मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

📖 वाचताना वेचलेले  📖

 ☆ मुलांकडे (थोडे) दुर्लक्ष करा… – लेखक : श्री शिवराज गोर्ले ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

मुलांना जबाबदार  बनवायचं असेल, तर अर्थातच त्यांना काही गोष्टीचं स्वातंत्र्य द्यायला हवं. याचाच अर्थ त्यांच्याकडं जसं लक्ष द्यायला हवं, तसंच थोडं दुर्लक्षही करायला हवं. रेणू दांडेकर यांनी यासाठी ‘ हेल्दी निग्लिजन्स ‘ हा शब्द सुचवला आहे. त्या म्हणतात, ‘आजकाल घरात एकच मूल असतं. फार फार तर दोन. या ‘दोन बाय दोन’,च्या रचनेत मुलंच केंद्रस्थानी असतात. लक्ष्य असतात. त्यामुळंच कधी कधी आपलं नको इतकं लक्ष मुलांकडे असतं.

त्यांनी असं एक उदाहरणही दिलंआहे: माझी एक मैत्रीण मुलांच्या बाबतीत अत्यंत जागृत होती. तिनंच तिच्या मनानं मुलांच्या अभ्यासाच्या वेळा…जेवायच्या वेळा… आहार… कोणत्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास, या सगळ्याचंच वेळापत्रक बनवलं होतं. सतत त्यानुसार ती आपल्या मुलांवर देखरेख ठेवायची. मुलं अगदी जखडून गेली, कंटाळली, हळूहळू ऐकेनाशी झाली.

आईची प्रतिक्रिया, ‘ मी मुलांचं इतकं करते,तरी मुलं अशी वागतात. यापेक्षा किती लक्ष द्यायचं? ‘

” तू जरा जास्तच लक्ष देते आहेस.” रेणूताईंनी म्हटलं ,” थोडं दुर्लक्ष कर .मुलांना त्यांचं स्वतःचं जगणं आहे. जर त्यांच्या प्रत्येक क्षणावर ताबा ठेवलास तर कसं चालेल? जरा ‘हेल्दी निग्लिजन्स’ करायला शिक.” 

मुलांना मोकळेपणा, स्वातंत्र्य दिल्याशिवाय ती जबाबदार कशी होतील? फक्त एवढंच की ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करत आहेत ना, हे त्यांच्या नकळत पहायला हवं. लक्ष हवंच, पण न जाचणारं ! मूल पोहायला लागलं तरी आईनं त्याच्या पाठीवर डबा बांधला, त्याचा हात धरला तर ते तरंगणार कसं?हात पाय हलवणार कसं? ते आता पोहू शकतंय यावर विश्वास ठेवायला हवा. आपण ते बुडेल ही भीती सोडायला हवी. थोडं काठावर उभं राहता आलं पाहिजे, थोडं पाण्यातही भिजता आलं पाहिजे. पालक प्रशिक्षणातला हा एक धडा फार महत्त्वाचा आहे. शोभा भागवत म्हणतात त्याप्रमाणे, ‘मूल मोठं व्हावं, शहाणं व्हावं, असं तोंडानी बोलत, मनात ठेवत, प्रत्यक्षात आपण त्याला ‘लहान’च ठेवत असतो. तोंडी बोलण्यापलीकडं मूल आरपार आपल्याला पहात असतं. आपण ‘ मूल ‘ राहण्यातच पालकांना समाधान आहे, हेही ते जाणतं आणि तसं वागत राहतं.’

ते विश्वासानं शहाणं व्हायला हवं असेल, तर पालकांनी सतत पालक म्हणून वागायचं सोडून द्यायला हवं. पालकपणाचा (अधून मधून) राजीनामा द्यायला हवा.

लेखक : श्री शिवराज गोर्ले

प्रस्तुती : सुश्री सुनिता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ बहिणी… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

बहिणी…..​​

दुःख  वाटून घेणाऱ्या…. सुख वाटत जाणाऱ्या

सल्ला देणाऱ्या …. सल्ला घेणाऱ्या 

खूप दूर असल्या तरी खूप जवळ असणाऱ्या 

आपआपल्या संसारात मग्न असल्या तरी मनाने आपल्याशी सतत संलग्न असणाऱ्या 

स्वतःचे भरले डोळे लपवून आपले अश्रु पुसणाऱ्या 

शाबासकीची पहिली थाप पाठीवर देणाऱ्या .

खूप सुखात आहे ग मी म्हणून हळूच डोळे पुसणार्या.

 

​​बहिणी ….. 

आयुष्याला मिळालेलं एक वरदान.

जागेपणीचं स्वप्न छान …. पुस्तकातलं मोरपीस जपणारं पान.

सप्तरंग उधळणारी इंद्रधनूची कमान

मनातल्या फुलपाखराची इवली भिरभिर

हळुवार हात पुसतात डोळ्यातले नीर

उपसून काढतात हृदयात घुसलेला तीर

 

​​बहिणी ….. 

गातात नाचतात, खाऊ घालतात प्रेमाने चटणी भाकरी ते गुलाबजाम.

त्या सुगरण असोत  नसोत…. प्रत्येक  घास वाटतो अमृताहून गोड.

बहिणीत नसतो भेदभाव गरीबी श्रीमंती… लहान थोर… शहर गाव.

बहीण असते एक सरिता ….. या हृदयापासून त्या हृदयापर्यंत वहाणारी……. 

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ !! पन्नाशी पार करतांना !! – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? वाचताना वेचलेले ?

!! पन्नाशी पार करतांना !!  … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एकदा एका पन्नाशी ओलांडलेल्या आणि साठीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले, 

” मित्रा, पन्नाशी ओलांडल्यावर आणि साठीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असं तुला वाटतंय? ” 

— यावर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे……… 

— आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय

— मला याची जाणीव झालीय की, आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही, की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.

— आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना ! 

— आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.

— आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही.‌ कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.

— आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.

— आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.

— ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहिती नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.

— आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.

— आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.

— आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.

—  आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न‌ करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो. 

— मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!

— आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.

 — आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जाऊन रडतो. त्याच्या तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असल्याची भावनाही मनात येते.

खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?

— आत्ता  कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.

खूप खूप शुभेच्छा पन्नाशी ओलांडताना !! —

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आतून तुटलेली माणसं ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ आतून तुटलेली माणसं ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, प्रॅक्टिकल होत जातात.  त्यांचं इमोशनल होणं कालांतराने बंद होत जातं.

आतून तुटलेली माणसं फारशी व्यक्त होत नाहीत. त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना सहन करावं लागलं असेल काहीतरी.

२+२=५ कुणी म्हणालं तरी ते “it’s okay” म्हणून निघून जातात.

ती माणसं वाद टाळतात, माणसांशी बोलणं टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा realisation sense झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खरं बोलतोय, किती खोटं बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थ आहे हे पटकन समजून येतं.

काहीच रिॲक्ट न करता ती माणसं पुढे निघून जातात,आणि यातच खरा शहाणपणा असतो.

थोड्या कालावधीनंतर ही माणसं सेल्फ motivated होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा interference  नको असतो.  कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट मिळालेली नसते, म्हणून मग ते  सेल्फ dependent होतात.

आतून तुटलेल्या माणसाला वादळाची भीती नसते, संकटांची काळजी नसते.  कारण आपण लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे इमोशनल होण्यापासून ते mindset प्रॅक्टिकल होण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरुवात आतून तुटण्यापासून होते….!

म्हणून……

” कभी कभी दर्द भी अच्छा होता है । “

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घोडा हवेत उडू शकेल….मूळ कथा – जाॅर्ज बर्नार्ड शाॅ…अनुवाद  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ घोडा हवेत उडू शकेल….मूळ कथा – जाॅर्ज बर्नार्ड शाॅ…अनुवाद  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

घोडा हवेत उडूही शकेल…..  

एका गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा होते. सैनिक त्याला वधस्तंभाकडे घेऊन जात असतात. प्रथेप्रमाणे त्याला अखेरची इच्छा विचारण्यात येते. कैदी म्हणतो “ मला राजाशी बोलायचं आहे.” 

कैदी राजाला म्हणतो, “ मी मरणार याचं दुःख मला आहे, पण मरण टाळता येणार नाही हे मला समजतं. माझं दुःख हे की माझ्याबरोबर माझी कला संपून जाईल.” 

“ कोणती कला? “ राजा विचारतो.

“ मला घोडा हवेत उडवता येतो,”  कैदी अभिमानाने उत्तरतो, “ ही कला कोणाला शिकवता आली तर मी सुखाने मरेन.” 

“ मला शिकवशील? “ राजा विचारतो.

 कैदी आनंदाने ‘ हो, नक्की शिकवेन ‘ असे म्हणतो. 

“ किती दिवस लागतील?” 

“ एक वर्ष लागेल, “ कैदी म्हणतो.

राजा त्याचा देहदंड रद्द करतो. कैदी कारागृहात येतो. इतर कैदी अचंबित होतात. हकीकत ऐकल्यावर त्याला विचारतात, “ तुला खरंच घोडा हवेत उडवता येतो?” 

“ नाही,” कैदी प्रामाणिकपणे सांगतो.

“ मग तू राजाला का थाप मारलीस?” 

“ एक वर्षात काहीही होऊ शकतं. राजा मरू शकतो, मी मरू शकतो, शेजारचा राजा आक्रमण करू शकतो, राजाचा वा राणीचा वा त्यांच्या मुलाचा वाढदिवस म्हणून कैद्यांना मुक्त केलं जाऊ शकतं, काहीही … “ कैदी उत्तर देतो.

“ गाढवा, पण हे काहीच घडलं नाही तर?”  सोबती विचारतात.

“ मग… कुणी सांगावं…  घोडा हवेत उडूही शकेल,”  कैदी उत्तरतो.

—– कैद्याला हसू नका. हेच सांगत, आश्वासन देत राजकारणी लोक पाच पाच वर्षं राज्य करतात. पुढच्या निवडणुकीत निवडून द्या, घोडा नक्की उडू लागेल असंच सांगत असतात. त्यांनी घोडा लावला तरीही मतदारांना वाटतं आहे त्या घोड्याला पर्याय नाही, तोच लवकरच उडू लागेल. 

सहज माहिती म्हणून…..

….. ही मूळ गोष्ट जॉर्ज बर्नाड शॉ यांची आहे. ‘ सरकार कसं काम करतं ?‘ — या प्रश्नाला त्यांनी दिलेलं हे उत्तर अतिशय संक्षिप्त पण समर्पक आहे…

लेखक :अज्ञात

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 38 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 38 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५९.

पानांपानांवर नाचणारा हा सोनेरी प्रकाश,

आकाशात तरंगणारे हे ढग,

माझ्या मस्तकाला थंडावा देत जाणारा हा वारा

हा सारा तुझ्या प्रेमाचा स्पर्श आहे.

 

प्रभात समयीचा हा प्रकाश

माझे डोळे काठोकाठ भरून टाकतो

आणि तुझा संदेश ऱ्हदयात भरून जातो.

 

माझ्या चेहऱ्यावर तुझा चेहरा

वाकलेला आहे,

तुझे डोळे; माझे डोळे निरखताहेत,

माझं ऱ्हदय तुझ्या चरणांवर वाहिलं आहे.

 

६०.

अंतहीन जगाच्या समुद्रकिनाऱ्यावर मुलं भेटतात.

 

त्यांच्या मस्तकावर स्तब्ध अफाट आकाश आहे.

खळखळणारं चंचल पाणी आहे.

अंतहीन जगाच्या समुद्रकिनाऱ्यावर

आरडाओरडा करत पोरं नाचतात.

वाळूची घरं बांधतात,शिंपल्यानं खेळतात.

वाळलेल्या पानांच्या नावा बांधून

हसत हसत खोल समुद्रात सोडतात.

जगाच्या किनाऱ्यावर पोरं खेळतात.

 

पोहायला,जाळी फेकायला त्यांना येत नाही.

मोती शोधणारे समुद्रात मोत्यासाठी बुडी मारतात.

व्यापारी त्यांच्या गलबतातून सागर सफर करतात.

पोरं शिंपले गोळा करतात, उधळतात.

समुद्रातील धन- दौलत त्यांना नको,

जाळी पसरणं त्यांना माहीत नाही.

सागर खळाळून हसतो, किनारा अंधुकसा हसतो.

 

पाळण्याच्या लहानग्याला

अंगाई गाणाऱ्या मातेप्रमाणं

लाटा निरर्थक व जीवघेणी कवनं गातात.

सागर मुलांशी खेळतो आणि

किनाऱ्याच्या अस्फुट हास्यात

प्रकाशकिरण चमकतो.

 

अंतहीन जगाच्या सागरकिनाऱ्यावर

मुलं खेळतात.

पंथहीन आकाशात वादळ घोंगावतं,

मार्गहीन सागरात जहाजं फुटतात, बुडतात.

दूरवर मृत्यूचं थैमान चाललंय.

 

किनाऱ्यावर पोरांची भव्य सभा भरलीय.

अंतहीन सागरावर पोरं खेळतात.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृतज्ञ रहा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ कृतज्ञ रहा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा .

या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , नाहीत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो . कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . ” मिळतं तेच, जे आपण पेरलेलं असतं . ” आपल्याशी कोणी  कसंही का वागेना, आपण सगळयांशी चांगलंच वागायचं . इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे .

आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते .आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका . फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा— आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे . ” जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत . ” 

जगणं कोणाचंही सोपं नसतं . आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं . ” सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. ” म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ” कृतज्ञ ” रहा .

पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही . म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे . दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून, त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तव्य कधीच सिद्ध होत नसते .

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये . कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात . कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते , ज्याचं नाव आहे , ” आत्मविश्वास ” 

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.

समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा —- ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून .

या भावना नक्की आचरणात आणाव्यात असे सर्वांना सांगणे आहे .

 

संग्राहक –  श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रफू… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ रफू ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

एक मित्र भेटला परवा… खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर… 

म्हणाला, ” मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही… क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं मी ठरवलंय.”_

सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजूला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला…… विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव ‘आलासच ना अखेरीस ‘_ हा माज ठेऊन. 

तो मला म्हणाला, ” दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली….. काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…… ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं….. आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता….. वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…… त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच…..  

मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षून…… तू त्यावेळी मला म्हणाला होतास, “ देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो “…….  ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपुर्वी……  नाही शिवू शकलो मी ते भोक… 

नाही करु शकलो रफू…..  नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र…… . 

माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं…! _ गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दूषणं देत…..  ‘ कसला बाप तू? ‘ अशी खिल्ली उडवत..  बहुदा मनातल्या मनात……   म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे… आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला… यावेळी तू आपलं नातं ‘ रफू ‘ केलेलं पहायला… 

त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला लागलो…. “

सुन्न होऊन ऐकत होतो मी……. 

संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला… 

_’ देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो ‘,चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता…. 

घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे….. 

‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘ पापातून ‘ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘ शापातून ‘ उतराई होऊ बघत होतो… 

मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो……  

दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘ रफू ‘ करू पहात होतो ! ….. 

तात्पर्य:….

सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो.  मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक,शेजारी,सहकारी,आपले नोकर चाकर, हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही. आपल्या आचरणाने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधानाने कुणी दुखावलेच, तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….

पहा विचार करुन…

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जरा बरं नसेल तर… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ जरा बरं नसेल तर… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात—–

 

तू झोप आता म्हणून दहा वेळा उठवतात 

चहा कशात आहे, साखर संपलीये का, गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —

 

टेबलावरची वर्तुळ सांगतात किती झालाय चहा, 

आवरणारे म्हणतात तू झोपूनच रहा,

 फडके म्हणून नवाकोरा नॅपकीनही घेतात.

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —-

 

दूध जातंच उतू  जरी केलं ‘वर्क फ्रॉम होम’ 

आणि ऑफिसला गेले तर फोन वर फोन.

चौकशीच्या नादात बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —-

 

खरकटी भांडी आणि पिम्पाखाली तळे,

 कुकरच्या अगणित शिट्या आणि पोळी भाजीची पार्सले,

 यांच्या दर्शनानेच बहुदा आजारपणे पळतात,

जरा बरं नसेल तर नवरे कित्ती मदत करतात —-

 

रागावू नका, एखादा नवरा असेलही जगावेगळा.

 सन्माननीय अपवादांनी स्वतःला वगळा.

 —पण असे नवरे नेहमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात

 —की पलीकडचे रंग जरा जास्तच हिरवे दिसतात.

                                              

———म्हणे नवरे मदत करतात??

 

हा माझा अभिप्राय आहे — जसं पुरुष म्हणतात 

चांगल्या बायका नेहमी दुसऱ्यालाच मिळतात, 

तसं बायका देखील म्हणतात —–

चांगले नवरे नेहेमी दुसऱ्या बायकांनाच मिळतात ——

संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घर कसं असावं? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घर कसं असावं? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆  

केवळ अपुल्या स्वार्थासाठी

कलह नसावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——-

 

येणार्‍याला पाणी द्यावे

स्वागतातही गोडी हवी

जाणार्‍याच्या मनांत फिरुनी

येण्यासाठी ओढ हवी

ऐसा प्रेमळ माणुसकीचा

झरा वहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——–

 

भांड्याला लागतेच भांडे

विसरुन जावे क्षणामधे

परस्परांना समजुन घ्यावे

अढी नसावी मनांमधे

रुसवे फुगवे नको फुकाचे

मोद रहावा घरामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——-

 

नित्य काळजी घरात घ्यावी

वय झालेल्या पानांची

ज्याची त्याला द्यावी जागा

वयाप्रमाणे मानाची

एकमताने निर्णय घ्यावे

नको दुरावा मनामधे

आपुलकीच्या नात्यामधुनी

स्नेह जपावा मनांमधे ——–

 

कवी  : रमण रणदिवे

संग्रहिका : माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares