श्री प्रमोद वामन वर्तक
विविधा
चं म त ग ! श्री प्रमोद वामन वर्तक
लग्नातला सुट !
“पंत गुडमॉर्निंग !”
“गुडमॉर्निंग, गुडमॉर्निंग मोऱ्या, कसा आहेस ?”
“मी बरा आहे, पण तुमचा मूड एकदम खास दिसतोय आज मला !”
“खास म्हणजे काय बुवा, नेहमी सारखा तर आहे.”
“नाही पण नेहमी पेक्षा आज तुम्ही जास्त आनंदी दिसताय, काकू माहेरी वगैरे गेल्या की काय?”
“मोऱ्या उगाच अकलेचे दिवे पाजळु नकोस, अरे बायको माहेरी जाणार याचा आनंद तुझ्या सारख्या लग्नाला दोन वर्ष झालेल्या नवऱ्यांना होतो ! आमच्या लग्नाला तब्बल चाळीस वर्ष झाली आहेत !”
“ते ठीक आहे पंत, मला फक्त तुम्ही एव्हढे खूष का ते सांगा, म्हणजे मी घरी जायला मोकळा.”
“मोऱ्या परवा लग्नाला गेलो होतो केळकरच्या मुलीच्या, तर….!”
“त्यात एवढा आनंद साजरा करण्या सारखं काय ?”
“तुला सांगतो असं लग्न मी माझ्या अख्या आयुष्यात अटेंड केलेले नाही मोऱ्या आणि या पुढे तशी शक्यताही नाही !”
“ते तर सांगाच, पण ते कोपऱ्यात स्पेस सूट सारखं काय पडलंय पंत ? तुमचा मुलगा नासा मध्ये काम करतो म्हणून काय US वरून स्पेस सूट मागवाल की काय ?”
“तेव्हढी अक्कल देवाने दिल्ये मला आणि तो स्पेस सूट नाही पण जवळ जवळ…. “
“तसंच काहीतरी आहे, पण ते काय आहे ते तुम्हीच…. “
“तेच तर सांगतोय तुला, पण मला बोलू तर देशील का नाही मोऱ्या ?”
“सॉरी, सॉरी पंत बोला !”
“अरे मी तुला मगाशीच म्हटलं ना, की परवा केळकरच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो तिथे….. “
“हे सूट वाटत होते की काय पंत ?”
“मोऱ्या आता एक काम कर, आमचा पेपर आणला असशील तर तो दे आणि चालायला लाग !”
“पंत खरंच सॉरी, आता नाही तुम्हाला अडवत, बोला तुम्ही.”
“अरे असं बघ सध्या कोरोनाची साथ चालू आहे, त्यात लग्नाचा मुहूर्त, सगळी तयारी वर्ष सहा मिहिन्यापासून चालू होती केळकराची आणि त्यात हा नेमका कोरोना तडफडला.”
“हो ना !”
“पण केळकर डगमगला नाही. त्यानं मुलाकडच्या लोकांना ठणकावून सांगितल, लग्न ठरल्या प्रमाणे होणार म्हणजे होणारच.”
“आणि लग्न ठरल्या प्रमाणे झालं, हे कळलं, पण त्या स्पेस सूटच कोडं काय ते तरी सांगाल का आता ?”
“तू म्हणतोयस तसा हा स्पेस सूट वगैरे काही नाही, पण कोरोना पासून रक्षण करायला हा हॉस्पिटलमधे डॉक्टर लोक वापरतात तसलाच आहे हा PPE सूट आहे !”
“अस्स, मग तो तुमच्यकडे कसा आला, तुम्ही तर साधे भोंदू वैदूही नाही !”
“मी रागवत नाही म्हणून उगाच फालतू विनोद नकोयत, अरे हा मला परवाच्या केळकराच्या लग्नात मिळाला.”
“तुमचे एकवीसचे पाकीट कितीतरी पटीने वसूल झाले म्हणायचे पंत !”
“ते सोड, पण मला एकट्यालाच नाही तर लग्नाला आलेल्या सगळ्याच वऱ्हाडी मंडळीना हा PPE सुट मिळाला !”
“काय सांगता काय पंत ? पण हा सूट प्रत्येकाला देण्यामागच कारण काय ?”
“अरे आजकाल कोरोनाचा सगळ्यांनी धसका घेतला आहे ना, त्यापासून बचाव नको का व्हायला मोऱ्या.”
“अहो पंत पण त्यासाठी साधं हॅन्ड सॅनिटायझर पण चाललं असतं की !”
“अरे त्याच्या पण प्रत्येकाला एक एक डझन बाटल्या दिल्या केळकराने, आहेस कुठे ?”
“केळकरांची खरच कमाल आहे म्हणायची. पण पंत सगळेच वऱ्हाडी सूट घालून आले असतील तर त्यांनी एकमेकांना कसं काय बुवा ओळखल?”
” मोऱ्या तो सूट नीट बघितलास तर तुला कळेल, की माझ्या नावाची नेम प्लेट आहे त्या वर.”
“हां, आत्ता दिसली मला ती. पण मग एकमेकांशी बोलतांना काही… “
“काहीच प्रॉब्लेम आला नाही, त्या सूटच्या आत तोंडा जवळ एक छोटा माईक बसवला आहे आणि काना जवळ इयर फोन!”
“अरे व्वा, पण सध्या जमाव बंदी आहे आणि लग्न म्हटलं की 500-600 लोक आले असणारच लग्नाला !”
“तेच तर सांगतोय ना मोऱ्या, केळकर म्हणजे बड खटलं ! पठयाने एका हॉटेल मधल्या शंभर रूम बुक केल्या होत्या.”
“म्हणजे अख्ख हॉटेलच म्हणा की.”
“तसंच काहीस आणि एका एका रूम मधे सूट घालून फक्त पाच पाच लोक, म्हणजे जमावबंदी… “
“मोडायचा प्रश्नच नाही. पण मग लग्न कसं काय अटेंड केल लोकांनी, वेगवेगळ्या शंभर रूम मधे बसून ?”
“अरे प्रत्येक रूम मधे टीव्ही असतो हे विसरलास की काय ?”
“ओके, ओके, म्हणजे सगळ्या वऱ्हाड्यांनी वेगवेगळ्या रूम मधे बसून आपापल्या रूम मधल्या टीव्हीवर लग्न… “
“सोहळा याची देही याची डोळा पहिला, कळलं !”
“अच्छा, पण मग नवरा नवरीवर अक्षता टाकायचा प्रश्नच आला नसेल ना ?”
“वेडा आहेस का तू ? अरे प्रत्येक रूम मधे दोन पेट्या ठेवल्या होत्या, इयर फोनवर भटजींच सावधान ऐकू आले की, एका पेटीतल्या अक्षता दुसऱ्या पेटीत टाकायच्या मग ती पेटी……”
“कळलं, नंतर सगळ्या पेट्या एकत्र करून नवरा नवरीच्या रूमवर पोचवणार, ते ठीक, पण मग तुम्ही तुमच एकवीसच अहेराच पाकीट कसं काय दिलंत ?”
“अरे त्यासाठी देवळात जशी दानपेटी असते, तशी स्लिटवाली पेटी होती, त्यात प्रत्येकाने आपापली अहेराची पाकीट…. “
“टाकायची मग पुढचे सारे सोपस्कार अक्षतांच्या पेट्यां प्रमाणे, बरोबर ना ?”
“आता तुला कळायला लागलं आहे थोडं थोडं.”
“पण पंत तुम्ही सर्व लग्न समारंभ, एकवीसचे पाकीट देवून ज्यासाठी अटेंड करता त्या उदरभरणाची काय सोय होती ते नाही सांगितलत !”
“केळकराने ती सोय काय झकास केली होती मोऱ्या, खरच हुशार आहे पठया.”
“तेच तर विचारतो आहे की… “
“अरे त्या PPE सुटला पोटाच्या जागी दोन खण आहेत. एका खणा मध्ये लंच प्याक केला होता, दोन दोन स्वीट्स सकट आणि दुसऱ्यामधे मिनरल वॉटरची बाटली, आता बोल !”
“हो पण जेवण कुठे आणि कसं करायच तो सगळा सूट घालून ?”
“वेडा आहेस का तू ? अरे लग्न लागलं आणि सगळे वऱ्हाडी आपल्याला घरी जाऊनच जेवले !”
“हो, तेही बरोबरच म्हणा, उगाच एकमेकांच्या संपर्कात यायला नकोत कोणी ! बरं मी निघतो आता पंत, ऑफिसला जायला उशीर होतोय.”
“थांब मोऱ्या, त्या सूटचा आता मी रिटायर असल्यामुळे काहीच उपयोग नाही, म्हणून तो सूट उचल आणि घरी घेऊन जा आणि ऑफिसला जाताना नक्की घाल, कारण मुंबईची लाईफ लाईन अजून तरी चालू आहे !”
“थँक्स पंत, पण मी एवढा अप्पलपोटा नाही.”
“यात कसला आला आहे अप्पलपोटेपणा ?”
“कसला म्हणजे, मी सूट घालून ट्रेन मधून प्रवास करायचा आणि बायकोने मात्र… “
“अरे तिच्यासाठी पण एक सूट आहे माझ्याकडे.”
“तो कसा काय ?”
“अरे मगाशी मी तुला काय म्हटलं मोऱ्या, सगळ्या वऱ्हाडी मंडळींना एक एक सूट दिला म्हणून.”
“हो मग त्याच काय ?”
“अरे मोऱ्या ही पण त्या लग्नाला आली होती ना, तेव्हा तिला पण एक सूट मिळाला आहे, तो तुझ्या बायकोला दे ऑफिसला जातांना, मग तर झालं !”
“धन्य आहे तुमची पंत !”
© श्री प्रमोद वामन वर्तक
२५-०३-२०२२
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈