच्या वाटू लागल्या,
मग काळ तोही बदलला. आता बरणी हाताळताना आत्मविश्वास कमी वाटतो, हाताळताना चुकून पडण्याची शक्यता वाटते ,हात थोडा थरथरतो, आणि त्या बरण्या पाठीमागच्या रांगेत जाऊन रिकाम्याच बसल्या. आता प्लास्टिकच्या बरण्या सोयीच्या वाटायला लागल्या, कारण पदार्थही दिसतो आणि पडली तरी धोका नाही आणि म्हणून त्या वापरताना बिनधास्त वाटतं.
एकूण काय आज जे मला सोयीचे ,आवडीचे, छान वाटते ते कायम तसेच नसते. हे जसे वस्तूचे तसेच माणसांचेही होत असावे ना असे वाटते. माणसेही सदैव पहिल्या रांगेत नसतात ,तर ती कधीतरी मागच्या रांगेत जातात, हे जीवनाचे सत्य परिवर्तन…..
लेखिका : सुश्री सुनेत्रा पंडित
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आनंद… – लेखक : डॉ. अशोक माळी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला. बापानंही त्याचं अनुकरण केलं.
“मुलगा दहावी पास झाला.” बाप बोलला.
“अरे वा, छानच की!….किती मार्क मिळाले?” मी विचारलं.
“मग काय तर?….गेल्या वर्षी पन्नास टक्के होते. एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे चेष्टा नाही.”
“खूपच छान….आता पुढं काय करायचं ठरवलंय?” मी विचारलं.
“अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय….आम्हांला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस्स….हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते.”
आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला.
“किती मार्क पडले गं?” मी तिला विचारलं.
“नाईनटीफाईव्ह परसेंट.”
“अभिनंदन.” मी म्हटलं. मला वाटलं होतं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजिल होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. “खूप छान मार्क मिळवलेस पोरी, बापाचं नाव केलंस बघ.” मुलाचे वडील बोलले.
ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला.
“याच्या बऱ्याच दोस्तांनाही नव्वद पंचाण्णव टक्के मार्क आहेत. बासष्ट टक्के मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना आश्चर्य वाटतंय.तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या…..बाकी सगळे ‘फक्त बासष्ट टक्के मार्क?’ या नजरेनं पाहत असतात.”
“हो ना?”
“खरं सांगू डॉक्टर?….प्रत्येक मुलाची एक कुवत असते….एक आवड असते. त्या मुलीला पंचाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळालेत….. हा तर आनंदसोहळाच आहे की आमच्यासाठी.”
“खरं आहे. आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो…..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला.” मी म्हटलं.
“हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले. त्यामानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्टच टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं?”
“ग्रेट.”
“मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्याने बोलले होते…. माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना?”
“ते भाऊ आता काय करतात?”
“एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे.”
“तुम्ही शेतीच करता ना?”
“हो ! वडिलार्जित दोन एकर होती आता वीस एकर आहे. मी स्वतः अठरा एकर घेतलीय. स्वतःची डेअरी आहे. खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो चाळीस लाखांचा झाला….शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा.”
आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला.
माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल. जे आहे त्यात समाधान मानणारी. आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी…..आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं!
कृष्णाला बर्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तुरटी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,”आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.”
फोनवर ती बरेच काही बोलत होती.बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा- वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.”
मला हसूच आलं.
आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो.
हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.
खरंतर…आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात, पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.
कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं, की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते.
तसंच…
आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले, तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की, वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात…
जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण,आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.
जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.
आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो…
मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते, त्याला तरी ते कळले पाहिजे.
काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी.
अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे…
पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.
मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.
ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत, त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.
आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.
या पलीकडे काय असू शकते?
लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले, की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते.
मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे…
लेखिका : अज्ञात
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈