मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 3 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 3 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५.

तुझ्या चरणकमळाजवळ निवांत बसावे

असे  आज मला वाटते

हातात असलेली कामं नंतर करता येतील

 

किनारा नसलेल्या सागरासारखी असंख्य

निरर्थक कामं मी करीत राहतो

पण तुझ्या दर्शनावाचून माझ्या मनाला

ना विश्रांती ना आराम

 

गाणी गात वसंत ॠतू  माझ्या गवाक्षाशी

रुंजी घालतो आहे.

फुलपाखरं बागडणारी आणि

पुष्पगुच्छांचा सुवास हवेत दरवळत आहे

 

जीवन समर्पणाचं गीत गात,

शांत मनानं तुझ्या समोर

विसावा घ्यावा असा हा क्षण आहे

 

६.

कोमेजून आणि धुळीत मिसळून जाण्याअगोदर

हे छोटेसे फूल तू खुडून घे l आता विलंब नको

 

तुझ्या गळ्यातल्या हारात त्याला स्थान नसेलही,

पण तू ते खुडताना त्याला होणाऱ्या

यातना  त्याचे गौरवगीत आहेत.

मला समजण्याअगोदरच समर्पणाचा

हा दिवस कधीच निघून गेला असेल.

 

फिकट रंगाचे आणि मंद वासाचे हे फूल

तुझ्या चरणसेवेतच यावे.

अजून वेळ आहे, तोवर ते खुडून घे.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उलगडण्याला शिका… गीता स्त्रोत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

उलगडण्याला शिका… गीता स्त्रोत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

  डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका

  जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥धृ॥

 

  भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले

  कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले

  प्रारंभी जे अदभूत वाटे गहन, भितीदायी

  त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही

  या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका !

  जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥१॥

 

  वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा

  बीज पेरता कसे उगवते, पाऊस येई कसा

  चारा चरूनी शेण होतसे, शेणाचे खत पिका

  पीक पेरता फिरूनी चारा, चक्र कसे हे शिका

  जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका

  जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥२॥

 

  अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार

  सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार

  या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे

  बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे

  विज्ञानाची दृष्टी वापरा, स्पर्धेमध्ये टीका !

  जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥३॥

 

गीत स्त्रोत – मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रतिभावंत☆ प्रस्तुति – सुश्री प्रिया आपटे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रतिभावंत☆ प्रस्तुति – सुश्री प्रिया आपटे ☆

सोपं नसतं प्रतिभावंत स्त्रीवर

प्रेम करणं…

कारण तिला पसंत नसते जी हुजुरी ;

झुकत नसते ती कधी .. जोवर असत नाही नात्यांमध्ये प्रेमाची भावना ;

तुमच्या प्रत्येक हां ला हां आणि ना ला ना म्हणणे तिला मान्य नसतं..

कारण ती शिकलेलीच नसते नकली धाग्यात नाती गुंफणे ;

तिला ठाऊक नसते सोंगाढोंगाच्या

पाकात बुडवून आपले म्हणणे मान्य

करवून घेणे;

तिला तर ठाऊक असते बेधडक

खरे बोलत जाणे;

फालतू चर्चेत पडणे तिच्या स्वभावात बसत नाही;

मात्र तिला ठाऊक असते तर्कशुध्दपणे आपला विचार कसा मांडायचा ते;

ती वेळोवेळी दागदागिने

कपडेलत्ते यांची कोणाकडे मागणी नाही करत ;

ती तर सावरत असते स्वतःला.. आपल्या आत्मविश्वासाने,

सजवत असते आपले व्यक्तिमत्व ती

निरागस स्मितहास्याने ;

तुमच्या चूकांविषयी ती तुम्हांला

अवश्य बोलणार..

पण अडचणीच्या काळात तुम्हाला सांभाळून पण घेणार;

तिला तिची गृहकर्तव्ये नक्की माहित आहेत..

तसेच आपल्या स्वप्नांना पूर्ण करणेदेखील….

 

तिला जमत नाही कुठल्याही निरर्थक गोष्टींना मानणे;

पौरुषापुढे ती नतमस्तक नाही होत,

झुकते जरुर पण ते तुमच्या निःस्वार्थ प्रेमापुढे..

आणि या प्रेमासाठी आपलं सर्वस्व

उधळून देऊ शकते……

धैर्य असेल निभावण्याचे तर आणि तेव्हाच अशा स्त्रीवर प्रेम करावे..

कारण कोसळत असते आतून ती दगाफटका नि कपटाने,

पुरुषी अहंकाराने,

जी पुन्हा जोडली जाऊ शकत नाही

कुठल्याही प्रेमाखातर….!

पोलंड च्या प्रसिध्द कवयित्री डोमिनैर यांची ही कविता आहे…

संग्राहिका : सुश्री प्रिया आपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 2☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 2 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

१. आयुष्य संथ झालं म्हणून तक्रार करत होतो. तेव्हा मैलाचा दगड भेटला अन म्हणाला ;
“मी स्थिर आहे म्हणूनच लोकांना त्यांची गती मोजता येत्ये रे!”

२. माझ्या एका सत्कार समारंभात मला आकाश भेटलं कानात कुजबुजत म्हणालं, “एवढ्यात शेफरलास ?
जी मोजता येत नाही ती खरी उंची.”

३. कुठलीही गोष्ट हसण्यावारी नेतो म्हणून मी मित्रावर रागावलो. तो मला समुद्रकिनारी घेऊन गेला आणि त्याने मला विचारलं,” या समुद्राची खोली किती असेल सांगू शकशील?” तेव्हापासून मी मत बनवत नाही कुणाबद्दल.

४. मला वाटलं कठीण हृदयाच्या माणसांना सौंदर्य कसं समजणार ?
एक हिरा लुकलुकला. म्हणाला, “वेडा रे वेडा !!”

५. कमी मार्क मिळाले म्हणून एका कोकराला कोणीतरी बदडत होतं. त्या कोकराच्या डोळ्यातले भाव वाचले मी ! ते म्हणत होतं, ‘करून बघायचं कि बघून करायचं,
ठरवू दे की मला मी कसं जगायचं !’

 

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

.

आणि हे स्वामी, मी भितरा अशी साद घालतो

 हे स्वामी, तू गातोस आणि मी शांत चकित होऊन

 ते फक्त ऐकत राहतो

तुझ्या संगीताच्या प्रकाशात सारे जग उजळून निघते

तुझ्या संगीताच्या जिवंत स्पर्शानं

आकाशाचा कोपरा अन् कोपरा उजळून निघतो

तुझ्या पवित्र संगीताचा ओघ पाषाणांचे अडथळे पार करून वाहातच असतो

तुझ्या गीतात सूर मिसळायची धडपड मी मनापासून करतो, पण आवाज उमटत नाही

मी गायचा प्रयत्न करतो, पण ध्वनीच उमटत नाही, अर्थ निघत नाही, ते फक्त अरण्यरुदनच ठरते

हे स्वामी, तुझ्या संगीतमय धाग्यात तू मला बंदिवान करून ठेवले आहेस.

 

४.

माझ्या जीवनाच्या जीवना,

माझ्या सर्वांगावर तुझ्या अस्तित्वाचा स्पर्श आहे,

ही जाणीव ठेवून मी माझे शरीर स्वच्छ व शुद्ध

ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो

 

माझ्या मनाच्या गाभाऱ्यात

श्रध्देची व सत्याची ज्योती

सतत तेवत रहावी म्हणून सत्याचा

प्रकाश  फेकणारा तूच आहेस

या जाणिवेने साऱ्या असत्यांचा पसारा

मी बाजूस सारतो

 

माझ्या अंत: करण्याच्या गाभाऱ्यात

तुझीच पुष्पांकित मूर्ती विराजमान आहे,

ही जाणीव ठेवून माझ्या अंत: करण्यातून

सर्व दुष्ट प्रवृत्ती सतत दूर ठेवायचा मी प्रयत्न करतो.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ आपली भाषा…पु.ल.देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

कुसुमाग्रजांची एक कविता आहे,

‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ,

उतरली जणु तारकादळे नगरात,

परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हां,

त्या माजघरातील मंद दिव्याची वात.’

आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणार्‍या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरात रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणार्‍या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तो, “मन एव मनुष्यः”, अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

(पुलंनी अमेरिकेत केलेल्या एका भाषणातून)

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

मी मुक्तामधले मुक्त… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मी मुक्तामधले मुक्त,

तू कैद्यांमधला कैदी।

माझे नि तुझे व्हायाचे,

ते सूर कसे संवादी?

माझ्यावर लिहिती गीते,

या मंद-समीरण लहरी।

माझ्यावर चित्रित होते,

गरूडाची गर्द भरारी।

जड लंगर तुझिया पायी,

तू पीस कसा होणार?

माझ्याहून आहे योग्य,

भूमीला प्रश्न विचार।

 

आभाळ म्हणाले ‘नाही’,

भूमिही म्हणाली ‘नाही’।

मग विनायकाने त्यांची,

आळवणी केली नाही।

 

पापण्यांत जळली लंका,

लाह्यांपरि आसू झाले।

उच्चारून होण्याआधी,

 उच्चाटन शब्दां आले।

की जन्म घ्यायच्या वेळी,

गंगेस हिमालय नाही।

शाई न स्पर्शली असूनी,

हे अभंग नदिच्या‘बाही’।

 

दगडाची पार्थिव भिंत,

तो पुढे अकल्पित सरली।

‘मी कागद झाले आहे,

चल ‍‍‍‍‍‍लिही’ असे ती वदली।

 

(वीर सावरकरांनी अंदमानात असताना, कागद-पेन यांना बंदी म्हणून गुपचूप बोरीचा काटा सोबत नेऊन, अंदमानाच्या भिंतीवर कोरून कविता लिहिल्या, काट्याची लेखणी झाली, भिंतीची वही झाली… ते रेखाटणारी एक कविता…!!)

कवी कोण आहे हे समजू शकले नाही.

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रश्न ?? # 1 ☆ प्रस्तुति – सुश्री मंजिरी गोरे ☆

 

  1. एका वाढदिवसाला मला आयुष्यानं विचारलं – “जगलास किती दिवस?”
  2. प्रेताने सरणावरच्या लाकडांना विचारलं – “माझ्याबरोबर तुम्ही का जळताय?” लाकडं म्हणाली, “मैत्री म्हणजे काय ते कळलं नाही का अजूनही तुला?”
  3. पांगळ्या मुलाला भर उन्हात खांद्यावरून उतरवून रस्त्याच्या कडेला एका फाटक्या पोतेऱ्यावर बसवल्यावर त्याचा घाम आपल्या नवखंडी पदराने पुसून ती माऊली एकुलती एक कोरडी शिळी पोळी त्याला भरवताना म्हणाली ,”बाळा दमला असशील ना? खा पोटभर !!”
  4. माणसानी देवाला विचारलं संकटं का पाठवतोस ? – देव म्हणाला माणसाला होणाऱ्या माझ्या विस्मरणावरचं हमखास औषध आहे ते.
  5. ‘विश्वास’ या शब्दात “श्वास” का आहे? – दोन्हीही एकदा जरी तुटले तरी संपतं सगळं !
  6. दरवेश्याचं माकडाशी वागणं बघून मला माकडाची दया आली माझ्या मनाचा मला लगेच प्रश्न, “माकडाची येते पण माझी नाही येत दया तुला?” त्यावर माझा मनाला प्रतिप्रश्न. “माकडानं दरवेश्याला खेळवताना पाहिलं आहेस कधी?”

संग्राहिका : सुश्री मंजिरी गोरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

प्रस्तावना-

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली साठी नोबेल पारितोषिक मिळाले. एक तत्त्वज्ञ, महाकवी यांची, गंगेच्या किनारी नीरव शांततेत, निसर्गाची अनेक अद्भुत रुपे पहात फिरताना तरल सर्वव्यापी काव्यनिर्मिती म्हणजे गीतांजली. प्रेम, समता आणि शांती यांचा संदेश देणारी. इंग्रजी भाषेतील गीतांजली मा. ना. कुलकर्णी यांच्या वाचनात आली. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते तसेच त्यांना साहित्याची आवड होती. संत साहित्याचे वाचन, चिंतन, मनन करत असत. टागोरांची गीतांजली त्यांना निसर्गरुपी ईश्वराशी तादात्म्य पावणारी कविता वाटली. त्यांना मिळालेले ज्ञान, तो आनंद, इतरांना मिळावा म्हणून त्याचा मातृभाषेत भावानुवाद केला, जो पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाला. ई- अभिव्यक्ती – मराठी मध्ये या कविता क्रमशः प्रसिद्ध होत आहेत, ह्यासाठी सर्व संपादक मंडळाला मी कृतज्ञता पूर्वक धन्यवाद देते.

☆  गीतांजली भावार्थ

१.

हे नाजूक भांडे तू पुन्हा पुन्हा रिते करतोस,

आणि नवचैतन्याने पुन्हा पुन्हा भरतोस

 

ही बांबूची छोटी बासरी

दऱ्याखोऱ्यांतून तू घुमवितोस

तिच्यातून उमटणारे नित्यनूतन संगीत

तुझेच श्वास आहेत.

 

तुझ्या चिरंतन हस्त स्पर्शाने

माझा चिमुकला जीव आपोआपच

मर्यादा ओलांडतो

आणि त्यातून चिरंतन बोल उमटतात

 

माझ्या दुबळ्या हातात न संपणारं दान ठेवतोस,

युगं संपली तरी ठेवतच राहतोस,

आणि तरीही ते हात रितेच राहतात

 

तुझी किमया अशी की,

मला तू अंतहीन केलेस !

 

२.

मी गावं अशी आज्ञा करतोस यात

केवढा माझा गौरव

नजर वर करून तुला पाहताना

माझं ह्रदय उचंबळून येतं

बेसूर जीवन मुलायमपणे एका

मधुर संगीतानं फुलून येतं

आणि सागरावर विहार करणाऱ्या

समुद्र पक्ष्याप्रमाणं

माझी प्रार्थना पंख पसरते

 

माझं गाणं ऐकून तू सुखावतोस

तुझ्या सान्निध्यात एक गायक म्हणूनच

मला प्रवेश आहे

 

ज्या तुझ्या अस्पर्श पावलांना

माझ्या दूरवर पसरणाऱ्या गीतांच्या पंखांनी

मी स्पर्श करतो,

गाण्याच्या आनंद तृप्तीने मी स्वतःला विसरतो

 

– मा. ना.कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

फोन नंबर – 7387678883

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३६ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३६– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

[१६१]

आपली स्वत:चीच फुलं

भेट म्हणून

स्वीकारण्यासाठी

माणसाकडून

किती वाट पाहतो

ईश्वर

आतुर: उत्सुक

 

[१६२]

सूत कातता कातता

कुणी साधी भोळी स्त्री

गुणगुणत असावी

एखादं  प्राचीन लोकगीत

हरवलेल्या आवाजात

तशी आज ही धरती

गुणगुणते काही बाही

माझ्या कानाशी

 

[१६३]

आपआपल्या मंदिरात

आपलेच दिवे

ओवाळतात ते

आळवतात अहोरात्र

आपल्याच आरत्या

पण हे पक्षी

तुझ्याच प्रात:कालीन प्रकाशात

तुझ्याच प्रसन्न प्रार्थना

किती खुशीनं गातात. 

 

[१६४]

सर्व चुकांसाठी

आपले दरवाजे

जर

बंद ठेवलेस तू

तर

सत्यालाच प्रत्यक्ष

कोंडून ठेवशील तू

बाहेर…

 

[१६५]

कीर्तीच्या आणि प्रतिष्ठेच्या

शेवटच्या टोकापर्यंत

जाऊन आल्यावर

सभोवार पसरलेली

ही पोकळ उदासी

आणि गुदमरणारे प्राण…

किती वांझ असतं शिखर

आणि किती निमुळतं

क्रूरपणे आसरा झिडकारणारं…

तूच आता दाखव वाट

हे प्रभो,

अद्याप धुगधुगत आहे

हा प्रकाश

तोवरच घेऊन चल मला

त्या दरीपर्यंत

खोल … खोल…

शांत… निवांत

आयुष्याचं मृदू फळ

पिकून तयार असेल तिथं

आणि

त्यावर तकाकत असेल

जाणिवेचा सोनेरी रंग

-समाप्त-

(या कवितांबरोबरच हे सदर इथे संपत आहे.)

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares