मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ गदिमांचा एक किस्सा … – लेखक : श्री सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू) ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

गदिमा ग्वाल्हेरला विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मुक्काम प्रसिद्ध कायदेपंडित प्रिं. करकरे यांच्या बंगल्यावर होता. ग्वाल्हेरच्या साहित्यसंस्थेचे ते अध्यक्षही होते. तिथल्या मुक्कामात बोलता बोलता वकिलांनी गीतरामायणासंबंधी चौकशी केली.

वकील म्हणाले, “अण्णासाहेब, इतरही काही गायक आता गीतरामायणाचे कार्यक्रम करायला लागले आहेत.ते रॉयल्टी वगैरे देतात?”

गदिमांनी वस्तुस्थिती सांगितली.

करकऱ्यांनी एक कोरा कागद त्यांच्या पुढे सरकवला व ते म्हणाले, ”यावर सही करून द्या.”

गदिमांनी विचारले, “कशासाठी ?”

“ मला वकीलपत्र दिलंय म्हणून. मी तुमचे गीतरामायणाच्या रॉयल्टीचे पैसे वसूल करून देतो. वकील फी घेणार नाही.”

क्षणात कागद परत करीत गदिमा म्हणाले,

“मग गीतरामायण लिहिलं, याला काहीच अर्थ उरणार नाही. वकीलसाहेब, अहो, रामनामाने दगड तरले, मग काही गायकमित्र तरले म्हणून काय बिघडलं? “

करकरे नुसते गदिमांकडे बघतच राहिले.कौतुक, आदर, भक्तिभाव, प्रेम अशा अनेक संमिश्र छटा त्यांच्या नजरेत तरळत होत्या. किती हा मनाचा मोठेपणा!गीतरामायणाच्या शेवटच्या ओळीत गदिमा म्हणतात-

‘नच स्वीकारा धना कांचना

नको दान रे, नको दक्षिणा

काय धनाचे मूल्य मुनिजना

अवघ्या आशा श्रीरामार्पण’

*

प्रभू रामाच्या चरणी गदिमांची सेवा रुजू झाली आहे.

‘अवघ्या आशा श्रीरामार्पण!’

*****

लेखक : श्री.सौमित्र श्रीधर माडगूळकर (गदिमांचे नातू).    

संग्राहक  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? वाचताना वेचलेले ?

☆ तुजी यत्ता कंची? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

शनाया आईला विचारत होती, ‘आई तू किती शिकली आहेस गं?’

आज या प्रश्नाने आई किंचित गडबडली, मग मंद हसली. ‘

आज हे काय नवीन नवीन माझ्या शानूचं?’ 

‘अगं, आज शाळेत झिरो पिरेड (शून्य प्रहर) होता. त्यात मुलांनी आपल्या पालकांविषयी सांगायचे होते. कुणी म्हणालं, माझे बाबा डॉक्टर आहेत. कुणी म्हणालं, माझी आई सी ए आहे. कुणाचे आई बाबा दोघंही नावाजलेले वकील आहेत. असं काय काय सांगत होते. माझी वेळ आली तेंव्हा मला जसं सुचलं तसं मी बोलत गेले. माझी आई खूप खूप शिकली आहे. ती डॉक्टर आहे. मला जेंव्हा ताप येतो तेंव्हा ती माझ्या कपाळावर मिठाच्या पाण्याचा घड्या ठेवते. माझ्या पोटात दुखतं तेंव्हा ती मला ओवा मीठ देते. ती गायिका आहे, कारण माझ्याबरोबर ती गाण्याच्या भेंड्या त्याही सुरात लावते. आणि मला झोप येत नाही तेंव्हा ती देवा तुझे किती सुंदर आकाश म्हणते. ती उत्तम वकील आहे कारण माझ्यासाठी एखादी गोष्टं, एखादा क्लास किंवा एखादी वस्तू आवश्यक आहे असं तिला कळतं तेंव्हा माझ्या बाबाकडे माझी बाजू मांडून मला ती वस्तू आणून देते. मला कधी कधी क्षुल्लक भांडणाने इतर मुली खेळायला घेत नाहीत तेंव्हा माझी बाजू ती माझ्या वतीने पटवून देते आणि समेट करुन देते. ती उत्तम ज्योतिष जाणते कारण माझ्या मनात काय चाललंय ते तिला बरोबर कळते. माझ्यासाठी भविष्यात काय उत्तम आहे ते ती जाणते. ती उत्तम शेफ आहे, कारण बाहेरचं खाऊन माझं आरोग्य बिघडेल म्हणून उत्तमोत्तम पदार्थ ती मला घरीच बनवून देते. ती उत्तम ब्युटीशीयन आहे कारण माझ्या गँदरिंगसाठी ती मला घरीच तयार करते. ती उत्तम शिक्षिका आहे कारण मला कठीण वाटणारी गणितं ती मला पूर्ण समजेपर्यंत शिकवत रहाते. ती उत्तम टेलर आहे कारण माझ्या वाढदिवसासाठी उत्तम प्रतीचा ड्रेस ती घरीच मशीनवर शिवून देते. ती उत्तम मॅनेजर आहे कारण एकाचवेळी अनेक गोष्टी ती लीलया मॅनेज करते आणि शेवटी ती एक उत्तम मैत्रीण आहे आणि तिची आणि माझी मैत्री पार अवीट आहे. आई, तुला सांगू, सर्व मुलं आणि बाई तन्मयतेने ऐकत होती आणि माझं बोलणं झाल्यावर तास संपायची बेल होईपर्यंत बाई आणि मुलं टाळ्या वाजवत होती. मला खूप रडू आलं.’

आई ऐकत राहिली. आपली शानू एवढी मोठी झालीये. तिने शनायाला जवळ घेऊन कुरवाळलं. 

‘आई, बाई पण मला असंच कुरवाळत होत्या प्रेमाने! म्हणत होत्या, हिची आई खूप भाग्यवान आहे.’

— आईला गहिवरून आलं. तिने देवाला दिवा लावला आणि तूप, गूळ, खोबऱ्याचा प्रसाद ठेवला. देव बोलला असता तर म्हणाला असता, ‘यांची इयत्ता जगातल्या कुठल्याच शाळेत नं धरणारी आहे. ही साक्षात माझी म्हणजे देवाची यत्ता आहे!’

लेखक – अज्ञात

प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राम राम माझ्या लाडक्या भाच्च्यांनो ! – ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? वाचताना वेचलेले ?

☆ राम राम माझ्या लाडक्या भाच्च्यांनो ! – ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

धर्माची आवश्यकता समाजाला का असते, हे सांगणारी घटना तुम्हा भावंडांना, तुमच्या मित्रांना योग्य वयात अनुभवायला मिळाली. 

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे आपल्या पूर्वजांनी चांगलं जाणलं. आणि त्या उत्सवाला धांगडधिंग्याचं स्वरूप न येऊ देता कलागुणांच्या, सद्गुणांच्या उत्कर्षाचं स्वरूप यावं यासाठी पायंडे घालून दिले. नियम केले. श्रद्धेची चौकट घालून दिली. 

तुम्ही आत्ता पाहिलंच असेल.. पुण्याहून १५००+ किमीवर आणि बेंगळुरूहून १९०० किमीवर असलेल्या श्रीराममंदिराच्या निमित्ताने तुमच्या सोसायटीत कितीतरी कार्यक्रम झाले. इतके लोक एकत्र आले. कुठेही खाण्यापिण्यावर भर नव्हता. पिण्याचा तर प्रश्नच नव्हता. खाण्यासाठी कुणीही कुठेही एखादा प्राणी, पक्षी, अगदी त्याचं अंडंसुद्धा मारलं नाही. नेहमीच्या कार्यक्रमांमधे येणाऱ्यांना खूश करणे हा एक मुख्य हेतू असतो. इथे तसं काही नव्हतं. जो तो त्याला करावंसं वाटतंय, म्हणून सहभागी होत होता. त्याचे काहीही लाड होणार नाहीत, हे पक्कं माहित असूनसुद्धा. विचार करून पहा आपल्या मनाशी.. आत्तापर्यंत झालेले कार्यक्रम आणि हा कार्यक्रम यात काय काय फरक होता ते. 

कितीतरी जणांनी आपल्यातल्या कला जोपासल्या. सुंदर रांगोळ्या, दीपोत्सव, काव्य, गायन, वादन, नृत्य, जी जी म्हणून कला श्रीरामचरणी अर्पण करता येईल ती जे कलाकार आहेत त्यांनी केली. कल्पकता वाढीला लागली. आणि प्रत्येकाने ती “इदं न मम (हे माझं नाही), श्रीरामाय स्वाहा (श्रीरामाला अर्पण)” अशा भावनेनं सादर केली. किती लाईक्स, किती कौतुक हे विषय मागे पडले. करण्यातला आनंदच सुखावणारा ठरला. जाणवलं का तुम्हाला ते? 

जे कलांचा आस्वाद घेत होते तेही अती चिकित्सकपणा, कुचकटपणा करत नव्हते.. सगळ्यांना सगळ्यांचं कौतुक.. ही किती गोड गोष्ट होती ना?

याचं कारण म्हणजे या सगळ्याच्या केंद्रस्थानी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम होता. त्याच्या चरित्रातच एवढी प्रेरणा आहे की ७००० वर्षांनीही लोकांना चांगलं जगण्याची तो प्रेरणा देतोय. म्हणूनच तो जरी हाडामांसाचा एक माणूस असला तरी एक राजा म्हणून विष्णूचा अवतार मानला गेला, आणि देवत्व पावला. इतका चांगला माणूस म्हणजे देवाचाच अवतार, अशी लोकांची भावना आजही आहे. मुळातच हिंदू धर्म प्रत्येक सजीव गोष्टीत, ज्यांच्यात चैतन्य (energy) आहे त्या सर्वांमध्ये असलेलं ते चैतन्य म्हणजे दैवी (divine) शक्ती मानतो. जे चांगले असतात, त्यांच्यात ती शक्ती अधिक. म्हणून आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक चांगले होण्यावर हिंदू धर्माचा भर आहे. आपल्यातला सर्वोत्तम कोण? तर हा मर्यादापुरुषोत्तम श्रीराम ! 

या उत्सवाआधी कित्येक जणांना ही काळजी होती की उत्साह उन्माद व्हायला नको.. हिंदूंनी अल्पसंख्यांकांना त्रास द्यायला नको. मी तरी अशा काही घटना ऐकल्या नाहीत. कारण उत्सव साजरा करणाऱ्या हिंदूंना त्रास द्यायला कुणी आलंही नाही. ही देखील एक खूप मोठी जमेची बाजू. यात जास्त सांगत बसत नाही कारण आता पुढच्या २-५ वर्षात तुम्ही सुजाण नागरिक बनाल, मतदान करायला पात्र ठराल. हा अभ्यास तुमचा तुम्ही केलेला बरा. तुम्हाला पडणारे प्रश्न बऱ्याच लोकांना विचारा. आणि तुमची मतं तुम्ही ठरवा. 

पण सर्वधर्मसमभाव हा हिंदूंचा सहजगुण आहे. या जगाला चालवणारी काही एक शक्ती आहे, आणि ती शक्ती वेगवेगळ्या रूपात प्रकट होऊ शकते. ज्याची त्याची त्या शक्तीच्या रूपाची कल्पना वेगळी असू शकते. अट एकच, त्या श्रद्धेनं माणूस सज्जन बनला पाहिजे. सुदृढ बनला पाहिजे. तसं असेल तर त्या माणसाच्या श्रद्धेचा आपण सन्मानच केला पाहिजे, हे हिंदूंच्या नसानसात आहे. तुमच्या आधीच्या पिढ्यांमध्येही हे आहे, आणि तुमच्यातही आहे. उद्या जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही हेच सांगाल. हीच आपली संस्कृती.

हे नेहमी लक्षात ठेवा.. आपण सज्जन तर असलेच पाहिजे. पण समर्थही असलं पाहिजे. त्यासाठीचा आदर्श म्हणजे प्रभू श्रीराम ! त्याचं चरित्र नक्की अभ्यासा !

पटलं तर तुमच्या मुलांना नक्की वाचायला द्या नाहीतर सोडून द्या

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कोटी मोलाची कथा – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

लग्नात आहेर म्हणून आलेली भेटपाकिटं उघडतांना एका पाकिटात फक्त एक कागद अन् एक रुपयाचा ठोकळा हातात लागल्यानं त्यांची उत्सुकता वाढली. कागदाची घडी उघडली अन् त्यात खरडलेल्या पाच सहा ओळींचा मजकूर वाचताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यात लिहील होत, ” माफ करा. मी तुमच्या नात्यातला काय, ओळखीचा सुद्धा नाही. वृद्ध आई-वडीलांनी माझ्याबाबत पाहिलेली स्वप्ने फुलवण्यासाठी ग्रामीण भागातून नोकरीच्या शोधात आलेला एक उच्चशिक्षित बेरोजगार तरूण आहे मी. कडकडून भूक लागली होती. जवळ पैसेही नव्हते. येथून जातांना हे लग्न दिसलं. तसाच आत शिरलो नि भूक शमवली. या रुपयाचं हल्लीच्या काळात काहीच मोल नाही, हे पुरेपूर जाणून आहे मी. तरीही खाल्लेल्या अन्नाबद्दलची कृतज्ञता, म्हणून यात हा रुपया टाकला आहे.” 

— या एकाच गोष्टीला किती पैलू आहेत !

भूक पापी आहे.

परिस्थिती नाइलाजाची आहे.

हातून अपकृत्य घडलं आहे.

त्याची मनाला खंत आहे.

कांटा बोचरा आहे.

पश्चात्तापाची भावना आहे.

पापक्षालनाची इच्छा आहे.

पण तेव्हढीही ताकद खिशात नाहीये.

रुपयाला अर्थ नाही याची जाण आहे.

पाकिटातल्या रुपयाला नुकसानभरपाई म्हणावं की आहेर म्हणावं? समजत नाही !

या साऱ्या प्रकाराला एकच गोष्ट जबाबदार आहे – पापी भूक.

ती सुद्धा रोज रोज लागते.

उपाशी माणसाने अन्नाची चोरी करावी कां – हा प्रश्नच अमानुष आहे.

“पापी पेटका सवाल है भाई”

पण माणूस नेक आहे.

त्याच्यापाशी देण्यासारखं असलेलं सर्वस्व –

एक रुपया – देऊन त्यानं  लाखमोलाचं पुण्य जोडलं आहे.

म्हणूनच ही कथा कोटीमोलाची आहे !

मित्रांनो, काळजी घ्या…. कृपया अन्न वाया घालू नका. भूक भागवण्यासाठी अन्नाची खूप गरज आहे.

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ II सखीII… अशी ही – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ II सखीII… अशी ही – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले

अवखळ मुलीची एकदम बाई झाले

*

नको वाटायचे तिचे येणे

सगळ्यात असून दूर बसणे

*

सण नाही वार नाही

तिचे येणे ठरलेले

अन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले

*

बरोबर महिन्याने यायची,

येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायची

इतकी सवय झाली तिची 

की नाही आली वेळेवर तर मी चिडायची

*

सगळे तिचे नखरे सहन केले

तिने नाचवले तशी नाचले

*

तिनेच एकदा न येऊन सांगितले गुपित

आई होशील आता गर्भ रुजलाय कुशीत

*

तेवढाच काय तो दुरावा बारा महिन्यांचा

पण नंतर आलीच परत भाग होऊन आयुष्याचा

*

इतकी वर्षे चाललेय तिच्या सोबत

कधी कंटाळा दाखवला नाही

आता मात्र काय झालेय तिचे

मनातलं काही सांगत नाही

*

नसलं मनात तर येत नाही दोन दोन महिने

मी मात्र सैरभैर तिच्या न येण्याने

*

कशासाठी ही चिडचिड कोणालाच कळत नाही

कशासाठी ही कासावीशी माझे मला वळत नाही

*

कधीमधी येत राहून ती मला चिडवणार

तिच्याच मनासारखे वागून ती मला ताटकळवणार

*

ती यायला लागली तेव्हा सोहळा केला होता आईने

तिच्या जाण्याची हुरहुर मात्र सोसतेय मी एकटीने

*

एक वेळ अशी येईल तिचे येणे बंद होईल

एक कप्पा आयुष्यातला कायमचा दूर होईल

*

होईन मी मुक्त बांधिलकीतून म्हणून वाजवावीशी वाटतेय टाळी

तुमचीही परिस्थिती नाही माझ्यापेक्षा वेगळी

*

वाचताना गालात हसाल

ही तर माझीच कहाणी म्हणाल 

*

येते मनाने जाते मनाने ही

बंधन कसले पाठवत नाही

*

येताना तारुण्यपण देते

जाताना म्हातारपणाची चाहूल देते 

*

अशी ही एकमेव मैत्रीण खाशी,

जरी असल्या आपल्या बारा राशी !!

कवी : अज्ञात. 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – एक करायला गेलं तर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – एक करायला गेलं तर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

एक करायला गेलं तर,

एक राहूनच जातं.

 

सकाळी फिरायला गेलं तर,

साखरझोपेचं सुख राहून जातं .

 

शांततेने पेपर वाचू लागलो तर,

पूजा, प्राणायाम राहून जातो . 

 

दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर,

नाश्ताच राहून जातो .

 

धावपळ करत सगळं केले तर,

आनंद हरवतो .

 

डायट फूड मिळमिळीत लागतं,

चमचमीत खाल्लं तर वजन वाढतं .

 

एक करायला गेलं तर,

एक राहूनच जातं.

 

नोकरीसाठी कुटुंब सोडायचं नाही,

पण कुटुंबासाठी नोकरी हवी.

दोन्ही सोडायच्या कल्पनेने

भिती वाटायला लागते .

 

लोकांचा विचार करता करता,

मन दुखावतं,

मनासारखं वागायला गेलो तर,

लोक दुखावतात .

 

एक करायला गेलं की,

एक राहूनच जात

 

घाईगडबडीने निघालो तर,

सामान विसरते,

सावकाश गेलो तर,

उशीर होण्याची भीती वाटते.

 

सुखात असलो की,

दुःख संपतं, आणि

दुःखात असलो की,

सुख जवळ फिरकत नाही.

 

एक करायला गेलं की,

एक राहूनच जातं .

 

पण या काहीतरी राहून जाण्यातच,

खरा जीवनातील आनंद आहे.

काहीतरी मिळाल्याचे समाधान आहे.

 

कारण बाळ जन्मल्याबरोबर,

त्याच्या रडण्यात आनंद आहे,

आणि अचानक दुरावलेली व्यक्ती,

कित्येक वर्षांनी भेटल्यावर,

आनंदातही रडणे आहे.

 

कधी रडण्यातही आनंद मिळतो,

तर कधी आनंदातही रडता येतं.

 

ज्याला या कुठल्याच गोष्टीचे

काही विशेष वाटत नाही

तो माणूस नाही,

तर यंत्रच आहे.

 

म्हणून आनंदाने

भरभरून जगून घेऊ या .

 

आजचा दिवस आहे

तो आपला आहे .

कवी : अज्ञात

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ “गीती गाईन ज्ञानदेव…” कवयित्री – सुश्री लीना दामले ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ “गीती गाईन ज्ञानदेव…” कवयित्री – सुश्री लीना दामले ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आनंद सागरी विहरीन। मुक्त होईन भवचक्रातून।

निरंजन समाधी घेऊन।। सांगती ज्ञानदेव ।।१।।

*

अवघा जनसागर निघाला। संतांसवे आळंदीला।

निरोप द्याया ज्ञानराजाला। बुडाला दुःखार्णवे ।।२।।

*

नामदेव व्याकुळ झाले। दुःखाने जणू पिसे लागले।

कसा राहू ज्ञानदेवा विणे। सांग बापा ।।३।। 

*

ज्ञानदेव समजावीती। नामदेवा वृथा शोक करिसी।

जडदेहाची नको आसक्ती। शरीर हे नश्वर ।।४।।

*

जे जे जगी उपजते। ते ते नाश पावते।

हे तो तुजसी ठावेच असे। नामदेवा ।।५।।

*

कसे समजावू तुजसी। ज्ञानवंत भक्त म्हणविसी।

हा शोक ना शोभे तुजसी। नामदेवा ।।६।।

*

निवृत्ती अंतरबाह्य शांत। सोपाना लीन ब्रह्मस्वरूपात।

मुक्ताई शांत शांत। वियोगाच्या कल्पनेत ।।७।।

*

कार्तिक वद्य त्रयोदशी। शुभ दिन शुभ वेळी।

निघती ज्ञानदेव समाधीस्थळी । सिद्धेश्वरा पास ।।८।।

*

समाधी स्थळ स्वच्छ केले। गोमयाने सारविले।

अंथरीली बेल,तुळशी अन फुले। आसनाभोवती ।।९।।

*

इंद्रायणीत स्नान केले। सुवासिनींनी ओवाळीले।

चंदन उटी लावली नामदेवे। ज्ञानदेवांसी ।।१०।।

*

शांत संयत चाल। कंठी तुळशीची माळ।

चालले ज्ञानदेव। वैकुंठासी ।।११।।

*

सद्गुरू निवृत्तीनाथांसी वंदिले। शुभ आशिष घेतले।

नतमस्तक ज्ञानदेव। गुरू पुढती ।।१२।।

*

नामदेव, निवृत्तीनाथ। घेऊन चालिले ज्ञानदेवास।

बसविले आसनी विवरात। भरल्या कंठी ।।१३।।

*

नंदादीप चेतविले। रत्नदीप प्रकाशले।

अवघी समाधी उजळे। स्वर्गीय प्रकाशात ।।१४।।

*

पद्मासनी बसून। भावार्थ दीपिका समोर ठेवून।

मुखावरी दिव्य हास्य लेवून। घेतले नेत्र मिटून ।।१५।।

*

समाधिस्त ज्ञानेश्वर होती। थरथरत्या हाती जड शिळा बसवती।

नामदेव समाधीवरती। जड अंतःकरणे ।।१६।।

*

ज्ञानसूर्य बुडाला। घन अंधकार पसरला।

शोक अपार दाटला। वैष्णवांच्या मनी ।।१७।।

*

ज्ञानियांचा राजा गेला। नामदेव दुःखार्णवी बुडाला।

निवृत्तीनाथ समजावीती त्यांना। अपार स्नेहे ।।१८।।

*

कुठे न गेले ज्ञानदेव। इथेच आहे ज्ञानदेव।

चराचरी भरले ज्ञानदेव। संजीवन समाधी घेऊन ।।१९।।

*

सगुण समाधी घेऊन। अमर झाले ज्ञानदेव।

पूर्णानंदी राहे सदैव। सिद्धेश्वरा पास ।।२०। 

कवयित्री : सुश्री लीना दामले (खगोलीना)

प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुललेल्या अबोलीस पाहून… — कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

फुललेल्या अबोलीचे

लाख फुलांनी असे बोलणे !

 

शब्दावाचून अंगोअंगी

असे जरासे धुंद बहरणे !

 

हिरव्या हिरव्या पानांमधुनी

फिकट केशरी रंग सांडणे !

 

नको कोणते अजून अलंकार,

असेच जरासे नटणे अन् मुरडणे!

 

द्यावे वाटे हृदयीचे असे काही

जरी नसते तुझे काही मागणे !

 

होते पाहून तुजला कृतार्थ

आमचे इथले येणे !

 

कवी : श्री चंद्रशेखर देशपांडे

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘पहा देव कसे काम करतो…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही एव्हाना त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावणसरी बरसायला सुरुवात झालेली होती.

औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायी सुद्धा जात आले असते. पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे कांही बांधकाम सुरु होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करीत होता. 

मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं, “काय रे, खाली आहे कां तुझी रिक्षा?” तो “हो” म्हणाला. मग मी त्याला विचारलं मला नेशील कां सवारी म्हणून?”

तो हो म्हणाला तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं. मग माझ्या कडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, “काय रे बाबा, काय होतंय तुला? आणि तू रडतोयस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाहीये?”

ह्यावर तो उत्तरला, “सतत सुरु असलेल्या ह्या पावसाने मागील तीन दिवसांपासून भाडं मिळालेलं नाहीय, त्यामुळे रोजगार नाही, म्हणून पोटात तीन दिवसांपासून अन्नाचा कणही गेलेला नाहीय. आज तर अंगही दुखतंय. आताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे, आज तरी मला एखादी सवारी मिळू दे.” 

कांहीही न बोलता मी रिक्षा थांबवला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला ह्या रिक्षेवाल्याच्या मदतीला मुद्दामहून पाठविलं नसेल? कारण असं बघा की मला सुरु झालेला हा ऍलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरु झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधे आणवून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती, आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षेत सुद्धा कशाला बसलो असतो? 

मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, “देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षेवाल्याच्याच मदतीसाठी माझी योजना केली आहे ना?” मला मनातल्या मनातच उत्तर मिळालं, ‘हो.’ 

देवाचे आभार मानत मी माझ्या औषधांसोबतच त्या रिक्षेवाल्यासाठीही औषधं विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. 

ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षेवाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली, त्याच्या हाती रिक्षेचं भाडं म्हणून ३० रुपये ठेवले, गरम गरम छोले-पुरीचा पूड आणि त्याच्यासाठी घेतलेली औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, “हे बघ, छोले-पूरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या दोन गोळ्या घेऊन घे आणि उरलेल्या दोन गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे.”

रिक्षेवाल्याचा डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, “साहेबजी, देवाला तर मी केवळ दोन घास पोटांत पडू दे म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोले-पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले-पुरी खावी अशी इच्छा मनांत होती, आज देवाने माझी ती इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्ताची त्याने यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करवून घेतले अशी माझी समजूत आहे.” तो आणखी बरंच कांही बोलत होता, भरभरून. पण माझं त्याकडे लक्षच नव्हतं.

घरी आल्यानंतर माझ्या मनांत आलं, ‘त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते, रिक्षेवाल्यासाठी मी कांहीही घेऊ शकत होतो, सामोसे, भाजी किंवा जेवणाची थाळी, कांहीही. पण मी नेमकं छोले पुरीच कां घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला ते खरंच तसं आहेकां? देवानंच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल? माझं ऍसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं  आणि मी रिक्षा करणं ही, तो रिक्षेवाला म्हणतो त्या प्रमाणे दैवी योजना तर नसेल ना?’  

आपण जेव्हा योग्य वेळी कुणाच्या साहाय्यासाठी धावून जातो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यास उद्युक्त होतो त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा (देवाचा) प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेलं चांगलं कार्य हे देवाने आपल्याकडून करवून घेतलं असं समजावं म्हणजे सत्कृत्याचा वृथा अभिमान होत नाही.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? – लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का ?? 

याची कारणे : वयाच्या तिसऱ्या  टप्प्यातील मानसिक गोंधळ …… 

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:…

वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

— काही सुचवतात: “डोक्यात ट्यूमर”.  मी उत्तर देतो: नाही !

— इतर सूचित करतात: “अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे”.  मी पुन्हा उत्तर देतो नाही !

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:….   

– अनियंत्रित मधुमेह

 – मूत्रमार्गात संसर्ग;

 – निर्जलीकरण

हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही.  ५० वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात.  निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.  यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा– यासारख्या घटना घडतात. 

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण ५0% पेक्षा जास्त असते. तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय ५0 व्या वर्षी सुरू होते.  ५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो.  हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे.  जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं असं वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

निष्कर्ष:

५0 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही,  तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

५0 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांची कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः

१) द्रव्य पिण्याची सवय लावा.  पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे;  संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.  महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रवपदार्थ पिणे आवश्यक आहे.  हे लक्षात ठेवा !

२) कुटुंबातील सदस्यांना इशारा:::  पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा. .. जर आपल्या हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणे आहेत.

जर आपल्याला हे आवडले असेल तर ते सगळ्यांपर्यंत पसरविण्यास विसरू नका.  आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटूंबाला, त्यांच्यासह स्वत:साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे. पन्नाशीच्या पुढील लोकांसाठी हे शेअर करणे चांगले आहे !

लेखक : अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन.

(अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.) 

संग्राहिका  : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares