मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ थांबणे… लेखक : श्री सुभाष अवचट ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

कुठे..?

केव्हा..?

कसे थांबावे..?

ही एक कला आहे.

ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.

माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही…!’

विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट मिळाल्यासारखे हसत जगले.

‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…!,’ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही.’ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली…! आता पुढे भेट शक्य नाही.’

‘परदेशी चाललाय का…?’ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला…!’

ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत…! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

समतया वसुवृष्टि विसर्जनै

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो…

हे विसर्जन…!!!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी  हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो.ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच…!!!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही…!!!!

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ समजूतदार आग्रह… – लेखक : श्री प्रवीण दवणे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

आपण जेवत असतानाच कुणी पाहुणा आला की, हातात ताट घेऊन आत पळत जायची पद्धत तेव्हा आली नव्हती. जे आपल्या पानात, ती चटणी-भाकरी चटकन वाढली जायची आणि भूक असो वा नसो, दोन घास मायेचे स्वीकारून अतिथी तृप्त व्हायचा. आता मनात असूनही बदलत्या जीवनशैलीनं आपले आग्रहही समजूतदार झाले; पण आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं किती समजून घ्यायचं, हेच समजण्याची पंचाईत झालेय. अशीच पंचाईत माझी अलीकडं झाली.

अनेक दिवसांचा आग्रह आता दूर लोटणं अवघड झाल्यानं शेवटी श्रीकांत अन्‌ मृदुलाला मी कळवलंच ः “येतो येत्या शनिवारी जेवायला.’

त्यांना झालेला आनंद मला फोनवरही जाणवत होता. केवळ आपण एखाद्याकडं “जेवायला येतोय’ म्हटल्यावर समोरच्या माणसाला एवढा आनंद होतो, ही गोष्टच केवढी सुखद आहे.

तासभर आधीच गेलो. थोड्या गप्पा होतील; मग सावकाशीनं जेवण. खरं तर जेवण हे केवळ गप्पांसाठीचं निमित्त. एकमेकांचा मैत्रभाव साधणारा एक रुचकर दुवा! पाच-दहा मिनिटं गप्पा झाल्यावर उत्साहानं श्रीकांत म्हणाला, “तुम्हीच सांगा, कुठलं हॉटेल “प्रीफर’ कराल? “स्वीकार’ गार्डन रेस्टॉरंट आहे, “अतिथी’तलं फूड मस्तच!, “सुरभि’मध्ये कॉंटिनेंटल डिशेस..! चॉईस इज युवर्स! अगदी न संकोचता सांगा…’ 

संकोचायलाही पुरेसा वेळ नव्हता. जे मला कळत होतं, ते खरं होतं की जे खरं होतं ते मला समजत नव्हतं, कुणास ठाऊक! बागेत फिरायला निघालेला माणूस पाय घसरून तलावात पडावा, तसं काहीसं.

“हे बघा श्रीकांत, तुम्हीच ठरवा.’

“अस्सं कस्सं? तुम्हा आमच्या घरी आलायत नं जेवायला?’

तोच धागा शिताफीनं पकडून मी म्हटलं, “अहो, मग घरीच जेवू या नं. अगदी साधी मुगाच्या डाळीची खिचडीही चालेल; पण घरी जेवू या. घरात जेवायची गंमत वेगळी आहे.’

श्रीकांत-मृदुलाची बोलकी दृष्टभेट टिपायला वेगळ्या कॅमेऱ्याची गरज नव्हती. एकदम स्मार्ट टिचकी वाजवून मृदुला म्हणाली, “वॉव! ही तर बेस्ट आयडिया! घरीच जेवू या. खूप गप्पा होतील. तुम्ही बोलत बसलात की ऐकावंसं वाटतं. बाहेर काय, लगेच उठावं लागतं!’

चला! मी सुटकेचा निःश्‍वास सोडला. खूप आग्रह करून घरी जेवायला बोलावणाऱ्या चाहत्यांच्या घरात मला चक्क “घरचं’ जेवायला मिळणार होतं. वेगळ्या हातचं – मनापासूनचं!

ड्रॉवर उघडून मेनूकार्ड काढून तेवढ्यात दोघंही ठरवू लागले : “हे बघ श्री, सुरवातीला हराभरा कबाब असू दे. व्हेज मखनी, रुमाली रोटी, मग पनीर फ्राईड राईस…’

फोनवर ऑर्डर दिली गेली. माझी मुगाची खिचडी मूग गिळून बसली! 

श्रीकांत म्हणाला, “”आत्ता अर्ध्या तासात पार्सल येईल. हां, इथल्या “सागर’मधलं फूड बाकी…’ 

दोघांच्या आतिथ्यात कमतरता नव्हती; पण लिफ्टनं पायउतार होताना मन समाधानानं भरलं नव्हतं. वेळ, प्रवास न्‌ खर्च करून गेलेला माणूस एखाद्याच्या घरी फक्त “पार्सल’चं खाद्य खायला जात नसतो; अगदी साधं; पण ज्यात गृहिणीचं मन मिसळलंय, अशा गोष्टीनं आतिथ्य होतं. अशा मनपरंपरेत वाढलेल्या मला पार्सलपरंपरेशी जुळवून घेताना थकायला होत होतं. एवढा कंटाळा, एवढा औपचारिकपणा असेल तर केवळ पैसे मोजून आतिथ्याचा हव्यास तरी ओढवून घ्यायचा कशाला, या प्रश्‍नाचं उत्तर सापडत नव्हतं. आता कशालाही “व्वा!’ म्हणावं तर लगोलग उत्तर येतं – “हे श्रेय माझं नाही. “अन्नपूर्णा’तून आणलंय!’

दिवस “पार्सल’नं सुरू होतो; “पार्सल’नं संपतो. ऑफिसला जाताना निघण्याची तारांबळ म्हणून “चार पोळ्या, 200 ग्रॅम भाजी’ पार्सल, तर रात्री घरी जाताना “आता कुठं स्वयंपाकाचा कुटाणा; जातानाच नेऊ या पाव-भाजी पार्सल!’ 

आजारपण, वार्धक्‍य, एकाकीपण, अचानक, अनपेक्षित आलेले खूप पाहुणे आणि आणखीही काही असे क्षण असतील की जिथं “रेडीमेड पार्सल’ आणणं गरजेचं आहे. तिथं ती गोष्ट सुविधा ठरते; पण रग्गड पैसा, भरपूर आळस, लाडावलेलं सुखवस्तूपण, फक्त कंटाळा, चट्टू खाण्याची चटक अशा ठिय्या मारून रुतलेल्या असंख्य घरांतल्या वृत्ती-प्रवृत्तीनं आता नव्या समस्यांची पाळणाघरे सुरू केली आहेत!

घरातलं स्वयंपाकघर म्हणजे फक्त पार्सलचं गोडाऊन झालं तर तिथल्या मुलांचं पालन सुखरूप होईल; पण पोषण मात्र होणार नाही. पालन पदार्थांनी होतं; पोषण भावनांनी! आई-बाबा दोघांचाही ध्यास जेव्हा मिसळतो; तेव्हा ताटातल्या पदार्थांना येणारा सुवास कुठल्याही बिलानं चुकता होणारा नसतो. अगदी घरातलं साधं खिमट लोणचं असेल, फोडणीचा भात असेल, गूळ-चपातीचा लाडू असेल…पदार्थ अगदी साधे! पाच मिनिटांहून वेळ लागणार नाही; पण त्यात एक घर मिसळलेलं असतं. चव त्या घराची असते!

कुणी म्हणेल; सांगायला काय जातं? हल्लीची मुलं खातात का हे असलं? हल्ली चायनीज हक्का नूडल्सवर हक्कानं ताव मारणारी मुलं आहेत. तुमचं सांगणं कालबाह्य आहे! मजा म्हणून खाण्याचे पदार्थ हेच जर रोजचे खाण्याचे झाले तर घर न्‌ हॉटेल यात वेगळेपण काय उरलं? आणि अन्नपदार्थांतलं सत्त्व फक्त चवीत असतं? की त्याच्या पोषणमूल्यांत? एकत्र मायेनं गुंफून साधं-सात्त्विक जेवण्यात? आता गंमत म्हणून, फॉर अ चेंज म्हणून “घरी’ जेवू या, असं म्हणणारी घरं वाढत आहेत. सगळेच काही इतके गर्क नाहीत; पण बटण दाबल्यावर सुख दारात हजर, हा आभास नको त्या दिशेनं घेऊन चालला आहे. अनेक लोक हे ऐकण्याच्याही मनःस्थितीत नाहीत; इतकी रेडीमेड सुखाची सवय पटकन्‌ बेफाम वेगानं वाढत आहे. या सर्व सोईंनी वेळ वाचतो, हे खरंच आहे; पण त्या वाचलेल्या वेळेचं काय करायचं, हे स्वतःपुरतं ठरवायला हवं.

जाहिरातीतले स्टार्च इस्त्रीतले पप्पा-मम्मा न्‌ घरातले आई-बाबा यातला फरक अधोरेखित होतो, छोट्या छोट्या गोष्टींतील आपल्या गुंतवणुकीतून. एखाद्‌ वेळची “सोय’ जर “कायमची व्यवस्था’ होत असेल तर नातीही पार्सलचीच ठरतील! त्याला फक्त लेबल्स असतील; पण त्यात तिन्हीसांजेच्या आठवणींची ऊर्मी नसेल.

आज जी आळशी, सुखवस्तू घरं पार्सलसंस्कृतीच्या पायावर उभी आहेत, त्यांच्या हाती पार्सलनंच पुष्पगुच्छ येणार! पार्सलनंच केक येणार आणि हॅप्पी बर्थ डेचं एक स्वतःची सहीसुद्धा नसलेलं ग्रीटिंग! त्या वेळी जरा वळून पाहताना, आपण आपलं वात्सल्यही पार्सलनंच पाठवलं होतं, या वस्तुस्थितीची जाणीव असायला हरकत नाही. कृती स्वीकारायची ती परिणामासकट!

आधुनिकता, व्यग्रता कितीही असो; नाती एकमेकांशी वा समाजाशी जोडताना थोडी तोशीस पडतेच. प्रसंगी अडचण, चिडचीड, वैतागही उद्भवतोच. तारांबळ-गोंधळ-श्रमही होतात; पण घर नावाच्या समाजात न्‌ समाज नावाच्या घरात एकमेकांना गुंफताना अनेकदा इतकी सावध अलिप्तता नाही चालत. सिमेंटची अलिप्तता घराच्या पायरीसाठी ठीक; पण सिमेंटमध्ये बीज रुजणार नाही. पहिल्या पावसानं टणक ढेकूळ विरल्यावर त्याची मऊ माती होते. पुढं तेच मातीचं मऊपण बीजांकुरांनी हिरवळून येतं. अनेकदा आयुष्यातही रुक्ष अलिप्तता सोडावीच लागते; नाती एकमेकांत दरवळताना एकमेकांसाठी राबायची तयारी लागते.

आजच्या यंत्रयुगाला विसाव्याचे क्षण परवडणारे नाहीत; हे सगळ्यांनाच कळतं; पण तरीही ओढीनं जमवलेले विसाव्याचे क्षण पुन्हा यंत्राच्या स्वाधीन करणं हे केव्हाही समर्थनीय नाही. एकमेकांतील निरपेक्ष सहजता ओसरली तर “शब्द’सुद्धा “पार्सल’मधून आल्यासारखे उमटतील; पण प्रकटणार नाहीत. 

श्रीकांत न्‌ मृदुलानं ओढीनं जे अगत्य केलं, ते त्यांच्या माहिती व तंत्रयुगाच्या संदर्भांना धरून अगदी योग्यच आहे; पण त्या हद्दीपलीकडं भावनांचाही एक सुकोमल प्रदेश असतो. जिथं “मन’ व्यक्त करताना मनाचाच आधार घेतला की, एक अपार आनंद असतो, हेही त्यांना समजायला हवं!

दोघांनी खूप सारे पैसे खर्च करून “पार्सल’ने घरचं अगत्य केलं; पण त्याहीपेक्षा घरातला साधा “माझ्यासाठी’ केलेला चहा मला अधिक उबदार वाटला असता!

लेखक : श्री प्रवीण दवणे.

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “तरच मी लग्नाला तयार होईन…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? वाचताना वेचलेले ?

☆ “तरच मी लग्नाला तयार होईन…” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

तरच मी लग्नाला तयार होईनअशी मागणी  ऐकून थक्क झाले

दोन दिवसांपूर्वी एक विवाह  जमवण्यासाठी उपस्थित होतो.

मी मुलाकडील बाजूने होतो.

मुलगा माझ्या मित्राचा होता.

मुलाचा माझा फारसा परिचय नव्हता.

पण मित्र नेहमीच्या परिचयातील होता.

मुलाने मुलगी पसंती कळवलेली होती.

बैठकीच्या सुरुवातीला मुलाने खालील मागण्या केल्या.

त्या ऐकल्याबरोबर वधुकडील मंडळी आश्चर्यचकीत झाली आणि मागण्या मान्य करण्यासाठी वेळ मागून घेतला.

✅ संपूर्ण विवाह वैदिक पद्धतीनुसार होईल. ✅

  1. ✅ कोणत्याही प्रकारचे विवाहपूर्व चित्रफीत अथवा छायाचित्रण होणार नाही. ✅
  2. ✅ वधु विवाहप्रसंगी घागरा न घालता महाराष्ट्रीय पद्धतीची साडी नेसेल. ✅
  3. ✅ विवाहस्थळी कसलेही कानठळ्या बसवणारे संगीत न वाजवता शांत संगीत वाजवण्यात येईल.✅
  4. ✅ विवाहप्रसंगी म्हणजे हार घालतेवेळी केवळ वधु आणि वर मंचावर असतील✅
  5. हार घालतेवेळी वधु किंवा वरास उचलणार्‍यास विवाहमंडपातून बाहेर घालवण्यात येईल. ✅
  6. ✅ गुरुजींनी विवाहविधी सुरु केल्यानंतर कोणीही त्यांना थांबवणार अथवा अडथळा आणणार नाही.✅
  7. ✅ छायाचित्रकार अथवा चित्रफीत तयार करताना गुरुजींना दिशादर्शन करणार नाही. तो लांबूनच चित्रीकरण करेल. ✅
  8. छायाचित्रकार वधुवरांना चित्रविचित्र पोजेस देण्यास सांगणार नाही. ✅
  9. वधुवरांना सर्व आमंत्रितासमोर आलिंगन देण्यास सांगणार्‍यास विवाहमंडपाचे बाहेर काढण्यात येईल.✅
  10. वधु अथवा वराकडील कोणताही पाहुणा दारु अथवा इतर विचित्र भोजन पदार्थ मागणार नाही.
  11. कानठळ्या बसवणारे संगीत बिलकुलच लावण्यात येणार नाही.
  12. भोजनामध्ये अथवा नाश्त्यामध्ये कोणतेही विचित्र पदार्थ असणार नाहीत. भोजन व नाश्ता पूर्णपणे महाराष्ट्रीयन पद्धतीचे व साधे असेल.
  13. विवाहप्रसंगी कोणतेही अचकट विचकट नाच होणार नाहीत.
  14. विवाहप्रसंगी अथवा आदल्या दिवशी संगीत रजनीच्या नावाखाली चित्रविचित्र नृत्ये होणार नाहीत.
  15. लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणे,व भेटणे फोटो काढणे  मला आवडणार नाही..
  16. कमीत कमी खर्च व धर्म व शास्त्रीयपद्धतीने विवाहअसेल तर मी   तयार होईल…
  17. आई वडील खूप कष्ट करून लहानस मोठे करतात,जीवापाड जपतातलग्न साठी कर्जबाजारी  होतात, हा  वायफळ खर्च  टाळा

 

हा संदेश,,,

आश्चर्य म्हणजे वधुकडील मंडळींनी काही वेळानंतर चर्चा करुन उपरोक्त मागण्या मान्य केल्या आणि विवाह साध्या पद्धतीने करण्य‍ाचे मान्य केले.

आजच्या काळात असा विवाह प्रस्तावित करणार्‍या या मुलाचे मी ताबडतोब अभिनंदन केले.

बघा जमतय का ?

ही काळाची  व  संस्कृती जपण्याची गरज आहे … 🚩

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “छंदश्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “छंदश्रीमंत…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

लघु कथा  – – १.

आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधांच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़ मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.

लघु कथा ..२.

शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले ; त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रूंनी शाई फुटली होती.

लघु कथा  – -३.

आजोबांच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ीन बरा… माझ्याजवळ दोन काठया असताना.

लघु कथा  – – ४.

आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवालदाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहोर आला नाही.

लघु कथा  – -५.

ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, “ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.”

लघु कथा  – -६.

वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खूप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलंय.

लघु कथा  – -७.

काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .

लघु कथा  – -८.

तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये, तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच 5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला. म्हणाला, लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता. माझा दोस्त बरा झाला की छानशी साडी घ्या. त्या पाकिटापुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.

लघु कथा  – -९.

आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावत-पळत घर गाठले तिने. स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.

✨ लघु कथा  – -१0.

तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसांत फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती. त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.

सकारात्मक रहा…

सध्या बाहेर इतके नकारात्मक विचार फैलावतायेत की लोकांचा माणसातल्या चांगुलपणा वरचा विश्वास उडत चाललाय. अश्यावेळी अश्या सकारात्मक लघुकथांची आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रसार करण्याची खरोखर आवश्यकता आहे !!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवरा आणि नारळ… – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नवरा आणि नारळ… – लेखक : श्री. पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नवरा आणि नारळ कसे निघतील ते नशीबच जाणे असं आजी म्हणायची. 

बरं, घेताना फोडूनही बघता येत नाही. 

दोन्हीही कसेही निघाले तरी  ‘पदरी पडले, पवित्र झाले’. 

दोघांनाही देवघरात स्थान,  दोघेही पुज्य.

 

पार्ल्यातल्या फिश मार्केट बाहेर मद्रासीअण्णाच्या गादीवर नारळ रचून ठेवलेले असायचे. 

हल्ली ऑन लाईन साईटवर सगळ्या किमतीचे नवरे असेच रचून ठेवलेले असतात. 

 

नारळ म्हटलं कि मला धडधडतं . 

चांगला ओळखायचा कसा ?

मी उगाचच कानाजवळ नेऊन 

हलवून वगैरे बघत असे. 

 

अण्णाला कळायचं हे गि-हाईक  नवीन आहे. तो आपली जाड पितळी आंगठी दोन तीन नारळावर टांग टांग वाजवून हातात एक नारळ द्यायचा. 

ये, लो ! म्हणायचा. 

मी विचारायचो ‘खवट’ निकलेगा तो ? 

तो म्हणायचा ‘तुम्हारा नसीब !!’

 

आजी म्हणायची नारळ गोड निघाला तर दडपे पोहे, सोलकढी व खोब-याच्या वड्या आणि काय काय !

 

खवट निघाला तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल बाजूला घ्यायचं. घाणीवरचं असतं तसं. 

कापलं, भाजलं, ओठ फुटले, टाचाना भेगा पडल्या, केसांना लावलं, थंडीत चोळलं, दुखऱ्या कानात टाकलं, 

उत्तम घरगुती औषध. किती उपयोगी …. किती बहुगुणी !! 

 

थोडक्यात काय, 

नवरा काय ? नारळ काय ? 

गोड निघाला तर नशीब, 

खवट निघाला तर उपयोगी, 

हे कोकणी तत्त्वज्ञान. 

ह्याला जीवन ऐसे नांव !!

 

(याबाबत माझी एक विशेष सूचना…. या मध्ये “नवरा” या ठिकाणी “बायको”  लिहून ही वाचू शकता.अर्थात स्वतःच्या जबाबदारीवर…. मग खरी गंमत येईल.) 

लेखक –  श्री. पु ल देशपांडे

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेर मैत्रिणीचे … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेर मैत्रिणीचे … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

काल अगदी सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला ..  ” मी आज दिवसभर तुझ्याकडे रहायला येतेय ” आणि  सकाळी 9 वाजता  ती आली.  सकाळीच डबा करायचा असतो तेंव्हाच स्वयंपाक  होऊन जातो, त्यामुळे ती आली तेव्हा माझी  बरीच कामं होऊन मी गप्पा मारायला मोकळी झाले होते.  

ती येतेय म्हणून तिला आवडणारी  गरम थालिपिठं ,लोणी, मिरचीचे लोणचे ब्रेकफास्ट साठी तयार केले . थालिपिठं 1 घास खाल्ले आणि म्हणाली “अगदी माझी आई  करायची तसेच झालेत  ग” मस्करी, बडबड करत, गाणी ऐकत  ब्रेकफास्ट केला.  मग  सध्या काय वाचन चालू आहे पासून नवीन काय खरेदी केलीस असे  विचारत आधी तुझ्या  सुंदर साड्या बघू दे  म्हणत साड्यांच्या कपाटाकडे मोर्चा वळवला  आणि  एक दिवस मी तुझ्या साड्या पळवून नेणार हे सांगून टाकलं. नातेवाईक , राजकारणी आणि राजकारण ,शिक्षण  ,सोशल मीडिया त्यावरचे  फ्रॉड  या सगळ्या वर पूर्ण अधिकार वाणी ने  तावातावाने मते मांडून झाली त्यातले कळते किती हा भाग सोडा . 

मी इंस्टावर नाही म्हणून फेसबुक वर active असते, म्हणून मला ‘तू आज के ज़माने की नहीं है “असे   नेहमीप्रमाणे चिडवून ,बघू नवीन काय लिहिले आहेस असे म्हणून फेसबुक उघडून माझ्या पोस्ट वाचत बसली तुझे बरेच पोस्ट छान असतात ग मला खूप आवडतात तुझे सर्व पोस्ट .

आज तुझ्या झाडांना मी पाणी घालते असे म्हणत पाणी घालायला घेतले आणि  म्हणाली ” काय जादू करता ग ..  माझ्या आईची पण तुझ्या सारखीच सदा फुलांनी बहरलेली बाग असायची, माझ्याकडे नाही येत अशी इतकी फुलं ”  तिची अखंड बडबड चालू असताना मला  मात्र कुठे तरी  तिचं काही तरी बिनसले आहे असे वाटत होते. 

दुपारी तिला आवडते म्हणून दलियाची खिचडी , 2/3 प्रकारची फळे होतीच घरात  मग  fruit custard  केलं  … जेवताना  मला काही तरी जाणवलं  म्हणून उठून तिच्या जवळ जाऊन  तिच्या पाठीवर हात ठेवून  म्हंटलं  “आईची आठवण येतेय ना ”  हे ऐकल  आणि मला मिठी मारून तीने इतका वेळ अडवलेल्या डोळ्यातील पाण्याला वाट करून दिली.  

शांत झाल्यावर म्हणाली ” आधी  बाबा  गेले  आणि  3 वर्ष झाली आई  गेली , दादा  अमेरिकेत .. 

1 दिवस  कुठल्याही  जबाबदारी शिवाय  लहान होऊन  जगावं  ते माहेर राहिलेच नाही ग … काल पासून अस्वस्थ होते मग  म्हंटलं  मैत्रीण आहे ना  … 

आणि बघ  आई कडे गेल्यावर आई माझ्या आवडीचे जे पदार्थ करायची  त्यातले पदार्थ केलेस  … मी  मस्त लोळून tv पाहिला  , insta  वर टाईमपास केला  ..  गाणी ऐकत गप्पा मारल्या … आणि विशेष म्हणजे मी  डिस्टर्ब आहे  आणि कशाने डिस्टर्ब आहे हे तू ओळखलेस , आणि  आता  मनातले  दुःख बोलून  मन हल्का हो गया मेरा. तुझ्याकडे मी 1 दिवसाच  माहेरपण enjoy केलं . 

एक दोन दिवस राहा बोलली तरी ऐकले नाही माझे.  खूप हट्टी अगदी लहानपणापासूनच.  

संध्याकाळी घरी जातांना मला एक घट्ट मिठी मारली आणि अश्रू नकळतपणे डोळ्यात तरंगत होते दोघीच्या ही ..  माहेरी म्हणून माझ्याकडे आलेली माझी माहेरवाशीण मैत्रिण आनंदाने घरी गेली. 

वय कितीही असू द्या,  घरी कितीही मोकळ वातावरण ,ऐश्वर्य असू द्या पण  माहेरी जो आनंद, समाधान मिळते त्याची सर कुठल्याही ऐश्वर्याला  नाही हेच खरं …. 

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मम्मी म्हणा, मदर म्हणा,— ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

मम्मी म्हणा, मदर म्हणा,

आई शब्दात जीव आहे.

*

पिता म्हणा, पप्पा म्हणा,

बाबा शब्दात जाणीव आहे.

*

सिस्टर म्हणा, दीदी म्हणा, 

ताई शब्दात मान आहे.

*

ब्रो म्हणा, भाई म्हणा,

दादा शब्दात वचक आहे.

*

फ्रेंड म्हणा, दोस्त म्हणा,

मित्रा शब्दात शान आहे.

*

रिलेशन म्हणा, रिश्ता म्हणा,

नातं शब्दात गोडवा आहे.

*

हाय म्हणा, हॅलो म्हणा,

हात जोडणे संस्कार आहे.

*

सर म्हणा, मॅडम म्हणा,

गुरु शब्दात अर्थ आहे.

*

ग्रँड पा,  ग्रँड मा  

या शब्दात काहीच मजा नाही,

आजोबा आणि आजी 

यासारखे सुंदर नाते जगात नाही.

*

गोष्टी सर्व सारख्याच आहेत, 

पण फरक फार अनमोल आहे.

*

‘अ’  ते  ‘ज्ञ’  शब्दात ज्ञानाचे भांडार आहे…

म्हणून मराठीत आदर जास्त आहे.

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भज्यांचे विश्व —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “भज्यांचे विश्व —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

संपूर्ण महाराष्ट्राला एकाच धाग्याने बांधून ठेवणाऱ्या गोष्टी कोणत्या ? असे जर कोणाला विचारले तर कोणी पंढरपूरच्या विठोबाकडे बोट दाखवेल, कोणी लोककला म्हणेल, तर कोणी सहयाद्री पर्वत सांगेल.

माझ्या मते या सगळ्या सांस्कृतिक व भावनिक गोष्टी झाल्या.

पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जोडणारी एकच गोष्ट म्हणजे धागा नसून भजी हा सर्वमान्य पदार्थ आहे यावर कोणाचे दुमत नसावे. भजी न आवडणारा माणूस अजून तरी मी पाहिलेला नाही.

खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांची मुलाखत T V वर पाहिली होती. 

त्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत त्यांच्याकडून अनेकदा भजी या गोष्टींचा उल्लेख व त्या विषयीच्या  उपमा आल्याचे मला आठवते.

..  थोडक्यात काय तर त्यांच्यासारख्या उद्योगपती पासून माझ्यासारख्या उचापती माणसाला भजी ही प्रिय गोष्ट आहे.

भज्यांची पहिली ओळख ही लहानपणी पत्ते खेळताना झाली. 

एक्क्या मध्ये किलवर, बदाम किंवा चौकट चा एक्का हातात आला तर विशेष आनंद होत नसे. पण इस्पिक एक्क्याचे भजे आले की चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नसे. त्या पानाचा तो गोलाकार डिझाइन असलेले रंग फार आवडत असे.

भजी दोन प्रकारे खाल्ली जातात. एक म्हणजे  घरात व लग्न , मुंज वगैरे समारंभात. दुसरी म्हणजे हॉटेल, ढाबा , टपरी अशा ठिकाणी.

घरातील भजी थोडा सात्विकपणा घेऊन येतात. त्याला पवित्र कार्यक्रमाची जोड असल्याने कांदा लसूण माफक वापरले जातात. घोसावळी ,कोबी किंवा प्लेन असेच प्रकार केले जातात.

गोड केळ्याची भजी हा मला आवडणारा प्रकार खूप कमी केला जातो व विशेष लोकप्रिय नाही. पण गरम गरम भजीच्या कव्हर मधून जेव्हा गरम केळे डोकावते तेव्हा जिभेला व मनाला दोन्ही प्रकारे चटका देऊन व लावून जाते.  

शाळकरी व कॉलेज वयात स्वयंसेवक म्हणून वाढप्याचे काम करणाऱ्या लोकांसाठी लग्नातील आचारी लोक खास भजीचा घाणा काढत. 

तेव्हाचे आचारी हे व्यावसायिक केटरिंग कॉन्ट्रॅक्टर झालेले नसत. एक पंगत झाली की दुसरी बसे पर्यंत असे भज्यांचे घाणे मी स्वतः अनेकदा रिचवले आहेत.

बाहेरची भजी प्रथम खाल्ली तो दिवस मला चांगला आठवतोय. एक दिवस वडील सकाळी सकाळी आम्हाला बंडगार्डनला घेऊन गेले होते. १९७० च्या सुमारास तिथे बोटिंग चाले.

बोटिंग झाल्यावर एका टपरीवर भजी व चिंच गुळाची चटणी खाल्ली व तेव्हापासून भजी व चिंच गुळाची चटणी हे समीकरण फिक्स झाले.

हॉटेलमध्ये भजीबरोबर टोमॅटो सॉस दिले की माझे पित्त खवळते.

कालानुरूप आपले पुणे बदलले आहे पण तीन भजीवाले अजूनही अढळ ध्रुवपद घेऊन बसले आहेत.

बाजीराव रोडवरील विश्रामबागवाड्या समोरचा, रतन टॉकीज समोरचा व फडके हौदा जवळील रेल्वे बुकिंग ऑफिस जवळचा. शाळकरी वयात यांच्याकडील भजी फक्त गणेशोत्सवात खाल्ली जात. गेल्या काही वर्षांत तर hygene वगैरे मुळे तिकडे लक्ष दिले  जात नाही ही गोष्ट वेगळी.

पुण्यात भजी टिकवून ठेवण्यात वाटा उचलणारे म्हणजे टिळक रोडवरील रामनाथ हॉटेल

आषाढ महिन्यात चातुर्मास सुरु होण्याआधी माझे सासरे नेहमी तिथली भजी आणायला सांगत. कागदाच्या पुडीत ती घरी आणेपर्यंत पिशवी अगदी तेलाने माखून जात असे. पण दोन भजी व त्याबरोबर कडक मिरची पोटात गेली की तबियत एकदम खूष !

गणपती चौकातील आरोग्य मंदिर ची बटाटा भजी ही पण अशीच सुंदर. बेडेकरांनी जरी मिसळीत नाव मिळवले असले तरी त्यांची भजीही उत्तमच.( सध्या देतात की नाही ते जाणकार मित्रांनी सांगावे )

तुळशीबागेत सुध्दा श्रीकृष्ण उपहार गृहातील मिसळीला भजी हवीतच.

सुजाता हॉटेलमध्ये भजी सूप नावाचा प्रकार मिळे. चिंच गुळाचे पाणी त्यावर कांदा, कोथिंबीर, शेव व भजी – -अहा हा ! अजून आठवले तरी तोंडाला पाणी सुटते.

बादशाहीमध्ये सुद्धा एकदा जेवणाबरोबर extra चार्ज लावून भजी खाल्ल्याचे आठवते. गोल भजी, खेकडा भजी हे दोन प्रामुख्याने विकले जाणारे ब्रँड.

महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा , एखादे तरी भजीचे हॉटेल मिळणारच. का कोणास ठाऊक पण अशा दुकानात भजी हा पुरुष माणूस करत असतो तर काउंटर वर नेहमी त्यांची पत्नी असते. 

मला या दुकानात जर सर्वात काय आवडत असेल तर पीठ पातेल्यात काढून त्यात पाणी, मसाला , तिखट, कांदा घालून कढईत सोडे पर्यंतची कृती .बहुतेक सर्व मंडळी त्यात इतकी गर्क झालेली असतात की जणू समाधी लागली आहे.

मग हळूहळू कढईच्या टोकावरून किंवा मध्यातून एकेक भजे तेलात सोडणे. मग लाल रंग येईपर्यंत वरखाली करून झाऱ्यावर निथळत ठेवणे. एकदा तो भज्यांचा lot अल्युमिनियमच्या परातीत टाकला की पुढचे काम पोऱ्या करणार.

भजी ही कागदाच्या पुडीत धरून खाल्ली तर जास्त मस्त लागतात. मधूनच पुडी बाजूला करून मीठ लावलेली मिरची दाताखाली चावायची. त्यासारखे स्वर्गसुख नाही.

जोडीला चुरलेली भजी , तिखट व लसूण घातलेली चटणी असेल तर काय विचारायलाच नको.

ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीतात काही राग हे सर्वकालीन म्हणजेच केव्हाही गायले तरी चालतात तसेच भजी पण सर्वकालीन खाद्य आहे.

भजी खाण्याचे आवडते ठिकाण म्हणजे एखादे हिल स्टेशन, सिंहगड, सज्जनगड , वरंध घाट, ताम्हिणी घाट .

महाबळेश्वरच्या आर्थर सीटला सकाळी सकाळी नऊ वाजता जाऊन भजी खाणे हे माझे आवडते काम.

काही वेळेला तर आदल्या दिवशीचे तेल वापरून केली आहेत हे समजते, पण त्यांची चव न्यारीच आणि कधीच बाधत नाहीत.

लोणावळा येथील भजी पॉइंटची भजी ही नेहमीच किलोवर घ्यावीत नाहीतर कुटुंबात कलह माजू शकतो.

उटी येथे एकदा लांब मिरची घालून केलेले भजे एकट्याने फुल्ल खाल्ले. लग्न नवीन झाले असल्याने बायकोवर इंप्रेशन मस्त मारले गेले.

पुणे कोल्हापूर मार्गावर ज्या बस नॉनस्टॉप जातात त्या कराडच्या अलीकडे अतीत गावाच्या बस स्थानकात फक्त भज्यांसाठी थांबतात. तो आस्वाद मी असंख्य वेळा घेतला आहे.

सुखाच्या कल्पनेत माझे एक सुख म्हणजे कुठलेतरी डोंगरगाव, जांभुळपाडा, बामणोली अशा नावाचे गाव असावे, हवा ढगाळ व रिमझिम पाऊस पडत असावा, डोंगर दऱ्यांवर धुके असावे , एखाद्या पत्र्याच्या टपरी वर भजी चालू असावीत, मग पुडीत भजी, मिरची, लाल चटणी व तिखट लागले की लालबुंद कडक चहाचा घुटका

आयुष्यात दुसरे काही नकोच  मग !

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाचे लक्ष आहे बरं का… लेखक : अज्ञात ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाचे लक्ष आहे बरं का… लेखक : अज्ञात ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी 

एके दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तेव्हा पाहिले कि, एक आकर्षक बांद्याची व्यक्ती सस्मित समोर उभी होती. मी म्हटले, बोला! काय काम आहे?

ते म्हणाले, ठीक आहे भाऊ, तुम्ही रोज माझ्यासमोर प्रार्थना करत होता म्हणून म्हटले आज भेटूनच घेऊ. 

मी म्हटले, “माफ करा मी तुम्हाला ओळखले नाही.”

तेव्हा ते म्हणाले, “बंधू! मी भगवान आहे. तू रोज प्रार्थना करत होतास, म्हणून मी आज पूर्ण दिवस तुझ्या बरोबर राहणार आहे.”

मी चिडत म्हटलं, “ही काय मस्करी आहे?”  “ओह ही मस्करी नाही सत्य आहे. फक्त तूच मला पाहू शकतोस.  तुझ्या शिवाय मला कुणीही पाहू किंवा ऐकू शकणार नाही!

काही बोलणार इतक्यात मागून आई आली… 

एकटा काय उभा आहेस, इथं काय करतोस? चल आत, चहा तयार आहे आत येऊन चहा पी. आई ला काही तो दिसला नाही.

आईच्या या बोलण्या मुळे आता या आगंतुकच्या बोलण्यावर थोडा विश्वास होऊ लागला. माझ्या मनात थोडी भीती होती. चहाचा पहिला घोट घेतल्या बरोबर मी रागाने ओरडलो. 

अग आई, चहा मध्ये इतकी साखर रोज रोज का घालतेस? एवढे बोलल्या नंतर मनात विचार आला कि, जर  आगंतुक खरोखर भगवान असेल तर त्याला आई वर रागावलेलं आवडणार नाही. मी मनाला शांत केले आणि समजावले कि, अरे बाबा, आज तू नजरेत आहेस. थोडे लक्ष दे… 

“बस्  मी जिथं असेंन, प्रत्येक ठिकाणी ते माझ्या आले… थोड्या वेळाने मी आंघोळीसाठी निघालो, तर ते सुद्धा, माझ्या पुढे…..

मी म्हटले ” प्रभू , इथे तरी एकट्याला जाऊदे.”

आंघोळ करून, तयार होऊन मी देव पूजेला बसलो. पहिल्यांदा मी परमेश्वराची मना पासून प्रार्थना केली. कारण आज मला, माझा प्रामाणिक पणा सिद्ध करायचा होता. 

ऑफसला जाण्यास निघालो. प्रवासात एक फोन आला. फोन उचलणार, इतक्यात आठवले, आज माझ्यावर प्रभू ची नजर आहे, गाडी बाजूला थांबवली. फोन वर बोललो आणि बोलत असताना, म्हणणार होतो की, या कामाचे पैसे लागतील, पण का कोण जाणे, तसे न बोलता म्हटले तू ये! तुझे काम होईल आज”….

ऑफिस मध्ये पोचल्यावर मी माझे काम करत राहिलो. स्टाफ वर रागावलो नाही किंवा कुठल्याही कर्मचऱ्या बरोबर वादविवाद केला नाही. रोज माझ्या कडून विना कारण अपशब्द बोलले जायचे.  पण त्यादिवशी तसे काहीं न बोलता काही हरकत नाही,   ठीक आहे,    होऊन जाईल काम, असे म्हणत सहज पणे सर्व कामे केली.

आयुष्यातील हा पहिला दिवस होता. ज्या दिवशी माझया दिनचर्येत राग, लोभ,अभिमान,दृष्टता, अपशब्द, अप्रमाणिकपणा, खोटेपणा कुठे ही नव्हता.

संध्याकाळी ऑफिस मधून निघून घरी जायला निघालो. कार मध्ये बसलो आणि बाजूला बसलेल्या प्रभूंना म्हणालो,” भगवान, सीटबेल्ट बांधा. तुम्ही पण नियमांचे पालन करा.” प्रभू हसले. माझ्या आणि त्यांच्या चेऱ्यावर समाधान होते. 

घरी पोचलो. रात्रीच्या भोजनाची तयारी झाली. मी जेवायला बसलो. प्रभू! प्रथम तुम्ही घास घ्या. मी असे बोलून गेलो. त्यांनीही हसून घास घेतला. 

जेवण झाल्यानंतर आई म्हणाली,” आज पहिल्यांदा तू जेवणाला नावे न ठेवता, काही दोष न काढता जेवलास!   काय झाले? आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?

मी म्हटले, “आई, आज माझ्या मनात सूर्योदय झाला आहे. रोज मी फक्त अन्नच खात होतो. आज प्रसाद घेतला.  आई आणि प्रसादात कधी काही उणीव नसते!”

थोडा वेळ शतपावली केल्यानंतर, मी माझ्या खोलीत गेलो आणि निश्चिन्त व शांत मनाने उशीवर डोके टेकवले… झोपी जाण्यासाठी… प्रभू नि माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, म्हणाले,” आज तुला झोप येण्यासाठी,मोबाईल संगीत, किंवा औषध किंवा पुस्तकाची गरज भासणार नाही.”  खरोखर, मला गाढ झोप लागली.

ज्या दिवशी आपणास कळेल की,  ‘तो’ पहात आहे, आपल्या हातून सर्व काही चांगले घडेल.                   

देवाचे लक्ष आहे बरं का ….. 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “१ एप्रिल —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “१ एप्रिल —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

म्हणजे गंमत..चेष्टा.. मस्करीचा दिवस. हो.. नेहमीच कसे गंभीरपणे जीवन जगायचे, किमान एक दिवस तरी बनवाबनवीचा.. गमतीचा हवाच. अर्थातच फुल म्हणजे वेड्यात काढणारी.. धक्का देणारी गंमत. पण ही जिवघेणी नको तर बुद्ध्यांक तपासणारी.. समोरच्यालाही हसवणारी हवी.      

अशी ही एक कथा सांगितली जाते की या दिवसाचा प्रारंभ चक्क १३८१ चा. त्यादिवशी म्हणजे ३२ मार्चला इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी अँनचे लग्न आहे अशी अफवा पसरली. लोक आनंदोत्सव साजरा करु लागले. तेव्हा नंतर कळले की ३२ मार्च कॅलेंडरमध्ये नाहीच. १ एप्रिल आहे. तेव्हापासून हा गमतीचा दिवस सुरू झाला. 

…पण कधीकधी अशीही गंमत केली जाते जी ऋणानुबंध जुळवते. आज लग्न ही समस्या झालीय. खरं म्हणजे आसपास आवडणारा जोडीदार दिसतो. सारे काही अनुरुप असतानाही बोलण्याचे ध्यैर्य नसल्यामुळे लग्न जुळत नसते. मग काही उत्साही १ एप्रिलचा फायदा घेतात. म्हणजे ‘वाजली तर पुंगी’. बाजू उलटलीच ..’तो’ किंवा ‘ती’ अंगावर धावली तर लगेचच आजचा दिवस कोणता ?.. असे म्हणत हसत सुटका करुन घेता येते.

पण ही १ एप्रिल ची मात्रा लागू होत आज अनेक संसार सुखात सुरू आहेत. त्यांच्यासाठी तर आजचा दिवस फारच महत्वाचा. त्यांचे अभिनंदन. 

एकमेकांना आपल्या मनातील भाव कळण्यासाठी १ एप्रिलचा हा दिवस फलदायी ठरला. तेव्हा इतरांनाही असा लाभ घेण्यासाठी शुभेच्छा.

आता अजूनही कुणाला याचा फायदा झाला, हृदयातील प्रेम व्यक्त करत सुखी संसार सुरू झाला तर आम्हांला अवश्य कळवा. हल्ली लग्नातील जेवणाचे वाढलेले दर बघता आम्हाला बोलवू नका, फक्त कळवा. बोलवले नाही तरीही आमच्या शुभेच्छा आहेतच.

आणि.. हो समजा तुम्ही बोलवले तरीही वेळ.. पैसा.. प्रवासाची दगदग यामुळे यायलाही परवडत नाही हो.. पण हे मान्य न करता आमचा अहंकार दुखावतो. आम्ही ओरडून जाणीव करुन देतो. असो.. हे असे एप्रिल फुल.

लेखक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print