मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मित्र का असावेत ?… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ मित्र का असावेत … लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की हे धाडस कोणी केले? 

स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले महाराज सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे. आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले : माझे कान ओढताना तुला कोणी पाहिले तरी नाही ना ?

माकड : नाही महाराज.

सिंह : मग ठीक आहे, आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटले.

माकडाने सिंहाचे दोन तीन वेळा कान ओढले. सिंहाला खुप बर वाटलं.

सिंह: आजपासून मिच तुझा मित्र आहे अस समज, आणि मरणाचा विचार सोडुन दे.

या कथेचे सार. 

एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, त्यांचे कान ओढत रहा, खुप मेसेज येणे भाग्याचे समजा कोणीतरी आपली आठवण काढतय. चांगल्या पोस्टला लाईक करा, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. बडबड करा. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा मजा करत रहा.

विश्वास ठेवा की तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.

 Dont worry 

 Be happy

मित्र श्रीमंत किंवा गरीब नसतो, मित्र शिकलेला असावा असे काही नसते.  मित्र अडाणी पण चालतो …..  

कारण मित्र हा मित्रच असतो। 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “परिवर्तन चिंतन…” – लेखिका : सुश्री सुनेत्रा पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “परिवर्तन चिंतन…” – लेखिका : सुश्री सुनेत्रा पंडित ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

काळाप्रमाणे आपल्या आवडीनिवडी सोयी गैरसोयी बदलत जातात. आणि जे हौसेने सोसाने बदलले ते सुद्धा, काही दिवसानंतर पुन्हा बदलावे वाटते. कोणे एकेकाळी पितळेचे डबे रांगेने चकाचक घासून फळीवर मांडले की, घर कसे झळाळून उठायचे.  

वय पुढे सरकले, मग प्रत्येक वेळी तो डबा जड खाली काढणे, आत काय आहे?ते बघणे, हे जड जाऊ लागते, अशावेळी ते डबे घासण्याची ताकदही राहिली नाही, तेव्हा भांडे गल्लीत मोडीत गेले ,काचेच्या बरण्या सोयीच्या वाटू लागल्या. त्या बरण्यांमधून साखर मीठ तांदूळ सगळे पारदर्शीपणाने दिसत असल्याने बरण्याच आवडीच्या, सफाईला सोयीच्या वाटू लागल्या, 

मग काळ तोही बदलला. आता बरणी हाताळताना आत्मविश्वास कमी वाटतो, हाताळताना चुकून पडण्याची शक्यता वाटते ,हात थोडा थरथरतो, आणि त्या बरण्या पाठीमागच्या रांगेत जाऊन रिकाम्याच बसल्या.  आता प्लास्टिकच्या बरण्या सोयीच्या वाटायला लागल्या, कारण पदार्थही दिसतो आणि पडली तरी धोका नाही आणि म्हणून त्या वापरताना बिनधास्त वाटतं.  

एकूण काय आज जे मला सोयीचे ,आवडीचे, छान वाटते ते कायम तसेच नसते. हे जसे वस्तूचे तसेच माणसांचेही होत असावे ना असे वाटते. माणसेही सदैव पहिल्या रांगेत नसतात ,तर ती कधीतरी मागच्या रांगेत जातात, हे जीवनाचे सत्य परिवर्तन…..

लेखिका : सुश्री सुनेत्रा पंडित

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद… – लेखक : डॉ. अशोक माळी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ आनंद… – लेखक : डॉ. अशोक माळी ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला.   बापानंही त्याचं अनुकरण केलं.

“मुलगा दहावी पास झाला.” बाप बोलला.

“अरे वा, छानच की!….किती मार्क मिळाले?” मी विचारलं.

“बासष्ट टक्के आहेत.” मुलगा बोलला.

“फर्स्ट क्लास मिळालाय त्याला.” बापानं कौतुकानं मुलाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं.

“चांगले मार्क आहेत.” मी म्हटलं.

“मग काय तर?….गेल्या वर्षी पन्नास टक्के होते. एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे चेष्टा नाही.”

“खूपच छान….आता पुढं काय करायचं ठरवलंय?” मी विचारलं.

“अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय….आम्हांला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस्स….हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते.”

आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला.

“किती मार्क पडले गं?” मी तिला विचारलं.

“नाईनटीफाईव्ह परसेंट.”

“अभिनंदन.” मी म्हटलं. मला वाटलं होतं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजिल होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. “खूप छान मार्क मिळवलेस पोरी, बापाचं नाव केलंस बघ.”  मुलाचे वडील बोलले.

ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला.

“याच्या बऱ्याच दोस्तांनाही नव्वद पंचाण्णव टक्के मार्क आहेत. बासष्ट टक्के मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना  आश्चर्य वाटतंय.तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या…..बाकी सगळे ‘फक्त बासष्ट टक्के मार्क?’ या नजरेनं पाहत असतात.”

“हो ना?”

“खरं सांगू डॉक्टर?….प्रत्येक मुलाची एक कुवत असते….एक आवड असते. त्या मुलीला पंचाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळालेत….. हा तर आनंदसोहळाच आहे की आमच्यासाठी.”

“खरं आहे. आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो…..तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला.” मी म्हटलं.

“हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले. त्यामानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्टच टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं?”

“ग्रेट.”

“मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्याने बोलले होते…. माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना?”

“ते भाऊ आता काय करतात?”

“एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे.”

“तुम्ही शेतीच करता ना?”

“हो ! वडिलार्जित दोन एकर होती आता वीस एकर आहे. मी स्वतः अठरा एकर घेतलीय. स्वतःची डेअरी आहे. खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो चाळीस लाखांचा झाला….शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा.”

आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला.

माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल. जे आहे त्यात समाधान मानणारी. आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी…..आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं!

लेखक : डॉ.अशोक माळी, मिरज

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्ण – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ कृष्ण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहिजे………

पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुरटी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ तुरटी… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,”आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.”

फोनवर ती बरेच काही बोलत होती.बोलता बोलता ती म्हणाली, “पंधरा- वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.”

मला हसूच आलं.

आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो.

हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

खरंतर…आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात, पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.

कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात. आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं, की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते.

तसंच…

आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले, तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत. आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की, वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात…

जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण,आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.

जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.

आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो…

मेंदूला वाचा नसते. तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते, त्याला तरी ते कळले पाहिजे.

काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. 

अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे…

पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.

मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.

ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत, त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.

आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.

या पलीकडे काय असू शकते?

लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले, की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते.

मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे…

लेखिका : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “’लक्ष्मीची’ सावली……” – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “’लक्ष्मीची’ सावली……” – कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

विठोबाही रुक्मिणीला 

       खूप कामे सांगतो ,

अन्  तिच्यावर थोडा

    रूबाब गाजवतो .

*

सकाळीच म्हणाला विठुराया

     रुक्मिणी,’ जरा आज

नीट कर सडा -सारवण

आपल्याकडे येणार भक्त सर्वजण

*

विठोबा म्हणतो रुक्मिणीला ,

‘ भक्तांची विचारपूस

    जरा अगत्याने कर ,

अगं हे तर त्यांच माहेरघर ‘.

*

विठोबा म्हणतो , ‘ जनीची

    कर  ना तू वेणी -फणी ‘

अगं एकटी आहे अगदी

 तिला या जगी नाही कुणी .

*

रुक्मिणी, उद्या तर घाल तू

     पुरणा -वरणाचा घाट

उदया आहे बार्शीच्या

 भगवंताच्या स्वागताचा थाट

*

एका मागोमाग सूचना ऐकून

    रुक्मिणी आता रुसली

आणि रागा- रागाने जाऊन

    गाभाऱ्या बाहेर बसली .

*

सारखंच याचं आपलं

       भक्त अन् भक्त

मी काय आहे

          कामालाच फक्त ?

  *

भोवती तर याच्या सारखा

      भक्त आणी संत मेळा

काय तर म्हणे _ 

     विठू लेकुरवाळा .

*

भक्तांनाही काही

       माझी गरजच नाही

कारण तोच त्यांचा बाप

    अन् तोच त्यांची आई .

*

कधीतरी माझी ही 

      कर जरा चौकशी

भक्तांच्या सरबराईत

     दमलीस ना जराशी .

*

मी आता मुळी

     जातेच कशी इथून

बाहेर जाऊन याची

      गंमत बघते तिथून

*

आता तरी याला

       माझी किंमत कळेल

अन् मग हळूच

     नजर इकडे वळेल

*

विठू जरी आहे

      साऱ्यांची माऊली

भगवंतांच्याही मागे असते

     ‘ लक्ष्मीची ‘ सावली…

कवी : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शांतीप्रिय माणसं … – लेखिका : सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ शांतीप्रिय माणसं … – लेखिका : सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली.  आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने सुखावली. सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून ‘ये बस’ म्हणाली. नाश्त्याला काय करायचं हे विचारायला आले होते, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली. 

(‘शांतीप्रिय माणसं’ ग्रंथातून साभार)

लेखिका – सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ अशीच वाचलेली काही माहिती… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.

मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.

3. “The quick brown fox jumps over the lazy dog” ह्या इंग्रजी वाक्यात इंग्रजीतीलसर्व अक्षरे आलेले आहेत.

4. जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.

5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.

6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.

7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.

8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद

9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमी पेक्षा जरासे कमी भरते.

10. वाळवंटातील उडणाऱ्या वाळूच्या कणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.

11. “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.

12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.

13. अमेरिकेत दर माणसी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.

14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळदाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द आहे. 

15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाइट दोन्ही उणे चाळीसच असतात.

16. चाॅकलेट खाल्ल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टम वर विपरित परिणाम होतो.

17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पट वेळा पापण्या ब्लिंक करतात.

18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.

ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड” — तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये नमूद आहे.

20.  डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.

21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील उच्चारण्यास सर्वात अवघड वाक्य मानले जाते. 

22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वर रहीत सर्वात लांब शब्द आहे.

23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.

24. पत्त्यातील चारही राजे महान राज्यांचे चित्र आहेत.

     – इस्पिक – राजा डेव्हिड

     – किलवर – अलेक्झांडर

     – बदाम – चार्लमॅगने

     – चौकट – जुलियस सीझर

25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.

26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321

27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही  पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.

28. गोळीरोधक जॅकेट, अग्निरोधक, कारचे वायपर व लेझर प्रिंटर्स … ही सर्व स्त्रियांनी  शोधलेली साधने आहेत.

29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.

30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.

31. साप तीन वर्षांपर्यंत झोपू शकतो.

32. सर्व विषुववृत्तीय अस्वलेडावरी असतात.

33. विमानात द्यावयाच्या सॅलड मधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.

34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.

35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.

36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.

37. मृत्यूपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्याहाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.

39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.

40. वीज-दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.

41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 

42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात. 

43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.

44. सिगरेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.

45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती: सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ साठीच्या पुढचा म्हातारा… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो !

 

उजेडाचा त्रास होतो म्हणून

गॅागल वापरत असतो

काळ्याभोर काचेमागून

निसर्गसौंदर्य न्याहाळीत असतो!

शेजारीण घरी आली की

आनंदाने हसत असतो

बायकोला चहा करायला लावून

स्वत: गप्पा मारीत बसतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

पाय सतत दुखतात म्हणत

घरच्या घरी थांबत असतो

बाकी सगळ्या दिवशी मात्र

मित्रांबरोबर भटकत असतो!

चार घास कमीच खातो

असं घरात सांगत राहतो

भजी समोसे मिसळपाव

बाहेर खुशाल चापत असतो

 

कारण — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

औषधाचा डोस गिळताना

घशामध्ये अडकत असतो

पार्टीत चकणा खाता-खाता

चार चार पेग रिचवत असतो

अध्यात्माच्या गप्पा मोठ्या

चारचौघात झोडत असतो

मैत्रिणींच्या घोळक्यात मात्र

रंगेल काव्य ऐकवत असतो

 

कारण— 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो!

 

साठीच्या पुढचा म्हातारा

आता निवृत्तीत गेलेला असतो

विरंगुळ्याला जुन्या-जुन्या

आठवणीत रमत असतो

काम नसतं हातामध्ये

किंमत नसते घरामध्ये!

म्हटलं तर ज्येष्ठ असतो

तरी बराच तरूण असतो

संपून गेलेलं तारुण्य

पुन्हा आणू पहात असतो

 

कारण —

थंड हवेच्या ठिकाणी जसा

नेहमीच गारवा असतो

तसाच — 

साठीच्या पुढचा म्हातारा

थोडा जास्तच हिरवा असतो

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..

साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, “व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?” मास्तर मंजे कंडक्टर.

मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं.

आरं देवा… मंग तिकीट??

त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय.

मग आता???

“तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही.”

“दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.

त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.

सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी न्हाय वाचलं.”

“अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये बेंन कुणाचं काय ऐकत नाहीत, तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू…”

दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.

डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली,

“नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार.”

ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टॅण्ड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता. आजीला म्हटलं, “आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा.”

आजी कैच बोलली नै.

बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं…

“आज्जी अजून इथंच?”

आज्जीनं चोळीत खुपसलेलि पर्स काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.

आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली

“टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.

माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढील.”

म्हटलं, आज्जी…. “पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात…”

आज्जी हसली…. म्हणाली “जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली.

कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर. पण त्या अंबा बाईनं चार चौघात लाज राखली.

दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर….आता जाताना मात्र इस्रायची न्हाई तिकीट काढायला.

महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून… हे बरं न्हाई …”

मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले.

ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.

असली गोडं माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे, एखादेवेळी आर्थिकदृष्ट्या दुबळं असतीलही, तो भाग अलाहिदा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं, मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मुळ ओळख म्हणजे हीचं सोन्यानं बनलेली माणसं.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
image_print