‘लता’ या अफाट कर्तृत्वाच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं अस्तित्व ही आपली श्रीमंती होती, अभिमान होता. रसिकांच्या हृदयात स्थान हे केवळ लिहिण्याची गोष्ट नाही तर प्रत्येकासाठीचं आनंददायी वास्तव होत.
कोणताही दुर्गुण वाईटच. पण त्यातही अहंकार अधिक बोचरा. काटेरी. अहंकारी व्यक्तीच्या सहवासात येणाऱ्या कुणालाच तो सुखावह नसतो. तो टोचणारा,अस्वस्थ करणाराच असतो. गंमत म्हणजे या अहंकाराचे काटे अहंकारी व्यक्तीला मात्र त्याचे मन बधीर केलेलं असावं तसे कधीच बोचत नसतात.अर्थात या बधिरतेमुळे ती बोच जाणवली नसली, तरी त्या अहंकाराचे दुष्परिणाम मात्र त्याला सोसावे लागतातच.
‘हा अहंकार नेमका येतो कुठून?’ हा वरवर गहन वाटणारा प्रश्न. पण अहंकार मुळात बाहेरून कुठून येत नसतोच. कुणीतरी ओवाळून टाकलेलं लिंबू ओलांडू नये असं म्हणतात.ते अनवधानाने जर कुणी ओलांडलं, तर त्याला ‘लागीर’ होतं असा एक (गैर)समज आहे. यालाच ‘बाहेरचं’ लागीर असं म्हणतात.तसंच अहंकाराला ‘आतलं’ लागीर म्हणता येईल.
सद्गुण आणि षडरिपू दोन्हीही प्रत्येकाच्या मनोभूमीत बीजरूपाने अस्तित्वात असतातच. आजूबाजूची परिस्थिती, संस्कार, विचार करायची पद्धत, यावर त्यातील सद्गुण अंकुरणार की षड् रिपू हे अवलंबून असतं. सुसंगत, घरचं आणि आजूबाजूचं आनंदी वातावरण, परस्पर-सामंजस्य, यामुळे विचारांनाही एक चांगलं वळण लागतं, जे सद्गुणांच्या जोपासणीला पूरक ठरतं.ती सकारात्मकता अर्थातच षड् रिपूंच्या वाढीला मारक ठरणारी असते.कुसंगत,आत्मकेंद्री विचार, स्वार्थ, संस्कारांचा अभाव, यासारख्या अनुकूल घटकांमुळे निर्माण होणारं वातावरण मात्र दुर्गूणांच्या वाढीस पोषक ठरतं.अशा वातावरणात षड् रिपूंपैकी ‘मद’ म्हणजेच गर्व स्वतः अंकुरतानाच अहंकारालाही स्वतःसोबत मिरवीत वाढू लागतो.
अनपेक्षित यश आनंददायी असतंच. सूज्ञ माणसं त्या आनंदाची क्षणभंगुरता जाणून असल्याने ते त्यात फार काळ तरंगत रहात नाहीत. त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवरच टिकून रहातात. अहंकारी माणसाला मात्र एवढंसं यशही पचवता येत नाही. आनंदाने बेभान झालेल्या त्याला मग स्वर्ग फक्त दोन बोटेच उरतो.
अहंकार कशाचाही असू शकतो.स्वतःच्या देखण्या रूपाचा, वडिलोपार्जित धनसंपत्तीचा, कार्यकर्तृत्त्वाचा, यशाचा,पद आणि प्रतिष्ठेचा, त्यामुळे मिळत असणार्या मान-मरातबाचा, सत्तेचा.. अगदी कशाचाही.अहंकार त्या व्यक्तीच्या दृष्टीने मारकच. अहंकार असेल तिथे समाधान राहूच शकत नाही.
माणूस खरंतर समाजप्रिय प्राणी.एकटेपण त्याला कधीच रुचत नसतं. माणसाच्या जगण्याचा परीघ लहान असो वा मोठा तो सच्चे मित्र, हितचिंतक, नाती-गोती यांनी समृद्ध असावा असंच प्रत्येकालाच वाटत असतं. अहंकारी व्यक्तीलासुद्धा ही अभिलाषा असतेच. पण त्याच्याच अहंकारीवृत्तीमुळे माणसे त्याच्यापासून नकळत दुरावत जातात. त्याच्याभोवती गर्दी नसते असे नाही, पण ती असते फक्त त्याचा अहंकार कुरवाळणाऱ्या ‘होयबां’चीच! त्यामुळे मनात आकारू लागलेला अहंकाराचा कांटा योग्यवेळी उपटून फेकून देण्याऐवजी, तोंड देखल्या स्तुतीने तो वाढतच जातो. आणि त्या क्षणापासूनच अहंकारी व्यक्तीची विनाशाकडे वाटचाल सुरु होते.
अहंकार म्हणजे अहंभाव नव्हे तर अहंभावाचा अतिरेक. अहंभाव भल्याबुऱ्या प्रत्येकाच्या मनात असतोच. आणि तो वाईट असण्याचा प्रश्नही नाही कारण तो ‘आपला’ चाॅईस नसतोच. ‘मी’ आणि ‘माझं’ याची जाण प्रत्येक माणसाला त्याच्या न कळत्या वयापासून नैसर्गिकरीत्याच असते.आपले आणि परके यातला फरक त्या वयापासूनच त्याला व्यक्त करता आला नाही तरी समजत असतोच. म्हणूनच आईला चिकटून बसलेल्या बाळाला जर गंमतीने कुणी ‘आई माझीs’ असं म्हटलं तर ते बाळ लगेच कावरंबावरं होत आपल्या बोबड्या बोलांनी ‘नाईsआई माजीs’ असं म्हणत ओठ काढून रडवेलं होतं. आई,बाबा,ताई, दादा,खेळणी,ठराविक दुपटं,वय वाढेल तसे स्वतःचे कपडे,गोष्टींची पुस्तकं, पांघरूण,खेळणी, वाटणीचा खाऊ हे सगळं मनोमन ‘माझं माझं’ म्हणून जपतच ते लहानाचं मोठं होत असतं. ‘मी’पणा, अहंभाव हा असा न कळत्या वयापासून आपला प्रत्येकाचाच स्थायीभाव असतो. हा अहंभाव हेच अहंकाराचे बीज! ते अंकुरलं,वाढत गेलं,तरच त्याचं अहंकारात रूपांतर होतं.आणि अर्थातच ते हानिकारक ठरतं.
ठराविक मर्यादेपर्यंतचा अहंभाव म्हणजे स्वाभिमान.तो मात्र व्यक्तिविशेष ठरणारा असतो. पण त्या पुढे होणारी अहंपणाची अतिरेकी वाढ स्वाभिमानाचे रूपांतर अहंकारात व्हायला कारणीभूत ठरते.
यापासून बचाव व्हावा म्हणूनच ‘अहंकाराचा वारा न लागो ‘ अशी प्रार्थना प्रत्येकानेच स्वत:साठी करायला हवी आणि त्यादिशेने प्रयत्नही !
अहंकाराची लागण न होण्यासाठी प्रत्येकाने जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. जगायचं का? कशासाठी?कसं? हा विचार करून प्रत्येकाने जगण्याचं प्रयोजन ठरवायला हवं.
जगणं म्हणजेच जीवन. मग ते येईल तसं, जमेल तसं जगायचं कि अट्टाहासाने फक्त स्वतःसाठी जगायचं ते व्यक्तिपरत्त्वेच ठरत असतं.
ज्याना जीवन खर्या अर्थाने कळलेले आहे ते आनंदासाठी जगत नसतात, तर आनंदाने जगत असतात. त्यांच्या प्रत्येक पावलावर, लहान-सहान गोष्टीतही त्यांना आनंद सापडत जातो. तो फार शोधावा लागतच नाही.न शोधताही सापडतो.
आनंद तर प्रत्येकाला हवाच असतो. पण प्रत्येकाच्या आनंदाची त्याच्या गुणात्मकते नुसार प्रतवारी मात्र ठरलेली असते.सगळ्यांचे सगळेच आनंद सारख्या प्रतीचे नसतात. आनंद क्षणभंगुरच असतात,पण त्या अत्यल्प काळातही ते मनाला रिझवून, समाधान पेरुन जातात. असे आनंद निर्भेळ असतात. कर्तव्यपूर्तीतून मिळणारा आनंद कृतार्थता देणार असतो. दुसर्याचं दुःख हलकं करून मिळणारा आनंद उदात्त असतो. दुसर्याच्या आनंदाने स्वतःही आनंदी होण्यातला आनंद दुसऱ्याचा आनंद द्विगुणित करणारा असतो.
आनंद कुठे कसा शोधायचा, मिळवायचा हे प्रत्येकाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. ज्यांना जीवन म्हणजे काय हे कळले आहे, ती वरवर सरळ साधी वाटणारी माणसंही जगताना स्वतःचा विचार करतात तसेच आपल्या सोबत असणाऱ्या इतरांचाही.
आत्मकेंद्री,अहंकारी माणसं मात्र फक्त स्वतःचाच विचार करीत आनंद मिळवायचा अट्टाहास करतात. त्यामुळे तो आनंद निर्भेळ नसतो.भेसळयुक्त असतो. वरवर पहाणार्याला जरी असा आत्मकेंद्री माणूस यशस्वी, श्रीमंत, सुखी-समाधानी वाटला तरी आतून तो एकलकोंडा, दुःखी,पोखरलेलाच असतो.
अहंकारी माणूस ‘जीवन म्हणजे काय हे न कळलेला’ या अर्थाने मला अज्ञ,अजाण वाटतो. कारण त्याचा विचार स्वतःपलिकडे कधी जाऊच शकत नाही.
जीवन कळलेल्या माणसाचं नेमकं जगणं कवीवर्य बा.भ. बोरकर यांनी त्यांच्या एका कवितेत अतिशय सुंदर रीतीने शब्दबद्ध केलेले आहे.त्या कवितेतली या मोजक्याच ओळीही मी अहंकारी माणसाला ‘अज्ञ’, ‘अजाण’ कां म्हणतो ते अधोरेखित करणारी आहे.
‘जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो ‘
असं असताना ‘मी’पणालाच कवटाळून बसणाऱ्या अहंकारी माणसाला ‘अज्ञ’च म्हणायला हवं ना?
“काय पंत, आज तुमच्या घरातून t v चा आवाज नाही आला सकाळ पासून !”
“अरे मोऱ्या वैताग आणला आहे नुसता या tv वाल्यांनी !”
“काय केबल गेली की काय तुमची पंत ?”
“अरे केबलला काय धाड भरल्ये मोऱ्या ? व्यवस्थित चालू आहेत सगळे चॅनेल्स !”
“पंत, मग तुमचा खास सखा सोबती आज मुका कसा काय बुवा ?”
“अरे काय सांगू तुला मोऱ्या, कुठलेही चॅनेल लावा सगळीकडे बजेट, बजेट आणि फक्त बजेट. दुसरा विषयच नाही या लेकांना. नुसता उच्छाद आणलाय सगळ्यांनी.”
“पंत, बजेट हाच सध्याचा एकमेव गरम विषय आहे आणि त्यावर हे चॅनेलवाले आपली पोळी भाजून घेत असतील तर त्यात नवल ते काय ?”
“तू म्हणतोस ते बरोबर आहे रे, पण ज्यांना “अर्थसंकल्प” हा शब्द सुद्धा नीट उच्चारता येत नाही, असे लोक वायफळ चर्चा करून आपल्याला अर्थकारण समजावणार ? “
“पंत सध्या दिवसच तसे आलेत, त्याला आपण तरी काय करणार ?”
“काय करणार म्हणजे, सरकारचा रिमोट जरी कुठूनही चालत असला, तरी आपल्या t v चा रिमोट आपल्या हातातच असतो ना ? मग ती वायफळ चर्चा ऐकण्यापेक्षा केला बंद t v. आता कसं शांत शांत वाटतंय !”
“पंत त्यात तुमचेच नुकसान नाही का?”
“माझे कसले बुवा त्यात नुकसान ? उलट आता बजेटच्या आधीच विजेचे दर वाढलेत, मग t v बंद करून मी एक प्रकारे पैशाची बचतच नाही का करतोय ?”
“अहो पंत, पण सरकारने कर सवलत किती दिली, काय स्वस्त होणार, काय महाग होणार हे तुम्हाला कसे कळेल ?”
“कसे म्हणजे, पेपर मधून, जो मी रोज सकाळी वाचायच्या आधी लंपास करून तूच वाचतोस, होय ना ?”
“काय पंत मी…. “
“अरे मस्करी केली मी तुझी. बर ते सगळे सोड, पण तुला माहीत आहे का, बजेट हा शब्द कुठून आला ते ? “
“नाही खरच माहीत नाही मला, कळायला लागल्या पासून अर्थसंकल्पाला इंग्रजी मधे बजेट म्हणतात एव्हढेच ठाऊक आहे.”
“तुला सांगतो मोऱ्या, अरे ‘बजेट’ या शब्दाची निर्मिती फ्रेंच शब्द ‘बुजेत’पासून झाली. या शब्दाचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. फ्रेंच मंडळी पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चामड्याच्या पिशवीचा पूर्वी वापर करत असतं आणि या पिशवीला ते ‘बुजेत’ म्हणत. बजेट हा शब्द प्रचलित होण्या मागे एक गमतीदार किस्सा आहे, बरं का मोऱ्या !”
“कोणता किस्सा पंत ?”
“मोऱ्या, १७३३ साली इंग्लंडचे माजी अर्थमंत्री, सर रॉबर्ट वॉलपोल वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांच्या संसदेत आले असतांना, त्यांनी स्वत:सोबत एक चामड्याची पिशवी देखील आणली होती. याच पिशवीत त्यांनी अर्थसंकल्पाचे कागदपत्र ठेवले होते. ती पिशवी उघडतांना त्यांनी ‘बुजेत इज ओपन’ असे म्हटले. परंतु ‘बुजेत’ हा शब्द त्यांनी अशा प्रकारे उच्चारला की सभागृहातील इतर मंडळींना तो ‘बजेट’ असा ऐकू आला आणि तेव्हा पासून जगभरात बजेट हाच शब्द प्रचलित झाला बघ !”
“पंत, फारच मनोरंजक आहे हा बजेट शब्दाचा इतिहास ! बजेट शब्दा बद्दल तुम्हाला इतकी माहिती आहे पण खऱ्या बजेट मध्ये तुम्हाला खरच इंटरेस्ट नाही याचेच जरा नवल….. “
“अरे मोऱ्या इंटरेस्ट असला काय आणि नसला काय, रोजच्या खर्चाची तोंडमिळवणी करणे भाग आहे ना ? आणि मला असे एक तरी उदाहरण सांग ना, की अमुक एका बजेट नंतर अमुक तमुक गोष्टींच्या किमती खाली आल्या म्हणून ?”
“तसच काही नाही पंत, काही काही गोष्टी खरच स्वस्त…… “
“होतात तात्पुरत्या, परत ये रे माझ्या मागल्या ! नंतर तुझ्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला त्याची सवय होवून जाते ! You know, public memory is very short.”
“हो, पण आपल्या बजेटची साऱ्या जगात चर्चा होते आणि…… “
“त्याचा जागतिक अर्थकारणावर परिणाम होतो वगैरे, वगैरे, असेच ना ? अरे पण म्हणून बजेट वाचतांना कविता वाचून आणि कथा सांगून कितीही साखरपेरणी केली, तरी प्रत्यक्ष महागाईचा सामना करतांना सामान्य माणसाचे तोंड कडवट होतेच, त्याचे काय ? “
“तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे पंत पण…… “
“पण बिण सगळे सोड, मला एक सांग, आपण कितीही संकल्प केले तरी आपल्या खिशातल्या अर्थाला ते झेपायला नकोत का? अरे आपल्या घरचे महिन्याचे बजेट सांभाळतांना घरच्या होम मिनिस्टरची काय हालत होते, हे तुला मी वेगळे सांगायची गरज आहे का ?”
“हो बरोबर पंत, या बाबतीत सगळ्याच होम मिनिस्टरना माझा सलाम ! महागाईचा कितीही भडका उडाला, तरी घरातले बजेट सांभाळणे त्याच जाणोत ! पंत पटल तुमच म्हणण.”
“पटल ना मोऱ्या, मग आता आमचा तू नेलेला आजचा पेपर आणून दे बरं मुकाट, कारण t v बंद केल्याने तोच आता माझा सखा सोबती !”
“तरी पण तुमच्या सारख्या सिनियर सिटीझनने “बुजेत” मध्ये इंटरेस्ट न दाखवणे मला नाही पटत पंत !”
“अरे त्यात न पटण्या सारखं काय आहे मोऱ्या ? सगळ्या बजेट मधे तेच तेच तर असत. एका हाताने दिल्या सारखे करायचे आणि दुसऱ्या मार्गाने दोन हातांनी वेगळ्याच नावाने काढून घ्यायच ! आता तो आकडयांचा खेळ नकोसा वाटायला लागलाय. अरे पूर्वी लाखावर किती शून्य सांगताना दमछाक व्हायची आणि बजेटचे सगळे आकडे लाख करोड मधे ! मग माझ्यासारख्या पामराचे काय होईल याची तू कल्पनाच केलेली बरी.”
“पंत, तरी पण माझा मुख्य प्रश्न उरतोच ना !”
“तू तसा ऐकण्यातला नाहीस ! तुला आता शेवटचे एकच सांगतो, निर्मल मनाच्या कुठल्याही रामाच्या सीतेने जरी अर्थसंकल्प मांडला, तरी त्याला त्या त्या वेळचे विरोधक नांव ठेवणार आणि त्या त्या वेळचे राज्यकर्ते मांडलेल्या बजेटची प्रशंसा करणार, हा आजपर्यंतचा इतिहास आणि अलिखित नियम आहे ! त्यामुळे बजेट चांगले का वाईट या फ़ंदात न पडता, घरातले “बुजेत” सांभाळणाऱ्या घरच्या लक्ष्मीला माझे शतशः प्रणाम !”
‘ए अग, मेकअप बॉक्स काय म्हणतेस ग,. माझं नाव ‘फणेरी’ किंवा ‘फणी करंड्याची पेटी’ असं आहे. माझं वय अंदाजे ९५ वर्ष. ?♀️. माझा जन्म गुहागर मधल्या एका खेड्यात झाला. खास फणसाच्या झाडापासून बनवलय हो मला ?आणि म्हणूनच इतकी वर्ष अडगळीत असूनही वाळवी शिवली सुद्धा नाही मला?. जुनं खोड ना मी?
एका कोकणकन्येच्या म्हणजे यमीच्या रुखवतावर ठेवण्यासाठी मी खास घडवले गेले हो…☺️
एक आयाताकृती भक्कम पेटी आहे मी. आतमध्ये दोन खण आहेत. एकात हस्तिदंती फणी, केस बांधायचे आगवळ ( म्हणजे रबर गो), आकडे, खोबरेल तेल असायचे अन दुसऱ्या खणात मेणाची डबी, पिंजर, आंबड्यावर लावायच मोत्याच फूल अन् अस काय काय असायचं बर..
पोरांनो आगवळ म्हणजे गोफ. अन् पूर्वी कपाळावर मेण लावून त्यावर गोलाकार पिंजर म्हणजे कुंकू लावायचे बर. तेव्हा ओल कुंकू अन् टिकली चा जन्म व्हायचा होता.
पेटीच्या झाकणाच्या आतल्या बाजूला छोटासा आरसा असायचा. झाकणाच्या खोबणीत बरोबर अडकवलेला होता तो.
तुम्हाला सांगते पूर्वीच्या बायका अहोरात्र काम करायच्या बरे. अगदी परकऱ्या पोरी देखील दिवसभर लुडबूडत काम शिकायच्या. भल्या पहाटे न्हाणीघरातून आल्या आल्या काय तो नट्टापट्टा. ते देखील काय तर भल्यामोठ्या केसांचा तेल लावून घट्ट अंबाडा बांधायचा अन् वर आवर्जून एक तरी फूल किवा वेणी माळायची. कपाळावर टप्पोर लाल कुंकू रेखायच अन् काय ते दागिने ल्यायचे. पावडरचा जन्म देखिल नव्हता हो झाला तेव्हा. तरी देखील माझी यमी साक्षात लक्ष्मी दिसायची हो.. मग तिची लेक आली, सून आली.
पण हो माझा वावर काय तो माजघरात होता बर. ओसरी, पडवी ठावूक नव्हती मला अन् यमीलाही.. ?
हळूहळू कालपरत्वे माजघरातील पैजणाची किणकिण ओसरीवर ऐकू येऊ लागली म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्त्रीस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले अन् मोठा आरसा, माझा शत्रूच म्हणा की, भिंतीवर विराजमान झाला. झालं तेव्हा पासून माझ्या अस्तित्वाला जणू उतरती कळा लागली. ?
माझा वापर कमी कमी होत मी कशी अन् कधी अडगळीच्या खोलीत गेले कळलच नाही हो. ?
गेल्या वर्षी अचानक माळ्यावर खूप गडबड चालू झाली. ? माझी यमी तर कधीच कालवश झाली होती. तिची सून, मुलगी पण वारल्या की पूर्वीच. मग कोण बर असेल. ?
अरे देवा भंगारवाला आलाय हो. ? माझा अंत जवळ आलाय कळून चुकलं होतं मला. साक्षात यमदेव दिसायला लागला समोर. मी डोळे मिटून राम म्हणणार तोच तिने मला भंगारवाल्याच्या हातून खेचून घेतलं.
” माझ्या पणजी ची पेटी आहे ही. ही नाही न्यायची, जुनं ते सोन,” असं म्हणून तिने मला जवळ घेतलं. तब्बल सहा दशकानंतर मला मानवी स्पर्श झाला आणि तोही माझ्या पणतीचा, गौरीचा.
गौराईने मला नाहू माखू घातले, रंगवले अन् नवा लूक दिला. मॉर्डन का काय म्हणतात ना तसा. अन् आश्चर्य म्हणजे आपल्या दिवाणखान्यात मानाचे स्थान दिले. ? आता मी तिच्या दिवाणखान्यात दिमाखात बसून तिच्या घरच्या किल्ल्या सांभाळते ? आहे की नाही माझी ऐट?.
एवढेच नाही तर माझे सगळे सवंगडी म्हणजे फिरकीचा तांब्या, हांडे, घागरी अन् पाट वगैरे पण खुश आहेत आता.
आम्हाला नवा लूक अन् स्टेटस मिळालं. अजून काय पाहिजे महाराजा या मॉडर्न युगात.?
चला तर मी तुमची रजा घेते. ?
माझा एखादा सवंगडी येईलच आता त्याचं मनोगत मांडायला. ??
सायोनारा…?
लेखिका :. गौरी गोरे दातार
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
१९८२-ची घटना.जानेवारी महिना; दुपारची वेळ,. मध्यप्रदेशातील राजनांदगांव स्टेशन. एक साधारण ३५शीतली बाई, खांद्याला पर्स कम बॅग,. आणि दोन्ही हातात कशीबशी सांभाळलेली, म्हणजे जरा कसरत करतच धरलेली सतार — अगदी छान गवसणी घातलेली, घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट बघत उभी होती. जरा कावरीबावरी, भिरभिरती नजर, चेहर्यावर पुर्ण बावळटपणा.
तेवढ्या धाडधाड करत गाडी आली.
काही मिनिटांचा हॉल्ट म्हणुन सगळा जामानिमा सांभाळत, फारसा विचार न करता., शिरली समोर येऊन थांबलेल्या डब्यात.
“बहेनजी रिझर्वेशनका डिब्बा है, आप अंदर नही आ सकती”.अशा येणाऱ्या सूचनांकडे सोईस्कर दुर्लक्ष केले.
ओळखलेत ना सख्यांनो, कोण होती ती महाभाग.अहो कोण काय? “अस्मादिक”. हो मीच.
अन् गाडी सुटली की हो लगेच.
चला. कुठला का डबा असेना,
गाडी तर मिळाली म्हणुन “हुश्श” केले.
हातातली सतार सांभाळत कसेबसे पुढे जाणार. डोळे वर केले तर समोर काळ्या कपड्यातला टी. सी. वाटले बाणासुर, भस्मासुर. भीमासुर, बकासुर कोणीही समोर उभा ठाकला असता तरी घाबरले नसते हो. कारण कृष्णसखा, भीम, अर्जुन यांचा धावा तरी करता आला असता मदतीसाठी.
पण आता कोणाचा धावा करु? चेहरा करता येईल तेवढा ओशाळवाणा केला.”चला आयते सावज समोर आले” या नजरेने टी.सी.महाराज माझ्याकडे नखशिखांत बघायला लागले.सीतामाईसारखी धरणी नसली तरी रेल्वे पोटात घेईल तर बरे असे वाटु लागले.
“बहेनजी, programme से आयी हो बंबईतक जाना है?.टिकेट दिखाओ, ये स्लीपर कोच है.आपका सीट नंबर?”
मनातल्या मनात “”अरे देवा. मुंबई कुठली? नागपूरपर्यंतचे साधे तिकीट आहे बाबा माझ्याकडे”.
पण आवंढा गिळत, मनात जुळवाजुळव करत, माझ्या फर्मास हिंदीमध्ये, “भाईसाब, वो क्या हुआ की, जल्दीसे, चुकीसे, सॉरी गलतीसे मैं जो सामने आया वो डब्बे मे चढ गई. मुझे नागपुरतकही जाना है. आप कहते हो तो अगले स्टेशनपर दुसरे डब्बे मे जाऊंगी”. माझा जरा सामोपचार.अगदी बिनशर्त.
टी.सी. “आप पहिली बार इस ट्रेनसे ट्रॅवल कर रही होंगी.नागपुरतक ये ट्रेन कोनसेही स्टेशनपे जादा देर रुकती नही.आपको फाईन देना होगा”.
हरे रामा. पुर्ण जर्नीच्या दीडपट–म्हणजे कलकत्ता-मुंबई तिकिटाच्या दीडपट.डोळ्यातुन पाणी यायचे तेवढे बाकी होते.
तेवढ्यात, तिथल्याच कंपार्टमेंट बसलेले एक वयस्कर गृहस्थ,”बेटी आप खैरागड –संगीत युनिव्हर्सिटी से आयी हो?”
क्षणाचाही विलंब न लावता मी “हां, हां, वहीसे”
“आप सितार बजाती हो.आओ.नागपुरतकही जाना है ना.४,५घंटेका सवाल.यहॉं बैठ सकती हो.”
अन् टी.सी. ला नागपुरपर्यंतच प्रश्ण आहे. आणि आता ही बाई एकटी कुठे जाईल. वगैरे सांगून मला बसायला परवानगी देण्यास अगदी मधुर शब्दात.अस्सल हिंदीचा लहेजा सांभाळत सांगितले. टी.सी.
“पंडितजी, आप करह तो इसलिये मै मानता हुं. बहेनजी बैठ सकती हो. मैं भी सितार बजाता हुं. चेकिंग करके आता हुं. आपसे बातचीत करनेके लिये.”
परत, धर्मसंकट. कारण, सतार काय साधे तुणतुणे ही मला वाजवायला येत नव्हते.
झाले काय होते. माझी नणंद खैरागडला रहात होती. तिचे मिस्टर त्या युनिव्हर्सिटीत तबल्याचे प्रोफेसर होते. त्यांचे नुकतेच अकाली निधन झाले होते. आणि तिला तिच्या मुलांना घेऊन लगेच कोल्हापुरला आणले होते. आणि तिथली क्वार्टर सोडायची म्हणुन तिचे सर्व सामान आणायला हे, मी आणि तिचे दीर गेलो होतो.
सर्व सामान २,३ दिवसात पॅक केले पण ट्रक वेळेवर न आल्याने त्या दोघांना सामान लोड करे पर्यंत तिथे थांबणे भाग होते. नागपुरला बहिणीकडे माझ्या लहान मुलीला ठेवले होते म्हणुन मी मिळेल त्या गाडीने निघाले होते.नणंदेची सतार मला माझ्याबरोबर आणल्याशिवाय पर्याय नव्हता.
आणि माझ्या हातातील सतारीने मी कोणीतरी सतारवादक आहे असा गैरसमज झाला होता.आणि आता तो तसाच ठेवणे माझ्यादृष्टीने आवश्यकच होते.
कारण त्या सतारीमुळेच पंडितजींनी मला बसायला जागा दिली.
पण–पण बसल्याबसल्या पंडितजींनी गायन- वादन यावर माझे बौध्दिकच घेतले.शास्त्रीय संगीताचा माझा संबंध फक्त सा रे ग म —सरगमपुरताच.
बागेश्री, भीमपलास, मियाकी तोडी, जयजयवंती सगळे मला सारखेच.
काळी पाच, का काय ते ही मला माहित नाही. हिंदी बोलणे ही अगदी अफलातुन. पण पंडितजी खुप गप्पिष्ट. त्यात भर म्हणजे दिल्या शब्दाला जागुन टी. सी. महाशय ही
बातचीत करायला येऊन बसले. तेही संगीतातले दर्दी.
आणि मी ही तज्ञ(?) म्हणुन मलाही गप्पात सामिल करुन घेत होते.
कुठेतरी, काहीतरी जुजबी वाचलेले, ऐकलेले, आणि आठवणीत असलेले अधूनमधून बोलुन “हां भाईसाब, आप सही कहते हो.” “वा क्या बात है”
वगैरे वाक्ये फेकत, अस्तित्वात नसलेल्या गुरूचे, कधीही न केलेल्या मैफिलींचे – खोटे वाटणार नाही इतपत वर्णन करत – थापा मारत खिंड लढवत होते खरी. पण मनातल्या मनात कधी हसत , कधी घाबरत नागपुर लवकर येवो ही प्रार्थना करत होते.
कसाबसा प्रवास संपवला.
आणि घरी आल्यावर मात्र बहिण, मेहुणे, भाचे कंपनीला सर्वच किस्सा रंगवून सांगितला. आणि नंतरही जे भेटेल त्याला माझी कलाकारी सांगत होते,.
गायन -वादनातली नसेना का पण अभिनयातील औटघटकेची कलाकार म्हणुन यशस्वी ठरले.
☆ विचार–पुष्प – भाग ३ – बालमानस -१ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.
एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.
आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.]
लहान मुलांचे मानसशास्त्र हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. बाल वयात ते आपले आई वडील,
घरातील लहान मोठे आणि संपर्कातील माणसे यांचे निरिक्षण करीत असतात. ते काय बोलतात ते
नीट ऐकून मनात साठवत असतात. ते मूल जिज्ञासू असेल तर विचारायलाच नको. कारण या
बालवयात होणारे संस्कार त्याला आयुष्यभर पुरत असतात.
नरेंद्र असाच सर्वांपेक्षा वेगळा. त्याला प्रत्येक गोष्टींचे कुतूहल असे. दुपारच्या वेळी कुटुंबातल्या सर्व स्त्रिया एकत्र जमून रामायण महाभारताचे वाचन करीत असत. त्या कथा नरेंद्रला फार आवडत, रामायणाच्या तर विशेष आवडत. श्रीराम आणि सीता यांच्या विषयी तर नरेंद्रच्या मनात अपार श्रद्धा व भक्ति उत्पन्न झाली होती. एव्हढी की त्यांच्या मूर्ति आणून त्याने खोलीत ठेवल्या आणि त्याची रोज पुजा पण होऊ लागली. एकदा राम कथेच्या कीर्तनात त्याने ऐकले की हनुमंत केळीच्या वनात असतो. त्या बालबुद्धीला खरेच वाटले. कीर्तनकारांना त्याने विचारले, की मला हनुमंत त्या वनात भेटेल का ? कीर्तनकाराने समजूत काढायची म्हणून, हो म्हटले. आणि नरेंद्र हनुमंताला भेटण्यासाठी त्या केळीच्या वनात गेला, खूप वेळ बसला तरी त्याची भेट झाली नाही. निराश होऊन तो परत आला आणि आईला संगितले .आईने “ प्रभु रामाचंद्राने काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून तो तिकडे गेला असणार अस सांगून बालमनाची समजूत काढली खरी. आणखी एकदा असाच अनुभव त्याला आला.
त्यांच्याकडे नोकर चाकर होते ते अदबीने वागत बोलत. प्रेमळ होते ते. त्यांच्या मुलांशी गप्पा ही होत असत. एकदा नरेंद्रशी बोलत असताना एका नोकराने म्हटले, “विवाह किती वाईट गोष्ट आहे” तर प्रपंचत किती कटू अनुभव येतात तेही त्याने नरेंद्रला संगितले. या बोलण्याचा नरेंद्रवर इतका खोलवर परिणाम झाला की त्याल वाटले, राम आणि सीता या देवतांना आपण मानतो. पण त्यांचा विवाह झाला आहे आणि त्या क्षणीच प्रभू रामचंद्र नरेंद्रच्या मनातून उतरले, त्याने आईकडे धावत जाऊन हे संगितले. पण ती माऊली या बालमानला काय समजवणार? भुवनेश्वरी देवी म्हणल्या. “तू असं कर, श्रीरामांच्या ऐवजी शिवाची पुजा कर. हे म्हणणे पटले. अर्थातच नरेंद्रला हे माहिती नसावे की शिव पार्वती यांचा ही विवाह झालेला आहे म्हणून. त्या बालबुद्धीने लगेच वर खोलीत जाऊन राम -सीतेच्या मूर्ति काढून टाकल्या आणि शिवाची मूर्ती आणून त्याची स्थापना केली. मोठा होई पर्यन्त शिवाची पुजा चालू होती.
असे घडत असते बालमन. बालवयात मुलांना घडवताना त्यांची जिज्ञासा, त्यांचे कुतूहल पूर्ण करताना आईवडिलांनी आणि मोठ्यांनी खूप विचार पूर्वक उत्तरे दिली पाहिजेत. आपण स्वताही वागताना नीट काळजी घेतली पाहिजे.
खरं म्हणजे आपण जाणीवेत नेणीवेत सतत मनाबरोबरच असतो की ..क्षणोक्षणी आपण काही ना काही मनात कोंबतच असतो.आणि आयुष्याच्या इतक्या वर्षात कितीतरी मनाच्या आत साठलेलं असणार..ते डोकावून बघायचं ठरवलं तर मनाला दार हवच. जे हवं तेव्हां उघडता येईल आणि हवे तेव्हां कुलुप लावुन बंदही करता येईल….
मनाचे दार उघडेन अन् पाहीन त्यातला पसारा..
इतक्या वर्षाची अडगळ साठली असणार तिथे..
दार उघडुन जेव्हां मी मनात शिरेन ना तेव्हां मनाचे सगळे कप्पे उघडतील.. त्या कप्याकप्प्यात साठलं गेलेलं कितीतरी पाहता येईल…
काहीमधे असतील फुलपांखरं..नाचणारी बागडणारी फुलाफुलातला मध गोळा करणारी .ती ठेवेन जपुन..
पण काही कप्प्यांत खूपच कचरा असेल..वेदना दु:खं वियोग नकार फसवणुक अपमान विश्वासघात पराभव अपयश… निंदा भांडणं ..नको .नकोच ते बघायला.सगळं उपसायला हवं. कशाला बाळगायचं..?मनाचा हा खण साफ करेन.
सगळं फेकुन देईन. कल्पनेतही किती मोकळं स्वच्छ वाटायला लागल,..!!
काही मनाचे खण मात्र हुरहुर लावणारे असतील..
त्यात अनेक तुटलेली दुरावलेली रेंगाळत राहणारी किंवा नव्याने झालेली नाती असतील…
पण काहीसांठी घेईन प्रेमाचा धागा,मैत्रीची सुई अन् घालीन टाके छान जोडण्यासाठी.. आणि ठेवेन नीटनेटकी रचून.. नव्या नात्यांना मुरायला थोडा वेळ हवा म्हणून ती राहू देईन.
तरिही मनाचं कपाट भरलेलच असणार. काही कप्पे विनोदाने हास्याने ओसंडत असतील. प्रेम वात्स्यल कौतुक असं छान छान दिसेल. मनाचं दार उघडलं ना की मी प्रथम हेच डोळेभरुन पाहुन घेईन. ताजतवानं शुद्ध वाटेल… पण तिथे रिकामे कोनाडेही असतील ना?
ईथून पुढे त्यांची मात्र काळजी घेईन. सदा स्वच्छ ठेवेन.
नसता कचरा होउच देणार नाही…
असा विचार करत असताना ,मनाला दार असते तर याची कल्पना करत असताना चटकन् ध्यानात आले, अरे! मनाला दार असतेच की..ते उघडण्याची किल्ली सुद्धा आहे आपल्याकडे.. पण आपणच कधी मनाचे दार ऊघडण्याची, त्यात डोकावण्याची तसदीच घेत नाही..
लतादीदी कधी परक्या वाटल्याच नाहीत… आपलीच लता मंगेशकर… खूप आदर, पण त्याहीपेक्षा आपुलकी जास्त, प्रेम उदंड…देवाला आपण “अहो” म्हणतो का ? हा गणपती, हा मारूती, ही महालक्ष्मी,ही सरस्वती….तशी ही आपली लता !..”मंगल प्रभात” पासून “आपली आवड” पर्यंत.”आपहीके गीत” पासून “बिनाका गीतमाला”, विविध भारतीच्या विविध कार्यक्रमात दिदींचं गाणं नाही असं झालंच नाही.
सर्व बारा स्वर (७+५), दिदीच्या कंठात येण्यास उत्सुक असायचे..ताल दिदीच्या स्वरांना साथ द्यायला आतुर असायचे….
शब्द कोणत्याही गीतकाराचे असो.. गदिमा,जगदीश खेबुडकर, आनंद बक्षी, साहिर लुधियानवी, संतोष आनंद, शकील बदायुनी इ.इ. असे अनेक गीतकार,त्यांच्या शब्दांना न्याय देण्याचं दिदींचं कसब अद्भुत होतं… गाण्यांचा पहिला आलाप जणू गाण्यातील स्वरांना आणि शब्दांना हळुवारपणे सतर्क करायचा..मग स्वरांनी मढविलेले सर्व शब्द एकामागून एक शिस्तीत यायचे… प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या रेडिओ स्टेशनवर दिदींचं गाणं चालू असायचं….
सैगल पासून शैलेंद्रसिंग पर्यंत आमच्या पिढीने दिदींबरोबर द्वंद गीत ऐकली आहेत…. नव्या गायकांना दिदींनी उत्तेजन दिले आहे… लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकाराची प्रतिभा ओळखून दिदींनी त्यांना उत्तेजन दिले.. आणि त्यांच्या रूपाने एक “मोस्ट मेलडियस” संगीतकार चित्रपट सृष्टीला मिळाला. दिदींची सर्वात जास्त चित्रपटगीते या जोडगोळी बरोबर आहेत.शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, नौशाद,कल्याणजीआनंदजी,रवि,दत्ताडावजेकर, सी.रामचंद्र, रोशन, एस्.डी., आर्.डी.बर्मन, राम कदम
अशा अनेक संगीतकारांची दिदींच्या आवाजातील गाणी आमच्या पिढीने ऐकली.दिदींचं गाणं ऐकलं की ते आवडतच व्हायचं….मी गाणी ऐकायला लागल्यापासून दिदींचा अनेकांप्रमाणे चाहता आहे.. एक छान आठवण.. आळंदीच्या आ.भा. साहित्य संमेलनला मी निमंत्रित कवी होतो.तेथे सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके संमेलनाध्यक्ष होत्या त्यांची माझी तोंडओळख होती.शांताबाईसोबत दिदी आल्या होत्या.संधी मिळाल्याबरोबर मी शांताबाईना आणि दिदीना भेटलो.वाकून नमस्कार केला….एक शब्दप्रभू, एक स्वरलता…. तो आयुष्यातील अत्युच्च क्षण !
आक्टोबर १९८१ ला मला दिदींचे स्वतःच्या लेटरहेड वर स्वहस्ताक्षरात पत्र आले आहे.
उद्या त्याचा फोटो पोस्ट करीत आहे.आता मी नि:शब्द झालोय.
गीतकारांच्या लेखण्या अश्रू ढाळताहेत..स्वर पोरके झाले आहेत…वाद्ये मूक झाली आहेत.
“लता”हा शब्द उलटा वाचला तरी “ताल” होतो, ते ताल “बेताल” होऊ लागलेत.. किशोरदांनी एकदा दिदींना विचारले ,”मेरा कौनसा गाना आपको सबसे अच्छा लगा ? “दिदींनी विचारले, “बोलके सुनाऊं या गा कर ?” किशोरदा बोलले “गा कर”दिदींनी आपल्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून किशोदांना एक कैसेट दिली.त्यात दादींचं किशोरदांनी गायलेलं आवडतं गीत होतं..”ये जीवन है,इस जीवनका” एल्.पींचं..”पिया का घर”मधलं.. एकांतात किशोरदां हे गाणं अनेकदा ऐकत होते.
शेवटी मला वाटतं देवलोकात गंधर्वांना आणखी संगीत शिकायचय्, भगवान विष्णूंना आपला आवडता राग “हिंडोल”
दिदींकडूनच ऐकायचा आहे, श्री महादेवांना मालकंस ऐकायचाय आणि ब्रम्हदेव-सरस्वतीना वीणेची साथ करायची म्हणून त्यांनी दिदींना वर बोलावून घेतलय्.
दिदी, तुम्ही आम्हाला वचन दिलंय “रहे ना रहे हम महका करेंगे,बनके कली बनके समा बावजे वफामें..”दिदी, तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर घेऊन जाऊ शकत नाही.
मृत्यु हेही एक सत्यच…आणि लताच्या असंख्य चाहत्यांनी ते कसे पचवावे…?
मनावर गारुड घालणारा, मंत्रमुग्ध करणारा तो दैवी सूर हरपला असे तरी कसे म्हणणार..
तो अमर आहे..तो रसिकांच्या मनात सतत रुंजी घालत राहणार…
एक युग संपलं..
एकच सूर्य ,एकच चंद्र एकच लता हेच सत्य…
भारत रत्न लता..
गानसम्राज्ञी लता..
संगीतसृष्टीतला मुकुट लता..
शान भारताची..
आवाज भारताचा..
सदा बहार ..सदा तरुण..
ॐ नैनं छिन्दन्ती शस्त्राणि।
नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो।
न शोषयति मारुत:।।
लतादीदींचा सूर असाच अमर आहे…
शतकातून असा एखादाच कलाकार जन्माला येतो..
माणूस म्हणून त्यांचं व्यक्तीमत्व भारावून टाकणारं होतं..
१९२९ ते २०२२ हा त्यांचा जीवनकाल..
जवळजवळ सहा दशके त्यांनी त्यांच्या सूरांनी
राज्य केले..अनेक पिढ्यांना आनंद दिला..
त्या सूराला कुठला मजहब नव्हता.धर्म नव्हता.
वंश वर्ण जात नव्हती …तो फक्त इश्वराचा सूर होता…
त्यांनी चित्रपट विश्वातील स्थित्यंतरे पाहिली.
पण चित्रपटाच्या पल्याड ,भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत हे त्यांचं स्वप्नं होतं…
२८ सप्टेंबर १९२९ हा त्यांचा जन्मदिन.
मास्टर दीनानाथ मंगेशकर या महान नाट्य गीत गायकाची ज्येष्ठ कन्या..
कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेलात…
हा कल्पवृक्ष खरोखरच लतादीदींच्या गाण्याने बहरला ..फुलला..विस्तारला…
३६ हून अधिक भाषांमधून त्या गायल्या..
अनेक रस रंग अभिनयाची गाणी त्यांच्या कंठातून रुणझुणली… त्यांच्या गायनातून शब्द भाव अक्षरश: ऊर्जीत होत…
अनिल विश्वास, शंकर जयकिशन, एस डी बर्मन सलील चौधरी, सी रामचंद्र ए आर रहेमान, सुधीर फडके..
अशा अनेक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले… तीस हजाराहून अधिक गाणी त्यांनी गायली..
आनंदघन या माध्यमातून त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले.साधी माणसं या मराठी चित्रपटातली त्यांची गाणी अत्यंत गाजली.आजही अगदी आजची संगीतप्रेमी मुलं त्यांची गाणी
अभ्यासून गातात..
पार्श्वगायिका ही त्यांची जागतिक ओळख असली तरी त्यांनी १९४२ साली एका चित्रपटात लहानशी भूमिकाही केली होती..
लता मंगेशकर म्हणजे सात लखलखती अक्षरे.
या सप्त सूरांची जादू किती खोलवर रुजलेली आहे..
प्रेमस्वरुप आई.. हे माधव ज्युलीअनचं गीत लताने भावभावनांसहित मूर्तीमंत ऊभे केले आहे..त्यातील शेवटच्या ओळी ,घे जन्म तू फिरोनी येईन मी पोटी..या शब्दातली हताशता व्याकुळता त्यांच्या गाण्यातून तितक्याच तीव्रतेने जाणवते..शब्दोच्चार, त्यातला लगाव यातलं विलक्षण मिश्रण त्यांच्या गाण्यात जाणवतं.
त्यामुळेच त्यांच्या गाण्याशी, आवाजाशी कुणाची तुलनाच होऊ शकत नाही…
जरासी आहट होती है
तो दिल सोचता है
कही ये वो तो नही
कही ये वो तो नही…
कारुण्याने आणि भावनाने ओथंबलेले हे लतादीदींचे सूर जेव्हांजेव्हां कानावर पडतात तेव्हा तेव्हा देहावर कंपने जाणवतात…
लता एक महासागर आहे…असंख्य स्वर मोत्यांचा..वेचता किती वेचावा..
☆ मनाला दाह देणारे दृश्य ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
मी आज सकाळी सायकलींगला बाहेर पडले होते. काही अंतर गेल्यावर मी जे दृश्य पाहिल त्यांनी माझ्या मनाला असंख्य वेदना झाल्या, डोळ्यातून नकळत पाणी वाहू लागले. शब्दांच्या पलीकडले असंख्य यातना देणारे दृश्य होते ते.
एक आई आपल्या काही महिन्यांच्या तान्हुल्याला कडेवर घेऊन तर काही वर्षांच्या आपल्या दोन लेकरां सह कचराकुंडीत काही अन्न मिळतंय का ते पहात होती. पदराच्या झोळीत आपल्या पिल्लाला ठेऊन जे भुकेच्या आकांताने रडत होतं, ती माता खूप आशेने सगळा कचरा, सगळ्या पिशव्या फाडून काही मिळतय का डोकावत होती. अनेक माश्या भिरभिरत होत्या, दुर्गंधी सुटली होती पण मुलांच्या पोटात भुकेने पडलेल्या आगी मुळे तीला हे काही दिसत नव्हते, जाणवत नव्हते. तीला हवं होतं फक्त काही अन्न.
हे कमी की काय म्हणून काही कुत्री तिला अडथळा निर्माण करत होती. मूलं भेदरलेल्या नजरेने एकदा आई कडे आणि एकदा कुत्र्या कडे बघत होती. एकच पिशवी दोघांना हवी होती. त्यांना हकलत, ती जिवापाड शोधत होती काही अन्नाचे घास जे आपल्या मुलांचे पोट भरू शकतील.
खूप प्रयत्न केल्या नंतर तिला एक भाकरी चा तुकडा आणि भात मिळाला. भाकरी कसली ती पूर्ण वाळून गेली होती. पण त्या माऊलीच्या चेहर्यावर ही भाकरी पाहून सुद्धा असं काही समाधान दिसले जणू पुरणपोळीच सापडली आहे.
ती ते घेऊन जरा बाजूला बसली दोन मोठ्या मुलांना भाकरीचे दोन भाग करून दिले, तर सगळ्यात छोट्या मुलाला भात भरवू लागली. ती भाकरी काही केल्या त्या मुलांना तोडता येईना. कुत्र्यांनी तोंडात हाड धरून चघळत रहावं तसं काहीसं त्यांच झालं होतं. गरिबी काय काय शिकवते सांगू, त्या मुलांनी तिथे जवळच असलेल्या पाण्याच्या नळावर जाऊन ती भाकरी चक्क ओली केली आणि खाल्ली. उरलेले पोट पाण्यानी भरले आणि हसतं हसतं आई कडे निघून गेली.
हे दृश्य पाहून मी जागेवरच थिजले होते. मनाला असंख्य यातना होत होत्या, अनेक प्रश्न मनाला भेडसावत होते. डोळ्यातून पाणी वाहतं होते आणि त्या ही पेक्षा जास्त राग येत होता अश्या अनेक बडय़ा लोकांचा जे अन्न फक्त स्वतः ची श्रीमंती दाखविण्या साठी वाया घालवतात. पर्वाची माझ्या मैत्रिणींनी दिलेली बर्थडे पार्टी चटकन माझ्या डोळ्यासमोरून गेली. काय तो सोहळा होता. अनेक खाद्यपदार्थ होते. सगळ्याची चव घेऊन बघणंही शक्य नव्हतं. बर्थडे पार्टी च्या नावाखाली केक शरीराला फासत होते. मनात आले हाच केक ह्या बाईला मिळाला असता तर… माझी आणखीन एक मैत्रिण आहे तिला मी अर्धा कप चहा दिला तर ती त्यातला पण अर्धा वगळते. अस का हे मला आज पर्यंत समजलं नाही.
काही घरांमधे तर खूप अन्न शिजवले जाते आणि दुसरे दिवशी ते फेकले जाते. काही घरात शिळे अन्न खायचेच नाही असा जणू नियम असतो, त्यामुळे ते सर्रास कोणताही विचार न करता कचरा कुंडीत फेकले जाते. हे बरोबर आहे की शिळे अन्न खाऊ नये पण मग करतानाच मोजके करावे आणि उरलेच तर गरम करून खावे. आणि अगदीच जमत नसेल तर कोणत्या तरी गरजूच्या मुखात पडेल असे तरी पहावे. काही घरांत माणसं चार आणि ब्रेकफास्ट ला जिन्नस सहा असतात. प्रत्येक व्यक्तींची आवड निवड जपण्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात आणि शेवटी ते फुकट जातात.
आज हे दृश्य पाहिल्यानंतर मी सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती करते की कृपा करून अन्न टाकू नका, वाया घालवू नका. गरजे पुरतेच शिजवा. असे किती तरी लोकं आहेत ज्यांना अन्न मिळत नाही काही कारणाने अन्न शिल्लक राहिले तर ते कचरा कुंडीत न टाकता गरजू व्यक्तींना द्या. जरा डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा असे अनेक जण आहेत ज्यांना ह्याची गरज आहे.
अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, अन्न दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. लोकं आपला बडेजाव दाखविण्या साठी जंगी पार्ट्या देतात ज्यात सत्राशे साठ जिन्नस बनवले जातात. आणि त्यातले निम्मे अधिक वाया जातात. हा स्टेटस सिम्बॉल दाखविण्याचा अट्टाहास कश्यासाठी ?? त्या पेक्षा रोज नेमाने काही गरजूंना अन्न दान करा. त्यांच्या पोटातल्या धगधगत्या अग्नीला शांत करा. नकळत तृप्त झालेलं मन आणि भरलेले पोट तुम्हाला लाख आशीर्वाद देऊन जातील. आणि हाच असेल तुमचा खरा स्टेटस सिम्बॉल .
आज मी तुम्हाला हातं जोडून विनंती करते शक्य असेल तेवढे अन्न दान करा. अन्न वाया घालवू नका.