मराठी साहित्य – विविधा ☆☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?विविधा ?

☆ महिला दिना निमित्त – स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(नमस्कार रसिकहो! जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव करून भारतीय स्त्रीशक्तीला प्रस्तुत लेखाद्वारे मानाचा मुजरा प्रदान करीत आहे.)

भारतीय संस्कृतीत ‘स्त्रीला’ अनन्य साधारण स्थान आहे. पुरातन काळापासून आजच्या अत्याधुनिक युगापर्यंत ती ‘शक्ती देवता’ म्हणून ओळखल्या जाते.  ती मांगल्य, सुचिता, पावित्र्य यांची मूर्ती आहे.  प्रेम, वात्सल्य, ममता यांची कीर्ती आहे.  नररत्नांची खाण आहे. कुटुंबाची शान आहे. समाजाची मान आहे.

आजची स्त्री उच्चविद्याविभूषित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आपल्या कर्तव्य कर्मात उभी आहे.  चूल व मूल ही दोन्ही क्षेत्रे सांभाळून तिने आर्थिक बाजूही सांभाळली आहे.  खरेच कुटुंबाची ती ‘कणा’ आहे. स्वाभिमान,अस्मिता हा तिचा बाणा आहे.  जवळ जवळ सर्वच क्षेत्रे तिने आज पादाक्रांत केली आहे.  केवळ पृथ्वीवरच नव्हे तर अंतराळात जाणारी भारतीय पहिली स्त्री कल्पना चावला हिने हा मान मिळविला आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या.  प्रतिभाताई पाटील यांनी पहिल्या राष्ट्रपती पदाचे स्थान भुषविले आहे. अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे असेल तर स्वाती महाडिक व सुप्रिया म्हात्रे यांचे देता येईल.  तसेच अगदी अलीकडे अंतराळात गेलेली भारतीय महिला म्हणजे शिरीष बंदला ही होय.

स्त्रीचे महत्व हे नदीसारखे असते. म्हणून केवळ प्रसंगोचित तिचा उदो उदो न करता नेहमीच तिला शाश्वत मानबिंदू देणे समाजाचे कर्तव्य नव्हे का?  कोणत्याही विकृत भावनेला बळी न पडता समाजाने तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.  या नवीन दृष्टिकोनाचे पालन केल्यास आज आपण समाजात तिचे भेसुर, भयान, निंदास्पद अपमानकारक चित्र बघतो ते मिटविण्यास मदत होईल.  स्त्री एक आदर्श माता आहे. याचा अंगीकार केल्यास जिजाबाई ला शिवबा निर्माण करता येईल.  नव्या युगाला औरंगजेबाची गरज नसून शिवबाची नितांत गरज आहे.  शिवरायाचा आदर्श व आदर म्हणजेच स्त्रीत्वाचा गौरव होईल व स्त्रीत्वाचा गौरव हाच तिला केलेला  मानाचा मुजरा होईल. म्हणूनच कवी म्हणतो,

| मूर्तिमंत लक्ष्मी तू घरादारांची

     कुशल अष्टपैलू मंत्री तू जीवनाची

    शिल्पकार तू नवनिर्मितीची

     खाण असे तू नररत्नांची |

  | दुर्गा असे तू जीवन संघर्षाची

    कालिका भासे तू रौद्ररुपाची

    राणी असे तू स्वातंत्र लक्ष्मीची

    संगम देवता तू शक्तीयुक्तीची |

  | ढाल असे तू कुटुंब देशाची

    प्रतिकाराच्या तलवारीची

    कीर्तिवंत तू कर्मभूमीची

    सदा वंदनीय तू युगायुगांची |

या स्त्रीच्या यशोगाथेचा गौरव करून माझ्या लिखाणाला पूर्णविराम देते

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ स्त्री…रंग जीवनाचे … ☆ सौ राधिका भांडारकर☆

स्री म्हणजे देवाने निर्माण केलेली एक अद्भुत चमत्कृती आहे…

अनेक दैवी तेजापासून उत्पन्न झालेली स्त्री म्हणजे दिव्य शक्तीचाच साक्षात्कार आहे..

निसर्गानेच स्त्रीला निर्मीतीचे वरदान दिले आहे.

म्हणूनच स्त्री ही सृष्टीची सर्वश्रेष्ठ अपूर्व कलाकृती आहे..

जीवनातला प्रमुख रंग आहे…

तरीही स्त्री पुरुषांच्या एकत्रित जीवनाचा विचार केला तर ती दुय्यम स्थानावर असते.. तिला अबलाच मानले जाते. तिची जीवनपद्धती, तिच्या वर्तणुकीचे नियम तिच्या चारित्र्याविषयीचे आराखडे हे पुरुषप्रधान संस्कृतीने बांधल्यामुळे ही महान स्त्रीशक्ती दडपल्यासारखी वाटते मात्र… पण जेव्हा या परंपरेच्या साखळ्या तोडून ती लखलखत्या रंगात अवतरते तेव्हांच घडते तिच्यातले दिव्यत्वाचे तेज….!! मग हीच गौरी दुर्गा बनते… दुष्ट वृत्तीची, असत्याची, अनैतिकतेची संहारक बनते… ही नम्र, शालीन, शांत सात्विक, त्यागमूर्ती तेजमूर्ती संभवते… आणि एका वेगळ्याच रंगाने नटते…

माझे काका मला नेहमी सांगायचे, तुझी काकु अशक्त वाटते ंना.. दुर्बल वाटते ना… गरीब वाटते ना.. परावलंबी वाटते ना…

नाही बरं.. जेव्हा संसारात काही समस्या. संकट निर्माण होते तेव्हा हीच काकु बलदंड बनते. मी पार ढेपाळून  गेलेला असतो तेव्हा ही शक्ती बनून रणरागिणी बनते…

बहु शस्त्रधारिणी बनते… संकट पार होई पर्यंत तिची ताकद संपत नाही. श्रद्धेचं विलक्षण बळ तिच्या पाठी असते.. तेव्हा जाणवते, मीच सगळा वेळ एक अबला स्त्री होतो. आणि ती योध्याच्या भूमिकेतील पुरुष असते… स्त्री म्हणून तिचे हे रंग जेव्हा मी अननुभवतो तेव्हांच तिच्याशिवाय माझे जीवन व्यर्थ आहे….. हे  तीव्रतेने जाणवते…

माता भगिनी पत्नी या नात्यांत तिचे मूलभूत रंग असतातच, पण तिच्या व्यक्तीमत्वात अनेक सुप्त रंग असतात, जे जीवनात रंग भरतात… ओळखणारे ओळखतात आणि त्यांच्या जीवनाची सफर सुखदायी करतात…. माझे आजोबा नेहमी म्हणायचे,

“ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो…..”

म्हणून स्री शक्तीची पूजा फक्त गाभार्‍यात नको ती घराघरात हवी…

स्त्री …जीवनाचे रंग निरनिराळे…

जीवन  अनेकांगाने रंगवणारे…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 7 – कृतज्ञता ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

“कोणावरही उपाशी राहायची वेळ येऊ नये”, अशी राजकीय वाक्यं सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सतत ऐकायला मिळत आहेत. एरव्ही रस्त्यारस्त्यात कुणी अडवून काही मागायला लागलं तर चीड येते आणि भीक मागण्यापेक्षा काहीतरी काम करावं असं आपण सुचवित असतो. त्याउलट, मंदिराबाहेर दान देणारे  श्रद्धावान भाविक खूप असतात, तर हे दान स्वीकारणार्‍या व्यक्तीही मंदिराबाहेर खूप दिसतात. पण आजची उपाशी राहण्याची परिस्थिति वेगळी आहे. लॉक डाउन काळात आपआपल्या गावी परत जाणारे मजूर, कामगार व काही लोक यांच्यावर अशी वेळ आली आहे. हे बघून आपल्याला दु:ख होते. असच कलकत्त्यात एक माणूस उपासमारीने मेला अशी बातमी पेपर मध्ये छापून आली, ती वाचून स्वामी विवेकानंद, “देशाचा सर्वनाश ओढवणार, देश रसातळाला जाणार” असे दु:खाने म्हणू लागले. या दुखाचे कारण त्यांचे मित्र हरिपाद मित्र यांनी विचारलं. त्यावर स्वामी म्हणले, “ इतर देशात कितीतरी अनाथ आश्रम, गरीबांना कामं पुरवणार्‍या संस्था, धर्मादाय, सार्वजनिक फंड असूनही शेकडो लोक दरवर्षी उपासमारीने मेल्याचं आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण भुकेलेल्याला मूठभर अन्न देण्याची  प्रथा आपल्या देशात असल्यामुळे कधी कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते. आज प्रथमच वाचले की, दुष्काळाचे दिवस नसतानाही उपासमारीने एक मनुष्य अन्नान्न दशा होऊन कलकत्त्यासारख्या शहरात मृत्यूमुखी पडला”.

आपण नेहमीच अनुभवतो की आज काही पैसे दान दिले तर फुकट मिळतात म्हणून त्या पैश्यातून व्यसनाधीन होऊन खितपत पडणारे लोक आहेत. तशी सवय लागते त्यांना. पण स्वामी विवेकानंद म्हणतात, दारात भिकारी आला तर, आपल्या ऐपतीनुसार त्याला काहींना काही देणेच योग्य आहे. त्याचा सदुपयोग होईल की नाही याची नसती चिंता कशाला करायची? कारण तुम्ही त्याला दान दिले नाही तर तो  पैशांसाठी तुमच्याकडे चोरी करेल, त्यापेक्षा दोन पैसे भीक मिळाली तर स्वस्थ तरी बसेल घरात. त्यामुळे निदान चोर्‍या होणार नाहीत.

त्यांच्या मते, आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवणे. कारण तो गरीब असल्यामुळेच मागतोय. लक्षात ठेवा दानाने धन्य होत असतो तो देणारा, घेणारा नव्हे. जगावर आपल्या दयाशक्तीचा प्रयोग करण्यास वाव मिळाल्यामुळेच तुम्ही स्वताला समर्थ बनवू शकता या बद्दल तुमच्या मनात कृतज्ञता असली पाहिजे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?विविधा ?

☆ माझी पूजा अपूर्ण आहे…. अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पूजेसाठी रोज मी उपकरणं स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज ताम्हनात देवांवर मी पाणी घालतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

 श्री गुरुदेव दत्त .

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ गौरव मराठी भाषेचा… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त्ताने…. सकाळपासून मोबाईल वर भाषा दिनानिमित्त चे विशेष वाचताना सहज लक्षात आलं ! महाराष्ट्राची प्रमाणित मराठी भाषा म्हणून जी आपण वापरतो ती पुस्तकातील भाषा ! पण बोली भाषा दर पाच मैलागणिक बदलते असे पूर्वी पासून ऐकून आहे! त्याप्रमाणे महाराष्ट्रात सुध्दा देश, कोकण, खानदेश,वर्हाड या प्रत्येक भागातील मराठी आपले वेगळेपण दाखवते!

मी महाराष्ट्रातील या सर्व भागात थोडा थोडा काळ राहिले आहे.आणि अनुभवली आहे वेगवेगळी मराठी भाषा.मिरज- सांगली तील भाषेवर कर्नाटक जवळ असल्याने कानडी भाषेची छाप दिसून येते.प्रत्येक वाक्यात शेवटी ‘की’ चा उपयोग!’काय की,कसं की..इ.’खानदेशाजवळ गुजरात राज्य असल्याने तेथील मराठीत गुजराथी, अहिराणी भाषेचे शब्द आपोआपच येतात!

तर नागपूर च्या मराठी भाषेत हिंदी शब्दांचा वापर जास्त दिसून येतो.’करून राहिले, बोलून राहिले,होय बाप्पा’ असे शब्द प्रयोग वर्हाडी भाषेतच दिसतात!

भाषेचा प्रवास हा असाच चालतो.व्यवहारात,बोली भाषेत अशी भिन्नता दिसत असली तरी पुस्तकी भाषा ही साधारणपणे एकच असते. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संस्कृतमधील भगवद्गीता त्याकाळात प्राकृत मराठीतून लिहिली पण आपण आता ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर ती भाषा आपल्याला पुष्कळ वेळा कळत नाही. त्यातील कित्येक शब्दांचे अर्थ लागत नाहीत! त्यातील भाषेचे सौंदर्य कळायला पुन्हा शब्दार्थ बघावे लागतात!

काळानुरूपही भाषा बदलत असते.लहान बालकाला बोलायला शिकताना अनुकरण हेच माध्यम असल्याने आई जे शब्द उच्चारेल तेच ते बाळ बोलते. म्हणून मातृभाषेचे महत्त्व फार आहे!आपण कितीही शिकलो, वेगवेगळ्या देशात गेलो तरी कोणतीही तीव्र भावना व्यक्त करताना आपण मातृभाषेतून च बोलतो.आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की तिची अभिव्यक्ती करताना शब्द संपदा कधी अपुरी पडत नाही! ओष्ठव्य, दंतव्य, तालव्य, कंठस्थ..

अशा सर्व प्रकारच्या अक्षरांनी ती संपन्न आहे! मराठी भाषा आपल्या शरीर मनाशी एकरूप झालेली असते.म्हणून ती मातेसमान आहे. त्या मराठी भाषेला आपण जतन केले पाहिजे,   

मराठी दिनासाठी ची शुभेच्छा!

एक  मराठीप्रेमी…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ रंग संवेदना… ☆ सौ ज्योती विलास जोशी

एक रंगसंवेदना असते.आवडत्या रंगाला त्याच्या मनःपटलावर एक स्थान असतं. रंगीबेरंगी दुनियेतला तोच एक रंग त्या व्यक्तीला भावतो आणि आनंदही देतो.

‘रंग रंग के फुल खिले है भाए कोई रंग ना’ ह्या प्रेमिकेच्या ओळीतून तोच अर्थ प्रतीत होतो.’प्रेमरंगा’चा शोध घेत तिचे डोळे भिरभिरत असतात. नेमक्या परावर्तित होणाऱ्या किरणांच्या (प्रेमिकाच्या) शोधात ते असतात.आणि तसे एकदा झालं की मग,’ मुझे रंग दे, मुझे रंग दे’ असं म्हणत हर्षोल्हासात ती रंगून जाते.

लहानपणी इंद्रधनुष्यातले रंग ‘जातानाहीपानीपी’ असा ठेका धरून पाठ केलेले…..तेव्हाच मनांत आलं की या इंद्रधनुष्यात गोरा रंग कुठे आहे?धाडसानं तसं बाईंना विचारलं देखील होतं. विज्ञानाची शिडी धरून बाईंनी ‘सात रंग मिळून जो होतो तो गोरा म्हणजे पांढरा रंग.’  असही सांगितल्याचं आठवतंय. माझ्या बाल मनानं सोयिस्कर अर्थ असा लावला होता की सगळे रंग नसले की ‘अंधार’ म्हणजे काळा रंग…. मग या अंधाराला पारंब्या फुट्याव्यात तसा काळा रंग मला दिसू लागला आणि आठवली ती संत नामदेवांची गवळण… ‘रात्र काळी घागर काळी जमुना जळे ही काळी ओ माय’. … ‘देव माझा विठू सावळा’ या गाण्यातील सावळ्या रंगाचं सौख्यही विठूला पाहिल्यावर डोळ्यात भरलं. डोळे आणि मन सावळ्या रंगाचा शोध घेत घेत श्यामलसुंदर अजिंठा-वेरूळची लेण्या पर्यंत पोहोचलं. या स्त्रियांचं सौंदर्य सावळ्या रंगा व्यतिरिक्त आणखी कोणत्याही रंगानं खुललं नसतं हे मनोमन पटलं.

लोकसाहित्यात चंद्रकलेचा उल्लेख पैठणी पेक्षाही जास्त आढळतो. त्यातही तांबड्या चन्द्रकळेपेक्षाही काळी चंद्रकळा जास्ती रूढ…. त्या काळ्या चंद्रकळेतील नारी काळे मणी आणि काजळ यांनी खुलून दिसते. त्यात तिने काळी गरसोळ घातलेली असेल तर मग त्या श्यामलेचे वर्णन ते काय करावे?

विठ्ठलाला माउली म्हणत ज्ञानोबांनी’ रंगा येई वो’ अशी हाक मारली आहे. रंगांच्या यादीत काळ्यासावळ्या रंगाला अव्वल स्थान मिळालं ते त्यांच्या या हाकेनं…

‘निळा सावळा नाथ’ असे आपल्या पतीचे वर्णन करताना निळ्या रंगाच्या आडून सावळेपण दाखवताना नारीच्या भावनेतील शीतलता, घनता आणि गारवा जाणवतो. कृष्ण आणि विष्णू यांच्या सावळ्या रंगात निळसर रंगाची झाक आहे. निळ्या सावळ्या रंगांसोबतच पांढऱ्या रंगाच अप्रूपही तितकंच आहे. लेखक कवी साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून या रंगीबेरंगी दुनियेतील सर्व रंगांची उधळण केली आहे.

पद्मजा फेणाणी यांचं ‘शुभ्र ज्वाला’ या अल्बम मधील ‘पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हे गीत पांढऱ्या रंगाचं सौंदर्य खुलवतं. ‘पुस्तकातली खूण कराया दिले पण एकदा पीस पांढरे’ या त्यांच्याच गाण्यात त्यांच्या आवाजातून शुभ्र पांढऱ्या पिसार्याचं सौंदर्य झाकोळतं.

लावणीतील रंग बरसातही अनुभवण्यासारखी आहे. होळीच्या सणातली रंगांची उधळण करताना ‘खेळताना रंग बाई होळीचा म्हणत… तर ‘कळीदार कपूरी पान केशरी चुना रंगला कात’ म्हणत सुलोचना बाईंनी खाऊ घातलेलं पान लावणीचा ठसका देतं.’पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा’म्हणत हिरव्याकंच शालूतील लावणीसम्राज्ञी मन जिंकते. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना. हिरव्या मोराची थुईथुई थांबेना’ अशी लडिवाळ तक्रार करत लावणीसम्राज्ञी रंगात येते तेव्हा मन लावणीत रंगून जातं.

इंद्रधनुष्यातले रंग, काळा पांढरा रंग यांच्यासोबतच लिंबू, पारवा, श्रीखंडी, चिंतामणी  गुलबक्षी पोपटी, आकाशी, डाळिंबी, तपकिरी, शेवाळी, मोतिया, राखाडी, केतकी,  आमसुली याआ णखीन अशा अनेक रंगानी माझं आयुष्य रंगीबेरंगी करून टाकलं. लहानपणी एका रंगानं मात्र मला कोडयात टाकलं होतं. ‘गणराज रंगी नाचतो’ हा रंग कोणता? तो कलेचा रंग होता हे मोठे झाल्यावर लक्षात आलं.’अवघा रंग एक झाला’ असं म्हणत सोयराबाईंनी मानव जातीतील सारे भेद मिटवले. हा रंग देखील समजायला मोठं व्हावं लागलं….

अशा अनेकविध गाण्यांच्या लोलकातून गीतकारांच्या प्रतिभेचे किरण जाऊन माझ्या मनःपटलावर रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उमटलं. या इंद्रधनुष्यात अगणित रंग होते. त्या रंगात मनानं  रंगून जायचं ठरवलं.रंग उडलेल्या मनाच्या पापुद्र्यांवर आता आगळे वेगळे रंग चढू लागले. आयुष्याचं चित्र रंगीबेरंगी रंगांनी रंगवून टाकायचं त्यानं ठरवलं…..

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

 

?विविधा ?

☆ सामान्यातील असामान्यत्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

काल मी कृष्णा काकांकडं गेले होते. काका काकू बाहेर जाण्याची तयारी करत होते. त्यांची लगबग बघून मी न राहवून चौकशी केलीच. काका काकू चिनूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनाथाश्रमात मुलांना लाडू वाटायला चालले होते.

नोकरी च्या निमित्तानं परदेशी राहणाऱ्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्याची ही कल्पनाच किती अभिनव आहे, नाही का ? आमच्या काका काकूंनी मुलगा जवळ नसताना सुद्धा वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. कितीतरी जणांच्या चेहऱ्यावर तो परावर्तित झालेला बघितला!

पुण्यातील एक सद्गृहस्थ आपल्या मुलाच्या निधनाचं दु:ख विसरून अनेक अनाथ मुलांना आपलं घर देतात, त्यांना आश्रय देतात. अशी माणसं मला सामान्य असूनही असामान्य वाटतात. या देवदूतांना प्रसिध्दी नको असते. हारतुरे नको असतात. पेपर मध्ये फोटो किंवा बातमी नको असते. त्यांना फक्त आनंद वाटायचा असतो. समाधान पेरायचं असते. स्वतः बरोबर आजूबाजूला सुख पसरवायचं असतं. प्रसिध्दी, पैसा, अहंकार मोठेपणा त्यांच्या आजूबाजूला फिरकतही नाहीत. या सगळ्या पलिकडं ते पोचलेले असतात. म्हणूनच इतरांपेक्षा वेगळे दिसतात.

असामान्य होण्यासाठी मोठं कार्यच करायला पाहिजे असं नसतं हं. मोठेपण अंगी बाणवायला यातना ही सोसाव्या लागतात. ती असामान्य व्यक्तिमत्वं लाभलेली माणसं तुमच्या आमच्यासारखी असूनही वेगळी असतात.ते सगळ्यांना शक्य नसतं. परंतु छोट्या छोट्या गोष्टीतून आपण कुणालातरी मदत करु शकतो. कुणाला तरी हसवू शकतो, उदास मनाला आनंद देऊ शकतो. बघा हं. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या बहुतेकांच्या घरी खूपसा खाऊ असतो, नको असलेले जास्तीचे कपडे असतात. हेल्थ कॉन्शस असलेले आपण इतका खाऊ संपवू शकत नाही. काकूंच्या प्रमाणं मुद्दाम करुन नाही जमणार कदाचित, पण असा जास्तीचा खाऊ ; ताजा, चांगला असतानाच गरजूंना का वाटू नये बरं? जसं खाण्याच्या पदार्थांचं, तसंच कपड्यांचं! आजकाल कपाटात मावत नाहीत एवढे कपडे असतात नं बहुतेकांच्या जवळ! ते जुने होण्यापूर्वी, फाटण्यापूर्वी दिले गरजूंना तर? अगदी सुधा मूर्तीं इतका साधेपणा नाही जमला तरी , त्यांचं थोडंसं अनुकरण करायला काय हरकत आहे? बघा बरं, अशा वागण्यानं कसं समाधान मिळतं ते. आनंद, समाधान, या भावना संसर्गजन्य आहेत. त्या परावर्तीत होतात. आणि त्या परावर्तनाचा एक सूक्ष्मसा किरण आपल्याला होता आलं पाहिजे.

आनंदाचे डोही आनंद तरंग. अंतर्मनात जेंव्हा असा आनंद भरलेला असतो, मनाचा डोह आनंद गान गात असतो तेंव्हा अगदी सहजपणं आनंद तरंग उठत असतात. त्यांचा भवताल ही आनंदानं डोलत राहतो.

निर्व्याज समाधान मिळवण्यासाठी पैसे खर्च लागत नाहीत. असं सिद्ध करणारे अनेक सामान्य लोक या जगात आहेत. एक भांडी घासणाऱ्या बाई आपल्या झोपडीवजा घरात दहा बारा अनाथ मुलांच संगोपन करतात. त्यांच्या शिक्षणासाठी धडपडतात. त्यांना एकवेळेला पोटभर खाऊपिऊ घालतात.मग ती साधी चटणी भाकरी का असेना. एवढा उदात्तपणा राजेशाही बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांच्या कडंही नसतो.अशी अनेक उदाहरणे आहेत जी सहजपणे समाजकार्य करतात. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळूही न देता अविरतपणे घेतला वसा सुरू ठेवतात. या सर्वांना माझे दंडवत. साने गुरूजींच्या या धर्माचे आचरण करण्याचा निदान एक लहानसा का होईना प्रयत्न अवश्य करुया. . . . . .

जगी जे दीन पद दलीत

जगी जे हीन अतीपतीत

तया जाऊन ऊठवावे

जगाला प्रेम अर्पावे

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ६ – अनुकरण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मुलं अनुकरणप्रिय असतात. घरात आपले आई वडील कसे वागतात, कसे बोलतात, कपडे काय घालतात, नातेवाईकांशी कसे संबंध ठेवतात हे सर्व ते रोज बघत असतात. त्यांच्या सवयी काय आहेत ,कोणत्या आहेत? हे मनात साठवत असतात. मुली असतील तर त्या आईची नक्कल करतात,उदा. भातुकली च्या खेळात मुली आईची भूमिका नेहमी करत असतात. आजही. मुले वडिलांची नक्कल करतात. म्हणजे आई वडील या नात्याने आपल्या मुलांच्या भविष्यात चांगले काही घडण्यासाठी ची आईवडिलांची जबाबदारी किती मोठी असते हे लक्षात येईल. घरात जसे वातावरण असेल तशी तशी मुलं घडत जातात. 

नरेंद्रही अशा वेगळ्या वातावरणात घडत होता. १८७७ मध्ये नरेंद्र विश्वनाथबाबूंच्या बरोबर रायपूर येथे राहत होता. तेथे शाळा नव्हती. त्यामुळे ते स्वत:च नरेंद्रला शालेय पाठ्यपुस्तकाशिवाय इतिहास तत्वज्ञान, साहित्य विषय शिकवीत असत. शिवाय घरी अनेक विद्वान व्यक्तीं येत असत. त्यांच्या चर्चाही नरेंद्रला ऐकायल मिळत असत. त्याचं वाचन इतकं होतं कि, तो वादविवादात पण सहभागी होत असे. नरेंद्रची बुद्धी आणि प्रतिभा बघून ते वेगवेगळ्या विषयांवर मोकळेपणी मत मांडण्याची संधी नरेंद्रला देत असत.

नरेंद्रचही असच होत होतं. वडिलांचे गुण, दिलदारपणा, दुसर्‍याच्या दु:खाने द्रवून जाणं, संकटकाळी धीर न सोडता, उद्विग्न न होता, शांतपणे आपलं कर्तव्य बजावत राहणं अशी वैशिष्ठ्ये त्यानं आत्मसात केली होती. दुसर्‍यांची दुखे पाहू न शकल्याने दिलदार विश्वनाथांनी मुक्त हस्ताने आपली संपत्ती वाटून टाकली होती. तर ज्ञानसंपदा दोन्ही हातांनी मुलाला देऊन टाकली होती. एकदा कुणाच्या तरी सांगण्यावरून नरेंद्रनी आपल्या भविष्यकाळाबद्दल वडिलांना विचारले , “ बाबा तुम्ही आमच्या साठी  काय ठेवले आहे?”  हा प्रश्न ऐकताच विश्वनाथबाबूंनी भिंतीवरच्या टांगलेल्या मोठ्या आरशाकडे बोट दाखवून म्हटलं, “ जा, त्या आरशात एकदा आपला चेहरा बघून घे, म्हणजे कळेल तुला, मी तुला काय दिले आहे”.  बुद्धीमान नरेंद्र काय समजायचं ते समजून गेला. मुलांना शिकविताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून विश्वनाथबाबू त्यांना कधीही झिडकारत नसत, की त्यांना कधी शिव्याशाप ही देत नसत.

आपल्या घरी येणार्‍या आणि तळ ठोकणार्‍या ऐदी आणि व्यसनी लोकांना वडील विनाकारण, फाजील आश्रय देतात म्हणून नरेंद्रला आवडत नसे. तो तक्रार करे. त्यावर नरेंद्रला जवळ घेऊन वडील म्हणत, “ आयुष्य किती दुखाचे आहे हे तुला नाही समजणार आत्ता, मोठा झाला की कळेल. हृदय पिळवटून टाकणार्‍या दु:खाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, जीवनातला भकासपणा थोडा वेळ का होईना विसरण्यासाठी हे लोक नशा करत असतात. हे सारे तुला जेंव्हा कळेल, तेंव्हा तू पण माझ्यासारखाच त्यांच्यावर दया केल्याखेरीज राहणार नाहीस”. 

समोरच्याचा दु:खाचा विचार करणार्‍या वडिलांबद्दल गाढ श्रद्धा नरेंद्रच्या मनात निर्माण झाली होती. मित्रांमध्ये तो मोठ्या अभिमानाने वडिलांचे भूषण सांगत असे. त्यामुळे, उद्धटपणा नाही, अहंकार नाही, उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असा भाव कधीच त्याच्या मनात नसायचा. वडीलधार्‍या माणसांचा अवमान करणे नरेंद्रला आवडत नसे. अशा प्रकारे नरेंद्रला घरात वळण लागलं होतं.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ? 

☆ अध्यात्म व विज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पुरातन देवळात  दर्शन घेण्यास का जावे ? (गल्ली बोळातील नाही)

अध्यात्म आणि सायन्स

देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.

देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.

सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक (good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.

त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.

आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.

1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो……..

ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.

जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..

2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे……

ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.

अ. कापूर जाळणे — दृष्टी

ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे… स्पर्श

क. मुर्तीवर फुले वाहणे…फुलांच्या अरोमामुळे वास.

क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.

हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.

ड. घंटानाद व मंत्रोच्चरण….ऐकणे.

अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.

मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..

पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.

मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..?

मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 2 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 2☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

पौषाचे काही दिवस आणि माघाचे काही दिवस घेऊन येतो फेब्रुवारी महिना. इंग्रजी कालगणनेतील वर्षाचा दुसरा महिना. बारा महिन्यांतील आकाराने सर्वात छोटा महिना. छोटा असला तरी एक मोठ काम त्याच्याकडे दिलं आहे. ते म्हणजे कालगणनेत सुसूत्रता आणण्याचे. दर तीन वर्षांनी येणारे ‘लीप इयर’ या महिन्यामुळेच साजरे होऊ शकते .

तीस आणि एकतीस तारीख बघण्याचे भाग्य फेब्रुवारीला लाभत नाही पण दर तीन वर्षांनी एकोणतीस तारीख या महिन्याला दर्शन देते आणि या दिवशी जन्मलेल्याना आपला खराखुरा वाढदिवस साजरा करण्याचे भाग्य लाभते.

अशा या फेब्रुवारी महिन्यात अनेक थोर व्यक्तींचा जन्म दिवस हा जयंती म्हणून साजरा केला जातो.  याच महिन्यात असते गणेश जयंती. हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवरायांची जयंती याच महिन्यात असते. तसेच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, संत रोहिदास, संत गाडगेबाबा, शेगावचे संत गजानन महाराज या सर्वांच्या जयंती समारोहांमुळे त्यांचे विचार, शिकवण यांचा विचार केला जातो. काही चांगले उपक्रम राबवले जातात. संत वाड्मयाचे वाचन होते.

माघ कृष्ण नवमी या दिवशी समर्थ रामदास स्वामी समाधीस्त झाले. हा दिवस दास नवमीचा. याच महिन्यात असते स्वा. सावरकर आणि वासुदेव बळवंत फडके या दोन क्रांतीकारकांची पुण्यतिथी. इतिहासातील क्रांतीकारक घटनांचे त्यानिमीत्ताने स्मरण होते. संतांची शिकवण आणि क्रांतिकारकांचे विचार आपल्या पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात.      

माघ शुद्ध सप्तमी हा दिवस  रथसप्तमीचा.  भारतीय परंपरेप्रमाणे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस मानला जातो. सूर्यनमस्काराचे महत्व लक्षात घेऊन  जागतिक सूर्यनमस्कार दिन याच दिवशी साजरा होतो.  या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात.   पारंपारिक उत्सवांबरोबर अशा उपक्रमांमुळे आधुनिक, विज्ञानवादी विचारांना  चालना मिळते.

माघ शुक्ल पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंत ऋतूचे आगमन झालेले असते. सृष्टीत वसंताचे वैभव फुलू लागलेले असते. या वसंताचे स्वागत करण्यासाठी वसंत पंचमी किंवा ऋषी पंचमी साजरी होते. या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे.

मराठीतील ज्येष्ठ कवी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त,  कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारीला असतो. हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या चळवळीला अधिक बळ प्राप्त होते.          

जोहान्स गटेनबर्ग या जर्मन लोहव्यावसायिकाने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली. चोवीस फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस.  त्यामुळे हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणूनसाजरा केला जातो.

थोर भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरामन् यांनी 28/02/1928  ला लावलेला शोध ‘रामन इफेक्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. समाजात विज्ञानरूची वाढावी व विज्ञानजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.

असा हा फेब्रुवारी महिना. धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक अशा सर्वच घटनांनी गजबजलेला महिना खूप लवकर संपला असं वाटतं. काळ मात्र पुढे ‘मार्च’करत असतो. येणा-या मार्च महिन्याच्या दिशेने !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print