मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

नोकरीनिमित्त उपनगरातून मुंबईला लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे विवाह हे सहजासहजी मोडत नाहीत, अशी माहिती नुकतीच एका सर्व्हेमुळे समोर आली. यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आमच्या काही प्रतिनिधींनी सोमवार ते शुक्रवार असा सलग पाच दिवस सकाळी कल्याण ते दादर असा ‘वरून’ येणाऱ्या गाडीने व पुन्हा सायंकाळी ‘दादर ते कल्याण’ असा लोकलचा प्रवास चक्क पिक अवर्समध्ये केला व त्यांना आलेल्या अनुभवांवरून यामागची काही कारणे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.

सकाळी घरून निघताना एखादी फास्ट गाडी मनात ठरवून स्टेशनला यावे, तर ती गाडी वरूनच खचाखच भरून आलेली. मुंगीलाही आत शिरायला जागा नाही. नाइलाजाने ती गाडी सोडून हताशपणे दूर जाताना तिच्याकडे पहात बसायचे. नंतर एक स्लो लोकल.. बऱ्यापैकी रिकामी.. पण तुम्हाला नकोशी. मग शेवटी काँप्रोमाईज करून एक सेमीफास्ट लोकल पकडायची. ह्या रोजच्या प्रकारामुळे एक तडजोडीचा गुण माणसात तयार होतो. त्याला आवडणारी मुलगी त्याला नाकारून दुसऱ्याबरोबर लग्न करते तर जी याच्याशी लग्नाला तयार असते.. याला पसंत नसते. शेवटी घरच्यांच्या इच्छेप्रमाणे एका ‘अनुरूप’ मुलीशी विवाह करण्याची तडजोड तो याच प्रवासात शिकलेला असतो.

बरे.. तडजोड करून पकडलेल्या ह्या सेमीफास्ट गाडीतही लगेच सीट मिळत नाहीच. पण हा जरा धावपळ करून खिडकीत समोरासमोर बसलेल्या दोन माणसांच्या पुढ्यात जाऊन उभा रहातो. हे दोघे तर लवकर उठत नाहीतच; पण येणाराजाणारा प्रत्येक जण आपली बॅग स

शेल्फवर ठेवण्यास वा काढण्यास यालाच सांगत रहातात व त्यालाही तेथे उभे राहिल्याने हसतमुखाने हे काम करत राहावे लागते. यातून आपला काही फायदा असो वा नसो.. न थकता शेवटपर्यंत, इच्छा असो वा नसो.. हसतमुखाने सासुरवाडीच्या नातेवाईकांची कामे करण्याचा गुण यांच्या अंगी बाणला जातो.

अशा माणसांना गाडीत चढल्या चढल्या चुकून कधी बसायला जागा मिळालीच तर नेमके त्याच डब्यात कोणीतरी वृद्ध अथवा आजारी व्यक्ती चढते व त्याच्या समोर उभे राहून आशाळभूतपणे बघू लागते. इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही याने उठून त्यांना जागा द्यायलाच हवी, असे भाव असतात. मग नाईलाजाने तो उभा राहून त्या वृद्धास वा आजाऱ्यास जागा करून देतो. यातूनच सासुरवाडीच्या वृद्धांची व रुग्णांची सेवा करण्याचा गुण वृद्धिंगत होतो.

लोकलच्या लेडीज डब्याचे नियम तर फार कडक. चुकून त्यात पुरुष शिरला तर बायकांचे शिव्याशाप.. क्वचित मारही खावा लागतो. त्यातून घोर अपमान व पोलिसांच्या हवाली होणार ते वेगळेच. यामुळेच चार बायका एकत्र दिसल्या की तेथून दूर होण्याच्या गुणाची निर्मिती होते. त्यामुळेच घरी हॉलमधे किटी पार्टी, भिशी, हळदीकुंकू वगैरे सुरू असल्यास हा त्यात लुडबूड न करता बेडरुममध्ये शांत पडून राहतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकल प्रवासातून तयार होणारी प्रचंड सहनशक्ती. आपला चुकून धक्का लागला तरी खुन्नस देणाराच आपल्या शेजारी बसल्यावर मात्र पेपर वाचताना त्याचे कोपर पोटात खुपसतो.. समोरचा मोबाईल वाचता वाचता नाकात बोटं घालतो.. कुणाच्या घामाचा प्रचंड वास येत असतो.. एक ना अनेक नरकयातना या तासाभरात त्याच्या वाट्यास येत असतात व त्या शांतपणे भोगल्याने मनस्ताप सहन करण्याची प्रचंड ताकद यांच्यात तयार होते, जी संसारात पदोपदी उपयुक्त ठरते !

तसेच दिवसभर कितीही उंडारले तरी संध्याकाळी ठरलेल्या गाडीने ठरलेल्या वेळी घरी परत येणे, हाही एक वाखाणण्याजोगा गुण..

असे एक ना अनेक गुण आहेत जे पिक अवर्समधे प्रवास करणाऱ्यांच्यात निर्माण होतात, जे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करतात.

आमच्या प्रतिनिधींना आलेले हे अनुभव जेमतेम ५ दिवसांचे आहेत. पण आपण जर वर्षोनवर्षे असा प्रवास करत असाल व आपले याबाबत काही विशेष अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा !

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मंत्रजागर… लेखिका: श्रीमती रश्मी साठे ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मंत्रजागर… लेखिका: श्रीमती रश्मी साठे ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

शिव्या दिल्यातर समोरचा क्रोधित होतो हे उदाहरण शिक्षित वा अशिक्षित सर्वांना पटण्यासारखे आहे.

मंत्र प्रभावा विषयी हा लेख वाचून एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळेल. 

केळीचे लोंगर बागेत दिसायला लागल्यावर वानरांनी बागेत येऊन धुडगूस घालायला सुरुवात केली. केळी, पपई …..  एकही फळ हाताशी लागेना. आमच्या जमिनीत वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींचे मंदिर बांधलेय. देवळात वीज आल्यावर एक दिवस जपयंत्र आणलं. सूर्यास्ताला जपयंत्रावर गायत्री मंत्राचा जप सुरू करायचा, तो चांगलं उजाडल्यावर बंद करायचा. आठ पंधरा दिवसातच एक गोष्ट अनुभवाला आली. जपयंत्र जरी रात्री सुरू असलं तरी दिवसभर बागेत होणारा वानरांचा धुडगूस आपोआप बंद झाला. वानर बागेच्या कुंपणापर्यंत यायचे. पण बागेत यायचे नाहीत. नुकसान करायचे नाहीत. रात्रीच्या वेळी मात्र तोच कळप तळ्याकाठच्या त्याच झाडावर वस्तीला असायचा. आज घराभोवती पाच फळबागा उभ्या राहिल्या असून वानरांमुळे होणारं नुकसान पूर्णपणे थांबलं. गायत्री मंत्र आणि वानर यांचा नेमका काय संबंध –  हे मात्र अनाकलनीय आहे. आज अनेक शेतकरी हा अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत.

‘रानगोष्टी’  या डॉ. राजा दांडेकर यांच्या पुस्तकातील हा उतारा. गायत्री मंत्राचा उत्तम महिमा सांगणारा. आजच त्याची आठवण होण्याचे कारण काय? कारण कोकणातील एक फेसबुक मित्र श्री. अविनाश काळे यांची पोस्ट. ‘कोकणचे दुःख कोणी दूर करेल ?’  ह्या मथळ्याच्या पोस्टचा मथितार्थ असा की कोकणातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान माकडे आणि वानरे यांच्यामुळे होत आहे. त्यांचा बंदोबस्त न झाल्यास कोकणातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ ओढवणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये वानर आणि माकड यांना उपद्रवी पशू जाहीर करून मारायला सुरुवात केली. महाराष्ट्रातसुद्धा असे करण्याची गरज आहे.

हे वाचताना गायत्री मंत्राचा प्रभाव आठवला. वानरे, माकडे यांना जीवानिशी मारण्यापेक्षा शेतकरी मित्रांनी हा साधा, निरुपद्रवी उपाय करून पहायला काय हरकत आहे ?

एखाद्या मंत्राचा प्रभाव मान्य करणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? हा वाद जुनाच आहे. अशीही शक्यता आहे की एखादी विज्ञानाधिष्ठित गोष्ट देवाधर्माच्या नावे सांगितली की लोकांना पटते, ते ऐकतात. हे लक्षात आल्याने आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी हुशारीने लोकांच्या गळी उतरवल्या असतील. आपल्याला त्यामागचे विज्ञान माहीत नसल्याने आपण त्याला अंधश्रद्धेचे लेबल लावून मोकळे होतो !

भारतीय मानसिकतेला मंत्राचा प्रभाव, त्यामुळे होणारे चमत्कार हा मुद्दा नवीन नाही. मूल अक्षरओळख शिकण्याच्या आधीपासून घरच्यांकडून रामायण, महाभारतातील गोष्टी ऐकू लागते. अक्षरे ओळखता येऊ लागली की पौराणिक कथा वाचू लागते. (आताच्या नवीन पिढीत बहुधा हे होत नसावं.) बालवयातच ‘कुमारी माता’ कुंतीची कथा सामोरी येते. कुंतीने मनापासून दुर्वास ऋषींची सेवा केल्याने त्यांनी संतुष्ट होऊन अपत्यप्राप्तीसाठी देवांना वश करण्याचा मंत्र तिला दिला. तिने कुतूहलापोटी मंत्रजप करून सूर्याला आवाहन केले. सूर्य प्रगट होताच भयभीत होऊन त्याला परत जाण्यास सांगितले. मात्र ‘मंत्र व्यर्थ होऊ शकत नाही’ असे सूर्य म्हणाला आणि सूर्यपुत्र कर्णाचा जन्म झाला.

भयकथा, गूढकथा यातही अघोरी विद्यांमध्ये विशिष्ट मंत्रांचे सामर्थ्य किती अचाट आहे, हे वाचायला मिळते. ‘वशीकरण मंत्र साक्षात मनुष्यरुपात प्रगट झाला’  वगैरे वाचताना मला भयंकर कुतूहल वाटत असे. जर खरेच असे काही प्रत्यक्षात घडत असेल तर ते आपल्याला निदान एकदा तरी बघायला मिळावे, असेही वाटून जाई.

विशिष्ट शब्द विशिष्ट पद्धतीने उच्चारणे म्हणजे मंत्र. या मंत्रोच्चारणाचा विधायक वापर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करू शकलो तर आपले कितीतरी प्रॉब्लेम्स सुटतील ! खरंच मंत्रात शक्ती असते का ?   अलीकडेच  व्हाॅट्सॲपवर एक पोस्ट वाचायला मिळाली. त्यात या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. पोस्टचा मथितार्थ असा की एखाद्या माणसाने आपल्याला उद्देशून अपशब्द उच्चारले, शिव्या दिल्या तर आपल्याला संताप येतो. म्हणजेच त्या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होते. ह्याउलट कुणी आपले कौतुक केले, प्रेमाने बोलले तर आपल्याला प्रसन्न, आनंदी वाटतं. म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते अगदी ह्याच प्रकारे मंत्रातील शब्दांतदेखील ऊर्जा, सामर्थ्य असते. हे मंत्र आपल्या ऋषीमुनींनी, जे वैज्ञानिक होते, संशोधनातून सिद्ध केले आहेत.

सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड,विश्वविख्यात नेमबाज अंजली भागवत यांच्यासारखे अनेक खेळाडू ज्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात होते ते क्रीडामानसशास्त्रज्ञ व माजी इंटेलिजन्स ऑफिसर भीष्मराज बाम यांनी हा मुद्दा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे. ते म्हणतात,’ मंत्र म्हणजे काही शब्दांच्या किंवा वाक्यांच्या आधारे प्रगट होणारा एखादा प्रभावी विचार असतो. काही वेळा एखादा शब्द किंवा ओंकारासारखे अक्षर मंत्रजपासाठी वापरले जाते. तर कधी कधी काही ओळींचाही मंत्र असू शकतो. मंत्रजप हा एकाग्रतेसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. आपल्या विचारांवर आपला ताबा नसेल तर विचार भरकटतातच. पण त्यासोबत आपलीसुद्धा अत्यंत त्रासदायक अशी फरफट होते. विचारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्र उपयुक्त ! मंत्रातले शब्द ज्या अर्थाने वापरले असतील त्यावर तुमची पक्की श्रद्धा असायला हवी. म्हणून तर मंत्र हा तुमची ज्या गुरुवर श्रद्धा असेल त्याच्याकडून मिळवायचा असतो. किंवा तो मंत्र तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सिद्ध झालेला हवा. मग आपोआप तुमची त्याच्यावर श्रद्धा बसते.’

प्रभावी स्वसंवाद ( स्वतःसाठी सूचना)  लिहून काढून त्याचा मंत्रासारखा वापर करण्याबाबतही बाम सरांनी लिहिले आहे. Winning Habits या त्यांच्या मूळ इंग्लिश पुस्तकाचा ‘विजयाचे मानसशास्त्र’ या नावाने वंदना अत्रे यांच्या सहाय्याने मराठी अनुवाद केला आहे.

दैनंदिन जीवनात मारुती स्तोत्र, रामरक्षा (किंवा आपले आवडते स्तोत्र / मंत्र) म्हटले की प्रसन्न वाटतं, नकारात्मक विचार पळून जातात हा अनुभव तर सर्वांनीच घेतला असेल. ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य’  अशीच रामरक्षेची सुरुवात आहे. बुधकौशिक ऋषींना स्वप्नात रामरक्षा स्फुरली. कुरवपूर (कर्नाटक) येथे श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’  या अठरा अक्षरी प्रभावी मंत्राचा साक्षात्कार झाला.

अखंड नामस्मरण, मंत्रजप यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मकता येत असेल, फायदा होत असेल तर ‘श्रद्धा – अंधश्रद्धा’ चा काथ्याकूट कशाला ? नियमितपणे, श्रद्धेने मंत्र जपावा हे उत्तम.

लेखिका: श्रीमती  रश्मी साठे

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

प्रेम

प्रेम कुणावर करावं ?

प्रेम कुणावरही करावं.

 

प्रेम

राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,

कुब्जेच्या विद्रुप कुबड्यावर करावं,

भीष्म द्रोणाच्या थकलेल्या चरणावर करावं,

दुर्योधन कर्णाच्या आभिमानी,

अपराजित मरणावर करावं

प्रेम कुणावर ही करावं.

 

प्रेम

रुक्मिणीच्या लालस ओठावर् करावं,

वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,

मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं,

प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,

आणि खड्गाच्या पात्यावरही करावं

प्रेम कुणावर ही करावं.

 

प्रेम

ज्याला तारायचाय त्याच्यावर तर करावंच

पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं,

प्रेम योगावर करावं,

प्रेम भोगावर करावं,

आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं,

 

प्रेम

प्रेम कुणावर करावं

प्रेम कुणावरही करावं.

कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)‍

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “ज्योत ज्योतीने जागवा…” – लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

काही घटना, काही शब्द, काही ओळी काळजावर छिन्नीने अशा कोरल्या जातात की सदैव दिसत राहतात. काळाची धूळ बसली तरी तो झिरझिरीत पडदा त्यांचे अस्तित्व पुसू शकत नाही. कधीतरी आनुषंगिक संदर्भ ती धूळ पुसतात आणि मग ते कोरीव काम लख्ख दिसू लागते.

गेली अनेक वर्षे अशी अनेक कोरीव लेणी मनात टिकून राहिली आहेत.

काल आपटे हायस्कूलच्या एका माजी विद्यार्थ्याने एक जुना फोटो पाठवला. त्याच्या खाली त्याने लिहिले होते, ” बाई, सततआठवते का?”

ही आव्हाने जितकी नाजूक असतात, तितकीच मुश्किलही असतात. पण एखाद्या लहान मुलीने स्वतःच डोक्यावर चादर घ्यावी आणि काही क्षणात स्वतःच ती दूर करून बोळके पसरून हसावे तशी त्यांच्यावरची अनेक आवरणं झुगारून ती कधीकधी स्वतःच उघड होतात.

तसेच झाले आणि त्या फोटोतला काळ दूर गेलाच नसल्यासारखा समोर येऊन उलगडला.

परमवीरचक्र विजेत्या पैगंबरवासी अब्दुल हमीदच्या वीरपत्नीला शिवणकाम करून पोट भरावे लागते, अशा बातमीने व्यथित होऊन ती मी माझ्या ९ वी ब च्या वर्गात वाचून दाखवली. त्या व्यथेतून एक मोठा उपक्रम आकाराला आला-‘ पै. अब्दुल हमीद कृतज्ञता निधी. ‘७८ मुलांच्या वर्गानं स्वकमाईने ‘कृतज्ञता निधी’ उभारला. त्यात नंतर ९वी क देखील सामील झाला व समाजातल्या काही संवेदनशील व्यक्तींनीही थोडी भर घातली.

पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात, एका भव्य कार्यक्रमात, ल. आपटे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पु. ग. वैद्य, श्री. शशिकांत सुतार, विक्रम बोके, पुण्यात स्थायिक झालेल्या परमवीरचक्र विजेत्या श्री. रामराव राणे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती राजेश्वरी राणे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत दै. सकाळचे तत्कालीन व्यवस्थापक श्री. के मो. भिडे यांच्याकडे तो निधी जाहीरपणे सुपूर्त केला गेला.

याची दोन कारणे होती. एक म्हणजे तो उपक्रम दै. सकाळमधील बातमीमुळेच आकाराला आला होता आणि दुसरे म्हणजे हा निधी सार्वजनिक कामातून उभा राहिला होता म्हणून तो सार्वजनिक रूपातच जाहीरपणे हस्तांतरित होणे गरजेचे होते.

राखीपौर्णिमेचा दिवस यासाठी निवडला होता कारण ती भावनाही या कार्यक्रमाच्या मागे होती. मुलांच्या तुडुंब उत्साही गर्दीत कार्यक्रम शानदारपणे पार पडला. पाटेकरांनीही या निधीत मोलाची भर घातली. व्यासपीठावरच्या संपूर्ण कार्यक्रमातल्या सर्व भूमिका मुलांनी जबाबदारीने अचूक पार पाडल्या. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावरच्या सन्माननीय व्यक्तींना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. त्यांच्यासाठी चहा-बिस्किटे सतत मागवली जात होती. टिळक स्मारकच्या खालच्या कँटिनमधून भरलेले ट्रे वर येत होते. माझ्याही भोवती गर्दी असल्याने मला याचा कोणताही हिशेब ठेवता येत नव्हता….

हळूहळू हॉल रिकामा होऊ लागला आणि कँटिनचे मालक श्री. भागवत माझ्याजवळ आले. त्यांच्या हातात झालेल्या चहापाण्याचे बिल होते. माझ्या पोटात गोळा आला. स्टेजवर जाणारे ते भरलेले ट्रे दिसू लागले. किती रक्कम मांडली असेल कोणास ठाऊक अशा विचारातच मी ते बिल हातात घेतले.

बिलातल्या रकमेच्या खालच्या जागेत लिहिले होते- ‘ही रक्कम आमच्यातर्फे आपल्या ‘कृतज्ञता निधी’त जमा करावी. ‘ उपक्रमाचे कौतुक करून, नमस्कार करून ते शांतपणे निघून गेले. शाळेत शिकवत असलेल्या कवितेच्या कोरीव ओळी माझ्या डोळ्यासमोर नाचू लागल्या-

‘ज्योत ज्योतीने जागवा

करा प्रकाश सोहळा

इवल्याश्या पणतीने

होई काळोख पांगळा. ‘

 * * *

आपटे प्रशालेच्या नववी ब व ९ वी क च्या मुलांनी हा ‘कृतज्ञता निधी’ जिच्या पाठीशी उभे राहण्यासाठी उभारला होता त्या वीरपत्नीला – श्रीमती रसूलन बेगम यांना उत्तर प्रदेशातील गाझियाबादपासून ८० किलो मीटर दूर असलेल्या धामुपूर येथे प्रत्यक्ष जाऊन तो देण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हते.

दै. सकाळने मुलांचे कष्ट, त्यांच्या भावना व त्यांच्यातील सामाजिक कर्तव्यांचे भान यांचे मोल जाणून त्यांचे लखनौ येथील प्रतिनिधी श्री. शरद प्रधान यांच्याकडे हे काम सोपवले. मुलांनी वीरपत्नीसाठी हिंदी व उर्दूमध्ये लिहिलेले प्रातिनिधिक, हृदयस्पर्शी पत्रही त्यांच्याकडे दिले होते.

गाझियाबादपासून धामुपूर येथे जाण्यासाठी वेळेवर काही वाहन न मिळाल्याने श्री. प्रधान यांनी एका ट्रकचालकाला विनंती केली. त्यासाठी शंभर रुपये आकार मान्य करून प्रधान ट्रकमध्ये चालकाशेजारी बसले. वाटेत गप्पा सुरू झाल्या. इतक्या आडगावात हा सुशिक्षित माणूस कशासाठी चालला आहे, अशी उत्सुकता त्याला वाटणे स्वाभाविक होते. दूरवरच्या महाराष्ट्रातल्या एका पुणे नावाच्या गावातल्या शाळकरी मुलांनी स्वतः कष्ट करून हा निधी उभा केला आहे, हे कळताच त्याचे डोळे विस्फारले. “साब, इतने साल यहाँ से आते-जाते हॆं, कभी उनसे मिलने की भी बात हमारे दिमाग में नहीं आई और इतनी बड़ी बात इतनी दूर के छोटे बच्चों ने सोची?”

बोलता बोलता धामुपूर गाव दिसू लागलं. प्रधानांनी आपल्या पाकिटातून शंभराची नोट काढून चालकापुढे धरली. त्यांचे हात हातात धरीत चालक डोळ्यात पाणी आणून म्हणाला, ” नहीं, नहीं साहब! ये पॆसे लूँगा तो अपने आपको आइने में नहीं देख पाऊँगा! शरमिंदा मत कीजिए। चलो, इस बहाने हमसे भी देश की थोड़ी-सी सेवा हो गई।”

प्रधान खाली उतरले आणि ती नोट त्यांनी मुलांनी दिलेल्या मखमली बटव्यात सरकवून दिली. नंतर फोन करून त्यांनी ही गोष्ट मला कळवली व फोटो पाठवले.

एक शाळकरी ज्योत किती ज्योती लावत गेली…. गोष्ट जुनी पण आज आठवली.. !

(‘आत्मचित्र’ मधून) 

लेखिका: श्रीमती संजीवनी बोकील

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम, आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना, रात्रीच्या वेळी अंधारामुळे त्यांना रस्ता सापडला नाही.

जंगल घनदाट होते. तिथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, न मागे फिरण्याचा.

तेव्हा तिघांनी ठरवले की, एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी मार्गस्थ व्हायचे.

तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.

पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करत असताना, झाडावरून एका पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा देतो आहे, आणि दोनजण झोपले आहेत.

पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान देऊ लागले.

पिशाच्चाचे बोलणे ऐकून सात्यकी संतापला आणि क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला.

तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले.

परंतु जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई, तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार आणखीनच मोठा होई आणि तो सात्यकीला जास्त जखमा करू लागे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले. त्यांनी सात्यकीला झोपायला सांगितले.

सात्यकीने पिशाच्चाबद्दल काहीच सांगितले नाही.

बलराम पहारा देऊ लागले. पिशाच्चाने त्यांनाही मल्लयुद्धासाठी बोलावले.

बलराम क्रोधाने त्याच्यावर धावून गेले, तेव्हा पिशाच्चाचा आकार अजून मोठा झाला.

ते जितक्या रागाने लढत, तितकाच तो अधिक बलवान होत असे.

प्रहर संपला, आणि पहारा देण्याची वेळ भगवान श्रीकृष्णांची आली.

 पिशाच्चाने मोठ्या रागाने श्रीकृष्णांना बोलावले.

परंतु श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले.

पिशाच्च अधिकच संतापले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले, पण श्रीकृष्ण मात्र शांत भाव जपत राहिले.

आश्चर्य असे झाले की, जसे जसे पिशाच्चाचा राग वाढला, तसे तसे त्याचा आकार छोटा होत गेला.

रात्र संपता संपता पिशाच्चाचा आकार इतका लहान झाला की तो शेवटी एक छोटासा किडा झाला.

श्रीकृष्णांनी तो किडा अलगद त्यांच्या उपरण्यात बांधला.

 सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी श्रीकृष्णांना सांगितली.

तेव्हा श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवत सांगितले:

“हे क्रोधाचे पिशाच्च होते. याला शांती हेच औषध आहे.

क्रोधाने क्रोध वाढतो, पण त्याचा प्रतिकार फक्त शांततेने होतो.

मी शांत राहिलो, म्हणून हे पिशाच्च आता किड्यासारखे लहान झाले आहे. ”

तात्पर्य:

क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो.

क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही; तो शांतपणे आणि प्रेमानेच कमी करता येतो, नष्ट करता येतो.

क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारांमध्येच असते.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती: सौ.राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माहेर नसलेल्या मुली

कुठं जात असतील सणावाराला?

सासरी थकून गेल्यावर

चार दिवसांच्या माहेरपणाला?

 

कुणाला सांगत असतील

नवऱ्यानं झोडपल्यावर

भरलेल्या घरात

पोरकं पोरकं वाटल्यावर?

माहेर नसलेल्या मुलींचं

गाव कोणतं असेल?

 

कुठून घेत असतील त्या साडी चोळी

कुणाला बांधत असतील राखी

वडील भावाची ढाल नाही म्हणून

त्या नेहमी भिऊन राहत असतील का जगाला?

दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात

नातवांच्या तोंडावरून मायेनं फिरताना पाहून

काळीज जळत असेल का त्यांचं?

 

माहेर नसलेली मुलगी

आपल्या लेकरांना कसं सांगत असेल

मामा- मामी आजी- आजोबा या हक्काच्या नात्यांबद्दल?

मामाच्या गावाला जायचं

गात असतील का तिचीपण मुलं?

 

आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना?

बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू

कधी मिळत असेल का त्यांना खायला?

 

माहेर नसलेल्या मुली

निवांत झोपू शकत असतील का कुठं

जिथून त्यांना कुणीही लवकर उठवणार नाही?

कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास

फक्त त्यांचाच अधिकार असलेला?

 

माहेर नसलेल्या मुलींना

येत असतील का रोज आईचे फोन

तू बरी हाईस का विचारणारे?

कधी तिला आवडतं म्हणून घरात काही बनतं का

की ती उपाशी निजली

तरी कुणाच्या लक्षातही येत नसेल?

 

माहेर नसलेल्या मुलींचे हुंदके

विरत असतील का हवेत

कुणीही तिला उराशी न कवटाळता?

किंकाळी फोडून रडावं

अशी कूस असलेली जागा मिळते का त्यांना कधी कुठं?

 

माहेरचा आधार नाही म्हणून

माहेर नसलेल्या मुलींना

जास्तच छळत नसेल ना नवरा?

त्रास असह्य झाल्यावर

माहेरला निघून जाईन

अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला?

घर सोडून कुठंतरी जावं या भावनेनं

हजारदा भरलेली पिशवी पुन्हा फडताळात ठेवताना

 चिंध्या होत असतील का त्यांच्या काळजाच्या?

 

माहेरची माणसं असूनही

माहेर नसलेल्या मुलींची वेदना खोल

की माहेरच्या माणसाचा मागमूसही न राहिलेल्या मुलीची जखम ओली

हे ठरवता येत नाही

 

माहेर नसलेल्या मुली

त्यांच्या लेकी-सुनांचं माहेर बनून

भरून काढत असतील का

स्वत:ला माहेर नसण्याची उणीव?

 

माहेर नसलेल्या मुलींना

आयुष्याच्या शेवटाला

कोण नेसवत असेल माहेरची साडी

की निघून जात असतील त्या

या जगातून

‘माहेर नसलेली मुलगी’

हेच नाव धारण करून?

कवयित्री : सौ. लक्ष्मी यादव  

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माझी लेक … – लेखिका: श्रीमती भारती पांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माझी लेक … – लेखिका: श्रीमती भारती पांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

माझी लेक…काळी सावळी..तरतरीत

अभिमानी.

चमकत्या आत्मविश्वासपूर्ण डोळ्यांनी माझ्या नजरेला नजर देत

वाकली नमस्काराला.

मी ठरवलं होतं कधीच

डोळे मऊ होऊ द्यायचे  नाहीत

तिनं मला एक कोवळं हसू बहाल केलं…जिवणीच्या कोपर्‍यातल्या खळीसकट.

काय नव्हतं त्यात?

कुठल्या कुठल्या आठवणी..राग लोभ ..रुसवेफुगवे

तान्हेपण तिचं आणि नवखं आईपण माझं.

चढता ताप तिच्या कोवळ्या शरीराला

आणि माझ्या कासावीस मनाला.

भांडण आम्हा मोठ्यांचं आणि

चेहरा उतरलेला बाळीचा

यशपराक्रम तिचा आणि

अभिमान प्रतिबिंबित माझ्या मनात

आणखीही बरंच काही काही

त्या नजरेत..त्या हसण्यात.

 

तेवढ्यात तिच्या मामानं

तिच्या ताठ पाठीवर हलका हात टेकत गदगदत म्हटलं, चल बाळ

परत एक खोल नजर माझ्या नजरेत

रुतवून ती वळली.

ती आता जी आहे आणि मी आता जी आहे

याबद्दलचं ऋणच जणू आम्ही दोघी स्वीकारत होतो.

फक्त आता तिच्या जिवणीवरचं फुलपाखरू उडून गेलं होतं

नुसती तिथली खळी थरथरत होती.

तिच्या डौलदार पाठमोऱ्या आकृतीकडे पहाता पहाता मी

एकदम अनोळखीच होऊन गेले.

कुण्या परक्या हातानं तिचा शेला सावरला.

आणखी कुणी तिच्या हातात एक भरगच्च हार दिला.

ही तर माझी कुणीच नव्हती

ही एक अनोळखी नवरी मुलगी..

मला क्षणभर वाटलं.

दारातल्या तोरणाखालीच

क्षणभर थबकत तिनं झटकन

मागे वळून पाहिलं.

चमकणारे डोळे आता मोत्यांनी लगडले होते.

थोडं भय थोडी उत्कंठा थोडी उत्सुकता आणि

पाठीशी हवी असलेली

आश्वासक नजर माझी.

 

पुन्हा नजर फिरवून ती

मंडपाकडे चालायला लागली

माझ्या छातीत पोटात डोळ्यात गळ्यात एक जीवघेणी कळ उठली

आज

दुसर्‍यांदा नाळ तुटत होती.

आज

दुसर्‍यांदा नाळ तुटत होती.

लेखिका: श्रीमती भारती पांडे.

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कशास मागू देवाला…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “कशास मागू देवाला” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

क्षणो क्षणी तो देतो मजला,

श्वासामागुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

क्षितिजावरती तेज रवीचे,

रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या,

नक्षत्रांचे लक्ष दिवे..

निळ्या नभावर रांगोळीसम

उडती चंचल पक्षी-थवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

वेलींवरती फुले उमलती,

रोज लेऊनी रंग नवे..

वृक्ष बहरती, फळे लगडती,

 गंध घेऊनी नवे नवे..

हरिततृणांच्या गालिच्यावर,

दवबिंदूंचे हास्य नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

 *

प्रसन्न होऊनी निद्रादेवी,

स्वप्न रंगवी नवे नवे,

डोळ्यांमधली जाग देतसे,

नव दिवसाचे भान नवे,

अमृत भरल्या जीवनातले,

मनी उगवती भाव नवे,

कशास मागू देवाला,

मज हेच हवे अन् तेच हवे?

 *

कोणी आप्त तर कोणी परका,

उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे,

नाम तयाचे नित घ्यावे..

नको अपेक्षा, नकोच चिंता,

स्वानंदाचे सूत्र नवे..

कशास मागू देवाला,

मज हेच हवे, अन् तेच हवे?

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “संगीतोपचार…” – लेखिका : सरस्वती ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “संगीतोपचार…” – लेखिका : सरस्वती ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

काही महिन्यांपूर्वी माझी पुण्यामध्ये संगीत उपचार करणाऱ्या एका ट्रेनरसोबत ओळख झाली. ते Music Therapy वर रिसर्च करतात आणि लेक्चर्स देतात. संगीत उपचारने आपण बऱ्याच त्रासांवर मात करू शकतो किंवा ते कमी करू शकतो. वेगवेगळ्या लोकांच्या वर सध्या पुण्यात खूप ठिकाणी असे उपचार चालू आहेत आणि याचे रिझल्ट्स खूप आश्चर्यकारक आहेत. बऱ्याच लोकांना फरक पडत आहेत. पूर्वी लोकं ग्रामोफोनवर असे बरेच राग ऐकत असत. त्यामुळे त्यांचे आरोग्यही उत्तम राहत असे.

खाली दिलेले सर्व राग तुम्हाला YouTube वर मिळतील.

जात्याच संगीताची आवड असणारी मी, एक प्रयोग म्हणून 30 दिवस दररोज 45 मिनिटे हेडफोन लावून शांत ठिकाणी यातील काही राग ऐकले. आणि मलाही आश्चर्यकारक फरक जाणवले. संगीतावर माझा शास्त्रीय अभ्यास नाही; पण संगीत आणि गाणी हा माझा खूप आवडता छंद आहे.

राग आणि त्यांच्या श्रवणाचे लाभ:

 १. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा.

 २. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा.

 ३. राग देस – उत्थान व संतुलन साधणारा.

 ४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा.

 ५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणीव करून देणारा राग.

 ६. राग शाम कल्याण – मूलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा.

 ७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि ऊर्जा निर्माण करणारा.

 ८. राग केदार – स्वकर्तृत्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारा, भरपूर उर्जा निर्माण करणारा, तसेच मूलाधार उत्तेजित करणारा.

 ९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा.

 १०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा, प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा.

 ११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा, भावनाप्रधान राग, सर्व सदिच्छा पूर्ण करून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग.

 १२. राग मालकंस – अतिशय शांत – मधुर राग. प्रेमभाव निर्माण करणारा व सांसारिक सुख वृध्दिंगत करणारा.

 १३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग. हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जागृत करणारा असा आहे.

 १४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यशदायक आहे. विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो.

 १५. राग भीमपलासी – संसार सुख व प्रेम देणारा.

 १६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो. आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग.

 १७. राग गौरी – शुध्द इच्छा, मर्यादाशीलता, प्रेम, समाधान, उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहीशा करणारा.

 विशेष सूचना:-

डॉक्टरांचे उपचार घेत असताना हे संगीतोपचारही घ्यावेत, पण डॉक्टरांचे उपचार मात्र थांबवू नयेत.

#हृदयरोग

राग दरबारी व राग सारंग

१) झनक झनक तोरी बाजे पायलिया( मेरे हुजूर )

२) तोरा मन दर्पण कहलाए ( काजल )

३) बहुत प्यार करते है, तुमको सनम ( साजन )

४) जादूगर संय्या छोडो मेरी ( नागिन).

 #विस्मरण

लक्षात रहात नाही त्यांनी शिवरंजनी राग ऐकावा

१) मेरे नयना सावन भादों (मेहबूबा)

२) ओ मेरे सनम (संगम)

३) दिल के झरोखे मे तुझको बिठाकर(ब्रह्मचारी )

४) जाने कहा गये वो दिन(मेरा नाम जोकर )

#मानसिक_ताण_अस्वस्थता

ज्यांना मानसिक ताण भरपूर प्रमाणात असेल त्यांनी राग बिहाग आणि राग मधुवंती वर आधारित गाणी ऐकावीत.

१) पिया बावरी ( खूबसूरत )

२) मेरे सूर और तेरे गीत (गूँज उठी शहनाई )

३) मतवारी नार ठुमक ठुमक चली(आम्रपाली)

४) तेरे प्यार में दिलदार ( मेरे मेहबूब )

  #रक्तदाब

हाय ब्लड प्रेशर साठी हळू ( धीमी गती ) चालीची, तर लो ब्लड प्रेशर साठी जलद चालीची गाणी फायदेशीर ठरतात.

  #उच्च_रक्तदाब

१) चल उड़ जा रे पंछी ( भाभी )

२) चलो दिलदार चलो ( पाकीजा )

३) नीले गगन के तले( हमराज )

४) ज्योती कलश छलके ( भाभी की चूड़ियाँ )

 #कमी_रक्तदाब

१) जहाँ डाल डाल पर ( सिकंदरे आज़म )

२) पंख होती तो उड़ आती रे ( सेहरा )

३) ओ निंद ना मुझको आये ( पोस्ट बॉक्स नं. ९०)

 #रक्तक्षय_ऍनिमिया

अशा वेळी राग पिलू वर आधारलेली गाणी ऐकावी.

१) खाली शाम हाथ आई है ( इजाजत )

२) आज सोचा तो आँसू भर आये ( हँसते जख्म )

३) नदियाँ किनारे ( अभिमान )

४) मैने रंग ली आज चुनरिया ( दुल्हन एक रात की)

#अशक्तपणा

शक्ती ताकद कमी झालेली वाटतेय, उत्साहाचा अभाव काही करण्याचा कंटाळा येतो अशा वेळी राग जयजयवंतीवर आधारित गाणी ऐकावीत.

१) मोहब्बत की राहों मे चलना संभलके ( उड़न खटोला )

२) मनमोहना बड़े झूठे ( सीमा )

३) साज हो तुम आवाज हूँ मै ( चंद्रगुप्त )

 #पित्तविकार_ॲसिसिटी

ॲसिसिटीवर उपाय म्हणून राग खमाज वर आधारित असलेली गाणी ऐकावीत.

१) छूकर मेरे मन को ( याराना )

२) तुम कमसीन हो नादां हो ( आई मिलन की बेला )

३) आयो कहाँ से घनश्याम ( बुढ्ढा मील गया )

४) तकदीर का फसाना जाकर किसे सुनाये ( सेहरा )

राग केदार:

१) हमको मन की शक्ती देना ( गुड्डी)

२) आपकी नजरो में (घर)

३) पल दो पल के ( द बर्निंग ट्रेन)

४) दर्शन दो घनश्याम नाथ मोरी

राग भैरवी:

१) तुमही हो माता पिता तुमही हो

२) ये गलिया ये चौबरा ( प्रेमरोग)

३) दिल दिया हैं जान भी देंगे ( कर्मा)

४) दुनिया बनाने वाले क्या तेरे मन मे (तीसरी कसम)

राग यमन:

१) धुंदी कळ्यांना ( धाकटी बहीण)

२) जिथे सागरा धरणी मिळते (पुत्र व्हावा ऐसा)

३) इक प्यार का नगमा है( शोर)

४) नाम गुम जायेगा ( किनारा)

राग मालकंस:

१) आधा है चंद्रमा रात आधी ( नवरंग)

२) पग घुंगरू बांध मिरा नाचे( नमक हलाल)

३) दिल पुकारे आरे आरे (jewel thief)

४) ये मालिक तेरे बंधे हम ( दो आंखे बाराह हाथ)

राग अहिरभैरव:

१) तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

२) अलबेला सजन आयो रे ( हे गाणे हम दिल दे चुके सनम मधले न ऐकता बाजीराव मस्तानी ह्या सिनेमातले ऐकावे)

३) सोला बरस की बाली उमर को सलाम ( एक दुजे के लिये)

४) कोमल काया विमोह माया ( नटरंग)

राग हंसध्वनी:

१) अखेरचा हा तुला दंडवत( मराठा तितुका मिळवावा)

२) अग नाच नाच राधे उडवूया रंग ( गोंधळात गोंधळ)

राग भूप:

१) इन आंखो की मस्ती के ( उमराव जान)

२) देखा एक ख्वाब तो सिलसिले हुये (सिलसिला)

३) कांची रे कांची ( हरे राम हरे कृष्ण)

४) सायोनारा ( लव इन टोकियो)

राग आसावरी:

१) इक राधा इक मीरा ( राम तेरी गंगा मैली)

२) मेरे महबूब कयामत होगी ( Mr. X in Bombay)

३) हम तेरे बिन अब रह नही सकते (आशिकी)

४) कौन तुझे यू प्यार करेगा (MS Dhoni)

राग दुर्गा:

१) सावन का महिना, पवन करे शोर ( मिलन)

२) तू इस तरह से मेरे जिंदगी में शामील है ( आप तो ऐसे ना थे)

राग देस:

१) वंदे मातरम्

२) प्यार हुआ छुपके से ( 1942 love story)

३) अजी रुठकर कर के कहा जाईएगा ( आरजू)

४) चदरिया झिनी रे झिनी ( जुदाई)

राग बिलावल:

१) लग जा गले ( वो कौन थी)

२) जय जय संतोषी माता ( जय संतोषी माता)

३) जण गण मन अधिनायक

४) ओम जय जगदीश हरे

राग श्यामकल्याण:

१) शूरा मी वंदिले

राग भीमपलासी:

१) तू चीज बडी है मस्त मस्त ( मोहरा)

२) ये अजनबी तू भी कभी ( दिल से)

३) तू मिले दिल खिले ( Criminal)

४) नैनो में बदरा सावन (मेरा साया)

रागाची चव कळावी म्हणून मी ही सर्वपरिचित चित्रपटगीते दिली आहेत. जेव्हा केव्हा मी माझी काही favourite गाणी ऐकत असते तेव्हा ती कोणत्या रागावर आधारित आहे हे आवर्जून पाहत असते. अजूनही तुम्हाला वरील रागावर YouTube वर खूप गाणी मिळतील.

पण मी म्हणेन प्रत्यक्ष राग- सर्वांगाने सजवलेला- ऐकणे अधिक लाभदायक ठरेल.

लेखिका : श्रीमती सरस्वती

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘सुकी पुरी…’ –- लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सुकी पुरी…’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

ते आजोबा नातवाला घेऊन रोज बागेत यायचे. त्याच्यासाठी कायम फिल्डर कम बॉलर बनून तो थकेस्तोवर त्याला बॅटिंग करू द्यायचे.

क्रिकेट खेळून मन भरलं की मग आजोबा घोडा बनणार… आणि त्यांचा पाचेक वर्षाचा नातू त्यांच्या पाठीवर घोडेस्वार बनून त्यांना त्या लॉनमध्ये इकडे तिकडे फिरवणार.

मग दोघेही थकले की आजोबा त्याला जवळ घेऊन कसली तरी गोष्ट ऐकवायचे…

‘मग एवढा मोठ्ठा राक्षस आला…’ आजोबा अगदी राक्षसारखं तोंड वगैरे करून गोष्ट रंगवायचे.

‘…आणि मग त्या राक्षसाला मारून तो राजकुमार राजकुमारीला सुखरूप घेऊन गेला आणि त्यानं खूप वर्षे राज्य केलं…’

रोज एका नव्या गोष्टीचा सुखांत व्हायचा. तृप्त मनानं आजोबा आणि तृप्त कानांनी तो नातू मग चांदणं बघत घरी निघायचे. ठरल्याप्रमाणं तो भेळ-पाणीपुरीवाला बागेच्या दारात वाट पाहत उभा असायचा.

“आजोबा, सुकी पुरी…”

नातवानं फर्माईश केली की आजोबा एक प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू एक प्लेट फक्त सुकी पुरी खाणार…

मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचं तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार.

त्यानं पूर्ण पाणी प्याल्यावर शिल्लक राहिलं, तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.

त्यांचं ते निर्व्याज प्रेम आणि त्या नातवाच्या बाळलीला बघून बरेच जण तृप्त होत होते… ज्यांना जमेल त्यांनी आपापला नातू आणायला चालूही केलं होतं आणि ज्यांना शक्य नव्हतं ते एखादा जास्तीचा फोन करून नातवाशी गप्पा मारत होते–  कुणी शहरातल्या नातवाशी, कुणी गावातल्या, तर कुणी सातासमुद्रापार गेलेल्याशी…

त्या दिवशी आजोबा एकटेच होते. त्यांना एकटं पाहून त्यांच्याहून जास्त बेचैनी रोजच्या बघ्यांना झाली होती. एखादं सुंदर कारंजं अचानक थांबल्यावर किंवा एखादी गार  वाऱ्याची झुळूक अचानक थांबल्यावर, एखादी सुरेल लकेर वरच्या पट्टीत गेल्यावर मध्येच रेडिओ खरखरल्यावर हमखास जसं होतं, अगदी तस्सं…

“आजोबा आज एकटेच… नातू नाही?”

आजोबा फक्त हसले. थोडा वेळ बागेत चकरा मारून झाल्यावर झोपाळयावर खेळणाऱ्या मुलांपाशी थोडेसे रेंगाळले. सुरकुतीतल्या मिशा थोड्याशा हलल्या. त्या मुलांना एकदोन चेंडू टाकून निघाले.

दारात नेहमीचा भेळवाला भेटला; पण आज काही त्यांनी तिखट पाणीपुरी घेतली नाही… त्यांची पावलं झपझप पुढच्या काळोखात विरून गेली.

“एक सेवपुरी देना…उसमे शेव कम डालनेका और कांदा थोडा जास्ती. तिखट मिडीयम रखना…” मी त्या भेळवाल्या भय्याला सांगितलं.

“ही घ्या साहेब तुमची कमी शेव, जास्त कांदा आणि मध्यम तिखटाची शेवपुरी…” त्याचं अस्खलित मराठी माझ्या अस्तर लावून बोललेल्या हिंदीची लक्तरं टांगत होतं.

“ते आजोबा थांबले नाहीत आज… छान खेळतात रोज नातवाशी आणि पाणीपुरी खातात तुझ्या गाडीवर… त्यांचा नातू नव्हता नाही का आज सोबत?” माझी अस्वस्थता मी बोलून दाखवली.

“तो त्यांचा नातू नाहीच साहेब… समोरच्या वस्तीतला पोरगा आहे तो… सैनिक स्कूलला गेला काल. एकदा चोरी करताना आजोबांनी त्याच्या बापाला आणि त्याच्या मित्राला पकडलं. प्रकरण पोलिसांत गेलं. घरची गरिबी बघून आजोबांनी केस मागं घेतली. त्याला चार चांगल्या गोष्टी सुनावल्या आणि पदरमोड करून त्याला सैन्यात भरती केलं.

लग्न लावून दिलं त्याचं आणि वर्षाचा पोरगा मागे ठेवून काश्मीरमधून तिरंग्यात गुंडाळून परत आला! सरकारी मदत जी मिळायची ती मिळालीच पण त्याची बायको आणि पोरगं वाऱ्यावर उघडे पडू नयेत म्हणून यांनी त्यांना स्वतःच्या घरात घेतलं. स्वतःच्या नातवासारखं त्याला आणि पोटच्या पोरीसारखं त्याच्या आईला जपतात…”

“मग आजोबांच्या स्वतःच्या घरचं कुणी…?”

“ उभी हयात सीमेवर शत्रूशी लढण्यात गेली, साहेब… शत्रूला डावपेचात मागं टाकण्याच्या विचारात संसाराचा डाव मांडणं जमलंच नाही… अजूनही सगळी पेन्शन आणि वेळ अशा रुळावरून खाली घसरू लागलेल्या पोरांना सावरण्यात घालवतात…”

“तुला इतकं सारं तपशीलवार कसं रे माहीत?”

“साहेब, तो चोरी करताना पकडलेला दुसरा पोरगा मीच होतो. ही भेळेची गाडी त्याच देव माणसानं टाकून दिलीय!”

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जागं होणारे बेगडी देशप्रेम कुठंतरी डोळे ओले करून गेलं!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares