मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ :: इठ्ठला :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ :: इठ्ठला :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

इठ्ठला… किती येळ असा

रहाणार रं उभा

इथं कुणीबी तुले म्हण्णार न्हाई

बस की रं बाबा…! 

 

तुझ्यासंगं रख्माई बी

हाये ना रं हुभी… 

तिचा इचार कर की जरा

ती बोलायची न्हाय कधी…! 

 

पाय बी किती दुखून दुखून

गळले असतील की रे… 

चार घटका बस ना जरा

वाटल की रं बरे…! 

 

बस जरा थोडं तेल

लावते गरम गरम… 

पायांले पडल आराम

पडतील जरा नरम…! 

 

किती काळ वाट पाहणार

आता पुंडलिकाची… 

वारकरी पाई येतात

तिबी रुपंच की रं त्याची…! 

 

बास झालं सोड आता

हट्ट जगायेगळा… 

रख्माईसंग बैस अता

हो बंधनातून मोकळा…! 

 

कटीवरचे हात बी जरा

उतरव आता खाली… 

भक्तासाठी आजवर तुझी

लय परीक्षा झाली…! 

 

इटेवर हाइस उभा

तसा तू मनात बी आमच्या हायेस… 

अठ्ठाईस युगं कधी व्हणार

आता तू आमचं ऐकणार हायेस… 

कर थोडा आराम

रख्माईला दे तू येळ… 

बायको खूश तर आपच रंगतो

संसाराचा खेळ…!!! 

 

कवयित्री : ©डॉ.प्रितीराणी जुवेकर

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ चंगळ… लेखिका – डाॅ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

माधव आणि मधुरा घरी आल्यापासून एकदम चकित झाले होते. खरं तर न्यूझीलंडहून इन्नीअप्पांकडे हट्टानं येण्याचा निर्णय दोघांनी का घेतला होता? तर इन्नी आणि अप्पांना उतारवयात एकटं वाटू नये म्हणून! पण… इथे तर त्यांनाच एकटं पडण्याची पाळी आली होती. कशी? पाहा ना! इन्नी आणि अप्पांकडे त्या आधीच गोपाळराव आणि राधिकाबाई भिडे यांचा ठिय्या मुक्काम होता. “या राधिकाबाई भिडे. आपल्या कुटुंबसखी.” इन्नीनं ओळख करून दिली. “माझी ओळख नव्हती झाली कधी यांच्याशी.” माधव इन्नीला म्हणाला. “अरे, गेली सात वर्षे तुम्ही न्यूझीलंडला आहात. इथे आम्ही दोघं निवृत्त झाल्यावर आम्ही एक क्लब स्थापन केला. क्लबचं नावच मुळी ‘चंगळ’ क्लब. अटी तीन. एक- तुम्ही निवृत्त असायला हवेत; दोन- सुखवस्तू सांपत्तिक स्थिती असावी आणि तीन- मौज, उपभोग यात भरपूर रस असावा. तर तुला सांगते माधव, चंगळ क्लबचे नळ्याण्णव सदस्य झालेत. यात पंचेचाळीस जोड्या आहेत आणि नऊ सदस्य एकेकटे, लाईफ पार्टनर गमावलेले; पण तरीही आयुष्य आहे ते रडत जगण्यापेक्षा मजेने जगावं अशा इच्छेने आपल्यात सामील झालेले आहेत.” इन्नी म्हणाली. “मी जेव्हा इन्नींची ही जाहिरात केबल टीव्हीवर बघितली ना, तेव्हा लगेच फोन केला त्यांना. आम्ही दोघं ताबडतोब मेंबर झालो चंगळ क्लबचे. आमचा मुलगा देवर्षी अमेरिकेत आहे. कन्या सुप्रिया लग्न होऊन सध्या सिलोनला राहते. म्हणजे आपल्या आताच्या श्रीलंकेत! आम्ही दोघं अधूनमधून जातो मुलाकडे-मुलीकडे, पण करमत नाही परक्या देशात. इथेच बरं वाटतं. चंगळ क्लब सुरू झाल्यापास्नं तर इथेच उत्तम वाटतं बघ.” राधिकाबाई म्हणाल्या. माधवनं निरखून राधिकाबाई आणि आपली आई इन्नी यांच्याकडे बघितले. खरंच की, दोघी कशा तजेलदार आणि टुकटुकीत दिसत होत्या. निरामय आनंदी! समाधानी आणि संतुष्ट वाटत होत्या. “त्याचं काय आहे माधव, प्रत्येक वय हे मौजमजा एनकॅश करण्याचं असतं असं तुझ्या अप्पांचं आणि माझं स्पष्ट मत आहे. लोकलला लोंबकळून आम्ही मुलुंड ते सीएसटी तीस तीस वर्ष सर्व्हिस केली दोघांनी. पण त्यातही मजा होती. कारण दोघांनी कमावलं म्हणून तुला राजासारखं ठेवता आलं. बारावीला अपेक्षित पसेंटेज मिळाले नाही तरी प्रायव्हेटला डोनेशन देऊन शिकविता आलं. सो? नो रिग्रेट्स! पण निवृत्तीनंतर दोघांचं मस्त पेन्शन येतंय. घरदार आहेच! तू आर्थिकदृष्टीने स्वतंत्र झालायस. नो जबाबदारी! मग आता मौजच मौज का बरं करू नये? म्हणून केबलवर अँड दिली. आम्हाला ठाऊकच नव्हतं की नुसत्या मुलुंडमध्ये यवढी माणसं चंगळ’ करायला इच्छुक आहेत!” माधव आणि मधुरा यांना ते सारं ऐकून चकित व्हायला न झालं तरच नवल होतं! त्याचबरोबर इन्नी आणि अप्पांना एकटं वाटत असेल ही अपराधीपणाची टोचणीही कमी झाली होती. आपण उगाचच टेन्शनमध्ये आलो होतो हेही जाणवलं दोघांना. नंतर जेवणं फार सुखात झाली. “रोजच्या जेवणाला कुसाताई येतात स्वयंपाक करायला, पण चार माणसं येणार असली घरात की आम्ही त्यांना सांगून ठेवतो अगोदर. त्या मैनाताई म्हणून मदतनीस घेऊन येतात बरोबर. त्यांना आम्ही दिवसाचे शंभर एक्स्ट्रा देतो. खुशीनं येतात अगदी.” अप्पा सांगत होते. “आमचे मेंबर जसे वाढायला लागले तसे आम्ही ‘बिल्व’ नावाचे समविचारी लोकांचे ग्रुप तयार केले बरं का गं मधुरा. म्हणजे अगं कुणाला वाचायला आवडतं. कुणाला खादडायला आवडतं. कोणी पिक्चर, नाटक यांचं शौकीन असतं. कोणी रमीत रमतं तर कोणी मद्याचे घुटके घेत ‘एक जाम एक शाम’ करतं. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. आम्ही काही माणसं भटकंतीवाली पण आहोत. ‘बिल्व’मध्ये समआवडींची तीनच कुटुंब एकत्र येतात. आपल्यात आम्ही, भिडे पतिपत्नी आणि शिंदे पतिपत्नी एकत्र आहेत. शिंदे सध्या बेंगलोरला मुलीच्या बाळंतपणास गेलेत दोघं. सेवेत मग्न! पण आमचे फोन चालू असतात.” इन्नीनं सांगितलं. “महिन्यातून एकदा आम्ही एकेकाकडे चार दिवस जमतो. रात्री झोपायला घरी. दिवसभर साथ साथ. आता ऑक्टोबरमध्ये आम्ही सहाही जणं कोकणात जाणारोत. डॉल्फिन शो बघायला. अगदी चंगळ आहे बघ!” अप्पा म्हणाले. “माझ्या मनात एक अभिनव कल्पना आहे.” श्रीयुत गोपाळराव भिडे म्हणाले. “हल्ली काऊन्सेलिंगचा बराच सुकाळ आहे. मॅरेजच्या आधी काऊन्सेलिंग, मरेजनंतरही प्रॉब्लेम येतात तेव्हा समुपदेशन… मुलांच्या समस्यांचं समुपदेशन, करियर कौन्सेलिंग! आता मी सुरू करतोय ‘निवृत्ती निरूपण’ यात आठ कलमी कार्यक्रम असेल. निवृत्तीआधी तीन कलम. एक – आपल्याला मिळणाऱ्या पैशांचा अंदाज घ्या. दोन- गुंतवणूक करण्यासाठी उत्कृष्ट सल्ला घ्या. तीन- आपला राहून गेलेला छंद तपासा. निवृत्तीनंतरची दोन पथ्ये- एक- घरातल्यांना न छळणे. दोन- आपल्या पार्टनरचे मन जपणे. आणि तीन गोष्टी आनंदाच्या. एक- आपल्या पैशाचा स्वतः उपभोग घ्या. दोन- समवयस्कांबरोबर ओळखी वाढवा आणि तीन- तिसरी घंटा वाजली मित्रांनो! आता मस्त चंगळ करा! चंगळ!… लाईफ इज टू शॉर्ट नाऊ!…” माधव आणि मधुरा, गोपाळराव भिडे यांच्या निवृत्ती निरूपणावर बेहद्द खूश झाले. माधव म्हणाला, “आम्हाला फार गिल्टी वाटत होतं. मी एकुलता मुलगा! इन्नी नि अप्पांना एकटं करून तिकडे दूर देशी राहतोय.” “आता काळजी करू नकोस तरुण मित्रा. चंगळ क्लब समर्थ आहे एकमेकांची काळजी घ्यायला.” भिडेकाका म्हणाले. तुम्हाला सुरू करायचा का आपल्या उपनगरात चंगळ क्लब? बघा बुवा! तिसरी घंटा वाजलीय… एन्जॉय नाऊ. ‘ऑर नेव्हर!’ म्हणायची वेळ कुणावर येऊ नये.

‘ तिसरी घंटा’ 

लेखिका – डाॅ. विजया वाड

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घडी मोडणे… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ घडी मोडणे… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या…. 

किती प्रेमळ रिवाज होता ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद – दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण  मजल असायची…. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली नवी कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल.. 

नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची… त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं…. तिला कानकोंडं वाटू नाही म्हणून, ” तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात “.. असंही वरून म्हणायचं..आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा…..

  …… आर्थिक श्रीमंती असो-नसो, पण मनांच्या श्रीमंतीचा तो काळ होता हे मात्र नक्कीच खरं …… 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तो सावळा सुंदरू… — लेखिका : सुश्री उल्का खळदकर ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  तो सावळा सुंदरू… — लेखिका : सुश्री उल्का खळदकर ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

तो सावळा सुंदरू । कासे पितांबरू ।।

तो सावळा सुंदर विठ्ठल ! त्याला डोळे भरून पाहण्यासाठी मन आसुसलेलं असतं. सगळ्या भक्तांची तीच असोशी ! ‘ भेटी लागे जीवा लागलीसे आस ‘ असे आर्ततेने म्हणून तुकारामांची जी अवस्था तीच अवस्था एकनाथांची !

कटी पीतांबर तुळशीचे हार ।

उभा सर्वेश्वर भक्त काजा ।।

नामदेवांना विठ्ठल दिसतो असा —         

वाळे वाकी मजे तोड चरणी

नाद झणझणी वाजताती

कास कासियेला पीत पितांबर

लोपे झणकर तेणें प्रभा ।।

तुकारामांनी त्याचे केलेले वर्णन-

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

कर कटावरी ठेवूनिया।।

तुळशी हार गळा, कांसे पितांबर, आवडे निरंतर तेचि रुप।।

मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित।।

सर्व संतांना या विठ्ठलाने वेड लावलं.

जनाबाई दळीता कांडिता म्हणतात-

जनी म्हणे बा विठ्ठला .. जीवे न सोडी मी तुजला।।

तिला तर जळी-स्थळी-काष्ठीपाषाणी  विठ्ठलच दिसायचा.

जनी जाय पाणियासी। मागे जाय ह्रषीकेशी ।।

आणि मग तिने ……

धरिला पंढरीचा चोर । गळा बांधुनिया दोर ।

ह्रदयीं बंदीवान केला । आत विठ्ठल कोंडीला ।

शब्द केले जुडाजुडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ।

सोहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळतीला आला ।

जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुजला।।

या विठ्ठलाचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात–

पांडुरंग कांती दिव्य तेज झळकतीं

रत्नकीळा फाकती प्रभा।।

अगणित लावण्य तेज पुंजाळले

न वर्णवे तेथिची शोभा।।

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु।।

सर्व संतांना त्यानी वेडं केलंच पण सामान्यांनाही तो आपलासा वाटू लागला आणि मग वारकरी संप्रदाय स्थापन झाला. दिंड्या देहू आळंदीहून पंढरपूरला जाऊ लागल्या. हातात टाळ चिपळ्या मृदुंग आणि मुखात विठ्ठलाचं नाव घेत, पायांना पंढरपूरचा ध्यास घेत दिंडी चालली. कुणाच्या तोंडी अभंग, कुणी हरिपाठ म्हणत आज वर्षानुवर्ष दिंडी चालली आहे. तनाने मनाने वारकरी म्हणतात…….

पोचावी पालखी विठ्ठलाचे द्वारी, मिळो मुक्ती तेथ दिंडीच्या अखेरी

देहाची पालखी, आत्माराम आत, चालतसे दिंडी, जीवनाची वाट।।

काही वर्षे या करोना महामारीमुळे या दिंडीला खीळ बसली होती. सारंच कसं आभासी झालं होतं. पण प्रत्येकाच्या मनात विठ्ठल आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल… असं कोणी मानतं, तर कुणी मनाने या दिंडीची वाट चालत आहे. जणू काही आपण वारीबरोबर चाललो आहोत ! आज एकादशीला सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले …  विसरून गेले देहभान — मी माझ्या दारात या फुलांच्या कलाकृतीने दिंडी चालत आले. आज त्याची समाप्ती. वारकरी अलोट गर्दीमुळे कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. परतवारी मी माझ्या मनाने तुझ्या गाभाऱ्यात पोचले. तुझं सावळं सुंदर

मनोहर रुप पाहतच राहिले. रोजच तुझे रुप मी अनुभवत होते. तुला फुलातून साकारताना तुझी पूजा बांधत होते. माझे वारकरी दिंडी चालत होते. त्याची सांगता !

आता या चातुर्मासाच्या निमित्ताने मी भागवताचे सार लिहिणार आहे. या माझ्या उपक्रमाला तुझ्या आशीर्वाद असू देत रे विठ्ठला !

रंगा येई वो ये …. रंगा येई वो ये

माझ्या या लेखनात अर्थ भरायला ये. तुला मी आईच्या रुपात बघते.

वैकुंठवासिनी विठाई जगत्रजननी

तुझा वेधु माझे मनी

रंगा येई वो ये ……

माझ्या ह्या लेखणीवर तुझी कृपादृष्टी असू देत.

 

लेखिका : सुश्री उल्का खळदकर

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटी अंतर तेवढंच राहिलं… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ शेवटी अंतर तेवढंच राहिलं… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

लहानपणी, लोकांना हॉटेलमध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं… आपण ही खावं…, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाहीं…

मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली…

— शेवटी अंतर तेवढंच राहिलं .

लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे…

मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले… सुती कपडे महाग झाले.

— शेवटी अंतर तेवढच राह्यलं.

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची,… शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची…

मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले…

—  शेवटी अंतर तेवढच राह्यलं.

लहान होतो तेव्हा दूध नसल्यानं घरी गुळाचा, काळा चहा मिळायचा… अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो… वाटायचं आपणही प्यावा पण ?

आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत.

—  शेवटी अंतर तेवढंच राह्यलं.

लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चार चाकीमधून फिरताना बघायचो, वाटायचं, आपणही फिरावं,

आता सकाळी सकाळी सर्वांना सायकल वरून व्यायाम करताना बघितले की वाटत…

— शेवटी अंतर तेवढंच राहीलं.

लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं…

आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये पैसे मोजून रांगा लावतांना दिसतात.

— शेवटी अंतर सारखंच राहतं…

लहानपणी चाळीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही मोठ्या घरात राहावं, आज तीच माणसं मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट / विपशना ) मध्ये राहतात तेंव्हा कळतं …

— शेवटी अंतर सारखंच राहतं…

आता कळलं…हे अंतर असंच कायम राहणार.  मग मनाशी पक्क केलं–  जसा आहे, तसाच राहाणार… कुणाचं पाहून बदलणार नाही…

म्हणून तर जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटले होते ,

ठेविले अनंते तैसेचि राहावे,

चित्ती असू द्यावे समाधान ...

….. मित्रांनो खूश रहा, समाधानी राहा, वाट्याला आलेले जीवन खूप सुंदर आहे, त्याचा मनमुराद आनंद   उपभोगा…… आणि अर्थातच … कुणाचं पाहून आपल्या स्व-आनंदाची व्याख्या बदलवू नका.

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

परवा अचानक मी मेले

आणि चक्क स्वर्गात गेले 

म्हटलं चला पृथ्वीवरच्या

कटकटीतून सुटले

 

स्वर्गात मला माझे

बरेच आप्त भेटले.

संध्याकाळी विचार केला

जरा फेरफटका मारू

स्वर्गाचा आनंद लुटण्यासाठी

पाय मोकळे करू

 

पहिल्याच वळणावर मला

विंदा आणि बापट भेटले

त्यांना पाहून अवाक् झाले

शब्दच माझे मिटले.

 

मला पाहिल्यावर बापट

छान मिश्कील हसले

विंदा म्हणाले याच्या या

हसण्यावरच सगळे फसले.

 

मी नमस्कार केल्यावर

हळूच म्हणाले विंदा

ज्ञानपीठ पुरस्काराचा म्हणे

क्रायटेरिया बदललाय यंदा.

 

मी म्हटलं मी काय बोलणार

मी तर एक सामान्य वाचक

तुमच्या साहित्य पंढरीतला

एक साधासुधा याचक.

 

पुढच्या वळणावरच्या बाकावर 

गडकरी होते बसले

त्यांच्या शेजारी गप्पा मारताना

बालकवी अन् मर्ढेकर दिसले

 

तशीच गेले पुढे

करीत मजल दरमजल

छोट्याशा पारावर होते

सुरेश भट अन् त्यांची 

भन्नाट गझल!!!

 

पुढे एका कल्पवृक्षाखाली

सावरकर होते बसले

मी नमस्कार करताच

हात उंचावून हसले

 

म्हणाले मला,” कसा आहे

माझा भारत देश?

मला दूर नेणा-या सागराचा

तसाच आहे का अजून उन्मेष?”

 

त्यांच्या बलिदानाची आम्ही

काय ठेवलीय किंमत 

हे त्यांना सांगायची

मला झालीच नाही हिंमत.

 

तशीच पुढे गेले तर

गडबड दिसली सारी

कोणत्यातरी समारंभाची

चालली होती तयारी.

 

कोणी बांधीत होते तोरण

कोणी रचित होते फुलं

स्वागतगीताची तयारी 

करीत होते पु ल.

 

पुढं होऊन नमस्कार केला

म्हटलं, ‘कसली गडबड भाई?

विशेष काय आहे इथे? 

कसली चालल्ये घाई?’

 

पुल म्हणाले उद्या आहे

इथं मोठा सोहळा

त्याच्यासाठी थोडासा

वेळ ठेव मोकळा.

 

डोळे मिचकावून भाई म्हणाले

उद्या आहे शिरवाडकरांचा बर्थ डे

तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे

उद्या आहे मराठी भाषा डे!!

 

असं नाही हं भाई

मी म्हणाले हसून

मराठी दिनाला आम्ही

‘दिन’ च म्हणतो अजून.

 

अरे वा! पुढे येऊन

म्हणाल्या बहिणाबाई

आसं दिवस साजये करून

व्हतंय का काही?

 

एक दिस म-हाटी तुम्ही 

वरीसभर करता काय?

एक दिस पंचपक्वान्न

पन वरीसभर उपाशी

असती तुमची माय!!! 

कवयित्री  : इरावती

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

कडी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे, याची खात्री देणारी ही कडी. खरं तर घराची देखणी नथच मानावी.

ज्या घराला कडीकोयंडेच नाहीत,ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः  स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला ‘मैं हूं ना!’ असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते, तर आधारासाठी कायम खडी असते. ती आपल्या सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू आणि दार नुसतंच लोटलेलं असेल, तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्याही दरवाजाला अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल, याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर….

कोणीही आपल्याला गृहीत धरून   आपल्याशी कसेही व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल, तर मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात, जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठरावीक अंतर ठेवून आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो, वाहवत जातो. आपल्याला पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती, हे सहज विसरुन जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत,घरात, समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही, असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे?

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे, शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण काय उपयोग?मित्र कायमचा गेला.

आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

म्हणून ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा.

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात,

नंतर कुरकुरत का होईना,

हळूहळू मुरतात.

 

हे लोणचं बाजारात मिळत नाही.

कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं.

त्याशिवाय जगण्याला

चव येत नाही.

 

कडवट शब्दांची मेथी जरा

जपूनच वापरावी.

स्वत:च्या हातांनी कशाला

लोणच्याची चव घालवावी ?

 

जिभेने तिखटपणा आवरला, तर

बराच फायदा होतो.

लोणच्याचा झणझणीतपणा

त्यानं जरा कमी होतो.

 

‘मी’पणाची मोहरी जास्त झाली,

तर खार कोरडा होतो

इतरांच्या आपुलकीचा रस

त्यात उगाच शोषला जातो.

 

रागाचा उग्र हिंग तसा तितकासा

बाधत नाही.

लवकर शांत झाला तर

लोणच्याची चव बिघडत नाही.

 

प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते.

विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते.

 

समृध्दीचं तेल असलं, की

काळजीचं कारण नसतं.

त्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं.

 

लोणचं न मुरताच नासावं, तसं काही संसारांचं होतं.

सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं.

लेखक : श्री.प्रमोद पाटकर

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होतं असं कधी कधी… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पै ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ होतं असं कधी कधी… ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पै ⭐

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.

दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत

तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. तरीही

काहीतरी दुसरेच घेऊन बाहेर पडतो आपण.

परतताना मनात विचार येतो की,

‘तो ड्रेस घ्यायला हवा होता…’

होतं असं कधी कधी.

 

सिग्नलला गाडी थांबते.

चिमुरडी काच ठोठावते.

गोड हसते, पण भीक मागत आहे ,

हे लक्षात घेऊन तिच्या त्या हसण्याकडे

फार लक्ष देत नाही आपण.

२-३ रुपये द्यावे असे मनात येते.

रेंगाळत सुटे शोधता-शोधता

“देऊ का नको, ” हा धावा मनात सुरू असतो.

तेवढ्यात सिग्नल सुटतो.

गाडी पुढे घ्यायची वेळ येते.

थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,

” सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला.”

होतं असं कधी कधी

 

जेवणाच्या सुट्टीत

ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास

फार विश्वासाने सांगतो,

त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.

वाईट वाटते खूप.

नशीब आपण त्या परिस्थितीत नाही,

असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो.

‘” काही मदत हवी का ?’” असे विचारायचे असूनही

आपण गप्प राहतो.

जेवणाची सुट्टी संपते.

तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.

क्षणभर स्वत:चा राग येतो,

मदत  विचारली नाही,

निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात

तरी ठेवायला हवा होता मी!

होतं ना असं कधी कधी?

 

असंच होतं नेहमी,

छोट्या-छोट्या गोष्टी राहून जातात…

खरं तर या छोट्या गोष्टीच

जगण्याचे कारण असतात.

 

गेलेले क्षण परत येत नाहीत.

राहतो तो ” खेद “,

करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

 

जगण्याची साधने जमवताना

जगणेच राहून जात नाहीयेना

ते चेक करा.

 

आनंद झाला तर हसा,

वाईट वाटलं,तर डोळ्यांना

बांध घालू नका.”

 

चांगल्या गोष्टीची दाद द्या,

आवडले नाही तर सांगा,

पण घुसमटू नका.

 

त्या-त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.

नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

 

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,

त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात

गुंफणे म्हणजेच जगणे.

 

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली

तर ” लाईफ ” कसले ?

 

आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले

तर ” लाईफ ” कसले?

 

मित्रांच्या फालतू विनोदांवर

पोट दुखेस्तोवर हसलो नाही

तर ” लाईफ ” कसले ?

 

आनंदात आनंद

आणि

दु:खात दु:ख नाही जाणवले

तर ” लाईफ ” कसले…?

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ अपेक्षांच  सेटिग… लेखिका: सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मिताली नुकतीच लग्न होऊन नव्या घरी आली होती. तिच्या सासूबाई फारच प्रेमळ आणि कार्यतत्पर होत्या. कार्यतत्पर याकरता, की त्यांच्या कामाचा उरक वाखाणण्याजोगा होताच शिवाय त्यांच्या म्हणण्यानुसार घरचं पानही हलत नसे त्यांच्याशिवाय..

हळूहळू मिताली नव्या घरी रुळू लागली होती. त्यादिवशी सगळ्यांचं झाल्यावर सासू-सून जेवायला बसल्या. इतक्यात सासऱ्यांचा आवाज आला, अग tv चा रिमोट मिळत नाहीये. तशा सासूबाई पटकन उठल्या आणि त्यांना tv वरच असलेला रिमोट देऊन आल्या आणि सुनेला म्हणाल्या, “माझ्याशिवाय बाई पानच हलत नाही यांचं.”

सकाळी योगा करतानापण मुलाने म्हणजे मितालीच्या नवऱ्याने अशीच हाक मारली, “अग आई,  माझा डबा भरला का, निघायला उशीर होतोय.” तशा पटकन योगा सोडून सासूबाई डबा भरायला गेल्या.

मिताली हे सगळं पहात होती.

एक दिवस सासूबाईंच्या भिशीचा ग्रुप घरी आला. सगळे एक आठवड्याच्या महाबळेश्वर ट्रिपचे ठरवत होते, पण सासूबाई म्हणाल्या, “मी काही येणार नाही, मी आले तर सगळंच कोलमडेल घरातलं.” तशी मिताली म्हणाली, “आई तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळं बघेन. मला माहितीये तुम्ही काय काय करता ते.” सासूबाई म्हणाल्या, ” अग, बरंच काही असतं, तुला नाही जमणार.” तशी मिताली म्हणाली  ” आई जमवून दाखवीन. बघाच तुम्ही.” मितालीने दिलेल्या विश्वासावर सासूबाई दोन दिवसात ट्रिपला गेल्या.

मिताली तिचं ऑफिसचं आवरत होती, तेवढ्यात नवऱ्याने आवाज दिला, “अग, माझा रुमाल , पाकीट कुठे आहे? आई नेहमी काढून ठेवते.” तसे मितालीने जागेवरूनच उत्तर दिले, “कपाट उघडलं की समोर जो ड्रॉवर आहे ना, त्यात आहे. रोज तिथेच असतं.उद्यापासून घेत जा हाताने.”

नवऱ्याने जराशा नाराजीनेच रुमाल आणि पाकीट ताब्यात घेतले. तेवढ्यात मितालीचा आवाज आला, “डबा मावशींनी धुवून ठेवलाय. कढईमध्ये भाजी आणि बाजूलाच डब्यात पोळ्या आहेत,त्यापण भरून घे. मी निघते ऑफिसला.” हे सगळं करण्याची सवय नसलेल्या नवऱ्याला हे ऐकून थोडा धक्का बसला; पण स्वतःच घेण्याशिवाय काही पर्याय नव्हता.

ती निघत असतानाच सासऱ्यांचा आवाज आला, “अग, पूजेसाठी फुलं नाहीत परडीत.”  तशी मिताली म्हटली, “अहो बाबा, घरचीच बाग आहे की, घ्या तोडून बागेतून. तेवढीच मोकळी हवा मिळेल आणि चालणंही होईल.”

हे ऐकताच सासऱ्यांनी मुलाकडे पाहिले, तसा तो खांदे उडवून निघून गेला.

त्यादिवशी रात्री मिताली जेवायला बसली, आणि नेहमीप्रमाणे सासऱ्यांचा आवाज आलाच रिमोट साठी, मिताली जागेवरून म्हणाली, “समोर tv वरच आहे, बाबा, ” सासऱ्यांनी निमूटपणे उठून रिमोट घेतला.

अशी अनेक छोटी-मोठी कामे मितालीने स्वतः न करता ज्याची त्याला करायला लावली.

आठवडा सरला, सासूबाई आल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना जरा उठायला उशीरच झाला. लगबगीने उठून त्या स्वयंपाकघरात आल्या , तर त्यांचा मुलगा डबा भरून घेत होता. आईला पाहताच त्याने विचारले, “आई, कॉफी देऊ का?”

सासूबाईंचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्या बाहेर आल्या, तर सासरे बाहेर बागेत मस्त कानात हेडफोन लावून फुलं तोडत होते, सासूबाईंना कळेना, हे काय चाललंय आपल्या घरात?

इतक्यात मिताली  कॉफीचे दोन मग घेऊन आली, म्हणाली “आई चला, कॉफी घेऊ.” सासूबाई अजूनही आश्चर्यचकीत होत्या, तशी मिताली म्हणाली, “आई, चिल, expectation setting झालं आहे घराचं आणि घरातल्या लोकांचं, आता आरामात दिवस एन्जॉय करा.”

अचानक सासूबाईंनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, “थॅंक्यू,मॅनेजर बाई. That’s what I was trying to achieve for so many years.”

मिताली खुदकन हसली.

लेखिका :सुश्री मंजिरी राजेंद्र पाठक

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares