मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “आयुष्याच्या संध्याकाळी…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आजी उदास आहे हे आजोबांच्या लक्षात आलं.

“काय झालं गं ?” आजोबांनी विचारलं. आजी म्हणाली, “अहो, आता थकवा येतो. आधी सारखं राहिलं नाही. आता गडबड गोंगाट सहन होत नाही. कुठे जायचं म्हटलं तर जास्त चालवत नाही. कधी भाजीत मीठ टाकायला विसरते, तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलंय माहीत नाही!”

आजोबा म्हणाले, “देवाचा हिशोब मला माहीत नाही. आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळही करू शकत नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात जे काही आहे, त्याचा विचार करावा.अग, वयानुसार हे सर्व होणारच.आधीचे दिवस आठव ना. किती कामं करायचीस तू. पूर्ण घर तू खूप छान सांभाळलंस.मला कशाचीच काळजी नव्हती कधी.आता वयोमानानुसार हे सारं होणारच. पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणं आपल्या हातात आहे.जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर थोडे शारीरिक बदल होतातच. थोडे आपल्यालाही करायचे असतात. आपली आयुष्याची घडी परिस्थितीनुसार बदलायची असते. चल. आज सायंकाळी बाहेर जाऊ या आपण. तू छान ती नारंगी साडी नेस. रात्री आपण बाहेरच जेवू.”

आजोबा संध्याकाळी आजीला घेऊन बाहेर पडले व जवळच असलेल्या बसस्टाॕपवर जाऊन बसले.दोघे बराच वेळ तेथेच भूतकाळात रमत गप्पा मारत बसले. आजोबा म्हणाले, “अगं, पाय दुखत असतील तर मांडी घालून बस छानपैकी.नंतर पाणीपुरी शेवपुरी खाऊनच घरी जाऊ.” अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे दोघांचे फिरणे झाले.

आजीची उदासी मात्र कुठे पळाली, हे तिला कळलंच नाही. ती अगदी ताजीतवानी झाली.

 मोबाईल पकडून आजीचा खांदा दुखतो, म्हणून आजोबांनी आजीसाठी मोबाईल स्टॅन्ड मागवला.आज आजीने आजोबांना सकाळीच सांगून टाकलं की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही. काही तरी चमचमीत खायला घेऊन या.आजोबांनी आनंदाने आणलेले समोसे, ढोकळा, खरवस, दोन पुरण पोळ्या पाहुन आजी म्हणाली,”अहो.. एवढं का आणलंत?” आजोबा म्हणाले,”अगं, आज आणि उद्या मिळून संपेल की.” आजी आजोबांची पार्टी छान  झाली.

आजोबा बऱ्याच वेळा पासून एका बाटलीचं झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून नातू म्हणाला,” द्या आजोबा मी उघडून देतो.” आजोबा म्हणाले, “अरे, नको, बाळा.मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच रे. जोपर्यंत करू शकतो, तोपर्यंत काम करायचं हे मी ठरवलंय. रोज फिरायला जाणं, भाजी आणणं , भाजी चिरणं , साफसफाई करणं , धुतलेले कपडे वाळत घालणं , वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालणं अशा कामांची जबाबदारी मी घेतली आहे.तुझ्या आजीला मदतपण होते आणि माझा वेळही जातो.”

वाहतं पाणी ‘धारा’ म्हणजे पुढे पुढे वाहत जाणारी उर्जा. तेच साचलेलं पाणी म्हणजे अनेक रोगांचा उगम. आयुष्याचं पण असंच आहे. शक्य तेवढं सक्रिय राहणं ही आवश्यकता असते. जे जमेल, जसं जमेल, जे आवडेल, जे झेपेल ते करत रहाणं गरजेचं आहे. चलतीका नामही जिंदगी है! वयाच्या ह्या वळणावर

एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने,विश्वासाने हातात घेणं ही उर्वरित आयुष्याची गरज आहे.

म्हणूनच  

प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सख्खं नातं सतत का देतं दुःख?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ सख्खं नातं सतत का देतं दुःख?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सख्ख्याच्याच ठायी का वसतात मत्सर, सूडबुद्धी, द्वेष आणि अहंकार की जो साधतो विध्वंस मानव जातीचा?

फक्त प्रेम करा !

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी, सख्खी मैत्रीण…

नेमकं काय असतं हे ‘सख्खं प्रकरण?’

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा. जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो.

त्याला आपलं म्हणावं,

 त्याला सख्खं म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय, हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये, इतकी खबरदारी घेतली जाते.तिथे सख्य नसते, पथ्य असते.

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो, त्याला सख्खं म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर, आपलं स्वागत होणारच असतं. आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं.

अपमानाची तर गोष्टच नसते.’फोन करून का आला नाहीस’ अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर

विठ्ठल म्हणतो का,

“या या फार बरं झालं !”

 

माहूर वरून रेणुका मातेचा किंवा कोल्हापूर वरून महालक्ष्मीचा किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ? या म्हणून !

मग आपण का जातो ?

कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकट मुक्तीची आशा वाटते ….म्हणून !

हापण एक प्रकारचा ‘आपलेपणाच’ !

 

लौकिक अर्थाने, वस्तूंच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ?

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ?

काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का,

“किती रोड झालीस ?

 कशी आहेस ?

सुकलेला दिसतोस,

 काय झालं ?”

नाही म्हणत ना.

 

मग दर्शन घेऊन निघताना वाईट का वाटतं ?

पुन्हा एकदा मागे वळून का पहावंसं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास म्हणजेच ‘आपलेपणा’!

 

हा आपलेपणा काय असतो ?

 

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ.

भेटल्या नंतर बोलण्याची ओढ.

बोलल्या नंतर ऐकण्याची ओढ.

निरोप घेण्या आधी पुन्हा

भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं त्याला आपलं म्हणावं.

आणि चुलत,मावस असलं तरी

सख्खं म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे

म्हणजेच ‘आपलेपणा’ !

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पहिल्या डोळे भरून येतात आणि निःसंकोचपणे गालावरून अश्रू ओघळू लागतात, तो आपला असतो, तो सख्खा असतो !

 

लक्षात ठेवा,

ज्याला दुसऱ्या साठी ‘सख्खं’ होता येतं त्यालाच कुणीतरी सख्खं असतं,

बाकी फक्त परिचितांची यादी असते,

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !

 

तुम्हीच सांगा…..

 

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्खं म्हणायचं का ?

ज्याला तुमच्या दु:खाची जाणीवच नाही त्याला सख्खं म्हणायचं का ?

 

आता एक काम करा..

 

करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची..

झालं न धस्सकन..

होतंय न धडधड..

नको वाटतंय न यादी करायला ….

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी..

आणि मानायला लागा सर्वांना आपलं.कोणी कितीही झिडकारलं तरी

कारण …..

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही.

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं… वादाने, मत्सर हेवा करून तर नक्कीच नाही…

लेखक  :अज्ञात

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ॐ “सौन्दर्य…” – लेखिका : सौ. सुधा मूर्ती ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ॐ “सौन्दर्य…” – लेखिका : सौ. सुधा मूर्ती ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

बऱ्याच स्त्रियांना शारीरिक सौंदर्याचा न्यूनगंड असलेला, मी समाजात, वावरत असताना माझ्या निरीक्षणात येतो.

पण, खर सांगू मैत्रिणींनो…

पुरूषांना काय आवडेल,

याचा विचार करून

स्वतःला घडवू नका…

पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य तोलणं, म्हणजे स्वतःमधील स्त्रीत्वाचं अधःपतन करवून घेणं आहे…

सकाळी उठून सडा-संमार्जन झाल्यावर स्वतःच्या हातानं काढलेली रेशीम-रेषांची रेखीव रांगोळी पाहिलीत, तर तुम्हाला तुमच्या बोटातली सुंदरता दिसेल…

स्वच्छ-सुंदर आवरलेलं, स्वच्छ स्वयंपाकघर तुम्हाला तुमच्या गृहिणीपणाचं सौंदर्य सांगेल…!

तुम्ही शिक्षिका असाल, तर तुमचं सौंदर्य फळ्यावर नीटपणे लिहिलेल्या अक्षरात असेल. विषयाचं आकलन झाल्यावर दिसणारे विद्यार्थ्यांचे आनंदी चेहरे, ही तुमचीच सुंदरता आहे…

सौंदर्य कपड्यात नाही,

कामात आहे….

सौंदर्य नटण्यात नाही,

विचारांमधे आहे…

 

सौंदर्य भपक्यात नाही,

साधेपणांत आहे…

सौंदर्य बाहेर कशात नाही,

तर मनांत आहे…!

आपण करत असलेलं प्रत्येक काम

म्हणजे सौंदर्याचंच सादरीकरण असतं…!

 

आपल्याला आपल्या कृतीतून

सौंदर्याची निर्मिती करता आली पाहीजे…

 

प्रेमानं बोलणं..

म्हणजे सुंदरता…!

 

आपलं मत योग्य रीतीनं

व्यक्त करता येणं..

म्हणजे सुंदरता…!

 

नको असलेल्या गोष्टीला

ठाम नकार देण्याची हिंमत

म्हणजे सुंदरता…!

 

दुसर्‍याला समजावून घेणं

म्हणजे सुंदरता…!

 

आपल्या वर्तनातून, विचारातून

आपलं सौंदर्य बाहेर आलं पाहिजे.

 

हाती आलेला प्रत्येक क्षण

रसरशीतपणे जगण्यात

खरी सुंदरता आहे…!

आपण करीत असलेल्या कामात कौशल्य प्राप्त झालं, की आपोआपच आत्मविश्वास वाढतो, आत्मसन्मानाची जाणीव येते…

अशी आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोआप सुंदर होते, हा माझा स्वानुभव आहे…

इंदिरा गांधींचं सौंदर्य

कणखर निर्णयक्षमतेत होतं,

मेरी कोमचं सौंदर्य

तिच्या ठोशात आहे…

बहिणाबाईंचं सौदर्य

त्यांच्या असामान्य प्रतिभेत होतं..

लतादीदींचं सौंदर्य

त्यांच्या अप्रतिम, दैवी

आवाजात आहे…

वेळ प्रसंगी या सर्वजणींची आठवणच आपलं जगणं सुंदर करायला मदत करेल..

आपण जशा जन्माला आलो आहोत, तशा सुंदरच आहोत, ही खूणगाठ मनाशी बांधून टाकली, की सौंदर्याकरता दुसर्‍या कुणाच्या पावतीची गरज पडत नाही आणि अवघं विश्व सुंदर भासतं…!

लेखिका :सौ. सुधा मूर्ती

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाटण संस्कृति… – लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चाटण संस्कृति… – लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आमच्या घरी जेवणं झाली की त्यानंतर आमचे वडील ताट ‘चेक’ करायचे.पान स्वच्छ लागायचं.

खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून  खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत.

माझ्या आयुष्यातला चाटण संस्कृतीतला जॉय, माझ्या लहानपणी, जॉय नामक वर्षाकाठी एकदाच मिळणाऱ्या आईसक्रीमपाशी सुरू झाला होता! त्या कपाचे पातळ कव्हरापासून  चाटणप्रवास सुरु झाला.

या प्रवासातला प्रामाणिक साथीदार म्हणजे दुधाचं पातेलं. ते घासायला टाकण्यापूर्वी अंगठ्याने त्याला खरवडून घेऊन चाटतानाचा तो समाधीक्षण अवर्णनीय असतो. दुधाच्या पातेल्याच्या इतकंच आमटीचं पातेलं चाटण म्हणजे ‘सुख दुःख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ.’दूध आणि आमटी याला समान न्याय देण्याइतकं गीतातत्त्व अंगात मुरणं ही या चाटणसंस्कृतीची देन आहे.

रात्रीचं जेवण झालेलं असतं. शेवग्याच्या शेंगांची ओलंखोबरं आणि चिंचगूळ घालून केलेली अमृततुल्य आमटी संपलेली असते, पण त्या रिकाम्या पातेल्याच्या आतल्या भिंतींना जे अमृतकण चिकटलेले असतात, ते बोटाने निपटून चाटून साफ करताना जो काही निर्मळ आनंद मिळतो, तो ते पातेलं चाटणाऱ्यानेच अनुभवावा.

तुम्ही काजू शेंगदाणे घालून मस्त आटवलेली अळूची भाजी (पुण्यात फदफदं म्हणतात) खाल्लेली असेल, पण पंगतीच्या शेवटी उरलेली भाजी, वाटीत ट्रान्सफर केल्यानंतर पातेल्याच्या आत चिकटलेली अळूची-साय कधी खाल्ली आहे?बेफाट लागते!

माझी नणंद गव्हल्याच्या खिरीचं पातेलं, खीर संपल्यानंतर मागून घेते आणि रिकाम्या पातेल्याला स्वच्छ करते.

सासूबाई तर गोडाचा शिरा संपल्यानंतर गार झालेली कढई घेऊन त्यात इवलं दूध टाकून ठेवायच्या आणि पातेले निपटून घ्यायच्या.

पिठल्याच्या कढईच्या तळाशी जमलेली खमंग खरवड बेसुमार चविष्ट लागते. आणि, ती मन लावून खरवडणारं ध्यान, किती सुंदर दिसतं ते साक्षात तुकोबाच सांगू शकतील.

या चाटण संस्कृतीला समजूतदारपणाचे आणि सिव्हिक सेन्सचे अनेक पदर आहेत.

ताट अथवा पातेलं इतकं स्वच्छ निपटावं की त्यातले अन्नकण पूर्णत्वाने संपावे, ते घासणाऱ्या बाईला त्याची घाण वाटू नये आणि बरबटलेलं ताट घासताना व्यय होणाऱ्या पाण्याचीही केवढीतरी बचत व्हावी.

आमचा हा चाटून पुसून खाण्याचा अलिखित नियम हा फक्त पातेलं आणि कढई पुरता मर्यादित नव्हता तर तो आंब्याच्या फोडी आणि कोयी खातानाही लागू व्हायचा.

‘खाऊन माजावं, टाकून  माजू नये’, ‘भूखी तो सुखी’ अशा अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांमध्ये लहानपण घालवलेल्या आम्हा सर्वांनाच, अन्न टाकण्याचा मोठाच तिटकारा. एकतर आम्ही जास्त अन्न शिजवत नाही आणि समजा जास्त शिजून उराउरी झालीच तर ती टाकून कधीच देत नाही.

आमटीची थालिपीठं, फोडणीचा भात, किंवा फोडणीची पोळी असेल किंवा, कोबीच्या उरलेल्या भाजीचे पराठे किंवा कोथिंबीर माठ पालक यांच्या कोवळ्या देठाचं बनवलेलं सुप असेल.

तुपाच्या बेरीमध्ये कणिक भिजवण्यापासून ते त्याचा गूळ घालून केलेल्या वड्यापर्यंतचा कायापालट असेल. अशी टाकाऊतुन टिकाऊची संस्कृती किंवा कचऱ्यातून पुनर्निर्माणाची कला जोपासणाऱ्या मला, या दिवाळीत मोठाच धक्का बसला.

घरी केलेला ताजा चिवडा आणि बेसन लाडू एका ओळखीच्या बाईने लेकाला खायला दिले, त्यानेही “ममी, यम्मी”करत खाल्ले. (मम्मी आणि यम्मी हे शब्द ऐकल्यावर का कुणास ठाऊक एक कानफटात मारावीशी वाटते. तसेच मराठी घरात मोठया बहिणीला ताई न म्हणता दीदी शिकवले जाते त्याचाही राग येतो)

असो खरा कानफटात मारायचा प्रसंग तेव्हा उदभवला, जेव्हा मी त्याची ताटली घासायला टाकली. मी पाहाते तो त्यात चिवड्यातून वेचलेले दाणे आणि लाडवातून उपटलेले बेदाणे त्याने चक्क टाकून दिलेले होते. त्याला विचारल्यावर ”हल्ली मला नाही आवडत तो कचरा,“ इतकं सरळ सोपं उत्तर आलं.

बारकाईने पाहिल्यावर अशा टाकणं-प्रसंगांची न संपणारी मालिकाच माझ्या डोळ्यापुढे तरळली.

माझा एक भाऊ पोहे आणि उपम्यातून मोहोरी निवडून बाजूला ठेवतो आणि मी फारफार तर मोहोरी कढीपत्ता मिरची असा सो कॉल्ड कचरा टाकणाऱ्यांना एकवेळ माफ करू शकते, पण बुफेच्या रांगेत उभे राहून भुकेकंगाल राष्ट्रातुन आल्यासारखं बदाबदा वाढून घेऊन, नंतर अन्न टाकून देणाऱ्यांना कधीही माफ करू शकणार नाही.

काहीजण पुलावातून काजू बाजूला निवडून ठेवतात आणि कितीतरीजण न आवडत्या भाज्या पुलावातून निवडून टाकून देतात आणि “नाही आवडत आम्हाला त्या भाज्या”असं निर्लेप स्पष्टीकरण देतात.

गुळाच्यापोळ्या खाताना, गूळ पसरलेला भाग सोडून उरलेल्या निर्गुळपोळीच्या चंद्रकोरी टाकणाऱ्यांचीही एक जमात असते.

पावाच्या कडा टाकून मधला मऊभाग खाणारे महाभागही असतातच की.

मसालादूध म्हणजे माझा जीव की प्राण!!

पण त्यात जीव ओतून घातलेलं केशर आणि सुकामेव्याचं वैभव, तळाशी जाऊन बसतं ही एक समस्याच आहे. आणि हल्लीच्या पिढीच्या माजखोर पाईकांना ते चाटायला आवडत नाही आणि टाकण्यात काही गैरही वाटत नाही.

मी मसाला दुधाच्या ग्लासच्या तळाशी चिकटलेली सुकामेवापूड बोटाने चाटून न खाणाऱ्याला कधीच क्षमा करू शकत नाही.

माझ्या एका मैत्रिणीकडे भरली वांगी प्रचंड आवडतात. ती करतेच अप्रतिम.पण तिची मुलं वांग्याला चिकटलेला मसाला खाऊन वांगी चक्क टाकून देतात. मी तिला सुचवणार आहे की एक दिवस मसाल्याचा गोळाच दे डब्यात भाजी म्हणून. कशाला ती वांगी फुकट घालवायची!!

अशा टाकण-संस्कृती पाईकांना शनिवारवाड्यावर जाहीर फटके अशा शिक्षा ठोठावल्या पाहिजेत

बरं ही टाकणं मंडळी स्वतः चाटून पुसून घेत नाहीतच पण इतरांनी कुणी चाटायला घेतलं की त्यांना एमबॅरॅसिंग वाटतं (टाकताना बरं नाही वाटत एमबॅरॅसिंग).

खूप जणांना सवय असते,ते पूर्ण चहा पीत नाहीत,तळाशी उरवतात…म्हणजे आम्ही वेडेखुळे म्हणून गाळून देतो की काय याना चहा!!

काहींना चहावर जमलेली साय त्याच कपाच्या कडांवर फाशी दिल्यासारखी टांगून ठेवण्याची सवय असते.जी बघताना घाण वाटते.

पुन्हा तो कप साफ करणाऱ्याचा विचार केला आहे का कधी?

ह्या मुलांनी खाल्लेल्या हापुसच्या फोडी बघितल्या आहेत? विलक्षण वेदनादायी आहे त्या खाल्लेल्या फोडी टाकणं!शरीराचा नक्की कुठला अवयव वापरतात फोडी खाताना देवच जाणे. दात नामक अवयव तोंडात असताना, आंब्याच्या फोडीला इतका गर शिल्लक राहूच कसा शकतो? आमच्यावेळी आम्ही आंब्याच्या कापट्या खाताना, जबड्यातला सर्वात तीक्ष्ण दात वापरून त्याचं अक्षरशः सर्जिकल स्ट्राईक करायचो,आणि त्यानंतर बाठ कुणी चाखायची यावरून युद्धं व्हायची ती वेगळीच.

हल्लीच्या फूड फूड वगैरे चॅनेलवर येणारे समस्त कपूर-खन्ना लोक, पदार्थ करुन झाल्यावर ज्या बेपर्वाईने ती पातेली आणि कढया सिंकमध्ये टाकतात, ते पाहून अंगावर काटा येतो.

खरवडून घेणे, निपटून घेणे, चाटून घेणे, पुसून घेणे, विसळून घेणे या स्वैपाकघरातल्या पाच क्रियापदांची ओळख हल्लीच्या पिढीला करून द्यावी वाटते. 

आतेसासूबाईंकडे एकदा गेले होते. त्या गुळाच्या पोळ्यांसाठी गूळ,किसत होत्या. किसण्याचे काम झाल्यावर त्यांनी किसणीखाली स्टीलचे ताट ठेवून त्या किसणीवर पाणी ओतले आणि म्हणाल्या दुपारपर्यंत हा किसणीला चिकटलेला गूळ विरघळून त्याचं पाणी होईल, मग मी ते आमटीसाठी वापरीन.

मला त्यांच्या काटकसरीपणाचं आणि कल्पकतेचंही कौतुक वाटलं.आता काही लोकांना या कृतीला ‘किती तो कर्मदरिद्रीपणा’ असं म्हणावंसं वाटेलही, पण उलटपक्षी मीच असं म्हणणाऱ्यांना विचारदरिद्री म्हणेन.

बटाटेवडे अथवा भजी करून झाल्यावर परातीला चिकटलेला पिठाचा, ओवा-मीठ- तिखट – कोथिंबीर-कांदा युक्त चविष्ट ऐवज, सिंकस्वाहा करण्याऐवजी, विसळून आमटीत ढकलावा,त्या आमटीची चव अप्रतिम लागते.

आणि ती आमटी यदाकदाचित उरलीच तर दुसऱ्यादिवशी थालीपीठार्पण करावी.काय जबरदस्त होतं त्या थालीपीठाचं. मुळात भाजणीचं थालीपीठ चविष्टच असतं पण उरलेल्या आमटीला पोटात आश्रय दिल्यावर थालीपीठ जणू कातच टाकतं.

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्मच्याही पलीकडे नेणारी एक ऋणजाण भावना आहे.ती, गुडघा गुडघा चिखलात भात लावणी करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल असेल.उन्हातान्हात राबणाऱ्या मजुराविषयी असेल.

पेरणी,लावणी,छाटणी, कापणी करणाऱ्या घट्टे पडलेल्या हातांबद्दल असेल.त्याहीपुढे,  रात्रीबेरात्री वाहने चालवून शेतातील धान्य आपल्यापर्यंत वाहून आणणाऱ्या वाहन चालकांबद्दल असेल.ज्या रस्त्यांवरून ती वाहने धावतात तो तयार करणाऱ्या मजूरांबद्दल असेल.शेतातून सुरू होणारी ही ऋण-जाण-साखळी, वाटेतल्या अनेक कष्टकऱ्यांपासून ती अगदी पोळ्यावाल्या काकूंपर्यंत, नव्हे त्याहीपुढे भांडी घासणाऱ्या सखूपर्यंत येते. मला टाकलेल्या अन्नात हे सगळे चेहेरे दिसतात.

काही वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनी संस्थेत एका शिबीरात सहभागी झाले होते.त्यांच्या कॅन्टीनमध्ये गेले असता, तिथे मनाला भिडणारा एक श्लोक-संदेश भिंतीवर लावला होता :

वदनी कवळ घेता,नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते,आपुल्या बांधवांचे

कृषिवल कृषी करुनि,अन्न ते निर्मितात

कृषिवल कृषी कर्मी,राबती दिन – रात

स्मरण करून त्यांचे,अन्न सेवा खुशाल

उदर भरण आहे,चित्त होण्या विशाल.

जुनं-नवं, आमची पिढी-तुमची पिढी,यापलीकडे जाऊन,विविध मतभेद टाळून,निदान अन्न-ऋण-स्मरण या विषयावर एकमत व्हायलाच हवे, नाही का?

लेखिका :श्रीमती योगिनी श्रीनिवास पाळंदे

पुणे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हार्मोन्स…” – लेखिका: श्रीमती सुमन संतोष पाटणकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “हार्मोन्स…” – लेखिका: श्रीमती सुमन संतोष पाटणकर ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

दुपारच्या निवांतक्षणी  फोन वाजला. ख्यालीखुशालीची जुजबी चौकशी झाल्यावर आईने सांगितले, “अगं, नुकतंच ‘गुरुचरित्राचे कथाप्रवचन’ ऐकण्याचा योग आला. त्यातील सगळ्याच कथा अद्भभूत !  ऐकताना तुझी आठवण झाली, म्हणून फोन केला.”

आईकडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून मी खुश ! आई सांगत होती, “समोरच्या ‘श्रावणधारा’ हाऊसिंग सोसायटीत हा प्रवचन सोहळा संपन्न झाला. रोज होणाऱ्या कथांतून गुरूभक्ती – श्रद्धा यांचे दाखले देत कीर्तनकार श्री. विवेकबुवा गोखले ( नृसिंहवाडी – जि. कोल्हापूर ) अवीट प्रवचन करीत होते. त्यांनी सांगितलेली घटना…..

श्री. गोखलेबुवांचे एक मित्र, उभयतः पती-पत्नी वेंगुर्ल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉ. सौ.कडे आलेली ही केस…..

साधारण चाळीशीच्या घरात वय असणारी एक अपटूडेट स्त्री त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली. तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्त्रीला पुरूषांप्रमाणे दाढी – मिशा येत होत्या… दाट दाढी आणि मिशा…

ही महिला उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी ! कंपनीत तिच्या हाताखाली अनेक सुशिक्षित ,तज्ज्ञ स्टाफ !  माहेरही तसेच Well – Educated ! दहा लाख रुपये पगार घेणारी ही स्त्री ह्या विचित्र प्रकाराने गोंधळली. अनेक डॉक्टर्स केले, परदेशात जाऊन विविध प्रकारच्या टेस्ट केल्या, निदान अनुत्तरित.उपाय दिशाहीन.

पुरूषांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या दाढीमिशीसारखी ही दाढीमिशी. रोज शेव्हिंग करून ह्या महिलेला ऑफिसला जावे लागे. कोणीतरी तिला वेंगुर्ल्याच्या ह्या डॉक्टरांची माहिती दिली,आणि त्या वेंगुर्ल्याला आल्या. ह्या उच्चपदस्थ ,स्त्रीची अनोखी समस्या डॉ. सौ. नी लक्षपूर्वक ऐकली. तिला विश्वासात घेत तिची केसहिस्टरी जाणून घेतली. तिचं शिक्षण, बालपण, ध्येय, तिचा स्वभाव, आवडनिवड सारं बारकाईने जाणून घेतलं. नाडीपरीक्षा केली आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितले.

सांगितलेल्या वेळी ती महिला अधिकारी हजर झाली. यावेळी डॉ. सौ. तिच्याशी मनमोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, “हे पहा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मी सखोल अभ्यास केला. त्यावरून मला जाणवलं, ते असं की, तुम्ही उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या, अनेक अधिकारी व्यक्तींची बॉस ही तुमची प्रतिमा ! कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करताना कंपनीचा उत्कर्ष व्हावा, ह्या भूमिकेतून तुम्हाला सदैव ठाम रहावं लागत असणार ! कठोर निर्णय शिस्त आणि जोखमीने अंमलात आणावे लागत असतील. तो ताणतणाव, बॉसचा ऍटिट्युड हे सारं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय, इतका तो बाणा तुमच्या नसानसात भिनलाय.

खरंतर एखादी जोखीम अंगावर घेणं, हे पुरुषी स्वभावाचे लक्षण आहे. स्त्री ही प्रकृती आणि पुरुष निवृत्तीदर्शक आहे. लज्जा, सौजन्य, मार्दव हे स्त्रीचे अंगभूत गुणधर्म तुमच्या नोकरीमुळे तुम्ही नकळतपणे दडपले आणि ऑफिसरूटिनचे पुरुषी गुणधर्म इतके रोमरोमी भिनवले; की 20 -22 वर्षांच्या नोकरीत वावरताना या स्वभावाने तुमचे हार्मोन्स बदलले! ‘स्त्रीत्व’ संपून ते ‘पुरुषी’ बनू लागले.त्याचं मूर्तरुप म्हणजे चेहऱ्यावरील दाढीमिशा !

बाई दचकल्या. हे निदान अनपेक्षित होतं. तरीही वास्तव होतं. डॉक्टर मॅडम बोलत होत्या, “यावर उपाय आहे, तुमचा ऍटिट्युड बदला. कपाळावर लाल रंगाची टिकली लावा, हातात एकेक तरी बांगडी घाला. एकपदरी का असेना,पण गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घाला, त्यात चार मणी, दोन वाट्या काळ्या मण्यासह दिसून येऊ देत. पायात जोडवी घाला ! ‘स्त्री’ सारख्या दिसा ! केस मोकळे ठेेवू नका. आपल्याला जाणवत नाही, पण वाईट शक्ती मोकळ्या केेसांकडे चटकन् आकर्षित होतात. इतके करून पहा अन् ही गोळ्या औषधे घ्या. दीड महिन्याच्या अखेरीस दाखवून जा.”

बाई स्तंभित ! डॉक्टरनी सुचवलेले उपाय अनुसरले आणि दीड महिन्यात फरक जाणवला. दाढी वाढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. दर दोन दिवसांनी करावी लागणारी शेव्हिंग आता आठवड्याने होत होती, तीही विरळ.

डॉक्टर मॅडमनी हीच वर्तणूक सदैव ठेवण्याचा सल्ला दिला. स्त्रीचे सौभाग्य अलंकार फक्त शोभेसाठी नाहीत, तर स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी आहेत, हे पटवून दिले. तीन चार महिन्यांत ह्या पेशंट पूर्णपणे रिकव्हर, नॉर्मल झाल्या !”

आई थांबली, म्हणाली, ” घटना ऐकताना मला तुझी आठवण आली.” तिने तिच्या नातींना आवर्जून ही घटना ऐकवली.

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या लेबलखाली आपली संस्कृती कुठे गहाण टाकतोय आपण ? मग उद्भवतात, नको ते आजार, मानसिक त्रास. आणि दवाखान्याची वारी…..

सत्संगाचं महात्म्य सांगणाऱ्या आईला धन्यवाद देत मी फोन ठेवला.

लेखिका :श्रीमती सुमन संतोष पाटणकर

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

सुख बघण्याची दृष्टी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

एका स्त्रीची एक सवय होती. ती रोज झोपण्याअगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहीत असे. एका रात्री तिने लिहिले….

मी फार सुखी समाधानी आहे.

माझा नवरा रात्रभर फार मोठयाने घोरतो. ही ईश्वराची कृपा आहे. कारण त्याला गाढ म्हणजेच सुखाची झोप लागते.

मी फार सुखी समाधानी आहे. माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर डास झोपून देत नाहीत. म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही. ही ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे. दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी वगैरेची बिले भरताना दमछाक होते खरी. म्हणजेच सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरात आहेत. जर ह्या वस्तू माझ्याकडे नसत्या तर तर हे जगणे किती अवघड झाले असतं! ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

दिवस संपेपर्यत माझे थकून फार हाल होतात. पण माझ्याकडे दिवसभर कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे. आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसे आहेत. हीच माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

रोज मला घरातील केर कचरा काढून घर स्वच्छ करावे लागते. आणि दरवाजा खिडक्या स्वच्छ कराव्या लागतात. खरंच देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे. ज्याच्याकडे घर, छत नाही, त्याचे काय हाल होत असतील?

मी फार सुखी समाधानी आहे.

कधीतरी लहान मोठा आजार होतो. पण लगेच बरी होते. माझे आरोग्य चांगले आहे, ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

प्रत्येक सणाला भेटी देताना माझी पर्स रिकामी होते. म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत – माझे नातेवाईक, मित्र, ज्यांना मी भेटी देऊ शकते. जर हे लोक नसते, तर जीवन किती वैराण झाले असते. ही ईश्वराची कृपा आहे.

मी फार सुखी समाधानी आहे.

रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते. म्हणजे मला रोज नवी सकाळ बघायला मिळते. ही ईश्वराचीच कृपा आहे.

जगण्याच्या या फॉर्मुल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे, छोटया व मोठया दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्यावा, आनंद शोधावा. अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानते.

ब्रह्मांडात जी ऊर्जा ठासून भरलेली आहे (Cosmic energy), तिचा एक नियम आहे की आपण आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात, आपल्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील.

सुख शोधून सापडत नसते. त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते.

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘भाकरी कधी कुणी विकतं का?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘भाकरी कधी कुणी विकतं का?’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

संध्याकाळची वेळ होती,

मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोडने जात होतो.

हिंगण्याच्या स्टॉपच्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली.इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पालाकडे गेली

(पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी).

तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती.

नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता.

त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्याबरोबर खेळण्यात दंग होता.

वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती.

 

माझा मित्र, जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता, अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजरीच्या भाकरीकडे बघत होता. त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता.

 

माझ्या मित्राने कधीतरी लहानपणी आपल्या खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता.

त्यानंतर मात्र त्याला परत तशी भाकरी खायला मिळाली नव्हती.

अचानक तो मित्र म्हणाला,

‘अरे संजू, आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का?’

 

मी त्याला म्हटलं, ‘अरे, काहीतरीच काय वेड्यासारखं बोलतोयस ! तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला?’

 

क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला, ‘चल उतर खाली.’

मीही त्याच्या मागोमाग उतरलो.

 

झोपडीसमोर उभं राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला.

क्षणभर तो गोंधळून गेला.

पण लगेच म्हणाला,

‘साहेब, काही काम होतं का?’

सरळ विषयाला हात घालत माझा मित्र म्हणाला, ‘मला तुमच्या या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत. तुम्ही मला त्या विकत द्याल का?’

 

ती दोघं नवरा-बायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे बघतच राहिली.

काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना, ‘काय साहेब गरीबांची चेष्टा करता?’

एवढंच तो म्हणाला.

‘अरे बाबा, मी सिरियसलीच बोलतोय. अशा भाकरी आमच्या घरात कुणाला बनविता येत नाहीत व घरात चूलही नाही.लहानपणी एकदा मी अशी भाकरी खाल्ली होती व आता यांना भाकरी करताना बघून मला त्या चवीची आठवण झाली.’

 

आता त्या नवरा-बायकोला पटलं की, खरंच यांना भाकरी हव्या आहेत.

बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला,

‘बसा दोघे या बाजेवर.

(बोलताना समजलं की, गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुर-ंढोरं, पडीक शेत म्हातारा-म्हातारीवर सोपवून रोजी-रोटीसाठी शहरात आले होते.)

 

आमचं बोलणं चालू असतानाच तो बायकोला म्हणाला, ‘सुंदे! साहेबांना दे त्या चार भाकरी.’

 

वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला.

तिने छानपैकी त्याच्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवड ठेवली. वर अजून तव्यातील चौथी गरमागरम भाकरीही त्याच्यावर ठेवली.

मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिलं.

 

मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता.

 

त्याने आभार मानत खिशात हात घातला व पाचशेची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली.

 

‘आवो सायेब, हे काय करता? भाकरी कधी कोण इकतं का?’

 

बायकोही त्याला दुजोरा देत म्हणाली, ‘सायेब भाकरीच पैसं  घेतलं तर नरकात बी जागा मिळणार नाय आमाला.’

 

आम्ही दोघं त्यांचं बोलणं ऐकून दिग्मूढ झालो. मित्रालाही काय करावं सुचेना.अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला व घरी मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भली मोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्यांच्या  हातात देत म्हणाला, ‘तुमच्या भाकरीची बरोबरी या खाऊशी होणार नाही. पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा हे.’

 

मी गाडी स्टार्ट केली,

मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता.

एक अख्खी भाकरी हडप करून राहिलेल्या भाकरी पुन्हा कागदात बांधत म्हणाला,’आता या राहिलेल्या उद्या खाणार.’

 

गाडी चालवताना एकच विचार मनात रुंजी घालत होता, ‘गरिबीतही किती औदार्य असतं या लोकांमध्ये! भाकरी ही विकायची वस्तू नाही’, हे तत्वज्ञान त्यांना कुठल्या शाळा-कॉलेजात जाऊन शिकावं लागलं नाही.

आणि हो! अख्ख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा पोशिंदा तुमच्या चार भाकरीचे पैसे घेईल का?

 

दुसरीकडे आपण बघतो एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो, तेव्हा जर एखाद्या छोट्या बाळासाठी अर्धी वाटी दूध मागविले, तरी त्याचं दहापट बिल लावलं जातं.

 

माझं शेजारी लक्ष गेलं,

मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता.

ब्रम्हानंदी टाळी लागली होती त्याची.

त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर समजले,

‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’

 

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्यात रिटेक नाही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ आयुष्यात रिटेक नाही… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं, तरी

ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना?

पण विरहाचं रुपांतर वियोगातच झालं तर?

नाती, माणसं असतात, तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण!

जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्याची किंमत.

पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि… आणि

आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असते….

म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी राहील उभा!

सकाळी उठताना कंटाळा येतो? मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य? कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो. मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल. आळसाला रामराम ठोकावासा वाटेल.

नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारांची रांग…

स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं…

अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं, ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत… त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असून नाकारणारी, कंटाळणारी आपणच कपाळकरंटी…

भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.

सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की, अस्वस्थ व्हायला होतं.

एकत्र कुटुंबाला भाऊबंदकीची कीड लागते, तेव्हा वाईट वाटतं.

आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही?

अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात.

आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं.

सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.

जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावंसं वाटतं.

श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.

अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर ?

शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी, वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ?

खररंच आयुष्य किती सुंदर होईल!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेरपण… – कवी :सौ. वैष्णवी कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ माहेरपण… – कवी :सौ. वैष्णवी कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

स्वर्गाची तुमच्या महती

आम्हाला नका सांगू देवा,

भोगून पहा माहेरपण

नक्कीच कराल आमचा हेवा.

 

मनसोक्त काढलेली झोप आणि

तिच्या हातचा गरम चहा,

सुख म्हणजे काय असतं हो ?

देवा एकदा अनुभवून पहा.

 

नेलेल्या एका बॅगेच्या

परतताना चार होतात,

तिच्या हातचे अनेक जिन्नस

अलगद त्यात स्वार होतात.

 

नेऊन पहा तिच्या हातच्या

पापड-लोणचे, मुरांबे-चटण्या,

सगळे मिळून स्वर्गात

कराल त्यांच्या वाटण्या.

 

शाल तिच्या मायेची

एकदा पहा पांघरून,

अप्रूप आपल्याच निर्मितीचं

पाहून जाल गांगरून.

 

लाख सांगा देवा हा

तुमच्या मायेचा खेळ,

तिच्या मायेच्या ओलाव्याचा

बघा लागतो का मेळ ?

 

फिरू द्या, तिचा कापरा हात

एकदा तुमच्या पाठीवरून,

मायापती देवा तुम्ही !

तुम्हीही जाल गहिवरून.

 

आई नावाचं हे रसायन

कसं काय तयार केलंत ?

लेकरासाठीच जणू जगते

सगळे आघात झेलत.

 

भोगून पहा देवा एकदा

माहेरपणाचा थाटमाट,

पैज लावून सांगते

विसराल वैकुंठाची वाट.

 

माहेरपण हा केवळ

शब्द नाही पोकळ,

अनुभूतीच्या प्रांतातलं

ते कल्पतरूचं फळ.

 

डोळ्यात प्राण आणून

वाट बघणारी आई,

लेकीसाठी ह्या शिवाय

दुसरा कोणताच स्वर्ग नाही.

 

कवयित्री :सौ. वैष्णवी कुलकर्णी

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “की जरा बरं वाटतं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “की जरा बरं वाटतं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

जाताना बरोबर काही नेणार नाही!

हे जरी सत्य असलं तरी…

खात्यावर बऱ्यापैकी शिल्लक असली की जरा बरं वाटतं!

 

वाटेत कुणी दीनदुबळा, असहाय दिसला की… चार नाणी खिशात असली की ती त्याच्या हातावर टेकवताना जरा बरं वाटतं!

 

हॉटेलिंगची हौस फिटली असली तरी….

मित्र भेटला तर त्याच्याबरोबर गप्पा मारायला हॉटेलात बसण्याइतपत चार पैसे केव्हाही जवळ असले की जरा बरं वाटतं!

 

कपडालत्ता, दागदागिने नकोसे वाटू लागले तरी… मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मनाजोगा खर्च करण्याइतकी ऐपत असली की जरा बरं वाटतं!

 

बरोबर काही न्यायचं नसलं तरी….

शेवटपर्यंत हातात चार पैसे खुळखुळत असले की, जरा बरं वाटतं!

 

“साठी पार केलीत? अजिबात वाटत नाही!” असं कुणी म्हटलं की जरा बरं वाटतं!

 

मित्रांसोबत रात्रभर पार्टी केली तरी…

घरी कुणी तरी आपली वाट पाहतंय हे जाणवलं की, जरा बरं वाटतं!

 

जाताना बरोबर काहीच जाणार नाही, हे माहीत असलं तरी…

आहे तोपर्यंत जे जे शक्य, ते उपभोगून घेतलं की, जरा बरं वाटतं!

 

पुढे दवा, डॉक्टर काय वाढून ठेवलंय माहीत नाही, तरी…

दोन चार एफडी, एखादी पॉलिसी असली की, जरा बरं वाटतं!

 

साठीनंतरही आपण मुलाबाळांना भार नाही, माझं मला पुरेसं आहे, असं म्हणण्याइतपत पुंजी गाठीशी असली की, जरा बरं वाटतं!

 

मी मेल्यावर मला काय करायचंय असं म्हटलं तरी…

जाताना दुसऱ्यासाठी काही शिल्लक ठेवून गेलं की, जाताना जरा बरं वाटतं!

 

गरजेपुरता संचय कर हे तत्त्वज्ञान ऐकायला बरं वाटलं तरी…

भविष्यात कशाकशाची गरज पडेल, हे सांगता येत नाही!

म्हणून…..

सगळं काही इथंच रहाणार,

जाताना काही आपल्याबरोबर नेता येणार नाही, हे जरी खरं असलं तरी…

अंगात ऊब आहे तोपर्यंत खिशालाही ऊब असली की,

जरा बरं वाटतं! जरा बरं वाटतं!

 

लेखक:अज्ञात

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares