मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “स्मृतिगंध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्मृतिगंध…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

मला आठवतंय,

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपणसुद्धा !

भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची.

    

आता तसं नाही.

लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !

खूप महाग झालंय बालपण !

   

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती.

फुल टाईम ‘आईच’ असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय.

जॉबला जातेय हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते!

मित्रसुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं ‘बट्टी’ म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी !

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,

“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”

मैत्री बरीच महाग झालीय आता.

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते !सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती.

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं.

फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय.

ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !

  

एवढंच काय, तेव्हाचे

आमचे संसारसुद्धा किती स्वस्तात पार पडले.

शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात,पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार. ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची.

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं !

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय, मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं !

  

कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं.

पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

   

म्हणून म्हणतोय, आहोत तोवर आठवत रहायचं.

नाहीतरी ह्या स्मृतीगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ !

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मी २०१३ पासून एकटी राहते. म्हणजे वयाच्या ७६व्या वर्षांपासून. आज माझे वय ८७+ आहे. हे एकटे राहणे मी मनापासून निवडले आणि त्याचा मला कधीच पश्चात्ताप करावा लागला नाही. कारणानिमित्ताने मी मुलाकडे जाते पण तेथे राहत नाही २ दिवसाच्या वर. मला तेथे करमतच नाही. ना काम ना धाम. वाचन आणि टीवी ह्यात वेळ घालवायचा. शिवाय प्रत्येकाची खोली वेगवेगळी. ते मला झेपतच नाही.

आत्ताच काही दिवसापूर्वी तब्येतीच्या कारणाने दीड महिना मुलाकडे राहिले..तर ढगांचे आकार बघण्याचा छंद  लागला… खिडकीतून फक्त तेच दिसतात ना? त्यातही मजा असते बरे का.  मुलगा आणि सून बाई कायम आग्रह करतात की आता येथेच राहा. मुलगा म्हणतो “आई फक्त बरे नसले तरच येतेस”..  मी त्यांना म्हणते, “अजून माझे हातपाय चालू आहेत. ते थकले की तुमच्याकडेच तर यायचे आहे.”

दिवसा गुड मॉर्निंगचा संदेश आणि रात्री गुड नाईटचा संदेश नेमाने पाठवते. विशेष काही घडले की फोन करतो एकमेकांना. शिवाय आजकाल विडिओ कॉलचीही सोय असतेच. म्हणजे तसे आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. शिवाय माझ्या एक असे लक्षात आले आहे की मी समोर असले की दोघांना माझी जास्तच काळजी वाटायची. ते बाहेर जाताना हजार सूचना केल्या जायच्या. माझ्यात दोघे अडकून पडायचे. तेव्हाच ठरवले की आता घरी परतलेच पाहिजे. परंतु माझ्या अशा एकटे राहण्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. प्रथम प्रथम बरे – वाईट तर्क – कुतर्क  आपापल्या मगदूराप्रमाणे लोकांनी केले. पण आता बहुतेक वृध्दांना माझी राहणी पटू लागलीये.

अनेकांना  जागेची दुसरी सोय नसल्याने जीव मारून एकत्र राहावे लागते. सर्वांचीच त्यामुळे मानसिक कोंडी होते आणि चिडचिड वाढते. कोणी आर्थिकदृष्टया मुलांवर अवलंबून असतात.  त्यामुळे एकत्र राहावेच लागते. काही वेळा तब्येत चांगली नसते आणि कोणाच्या तरी आधाराची सतत गरज भासते. देवदयेने अजूनपर्यंत मला ह्या परिस्थितीतून जावे लागले नाही. म्हणून उगीचच मुलाच्या संसारात गुंतून राहणे मला पटले नाही. तसे अडीअडचणीला सून आणि मुलगा फोन केल्याबरोबर धावून येतात.   हे पुरेसे नाही का? लांब राहून गोडी टिकवणे मी जास्त पसंत करते.

आता दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे एकटे राहिले की दुखणे येऊ नये म्हणून मी  माझ्या आरोग्याची नियमित काळजी घेते. व्यायाम/आहार / विश्रांती सर्व वेळच्यावेळी करते. दिनक्रम व्यवस्थित आखून घेतल्यामुळे उगीच आळसात वेळ घालवत नाही. कालपर्यंत घरातील सर्व कामे मीच करत होते. आता काही लोक ह्याला कंजुषी म्हणतील. पण ह्यात खूप फायदे आहेत. पैसे वाचवणे, हा हेतू नाहीच आहे. पण मन कामात व्यग्र राहते, वेळ चांगला जातो, आपोआप शरीराला व्यायाम होतो हे फायदे महत्त्वाचे आहेत. मला पहिल्यापासून व्यायामाची  आवड आहे. पहाटे  ४ वाजता उठून ६ पर्यंत त्यात वेळ जातो आणि मग घराकडे बघायचे. पूर्वी  मॉर्निंग वॉक घेत असे. आता घरातल्या घरात एकाच जागेवर तसेच अगदी थोड्या जागेत इंग्लिश 8 च्या आकड्याबरहुकूम चालून चांगला व्यायाम होतो, हे शिकले आहे. यु ट्युबवर पाहून.. शिवाय बाहेरची सर्व कामेही मी करते. (आता एक मदतनीस आहे. ) मुलाची शक्यतोवर मदत घ्यायची नाही, असा नियम केला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आपण पेलू शकतो, हा आत्मविश्वास मिळतो आणि त्यातून जगण्याची ऊर्जा मिळते. माझे छंद मला त्यामुळेच आजपर्यंत जोपासता आले.

आतापर्यंत व्यवस्थित चालले आहे. उद्याचा विचार मी करतच नाही. रोज देवाचे आभार मानते, ज्याने मला सुजाण आईवडील,प्रेमळ भाऊबहिणी,आनंदी लहानपण,उत्तम शिक्षण,चांगले नातेवाईक आणि  प्रेमळ कुटुंब दिले. आता एकटे राहण्यामुळे जुन्या आठवणी  मनात जागवताना मनाला निरलस शांतता मिळते. आज तरी एकटे राहणेच मला आवडते. ना कसली इच्छा ना कसली अपेक्षा.. उद्या काय होईल, त्याचा विचार मी करतच नाही. तब्येतीने साथ देणे सोडले की आहेतच मुलगा आणि सूनबाई..!

लेखिका : श्रीमती नीला शरद ठोसर

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ जजमेंटल… असावं की नसावं ? – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..

मला हे थोडंफार पटलंही….

एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….

या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….

माझी एक बहीण परवा मला फोनवर बोलता बोलता म्हणाली, “आजकाल आपलं वागणं जजमेंटल आणि भोचकपणाचं वाटू नये म्हणून लोकं एकमेकांच्या आयुष्यात दखलच देईनासे झालेत रे. तुझ्या आयुष्यात तु कसं वागायचं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे इतपत जजमेंटल नसणं ठीक आहे. पण तुझा निर्णय एका चुकीच्या दिशेने जातोय हे मला माझ्या अनुभवांती माहिती असूनही तुला न रोखणं हा अलिप्ततेचा मूर्खपणा झाला….काही वेळा समोरच्या माणसाच्या आयुष्यात इन्टरफेअर करायला हवाच यार… व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली तो स्वैराचार करत असेल तर तो रोखण्यासाठी किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे त्याचं किंवा अन्य कुणाचं नुकसान होणार असेल तर ते रोखायला हवंच रे”…..

मला हे थोडंफार पटलंही….

एका अट्टल बेवड्या क्लिनरच्या प्रेमात पडून घर सोडून पळून जाणाऱ्या पाटलांच्या अनूला भर चौकात थोबाडीत ठेवून तिच्या घरी घेऊन येणारे बंड्याकाका जोगळेकर आठवतात….नवाथ्यांच्या सुनीलला चोरुन बिड्या फुंकताना रेड हॅन्ड पकडल्यावर “मेल्या तुझा बाप तिथे पूजा सांगून दक्षिणेवर दिवस ढकलतोय आणि तुला ही थेरं कशी सुचतात?” असं म्हणून त्याची खेटराने पूजा बांधणारे अण्णा जाधव आठवतात…. परिक्षेत नापास झालेल्या कल्पनाला पारावर बसून रडताना बघितल्यावर तिला चॉकलेट देऊन घरी आणून सोडणारे अप्पा बेंद्रे आठवतात,”दहावीतीली पोर रे. भितीने जीवाचं काही बरंवाईट करेल असं वाटलं मला “असं म्हणाले….नलू जोशीचा घटस्फोट होतोय हे कळल्यावर हक्काने घरी जाऊन ताई जोश्यांना धीर देणाऱ्या कमलाबाई जगताप आठवतात…. “इंजिनिअर होऊन बेकार घरी बसण्यापेक्षा उद्यापासून वर्कशॉपमधे येत जा” असं बापूला हक्काने सांगणारे नाना गुप्ते आठवतात….

या माणसांना जजमेंटल न होणं, इतरांच्या आयुष्यात दखल न देणं वगैरे सोशल एटिकेट्स मॅनर्स खरंच माहीत नव्हते. त्यांनी घराभोवती आणि मनाभोवती कुंपणच आखली नव्हती. शेजारी मयत झाल्यावर चार जणांचा डबा आणि चहा आपोआप शेजारहून जात असे कारण मधे लौकिकार्थाने भिंती असल्या मनाला भिंती नव्हत्या…. आज धेडगुजरी संस्कृती सांभाळता सांभाळत आपण अर्धे भारतीय आणि सोयिस्कर पाश्चात्य कधी झालो ते समजलंही नाही….

लेखक – अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ माझा संसार व मी …… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

माझ्या लग्नानंतर मला कळलेल्या व पटलेल्या आणि मनाला भिडलेल्या, बऱ्याच गोष्टी या लेखात मला वाचण्यास मिळाल्या, पहा वाचा तुम्हालाही कदाचित पटतील व विचार करण्यास भाग पाडतील…

संसार काय असतो हे नेमक्या आणि मोजक्या शब्दात येथे मांडलंय

कागदावर जुळलेली पत्रिका

आणि

काळजावर जुळलेली पत्रिका 

यात नेहेमीच अंतर राहतं…

 

लाखो मनांच्या 

समुद्रातून योगायोगाने 

२ मनं अगदी एकमेकांसारखी 

समोर ठाकणं जवळ-जवळ अशक्य आहे, 

हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

 

वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले २ जीव, एकमेकांसारखे 

असतीलच कसे?

 

सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं 

हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

 

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही. 

या न देण्याचंच ‘देणं’ 

स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

 

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नाही, तर 

तुला मिळणारा ‘जीवन साथीदार’ अगदी तुला हवा तसा 

असणार कसा?. 

त्याचे – आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. 

त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, 

त्याचं माणूस म्हणून 

वेगळेपण आहे, 

हे मान्य करणार असाल 

तरच संसारात पाऊल टाकावं.

 

अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

 

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा.. 

बघण्याच्या समारंभात 

गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, 

श्रद्धा-अंधश्रद्धा असे 

तेलकट प्रश्न विचारा..  

या प्रश्नांची उत्तरं ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या 

सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

 

लग्नानंतर मग 

खरं काय ते एकमेकांना कळत जातं. 

 

तेव्हा म्हणाली होती …. ‘वाचनाचा छंद आहे’ 

पण नंतर साधं वर्तमानपत्र 

एकदाही उघडलं नाही बयेनं…

जाब विचारू शकतो आपण?

किंवा

 तो म्हणाला होता – ‘प्रवासाची आवड आहे; 

जगप्रवास करावा, हिमालयात ट्रेकिंग करावं – असं स्वप्न आहे!’

पण

प्रत्यक्षात कळतं; 

कामावरून आला की जो सोफ्यावर लोळतो की गव्हाचं पोतं जसं.

जेवायला वाढलंय.. हे ही चारदा सांगावं लागतं…

 

प्रवासाची आवड कसली?

कामावर दादरला जाऊन घरी परत येतो ते नशीब… 

वर्षभर सांगतेय .. माथेरानला जाऊ 

तर उत्तर म्हणून फक्त जांभया देतो…

 

कसले मेले ३२ गुण जुळले देव जाणे.

उरलेले न जुळलेले ४ कुठले 

ते कळले असते तर…

 

मनापासून सांगतो,

त्या न जुळलेल्या गुणांशीच 

खरं तर लग्न होत असतं आपलं.

 

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, 

तीच व्यक्ती टिकली…

 नाही जमलं की विस्कटली.

 

अन्याय -शोषण, सहन न करणं, हा पहिला भाग झाला… 

पण न जुळलेल्या गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन, 

नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता  दोघांमध्ये हवी.

 

पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाहीये;

 

आपल्याला ‘हवी तशी’ व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल; 

पण वेगळ्या रंगाच्या धाग्याने टाके घालीत आयुष्य जोडतं ठेवावं लागतं 

हेच खरं वास्तव आहे.

 

धुमसत राहणाऱ्या राखेत

 कसली फुलं फुलणार ?..

 

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत, 

ते मी स्वीकारणार आहे का?-

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर स्वत:शी देऊन 

मगच संसार मांडायला हवा.

 

आपल्यापेक्षा कोणत्याही वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं 

… हे या वाटेवरच पाहिलं पाऊल…

 

ते पाऊल योग्य विश्वासाने पडलं की मग … 

इतर सहा पावलं सहज पडत जातात.. 

आणि मग ती “सप्तपदी” – “तप्तपदी” होत नाही..

हेच संसाराचं खरं मर्म आहे.

हरीॐ

“मेड फॉर इच अदर” आपोआप होत नाहीत…. 

… होत जातात…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वेळीच टकटक ऐकायला शिका… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वेळीच टकटक ऐकायला शिका… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

(लहानपणीची अर्धी राहिलेली गोष्ट)

एक होती चिमणी आणि एक होता कावळा. 

चिमणीचं घर होत मेणाचं, याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. 

एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. 

कावळयाच घर होत शेणाचं, ते गेले  पाण्यात वाहून, कावळा काकडला. आता कुठे जावं बरं ? एवढयात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. 

.. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 

‘ चिऊताई, चिऊताई, दार उघड ! ‘ 

चिमणी आतून म्हणाली ‘ थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते ‘

 थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘ चिऊताई, चिऊताई, दार उघड ! ‘ 

चिमणी आतून म्हणाली ‘ थांब माझ्या बाळाला झोपवते ‘ 

इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा ! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. पण चिमणीने काही केल्या दार उघडले नाही.

 गोष्टीचा पुर्ण केलेला उत्तरार्ध – 

चिमणीचे सगळे काम आटोपले. ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की, 

अरेच्च्या ! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही. 

तिला विलक्षण अपराधी वाटलं. 

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती. 

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

‘ गेला असेल कुठेतरी… येईल परत ‘ …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली. 

मात्र, रात्र मावळली… दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता. 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … 

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची …… 

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं… 

अनेक दिवस उलटले …

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना. 

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली. 

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला… 

तो ‘कावळ्याचा’ आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला काय आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला. तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय ! 

…. कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता. 

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला, 

‘ या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी? ‘ 

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,- ‘ तुला राग नाही आला माझा? ‘

‘ का यावा? ‘

‘ मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?’

‘ छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती .

तर माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. 

माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येऊन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोन्हीही गोष्टी ‘अतिक्रमणासारख्याच’ घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर ‘अतिक्रमण’ करणे चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.’ 

-’ पण मला एकटे करून? अरे, कावळेदादा मला सवय झालीय आता तुझी.’

‘ चिमणाबाई, या जगात एकटे कोणीच नसतं. जेव्हा आपण एकटे आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच आपला सोबती असतो,. जो दाखवत असतो आपल्याला आपल्या आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची वाट… 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या ‘घरट्यात… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या ‘माझ्या माणसांमध्ये’ ‘

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला –

‘ चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.’ 

चिमणीचे डोळे पाणावले… भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे… 

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतकं बळ राहिलं नव्हतं….

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. 

– म्हणजे ?

– म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानीच नसतं. 

ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, मैत्रीण,आई, वडील, बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात…

त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही…. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो ‘ .. …’थांब मला जरा  करिअर करु दे…. थांब जरा मला आता घर घ्यायचंय… थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब मला काम आहे … थांब मला विश्रांती घ्यायची आहे … थांब जरा मला आता.. ….’ आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात… त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं… आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा येतं तेव्हा …. आपण फार एकटे झालेले असतो…!!

– आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर? 

तर मग ‘ मला कोणाचीच  गरज नाही ‘ हा अहंपणा बाळगू नका. 

– वेळीच ‘टकटक’ ऐकायला शिका.

काहीतरी निमित्त करून एकमेकांना भेटत रहा…

कवी : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्नमंजुषा… अशीही… – अज्ञात  ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

प्रश्नमंजुषा… अशीही.

जराशी गम्मत ….. बघा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतात का?

१. पगाराला दोनने ‘गुणले’ तरी 

‘भागत’ का नाही ?

२. लग्नाची ‘बेडी’ नक्की 

कोणत्या गुन्ह्यासाठी ‘पडते’?

३. अक्कल ‘खाते’ 

कोणत्या बँकेत ‘उघडता’ येते?

४. ‘भाऊगर्दीत’ 

‘बहिणी’ नसतात का?

५. ‘बाबा’ गाडीत 

‘लहान बाळांना’ का बसवतात? 

६. ‘तळहातावरचा फोड’ 

किती मोठा होईपर्यंत ‘जपावा’?

७. मनाचे मांडे भाजायला

‘तवा’ का लागत नाही?

. ‘दुग्धशर्करा योग’ 

‘मधुमेहींना’ वर्ज असतो का? 

९. ‘आटपाट’ नगर 

कोणत्या ‘जिल्ह्यात’ येते? 

१०. ‘तिखट प्रतिक्रिया’ 

‘गोड’ मानून घेता येते का?

११. सतत ‘मान खाली’ घालायला लावणारा मित्र  ‘मोबाईल’ असावा कां? 

१२. ‘काहीही’ या पदार्थाची 

‘रेसिपी’ मिळेल का?

१३. ‘चोरकप्पा’ नक्की

‘कोणासाठी’ असतो? 

१४. ‘पालक’ ‘चुका’ दाखवून 

 मुलांना ‘माठ’ ठरवत असतात का?

१५. ‘पैशांचा पाऊस’ असेल

तर ‘छत्री’ उलटी धरावी का?

१६. ‘भिंतीला’ कान असतात

तर बाकीचे अवयव कुठे असतात?

(ज्यांना मराठीची मजा चाखता येते, त्यांच्यासाठी खास चेहरा खुलवणारी प्रश्नमंजुषा !)

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,

आज उगाचच खूप वर्षांनी आठवली !

शाळा तर कधीचीच संपलीय, पण,

परीक्षेची धडधड मात्र तशीच राहिलीय !!

 

“शब्दांचे अर्थ लिहा” म्हटल्यावर,

अचूक अर्थ आठवायचे !

आता अर्थही बदललेत आणि,

शब्दही अनोळखी झालेत !!

 

“समानार्थी, विरुद्धार्थी शब्द”,

गुण हमखास मिळायचे !

आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,

अन् अर्थांचे अनर्थ झालेत !!

 

“गाळलेल्या जागा भरा”,

हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा !

प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच, 

गाळलेल्या जागा भरल्यात!

आयुष्यातल्या काही जागा मात्र,

आजही रिकाम्याच राहिल्यात !!

 

पेपरातल्या “जोड्या जुळवा”,

क्षणार्धात जुळायच्या!

पण नात्यांच्या जोड्या, 

कधी जुळल्या,तर कधी, 

जुळता जुळता फसल्या !

 

“एका वाक्यातल्या उत्तरा”नं पाच मिनिटात,

पाच गुण मिळवून दिलेत !

आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,

आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,

एकाच जागी उत्तराची वाट बघत.

 

“संदर्भासहित स्पष्टीकरण” लिहिताच,

पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच !

आता स्पष्टीकरण देता देता

जीव जातो !!

 

“कवितेच्या ओळी पूर्ण” करणं,

अगदी आवडता प्रश्न!

आजही शोध सुरु आहे, 

कवितेच्या सुंदर ओळींचा !

एका चालीत, एका सुरात गाताना,

मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला !!

 

“निबंध लिहा”, किंवा “गोष्ट लिहा”,

पाचापैकी तीन गुण देणारच देणार !

आता कितीही कल्पना लढवा,

किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,

पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार !!

 

तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो !

काही प्रश्न “option” लाही टाकायचो !

आता परीक्षा आधीच द्यावी लागते,

अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो !!

आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,

आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो !!

 

शाळेत सोडवलेली मराठीची  प्रश्नपत्रिका,

आज उगाच खूप वर्षांनी आठवली.

तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली !!

 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ३६ आकडा आणि ६३ आकडा ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

” ३६ आकडा आणि ६३ आकडा ”  हे दोन अंक शिकवतात जीवनातील सत्य स्वरूप . 

३६ आकड्याचा विचार केला तर, तीन आणि सहा दोन्ही आकडे एकमेकांकडे पहात नाहीत. दोघेही टाईट पणाने पाठीला पाठ लावून उभी आहेत. एकमेकांचं तोंडही पहात नाहीत.

त्याप्रमाणे माणसांचं असतं. छत्तीसचा आकडा हा चाळिशीच्या आतला आहे. म्हणून चाळीशीच्या आत माणूस सुद्धा अहंकाराने, ताकदीने, पैशाने, परिपक्व असल्यामुळे तो नेहमीच अहंकारी असतो. कमीपणा घेत नाही. मला गरज नाही, मी त्याचं तोंड पाहणार नाही, असे शब्द त्याच्या तोंडात असतात. सख्ये भाऊ पक्के वैरी होतात. आणि हातात हात न घेता पाठीला पाठ लावतात. 

आता ६३ आकडा पहा.

या आकड्याने साठी ओलांडल्यामुळे आता हे दोघेही नम्र झालेत. दोन्ही आकडे एकमेकांकडे पाहतात. हातात हात घेतात. एकमेकाला आलिंगन देतात. माणसाचं असंच असतं, एकदा साठी ओलांडली की, नम्र होतो. कारण ना ताकद, ना तारुण्य, ना पैसा, ना सत्ता, काहीच राहत नाही. म्हणून हा नम्र होतो. तुम्ही पहा, माणूस तरुणपणी बालपण विसरतो, लग्न झाल्यावर आई वडिलांना विसरतो, मुलं झाल्यावर भावांना विसरतो, पैसा आला की आपले नातेवाईक विसरतो, आणि म्हातारपणी, जेवढ्यांना विसरला होता त्यांची आठवण काढत बसतो. 

६३ च्या या आकड्याप्रमाणेच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.    

वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम, स्नेह व आदर असतो. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर,, तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा…!!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडते तुमची कलरफुल जनरेशन… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मला आवडते तुमची Colourful Generation…. लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

नात : “नानी, तू किती generations बघितल्या ?”

मी : “ मी न……. ५…… बघ हं… माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात… तू…”

नात: ” यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?”

मी : “ तुझी…. “

नात : “ वॉव…. पण का ?”

मी: “ कारण ती सर्वात जास्त colourful आहे. ”

नात: “ म्हणजे कशी ?”

मी : “ म्हणजे असं….. की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता… ‘ घर… घर काम, घरच्यांची सेवा आणि    घरी येणाऱ्यांचे आदरातिथ्य.

मग माझी आई… या घरकामाच्या रंगात अजून एक रंग वाढला…

तो म्हणजे शिक्षणाचा…. आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज… यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.

मग माझी पिढी… माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज यामुळे आमचं क्षितिज बरंच रुंदावलं…

 नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या… generation colourful होऊ लागली.

मग.. तुझ्या आईची generation………

Technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला…. ‘स्पर्धेचा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला. नवनवीन पाश्चिमात्य रंग डोकावू लागले… जागतिकीकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला…

आणि त्यानंतर…

नात : “ मी….. पण माझीच generation तुला का आवडते ?”

मी: “ कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळून आत्मविश्वासाचा प्रसन्न रंग  लेवून जन्मलेली तुझी पिढी…. technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं… जग तुमच्या बोटांवर नाचतं…

ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं…

समानता खऱ्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे….

माझ्या आजीच्या ‘घर आणि संस्कार’  पासून ते…

तुमच्या ‘अवकाश’ या प्रचंड कक्षेतील सगळे ‘सुखद’ रंग जपण्याचा आणि ‘दु:खद’ रंगांशी झुंजण्याचा तुमचा ‘Cool’ रंग मला फार आवडतो……

तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात…

BE BOLD FOR CHANGE….

 व्हा धाडसी…. बदलासाठी… !!!

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? वाचताना वेचलेले ?

☆ “आपण इतके तुसडेपणाने का वागतो ?” – लेखक : श्री दिलीप ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

हल्ली एक बदल अगदी ठळकपणे दिसून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत. कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गटात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु होत.कुठलेही खेळणे उपलब्ध नसताना मुलांचा धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितावृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही एकमेकांत मानापमान,हेवेदावे, रुसवेफुगवे,वितुष्ट,असूया, धुसफूस, अबोला असायचा,पण तो ठराविक मर्यादेपर्यंत. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह माणसं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती.हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत व्यवस्थित चालू होतं !

आता मात्र बदल इतका झालाय की लोकांचा एकमेकांशी संवाद जवळजवळ बंदच झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटेखानी समारंभ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात मग लगेचच स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसं मोबाईलमध्ये व्यस्त होतात. हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडंसं जुजबी बोलायचे… ‘ अरे आहेस कुठे हल्ली तू ? काय नवीन विशेष? US ला गेला होतास ना तू? ‘ ‘ काय ग किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना,’ ..  असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? का आपण हल्ली इतके तुसडेपणाने वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्र कुटुंब मोडून विभक्त कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकले की मनुष्यबळ उभे करता येते हा आत्मविश्वास. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील केटररच्या सेवेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे तर दुकानात जायची देखील आवश्यकता राहिली नाही.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ? वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय ! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली. आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा एकमेकांशी बोलत नाहीत….. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुडडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

कळतच नाही आपण असे का वागतो?

पहा … तुम्हाला काही उत्तर सुचतंय का ?

काही सुचले तर अवश्य शेअर करा. 

आपल्यातील माणुसकी एकदमच संपायच्या आत आपणच काही करू शकलो तर परत एकदा आनंदी समूह म्हणून रहायला लागू.

लेखक : श्री दिलीप

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares