मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

इतक्यात समर्थ श्लोक म्हणत, म्हणत आले. समर्थाचिया सेवका वक्र पाहे. असा भूमंडळी कोण आहे? जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही. उपेक्षिकदा रामदासाभिमानी.  निंदा करणारे लोकही, समर्थांचा जयजयकार करायला लागले. समर्थांनी वेणाबाईंच्या अंगावरुन काठी फिरवली.  वेणाबाईंचे आई-वडील “भिक्षा तरी घ्या,” असे म्हणत होते. तेव्हा समर्थ म्हणाले,” जी गोष्ट तुम्हाला नको ती मला द्या. उद्या चाफळला आम्ही वेणा बाईंना बरोबर घेऊन जाऊ.” दुसरे दिवशी सकाळी समर्थ, शिष्यगण यांच्यासह वेणाबाई  चाफळला निघाल्या.

सामाजिक जीवनातील कोंडमार्यातून त्या आता मुक्त झाल्या .चाफळ चे निसर्गसौंदर्य, मोकळी हवा, राम सीतेच्या चैतन्यमय मूर्ती, आणि पवित्र वातावरणाने  त्या  प्रसन्न आणि तृप्त झाल्या. चाफळला राहिलेल्या  आक्कास्वामी त्यांना मोठ्या बहिणी सारख्या होत्या. तेथे राहून दासबोधाचे अध्ययन, रामचरितमानस वाचण्यात त्या रंगून जायला लागल्या. त्या नंतर त्या स्वतःही काव्य करायला लागल्या. समर्थ सर्वत्र फिरता-फिरता जेव्हा चाफळला येत ,तेव्हा त्यांच्या निरूपण आणि कीर्तनात त्या तल्लीन होऊन जात असत. हळूहळू स्वतः काव्य करून रामासमोर कीर्तन करायला लागल्या. अनेकदा भिक्षाटनासाठी जाताना समर्थां बरोबर वेणाबाईही जात असत. त्यांची किर्तनाची कला पाहून, लोक प्रभावित होत असत. त्यांच्या रसाळ वाणीचे कीर्तन ऐकण्यासाठी ,वामनपंडितां सारखे विचारवंतही येत. आणि प्रशंसा करत. अनेकदा वीणा घेऊन वेणास्वामीच्यामागे उभे रहात असत. अनेकदा लोक आपले धार्मिक अध्यात्मिक प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तेव्हा वेणाबाई इतक्या चातुर्याने उत्तरं देत की स्वतः समर्थ ही खुष होत असत. एकदा काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट रामदासांशी तत्वज्ञान विषयक चर्चा करण्यासाठी पंढरपूरला आले. रामदासांनी वेणाबाईंना बोलावून घेतले .दासबोधाच्या सहाय्याने, एक विश्व तत्त्वाची कल्पना ,गागाभट्टांना स्पष्ट करून सांगण्याची वेणाबाईंना आज्ञा झाली .वेणाबाईंच्या  विद्वतप्रचुर विवेचनाने गागाभट्ट खुश झाले. आता त्या खऱ्या अर्थाने वेणास्वामी झाल्या. त्यांनी रचलेल्या एका पदात, शिवराज्याभिषेकाचे वर्णन आहे. त्यावरून शिवराज्याभिषेकाच्या त्या साक्षीदार होत्या असे म्हणता येईल .भक्त जन संत सज्जन। गोब्राम्हण प्रतिपाळाचे  करती स्तवन ।अनंत कोटी ब्रम्हांड भूपाळ जमले। वेणी सोहळा पाहती । (श्री वेणी कवन आणि पंचीकरण पद – 24 ).

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

वेणा सद्गुरुंचे स्मरण करीत रामायण, भागवत यांचे पारायण करीत राहिली. एके दिवशी समर्थ रामदास स्वामी कोल्हापूरला आले आहेत ,अशी बातमी समजली. वेणाला खूप आनंद झाला. घरातल्या मोठ्यांनी वेणाला माहेरी जाण्याच्या इच्छेला मान दिला .काही दिवसासाठी वेणा माहेरी गेली .आता ती वणाच्या वेणाबाई झाल्या होत्या. समर्थांची कीर्तने महालक्ष्मीच्या प्रांगणात होत होती. कीर्तन ऐकताना श्रोतृवृंद मुग्ध होऊन जात असे. गोपजी व राधिका दोघेही स्वामींचे शिष्य बनले होते. सकाळी समर्थ शिष्यां बरोबर मनाचे श्लोक  गात भिक्षेसाठी जात, तेव्हा गल्लीतील मुलेही जात. लेकीसुना भिक्षा देत असत. स्वामी सर्वांच्या ओळखी करून घेत. कीर्तनातून राम भक्ती, सदाचरण आणि आत्मविश्वासाचे बीजारोपण करत असत. कोल्हापुरात आल्यापासून वेणाबाई रोज कीर्तनाला जात. आणि पुढे बसत. एके दिवशी समर्थांनी तिला ओळखले. आपल्या कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी सांगितले की, सन्मार्गावर जात असताना, लोक निंदेस घाबरण्याचे कारण नाही. उत्तर रंगात त्यांनी भक्तशिरोमणी संत मीराबाई यांचे आख्यान लावले. सर्वजण ऐकण्यात तल्लीन झाले. किर्तन झाल्यावर वेणा बाईंनी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले. तत्वचर्चा सुरू झाली. रोज किर्तन झाल्यानंतर, प्रश्न-उत्तरे सुरु झाली .एके दिवशी तर चर्चा संपेना .रात्र संपून पहाट व्हायला लागली .समर्थांचे शिष्य आणि वेणाबाई तेवढेच राहिले. अखेर समर्थांनी वेणा बाईंना घरी जायला सांगितले.

व्हायचे तेच झाले.एकटी तरुण मुलगी रात्री उशीरा घरी येते अस म्हणून लोकांमधे कुजबुज सुरु झाली.लोक शंका कुशंका घेऊ लागले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लागले.घरोघरी चर्च्या व्हयला लागल्या.लोक वेणाबाईंच्या आई वडिलांना दोष द्यायला लागले.त्यांना धमक्या द्यायला लागले.निंदकांनी वेणाबाईंनाबदनाम करण्याचा निश्चय केला.वेणांनी आपले निर्दोषत्व अनेक परींनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण नाही.काही उपयोग झाला नाही. गोपजींवर लोक दडपण आणायला लागले. आणि अखेर “मीराबाई  प्रमाणे तूही विषाचा पेला पिऊन दाखव”अस म्हणून एक जण विषाचा पेला खरोखरच घेऊन आला. गोपजींनाही या बदनामीपेक्षा हिचे मरणे श्रेयस्कर वाटू लागले. वेणाबाईंनाही  खोट्या जगात रहाण्यापेक्षा परमेश्वरचरणी जाणे योग्य वाटायला लागले. त्यांनी श्रीरामाचे आणि स्वामी समर्थांचे स्मरण केले. हातात विषाचा पेला घेतला. रामनाम घेताघेता वीष पिऊन टाकले.

तास, दोन तास, तीन तास गेले. पण वेणाबाईंवर त्याचा काही परिणाम झाला नाही. फक्त कातडी काळी ठिक्कर पडली. आता लोकही घाबरले.”आमच्याकडून अपराध झाला आहे”असे म्हणून क्षमायाचना करु लागले. आई वडील तिला घरात आत घेऊन जायला लागले. पण तिने उत्तर दिले तुम्ही मला वीष दिलेत, तेव्हाच मी तुमची उरले नाही. तुमची वेणा मेली.आता  वीष पिऊन जिवंत झाली. ती आता प्रभू रामाची दासी झाली आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

“सूर्याच्या लेकी” हे नावच मुळी इतके समर्पक आहे की, सूर्याच्या तेजा प्रमाणे समाजात स्वत:च्या तेजाचा, ज्ञानाचा ,प्रकाश पसरविला आणि तोही अनंत हाल-अपेष्टा सहन करून! इतकेच नाही तर त्या तेजाचा समाजाला उपयोग करून दिला. भारतात अशा अनेक शूरवीर कर्तबगार आणि संत स्त्रिया होऊन गेल्या.

अशा अनेक स्त्रियांपैकी मला मनोमन भावल्या त्या समर्थ रामदास यांच्या शिष्या ‘संत वेणाबाई ‘त्याच ‘संत वेणास्वामी’. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या, कोल्हापुरात गोपजी देशपांडे गोसावी राहात होते. पुराणग्रंथ, तत्वज्ञान आणि ज्योतिषाचे ते ज्ञाते होते. श्री जगदंबा महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना एक कन्यारत्न झाले.(इ. स.१६२८) . तिचे नामकरण झाले ‘वेणा.’ वेणा दिसायला सुंदर तर होतीच, पण खेळात खूप रममाण होणारी होती. कोड कौतुक खूप होत होते. कुतुहल म्हणून यांनी कन्येची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत वैधव्य असा योग होता. आणि त्याचबरोबर अध्यात्मिक पातळीवर उच्च स्थान प्राप्तीचा योग होता. ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली नाही. ती जात्याच हुशार होती. त्यामुळे वडिलांनी तिला लिहायला वाचायला शिकविले .एकनाथांचे “भावार्थरामायण” “भागवत” ग्रंथ ही वाचायला लागली. घराण्यात राम भक्तीचा पूर होता. लहान असतानाच वेणा ‘अध्यात्मरामायण’ तोंडपाठ म्हणू लागली .राम भक्ती ही वेणाच्या रक्तात होती. आई बरोबर भजन, कीर्तन ऐकायला जात असे. या काळात समर्थ रामदासांचा संप्रदाय महाराष्ट्रात नुकताच उदयाला आला होता. तत्कालिन प्रथेप्रमाणे आठव्या वर्षी मिरज येथील चंदुरकर देशपांडे यांच्या एकुलत्या एक मुलाशी तिचे लग्न झाले. घर संपन्न होते.  ती माहेरी गेली.  आणि एके दिवशी सर्वजण जेवायला बसले होते ,आणि वेणाला  , मिरजेला बोलावल्याचा सांगावा आला. तिचे पती स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. हसण्या खेळण्याच्या वयात बाराव्या वर्षी वैधव्य आले. तत्कालीन सामाजिक पद्धतीनुसार केशवपन झाले. आणि ती अळवण (लाल लुगडे) नेसायला लागली. कोवळ्या वयातील अशा रूपातील वेणाचे चित्र डोळ्यासमोर आले की आपल्यालाही बेचैन होते.

तिने स्वतःला सावरले. धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात मन गुंतवू लागली .आपल्या सासरी ती राहात असे. सासरच्यांनीही तिला शिक्षणात मागे पडू दिले नाही. एकदा रामदासस्वामी भिक्षेसाठी दारात आले,” जय जय रघुवीर समर्थ”, तुंबा भर दूध मिळेल का? सासूबाईंनी आतूनच सांगितले. दूध आहे , पण ते मारुतीच्या अभिषेकासाठी ठेवले आहे. ठीक. म्हणून समर्थ निघून गेले. पण ही गोष्ट वेणाच्या मनाला लागून राहिली. एकदा ती घरातील कामे आटोपून, तुलसी वृंदावना  जवळ ‘एकनाथी भागवत, वाचत बसली असताना ,समर्थ रामदास भिक्षेसाठी दारात आले. वेणा वाचत बसलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला विचारले “मुली हे तुला समजते का “वेणाने उत्तर दिले,” समजत नाही ,समजून घेण्याचा प्रयत्न करते .मनात प्रश्न येतात. पण सांगणार कोण?” वेणाची तत्व जिज्ञासा पाहून समर्थांनी तिच्या शंका विचारल्या. 25 प्रश्न तिने विचारले. जीव आणि शिवा चे लक्षण ,आत्मा परमात्मा, मायेचे स्वरूप ,त्यावर सत्ता कोणाची, चैतन्य काय आहे? आद्याचे स्वरूप काय आहे? शून्य शून्य पण चैतन्य, जन्म मृत्यू आणि बद्धमुक्त कोण आहे? सगुण निर्गुण, ब्रह्म मार्ग कोण सांगेल? असे पंचवीस प्रश्न तिने विचारले. त्यानंतर समर्थांनी तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली .आणि वेणाला सांगितले की ,रोज हे वाचत रहा. तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. समर्थ स्वामी निघाले. त्यांना पहात राहिली. तिला सद्गुरु मिळाला.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-2 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-2 ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

क्रांतीतले अप्रकाशित तारे – रानी मां गायडिल्लू (Gaidinlue)

(वयाची उमेदीची चौदा पंधरा वर्षे त्यांना तुरूंगवा  सोसावा लागला.)…पुढे चालू

बाहेर आल्यानंतर रानी मां गायडिन्ल्यू यांचे आदिवासींसाठी कार्य जोमाने सुरू झाले. कारण धर्मांतरे थांबली नव्हतीच!! त्यांनी राजकीय क्रांती बरोबर सामाजिक, सांस्कृतिक चळवळींनाही प्राधान्य दिले. नागा आदिवासी  लोकांचे जीवन सुधारण्यासाठी रानीने जिवाचे रान केले. तिथल्या आदिवासींच्या जीवनात सुधारणा करण्यात रानी मां यांचा सिंहाचा वाटा आहे. तुम्ही सुद्धा हिंदू समाजाचेच घटक आहात हे त्यांनी आदिवासी नागांच्या ध्यानात आणून दिले.

त्या नंतर विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आल्या. वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे , रा.स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या भेटी रानी मां यांनी घेतल्या.त्यामुळे  त्यांच्या चळवळी खूपच जोरात चालू लागल्या.

 १७ फेब्रुवारी १९९३ रोजी रानी मां गायडिन्ल्यू यांचे देहावसान झाले. त्यानंतर १९९६ साली सरकारने त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ एक डाक तिकीट जारी केले. जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील एका रस्त्याला सन्मानाने ” रानी मां गायडिन्ल्यू पथ” असे नाव देण्यात आले आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या एका जहाजाला ही रानी मां यांचे नाव देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

 रानी मां गायडिन्ल्यू यांना १९७२  साली ताम्रपत्र फ्रीडम फायटर अॅवॉर्ड, १९८३ साली विवेकानंद सेवा अॅवॉर्ड, तसेच १९८२ साली * पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले आहे.

 २०१४ ते २०१५ हे वर्ष मणिपूर व नागालँड सरकारने त्याचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले. त्या वर्षाच्या समारोप समारंभाला भारताचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदींजी उपस्थित होते. त्यांनीच रानी गायडिन्ल्यू यांना नुसते रानी असे संबोधता  रानी मां गायडिन्ल्यू असे संबोधले.  तेव्हापासूनच त्यांना रानी मां असे म्हटले जाते.

 वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने २६ जानेवारी हा केवळ प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा न होता तो दिन आता ” नारी शक्ति दिन” म्हणूनही साजरा केला जातो.

 भारतीय स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये असे अनेक क्रांतिकारक आहेत की ज्यांची नावे अजूनही लोकांना माहीत नाहीत. त्यांचे कार्य  नि:संशय महानच आहे. त्यापैकीच एक रानी मां गायडिन्ल्यू  या आहेत.

 प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनाच्या दिवशी  वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने एक देशव्यापी कार्यक्रम आयोजित केला गेला. तो लाईव्ह पाहण्याचे भाग्य मला लाभले. आणि रानी मां गायडिन्ल्यू यांचे चरित्र थोडक्यात का होईना पण प्रत्येकाला समजले पाहिजे असे मला वाटले. म्हणून हा लेखनप्रपंच !!!

समाप्त

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! बॅलेन्टाईन डे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? बॅलेन्टाईन डे ! ?

“काय पंत, आज एकदम ठेवणीतला ड्रेस घालून स्वारीचे प्रस्थान कुठे ?”

“अरे आज आमच्या सिनियर सिटीझनचा ‘बॅलेंटाईन डे’ आहे बर.”

“तुमची काहीतरी गडबड होत्ये पंत, तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणायचं आहे का ?”

“उगाच नेहमी सारखा आगाऊ पणा नकोय, तो ‘व्हॅलेंटाईन डे’ तुमचा, आमचा ‘बॅलेंटाईन डेच’ आहे आज.”

“म्हणजे मी नाही समजलो?”

“अरे परवा लेल्याचा मुलगा आला US वरून आणि येतांना त्याने ‘बॅलेंटाईन स्कॉच’ आणली आहे आमच्या सिनियर सिटीझन ग्रुपसाठी.  मग लेले म्हणाला या सगळयांनी घरी शनिवारी संध्याकाळी, आपण आपला ‘बॅलेंटाईन डे’ साजरा करू.  म्हणून त्याच्याकडेच चाललोय.”

“Ok, एन्जॉय करा पण लेले काकूंना हे चालत ?”

“अरे नाही चालत, पण त्या गेल्यात पुण्याला, सत् संग करायला आणि तोच मोका साधून आमचे आज ‘बॅलेंटाईन डेच’ सेलेब्रेशन आहे.”

“पुण्याला आणि सत् संग करायला ?”

“का, पुण्याचे लोक सत् संग करत नाहीत ?”

“तसच काही नाही, पण आपल्या शिवाजी पार्कात कुठंही सत् संग चालत नाही की काय, उगाच एव्हढे त्यासाठी लांब पुण्याला कशाला जायला हवे ?”

“तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण त्यांचे माहेर पुण्याचे, उभे आयुष्य पुण्यात…. “

“गेले असेल, पण सत् संग तो  सत् संग, तो मुंबईत केला काय आणि पुण्यात केला…. “

“असे तुला वाटत, पण त्यांच मत थोडं वेगळे आहे.”

“यात कसलं आलं आहे मत, सत् संग सगळीकडे सारखाच असतो ना ?”

“अरे त्या इथे पण एक दोनदा

सत् संगाला गेल्या होत्या, पण त्यांच म्हणणं असं पडलं की इथल्या सत् संगाला पुण्याची सर नाही.”

“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो?”

“अरे ती एक पुण्याची मानसिकता आहे, आमच्याकडे जे जे आहे, मग ते काहीही असो, ते जगात कुठेच नाही आणि आपण मुंबईकर त्यांचा तो भ्रम दूर करू शकत नाही, एव्हढे बरीक खरे.”

“ते ही खरच आहे म्हणा.”

“आणि लेले काकू पुण्याला गेल्यात हे आमच्या दृष्टीने बरेच नाही का ? नाहीतर आम्ही आमचा ‘बॅलेन्टाईन डे’ कसा साजरा केला असता, काय बरोबर ना ?”

“Ok, एन्जॉय करा पंत, पण मला एक कळत नाही हे तुमच्या नातवाचे चांदीचे बोंडले कशाला घेतले आहे तुम्ही बरोबर ?”

“अरे आज आम्ही तेच पेग मेझर म्हणून वापरणार आहोत !”

“काय, चांदीचे बोंडले पेग मेझर म्हणून वापरणार तुम्ही ?”

“तुझी चेष्टा कळते बर मला, पण आता वय झाले. तुझ्या वयाचा होतो तेव्हा….. “

“ते तुम्ही मागे एकदा सांगितले होतं आणि माझ्या ते चांगल लक्षात आहे.  आत्ताच्या या तुमच्या पेग मेझरच काय ते…. “

“सांगतो, सांगतो.  मगाशीच मी तुला म्हटलं, लेले काकू मूळच्या पुण्याच्या, तर त्यांनी

पुण्याला जाताना, लेल्याने काही उद्योग करू नयेत म्हणून, पार्टीचा सगळा सरंजाम कपाटात ठेवून, चावी आपल्या बरोबर नेली आहे पुण्याला, अस मला लेल्यानेच  सकाळीच फोन करून कळवले, म्हणून हे…. “

“पण म्हणजे तुमची ‘बॅलेन्टाईन’ पण कपाटात…… “

“नाही नाही, ती आधीच जोशाच्या घरी सुखरूप आहे आणि जोश्या ती येतांना घेऊनच येणार आहे.”

“काय सॉलिड फिल्डिंग लावली आहे तुम्ही लोकांनी पार्टी साठी, मानलं तुम्हाला !”

“मानलंस ना, मग आता तू जा तुझ्या रस्त्याने आणि मी…. “

“जातो जातो, पण एक शंका आहे.”

“आता कसली शंका?”

“पेग मेझरच काम झाल, पण ग्लासचे काय, पाहिजे तर माझ्याकडचे….. “

“काचेचे अजिबात नको आणि तुझ्या कडचे नकोच नको, उगाच सगळीकडे बोंबाबोंब करशील.”

“मग काय द्रोणातून स्कॉच…. “

“उगाच वाटेल ते बडबडू नकोस, तेव्हढी अक्कल आहे आम्हाला.”

“पण मग ग्लासांचा प्रश्न… “

“आम्ही सोडवला आहे.”

“तो कसा काय पंत?”

“अरे असं बघ, आमच्या ग्रुप मधे बहुतेक सगळ्यांनाच डायबेटीस आहे आणि प्रत्येकाकडे जांभळाच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला लाकडी ग्लास आहे, त्यामुळे तो पण प्रश्न…. “

“निकाली लागला असंच ना ?”

“बरोबर ओळखलस !”

“पंत, म्हणजे पेग मेझर आणि ग्लासांचा प्रश्न तर सुटला, पण मग ही ‘बेनाड्रील सिरप’ची बाटली कशाला बरोबर घेतली आहे तुम्ही? “

“अरे सांगतो सांगतो, एकदा अशाच सेलेब्रेशनच्या वेळेला कुलकर्णीला एक पेग मध्येच झाली आणि सगळ्यांनी ठरवले की आता त्याला आणखी द्यायची नाही.”

“बर मग !”

“मग काय, पठया ऐकायला तयार नाही, आणखी पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. पण त्याची एक पेग नंतरची अवस्था बघून त्याला आणखी स्कॉच द्यायला कोणीच तयार नव्हतं.”

“पुढे”

“पुढे काय, जोश्यानेच अक्कल चालवून देतो, देतो म्हटलं आणि त्याचा ग्लास घेवून गेला किचन मधे आणि कपाटातली बेनाड्रीलची बाटली काढून ते चांगल अर्धा ग्लास भरून वर  पाणी टाकून ग्लास फुल करून दिला कुल्कर्ण्याच्या हातात, तेव्हा कुठे तो थंड झाला आणि आज पण कुलकर्णी पार्टीला आहे, म्हणून म्हटलं असावी एखादी बेनाड्रीलची बाटली इमर्जंसी म्हणून.”

“खरच धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना, मग येतोस का आम्हाला कंपनी द्यायला, बोल ? “

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-1 ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

? विविधा ? 

☆ क्रांतितले अप्रकाशित तारे – भाग-1 ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

क्रांतीतले अप्रकाशित तारे – रानी मां गायडिल्लू (Gaidinlue)

ब्रिटिश काळात इंग्रजांच्या अत्याचाराच्या विरोधात असंख्य क्रांतिकारकांनी देशासाठी लढे दिले. कित्येकांनी प्राणही गमाविले. त्या सर्वांचीच नावे प्रकाशात आली नाहीत.काही जणांचे बलिदान खूप गाजले. आजही त्यांची नावे अभिमानाने घेतली जातात. पण काही जणांनची नावे फक्त इतिहासालाच माहीत आहेत.त्यांचे कार्य खूपच महान आहे. पण त्याची कुणाला फारशी माहिती नाही. त्यांच्यापैकीच एक नाव आहे ” रानी मां गायडिन्ल्यू”.

या मणिपूर राज्यात तेमेलून जिल्ह्यातील ल्युंकाऊं या गावी जन्मल्या. जन्मतारीख होती २६ जानेवारी, १९१५. त्यांचे वडील लाॅथॅनाॅंग हे त्यांच्या राॅन्ग माई या समाजातील मोठे समाजसुधारक कार्यकर्ते होते. आई कारोटल्यू या अत्यंत धार्मिक, सात्विक अशा गृहिणी होत्या.या दांपत्याला आठ मुले मुली होत्या, त्यापैकी  रानी ही त्यांचे सातवे अपत्य होते.

पूर्वोत्तर राज्यातील राणी लक्ष्मीबाई म्हणून त्या नागा लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांना ” क्रांतीच्या वीरांगना”  म्हटले जाई. इंग्रजांविरुद्ध त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आंदोलनात सहभाग घेतला. कारण इंग्रज नागा लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची सक्ती करत होते. हे इंग्रज नागा लोकांवर अतोनात अत्याचार  करीत होते. त्यासाठी रानी मां गायडिन्ल्यू यांनी त्यांचा चुलत भाऊ हैपॉव जाडूनॉन्ग याने सुरू केलेल्या चळवळीत उडी घेतली. ही चळवळ Heraka Religious Movement म्हणून ओळखली जायची. ही धार्मिक स्वरूप असलेली चळवळ नंतर राजकीय स्वरूपात परिवर्तित झाली. त्यामुळे रानी मां ही प्रथम अध्यात्मिक नेता म्हणून ओळखली जायची ती आता राजकीय नेता बनली.

इंग्रज लोकांनी तिला  ” पूर्वोत्तर की आतंकवादी” म्हणून घोषित करून टाकले होते. तिला पकडण्यासाठी इंग्रजांनी प्रथम २०० रू. , नंतर ५०० रू. अशी बक्षिसे जाहीर केली. तरीही ती पकडली गेली नाही. म्हणून इंग्रज सरकार उदार झाले. त्यांनी साऱ्या विभागाचा कर रद्द करण्याची घोषणा केली होती.

वयाच्या सतराव्या वर्षी रानी मां गायडिन्ल्यू यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतला. आणि तिने Zeliangrong Three Tribe नावाच्या आर्मीची स्थापना केली. त्याचसाठी तिला. १९३२ साली इंग्रजांनी तुरूंगात डांबले. तिचा भाऊ, चळवळीतील सहकारी, नेता हैपॉव याला इंग्रजांनी १९३९ साली फाशीची शिक्षा दिली.

हरिपूर जेलमधून तिची  सुटका व्हावी म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्या अध्यक्षतेखाली काॅ॑ग्रेसने ठराव संमत केला. तरीही तिची सुटका झाली नाहीच. जेलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू तिला भेटायला गेले होते. त्यांनी ” नागाओंकी रानी”  असा तिचा गौरव केला. ते रानीपुढे नतमस्तक झाले. इंग्रजांनी सुनावलेली आजीवन कारावासाची शिक्षा ब्रिटिश देशातून जाईपर्यंत तिने भोगली.

तिचे कार्य झाशीच्या राणी इतकेच महान होते. ब्रिटिशांनी नागा लोकांचे जे हाल केले , त्यांना ख्रिश्चन बनण्यासाठी अत्याचार केले, त्याविरुद्ध ती मणिपूर, नागालँड च्या गावागावात फिरली.निरक्षर, अडाणी नागा आदिवासी हे ब्रिटिश ईसाईंचे लक्ष्य होते. ते वेगवेगळी आमिषे दाखवून त्यांना ख्रिश्चन बनवीत. त्याविरोधात रानी मां आदिवासी लोकांमध्ये जागृती करण्याचे काम करू लागली.

त्यासाठी तिने देवपूजा, भजन, कीर्तन ,या हिंदू पूजापाठ पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. आदिवासी लोकांमध्ये ती हिंदू धर्माविषयी जागृती, प्रेम निर्माण करू लागली.  तिने जुनी भजने लोकांमध्ये प्रसारित केली. तसेच नवी नवी भजने लिहायला ,गायला, शिकवायला सुरुवात केली. आणि जनजागृती करून लोकांना धर्मांतर करण्यापासून परावृत्त केले. रानी मां गायडिन्ल्यू फार शिकलेली नव्हती.पण तिच्या कार्याचा धडाका पाहून इंग्रज सरकार आणि ईसाई यांच्या छातीत मात्र धडकी भरत होती.

रानी मां गायडिन्ल्यू या Daughter of the Hills म्हणून नागालँड मणिपूर मध्ये सुप्रसिद्ध होत्या. त्या न घाबरता, न डगमगता नागांच्या हक्काकरिता ब्रिटिश सत्तेविरुद्ध सतत लढे देत राहिल्या. वयाची उमेदीची चौदा पंधरा वर्षे  त्यांना तुरूंगवास सोसावा लागला.

क्रमशः…

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भरताचे नाट्यशास्त्र ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ भरताचे नाट्यशास्त्र ☆ श्री अरविंद लिमये ☆

भरतमुनीनी लिहिलेला ‘नाट्यशास्र’ हा सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो.आज माघी पौर्णिमा.भरतमुनी जयंती ! या निमित्ताने त्यांच्या या ग्रंथाची ओझरती ओळख करुन देण्याचा हा प्रयत्न.जेणेकरुन जिज्ञासू रसिकांना या ग्रंथांवर अनेक अभ्यासकांनी लिहिलेल्या संशोधनात्मक ग्रंथसंपदेच्या माध्यमातून हा ग्रंथ समजून घेण्याबाबत उत्सुकता वाटावी.

या ग्रंथाचे लेखन भरतमुनींनी नेमके कधी केले हे ज्ञात नसले तरी त्यांचा कार्यकाल ख्रिस्तपूर्व चौथ्या किंवा पाचव्या शतकातला मानला जातो. याचाच अर्थ इसवीसनपूर्व काळापासून भारतवर्षात नाट्य,नृत्य,गायनादी कला प्रगतिशील स्तरावर पोचलेल्या होत्या हेच सिद्ध होते.

‘भरताचे नाट्यशास्त्र’ या ग्रंथात नाट्य,अभिनय याशिवाय नृत्य,गायन आदी पूरक कलांचे रंगमंचावरील सादरीकरणाचे शास्त्र व व्याकरणही सविस्तर समजून सांगितलेले आहे.या ग्रंथाची प्रत्यक्ष नाट्यप्रयोगासाठीची उपयोगिता तसेच या ग्रंथाची व्याप्तीही समजावी या हेतूने प्रातिनिधिक स्वरूपात त्यातील ‘अभिनय’ या अंगाचा इथे सविस्तर उहापोह करीत आहे.

या ग्रंथामधे ३६ अध्याय असून त्यातील आठव्या अध्यायात भरताने अभिनयाच्या चार प्रकारांची वैशिष्ट्ये विशद केलेली आहेत.हे चार प्रकार खालीलप्रमाणे-

१) आंगिक २) वाचिक ३)आहार्य व ४) सात्त्विक अभिनय.

आंगिक अभिनय – हा शरीराच्या माध्यमातून केलेला अभिनय. भरताने या ग्रंथात नाट्यधर्मीशैलीचा विचार करताना विविध अंग-उपांगांच्या हालचाली व मुद्रायुक्त रितीबद्ध हावभाव यांची सविस्तर ओळख करून दिलेली आहे.नाट्यधर्मीशैलीनुसार  हात,पाय,कंबर,छाती, मस्तक यासारख्या मुख्य अंगांच्या आणि बोटे,डोळे,नाक,गाल यासारख्या उपांगांच्या काही निश्चित आणि प्रतीकात्मक रितीबध्द चेष्टांची एक विशिष्ठ भाषाच तयार केली होती व  गद्यपद्यात्मक संवादातील व पात्रांच्या कृतीतील नेमका आशय  याच मर्यादित चेष्टांद्वारेच व्यक्त केला जायचा.

आंगिक अभिनयाचे मुखज,शरीर व चेष्टाकृत हे तीन प्रकार. यातील ‘मुखज’ म्हणजे चेहऱ्यावरील भुवया,पापण्या, डोळे, नाक, गाल, ओठ इत्यादी विविध उपांगांद्वारे केलेला अभिनय. ‘शरीर’ अभिनय म्हणजे खांदे,मान, हात, पाय यासारख्या मुख्यअंगाद्वारे केलेला अभिनय. आणि ‘चेष्टाकृत’ म्हणजे शरीर अवयवांच्या विविध हालचालींद्वारे केलेला अभिनय.

याशिवाय कोणती भूमिका साकारताना नटाने कसे चालावे, उठावे, बसावे इत्यादीबाबतचे नियमही नाट्यशास्त्रात सांगितले आहेत.उदा.- वृद्ध पात्र, तरुण पात्र, मध्यमवयीन,अपंग, दमून आलेले, दुःखी, आनंदाने भारलेले, अशा विविध पात्रांच्या मनोवस्था आणि स्थितीनुसार त्यांचे चालणे, उठणे, बसणे, यातील नेमके आणि सूक्ष्म फरक अभिनयाद्वारे दाखवणे अपेक्षित असते. तसेच वेड्या माणसाचा अभिनय करताना त्याचे अस्ताव्यस्त केस, कपडे याबरोबरच त्याचे डोळे, भुवया इत्यादीद्वारे होणारा मुखज अभिनय किंवा भरभर चालता चालता मधेच थबकणे,धपकन् बसणे, संतापणे, मधेच हसणे, यासारखे शरीर व चेष्टाकृत अभिनय याद्वारे त्याचे वेगळेपण अधोरेखित होणे अपेक्षित आहे.

आंगिक अभिनयाचं नेमकं सार भरतमुनींच्याच शब्दात सांगायचे झाले तर ते असे सांगता येईल.-‘ निरनिराळ्या वासाची फुले एकत्र करून माळी जशी फुलांची एक माळ तयार करतो त्याचप्रमाणे नटाने भिन्न भिन्न भावदर्शक अंगोपांगांची रचना करून त्याची सरस, सुंदर, सहज, स्वाभाविक आणि मनोहर दिसेल अशी भावमाला गुंफावी आणि ती प्रेक्षकांना प्रदान करुन आनंदित करावे.’

वाचिक अभिनय-नाटकातील गद्य पद्यात्मक संवाद, गद्य व संगीताद्वारे वाचेचा उपयोग करून प्रस्तुत करणे यास भरताने ‘वाचिक अभिनय’ असे संबोधले आहे. लेखकाच्या प्रत्येक शब्दातील व शब्दांमागील अर्थ जाणीवपूर्वक जपला पाहिजे यासाठी भरतमुनींनी शब्दांच्या खालील चार शक्ती सांगितलेल्या आहेत.

१) अभिदा शक्ती- शब्दांचा  साहित्यिक अर्थ स्पष्ट करणारी शक्ती.

२) लक्षणा शक्ती- शब्दात लपलेला अर्थ प्रकट करणारी.

३) व्यंजना शक्ती- शब्दांमधील सांकेतिक अर्थ प्रकट करणारी.      ४)तात्पर्य शक्ती- शब्दाचा हेतू प्रकट करणारी.

नटाच्या वाचिक अभिनयातून म्हणजेच संवादांमधील शब्दोच्चारातून या चार शक्तींचा प्रत्यय येणे आवश्यक आहे.

अशा या वाचिक अभिनयाच्या पायावरच आंगिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनय तोललेले आहेत. याचाच अर्थ अभिनयाच्या या इतर सर्व प्रकारांचा डोलारा वाचिक अभिनयाच्या पायावरच उभा असतो.                           आहार्य अभिनय नाटकातील पात्रे रंगमंचावर सादर करणाऱ्या  नटांना पात्रांचे रूप देणे व अभिनयासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे हे काम रंगतंत्राचे असते. तसेच दृश्यबंध

व अन्य मंचवस्तू नाटकातील अभिनयासाठी योग्य वातावरण निर्माण करतात. प्रकाश व ध्वनी संयोजनाद्वारे त्या वातावरणाला पूर्ण रूप प्राप्त होते. वेशभूषा व रंगभूषा नटाला पात्ररुप देतात. तथापि या कृत्रिम साधनांनी निर्माण केलेले वातावरण कृत्रिम नसून अस्सलच आहे असा आभास अभिनयाद्वारे निर्माण करणे ही नटाची जबाबदारी असते. अभिनयाच्या या अंगास  ‘आहार्य अभिनय ‘ असे म्हटले जाते.

सात्विक अभिनय पात्राच्या सत्त्वाशी संबंधित असलेल्या मानसिक प्रक्रिया आंगिक व वाचिक व आहार्य अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त करणे यास भरताने ‘सात्त्विक अभिनय’ ही संज्ञा दिली आहे.उदा.- कंठ दाटून येणे,डोळ्यात अश्रू येणे,स्तंभित होणे,रोमांचित होणे,शरीराला कंप सुटणे,इत्यादी.या सर्व प्रतिक्रिया नटाच्या अंतर्मनातून निर्माण होत असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या अभिनयास ‘सात्त्विक अभिनय’ असे म्हटले जाते.

भरताच्या नाट्यशास्त्रातील अभिनय या संकल्पनेचा हा ओझरता परिचय !

नाट्यशास्त्र या ग्रंथात भरतमुनीनी नाट्यास पूरक अशा नृत्यसंगितादी कलांचे शास्रही विदित केलेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये उगम झालेली ‘भरतनाट्यम्’ नृत्यशैली भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावरच आधारित आहे. भरतनाट्यम् नृत्याचे  सादरीकरण कर्नाटकी संगीताच्या साथीने होते. या नृत्य पद्धतीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे. तंजावर बंधू म्हणून मान्यता पावलेल्या संगीतकारांनी या नृत्याचा ‘मार्गम्’ रचला आणि त्याच क्रमाने आजही या नृत्याची प्रस्तुती करण्याची प्रथा आहे.

नाट्यनृत्यकलांचा भक्कम पाया असलेल्या ‘भरतमुनींचे नाट्यशास्त्र’ या ग्रंथाचे मोल म्हणूनच अमूल्य आहे.

भरतमुनी जयंती निमित्त त्यांचे हे लेखनरुपी स्मरण हीच त्यांना वाहिलेली माझी आदरांजली !???

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनातील अडगळीची खोली… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ मनातील अडगळीची खोली… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

मनातली अडगळीची खोली काय डोकावले आहे का कधी ह्या खोलीत… ?

प्रश्न जरा विचित्र वाटतो खरा, पण बघा जरा विचार करून शेवटचं कधी डोकावलं होत ते.

आपण आपल्या घरातल्या अडगळीच्या खोलीत अधून मधून डोकावत असतो. नेहमी नाही पण महिन्यातून एकदा तरी नक्की डोकावतो. एखादी वस्तू जी क्वचित लागते ती तिथे ठेवलेली असते ती आणायच्या कारणाने तरी, आणि नाहीच तर साठलेले धुळीचे थर झटकून खोली स्वच्छ करण्याच्या हेतूने तरी.

सगळं सामान, अर्थात बरचस नको असलेलं झटकून स्वच्छ पुसून नीट लावून ठेवतो. उगीचच सगळ्या वस्तूं वरुन हात फिरवतो, काही खास गोष्टींवर घातलेले कव्हर बाजूला सारून ते झटकून परत घालतो.

काय काय सापडत म्हणून सांगू. आरामखुर्ची, पेंड्युलमचे घड्याळ, कधी काळी शिवणकाम शिकलो आहे ह्याचा शिक्का मोरतब करणारे मशीन,एफेम रेडियो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला पाळणा, तीनचाकी सायकल जी आता कोणीही चालविणार नाही, पाटावरवंटा ज्यावर चटणी वाटण्यासाठी आपल्याकडे शक्तीही नाही, रॉकेल वरचे कंदील आता रॉकेल न का मिळेना, स्टोव्ह जो पेटवता सुद्धा येत नाही अशा एक ना अनेक वस्तू असतात.

परवा मी पण सहज माझ्या अडगळीच्या खोलीत गेले होते. तिथे धूळ झटकून खोली आवरताना एक खुर्ची सापडली ती पाहून मला माझ्या माळी काकांची आठवण झाली. परवाच ते मला विचारत होते, ताई एखादी खुर्ची असेल तर द्याल का? त्यांचे वडील आले होते गावाकडून आणि त्यांना खाली बसता येत नव्हतं. पटकन ती खुर्ची काढली झटकली आणि देण्यासाठी सज्ज केली. तेव्हाच ठरवलं अश्या वस्तू ज्या आपल्याला नको आहेत त्या आता ठेवायच्या नाहीत. ज्या चांगल्या आहेत त्या देऊन टाकायच्या. खराब झालेल्या टाकून द्यायच्या नाहीत तर भंगारात द्यायच्या.

हा विचार करत असतानाच मला असं वाटलं.. की माणूस नुसते अडगळीच्या खोलीतच अडगळ ठेवत नाही तर त्यापेक्षाही जास्त अडगळ मनात ठेवतो. ती साठवतो आणि त्याला खतपाणीही घालतो. त्या गाठोड्यात असतात अनेक गोष्टी जसे मान, अपमान,अपयश काही तुटलेली अपूर्ण राहिलेली स्वप्न, दुखावलेली दुरावलेली नाती, आपल्या मित्र मैत्रिणीशी झालेले भांडण, ते कोण मिटवणार म्हणून मनात असलेली अढी, अश्या एक ना अनेक गोष्टी. एका वर एक थर चढतच जातात, आणि नकळत त्याची अडगळीच्या खोली पेक्षाही जास्त मोठी खोली मनांत तयार होते.

तेव्हा ठरवलं घरात नको असलेल्या वस्तूंची खोलीच ठेवायची नाही. नको असलेल्या वस्तू ठेवायच्याच नाहीत, ना घरात आणि ना मनात. नको असलेल्या वस्तू देऊन मोकळं व्हायचं. सगळया गोष्टींचा कसा रोखठोक हिशोब ठेवायचा. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली नाही तर तिथल्या तिथे सांगून मोकळे व्हायचे. त्याचे व्याजावर व्याज चढवायचे नाही मनांत. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली म्हणून कुढत बसायचे नाही, धुळी सारखी झटकायची आणि पुढे जात रहायचे. अपयशाला गोंजारत बसायचे नाही तर त्याला यशाची पहिली पायरी समजून यश मिळे पर्यंत प्रयत्न करत रहायचे.

आज ह्या गोष्टी तुमच्या समोर मांडायच कारण आपण सगळेच जणं मनात खूप काही साठवून ठेवतो भूतकाळाला जास्त महत्त्व देऊन वर्तमान हरवून बसतो. तस नकरता वर्तमानात जगूया ह्या क्षणाचा आनंद घेऊया.

बघा आठवून तुम्ही शेवटचे कधी डोकावले होते मनातल्या खोलीत??

आज नक्की डोकावा नको असलेल्या साचलेल्या विचारांना काढून टाका, काही गैरसमज झाले असतिल तर त्या व्यक्तीशी बोलून दूर करा. कुढत बसू नका आणि सगळ्यात महत्वाचे विचार साठवून ठेवूच नका कोणापाशी तरी बोलून मन मोकळं करा. साठलेली धूळ आपोआपच निघून जाईल,एक स्वच्छंद, निरोगी मनाचे आयुष्य जगता येईल.

खुश रहा आनंदी जगा. ?

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ४ – बालमानस -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ४ – बालमानस -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मूल जस जसे मोठे होऊ लागते तसतसे कुटुंबात आणि भोवताली घडणार्‍या घटनांचे संस्कार  त्याच्यावर नकळत होत असतात. आजूबाजूला अशा घडणार्‍या अनेक छोट्या मोठ्या घटनांचे निरीक्षण केल्यामुळे, त्यातले बरे-वाईट काय आहे तेही कळायला लागते. लहान-मोठा, गरीब- श्रीमंत, अशा गोष्टीही समजायला लागतात.

अकरा बारा वर्षांच्या नरेंद्रची विचार शक्ति अशाच घटनांतून जागृत होत होती. वडील विश्वनाथ बाबूंकडे अनेक पक्षकार आपली कामे घेऊन येत असत. त्यावेळी हुक्का ओढण्याची प्रथा होती. गरिबांकडे चिलीम असे. घरी पक्षकारांसाठी एका मोठ्या खोलीत वेगवेगळे हुक्के ठेवलेले असत. स्वादांचे नव्हे, निरनिराळ्या जातींच्या पक्षकारांना निरनिराळे हुक्के . नरेंद्रला दिसले की एका जातीच्या पक्षकाराचा हुक्का दुसर्‍या जातीचा मनुष्य वापरत नाही. जातीचा निर्बंध मोडला तर काहीतरी भयंकर घडते आणि ते पाप असते. हे त्याच्या कानावर होतेच. असे काय घडते तरी काय ? असा प्रश्न नरेंद्रला होता. त्याने त्याचे उत्तर प्रत्यक्ष शोधण्याचा प्रयत्न केला.

त्या खोलीत कोणी नसताना त्याने जाऊन एकेक हुक्का ओढायला सुरुवात केली. त्याच्या मनात आले की आता काहीतरी भयंकर घडणार. मग दुसरा हुक्का, तिसरा, चौथा हुक्का झाला, पण भयंकर असे काहीच घडले नाही. तेव्हढ्यात विश्वनाथ खोलीत आले. “अरे तू इथे काय करतोस?” नरेंद्र ने संगितले, “एका जातीचा हुक्का दुसर्‍याने ओढू नये म्हणतात, पण मी तर सगळे ओढून पहिले, मला काहीच झाले नाही”.घडलेल्या प्रसंगाने वडिलांना नरेंद्र च्या जिज्ञासाचे कौतुक वाटले. ते मनातून सुखावले, हां हां असं होय म्हणून आपल्या खोलीत निघून गेले.

असे नरेंद्र ची प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ती समजून घेण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. स्वतंत्र विचार करण्याची शक्ति आणि आपल्याला योग्य वाटेल तेच करण्याची प्रवृत्ती असे विशेष गुण नरेंद्र मध्ये होते. त्याच्या या स्वतंत्र बुद्धीची चुणूक शाळेमध्ये शिक्षकांच्याही  ध्यानात येत असे.

 

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फॅमिली डॉक्टर…☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ फॅमिली डॉक्टर… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

‘काल रातीला सपान पडलं, सपनात आला त्यो…. न् बाई म्या गडबडले.’ व्हय आक्षी असंच झालं. दिसभर फिरून फिरून त्येलाच बघायचं मंग सपनात बी त्योच येनार की…. मनात असतंय त्येच सपनात दिसतंय असं म्हणत्यात..तर काय म्हनंत होतो म्या?

आमचा ‘फॅमिली डाक्टर’ आलता सपनात… दिसभर थोड्या थोड्या यळानं येतोय तो टीव्हीवर… त्यो आला की बाया बापड्या पोरं सोरं समदी सरसावून बसत्यात टीव्ही म्होरं.. जनु ‘राजेश खन्ना’च आला…. काय तरी नवीन सांगनार म्हनून आमीबी कान टवकारून बसतोय. तोबी लय भारी… काय बाय सांगत बसतोय. कल वायदा केलेली गोष्ट आज होनार नाही उद्याची गोष्ट उद्याच्याला बघू….असं सांगतोय. आम्हीबी एका कानानं ऐकतोय दुसऱ्या कानानं देतोय सोडून…. सोत्ता काय करणार आहे, त्येचा पाढा वाचतोय.आमानी ‘हे करा ते करा’ असं सांगून निघून जातोय.

त्येचा एक मोट्टा भाऊ आहे तिकडं दिल्लीत…. त्यो एकटाच खुर्चीत बसून समजून सांगतोय समद्यास्नी.पर आमचा डाक्टर माणसाळलेला…. माणसांच्या गराड्यात असतूया. फॅमिली डाक्टर हाय ना आमचा?… लोकं बी त्याला लई पिडत्यात. त्याला लई प्रश्न ईचारत्यात. पर लई शांत गडी… न चिडता त्याच त्याच प्रश्नांची परतून परतून तीच तीच उत्तरं देतुया. सारखं ‘नियम पाळा’असं म्हनतोय. औषधोपचार काय बी करत न्हाई. निस्ता कीर्तनावर जोर हाय त्येचा… लई बेस सांगतोय कीर्तन….अजिबात भ्यायाचं नाही. धीर सोडायचा नाही.भगवंताला शरण जायाचं.आम्ही तुमची येवस्था चोख लावनार हाय असं म्हणून आश्वासन देतोय.लई चांगला हाय सभावानं…

त्येचा दिल्लीचा भाऊ गळ्यात टेटसकूप घालतोय. ह्यो घालत नाही. पेशंटला हात दिखून लावत नाही. पर पेशंटची नाडी बराबर ओळखली हाय त्यांनं. लई प्रशिद्ध आहे तो! एकलाच हाय पेशल. त्याला बघितलं की दुखनं पार पळून जातंय.भारी इंग्लिश बोलतोय. एकदम त्येला आमी म्हनलं “कसली कसली विग्लिश नांव घेतायसा,आमच्या काय ध्यानात राहत नाही.तर त्यांनं आम्हाला अगदी सादं करुन सांगितलं… ‘रेमदेसिविर’ इंजेक्शनला रामदेव म्हणायचं *क्वारंटाईन’ला कोरांटी म्हणायचं. आपल्याला अर्थ समजला म्हणजे झालं. परीक्षा थोडीच द्यायची आहे.” असं म्हनला.

टीव्हीमंदी फोटू येऊ दे, म्हनून लई जनं तेच्या म्होर म्होरं करत्यात.तोंडाला ‘टोपी’ घालून काय  सांगतोय ते आमच्या समदं काय ध्यानात येत नाही. त्यो कायम कुनाइशयी तरी तक्रार करत असतोय. पन कुनाचा संशोय घेतोय ते आमालाबी कळत नाही.

‘दिसला ग बाई दिसला’ असं म्हनत त्याची वाट बघनारे त्येला बघून हरखतात. टीव्हीसमोर तोंडं आ वासून बसत्यात . आमच्याकडं बघूनशान आमच्या बापयास्नी डोक्यावरली टोपी तोंडावर घ्या म्हनून आणि आमाला नाकाला पदर लावाया सांगतोय….

आम्ही परवा त्याला म्हटलं,”आम्हाला लई भ्या वाटतंय…” तर हसला अन् म्हनला “काय भ्यायचं त्यात? गेला की रोग पळून…”त्यो तसं म्हनल्यावर आमच्या मनातलाबी रोग पळून गेला की वं …त्याला बघूनच निम्मं दुखनं कमी हुतय म्हना की!आमच्यातली एक धटिंगण परवा त्येला म्हनाली, “काय वं डाक्टर, तुम्ही आजारी पडत नाहीसा कवा? त्यो हसला जोरात.. एवढ्या जोरात हसला की वादळ आलं.आमी घाबरलो.

“अहो मी पण माणूसच आहे तुमच्या सारखा.आजारी पडणारच की! पण मी नियम पाळतो. केव्हातरी नियम तोडला आणि आला रोग भेटीला… तेव्हाच त्यानं माझ्या कानात सांगितलेलं गुपित मी तुम्हाला सांगतोय.”

‘मुस्कट बांधा’ हेच ते गुपित हुतं… खरंच ‘देव मानूस’ हाय आमचा डाक्टर… आरारारा…. देवमानसाची उपमा दिऊन चुकलो की रं देवा….. शिरीयल मधला’देवमानूस’ मर्डर केलाय म्हनं आज …जाऊ दे…. आपण आपल्या डाक्टरला निस्त ‘देव’ म्हनूया.पर ह्योच देव ‘ज्योतीष सांगनार, भविष्य सांगणार’ असं म्हनत येतोय रातच्याला आणि पुढली समदी संकटं आमच्या म्होरं सांडून पायात साप सोडतोय. म्हनून तर आमास्नी गडबडाया हुतंय, ह्यो सपनात आला म्हंजी… दुसऱ्या दिवशी त्येला ईचारलं की सपनात येऊन ते काय सांगून गेलासा? समदं खरं हाय काय? तर हसला गालांत जीब घालून… “स्वप्न तुम्ही पाहिलं ना? मग तुम्ही सांगा मी तुम्हाला काय म्हणालो ते?”आमानी काय समजलं याची परीक्षा बघत हुता जनू…. सपान आटवून आटवून आमच्याबी डोस्कीचा भुगा झाला.

“हां, दुसरी लाट का काय म्हनलासा, त्यात आमी वाऊन जाणार… बुरशीवानी काय तरी व्हऊन जीव जानार… तिसर्‍या लाटंत आमच्या पोरास्नी जपाय पाहिजे…. समदं खोटं ना? मी बी काय ईचाराया लागले तुमानी. सपान सपानच असतय नव्ह? पर तुमी जाता जाता एवढंबी म्हटलासा ‘मुस्कट बांधा’ मग यातलं तुम्हाला कायबी हुनार न्हई….. म्हनालासा नव्ह?” पुना एकवार गडगडाटी हसला त्यो……’चक्रीवादळ’आल्यागत वाटलं.

चार रोज कुठं त्यो आलाच न्हाई.बेपत्ताच हुता.आमी मुस्कट बांधत न्हाई म्हनून चिडला वाटतं… म्हनून आमी पटापट मुस्कट बांधलं आणि बसलो घरात.तर आला बघा दार ठोठावत.. तो काय बोलायच्या आतच आमी त्येला ईचारलं, “काय डाक्टर कुठं होतासा चार दीस? तिकडं चक्रीवादळ आलंत तिकडे गेलंतासा वाटतं…..

कवाबी न चिडणारा त्यो अचानक चिडला.”त्या वादळाचा आणि माझा काही संबंध नाही. त्या विषयाचा मी डॉक्टर नाही.त्याची माहिती तुम्हाला दुसरे डॉक्टर सांगतील. वाटल्यास मी त्यांचा पत्ता तुम्हाला देईन. एका वादळानंच अगोदर माझं डोकं गरगरायला लागलं ते दुसरं वादळ कशाला बघायला जाऊ मी?….”

वादळाचा फटका अमानी बी बसलाय… डोस्कं गरगराया लागलय आमचं बी… असं म्हणून आमीबी टीव्ही बंद करून टाकला. ईषय कट म्हणजे ईषय कट….हुश्श… रामा!  शिवा!! गोविंदा!!!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

jvilasjoshi@yahoo.co.in

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares