वाचताना वेचलेले
☆ भाव, अभाव आणि प्रभाव …☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
श्रीकृष्ण युधिष्ठिर आणि बलराम दादाच्या आग्रहास्तव कौरवांकडे दूत बनून गेला. जसं रामराया मिथिलेत आल्यावर जनक महाराजांनी सीतेचं सुंदरसदन रिकामं करून रामरायाची निवास व्यवस्था केली होती, त्याचप्रमाणें दुर्योधनाने आपल्या भावाचं, दुःशासनाचं राजभवन सुशोभित करून कृष्णाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. परंतू , श्रीकृष्णाने ते नाकारलं. शिवाय युद्ध टाळण्याची चर्चा निष्फळ ठरल्यावर जेव्हा दुर्योधनाने एक प्रयत्न म्हणून भगवंताला ५६ भोग भोजनाचं निमंत्रण दिलं, तेसुद्धा गोविंदाने नाकारलं….
भगवंताने भोजन नाकारण्याचं जे स्पष्टीकरण दिलं ते फार मार्मिक आहे. गोपाळ म्हणाले, “दुर्योधना, एखाद्याकडचं भोजन घेण्याची तीन कारणे असू शकतात ! —
१) भाव २) अभाव ३) प्रभाव
१) अन्न देणाऱ्याचा प्रेम भाव
२) भुकेल्याकडे अन्नाचा अभाव
३) भुकेल्याच्या मनात अन्नदात्याबद्दलचा प्रभाव
मुरारी म्हणाला, “दुर्योधना, मला जेवू घालण्यात तुझा प्रेमभाव नसून कपट आहे. मी शिधा सोबत आणलेला असल्याने माझ्याकडे अन्नाचा अभाव नाही. आणि तुझ्या दुराचरणामुळे माझ्या मनांत तुझ्याबद्दल आदरयुक्त प्रभाव नाही. मग तुझे हे ५६ भोग मी का स्विकारावे ? “
लहानपणी घरात भरपूर दूध, दही, लोणी असूनही दुसऱ्याकडे डल्ला मारणारा हा माखनचोर आतासुद्धा सोबत शिधा असतांना दुसरीकडे जेवायला जायच्या विचारात होता.
तेव्हा, द्रोणाचार्य, कृपाचार्य या आदरणीय गुरूजनांनी भोजनाचं निमंत्रण दिलं. परंतू , दुराचारीचा पक्ष धरल्याने कान्हाने त्यांचंसुद्धा निमंत्रण नाकारून त्यांचं गर्वहरण केलं ! आणि मग भगवंतानें विचार केला की, भूक तर लागलीच आहे आणि हे सर्व लोक तर माझ्या भोजनाच्या अनुग्रहाला पात्र नाहीत. परंतु, ब्रम्हज्ञानी, कर्मयोगी आणि अनन्य भक्त असलेला एकजण या राज्यात आहे, तो म्हणजे भक्त विदुर !
मन करम वचन छांड चतुराई ।
तबहि कृपा करत रघुराई ।।
मग काय ! भगवंत विनाआमंत्रण या भक्ताच्या घरी स्वतःहून गेले. परंतू, दैव म्हणा किंवा प्रारब्ध, विदुरकाका बाहेर गेलेले होते. काकू घरी होत्या. आणि ज्या भगवंताची आतापर्यंत भक्ती केली तो प्रत्यक्ष आपल्या दारात उभा पाहून त्या मातेचा कंठ दाटून आला आणि रडत रडतच भगवंताला हाताला धरून बसवलं…
विदुराणी भिजलेल्या डोळ्यांनी हा मुखचंद्र न्याहाळत म्हणाली, ” लाला, अरे दररोज तुझ्यासाठी लोणी-साखर काढून ठेवत होते, तू आलाच नाहीस. आता आलास, पण लोणी-साखर तयार नाही ?”
आणि मग काय सांगू ! या साध्वीने, आत जाऊन लोणी करत बसले तर भगवंताचा चेहरा नजरेआड होईल, म्हणून मग बाजूला ठेवलेले केळीचे घड घेतले आणि या भावविभोर अवस्थेत केळी सोलून भगवंताला साली भरवू लागली, आणि केळी बाजूला टाकू लागली.
थोड्या वेळाने जेव्हा विदुरकाका आले, तेव्हा परब्रम्ह परमात्मा स्वतः अचानक घरी आलेला पाहून आता काकांनी अश्रूंनी श्रीचरणी अभिषेक घातला. नंतर त्यांना भगवंताला केळीच्या सालांचा भोग चालू पाहून कसंतरी वाटलं आणि मग त्यांनी केळी भरवायला सुरुवात केली. आणि काकांनी विचारलं, ” हे गिरीधर, केळी गोड आहेत ना ?”
एवढा वेळ हे काका काकू रडत होते, आता भगवंताचा गळा भरून आला, अश्रू अनावर झाले. हा गोकुळ नंदन म्हणाला,
“काका, केळी फार गोड आहेत. परंतू काकूंच्या हातानं जी सालं खाल्ली ना त्याची बरोबरी फक्त माझ्या बालपणी यशोदा मातेने भरवलेल्या लोण्याशीच होऊ शकते. आज मला माझं बालपण पुन्हा जगायला मिळतंय या अमृतसेवनाने “
आणि हे ऐकून पुन्हा तिघांनी अश्रूंचा बांध मोकळा केला. हे तिघं म्हणजे भक्ती, प्रेम आणि ज्ञान ! विदुरकाकांचं परमात्मज्ञान, विदुराणीची निर्लेप, निर्दोष भक्ती आणि भगवंताचं या दोघांवरचं अमर्याद प्रेम ! या तिघांपैकी कोण श्रेष्ठ हे कसं आणि का ठरवायचं ?
भगवंताला साक्षी ठेवून सांगतो, हा भक्ती, प्रेम आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नाम ! ते नाम जीवापाड जपून कर्तव्याच्या मर्यादा सांभाळाव्या, भगवंत आपल्या घरी यायला, आपल्या हृदयांत साठवायला वेळ नाही लागणार.
।। श्रीगुरुदेवदत्त ।।
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈