मानवी जीवनात संकटे, आजार आणि अनपेक्षित घटना या अपरिहार्य आहेत; परंतु त्या क्षणी माणसाची मानसिक प्रतिक्रिया त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. एखादे संकट कोसळले किंवा गंभीर आजार झाला की “मलाच का? हे माझ्याच नशीबी आहे का आले?” असे प्रश्न पडणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होय… पण ही अंतर्मुखतेऐवजी आत्मदयेची छटा असलेली प्रतिक्रिया असते. या प्रश्नामागे अन्यायाची भावना आणि स्वतःला परिस्थितीचा बळी समजण्याची प्रवृत्ती दडलेली असते. ही मानसिकता दीर्घकाळ टिकली तर ती निराशावाद, हताशपणा आणि निष्क्रियता वाढवू शकते, कारण यातून समस्या सोडवण्याऐवजी परिस्थितीला दोष देण्याची सवय निर्माण होते. अशा वेळी व्यक्ती आपली उर्जा प्रश्न विचारण्यात खर्च करते, पण उत्तर शोधण्याचा प्रयत्न कमी पडते.
याउलट, “हे का घडले?” किंवा “यातून मी काय शिकू शकतो?” असा विचार हा अधिक रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो. या भूमिकेतून व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीकडे, निर्णयांकडे आणि सवयींकडे वस्तुनिष्ठपणे पाहू लागते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाल्यास त्यामागील कारणे—जसे की आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, किंवा वैद्यकीय दुर्लक्ष—यांचा विचार केल्यास भविष्यात त्यापासून बचाव करण्याचे मार्ग सापडू शकतात. संकटांच्या बाबतीतही तसेच आहे; चुकीचे निर्णय, अपुरी तयारी, किंवा बाह्य परिस्थिती यांचे विश्लेषण केल्यास पुढील वेळी अधिक सजगपणे वागता येते. ही वृत्ती केवळ समस्या समजून घेण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्तीला कृतीशील बनवते.
सामाजिक पातळीवरही ही दोन मानसिकता भिन्न परिणाम घडवतात. “माझ्याच वाट्याला का?” हा दृष्टिकोन व्यक्तीला स्वतःपुरता मर्यादित ठेवतो, तर कारणमीमांसा करणारी वृत्ती व्यापक संदर्भ समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, एखाद्या आजाराचा प्रसार झाला तर केवळ वैयक्तिक दु:खावर थांबण्याऐवजी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, स्वच्छता, जागरूकता यांसारख्या घटकांचा विचार केल्यास सामूहिक उपाययोजना शक्य होतात. त्यामुळे सकारात्मक वृत्ती ही केवळ वैयक्तिक विकासापुरती नसून सामाजिक प्रगतीसाठीही महत्त्वाची ठरते. याचा अर्थ असा नाही की “माझ्याच बाबतीत का?” हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे; तो मानवी भावनांचा नैसर्गिक भाग आहे. परंतु त्या प्रश्नात अडकून न राहता, पुढे जाऊन कारणांचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. संकटांना टाळता येत नाही, पण त्यातून शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी नक्कीच असते. त्यामुळे निराशावादी आत्मदयेपेक्षा विवेकाधिष्ठित, कृतीशील आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे हेच खऱ्या अर्थाने मानसिक परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीतून मार्ग काढताना अथक परिश्रम करण्याची जिद्द निर्माण होते.
☆ नाविन्य, अपेक्षा, आणि वास्तव… ☆ विभावरी कुलकर्णी ☆
सुरुवातीला विशेष आकर्षक वाटणारी गोष्ट, मिळाल्या नंतर सामान्य का वाटते?
असे बऱ्याच ठिकाणी आढळते. मानवी स्वभावच असा आहे की, जे मिळत नाही त्याची ओढ वाटते आणि एकदा ते मिळालं की त्यातील नाविन्य संपल्यामुळे त्याचा कंटाळा येऊ लागतो. यालाच ‘मानवी तृष्णेचा विळखा’ म्हणता येईल.
या साठी एक गोष्ट आठवते.
सोनरी पिंजरा आणि राघू
एका श्रीमंत सावकाराला पक्षी पाळण्याची खूप आवड होती. एकदा बाजारात त्याला एक अतिशय देखणा, मखमली पिसांचा आणि गोड बोलणारा पोपट दिसला. त्या पोपटाचा रंग इतका हिरवागार होता की सावकार त्याच्यावर मोहित झाला. त्याने खूप पैसे देऊन तो पोपट विकत घेतला.
घरी आल्यावर सावकाराने त्या पोपटासाठी एक सोन्याचा पिंजरा बनवून घेतला. सुरुवातीचे काही दिवस सावकार खूप उत्साहात होता. तो रोज पोपटाशी गप्पा मारायचा, त्याला बदाम-पिस्ते खायला द्यायचा. पोपटही नवीन घर आणि सोन्याचा पिंजरा पाहून सुरुवातीला खुश होता.
पण काही दिवसांनी सावकाराचा दृष्टिकोन बदलला. हळूहळू सावकाराला त्या पोपटाच्या त्याच त्या शब्दांचा कंटाळा आला. “किती तेच ते बोलतो हा!” असं म्हणून त्याने पोपटाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. जो पोपट आधी ‘अद्भूत’ वाटत होता, तो आता फक्त एक ‘शोभेची वस्तू’ बनला.
पोपटाची स्थिती पण काहीशी तशीच झाली. पोपटाचाही त्या सोन्याच्या पिंजऱ्यावरून जीव उडाला. त्याला आता ते बदाम नकोसे झाले आणि बाहेरच्या साध्या कडुनिंबाच्या झाडावरची फळं गोड वाटू लागली. ज्या सोन्याच्या पिंजऱ्याने त्याला सुरुवातीला आकर्षित केलं होतं, तोच आता त्याला ‘तुरुंग’ वाटू लागला.
या उदाहरणातून काही गोष्टी लक्षात येतात.
नाविन्याचा फुगा असतो. कोणत्याही भौतिक गोष्टीचे आकर्षण हे त्यातील ‘नाविन्या’वर अवलंबून असते. एकदा का आपण त्या गोष्टीशी सरावलो की तिचे महत्त्व कमी होते.
दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. आपण वस्तू किंवा व्यक्तीला ‘मिळवण्यावर’ जास्त लक्ष देतो, पण ती ‘टिकवून ठेवण्यावर’ किंवा त्यातील आनंद शोधण्यावर मेहनत घेत नाही.
जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा आपण तिचे फक्त फायदे पाहतो. मिळाल्यावर तिचे मर्यादा आणि दोष दिसू लागतात, ज्यामुळे कंटाळा येतो.
थोडक्यात सुरुवातीला चमकणारी प्रत्येक गोष्ट ‘हिरा’ वाटू शकते, पण जीवनाचा खरा आनंद हा ती गोष्ट मिळाल्यावर तिचा कंटाळा न येऊ देता, त्यातील समाधान शोधण्यात असतो. म्हणूनच म्हणतात, “दुरून डोंगर साजिरे!” पण त्याचे खरे स्वरूप डोंगरा जवळ गेल्या शिवाय कळत नाही.
ही मानवी स्वभावाची एक अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याला मानसशास्त्रात ‘हेडोनिक अडॅप्टेशन’ (Hedonic Adaptation) असे म्हणतात. एखादी गोष्ट मिळेपर्यंत आपली ओढ तीव्र असते, पण ती प्राप्त झाली की तिचे नाविन्य संपते.
यामागे काही महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे सांगता येतील:
१. मनाला ‘नाविन्याचा’ शोध असतो.
मानवी मेंदूला नेहमी नवीन गोष्टींचे आकर्षण वाटते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा आपला मेंदू त्याबद्दलची स्वप्ने रंगवतो. पण एकदा ती गोष्ट रोजच्या जगण्याचा भाग झाली की, मेंदू तिला ‘गृहीत’ धरू लागतो (Adaptation). त्यामुळे सुरुवातीचा तो उत्साह ओसरतो.
२. अपेक्षा आणि वास्तव यांतील फरक लक्षात येतो.
अनेकदा आपण एखाद्या गोष्टीचे अवास्तव चित्र मनात रंगवलेले असते. ती गोष्ट मिळाल्यावर आपल्याला मिळणारा आनंद हा कल्पनेतील आनंदापेक्षा कमी असू शकतो. ‘ती गोष्ट मिळाल्यावर माझे आयुष्य पूर्णपणे बदलेल’ हा भास जेव्हा संपतो, तेव्हा त्या गोष्टीचे विशेष वाटेनासे होते.
३. ‘डोपामाइन’चा प्रभाव असतो.
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा करतो किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचे रसायन स्रवते, जे आपल्याला ‘थ्रिल’ किंवा आनंद देते. एकदा का ध्येय गाठले की, या रसायनाचा स्तर कमी होतो आणि आपण पुन्हा पुढच्या नवीन ध्येयाकडे धावू लागतो.
४. सवयीची शक्ती फार मोठी असते. त्यामुळे सवयीच्या गोष्टींचा कंटाळा येतो.
कोणतीही मोठी सुखद घटना असो किंवा दुःखद, माणूस कालांतराने आपल्या मूळ स्वभावाकडे (Baseline Happiness) परत येतो. नवीन गाडी, नवीन घर किंवा नवीन पद भूषवल्यानंतर काही दिवसांनी ती आपली ‘सवय’ बनते. सवयीमुळे त्यातील ‘विशेष’ काहीतरी असण्याची भावना संपून जाते.
यावर उपाय
कृतज्ञता (Gratitude):
ज्या गोष्टी आपण मिळवल्या आहेत, त्या आपल्या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत याची जाणीव वारंवार स्वतःला करून देणे.
वर्तमानात जगणे:
केवळ ‘मिळवण्याच्या’ आनंदापेक्षा, त्या गोष्टीचा रोजच्या आयुष्यात ‘उपभोग’ घेण्यावर लक्ष केंद्रित करणे.
प्रवासाचा आनंद:
ध्येयापेक्षा ते गाठण्याच्या प्रवासाचा आनंद घेणे शिकले, तर प्राप्त झाल्यावर येणारी रिक्तता कमी जाणवते.
थोडक्यात सांगायचे तर, मिळवण्याची ओढ ही ‘इच्छे’तून येते, तर टिकवून ठेवण्याचा आनंद हा ‘तृप्ती’तून येतो. जर तृप्ती नसेल, तर प्रत्येक गोष्ट मिळवूनही ती साधारणच वाटत राहील.
ठरवलं तर माणूस काहीही करु शकतो. पण हे ठरवणंच सोप्प असत का. ?… कधी सोप्प, तर कधी कठीण असतं. फक्त हे सोप्प आणि कठीण आपण ठरवलय, का आपल्याबद्दल कोणी ठरवलंय यावर अवलंबून असत.
आपण कोणासाठी काही ठरवलं असेल तर त्यात बराच अर्थ असतो. पण कोणी आपल्याबद्दल काही ठरवलं असेल तर त्यात आपण अर्थ शोधायचा प्रयत्न करतो.
हे ठरवणं म्हणजे लग्नासारख्या मोठ्या गोष्टींच नाही. तर इतर गोष्टींचच आहे. पण यातही… लहान लहान गोष्टी ठरवायला तुम्ही कशाला पाहिजे… असं म्हंटल की मोठेपणा मिळाल्या सारख वाटत. पण त्याच बरोबर मोठ्या गोष्टी ठरवण्या इतका मोठेपणा कोणी देत नसल्याचही लक्षात आणून दिल जात. शेवटी काय ठरवण्यात आपला सहभाग असावा कि नसावा हे सुध्दा माझ्याबद्दल दुसरेच ठरवतात.
माणसानं स्वप्न सुध्दा मोठ्ठी पहावीत अस म्हणतात. याचप्रमाणे मी काहितरी मोठ्ठ ठरवाव अस वाटलं. पण मी जे ठरवत होतो ते काहितरी मोठ्ठ नव्हतच, काहीही ठरवण्याइतका मी मोठा झाल्याचं मला आठवतच नाही. आणि मी इतरांच्या बाबतीत काही ठरवावं इतके लहान दुसरे वाटलेच नाही. माझ्या बाबतीत इतरांनी माझ्यासाठी ठरवलेल्याच गोष्टी माझ्याकडून ठरवून होतात.
लहान असतांना कोणत्या शाळेत जायचं, अभ्यास कसा, कितीवेळ करायचा हे ठरवलं होत. पण मी नाही. खेळायचं काय हे आम्ही ठरवत असलो तरी खेळायची वेळ मी ठरवत नव्हतो. गणवेश शाळा ठरवत होती. तर कपडे कुठे, कसे, कोणते घालायचे हे घरचे ठरवत होते. त्यावेळी आजच्या सारखा ऑनलाईन जमाना नव्हता, उलट बर्याचदा तर सगळ्यांना म्हणजे लायनीने सारखेच कपडे असायचे. आजकाल कपडे आणि केस यावरून मुलगा आहे का मुलगी हे सुध्दा पटकन ठरवता येत नाही. पण आमच्या लहानपणी नुसत्या कपड्यावरून आम्ही भावंड आहोत हे सगळ्यांना सहज समजत होत. बर्याच घरी हीच स्थिती होती. त्याचा परिस्थितीशी संबंध असलाच पाहिजे अस काही नव्हत. माझ्या मुलांच्या बाबतीत हे मी ठरवण्याचा प्रश्न आलाच नाही.
नोकरीत मी कोणतं काम करायचं, हे त्यांंच ठरलं कि मला सांगितल जायचं. हं, हे करा. कदाचित मी कोणतं काम नीट करेन हाच प्रश्न त्यांना असावा. किंवा जे काम करायला कोणाला आवडत नसेल ते मला देण्याच ठरत असाव.
मुलांच्या बाबतीत काही ठरवावं, तर त्यांच आधीच काय करायच ते ठरलेलं असत. मग मी आपला त्यांनी ठरवलय तेच करायच ठरवतो. उगाच वेगळं कशाला ठरवा… आणि ठरवलं तरी ऐकणार कोण…
मी चारचाकी शिकावी अस मीच ठरवलं, आणि तसा क्लास लावणार अस सांगितल. तर आता चारचाकी काय दुचाकीसुध्दा अगदी गरज असेल तरच चालवायला द्यायची असच आम्ही ठरवलंय अस घरातून सांगण्यात आलं. फारतर व्यायाम म्हणून सायकल चालवा अस सांगितलं. आणि मी माझ्याचसाठी सायकल चालवायचं ठरवण कठीण होतं.
खाजगी बस ठरलेल्या अचूक वेळेला प्रवास सुरु करेल यावर जितका विश्वास असतो, तेवढाच विश्वास मी ठरवलेल्या गोष्टींबद्दल असतो.
या गोष्टीनंतर माझं वय हा शब्द कायम ऐकायला यायला लागला. आता वय किती हे सुध्दा कॅलेंडरच ठरवतो. आणि या वयात काय करायचं, आणि काय करायचं नाही हे माझ्याबाबतीत डाॅक्टर ठरवतात. काय खावं, किंवा किती खायला पाहिजे हे ते ठरवत नसले तरी सांगतात मात्र तेच. वर तुम्ही ठरवा… अस मला सांगतात. आणि ते सहज आणि आपलेपणाने सांगितल तरी… त्यासाठी फी किती आकारायची हे सुध्दा तेच ठरवतात. फक्त तो ठरवलेला आकार माझ्या खिशाचा किती आकार कमी करतो हे मी ठरवतो.
आता माझी झोपायची, उठायची, फिरण्याची वेळ. खायचं काय, किती, केव्हा हे. यासारख्या अनेक गोष्टी ठरवल्या गेल्या आहेत. व त्या गोष्टी त्या वेळात करायचं मी ठरवलंय. तरीही रोज रात्री उद्या सकाळी लवकर उठायचं असं ठरवतो. पण लवकर म्हणजे नक्की किती वाजता… हेच ठरत नाही. दुसर्या दिवशी ऊठतो तेव्हा लवकर हा शब्द हरवलेला असतो, आणि उठायला ऊशीरच झाल्याच लक्षात येतं.
रोज सकाळी उठण्यापासून झोपेपर्यंत कितीतरी छोट्या छोट्या असतात ज्या मनात आणलं तर ठरवता येऊ शकतात. पण ठरवायचच असेल तर छोट्या गोष्टी ठरवण्यात काय मजा… अस म्हणत मी त्या ठरवायच टाळतो… आणि मोठ्या गोष्टी… राहू देत. नंतर सांगतो…
पण माझं ठरवण हे हाॅटेल मधे जेवायला जाण्यासारखं असतं. हाॅटेल मधे ते काय देणार हे त्यांनी ठरवलेलं असत व तेच मेनूकार्ड वर असत. त्यावरून आपल्याला काय, आणि किती मागवायच हे आपण ठरवतो. तसच घरात काय ठरलं आहे, व त्यातलं काय, व किती मी (वेळेत) करु शकतो हे पाहून ते करायचं मी ठरवतो.
☆ “जनगणनेच्या नावाखाली सायबर भामट्यांचा धोका…” ☆ डाॅ.धनंजय देशपांडे ☆
आता देशात जनगणना “एप्रिल 2026 पासून टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे” महाराष्ट्रात घरांची यादी 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार आहे. जनगणना ही देशासाठी महत्त्वाची आहे, पण तुमची सुरक्षितता त्याहूनही जास्त. महत्वाची आहे. कारण जनगणनेच्या नावाखाली सायबर भामटेही तुमच्या घरी येऊन तुमच्याकडून तुमची सगळी माहिती काढून घेऊन / प्रसंगी बोलण्यात गुंतवून तुमच्याच कडून ओटीपी घेऊन लुटलेही जाण्याची शक्यता आहे म्हणूनच तातडीने मी (डॉ. धनंजय देशपांडे तुमचा सायबर सुरक्षा दोस्त) सर्वाना सावध करण्यासाठी व काय काळजी घ्यायची ते सांगण्यासाठी या पोस्टमधून संवाद साधतोय.
जनगणनेसाठी येणाऱ्या अधिकृत व्यक्तीला कसे ओळखावे, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत.
खऱ्या जनगणना अधिकाऱ्याची ओळख कशी पटवाल?
🛑 अधिकृत ओळखपत्र
प्रत्येक प्रगणकाकडे केंद्र सरकार किंवा स्थानिक प्रशासनाने दिलेले अधिकृत ओळखपत्र असते. त्यावर त्या व्यक्तीचे नाव, पद, फोटो आणि संबंधित विभागाचा शिक्का असतो. ते आधी नीट तपासा.
नुसतं ID कार्ड दाखवलं म्हणजे खरा अधिकारी असतोच असं नाही. स्कॅमर पण नकली कार्ड छापून आणतात. तर अस्सल कार्ड ते आहे का ? यासाठी खालील 5 स्टेप्स लक्षात ठेवा.
ID कार्डवर काय-काय तपासाल
अस्सल ID कार्डवर सरकारी शिक्का/होलोग्राम म्हणजेच Registrar General & Census Commissioner, India – ORGI चा लोगो त्यावर असतो. नकली कार्डवर लोगोची प्रिंट धूसर असते.
QR Code/बारकोड : 2026-27 ची जनगणना डिजिटल आहे. खऱ्या कार्डवर QR कोड असतो. तो स्कॅन केला की अधिकाऱ्याची माहिती अधिकृत साईटवर दिसते. प्रत्येक अधिकाऱ्याला विशिष्ट एरिया दिलेला असतो.
“तुमचा ब्लॉक नंबर कोणता?” विचारा. तो घाबरला किंवा टाळाटाळ केली तर तो संशयास्पद. आहे असं समजून त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवा.
तसेच कार्डवर जिल्हाधिकारी/तहसीलदारची अशा स्थानिक अधिकाऱ्याची सही-शिक्का असतो. तो आहे का पहा.
फोनवरून लगेच क्रॉस-व्हेरिफिकेशन करा
हा सगळ्यात खात्रीशीर उपाय आहे: त्याला सांगा “1 मिनिट थांबा, मी तहसील ऑफिसला फोन करतो”. असं म्हणत जनगणनेसाठी टोल-फ्री हेल्पलाईन 14444 आहे किंवा राज्याच्या सेन्सस हेल्पलाईनवर फोन करा.
स्थानिक पर्यायसुद्धा असून ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, किंवा पोलीस स्टेशन 112 वर फोन करून “या नावाचा प्रगणक आमच्या एरियात नेमला आहे का?” विचारा. त्यांच्याकडे यादी असते. खरा अधिकारी थांबेल. फ्रॉडस्टर पळून जाईल. सिम्पल आयडिया !! 🤣
गणवेश आणि साहित्य बघा
खरे प्रगणक सहसा:सोबत टॅब/मोबाईल घेऊन येतात ज्यावर CENSUS 2026 अँप असतं. निळ्या रंगाची बॅग/फोल्डर असते ज्यावर “भारताची जनगणना 2026-27” छापलेलं असतं. ते एकटे-दुकटे येत नाहीत. एक सुपरवायझर व हाताखाली 6-7 प्रगणक असतात. तो एरियात फिरत असतो.
फक्त कागद आणि पेन घेऊन कुणी आला, तर लगेच सावध व्हा. त्याला कोणतीही माहिती देऊ नका.
काय विचारतो ते ऐका
खोटे अधिकारी (सायबर भामटे) बऱ्याचदा माहिती विचारताना घाई करतात आणि घाबरवतात. “माहिती दिली नाही तर रेशन बंद होईल”, “दंड बसेल”. अस काहीतरी सांगून तुम्हाला पॅनिक करून नंतर हिप्नोटाईजसारखं करून त्यांना तुमच्याकडून हवी असलेली सगळी माहिती काढून घेतील. आणि नंतर ट्रॅपमध्ये अडकवतील. तेव्हा पॅनिक अजिबात होऊ नका.
आणि अधिकारी जर खरा असेल तर शांतपणे व ठराविक प्रश्नच विचारतो.
तो कधीही OTP, पैसे, बँक डिटेल्स, डेबीट क्रेडिट कार्ड डिटेल्स, पॅन नंबर, मागत नाही.
शेजारी-पाजारी सोबत घ्या
जनगणनेसाठी आलोय असं कुणी म्हणत बेल वाजवली तर एकट्याने दार उघडू नका. सोसायटीच्या ग्रुपवर आधीच मेसेज टाका की “आज आमच्या लेनमध्ये जनगणनावाला आलाय”. म्हणजे सगळे शेजारी अलर्ट होतील. प्रसंगी तुमच्या शेजाऱ्याला सोबत घरी बोलवा. कारण चारपाच 4 लोकांसमोर फ्रॉड करायला सायबर भामटा घाबरतो.
🛑 नियुक्ती पत्र (Appointment Letter):
जर तुम्हाला संशय आला, तर तुम्ही त्यांच्याकडे त्यांच्या नियुक्ती पत्राची मागणी करू शकता. जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना किंवा सरकारी कर्मचाऱ्यांना लेखी आदेश दिलेले असतात.
🛑 काय विचारले जाते आणि काय नाही?
सर्वात महत्त्वाचा फरक इथेच आहे.
काय विचारतात : कुटुंबातील सदस्यांची संख्या, शिक्षण, व्यवसाय, घरातील सुविधा (पाणी, वीज इ.).
काय कधीच विचारत नाहीत : अधिकृत अधिकारी तुम्हाला कधीही तुमचा OTP, बँक खात्याचा तपशील, पिन नंबर, सीव्हीव्ही (CVV) किंवा डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती विचारणार नाहीत.
🛑 प्रश्न काय विचारणार हे ठरलेलं आहे
प्रगणक फक्त ठराविक 33 प्रश्न विचारतात – घराचा प्रकार, पिण्याचं पाणी, शौचालय, वीज, गॅस, TV, गाडी वगैरे. ते तुमच्या उत्पन्नाबद्दल, गुंतवणुकीबद्दल, कर्जाबद्दल सविस्तर विचारणार नाहीत. असले प्रश्न आले तर सावध व्हा.
🛑 पैशांची मागणी नाही:
जनगणना ही पूर्णपणे सरकारी प्रक्रिया आहे. यासाठी येणारा अधिकारी तुमच्याकडे एका रुपयाचीही मागणी करत नाही. जर कोणी ‘फॉर्म फी’ किंवा ‘नोंदणी शुल्क’ मागत असेल, तर समजा तो स्कॅमर आहे.
🛑 मोबाइल ॲप आणि तंत्रज्ञान:
आताची जनगणना डिजिटल पद्धतीने होत आहे. अधिकारी त्यांच्या फोनमध्ये किंवा टॅबमध्ये ‘Census App’ वापरतील. तरीही, ते तुमच्या फोनवर कोणतीही अनोळखी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगणार नाहीत, याची दक्षता घ्या.
शेवटी नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या टिप्स
🔷 घराबाहेरच संवाद साधा : पूर्ण खात्री असल्याशिवाय अनोळखी व्यक्तीला घराच्या आत घेऊ नका.
🔷 स्थानिक प्रशासनाशी संपर्क : जर कोणी संशयास्पद वाटले, तर लगेच तुमच्या भागातील नगरसेवक, ग्रामपंचायत कार्यालय किंवा पोलीस स्टेशनला फोन करून शहानिशा करा.
🔷 सायबर हेल्पलाईन: जर कोणी जनगणनेच्या नावाखाली तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर त्वरित तक्रार करा.
🛑 Self-Enumeration केलेला ID उपयोगी पडेल
तुम्ही https://se. census. gov. in वर स्वतः माहिती भरली असेल तर तुम्हाला 11-अंकी SE ID मिळते. घरी आलेल्या अधिकाऱ्याला फक्त तो ID द्यायचा आहे. त्याने परत सगळी माहिती विचारली नाही पाहिजे. त्याचा व तुमचाही वेळ वाचेल तसेच फसवणुकीची शक्यता झिरो होईल.
डॉ. डीडी क्लास : शेवटी इतकंच सांगतो… “माहिती द्या, पण सतर्क राहून! जनगणना ही देशासाठी महत्त्वाची आहे, पण तुमची सुरक्षितता त्याहूनही जास्त महत्वाची आहे” त्यामुळे सहकार्य करताना सावधपणे करा. आणि विशेष म्हणजे केवळ तुम्ही एकट्याने हे वाचून सावध होऊ नका 🤣
तर तुमच्या कुटुंबियांनाही हे पाठवा तसेच तुमच्या सोसायटी ग्रुपवर फॉरवर्ड करा ! 🙏
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २१ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस प्रपंचात अडकलेल्या सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेत भरपूर अभंग लिहिले आहेत. सर्वसामान्य माणसांना ऐहिक जीवनाचा लोभ असतो, त्यातून त्यांना परावृत्त होणे फार अवघड आणि कष्टाचे असते. तुकाराम महाराज या संदर्भात आपल्यासारख्या सामान्यांना अत्यंत कळकळीने त्यांच्या वाणीत जागोजागी सांगत आहेत.
आहे ते सकळ कृष्णासी अर्पण/
* नकळता मन तुझे भावी*//
म्हणवुनी पाठी लागतील भुते/
येती गिवसीत पाच जणे//
ज्याचे त्या वंचले आठव न होता/
दंड न हा निमित्त कारणे//
तुका म्हणे काळे चेपीयला गळा/
मी मी वेळोवेळी करीतसे//
आपण प्रापंचिक लोक हे जाणतच नाही की जी काही कर्मे आहेत, आणि जे जे काही अस्तित्वात आहे ते एका कृष्णाच्या सत्तेने आहे. कर्ता-करविता तोच आहे. आपण अविवेकी, हे जाणत नाही आणि सर्व काही मी केले अशी मनात भावना धरतात. त्यामुळे “येती गिवसित पाच जणे”, म्हणजे आपला पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला शोधत येतो. याचाच अर्थ आपण जन्म मरणाच्या चक्रातून फिरत राहतो, आपला पुनर्जन्म होतो. सर्व कर्मे हरीचीच असून ती त्याची त्याला अर्पण करण्याची आठवण न ठेवल्यामुळे आपल्याला जगण्याचा आणि मरणाचा दंड मिळतो. हा दंड भोगायचा नसेल त्याने प्रथमतः अहंकाराने मी मी करणे सोडून दिले पाहिजे. ज्यावेळी अशी अवस्था होईल त्याचवेळी लोभ, मोह, सर्व मायापाश यातून माणसाची कायम सुटका होईल.
ते सामान्य संसारी माणसाला सांगतात,
वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जीती/
जाणार त्या निश्चिती देव नाही//
भाडेकरी वाहे पाठीवरी भार/
अंतरीचे सार लाभ नाही//
देवपूजेवरी ठेवूनिया मन/
पाषाणा पाषाण पूजी लोभे//
तुका म्हणे फळ चिंतीती आदर/
लाघव हे चार शिंदळीचे//
फळाची इच्छा मनात ठेवून प्रपंचासाठी अर्थार्जन करणाऱ्या प्रापंचिकांविषयी तुकाराम महाराज वरील अभंगात सांगत आहेत. एखादा चरितार्थाचा व्यवसाय मिळवून जमीन, घर, द्रव्य, राज्य, प्राप्त करून घेणारे जे लोक असतात त्यांनी परमार्थात कितीही धडपड केली, तरी त्यांना परमेश्वर प्राप्ती होणे असंभवनीय आहे. ओझे वाहणारा भारवाहक त्याच्या हमालीचे पैसे घेईल, परंतु त्या ओझ्यातील सारभाग त्याला कसा मिळेल? काही एक प्राप्त करण्याची वासना मनात ठेवून जो देवपूजा करतो तो दगडाची पूजा करणारा दगडच म्हणावा लागेल. अनेक प्रकारचे उद्योग करून त्यापासून फलप्राप्ती इच्छिणारे जे लोक आहेत त्यांची सर्व धडपड म्हणजे तुकाराम महाराजांच्या मते गणिकेच्या शृंगाराप्रमाणे निंद्य आहे.
रोजच्या जीवनातील उदाहरणे घेऊन तुकारामांची सामान्यांना परिस्थिती पटवून, समजावून देण्याची पद्धत खरोखरच आपल्या मनाचा ताबा घेऊन त्या दृष्टीने आपल्याला विचार करण्यास लावणारी आहे. आता हे दोन अभंग पहा…
(1)
माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक/
आपणा सरिसे लोक नागविले//
विषयी लंपट शिकवी कुविद्या/
मनामागे नांद्या होऊनी फिरे//
करुनी खाता पाक जिरे सुरण राई/
करिता अतित्यायी दुःख पावे//
औषध द्यावया चाळविले बाळ/
दावूनिया या गुळ दृष्टी पुढे//
तरावया आधी शोधा वेदवाणी/
वांझट बोलणी वारा त्याची//
तुका म्हणे जया पिंडाचे पाळण/
न घडे नारायण भेट तया//
(2)
मृगजळ दिसे साचपणा ऐसे/
खोटीयाचे पिसे ऊर फोडी//
जाणूनी का करा आपुलिया घात/
विचारा रे हित लवलाही//
संचित सांगती बोळवण सवे/
आचरण द्यावे फळ लेणे//
तुका म्हणे रोखी स्मशान ते वरी/
संबंध गोवरी आगीसवे//
आपल्या देहाचे पालनपोषण करण्यातच आयुष्य वेचणाऱ्या आणि दुसऱ्यांना उपदेश करून स्वतः पापे करणाऱ्या लोकांविषयी पहिल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की, हे धर्माचे स्तोम माजविणारे लोक माया आणि ब्रह्म एकच आहे असे म्हणतात आणि याच धारणेने स्वैर वागतात व अज्ञान्यांना फसवितात. ( या लोकांना महाराजांनी धर्मठक ही अगदी योग्य संज्ञा दिली आहे.) विषयासक्त मनुष्य दुसऱ्याला कुविद्या शिकवतो आणि स्वतः नंदीबैलाप्रमाणे मन मानेल तिकडे जातो. सुरण आणि मोहरी शिजवून खाल्ली तरच पचन होते, अन्यथा कच्चे खाणाऱ्यांना दुःख भोगावे लागते. आजारी मुलाला कडू औषध देताना त्याची आई त्याला एवढे औषध घेतल्यावर गुळाचा खडा देण्याचे आमिष दाखवते. महाराज सांगतात की, हा भवसागर तरुन जाण्यासाठी त्याचा नीट विचार करून, ज्ञान संपादन करून ( सुरणासारखा शिजवून आणि स्वर्गरूपी गुळाचा खडा महत्त्वाचा न मानता त्याग रुपी औषध घ्यावे) हेच आयुष्याचे सार आहे. माया आणि ब्रह्म एकच आहे असे समजून आणि देहाला सर्वस्व मानून त्याचे चोचले पुरविणाऱ्यांना नारायणाचे दर्शन कधीही होणार नाही.
दुसऱ्याही अभंगात मृगजळापाठी धावणाऱ्या हरिणाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज सामान्यांना हीच गोष्ट अधिक पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे मृगजळ हरिणांना खरे वाटते आणि ऊर फुटेपर्यंत मोठ्या आशेने हरणे तेथे धाव घेतात, त्याचप्रमाणे देहादिक प्रपंच खोटा आहे हे जाणूनही स्वतःचा घात करतात. स्वहित कशात आहे याचा विचार करीत नाहीत. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात येत राहते आणि पूर्वकर्माप्रमाणे ते भोगावे लागते. प्रपंचात्मक माणसाचा देह स्मशानात जातो, तेथे तो अग्नीमध्ये मिसळतो. ( अग्नीशी त्याचे लग्न लागते.) याचाच अर्थ असा की, त्याचा जन्म ईश्वर साधना न करता फुकट जातो.
संसारी लोकांबद्दल महाराज काय म्हणतात ते आपण या अभंगात पाहू.
काय एकाच जाले ते का नाही ठावे/
काय आहे सांगावे का म्हूण//
देखतील डोळा ऐकतील कानी/
बोलिले पुराणी तेही ठावे/
काय हे शरीर साच की जाणार/
सकळ विचार जाणती हा/
का हे कळो नये आपुले आपणा/
बाळत्व तारुण्य वृद्धदशा//
का हे आवडले प्रिया पुत्र धन/
काय काम कोण कोणा आले//
का हे जन्म वाया घातले उत्तम/
काहे राम राम न म्हणती//
काय भूली यांसी पडली जाणता/
देखती मरता आणिकांसी//
काय करीती हे बांधिलिया काळे/
तुका म्हणे बळे वज्रपाशी//
महाराजांना वाटते की, संसाराच्या संगतीने यांची ही काय दुर्दशा, अवस्था झाली आहे. यांना काय काय म्हणून सांगावे? प्रपंच संगतीने जीवाची किती दैना होते हे ते पाहतात, ऐकतात आणि पुराणातही सांगितलेले त्यांना माहित आहे. हे शरीर खरे आहे की नाशीवंत आहे याचे ज्ञान त्यांना आहे. कारण त्यांनी सर्व ऐकले आहे. आपल्या देहाला बाल्य, तारुण्य, वृद्धत्व या अवस्था अटळ आहेत हे माहीत असूनही त्यांना कळत कसे नाही? बायको, मुले, पैसा याविषयी इतकी प्रीती का असावी? ही माणसे कधी कुणाच्या उपयोगी पडू शकतात का? हे लोक त्यांना मिळालेला उत्तम नरजन्म वाया घालवीत आहेत. रामनामाचे चिंतन का करीत नाहीत? कित्येक लोक मरतात हे पाहिल्यावर आपल्यालाही मरायचे आहे हे जाणूनही लोकहो तुम्ही या वरपांगी देहाला का भुलता? काळाने त्याच्या बलिष्ठ वज्रपाषाने यांना बांधल्यावर हे काय करतील? गीतेमध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, व दोष यांचे जाणीवपूर्वक दर्शन करणे हे ज्ञानाचे लक्षण सांगितले आहे. संसारातील दुःखांची सतत जाणीव ठेवून हरी भजन करावे हेच महाराज आपल्यासारख्या मायाजालात फसलेल्या सामान्य जनतेला सांगत आहेत.
पुढील भागात याच संबंधी गाथेतील आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – २२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
मायाजालात अडकलेला सर्वसामान्य माणूस
संसाराची आसक्ती गेल्याशिवाय तुम्ही आम्ही सर्वच माणसे या ऐहिक मोह पाशातून मुक्त होणे कदापि शक्य नाही म्हणून अशा संसारासक्त माणसांना तुकाराम महाराज या अभंगात काय सांगतात ते पाहू.
का रे माझी पोरे म्हणशील ढोरे/
मायबाप खरे काय एक//
का रे गेले म्हणून मी करीसी तळमळ/
मिथ्याची कोल्हाळ गेलियाचा//
का रे माझे माझे म्हणशील गोत/
न सोडविती दूत यमाहाती//
का रे मी बळिया म्हणविसी ऐसा/
सरणापाशी कैसा उचलविसी//
तुका म्हणे न धरी भरवसा काही/
वेगी शरण जाई पांडुरंगा//
महाराज म्हणतात की, बाबारे, तात्काळ तू पांडुरंगाला शरण जा. उगाच कशापाई ही माझी मुलं, ही माझी गुर ढोरं करत बसतोस? माझे आई- बाप, माझं गोत का करतोस? कोणी गेल्यावर विनाकारण का तळमळतोस? यमदुताच्या तावडीतून यांच्यापैकी कोणीही तुला सोडवण्यास येणार नाही हे लक्षात असू दे. स्वतःला मोठा बलाढ्य का समजतोस? जर इतका बलवान आहेस, तर मेल्यानंतर तुला सरणावर दुसऱ्याला का चढवावे लागते? एकच लक्षात ठेव की या विश्वात कायम टिकणारा, चिरंजीव असा कोणताच पदार्थ नाही. म्हणून तू फक्त एका पांडुरंगाला शरण जा. ते एकच शाश्वत सत्य आहे.
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे/
उदास विचारे वेच करी//
उत्तमची गती तो एक पावेल/
उत्तम भोगेल जीवखाणी//
पर उपकारी नेणे परनिंदा/
परस्त्रिया सदा बहिणी माय//
भूतदया गाई पशूंचे पाळण/
तान्हेल्या जीवन वनामाजि//
शांतीरुपे नव्हे कोणाचा वाईट/
वाढवी महत्त्व वडिलांचे//
तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ/
परमपद बळ वैराग्याचे//
गृहस्थाश्रमी माणसाचे आचरण कसे असावे हे सांगणारा हा अभंग सर्वश्रुत व परिचित आहे. जन हो, प्रामाणिकपणे व्यवहार करून द्रव्य प्राप्त करावे, परंतु मनात त्याची आसक्ती नको. उदास विचारे, अलिप्त राहून ते द्रव्य खर्च करा. अशा व्यवहाराने तुम्हाला उत्तम गती मिळेल आणि तुम्ही चांगले भोग भोगाल. कुणाला लुबाडून, चोरी करून, डाका घालून सद्गती मिळणे कदापी शक्य नाही. जो परोपकार करतो, निंदा नालस्ती करत नाही, जो परस्त्रीला मातेसमान, भगिनी समान मानतो, जो सर्व भूत मात्रांवर प्रेम करतो, दया, सहानुभूती दाखवतो, त्यांचे पालन- पोषण करतो, यथाशक्ती वैराण मार्गात पाण्यासाठी विहिरी बांधतो, जो आपली वृत्ती शांत ठेवून कोणाशी दुष्ट वागत नाही, वरिष्ठांचा मान ठेवतो, त्याचा गृहस्थाश्रम आदर्श होय. मोक्षप्राप्तीला लागणारे वैराग्य ते हेच होय. केवळ जंगलात जाऊन एकांतवासात राहण्याने मोक्षप्राप्ती असंभव आहे.
महाराज प्रापंचिकाला पुढे सांगतात,
आयुष्य मोजावया बैसला मापारी/
तू का रे वेव्हारी संसाराच्या//
अरे भल्या माणसा, तो काळ तुझ्या आयुष्याचे माप घेत आहे आणि तू इथे संसारात रममाण झाला आहेस?
नेईल ओढोनी ठाऊक नसता/
न राहे दुश्चित्ता हरिविण//
तो काळ तुला कधी ओढून नेईल ते तुला कळणारही नाही, म्हणून आतापासूनच तू हरीचिंतन करत रहा. तुझे चित्त विचलित होऊन देऊ नकोस.
कठीण हे दुःख यम जाचतील/
कोण सोडविल तया ठाई//
तू केलेल्या पापांची यमराज तुला शिक्षा देईल, तेव्हा यातून तुला सोडवायला कोण येईल?
राहतील दूरी सज्जन सोयरी/
आठवी श्रीहरी लवलाही//
त्यावेळी सखे सोयरे, नातलग, मित्र मंडळी सर्वजण तुझ्यापासून दूर राहतील. तेव्हा तू सतत श्रीहरीचे स्मरण करत रहा, त्या एका हरीला शरण जा.
तुका म्हणे किती करसी लंडायी/
होईल भंडाई पुढे थोर//
तुकाराम महाराज म्हणत आहेत, ” अरे, इतका गर्व आणि मस्ती बरी नव्हे, असे केल्याने शेवटी तुझी मोठी दैना होईल.
संसारी माणूस, गृहस्थ सर्वसाधारणपणे कसा असतो त्याचे वर्णन आपल्याला या खालील अभंगात पहावयास मिळते.
जरी आले राज्य मोळविक्या हाती/
तरी तो मागुता वेवसायी//
तृष्णेची मजूरे नेणती विसावा/
वाढे हाव हावा काम कामी//
वैभवाची सुखे नातळता अंगा/
चिंता करी भोगा विघ्न जाळी//
तुका म्हणे वाहे मरणाचे भय/
रक्षण उपाय करूनी असे//
एखाद्या मोळी विक्या माणसाला राज्यकारभार देऊन त्याला सिंहासनावर बसवले, तरी त्याच्या मनात मोळ्या विकण्याची आणि त्याचा धंदा करण्याची इच्छा निर्माण होणारच. संसारी माणसाचे ही तसेच आहे. मनुष्य देहाचा लाभ होऊनही आपल्या तृष्णेचा (लोभाचा) गुलाम होतो. अविश्रांत श्रम करतो आणि हावेने हाव, कामाने काम वाढत जातो. भरपूर वैभव असले तरी त्याला सुख लाभत नाही. कितीही उत्तम भोग अनुकूल असले तरी काही विघ्न तर नाही ना येणार या भीतीने त्याचे आयुष्य जळत राहते. जरी तो आपल्याला मरण नक्की येणार आहे हे जाणत असला तरी, आपला पैसा, सारे वैभव कसे टिकून राहील याचा अहोरात्र विचार करत राहतो.
अशा प्रकारे या मायाजालात अडकलेल्या प्रापंचिकाला त्यातून बाहेर काढण्यासाठी परमार्थाला कसे लागावे ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तुकाराम महाराज त्यांच्या गाथेतील काही अभंगातून सुचवितात.
ते म्हणतात,
आवडी येते गुणे/
कळो चिन्हे उमटती//
पोटीचे ओटी उभे राहे/
चित्त साहे मानसी//
डोहोळीयाची भूक गर्भा/
ताटी प्रभा प्रतिबिंबे//
तुका म्हणे मागून घ्यावे/
मना खावे वाटे ते//
दृष्टांत देऊन महाराज जन रीत सांगत आहेत. ते म्हणतात की, एखाद्या ठिकाणी चांगले गुण दिसले म्हणजे त्या माणसावर आपली प्रीती जडते. जी गोष्ट मनात असते तीच ओठा वाटे प्रगट होते, कारण मन चित्ताचे सहाय्य घेत असते. मातेला डोहाळे लागतात, ती सर्व भूक, तहान, आवड गर्भाची असते. त्याचीच भावना आईच्या ठिकाणी अन्नाच्या वासने प्रमाणे प्रतिबिंबित होते. जे भक्षण करताना मनाला आवडते तेच पुन्हा मागून खावेसे वाटते. तुकाराम महाराज आपल्या आवडी परमार्थाकडे कशा लावाव्या ते सुचवतात.
स्वतःबद्दल प्रापंचिकांना ते सांगतात,
” माझ्यावर अशी काही अमंगल वेळ ओढवली की नेमका कथेच्या वेळी मला शीण आला आणि मी दुःखी झालो. माझ्या पापामुळे मला दुष्ट लोकांचे दर्शन झाले. मी आता हे विठोबाच्या कानावर घालतो. जन्माला येऊन संसाराच्या मोहात मी कितीदा माझी फजिती करून घ्यावी? देवा, माझी उघड उघड फजिती जाणून लवकर या आणि मला मदत करा. या संसाराच्या वेढ्यात सापडलो आणि बायका मुलांची सेवा करण्यातच अडकलो. पण भक्तीच्या वाटेने पांडुरंगाची कृपा झाली, आणि त्याची भेट झाली. संसाराचे ओझे डोक्यावर होते, ते सोडविणारा कोण सद्गुरु भेटेल याची मला चिंता लागून राहिली होती. “
स्वतःच्या या अनुभवावरून सांसारिकास महाराज सांगतात,
जा रे तुम्ही पंढरपुरा
तो सोयरा दीनांचा//
गुणदोष नाणी मना/
करी आपणासारिखे//
उभारोनी उभा कर/
भवपार उतराया//
तुका म्हणे तातड मोठी/
जाली भेटी उदंड//
तुम्ही पंढरपूरला जा कारण तो परमेश्वर, पांडुरंग दीनांवर दया करणारा आहे दीनानाथ आहे. जे त्याला शरण जातील त्यांचे गुणदोष न बघता तो त्यांना आपल्या समान करतो. शरणागताना भवसागरातून उद्धारून नेण्याकरता तो आपले हात वर करून उभा आहे. दीन व आर्त लोकांना भेटण्याची त्याला मोठी उत्कंठा आहे. त्याच्या भेटीने आपले फार मोठे हित होते.
इतके अभंग वाचल्यानंतर आपण सारेच या भवसागरातील प्रवासी, सर्वसामान्य प्रापंचिक, परमार्थाच्या वाटेने चाललो तर आपल्यालाही पांडुरंग, माय- माऊली भेटेल आणि कृपा करेल यात शंका नाही.
☆ “उत्तर वाहिनी परिक्रमा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
एखादी गोष्टी का करायची? या प्रश्नाचे उत्तर ती गोष्ट करायची हेच असतं. मग ही गोष्टी आपण आपली करायची, कोणीतरी विचारलं म्हणून, सोबत मिळते म्हणून, भावना, श्रध्दा, नवीन अनुभव, गंमत, स्वार्थ आणि सोबत परमार्थ अशा अनेक गोष्टींची सांगड या उत्तरात असते. नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करायची का? याचं उत्तर वरच्या सगळ्या गोष्टींचा एकत्र घेतलेला निर्णय होता. माझ्या बाबतीत निर्णय माझा नसतोच, तर याला बरोबर घ्यायचं का हाच निर्णय समोरच्याला घ्यावा लागतो. आणि असाच निर्णय मागच्या दोन तीन ट्रिपचा माझ्याबद्दल त्यांना अनुभव असूनसुध्दा त्यांनी घेतला होता. आता मला बरोबर का घेतलं याचं उत्तर, आणि उत्तर वाहिनी परिक्रमा मला सोबत घेत, कशी व्यवस्थित पार पाडायची याचं उत्तर त्यांना द्यायचं होत. त्यामुळेच उत्तर वाहिनी परिक्रमा करायची का? हा प्रश्न माझ्या बाबतीत निकाली निघाला होता. मला सोबत घेणं आणि सोबत परत आणण हिच इतरांच्या बाबतीत परिक्रमा असते.
तर नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा करायचं ठरलं. मराठी चैत्र महिन्यात हि परिक्रमा सुरु होते, आणि फक्त महिनाभरच असते. गुजरात येथील तिलकवाडा इथून वासुदेव कुटीर आश्रमात संकल्प करून यात्रा सुरु करावी अस ठरलं. साधारणपणे तिथूनच सुरु करतात. गरुडेश्वरजवळील रामपुरा ते तिलकवाडा या भागात नर्मदा उत्तरेकडे वाहते, म्हणून उत्तर वाहिनी परिक्रमा. उत्तरवाहिनी भागात परिक्रमा करणे अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानले जाते. साधारण एकवीस किलोमीटर इतका परिक्रमा मार्ग आहे.
खरतर मला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तेव्हाच मी सोडून सगळ्यांनी संकल्प केला होता. आणि यांनी संकल्प केल्यामुळे माझा झाला होता. पण तो माझ्या बाबतीत होता. धार्मिक बाबतीत हा संकल्प तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमात केला. आमचा मुक्काम गरुडेश्वर या ठिकाणी होता. आणि तिलकवाडा इथून वासुदेव कुटीर आश्रम येथून सकाळी पाच वाजता परिक्रमा सुरु करायची म्हंटल तर आम्हाला पहाटे तीन साडेतीन वाजता गरुडेश्वर सोडणे आवश्यक होते. आम्ही तसे जमवले सुध्दा. यासाठी रात्री दोन वाजताच सगळे उठले होते. हो सगळे, कारण आम्ही जवळपास पंधरा, सोळा जणं होतो. आणि सोळा लोकं इतक्या सकाळी सर्व आटोपून तयार होणं हाच एक सोहळा असतो. पण आम्ही तो पार पाडला.
ठरल्याप्रमाणे वासुदेव कुटीर आश्रमात संकल्प करून बरोबर पाच सव्वा पाचला नर्मदे हर च्या गजरात परिक्रमा सुरु केली. याच मंदिराच्या बाजूला एक हनुमान मंदिरपण आहे. हा मारुतीराया रामदास स्वामींंनी स्थापन केलेल्या पैकी एक आहे. पहाटे पाचच्या अगोदर विधीवत संकल्प सांगायला आश्रमात गुरुजी होते. त्यांच्याशी बोलतांना समजले परिक्रमेला जाणाऱ्या भक्तांना संकल्प सांगण्यासाठी रात्रभर ते आश्रमातच होते. म्हणजे आम्ही झोप घेऊन परिक्रमा करायला निघालो तेव्हा ते निद्राधीन होण्यासाठी निघणार होते.
सुरुवातीचा काही रस्ता गावातूनच होता. परिक्रमा मार्ग असे फलक जागोजागी आढळले. पण आगोदर हीच परिक्रमा केलेले दोन चार जणं आमच्यात असल्याने ते आमचे विदाऊट इंटरनेट लाईव्ह गुगल मॅप होते. पहाटे सुध्दा आमच्या पुढे आणि मागेही बरेच चालणारे दिसले.
गावातला रस्ता संपल्यानंतर शेतातून जाणारा कच्चा असलातरी चांगला रस्ता होता. पहाटेची वेळ, थंड वातावरण, आजूबाजूला केळीची शेती, आजुबाजूला रस्त्यावर दिसेल इतका प्रकाश टाकणारे लाईट होते. जे लाईट प्रखर प्रकाश देत होते. शिवाय रस्त्यावर सेवाभावाने चहा देणारे बरेच तसच पैसे घेऊन खाद्यपदार्थ चहा, बिस्किट, चाॅकलेट, थंड पेय विकणारेही बरेच होते. आम्ही सेेवाभावी मंडळींनी दिलेला चहा घेऊनच निघालो होतो. व सकाळची साडेपाच सहाची वेळ असल्याने थंड पेय विकत घेण्याचा आमचा प्रतिसाद पण थंडच होता.
पुढे एका शंकराच्या मंदिरात परत चहा, खायला काही, शिवाय थंडगार नाही पण गार असणारं ताक अस मुबलक प्रमाणात आग्रह करुन घ्या म्हणणारे होते. इथे थंड ताकाचा आस्वाद घेत पुढे सरकलो. ताक काय, लस्सीच होती. आणि… माझ्यासारख्याला अवघड वाटणारा एक सिमेंटचा जिना आला. मला उतरायला थोड अवघडच गेलं, पण सोबतची मंडळी, त्यांनी दोन्ही हाताला धरून दिलेला आधार, यामुळे तो जिना उतरण्यात यशस्वी झालो आणि पुढे पाय टाकायला सुरुवात केली. मनात म्हंटल जीना इसीका नाम है। यात जगणं म्हणजे जीना, आणि सिमेंटचा जिना यांचा संगम होता.
हा जिना उतरून आता आमची वाटचाल नर्मदेच्या बाजूने, आणि तिच्या साक्षीने सुरु झाली. आता बरोबर चालणारे आम्ही मागेपुढे व्हायला लागलो होतो. माझा स्पीड कमी पडत होता, कोणाला तरी माझ्या सोबत सतत रहाव लागत होत. मला बसण्याऊठण्याचा त्रास असल्याने जमेल तस, जमेल तिथे, जमेल तेवढावेळ बुड टेकवत मी परिक्रमेत माझं बुड टिकून राहिल याची काळजी घेत होतो. तर पुढे गेलेले काही माझी वाट पाहण्यात आपलं बुड टेकवून घेत होते.
नर्मदा नदी आणि मगर यांच एक अतूट नातं आहे. नर्मदेच वाहन मगर आहे, आणि अशी परिक्रमा करतांना मगर दिसली तर परिक्रमा पावते अस कोणीतरी म्हणालं. मग काय? आमची नजर पाण्यात कुठे मगर दिसते का? यावरच. एरवी मगर म्हंटली कि बुडबुडे येणारा मी आज पाण्यावर बुडबुडे दिसले तरी त्यात मगर शोधायचा प्रयत्न करायला लागलो. मगर वो मगर नजर आयीच नही.
आता किती अंतर झालं असेल, अजून किती अंतर चालायचं आहे? जमेल का आपल्याला? या विचारात असतानाच या किनाऱ्यावरुन त्या किनाऱ्यावर माणसांना घेऊन जाणाऱ्या बोटी जवळच दिसायला लागल्या. मग काय? माझ्या बोटी बोटीत परत एक ऊर्जा निर्माण झाली. आणि पावलं थोडी भराभर पडायला लागली. पण तरीही ती इतरांपेक्षा सावकाश आणि मागेच होती.
पण हा उत्साह जेवढ्या लवकर आला तेवढ्याच लवकर मावळला. खरतर आता सुर्य वरवर सरकायला सुरुवात झाली होती. पण माझा मावळत चालला होता. कारण बोटीपर्यंत जायला नर्मदेच्या कोरड्या पात्रातून चालत जावं लागणार होत. आणि पात्रातले ते गोटे वरवर दिसायला चांगले वाटत असले तरी त्या नर्मदेच्या गोट्यांवरुन पायी लवकर चालणं वाटलं तितकं सोप्प नव्हत. त्याचा त्रास व्हायला लागला होता. पण यामुळेच नर्मदेतला गोटा असं म्हणण्याच्या मागे नक्की काय भावना असतात हे समजलं. (थोडक्यात परिक्रमा अगदीच वाया गेली नाही. काहितरी शिकायला मिळालं… आणि मनातच नर्मदे हर… असा जयघोष केला.)
कसतरी करत एकदाच बोटीपर्यंत पोहोचलो, पण बसण्यापूर्वीच ती भरली आणि या गोट्याला किनार्यावर ठेवून मार्गस्थ झाली. प्रकरण येवढ्यावरच थांबल नाही. तिथे शेजारी शेजारी थोड्या अंतरावर चार पाच बोटी लावण्याची सोय होती. पण दुसरी बोट शेवटच्या जागेवर लागली. त्या बोटीत बसण्यासाठी ठराविक वेळत तेवढ अंतर परत गोट्यांवरुन कसरत करत जाणं मला कठीण होत. मग या जागेवर येणाऱ्या बोटीतच बसायच असा निर्णय मी घेतल्याने माला बोटीत चढवण्यासाठी थांबलेल्यांना पण तिथेच थांबाव लागलं. बाकी सगळे बोटीवर चढत होते, आणि मला चढवायचं होत. पण बोट भराभर येत होत्या. पाचसात मिनीटंच वाट पहावी लागली. मला बोटीत चढवण्याचा आणि उतरवण्याचा कार्यक्रम झाला. मी येईपर्यंत माझ्या पत्नीसह काही मंडळी पलिकडे माझी वाट पहात ऊन्हात थांबले होते. त्यांना परिक्रमेचा पुढचा प्रवास सुरु करता येत नव्हता.
पलिकडच्या तिरावर उतरलो, परिक्रमा अर्धी झाल्याच समाधान वाटलं, पण ते क्षणिक ठरलं. कारण पुढचा प्रवास सुरु करायलाच चांगल्या पंधरा वीस पायर्या चढायच्या होत्या. किंवा रस्त्याने गेलोतर रस्ता चांगलाच चढ असणारा होता. परत एकदा ऊत्साह मावळला.
पण याठिकाणी जिथून परिक्रमा सुरु केली तिथे परत जाण्यासाठी रिक्षा मिळू शकते असं समजलं. मग सगळा जोर पायर्या चढण्याचं सोडून रिक्षा मिळाली तर परत फिरण्यावर लावला. यात माझ्या पत्नीलाही माझ्या सोबत परत फिरण्याचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या निर्णयामुळे परिक्रमा पूर्ण करण्याच्या तिच्या विचारावर (नर्मदेच) पाणी फिरलं.
थोडक्यात परिक्रमा पूर्ण करायची या वासुदेव कुटीर इथे झालेल्या विचारातून आम्ही फुटीर झालो. आणि मिळेल त्या रिक्षाने परत वासुदेव कुटीर गाठायचं ठरवलं. आणि परिक्रमा पूर्ण करु शकलो नाही. पण राहिलेल्या सगळ्यांनी परिक्रमा पूर्ण केली…
असो, हा पण एक अनुभव घेतला. यातही अजून काही चांगल्या काही मनाला न पटणार्या गोष्टी आहेत. पण कुटीर ते फुटीर, आणि फुटीर ते कुटीर हाच प्रवास मोठ्ठा झाल्याने चांगल्या व मनाला न पटणार्या गोष्टी परत सवडीने पाहू…
☆ “मुले जबाबदारी घ्यायला का टाळतात?” ☆ श्री जगदीश काबरे ☆
भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची वैयक्तिक निवड नसून ती कुटुंब, परंपरा, प्रतिष्ठा आणि सामाजिक मान्यतेशी घट्ट जोडलेली संस्था आहे. म्हणूनच “मला लग्न करायचं आहे की नाही, कधी करायचं आहे, कुणाशी करायचं आहे” हे प्रश्न वैयक्तिक असले तरी त्यांची उत्तरं अनेकदा व्यक्तीपेक्षा कुटुंब आणि समाज ठरवतात. ही मानसिकता इतकी खोलवर रुजलेली आहे की अत्यंत उच्चशिक्षित, परदेशात काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले तरुणसुद्धा विवाहासारख्या निर्णयात पूर्ण स्वायत्तता घेत नाहीत. यामागे केवळ परंपरेचा दबाव नाही, तर भावनिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेचे घटकही गुंतलेले आहेत. भारतीय कुटुंबव्यवस्थेची रचना ही सामूहिक आहे. म्हणजेच व्यक्तीपेक्षा कुटुंबाचे हित, सन्मान आणि एकात्मता यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाचा निर्णय घेताना “माझं आयुष्य” यापेक्षा “आपल्या घरचं काय? ” हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो. लग्न म्हणजे दोन कुटुंबांची सांगड अशी धारणा असल्याने, निर्णय प्रक्रियेत पालकांचा हस्तक्षेप ‘हक्काचा’ मानला जातो. अशा वातावरणात स्वतंत्र निर्णय घेणे हे बंडखोरीसारखे वाटू शकते. परिणामी, मुलं स्वतःहून लग्न ठरवण्याऐवजी कुटुंबाच्या मान्यतेची वाट पाहतात किंवा त्यांच्यावरच जबाबदारी सोपवतात.
यात आर्थिक मानसशास्त्राचाही मोठा वाटा आहे. लग्न हा भारतीय संदर्भात केवळ सोहळा नसून तो एक मोठा आर्थिक प्रकल्प असतो. हॉल, जेवण, कपडे, दागिने, पाहुणचार, या सर्वांचा खर्च प्रचंड असतो. परंपरेने हा खर्च पालकांनी उचलायचा असतो, आणि अनेक वेळा तो “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनतो. त्यामुळे मुलगा-मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी “हे आई-वडिलांचं कर्तव्य आहे” ही धारणा कायम राहते. स्वतःच्या लग्नाचा संपूर्ण खर्च उचलणे म्हणजे केवळ पैसे देणे नाही, तर त्या खर्चामागील सामाजिक अपेक्षा, नातेवाईकांचे समाधान, प्रतिष्ठेचे गणित यांची जबाबदारी घेणे होय—आणि ही जबाबदारी घेण्यास अनेक जण मानसिकदृष्ट्या तयार नसतात. याशिवाय भावनिक अवलंबित्व हा एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय समाजात मुलांना लहानपणापासूनच “तुमच्यासाठी आम्ही आहोत” अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवण्यापेक्षा पालकांच्या अनुभवावर अवलंबून राहण्याची सवय लागते. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात चूक झाली तर त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील, ही भीतीही असते. म्हणूनच “आई-वडिलांनी ठरवलेलं सुरक्षित” अशी मानसिकता तयार होते. हे केवळ भीतीचे परिणाम नसून, एक प्रकारची सामाजिक कंडिशनिंग आहे.
सामाजिक दबाव आणि प्रतिष्ठेचे राजकारणही या प्रश्नात महत्त्वाचे आहे. “लोक काय म्हणतील? ” हा भारतीय मानसिकतेचा केंद्रबिंदू आहे. जर मुलगा किंवा मुलगी स्वतः लग्न ठरवते, विशेषतः आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय, तर कुटुंबावर टीका होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतः पुढाकार घेतात आणि मुलांनाही तसेच करण्यास भाग पाडतात. परिणामी, व्यक्तीची स्वायत्तता दुय्यम ठरते आणि सामाजिक मान्यता प्राथमिक ठरते. मुलं स्वतःहून लग्न का ठरवत नाहीत याचे आणखी एक कारण म्हणजे निर्णयक्षमता विकसित न होणे. आपल्या शिक्षणपद्धतीत करिअर, स्पर्धा, नोकरी यावर भर दिला जातो; पण जीवननिर्णय, नातेसंबंध, भावनिक परिपक्वता याबाबत मार्गदर्शन कमी असते. त्यामुळे एखादी व्यक्ती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सक्षम असली तरी वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यात ती गोंधळलेली असू शकते. यामुळे “कुटुंब ठरवेल” हा सोपा मार्ग निवडला जातो.
ही परिस्थिती बदलण्यासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर मानसिक स्वातंत्र्य आणि जबाबदारीची जाणीव आवश्यक आहे. जेव्हा व्यक्ती “माझ्या आयुष्याचे निर्णय मी घेईन आणि त्याचे परिणामही मी स्वीकारेन” अशी भूमिका घेते, तेव्हा खऱ्या अर्थाने बदल सुरू होतो. काही शहरी भागात, विशेषतः नव्या पिढीत, हा बदल दिसू लागला आहे—लव्ह मॅरेज, साधे विवाह, कोर्ट मॅरेज, स्वतः खर्च उचलणे यासारख्या प्रवृत्ती वाढत आहेत. पण हा बदल अजूनही मर्यादित आहे, कारण परंपरा आणि सामाजिक अपेक्षा अजूनही मजबूत आहेत. शेवटी, हा प्रश्न मुलं जबाबदारी का घेत नाहीत, इतकाच नाही तर समाज त्यांना तसे करू देतो का, हाही आहे. जोपर्यंत कुटुंब आणि समाज व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवत नाहीत, तोपर्यंत मुलं पूर्ण स्वायत्ततेने लग्न ठरवतील आणि पार पाडतील अशी अपेक्षा वास्तववादी ठरणार नाही. ज्या प्रमाणात व्यक्ती स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारेल आणि कुटुंब त्या स्वातंत्र्याला मान्यता देईल, त्या प्रमाणात भारतीय विवाहसंस्थेची मानसिकता बदलत जाईल, अशी आपण आशा करूया.
☆ वस्तू वस्तू जपून ठेव – ९ – रक्तचंदन बाहुली – ☆ विभावरी कुलकर्णी ☆
काही दिवसापूर्वी रस्त्याने चालत असताना, एक मुलगी लंगडत चालताना दिसली. तिला विचारले असता, पाय मुरगळला आहे आणि डॉ. कडे जात आहे असे समजले. मग मला आठवले आमच्या लहानपणी असे काही दुखणे झाले की, आजी घरीच एक लेप लावायची. आणि त्यातील औषधे मी प्रथमोपचार म्हणून जपली आहेत. आणि त्याचा वापरही चालू असतो. तर आता त्यातील एक महत्वाची वस्तू म्हणजे रक्तचंदन बाहुली. मला आठवते माझ्याकडे खेळण्यातील अशीच लाकडी बाहुली ठकी होती. आणि तिच्याशी खेळण्यात खूप मजा वाटायची. किती दिवस मला या दोन्हीतला फरक कळत नव्हता. आणि आजीने ही रक्तचंदनाची बाहुली उगाळली, की माझ्या बाहुलीचे पाय सहाणेवर घासून झीजवले म्हणून मी रडत असे. मग आजी मला दोन्ही बाहुल्या दाखवून तुझी ठकी सुखरूप आहे. हे समजावत असे. मला वाटते बऱ्याच जणांना ही औषधी बाहुली परिचित नसेल.
‘रक्तचंदनाची बाहुली’ म्हणजे विसरला गेलेला आजीच्या बटव्यातील ‘घरगुती डॉक्टर’!
आजच्या काळात छोटी जखम झाली किंवा मुकामार लागला की आपण लगेच मलम किंवा पेनकिलरकडे वळतो. पण ६-७ दशकांपूर्वी प्रत्येक घरात एक हक्काचा ‘वैद्य’ असायचा, तो म्हणजे ‘रक्तचंदनाची बाहुली’. माझ्या घरी ही बाहुली माझ्या पणजीच्या काळापासून, म्हणजे तब्बल १२० वर्षांपासून जपलेली आहे!
हे रक्तचंदन म्हणजे नक्की काय? तर याचे शास्त्रीय नाव ‘टेरोकार्पस सॅन्टलिनस’ (Pterocarpus santalinus) असे आहे. हे केवळ दक्षिण भारतात मुख्यतः आंध्र प्रदेशातील शेषचलम डोंगररांगात आढळणारे दुर्मिळ झाड आहे.
पांढरे चंदन सुवासिक असते, पण रक्तचंदनाला अजिबात सुगंध नसतो.
हे लाकूड इतके वजनदार आणि घन असते की पाण्याचा तांब्या भरून त्यात लाकूड टाकले तर ते बुडते. जे लाकूड पाण्यात बुडते, तेच अस्सल रक्तचंदन!
रक्तचंदनाच्या बाहुलीचे औषधी उपयोग अनेक आहेत. रक्तचंदन हे आयुर्वेदानुसार ‘शीत’ (थंड) आणि ‘दाहशामक’ गुणांचे असते. याचे उपयोगही अनेक आहेत.
खेळताना किंवा कामाच्या वेळी पडल्यामुळे शरीरावर सूज येते आणि त्वचा लाल होते. अशा वेळी ही बाहुली सहाणेवर पाणी टाकून उगाळावी. त्याचा जाडसर लेप सुजेवर लावल्यास वेदना कमी होतात.
जुन्या सांधेदुखीवर किंवा हाडात ठणका असल्यास, रक्तचंदनाचा लेप लावून तो वाळू द्यावा. लेप वाळताना तो त्वचा ओढून धरतो, ज्यामुळे आतील सूज कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जुनी जाणती माणसे त्याला ओढा घालणे म्हणायची.
रक्तचंदन त्वचेसाठी उत्तम असते. चेहऱ्यावरील मुरुमे (Pimples), काळे डाग किंवा उन्हामुळे होणारी जळजळ यावर याचा पातळ लेप लावल्यास त्वचा उजळते आणि थंडावा मिळतो.
जखमेतून रक्त येत असल्यास किंवा जखम भरून येत नसल्यास, पूर्वी याचे चूर्ण वापरले जात असे. यात नैसर्गिक ‘अँटी-सेप्टिक’ गुणधर्म असतात.
केवळ लेप लावून उपयोग होत नाही, तर त्यामागे एक जुनी पद्धत आहे. त्याच पद्धतीने ती बाहुली उगाळावी लागते. दगडी सहाणेवर थोडे पाणी घेऊन बाहुली गोलाकार फिरवून लेप तयार करायचा असतो. सुजेच्या जागी जाड थर लावायचा. लेप पूर्णपणे वाळल्यावर त्यावर सोसवेल इतक्या गरम मिठाच्या पुरचुंडीने शेक द्यायचा. या उष्णतेमुळे चंदनाचे औषधी गुणधर्म त्वचेच्या आतपर्यंत पोहोचतात.
या लाकडाला मुद्दाम बाहुलीचा आकारच दिलेला असतो.
हे लाकूड खूप कडक असते. ते उगाळताना हाताची पकड निसटू नये आणि व्यवस्थित दाब देता यावा, या उद्देशाने जुन्या कारागिरांनी या लाकडाला ‘बाहुली’चा (मानवी आकृती) आकार दिला.
हा केवळ एक लाकडाचा तुकडा नाही, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला आरोग्याचा अनमोल ठेवा आहे. आज ही बाहुली दुर्मिळ होत चालली आहे, पण तिचे महत्त्व आजही तितकेच आहे. पूर्वी लग्नात मुलीला आठवणीने ही बाहुली दिली जायची. तिला साडी नेसवून सजवून दिली जायची. जणू काही, तुला आता घरातील लोकांची काळजी घ्यायची आहे, हे सुचवायचे असावे. आणि ती मुलगी सुद्धा अशा माहेरच्या वस्तूंची जपणूक करत असे. आणि वेळेवर त्याचा वापर करत असे.
काही गोष्टी आपण वाचतो, किंवा पडद्यावर पाहतो सुध्दा. पण अशा गोष्टींचा प्रसंंग व त्याचा संबंध आपण अपल्याशीच लावायचा प्रयत्न केला तर… पाण्यात डुंबलेली म्हैस, किंवा तिला वा हत्तीला तलावात किंवा नदीवर नेऊन घातलेली आंघोळ… हे आपण वाचल, पाहिलं असेल. आपल्या बाबतीत मात्र…
आंघोळ हा आपला नेहमीचा शब्द. पण हिच आंघोळ पवित्र समजल्या जाणाऱ्या नदीत केली तर त्याच आंघोळीला स्नान म्हणावस वाटतं, किंवा आपण म्हणतो. असच स्नान करायच भाग्य नर्मदा ऊत्तर वाहिनी परिक्रमा करतांना पदरात पाडून घेतलं. खरतर आंघोळ करतांना पोहायला वापरतात तशी अर्धी चड्डी अंगावर असल्याने स्नानाच भाग्य पदरात पडलं म्हणण्यापेक्षा ते पवित्र पाणी अंगावर ऊडवून वाहून घेतलं. आणि अशी आंघोळ करतांना मला वर सांगितलेल्या म्हशीची आणि हत्तीची आठवण झाली.
गरुडेश्वरला आमचा एक दिवस मुक्काम होता. जवळूनच नर्मदा वाहात होती. चला तुम्हाला नर्मदा स्नान करवतो, अस म्हणत मला जे सोबत घेऊन गेले होते त्यांनी जवळपास आग्रहच धरला. मला तो रस्ता, व नर्मदेच्या काठावर असलेल्या त्या गोट्यांवरुन चालतांना त्रास होईल म्हणून मी अगोदर आढेवेढे घेतले. पण नर्मदेच ते वाहतं पाणी मनाला स्वस्थ बसू देत नव्हत. प्रवासाचा आला नसला तरी जाणवणारा शीण घालवायची ईच्छा होती. परत नदीवर आंघोळीचा आनंद कधी मिळेल? हा पण विचार होता. तो जवळचा वाटणारा पण बर्यापैकी लांब असणारा उताराचा, कच्चा, ओबडधोबड आणि गोट्यांनी भरलेला रस्ता त्या दोघांनी माझ्या दोन्ही हाताला धरून पार केला.
एखाद्या गिर्यारोहकाला अवघड चढणीचा चढ चढून शिखर सर केल्यावर जेवढा आनंद होत असेल तेवढाच आनंद मला तो खडकाळ रस्त्याचा ऊतार पार केल्यावर झाला. कदाचित मी पहिलाच असेल ज्याला चढाईचा नाही तर उतरण्याचा आनंद झाला असेल…
आणि मग मला सहज बसता येईल अशा खडकावर हा दगड (मी) त्यांनी बसवला. मी खडकावर बसल्यावर, आलो, आणि बसलो असा नि:श्वास मी सोडण्याच्या ऐवजी सोबतच्या दोघांनीच सोडला असावा. आणि मग ते दोघंजण दोन बाजूला ऊभे राहून त्यांच्या ओंजळींनी माझ्या अंगावर जमेल तसं, जमेल तितकं, जमेल त्या बाजूंनी मनसोक्त पणे पाणी उडवत होते आणि स्वत:ही स्नान करत होते.
आणि म्हशीला किंवा हत्तीला आंघोळ घालतांनाचा वाचलेला, पाहिलेला प्रसंग डोळ्यासमोर तरळला.
स्नान तर झालं. पण प्रसंग येवढ्यावरच थांबला का… नाही. मी बसलो तेव्हा तो खडक पूर्ण कोरडा होता. पण त्यांनी अंगावर पाणी उडवल्यावर थोडावेळ ते गार पाणी अंगावर छान वाटलं. पण नंतर…
नंतर मात्र मला काहितरी बर्याच प्रमाणात चावायला लागलं. त्या खडकाच्या फटिंमधे कोळ्यासारखे बारीक किडे बरेच होते. त्यांच्या घरात पाणी शिरल्याने ते भराभर बाहेर आले, व माझ्या अंगावर चढले आणि चावायला लागले. मी त्या परिस्थितीत जमेल तस पटकन ऊठायचा प्रयत्न केला, पण सगळाच भाग ओला झाल्याने पाय सरकायची भिती वाटत होती. कसातरी दोघांचा आधार घेत पाण्यात ऊभा राहिलो, परत त्यांनी थोडं पाणी अंगावर ऊडवलं आणि त्या त्रासातून मी आणि ते किडे दोघंही बाहेर पडलो.
पण जी ऊतरण ऊतरल्यावर आनंद झाला होता, ती परत त्याच पध्दतीने चढायचा प्रश्न होताच. पण परतण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मी मनातच म्हटलं, चला गिर्यारोहणाचा आनंद घेऊ…
हे नर्मदा स्नान बराच क्षकाळ स्मरणात राहील ते स्नान केल्यामुळे नाही, तर चावलेल्या किड्यांमुळे. आणि म्हशीला किंवा हत्तीला घालतात तशी आंघोळ आपल्याला कोणीतरी घातल्यामुळे.