वाचताना वेचलेले
☆ पत्राद्वारे मनोगत — अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
प्रिय सखी,
माझे मनोगत पत्राद्वारे व्यक्त करते कारण भेट दुरापास्त झालीय.
आधी थोडी प्रस्तावना —
मनोगत म्हणजे विचार शेअर करणे, पुष्कळ वेळा आपल्याला मनमोकळेपणाने काही सांगायचं असतं ,कधीकधी समोरासमोर सांगणं अवघड असतं. अर्थात समोरासमोर मनातले विचार, भावना सांगताना ,मांडताना वाटतं हा शब्दांचा गैरअर्थ तर काढणार नाही, दुखावला तर जाणार नाही .हिरीरीने मुद्दा मांडताना कधीकधी वाद वाढत जातात आणि रूपांतर भांडणात होते. अशा वेळेस कागदावर उतरलेले शब्द जास्त प्रभावी ठरतात .पत्राद्वारे व्यक्त केलेले मनोगत जितके रंजक असू शकते तितके ते भावनाप्रधान, मनापर्यंत पोचणारे देखील असते. असो. प्रस्तावना पुरे.
मध्यंतरी आपला ग्रुप जमला होता .हसणं खिदळणं गप्पाटप्पा अनेक विषय हाताळून झाले .प्रवास, बालपण, गमती जमती, वाचन, देव ,सत्संग वगैरे वगैरे. हळूहळू पुरुष राजकारणावर आणि आम्ही मैत्रिणी कुकिंग या आवडत्या विषयावर आलो. टिप्सची देवाण-घेवाण झाली. मला एक गंमत वाटते, हे पुरुष राजकारणावर इतके हिरीरीने मुद्दे मांडत असतात, यांचा सगळा आवेश चार भिंतीतच. कोण चूक कोण बरोबर– काहीच कळत नाही. पण खरं सांगू, राजकारण हे मला थोडीफार माहिती असण्याइतपतच मर्यादित आहे. कितीही राग आला, वाईट वाटलं तरी माझी धाव कुंपणापर्यंतच. मग कशाला वाफ दवडवा.
सध्या सत्संग, देव देव यांचे प्रस्थ पण फारच वाढले आहे. सारखे उपदेशानुरुप मेसेजेस. अरे चांगलं बोला, चांगलं वागा ,चांगला विचार करा– हाच खरा सत्संग– माझ्या घरातच देव आहे अशी श्रद्धा बाळगणं हेही तितकेच महत्वाचे
नं ! तासन्तास रांगेत उभे राहून मंदिरात जायचं ,देव दिसतो न दिसतो तोच हकालपट्टी. दान पेटीत पटकन दान करायचे– त्यापेक्षा सत्पात्री दान करावं .विशेषतः विद्यार्थी वर्गाची मला गंमत वाटते. चार-पाच तास रांगेत उभा राहून कधीकधी अनवाणी सिद्धिविनायक किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं, त्यापेक्षा तोच वेळ अभ्यासासाठी सत्कारणी लावला तर जास्त उपयोगी नाही का पडणार !
—-हळूहळू गप्पांचा ओघ आजच्या पिढीवर आला आणि ठेवणीतलं वाक्य ‘ आमच्या वेळेस असं नव्हतं ‘, या समेवर येऊन थांबला.
तुला काय वाटतं , आजची पिढी म्हणजे नातवंडं फार हुशार आहेत ,चौकस आहेत. माहितीची महाद्वार दररोज उघडत आहेत, त्यामुळे जास्तच डोळस होण्याची गरज आहे. एखादी गोष्ट सांगितली तर पटकन विश्वास ठेवणार नाहीत , प्रश्न विचारतील समजून घेतील आणि मगच ते काम करतील
आपल्या पिढीत असं नव्हतं. एखादी गोष्ट सांगितली तर ती बरोबरच असेल, मग ती करायची, प्रश्न विचारायचे नाहीत असा अलिखित नियम— अर्थात यामुळे आपलं काही वाईट झालं नाही, बिघडलं नाही. पण आता माहितीच्या कक्षा इतक्या रुंदावल्यात आणि सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध होत आहे.
आपण नाही का गं एखादं औषध आणलं की त्याचे कंटेंट्स, साईड इफेक्ट याचा शोध घेतो. मग ही तर पुढची पिढी यांची चौकसवृत्ती जरा जास्तच.
खरं सांगू, आता नात्याची चौकट बदलली आहे .आधी नात्याचा पाया भावनेवर उभारलेला होता. आता माहिती हा नात्याचा पाया झाला आहे. काळाचा महिमा.
माझी या पिढीबद्दल तक्रार नाही. पण यांच्या खर्चिक वृत्तीबद्दल जरा प्रश्नचिन्ह आहे. हातात मुबलक पैसा असल्याने मनोरंजनाच्या व्याख्या बदलल्या आहेत. या पिढीला आपल्यापेक्षा खूप टेन्शन्स, प्रेशर आहेत. सगळ्यांची तारेवरची कसरतच आहे. या सर्व गोष्टींशी लढता-लढता जीवनात अनावश्यक आहारांचा कधी शिरकाव झाला आणि तो अमर्यादित कधी झाला हे लक्षातच आले नाही किंवा येत नाही. जंक फुडचा अतिरेक आणि त्यात स्विगी ,झोमॅटो यासारख्या सुविधा आळशीपणात भर घालत आहेत .वाचन संस्कृतीचा ओघ कमी होतोय. असो, धिस इज लाईफ.
शंकराचार्यांच्या गुरूने दिलेला ,’ कोणत्याही परिस्थितीत आनंदात रहा ‘ हा मंत्र आत्मसात करायचा प्रयत्न करून तर बघू या.
मी माझं मन छान मोकळं केलं. अगं मैत्रिणी असतातच कशाला — गुपितं आणि मनातले विचार व्यक्त करायलाच
ना ! चल लवकर भेटूया.—– बाय .
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈