श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
कावळ्याची जणू कावळी ! संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित
कावळ्याची जणू कावळी !
कावळी : चला पुढचे पंधरा दिवस स्वयंपाकाला सुट्टी.
कावळा: हो जसा काही रोजच पुरणपोळीचा घाट घालतेस.
कावळी: देह सुटला पण तुमच्या वासना काही सुटल्या नाहीत. मनुष्य देहात असताना सगळं खाऊ घातलंय तुम्हाला, तरी तुमचं रडगाणं सुरूच
कावळा: मग कशाला आलीस माझ्या पाठोपाठ ?
कावळी: एवढ्या वटपौर्णिमा केल्या, तेव्हा बोलला असतात, तर आता तरी आपले मार्ग वेगळे झाले असते. आता भोगा आणखी सात जन्म.
कावळा: असो,आता उगाच वाद घालू नको.लोक काय म्हणतील ?
कावळी: आता कोणाला कळणारे आपली भाषा ?
कावळा: तेही खरंय म्हणा. मग कुठे जेवायला जायचं म्हणतेस ?
कावळी: अहो बऱ्याच जणांनी बोलावलंय. मलाच कळत नाहीये कोणाचं आमंत्रण स्वीकारावं. मी नुसतंच तोंडदेखल्या काव काव करून आलीये.
कावळा: पण आता पोटात काव- काव सुरू झालीये. वेळेत निघायला हवं, नाहीतर दुसरी जोडपी येऊन कट्ट्यावर बसतील.
कावळी: म्हणून अनोळखी लोकांकडे जायचंच नाही. जे आपली मनापासून आठवण काढतात ना तिथेच जाऊया.
कावळा: म्हणजे कुठे ?
कावळी: आपल्या मुलांकडे.
कावळा: अजिबात नाही. जिवंत असताना त्यांनी किती आठवण काढली ते पाहिलंय मी. प्रॉपर्टीची विभागणी काय केली, दोघांनी माझा आप्पासाहेब बेलवलकर करून टाकला.
कावळी: मुलगीही तशीच नलूसारखी आणि तुम्ही ?
कावळा: हो शेवटी मीच तुमचा सरकार— काव काव.
कावळी: हसू नका. आवरा आता. तुमच्या मित्राकडे जाऊ. त्याने पारावर आपलं ताट नक्कीच आठवणीने वाढून ठेवलं असेल.
कावळा: नको मेल्याने पेल्यात बुडवून माझं आयुष्य कमी केलं, नाहीतर आणखी काही वर्ष जगलो असतो मी. त्याचं काही खरं नाही, ताटाभोवती पाणी फिरवायचं सोडून मद्याचे थेंब टाकले असतील मला आकर्षून घ्यायला. पुन्हा अडकायच नाहीये मला व्यसनात. असले मित्र नकोच.
कावळी: मग माझ्या जिवलग मैत्रिणीकडे जाऊ.
कावळा: तिथेही नको तुमच्या गप्पा सुरू झाल्या तर मी उपाशी राहीन.
कावळी: अहो गप्पा मारायला आता आपण काही मनुष्य नाही, विसरलात का ?
कावळा: लक्षात आहे. पण तुम्ही बायका भिंतीशी सुद्धा बोलू शकता. तू तरी कावळी आहेस.
कावळी: खबरदार मला कावळी म्हणाल तर. किमान या पंधरा दिवसात तरी मला खूपच मानाने वागवतात लोक.
कावळा: ठीक आहे बाई– नाही म्हणत कावळी. तू तर डोमकावळी.( तू तर चाफेकळी चालीवर)
कावळी: पुरे आता. कुठे जायचं ते ठरवा पटकन. कधीची छान तयार होऊन बसलेय.
कावळा: मी काय म्हणतो, आपण घरीच जेऊया का ? आता आपुलकीने बोलावणारी माणसं राहिली नाहीत. राहिलाय तो फक्त सोपस्कार. लोक आपल्या नावाने स्वयंपाक करणार, छोट्याशा ताटात नैवेद्य दाखवणार. आपण खातोय की नाही हे सुद्धा नाही पाहणार. आणि स्वतः मात्र खीर-वड्याच्या जेवणावर आडवा हात मारणार. ज्यांनी जिवंतपणी आपल्याला नीट नाही वागवलं त्यांच्याकडून मेल्यानंतर चांगल्या वागणुकीची काय अपेक्षा करणार ?– त्यापेक्षा तू खिचडी टाक.
कावळी: झाsss लं. सगळंच बारगळलं. तेव्हाही हॉटेलला नेतो म्हणायचात आणि शेवटी असंच काहीतरी सांगून घरी खिचडी करायला लावायचात—पण तुमचं म्हणणं पटतय. –शेवटी कोणी नाही आपलं. आपणच जगतो एकमेकांसाठी, म्हणूनच तर भगवंताने बांधल्या आपल्या जन्मोजन्मीच्या गाठी.
कावळा: सरकार माझं ते आवडतं गाणं म्हणा नं, फक्त थोडं एडिट करून—
कावळी: आता पूर्वीसारखा कोकीळकंठी आवाज लागणार नाही बरं.
कावळा: हरकत नाही दोघांचा रंग तर सारखाच ना. घेईन मी ऍडजस्ट करून.थोडं खर्जात गाशील.
कावळी: सांज ये गोकुळी, कावळी कावळी. कावळ्याची जणू कावळी ——-
जिवंतपणी नातीगोती जपा.
संग्राहक : – श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈