☆ घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जिवावरच येतं. एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना. मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो, “येतो परत आठ दिवसांत. तोवर सांभाळ रे बाबा.. “
तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं.
मग कधी कधी आठ दिवसांचे आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहतो, त्या वेळचे समाधान काही वेगळेच असते. प्रवासाचा अर्धा शीण नाहीसा होतो.
पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं. दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं. मलूलतेची छाया पसरलेली असते. घर आळसावलेलं, रुक्ष, निर्जीव भासतं.
जाताना बदललेले कपडे, गडबडीत न विसळलेल्या कपबश्या, वह्यापुस्तकं, खेळण्यांचा पसारा….. आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो. रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते,
फ्रीज उघडल्यावर उरल्या सुरल्या भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटोचा येणारा दर्प. सिंक वॉश-बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात. वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो. भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं.
आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!
रुसलेल्या, रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते, मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते.
दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं. ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा बहाल करते. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते..
त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं.
घराला स्पर्श कळतात? हो. कळतात! त्याला आपली माणसेही कळतात. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात. आठवून पहा. काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते, तेव्हा लाडात आलेल तिचं घर तिच्याकडे पाहत हसतं. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”… !
शेवटी “बाईच” घराची “आई” असते.. !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
विदर्भातील व्यक्ती बेशुद्ध पडल्यास त्याला चमचाभर तर्रीचा वास दिला तरी तो तात्काळ शुध्दीवर येतो अशी आख्यायिका आहे. तर्रीचा कर्ता, करविता आणि चाहता व्हायचं असेल तर जन्म विदर्भातच व्हायला हवा. वैदर्भिय माणसाचे रक्त लाल असण्यामागे केवळ हिमोग्लोबिन नसून लाल आणि तिखट तर्रीही तितकीच जबाबदार आहे. कानातून घाम निघणे हेच तर्री पावल्याचे जीवंत लक्षण आहे. तर्री हा तरल स्थितीतील पदार्थ असुन याचा रंग लालच असतो. एक लालसर रंगाचा चमकणारा आणि खव्वैय्याला खुणावणारा पातळसा तैलीय पदार्थ हाच तर्रीचा आत्मा आहे. तर्रीचा जन्म जरी पोह्याचा स्वाद वाढवण्याकरता झाला असला तरी कोणत्याही तीखट पदार्थाबरोबर जुळवुन घेण्याची नवरदेवी कला याला अवगत असते. पोह्यावर तर्री पडताच, आपसूक पोह्यात विलीन होते, मग उगाच तर्रीतील दोन चार हरभरे, ‘आपण नाही बुवा त्यातले’ सांगुन पोह्यावर उभे राहुन आपलं वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करतात.
तर्री हा पदार्थ कालच खाल्ला याची आठवण ठेवायची अजिबात आवश्यकता नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी तर्री स्वत:, तर्री खाल्लयाची आठवण करून देते, आणि आठवण करून न दिल्यास हा पुन्हा दुसऱ्या दिवशी तर्री खाण्यास मोकळा.
व्यवस्थित तर्री बनवणं हे काही खायचं काम नाही, जरी बनवलेली तर्री हे खायचं काम असेल तरी. ज्याप्रमाणे कुशल गाडीवानच गाडी उत्तम रितीने चालवु शकतो त्याचप्रमाणे तर्री छान बनवायला कुशल तर्रीवानच हवा. एकदा का यांच्या तर्रीने अंघोळ करून पदार्थ शुचिर्भूत झाला की कोणीही पदार्थाची मूळ चव काय? हा प्रश्न उपस्थित करत नाही. अगदी गंगास्नान झाल्यावर जसा माणूस पापमुक्त होतो त्याचप्रमाणे तर्रीस्नान झाल्यावर मूळ पदार्थ हा चवमुक्त होतो आणि मग चर्चा उरते ती केवळ तर्रीची. तर्रीबाज पदार्थ खाणारा तर्रीबाज नव्हे तर “थोडी तर्री और डालो” म्हणणाराच पट्टीचा तर्रीबाज.
एखाद्या तर्रीबाजाने आठ पंधरा दिवस तर्री न खाता काढलेच तर त्या तर्रीपरायण व्यक्तीच्या मेंदुला तर्रीचे दर्शन व पुरवठा न झाल्याने तरतरी कमी होऊ शकते.
तर्री कशाची आहे (मटर की हरभरा) हे महत्त्वाचे नाही. तर्री हे स्वत:च एक परिपूर्ण पॅकेज आहे. वांग्याच्या भाजीवर असलेल्या तेलाच्या तवंगाला तर्री म्हणून, तर्रीचा अपमान करू नये. अस्सल तर्रीबाज हे फुलपाखराप्रमाणे तर्रीच्या सुगंधाकडे ओढले जातात. केवडा, मोगरा गुलाब या सारख्या सुगंधी अत्तराच्या बाटल्या आल्यात पण अजून तरी कोणीही हा तर्रीगंध बाटलीबंद स्वरूपात आणला नाही. आणल्यास, साध्या पाण्यात मिसळून परदेशस्थ भाऊबंदांना तर्रीचा आनंद मिळु शकतो. काही लोक, तर्रीला तेलाचा तवंग एवढंच समजतात, अशा लोकांना तर्री खाल्ल्यावर विशेष त्रास होण्याची शक्यता असते.
कोकणातील माणसाने तर्री करण्याचा प्रयत्न केला तर त्यात चिंच, गुळ, ओले खोबरे घातल्याने, तसेच दक्षिण महाराष्ट्रीय माणसाने शेंगदाणे घातल्याने, तर्रीची धार बोथट होते. त्यामुळे उगीच काहीतरी, तर्री म्हणून खाण्याऐवजी अस्सल ठसकेबाज तर्री खाण्यातच धन्यता बाळगावी. इतरांना पाण्यात पाहण्याऐवजी, तर्रीत पहायचा प्रयत्न केला तरी माणसाचे जीवन सुसह्य होईल यात शंका नाही.
सर्व तर्रीखाॅऺं साहेबांना हा तर्रीतराणा समर्पित.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
☆ “रूशा (रूपांतरित शायरी )…” – मूल शायरी – शायर अनवर जलालपुरी ☆ भावानुवाद – श्री सुनील देशपांडे ☆
(शायर अनवर जलालपुरी, ज्यांनी भगवद्गीतेचा उर्दूमध्ये अनुवाद केला आहे. त्यांच्या निधनाला ६ जानेवारी २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांची काही शायरी !! त्या शायरीचे मी केलेले मराठी रूपांतर मी ज्याला ‘ रूशा ‘ असे म्हणतो, सोबत दिले आहे.
अन्वर जलालपुरी यांचे हे शेर आमचे नाशिक येथील परममित्र आणि उर्दू शायरीचे अभ्यासक ॲड. नंदकिशोर भुतडा यांचेकडून उपलब्ध झाली त्यांचेही धन्यवाद !)
1.
मैं अपने साथ रखता हूँ सदा अख़्लाक़* का पारस !
इसी पत्थर से मिट्टी छू के, मैं सोना बनाता हूँ !!
* सदवर्तन !!
सद्वर्तनाचा परिस मी नेहमी बाळगतो
मातीला स्पर्श करून सोने ही बनवतो
२.
शादाब-ओ-शगुफ़्ता*कोई गुलशन न मिलेगा !
दिल ख़ुश्क** रहा तो कहीं सावन न मिलेगा !
*हरा भरा !! **सूखा !
कुठेही हिरवळीने समृद्ध बाग दिसणार नाही
अंतर्यामीच दुष्काळ तर श्रावण ही येणार नाही
३.
जो भी नफ़रत की है़ दीवार गिराकर देखो !
दोस्ती की भी कोई रस्म निभाकर देखो !!
*
द्वेशाची भिंत पाडून तर पहा
मैत्रीची शुचिता पाळून तर पहा
४.
तू मुझे पा के भी ख़ुश न था, ये किस्मत तेरी !
मैं तुझे खो कर भी ख़ुश हूँ, यह जिगर मेरा है !!
*
माझी प्राप्ती होऊन सुद्धा तुला आनंद नाही हे नशीब तुझे
बायका इतरांशी बोलत नाहीत पण कितीतरी लाख पटीने त्या स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलत असतात. काय बरं बोलत असतील त्या ? बघू तरी….
सकाळी झोपेतून उठताना..
आत्ता पावणेसहा वाजले आहेत. सहा वाजता उठेन. पंधरा मिनिटे जरा पडून राहते नाहीतर दिवसभर तेलाच्या घाण्याला बैल जुंपली जातात तसेच दिवसभर मी कामाला जुंपलेलीच असते. तेवढीच पंधरा मिनिटे मला गादीचा सहवास मिळेल. दिवसभर दोघींनाही एकमेकांचा विरह सहन करावाच लागतोच. हा घड्याळाचा काटा कसा दमत नाही कोण जाणे… वाजले सहा.. आता मात्र मला उठावेच लागेल.
दात घासताना..
कोणती भाजी करावी. फ्रिजमध्ये तीन भाज्या असतील. कोबी मला आवडत नाही, वांगं ह्यांना आणि कारलं मुलांना.. जाऊ दे, कोबीचीच भाजी करते. असंही आपल्याला आवडीनिवडी राहिल्याच कुठे?
गॅसजवळ गेल्यावर..
मस्तपैकी चहा टाकते. गॅसजवळ किती बरं वाटत आहे या थंडीच्या दिवसांत. तेल संपत आले आहे. लवकरच त्याची पूर्तता करावी लागणार.. कढईत जरा तेल जास्त झालेल दिसतंय.. थोडं काढून ठेवते नाहीतर “भाजीत तेल खूप झालं” येईल फोन ह्यांचा.. असंही तेल कमीच पाहिजे. माझी दीदी तर फोडणीचे दाणे भिजतील एवढेच तेल वापरते!
आंघोळीला जाताना..
कोणता ड्रेस घालू? कालच पिवळा ड्रेस घातला होता. आज बांधणीचा घालते. कुठे गेली ओढणी? सापडत नाही. नेहमी असेच होते.. कितीही कपडे नीट ठेवले तरी वेळेवर सापडत नाही. पिवळा ड्रेसच अडकवते आता!
डबा भरताना..
तीन पोळ्या घेऊ का एखादी कमी करू? वजन वाढतच चालले आहे. थंडीचे दिवस आहेत, भूक खूप लागते. तीनच पोळ्या घेते. भाजी कशी झाली देव जाणो.. चटणीची वाटी राहू दे बाजूला. वेळ झाली, निघायला हवं लवकर..
कूलुप लावताना..
गॅस, गिझर, लाईट बंद केले ना मी? पुन्हा बघावे तर वेळ जाईल.. सगळे चेक केलेले असते पण कुलूप लावताना नेहमी अशीच द्विधा अवस्था होते माझी..
गाडी चालू करताना…
ये बाई तू नको नखरे करुस.. माहित आहे मला थंडी खूप आहे. तू जर वेळेत चालू झाली नाहीस तर नक्कीच लेट मार्क लागेल. गणपती बाप्पा मोरया!!! चालू हो गं बाई लवकर…
गाडी चालवताना..
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम…. खूप लोड आहे कामाचा. आजच्या आज मला करावीच लागणार आहेत..
पंचिंग करताना..
हूश्य!!!.. झालं गं बाई वेळेत पंचिंग… पडला आजचा दिवस पदरात.. लेट मार्क लागला नाही ते बरं झालं.. अजून वीस बावीस दिवस जायचे आहेत.. कधी काय अडचण येईल आणि लेट मार्क लागेल सांगता येत नाही.. वेळेतच आलेलं बरे…
जेवताना..
भाजी मस्त झाली आहे आज.. ह्यांना नक्कीच आवडेल, फोन किंवा मेसेज येईलच ह्यांचा..
चार वाजता चहा घेताना..
कधी यायचा बाई चहा.. आज मात्र चहाची खूपच गरज आहे. चहा टाळायला पाहिजे.. बसून काम आणि त्यात साखरेचे सेवन.. वजन वाढायला तेवढेच पुरेसं. कमी होताना होतं की 100 ग्रॅम 200 ग्रॅमने आणि तेही खूप खूप मेहनतीने.. किती मन मारू.. घेते बाई चहाचा आस्वाद..
संध्याकाळी स्वयंपाक करताना..
कोणती भाजी करू? कंटाळा आलाय.. करते नुसती मुगाच्या डाळीची खिचडी, कढी किंवा टोमॅटोचे सार.. नको नको.. नुसत्या खिचडीवर नाही भागायचे. करतेच सगळा स्वयंपाक..
किचन ओटा आवरताना..
पडली तेवढी भांडी धुवून टाकते.. जेवण झाल्यावर जाम कंटाळा येतो भांडी घासायला..
झोपताना..
बघते जरा थोडावेळ मोबाईल.. (स्टेटस बघत असताना) किती एन्जॉय करतात या बायका.. कसा वेळ मिळतो यांना देव जाणो. मला कुठे बाहेर जायचं म्हणलं की किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात.. त्यापेक्षा बाहेर पडायला नको असं वाटतं.. हीच्या भावाचं लग्न झालेलं दिसतंय.. गळ्यात काय सुंदर दागिना घातलाय.. बघते जरा झूम करून. ही गेलेली दिसते बाहेर कुठेतरी फिरायला. मस्त दिसते जिन्समध्ये… हीच्या घरी झालेलं दिसते हळदी कुंकू, मला नाही बोलावले… पुढचे फोटोच नको बघायला… अरे बाबा कशाला लटकतोय ट्रेनमध्ये.. जरा जाऊन बस की आत ! कशाला शायनिंग मारतोय..
झोप आली असताना..
चला झोपा लवकर आता उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचंय..
मध्यरात्री जाग आली असताना..
आत्ताशी तीन वाजले आहेत. मला वाटले सहा वाजले. अजून तीन तास झोपायला मिळेल आपल्याला…
आनंदित होऊन रग ओढून गाढ झोपून जाणारी मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया..
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लोकसत्तेत 2025 च्या नवीन वर्षापासून प्रख्यात विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांची तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनाच्या वाटचालीवर आधारित लेखमाला सुरू केलेली आहे. ती लेखकाच्या सिद्धहस्त लेखणीमुळे अत्यंत वाचनीय झालेली आहे. कारण नेमक्या शब्दात डॉ सुनीलकुमार लवटे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आयुष्याची वाटचाल मांडत असतात. आज त्यांनी लिहिलेल्या ‘काशीतील उच्चशिक्षण’ या लेखातील हा महत्त्वाचा अंश आपल्याला नक्कीच माणसाने ज्ञानी होणे म्हणजे काय, शिक्षित होऊन वैचारिक प्रगल्भता अंगी आणणे कसे शक्य असते, हे स्पष्ट करेल. (संकलक JK)
प्राज्ञपाठशाळा, वाई येथील वेदाध्ययन पूर्ण करून सन १९१८ मध्ये लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘तर्कतीर्थ’ पदवी संपादनार्थ काशीस प्रयाण केले. तर्कतीर्थ पदवीसाठी न्याय, वेदांत, शाब्दबोध (व्युत्पत्तीवाद) यांचे अध्ययन आवश्यक होते. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ते वेगवेगळ्या शास्त्री-पंडितांकडे जाऊन पूर्ण केले. पैकी वेदांत त्यांनी पर्वतीयशास्त्री यांच्याकडे पूर्ण केला. न्यायाचे शिक्षण वामाचरण भट्टाचार्य यांच्याकडून घेतले. नव्यन्यायाचा काही भाग ते भंडारीशास्त्रींकडून न्यायाचार्य राजेश्वरशास्त्री द्रविड यांच्याकडे नव्यन्याय पूर्ण केला. ‘तर्कतीर्थ’ पदवी मिळाल्यावर ते काशीहून परत येऊन प्राज्ञपाठशाळेत अध्यापक झाले. अध्यापक म्हणून प्राज्ञपाठशाळेत तर्कतीर्थांनी नव्यन्याय, मीमांसा, व्याकरण शिकविले. ‘मीमांसान्यायप्रकाश’ ग्रंथाचे तर्कतीर्थांनी अनेकदा अध्यापन केले. पुढे वेदांताचेही अध्यापन केले. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे, पांडुरंगशास्त्री गोस्वामी यांसारखे त्यांचे शिष्य पुढे संस्कृत पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. तर्कतीर्थ पुढच्या काळात धर्मसुधारणा, समाजसुधारणा, स्वातंत्र्य चळवळीतील प्रबोधन, संघटनकार्यात व्यस्त झाले, तसे त्यांचे अध्यापन बंद झाले. त्यांनी अध्यापक पदाचा राजीनामा दिला, तरी ते प्राज्ञपाठशाळेत अन्य कार्याने संलग्न राहिले.
तर्कतीर्थांनी नंतरच्या काळात भारतीय तत्त्वज्ञानाच्या बरोबरीने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यातून त्यांच्यातील पंडित उदारमतवादी आणि आधुनिक बनत गेला. सर्वधर्म अभ्यासाने त्यांना वैश्विक बनवले. ‘हिंदुधर्म समीक्षा’ ते ‘सर्वधर्मसमीक्षा’ असा त्यांचा लेखनप्रवास असो वा ‘आनंदमीमांसा’ आणि ‘जडवाद अर्थात् अनीश्वरवाद’सारखे प्रबंध लेखन असो, त्यातून तर्कतीर्थ धर्मनिरपेक्ष होत गेले! नित्य स्नान-संध्या करणारा हा धर्मपंडित जीवनाच्या एका वळणावर कर्मकांडमुक्त होतो ते ज्ञानाचे सत्य रूप गवसल्यामुळे. पत्नी सत्यवतीने एकदा ‘देव पारोसे राहतात पूजेअभावी’ असे म्हटल्यावर, तर्कतीर्थ देव्हाऱ्यातील सर्व देव, टाक आणि मूर्ती कृष्णार्पण करतात. अनेक वर्षांच्या संस्कारांतून निरीच्छपणे मुक्त होणे, हे प्रखर बुद्धिवादी विचार आणि कृतीनेच शक्य असते. नास्तिक म्हणवून घेणाऱ्यांनाही जी गोष्ट अशक्य वाटे, ती तर्कतीर्थ केवळ वैचारिक प्रतिबद्धतेमुळे (करेज ऑफ कन्व्हिक्शन) करू शकले. देव, धर्म, पूजा, इ. सर्व गोष्टी या मूलत: भाव आणि श्रद्धेचे आंतरिक विषय होत. आपण ते प्रतीक, पूजा नि कर्मकांडात अडकवलेत. ज्ञान, सत्य ही तत्त्वे उमगली की मग ती जीवनमूल्ये व जीवनशैलीची अंगे बनतात, बाकी सर्व मग शून्य ठरते.
लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे
माहिती संग्राहक व प्रस्तुती : जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ? – लेखक – अज्ञात☆ श्री अनिल वामोरकर ☆
आपल्या मनासारखे वागावे का दुसऱ्याच्या मनासारखे ?
बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची.
पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…
एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.
घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. ‘मेलं की काय’ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.
त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क ‘शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार.. ‘ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी.. !
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टी पॉय वरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.
मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘अग मन्या दिसत नाही गं कुठं ?’ बायकोला सतत विचारत राहायचा.
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या गेटसमोर बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महापालिकेची व्हॅन येऊन थांबली.
मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला.
नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.
नवरा म्हणाला, “मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही. “
“मला माहितेय.. ! पण मला जायचंय आता. ” मन्या शांतपणे बोलला.
“मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता. ” काकुळतीला येवून नवरा बोलला.
मन्या गोड हसला, आणि बोलला, “तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?”
“म्हणजे काय शंकाय का तुला?”
“मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा
पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?”
नॉट सो स्ट्रेंज यार… !!
वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते……
जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?
समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.
पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.
भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.
आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?
आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं.
अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाला सारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले.
ते सेवा निवृत्त असले तरी, स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं.
ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतानासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.
एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.
प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत.
ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवा निवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे. ” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.
बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.
ते म्हणाले,“सेवा निवृत्त झाल्यावर, आपण सगळे फ्यूज वुडलेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॉट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला. “
पुढे ते म्हणाले……
” मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो.
.. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत….. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.
.. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.
— – आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा, पण मला माहीत आहे.
सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत – त्यांची वॉट क्षमता काहीही असो – 0, 10, 40, 60, 100 वॉट – आता त्याने काहीही फरक पडत नाही.
.. आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.
.. आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल… उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात. परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही.
….. ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे. “
आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात.
या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो.
लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात.
आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा. हवा तर समाज कार्यास वेळ द्या !
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈