… फार आग्रह केल्यानंतर वरदक्षिणा म्हणून फक्त चरखा मागणारे शास्त्रीजी
… परिवहन मंत्री असताना भारतातल्या पहिल्या महिला कंडक्टर ची नेमणूक करणारे शास्त्रीजी
… गृहमंत्री म्हणून काम करताना लाठी ऐवजी पाणी वापरण्यास सांगणारे शास्त्रीजी
… वयाच्या दीड वर्षी वडील गमावल्यानंतर कित्येक मैल भर दुपारी अनवाणी चालत काॅलेजला जाणारे शास्त्रीजी
… पुस्तके डोक्यावर बांधून दररोज दोन वेळा नदी पोहून शाळेत जाणारे शास्त्रीजी
… एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा देणारे शास्त्रीजी
… गरीब लोकांची घरे पाडावी लागू नये म्हणून घरी पायी जाणारे पंतप्रधान शास्त्रीजी
… पंतप्रधान असताना मुलाच्या काॅलेज अर्जावर आपला हुदा सरकारी कर्मचारी लिहिणारे शास्त्रीजी
… पाकिस्तानला सर्वात प्रथम पाणी पाजणारे, जय जवान जय किसान जयघोष करत सैनिकांसाठी पुर्ण देशासोबत दर सोमवारी उपवास करणारे शास्त्रीजी
… पंतप्रधान असताना खासगी कामासाठी सरकारी गाडी वापरल्यावर लगेच त्याचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करणारे शास्त्रीजी.
मृत्यू नंतर त्यांच्या नावावर घर जमीन मालमत्ता काहीच नव्हते, होते फक्त फियाट घेण्यासाठी घेतलेले कर्ज. आणि बँकेने ते कर्ज शास्त्रीजींच्या पश्चात त्यांच्या पत्नीकडून वसूल केले.
साध्या पण निग्रही, मृदु स्वभावाचे पण कर्तव्यकठोर वृत्तीचे, सगळ्यात कमी कालावधीत मोठा प्रभाव टाकणारे आपले दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीजी, …. त्यांना अनंत दंडवत….
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
ल आणि ळ ही दोन स्वतंत्र अक्षरे. या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते.
त्यामुळे अनेकदा ळ चा उच्चार काही लोक सहजपणे ल सारखा पण ल नाही, * ल * व *ळ * च्या मधला करतात. तर काही वेळेस ल करतात. ल हा उच्चार जगातील सर्व भाषांमधे आहे.
पण ळ हा उच्चार भारताबाहेर फक्त नेपाळमधे आहे, बाकी जगात कोठेही नाही.
भारतातदेखील ळ हा उच्चार सर्वत्र नाही.
संस्कृतमधे सध्या ळ नाही. हिंदी, बंगाली, आसामी मधे ळ नाही. सिंधी, गुजराती मधे ळ आहे,पण माझ्या अंदाजानुसार फारसा वापरात नाही. मराठी व दक्षिण भारतातील सर्व भाषात ळ आहे व वापर भरपूर आहे.
ल व ळ च्या उच्चारातील सारखेपणामुळे ळ च्या ऐवजी ल बोलले लिहिले तर कुठे बिघडते ? असे अनेकांना वाटत असेल कदाचित. हिंदीत कमल व मराठीत कमळ … ल काय , ळ काय..काय फरक पडला?
पण तसे मराठीत होत नाही. ल की ळ यावरून अर्थामध्ये फरक पडतो.
काही शब्द पाहू….
अंमल – राजवट // अंमळ – थोडा वेळ
वेळ time // वेल- झाड, सायलीचा वेल वगैरे
खल- गुप्त चर्चा किंवा खलबत्ता मधील खल // खळ- गोंद
पाळ – कानाची पाळ // पाल -. सरडा, पाल वगैरे
नाल.- घोड्याच्या बैलांच्या खुरांना मारतात ती धातूची पट्टी //
नाळ – बाळ आईच्या पोटात असताना अन्न पुरवठा वगैरे करणारा बेंबीशी संबंधीत अवयव
☆ स्वाधार प्रकल्प – पर्यावरण उत्सव – इको मेला… ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
दिनांक ३० सप्टेंबर २०२३ यादिवशी पर्यावरण उत्सव स. ८:०० ते दु. ३:०० या वेळेत झाला. या उत्सवात एकुण ३२ गावातून १८२ जण सहभागी झाले. वेल्हे तालुक्यातील जैवविविधता समजून घेत असताना ही विविधता सर्वांपर्यंत पोहचावी असा उद्देश ठेवून पहिल्या पर्यावरण उत्सवाचे नियोजन करण्यात आले. हा उत्सव पासली येथे सुरू होऊन वेगवेगळ्या ५ गावांमध्ये जाऊन संपला.
सकाळी ८:३० वाजता पासली येथे शुल्क देऊन आलेले साधारण १०८ पाहुणे व आपल्या ५० कार्यकर्त्या + स्थानिक १५-२० असे १८० जण पोहचल्यावर सर्वांसाठी नाचणी उपमा, घावन चटणी, पोहे असा ज्यांना जो हवा त्याप्रमाणे नाष्टा झाला.
एकीकडे २१ रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. ते बघण्याचा आणि माहिती घेण्याचा आनंद सर्वजण घेत होते. त्याचबरोबर बचत गटातील महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. तिथे ही कोणी बांबूच्या वस्तू खरेदी केल्या तर कोणी गावरान तूप, नाचणी लाडू, मिश्र धान्य लाडू, नाचणी रवा, हळद, थेपला, पर्स, शेवई… अशी एकुण साधारण १५०००/- रुपयांची विक्री झाली. त्यानंतर सर्वांना एकत्र करुन प्रबोधिनी व प्रकल्पाबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर सगळा गट केळदची देवराई बघण्यासाठी गेला. तिथे अमृता जोगळेकर व मेधावी राजवाडे या दोघींनी सर्वांना देवराईची माहिती दिली. दु. १:०० या सर्वांचे गट करून ५ गावांमध्ये व्हेज व स्थानिक नॉनव्हेज जेवणासाठी गेले.
कोफोर्ज मधून ६ जणांचा गट आला होता त्यांनी पुढे निगड्यात जाऊन गटाने वृक्षारोपण केले व जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर त्या त्या गावात समारोप झाला. *या उत्सवात एकुण ९०,०००/- रुपयांची उलाढाल झाली.
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ एक कडवट सत्य… — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
एके काळी आम्ही लालबागला रहाणारे अणि मुंबईतील इतरही सर्व मंडळी अगदी सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे….
चिंचपोकळी लेन, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान …. मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर…. पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा. कांबळी, फाटक, पेडणेकर यांची चलत् चित्र प्रदर्शने हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचं.
मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला …. पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं …. अगदी बाप्पांचा आकारही वाढला …. काळ बदलला, समजलच नाही, काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, त्यांची प्रदर्शने लुप्त झाली.
सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत. आज कुणाला मार्केटचा गणपती दाखवायला जायचे म्हणजे मोठा विचार पडतो.
साधी रांग, नवसाची रांग, व्ही.आय.पी रांग …. पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, जवळून दर्शन, दुरून दर्शन …. प्रत्येक दर्शनाचा भाव (भावना नव्हे) निराळा….
आम्हाला आजही आठवतं, कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची आरती पण होत नसे, परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची. आता बाजूला रहिवाशांनाही तिकडे जाता येत नाही ….
श्रद्धा तेवढीच राहीली, पण पेटी आणि किर्ती मोठी झाली. आम्हाला त्या देवाची आठवण येते, पण त्या देवाला आमचा चेहरा आठवत नाही का …. ?
नसेल कदाचीत, कारण आता “राजा” अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे, “VIP” झाला आहे बाप्पा ….
आता आम्ही लालबागकर तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो …. आमची सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो …. “राजा”ला इथूनच साष्टांग दंडवत. हात येथूनच जोडतो.
” देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग । पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग ?
देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती । बंदुका रे आम्हावरी, त्यांचे रक्षक रोखती.
देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी । कुठे लपवावी सांग गूळ-खोबऱ्याची वाटी.
देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे । माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे.
देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना । समजेल का तुला, माझी उपाशी वेदना.
देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट । तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट.
देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी ही सोडतो । तुला ठेवतो हृदयी, हात येथूनच जोडतो …. !!
|| गणपती बाप्पा मोरया ||
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एस्.डी. इंडस्ट्रीच्या मालकाच्या घरून आलेल्या गणपतीने विचारलं. लगेच दुसरा म्हणाला “थांबा थोडा वेळ ! झोपडपट्टीतला छोटा गुंड्या मोरयाला सोडतच नाहीय सारखा मोरयाला मिठी मारून ” नको ना जाऊस,” म्हणून जोरजोरात रडतोय. त्यामुळे मोरयाचाही पाय निघत नाहीय.येईलच आता तो. संध्याकाळ होत आली.आता आलच पाहिजे त्याला. तेवढ्यात मोरया गुंडा भाऊला सोडून कसाबसा धावत आला. त्याचे डोळे भरून आले होते. गळ्यात हुंदका दाटून आला होता.सगळ्यानी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचं सांत्वन केलं.
“चला रे चांगला मोठा गोल करा” आज विसर्जन झालेले सर्व गणपती एकत्र आले होते.”आता शिदोरी सोडा बरं!” प्रथम मोरयाच्या सुचनेनुसार सगळ्यानी आपापली शिदोरी सोडली.
प्रथम आलेला मोरया म्हणाला.आणि हो! आपापला अनुभव पण सांगा बरं.
सगळ्यांनी गोल करून आपापली शिदोरी सोडली.तळलेले मोदक तर सगळ्यांच्याचकडे होते.पण प्रत्येकाला आलेला अनुभव मोदकांच्या सारणासारखा गोड होताच,असं नाही.शेवटी पदार्थ करणारीच्या भावना पदार्थात उतरतातच नाही का!
प्रथम आलेला मोरया म्हणाला मीच पहिल्यांदा माझा अनुभव सांगतो.
एस्. डी इंडस्ट्रिजच्या मालकाकडचा मी दीड दिवसाचाच पाहुणा होतो.घर कसलं भलामोठा बंगलाच होता तो.जागोजागी श्रीमंती ओसंडून वहात होती. मला बसायला मऊ मखमली आसन.समोर थुईथुई उडणारं कारंज.त्यात पोहणारे हंस.माफक प्रकाश योजना.दारातच चेहर्यावर वैतागलेला भाव असलेल्या,खूप नटलेल्या बाईनं जरा घाईघाईतच माझं स्वागत केलं.तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं असावं.केवळ नाईलाज म्हणुन मला यानी घरी आणलंय असं मला वाटलं.ना कुणी “गणपती बाप्पा, मोऽऽरऽया” अशी आरोळी ठोकली, ना दणक्यात आरती ना घसघशीत नैवेद्य.ती बया नोकराना सारख्या सूचना करीत होती.”अगदी नैवेद्यापुरतंच करा .आम्ही दोघेही गोड खाणार नाही.” खरं सांगू का, माझातर मूडच गेला. दुसरे दिवशी घरच्या स्वयंपाकीणीनेच चांदीच्या ताटात नैवेद्य दाखवला.तो नैवेद्य माझ्या उंदराचंही पोट भरु शकला नसता.एवढुसाच होता .अगदी बाराच्या ठोक्याला माझ्या हातावर दही ठेवून बोळवण झाली सुद्धा. शिदोरी म्हणून चॉकलेटचे मोदक, विकत आणलेले मला दिले. हे पहा. हा दीड दिवसाचा पाहुणा म्हणजे मी केव्हा एकदा परत जातो असं घरातल्यांना झालं होतं. कामाच्या बायका स्वच्छता टापटीप करत होत्या. स्वयंपाकीण नैवेद्याचे पदार्थ करत होती. नुसतं पाणी फिरवून फक्त नैवेद्य दाखवायलासुद्धा मालकिणीला वेळ नव्हता. अगदी कोरड्या डोळ्यांनी माझी पाठवणी केली रे. फक्त एवढंच गाडीतून गेलो आणि गाडीतून परतलो.बस्स इतकंच .
प्रत्येकाला आपण गेलेल्या घरातला संवाद आठवत होता.
भल्या मोठ्या फोर बीएचके मध्ये राहणाऱ्या गोळे आजी-आजोबांना हौस दांडगी. शरीर साथ देत नव्हते तरीसुद्धा त्यांनी परंपरा सांभाळायची आणि आवड म्हणून म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव केला. दरवर्षीप्रमाणे आजीनी माझ्यासाठी नवीन कुंची शिवून त्यावर मोती लावून ठेवलेली होती. घरात नैवेद्यासाठी डिंकाचे, बेसनाचे, रव्याचे,बुंदीचे, तिळाचे असे विविध प्रकारचे लाडू तयार केलेले होते.अत्यंत हंसतमुखानी त्यांनी माझं स्वागत केलं. मी घरी गेल्यावर मला कुठे ठेवू नी काय काय करू असं त्यांना झालं होतं.गोळेआजी रोज माझी फुलांनी दृष्ट काढायच्या. आजी गजरा घालून छान नटायची.तिच्या नटण्यापेक्षा तिच्या चेहर्यावरचं हंसूच मला जास्त विलोभनीय वाटायचं.आरामात लोडाला टेकून आजी आजोबांचे खुसखुशीत संवाद ऐकताना मला मोठी मजा यायची. आरतीसाठी आपार्टमेंट मधल्या सगळ्या बाळ गोपाळांना जमा करून दणक्यात आरती करायचे. केवळ खाऊ मिळतो म्हणून हे बाळ गोपाळ जमायचे. ना त्यांना आरती यायची ना मंत्रपुष्प. देवघरातली घंटीसुद्धा मुलाना वाजवायची माहित नव्हती.
आजी आजोबानी मनापासून केलेला पाहुणचार मला फारच आवडला. सकाळी सकाळी आजोबा माझ्यासाठी व आजीसाठी चहा करायचे. चहा काय फक्कड करायचे माहिती आहे!.मला चहाचा नैवेद्य दाखवून म्हणायचे.”गणराया,बघ जमलाय का चहा.अरे पृथ्वीवरचं अमृत आहे हे. तिथं स्वर्गात नाही मिळायचं.बघ..
आणखी एक कप हवा का?”आणि खळखळून हसायचे. मग मला नाश्ष्टा त्यानंतर सुग्रास जेवण. असं दोन्ही वेळेला मिळायचं. दोन्ही वेळची आरती अगदी सुगंधी फुलं अत्तर लावून असायची. फार फार आवडलं मला. येताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझा पाय काय घरातून निघेना. मोठ्या प्रेमानं शिदोरी म्हणून 21 तळणीचे मोदक, गुळाचा खडा,पाणी देऊन हातावरास गोड दहीसाखर देऊन त्यानी माझी बोळवण केली. “तझा प्रवास सुखकर होवो.पार्वती मातेला महादेवाना आमचा नमस्कार सांग ” असा आशीर्वादही दिला.ही गोड शिदोरी मी कायम लक्षात ठेवीन . त्यांची मुलं अमेरिकेत ना! मग मलाच मुलगा म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं .वाईट इतकंच वाटते की मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही.
द्रौपदी आजीच्या घरी गेलेला गणपती म्हणाला द्रोपदी आजीना तीन नातीच आहेत. सगळ्या हुशार चटपटीत,आपापल्या कामात एकदम हुशार . द्रौपदी आजी आपल्याला नातू नाही म्हणून त्या नातींचा राग राग करायच्या. त्यांच्याबरोबर माझाही त्यांनी राग राग केला.
म्हणाल्या परंपरा सांभाळायच्या म्हणून तुला आणला. मला एखादा नातू द्यायला तुला काय झालं होतं रे,? नाईलाजाने करतीय मी हे सगळं, लक्षात ठेव!.उद्या कोण बघेल हा संसाराचा पसारा”? मी मनात म्हंटलं आजीबाई “आपण गेलं,जग बुडलं” ही म्हण माहीत नाही का? जे नाही त्यासाठी का रडायचं? तरीही नातीने केलेली सेवा पाहून मला खूप छान वाटलं.
कुलकर्णी कडून आलेला गणपती म्हणाला, “अगदी ऐसपैस स्वागत झालं हं माझं.” सगळ्या जावा भावा एकत्र येऊन माझा उत्सव साजरा करत होत्या. अगदी गोकुळात गेल्यासारखा वाटलं मला.काय तो आग्रह…. जेवायला बोलावलेले गुरुजी जेवून तिथेच कलंडले तरी आग्रह संपेना.झोप म्हणून दिली नाही मला. भजन,पारंपरिक खेळ, हास्यविनोद आणि आरती सुद्धा दणक्यात हो. एक नाही चांगल्या दहा दहा आरत्या म्हटल्या जायच्या. त्यामुळे मला खरोखर झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही . त्यांची मोलकरीणसुद्धा खुष होती बर का! सणाचं जादा काम पडणार म्हणून कुलकर्णी वहिनींनी आधीच गणपतीसाठी म्हणून तिला एक हजार रुपये जादाचे दिले होते.मोठ्ठ घर तसं मन ही मोठ्ठ आहे हो त्यांच.त्याही आनंदाने काम करत होत्या. प्रेमाने माझ्याकडे बघायच्या माझी अलाबला घ्यायच्या. खूप खूप मजा आली.
गोखले आजींच्या कडे गेलेला गणपती म्हणाला गोखले आजीना दोन नातीच पण कोण कौतुक त्यांना. दोघी हुशार अभ्यासात तर हुशार आहेतच शिवाय गायन, वादन, नृत्य यातही त्या पारंगत आहेत. काय सुरेख नृत्य केलं त्यांनी. क्षणभर मलाही वाटले की आपणही त्यांच्याबरोबर नृत्य करावं.
पंत वाड्यातून परतलेला गणपती थोडा उदास होता शिसवी महिरपीचा खास गणपतीचा भला मोठा कोनाडा त्यासमोर फळांचा मांडव. चांदीच्या समया पासून सगळ्या वस्तू चांदीच्या. भल्या मोठ्या वाड्यात दोनच व्यक्ती राहतात . मुलं, सुना, नातवंडं सगळी परदेशात. त्यामुळे वाडा अगदी उदास दिसत होता. त्यांनी माझा आगत स्वागत खूप चांगलं केलं, पण उदास वातावरणानं मलाही उदास वाटायला लागलं.घर कायम भरलेलं हवं असं मला वाटलं.
शांतीनगर मधून आलेला गणपती आला तोच मुळी कानात बोटं घालून. आल्या आल्या डोळे मिटून शांत बसून राहिलेला होता. तो म्हणाला काय तो कर्कश आवाज. ते गलीच्छ नाच.ते पाहून केव्हा एकदा आपण आपल्या घरी जातो असं वाटलं मला.कैलासाची,पार्वती मातेची मलाखूप आठवण आली.
एक मोरया म्हणाला मी खरंच भाग्यवान बरं का! खाऊनपिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय रोकडेंकडे गेलो होतो मी.तिथे बाप लेक अगदी मित्रासारखे वागत होते. सुना हंसतमुख होत्या.नातवंड आजी आजोबांबरोबर दंगा मस्ती करत होते.शुभंकरोती,रामरक्षा म्हणत होती. संध्याकाळी मला नमस्कार करून वडीलधार्यानाही नमस्कार करत होती. फारच छान वाटलं मला.त्या आजी माझ्याशी तासनतास बोलायच्या.नातवंडांना माझ्यासमोर उभं करून म्हणायच्या “मुलानो पाहुण्यांपाशी बसा जरा.बोला त्याच्याशी.कसा आहेस तू,तुला घरची आठवण येते का विचारा त्याला.झोपण्यापूर्वी त्या एकट्या माझ्याशी बोलायला बसायच्या.कुठं दुखतं खुपतं सांगायच्या.मग तोंडभर हंसून आपणच म्हणायच्या “मी कांही मागत नाही हो तुला! मी कुणापुढं बोलणार सांग ना!तेवढंच मन मोकळं झालं . तू सुखी रहा.बरं का म्हणजे आम्हालाही सुखी ठेवशील.हो ना!”
गंमत म्हणून विचारते. आमच्या घरासाठी आम्ही तुझी निवड केली.खूष आहेस ना तू? का तुला अमिताभ बच्चनच्या, तेंडुलकरच्या, आमदार,खासदारांच्या घरात जावंस वाटत होतं??? आम्ही माणसं ना खूप सुंदर ,सुंदर स्वप्नं पाहतो. ती पुरी होणार नाहीत हे माहीत असतं पण ” वचने कीं दरिर्द्रता ” हो की नाही?.स्वप्नंच ती. मग मोठी बघितली म्हणून कुठं बिघडलं? खूप हसायच्या त्या.मला भरपूर शिदोरी दिलीय.मी निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले.खूप मस्त वाटलं मला.
पहिला मोरया म्हणाला. खूप छान अनुभव सांगितले सगळ्यानी.असं वाटतं आपण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करावी.पण प्रत्येकाचं प्राक्तन असतं ना!त्यात आपण देव असूनही ढवळाढवळ करू शकत नाही.
सगळ्यात छोटा आवेकरांकडचा गणपती गंमतीनं म्हणाला.आपलं प्राक्तनतरी कुठं चुकलंय.कुणाच्या घरी आपण जायचं हे आपण थोडच ठरवलं होतं?तसं असतं तर सगळेच लालबागचा राजा झाले असते.यावर एकच हंशा पिकला.
आपण दरवर्षी विविध रुपात पृथ्वीवर जातो.माणसाना आपल्या येण्याने थोडाफार आनंद मिळतो. त्यांचं सुखदुःख ऐकतो.त्यात सामिलही होतो.आपण परत येताना ते म्हणतात.” पुढल्यावर्षी लवकर या “. आपणही एवढंच म्हणूया ….
सर्वे सुखिनः सन्तु……
आणि पुढच्या वर्षाची वाट पाहू या.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
🌺 “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं,
” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं.
ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.
कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, ” राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेऊ. तेव्हा द्या.”
थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, ” काका एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “
सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गांवात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”
कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला.
काका म्हणाले, ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही… तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले “माझं बाळ…! ” …. हे असं घडल्यापासून. ह्या गावातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो “
कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं– ” पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”
” ते ही केलं पण… जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही “
हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, ” काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!”
सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले, ” विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल… रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय….. विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीये . “
यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली, म्हणाला, ” काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडे जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदलली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले
” दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “*
कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं, ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “
काकांनी स्मित केलं, ” दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “
हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले..!
काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही … पण त्याला एकाच प्रेमाची गरज .. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” .. हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!
…. सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले ….. अगदी अनाहूतपणे …!!
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈