मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 3 ☆ 

(©️doctor for beggars )

(“म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ ) इथून पुढे —-

 “ माफ करणारी मी कोण ? कुणाचा तरी सांभाळ कर अशी माझ्यावर कुणीतरी जबाबदारी टाकली होती, आई म्हणुन मी ते कर्तव्य केलं… आता त्याने माझा सांभाळ करावा असा हट्ट मी का धरु ? मुलानं माझी परतफेड करावी असं वाटणं…तिथंच आईपण संपतं… ! “

“ हो ना पण, मुलाला त्याचं कर्तव्य कळू नये ? “ 

“ डाॕक्टर, रस्त्यांत खडे टोचतात म्हणुन रस्त्यांवर कुणी गालिचा अंथरत नाही, आपण आपल्या पायात चप्पल घालावी– त्याला त्याचं कर्तव्य कळेल न कळेल… आपण कशाला कुणाला शिकवायला जायचं ? आपलं  काम करत रहायचं, फळाची अपेक्षा न धरता… !” 

गीतेच्या ग्रंथाला हातही न लावता, गीतेतला एक अध्याय मला आज्जीकडुन समजला होता. 

“ चला डाॕक्टर, निघते मी… माझं पोरगं घरी एकटंच असेल… मला जायला हवं आता…! “ 

“ क्काय…??? “  मी जवळपास किंचाळलो असेन… कारण या वाक्यावर ती दचकली होती. 

“ अहो आज्जी, आत्ताच तर म्हणालात ना… एक मूल लहानपणीच  वारलं– बहिणीचा सांभाळलेला मुलगा सोडून गेला… आता हे काय… ? ”

ती मंद हसली. म्हणाली, “ सांगेन पुन्हा कधी भेट झाली तर… आधी मला केळी घ्यायला पाहिजेत कुठुनतरी…” 

“ नाही आज्जी, आत्ताच सांगा… प्लीज… माझ्या मनातनं हे जाणार नाही… “ 

ती शांतपणे म्हणाली,  “ अहो डाॕक्टर, कोरोनाच्या तपासणीसाठी दवाखान्यात गेले होते, तेव्हा ठरवलं होतं, चाचणी पाॕझिटीव्ह असेल तर उत्तमच.  नाहीतर येतांना सरळ एखाद्या गाडीखाली झोकुन द्यायचं. “  

“ मग…? “  आवंढा गिळत मी म्हटलं. 

“ मग काय ? जगायचं कसं आणि मरायचं कुठं हा विचार करत पडले असतांना माझं लक्ष शेजारच्या खाटेवर गेलं…साधारण चाळीशीचा एक मुलगा त्या खाटेवर होता—- कमरेखाली अधु ! 

मी त्याच्याकडे पाहिलं… !  डोळे मिचकावत मला म्हणाला… ” काय होनार नाय मावशी तुला, काळजी करु नको… अगं आजुन लय आयुष्यं हाय तुला..!” 

“ हा कोण कुठला ? स्वतःच्या जगण्याची खात्री नाही आणि मला जगण्याचं बळ देतो… ? 

मावशी म्हणतो… ?—- हा निराधार अपंग… रस्त्यांवर राहतो… माझ्यासारखाच तपासणीसाठी आणलेला…!— मरण्याचे विचार घेवुन वावरत असतांना वाटलं… आज माझं मूल जिवंत असतं तर याच्याच एव्हढं नक्की असतं.– ज्या काळात तो गेला… त्याचकाळात त्याच्याऐवजी समजा मीच गेले असते तर त्याचीही अवस्था आज अशीच अपंग आणि निराधार झाली असती… तो ही आज रस्त्यावरच असता…!–डाॕक्टर , त्या अपंग मुलात, मला माझं मुल दिसलं. आमच्या दोघांच्या तपासण्या निगेटिव्ह आल्यावर मी त्याला माझ्याकडे घेवुन आले—त्या दिवशी मी परत आई झाले हो… मरायचं म्हणुन ठरवुन गेलेली मी… येताना आई होवुन, लेकरु घेवुन आले. “ 

—मला काय बोलावं सुचेना. डोळ्यांतुन माझ्या झरझर पाणी वाहु लागलं. 

“ आज्जी, आधीच तुमची कमाई काही नाही, पेन्शन पुरत नाही… त्यात अजून एका व्यक्तीला घेवुन आलात सांभाळायला…?”   मी आश्चर्याने विचारलं. 

“ डाॕक्टर, आईला आपलं मुल सांभाळायला पैसे लागत नाहीत. आईला व्यवहार कधीच कळत नाही… !  शिवाय पैसा जगायला लागतो…जगवायला नाही…! “ 

“ म्हणजे … ? “  मी आ वासून विचारलं. 

“ म्हणजे, जो स्वतःचा विचार करत  स्वतःपुरता जगतो त्याला पैसे लागतात… पण आपण जेव्हा “स्व” सोडुन दुस-याला जगवायचा विचार करायला लागतो… त्यावेळी त्या दोघांची काळजी कुणी तिसराच करत असतो…आपण फक्त त्या तिस-यावर विश्वास ठेवायचा ! “

मी हे तत्वज्ञान ऐकत मूकपणे उभा होतो. 

“ मोठी झालेली मुलं, आपल्या आईला त्यांच्या घरात  राहण्याचं भाडं मागतीलही कदाचित् … पण नऊ महिने गर्भाशयात राहण्याचं भाडं आईनं कधी मागितल्याचं माहित आहे का ?–आईला व्यवहार कधीच कळत नाही डाॕक्टर  ! “

मी शहारलो हे ऐकून… ! 

‘आज्जी, आधीचे दोन वाईट अनुभव बघता, हा पण गेला सोडुन तर ? पुढं तुमचं काय ?’ मी चाचरत बोललो. 

‘डाॕक्टर, हा सोडुन गेला तरी, तो माझं आईपण घेवुन जावु शकणार नाही ना ?

एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देतो… त्यावेळी नुसतं बाळच जन्माला आलेलं नसतं… एक आई पण जन्म घेते त्याचवेळी… !

दोन जीव जन्मतात त्यावेळी… एक मुल आणि एक आई ! 

जन्माला आलेल्या त्या बाळाने आईला, आईपण हे त्याच्या जन्मावेळीच बहाल केलेलं असतं… हे लाभलेलं आईपण कोण कसं काढुन घेईल ?

मी काय बोलणार यावर—–

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक गूढ निरोप. . . भाग 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

पूर्वसूत्र- “या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं. त्यानंतरच्या दिवाळीपासून जावई म्हणालेत तसं करू.” त्यांनी आजोबांना सुचवलं. ते विचारात पडले. त्यांना काय बोलावं ते सुचेचना.

“पण थोडक्यासाठी त्यांना दुखावले असं नको व्हायला. ठरलंय तसंच होऊदे” ते म्हणाले. आजी हिरमुसल्या.

“ठरलंय तसं करू पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.समजावेन त्यांना. सांगून बघू तरी काय म्हणतात ते.” आजी म्हणाल्या.

जे जे होईल ते ते पहावे असा विचार करून आजोबा नाईलाजाने गप्प बसले.)

जावई आढ्यतेखोर नव्हतेच.त्यामुळे त्यांनी आजींच्या विनंतीला मान दिला. मग पूर्वीप्रमाणे त्या वर्षीही  सर्वजण दिवाळीसाठी सोलापूरच्या बंगल्यातच एकत्र आले. दिवाळीच्या फराळाचे सर्व जिन्नस सुनेच्या मदतीने पुढाकार घेऊन आजीनीच बनवले होते. त्यांनी मुलं, सुना, मुलगी, जावई, नातवंडं सर्वांसाठी आपले आशीर्वाद म्हणून त्यांच्या त्यांच्या आवडीच्या भेटवस्तूही आवर्जून खरेदी केलेल्या होत्या. या वर्षीच्या दिवाळीची रंगत काही औरच होती. पाडव्याच्या आदल्या रात्री स्थानिक साधकांना नामसाधनेसाठी आमंत्रित केलेले होते. रात्री उशीरपर्यंत नामसाधना, मग अल्पोपहार, भक्तिगीतांचा कार्यक्रम,असा भरगच्च कार्यक्रम होऊन त्या आनंदसोहळ्याची सांगता झाली. त्या रात्री आजी- आजोबांनी  अतिशय प्रसन्नचित्ताने अंथरुणाला पाठ टेकली. रात्री झोपायला खूप उशीर होऊनसुद्धा ठरल्याप्रमाणे पहाटे चार वाजता रोजच्यासारखी दोघांनाही जाग आली.

रोज असे पहाटे उठून मुख-संमार्जन करून दोघेही गुरुदेवांसमोर निरांजन लावून त्यांना मनोभावे नमस्कार करून नामसाधनेला बसत.नेमक्या ठराविक वेळी अंत:प्रेरणेनेच आजोबा प्रसन्नचित्ताने नेमातून बाहेर येत. मग उठून फुलांची परडी आणि दुधाचे पातेले घेऊन बागेत जात. दूधवाला येईपर्यंत त्यांची फुलांची परडी बागेतल्या फुलांनी अर्धी भरलेली असे. तो येताच पातेल्यात दूध घेऊन ते खिडकीत ठेवीत. बाकी फुले काढून आत येईपर्यंत दूध गॅसवर चढवून आजीनी चहाची तयारी सुरू केलेली असे. हा त्यांचा गेल्या कित्येक वर्षांचा न चुकणारा दिनक्रम. आजही असेच झाले. नेहमीप्रमाणे फुले काढत असताना दूधवाला येताच आजोबांनी दूध घेऊन पातेले खिडकीत ठेवले.फुले काढून झाल्यावर ते आत आले तरीही आजी अजून साधनेतच. खिडकीत दुधाचे पातेले तसेच होते. आजी नामसाधनेत तल्लीन. त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून आजोबांनी खिडकीतले

पातेले हळूच घेऊन ते आत नेऊन गॅसवर चढवले. चहाची सगळी तयारी करून ठेवली. आणि देवघराच्या दाराशी येऊन त्यांनी हलक्या आवाजात आजीना हाक मारली. प्रतिसाद आला नाही तसे पुढे होऊन त्यांनी आजींच्या खांद्यावर हलक्या हाताने थोपटले तशी त्या स्पर्शाने आजींची मान कांहीशी कलली. आजोबांना वेगळीच शंका आली. क्षणार्धात ती खरीही ठरली. नामसाधनेतल्या तल्लीनावस्थेतच आजी  परतत्त्वात  विलीन झाल्या होत्या!

दुसऱ्या दिवशीच्या पेपरमधे आजी गेल्याची बातमी वाचून मला धक्काच बसला. पण त्यांच्या या अलौकिक जिवा-शिवा च्या भेटीचा वृत्तान्त मी कुंटे आजोबांच्या सांत्वनासाठी गेलो तेव्हा मला समजला. सांगताना आजोबा स्थिरचित्तच होते.

“मृत्यूसुद्धा कृपावंत ठरला तिच्यासाठी.” ते म्हणाले होते.

“आला तेही तिला कणभरही वेदना न देता. नामस्मरणात दंग असताना मोठ्या सन्मानपूर्वक पालखीतून मिरवत न्यावं तसं घेऊन गेला तिला. माझ्यासकट सगळ्या सग्यासोयऱ्यांना या उत्सवासाठी जणू काही तिने आवर्जून बोलावून घेतले होते. स्वतःसह सगळीच छान आनंदात असताना अशी अलगद निघून गेली….!! “

आजोबा म्हणाले होते. त्यांच्या आवाजात थरथर जाणवत होती.पण चेहऱ्यावर मात्र त्यांच्या आनंदाश्रूनी ओलावलेल्या नजरेतून अलगद विलसलेलं अस्फुटसं स्मित..!

ऐकतानासुध्दा अंगावर शहारा आला होता माझ्या..!

कांही कांहीं अनुभव अविस्मरणीय असतात ते असे.

खूप विचार करुनही या अशा प्रस्थानाचं गूढ मला आज तागायत उलगडलेलं नाहीय. कुणालाही निरोप न देता न् कुणाचाही निरोप न घेता आलेला असा कृतार्थ मृत्यू विरळाच.त्या अर्थाने कुंटे आजी भाग्यवान हेही खरेच.पण तरीही एक निरुत्तर प्रश्न आजही माझ्या मनात डोकावून जातोच.’ठरल्याप्रमाणे दिवाळीला लेक जावयाकडे जाण्याचा बेत बदलायची व सर्वांना दिवाळीला इकडेच बोलावून घेण्याची आजीना झालेली प्रेरणा ही एक निव्वळ योगायोग की त्यांना आधीच लागलेली स्वतःच्या प्रस्थानाची चाहूल?

या प्रश्नाचं उत्तरही आजींसोबतच निघून गेलंय.म्हणूनच तो प्रश्न माझ्यासाठी तरी आजींच्या मृत्यू सारखाच एक गूढ बनून राहिलेला आहे..!

समाप्त 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 2 ☆ 

(©️doctor for beggars )

(नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ”) इथून पुढे —

हो- ना करता, कळलं ते असं—-

—-ही आजी आपल्या यजमानांसह रहात होती. यजमान नोकरीला…ही गृहिणी ! 

मूलबाळ होत नव्हतं— खुप वर्षांनंतर तिच्या वयाच्या चाळिसाव्या वर्षी मूल झालं…! 

या वयात झालेल्या मुलाला जन्मजात व्यंग होतं… कमरेखाली त्या बाळाला संवेदनाच नव्हत्या… हा धक्का तिनं पचवला. 

पुढे कळलं बाळाच्या हृदयाला छिद्र आहे… तो ही धक्का तिने पचवला… आणखी काही काळानं कळलं… मूल मतिमंद आहे… ! 

——-आता मात्र ती ढासळली !

गाडी कशीबशी सुरु होती. पुढे हार्ट अॕटेकने यजमान गेले… एक मोठा आधार गेला. 

मतिमंद मुलाचं करता करता दिवस सरत होते, पेन्शन पुरत नव्हती. मुलाचं दुःखं पहावत नव्हतं… तरीही मनोभावे त्याचं सर्व ती करत होती. …अशातच अचानक मुलगाही गेला तिला सोडून …!

—सगळीकडेच अंधार… ! ती एकटी …!—

आजीची बहीण टी बी ने आजारी होती, तिच्या शेवटच्या काळात ती आजीला म्हणाली…

” बिनबापाचं माझं पोरगं पदरात घे… मी जास्त दिवस राहणार नाही…”—–

तो शब्दही खरा झाला. बहीण गेली…बाप नसलेल्या तिच्या एकुलत्या एक मुलाची जबाबदारी आता आजीने घेतली त्यावेळी… ! 

बहीण गेल्याचं दुःखं होतंच… पण तिच्या मुलाच्या रुपानं पुन्हा आजीला मातृत्व मिळालं… 

बहिणीमाघारी तिनं त्या मुलाचं सर्व काही केलं. त्याच्या शिक्षणासाठी दागदागिने मोडले, राहतं घर विकलं, स्वतः भाड्याच्या घरात राहून मुलाला बाहेरगावी होस्टेलला ठेवलं. त्या वयातही चार घरची कामं करुन मुलाचं संपूर्ण शिक्षण  पूर्ण केलं. 

शिक्षण झाल्यावर मुलानं परस्पर तिकडेच नोकरी पाहिली, घरोबाही केला. तो हिच्याकडे परत आलाच नाही. म्हणायचा, ‘ तू  काय खरी आई आहेस का माझी… ? ‘

आजीनं इतके मृत्यु पाहिले होते, इतकं दुःखं पचवलं होतं… या सा-या धक्क्यांतुनही ती सावरली … 

पण या वाक्याचा आघात सहन झाला नाही—-” तू  काय खरी आई आहेस का माझी… ?”

“ मी खरी आई नव्हते तर कोण होते रे बाळा तुझी ? “—-ती प्रश्न विचारायची… पण उत्तर द्यायला कुणीच नसायचं…!

आई होण्याचं भाग्य दोन्ही वेळा लाभलंच नाही… !

दिवस सरत होते, मृत्यु नेत नव्हता आणि आयुष्यं जगु देत नव्हतं… ! बहिणीच्या मुलाला स्वतःचाच समजून, त्याच्यासाठी होतं नव्हतं ते सर्व आजीनं घालवलं होतं… नंतर मुलानं नातं नाकारलं—– 

आजी आता राहते कुठल्याशा चाळीतल्या एका खोलीत—-

पंधरा दिवसांपुर्वी हिला खोकतांना चाळीत कुणीतरी पाहिलं, यंत्रणेला कळवलं… सरकारी कर्मचाऱ्यांनी आजीला दवाखान्यात नेलं, कोरोनाची तपासणी केली, दोन दिवस दवाखान्यात ठेवलं… हिला घरी सोडलं… !

हिला खूप आशा होती– आपल्याला कोरोनाचा आजार व्हावा, त्यातच आपला अंत व्हावा… पण इथंही निराशाच पदरी आली… टेस्ट निगेटिव्ह ! —हिला घरी सोडलं… ! 

जगण्याने छळलं होतं… !!! 

ती परत चाळीत आली होती… ! 

“ आजी, वाईट वाटलं ऐकून…. “ पाणावलेल्या डोळ्यांनी मी तिला म्हणालो. 

“ वाईट काय वाटायचं डाॕक्टर ? भोग असतात, ते भोगावेच लागतात.”

“ पण तुम्ही सांभाळलेल्या मुलानं योग्य नाही केलं हे…”

“ असू  द्या हो, आपण आपलं कर्तव्य करायचं… गीतेत सांगितलं आहे… मोह नको… कर्म करत रहा… फळाची अपेक्षा नको…” 

“ म्हणजे तुम्ही त्याला माफ केलंत ! “ 

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ एक गूढ निरोप. . . भाग 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

कांही कांही अनुभव अविस्मरणीय असतात.  कुंटे कुटुंबियांच्या बाबतीतला हा अनुभवही असाच. त आमच्या बँकेच्या सोलापूर (कॅंप) ब्रँचमधे मी मॅनेजर होतो त्यानिमित्ताने माझ्या संपर्कात आलेले कुंटे आजोबा. आमच्या बँकेचे ग्राहक.  एक हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्त्व.

मी नवीनच रुजू झालो होतो त्या ब्रॅंचला, त्यानंतरच्या पहिल्याच एक तारखेची गोष्ट.  नेहमीप्रमाणे पेन्शनर्सची खूप गर्दी.  केबिनमधून बाहेर लक्ष गेलं तेव्हा जाणवलं की त्या गर्दीत बसायला जागा नसल्यामुळे एक वृद्ध गृहस्थ माझ्या केबिनलगत अवघडून पाठमोरे उभे आहेत. मी शिपायाला सांगून त्यांना आत बोलावलं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. ती खरं तर माझ्या दृष्टीने मीच करायला हवी होती अशी एक साधी गोष्ट होती. पण हीच माणूसकी मला पुढे अनेक पटीने बरंच कांही देऊन गेली. कारण त्यानंतर ते केबीनमधून बाहेर गेले ते माझ्याबद्दलचा एक सद् भाव मनात घेऊनच.  

कुंटे आजी-आजोबा, त्यांची दोन्ही मुलं-सुना, मुलगी-जावई सर्वचजण निंबाळ संप्रदायातले.  गुरुदेव रानडे यांचे उपासक.  त्यांनीच मला आवर्जून आग्रहाने एकदा निंबाळला नेले  होते.  कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडांचं अवडंबर नसलेलं, तिथलं वातावरण मला खूप भावलं होतं.  भक्तीमार्गाचे अनुसरण करून मानवजन्माचे सार्थक करण्याची शिकवण हे निंबाळ-संप्रदायाचे वैशिष्ट्य. त्यामुळे नित्यनेमाने नामसाधना हे कुंटे आजी-आजोबांचे अढळ श्रध्देने स्विकारलेले व्रतच होते. त्यांचे सोलापूर येथील कॉलेजमधे प्राध्यापक असणारे चिरंजीव    श्री. नरेंद्र कुंटे हे या संप्रदायातले एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते.  भक्तीमार्गावरील अनेक थोर विभूतींच्या ग्रंथरचनांचे विश्लेषण करणारे त्यांचे अतिशय सुबोध लेखन आणि त्यावरील त्यांची निरूपणं सर्वसामान्यांच्या अनेक शंकांचे निरसन करीत त्यांना मार्ग दाखवीत असत.  या कुंटे कुटुंबीयांबद्दल तिथे आलेल्या सर्वच उपासकांना वाटत असलेलं प्रेम आणि निष्ठा पाहून माझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला होता.

कुंटे आजीही अतिशय शांत,हसतमुख,अगत्यशील. त्यांचा एक मुलगा (श्री. नरेंद्र कुंटे), सून, नातू सोलापूरला त्यांच्याचजवळ.  दुसऱ्या मुलाचं बि-हाड नोकरी निमित्ताने मुंबईला. मुलगी-जावई पुण्यात.

त्या घरची दिवाळी त्या सर्वांसाठीच एक हवाहवासा आनंदसोहळा असे. कारण  आजी-आजोबाची इच्छा म्हणून सर्व कुटुंबियांची दिवाळी दरवर्षी सोलापूरच्या बंगल्यातच उत्साहात साजरी व्हायची.  त्यामुळेच दिवाळी म्हणजे कुंटे कुटुंबियांसाठी एक सत्संग आणि आनंदोत्सवच असायचा. परगावचे मुलगा,सून लेक-जावई, नातवंडे सर्वचजण दिवाळीचे चार दिवस आवर्जून सोलापूरला येत.

एका दिवाळीला असेच सर्वजण जमलेले असताना जावई आग्रहाने म्हणाले, “आता यापुढे दरवर्षी दिवाळीला आपण आलटून पालटून प्रत्येकाच्या घरी एकत्र जमू या कां? त्याशिवाय आमच्या बि-हाडी सगळ्यांचं येणं कसं होणार?”

मुंबईच्या मुलासूनेनं ही कल्पना उचलून धरली. एरवीही त्यात नाकारण्यासारखं कांही नव्हतंच. आजोबांनी आजींकडे पाहिलं. आजीनी हसून संमतीदर्शक मान हलवली. मग सर्वानुमते पुढच्या वर्षाची दिवाळी लेकीच्या घरी पुण्यात करायची असं ठरलं.

पावसाळा संपत आला तशी आजींच्या मनात चलबिचल सुरू झाली.

“आपल्या नामसाधनेला पुढच्या वर्षी एकवीस वर्षं पूर्ण होतायत.  त्यानिमित्ताने आपण निंबाळला सत्संग आयोजित करणार आहोत.  त्यानंतर पुढे लगेचच दिवाळी येईल.  या वर्षी तरी दिवाळी पाडव्याची आपली नामसाधना आपल्याच वास्तूत व्हावी असं आपलं मला वाटतं.  मग त्यानंतरच्या दिवाळीपासून हवंतर जावई म्हणताहेत तसं करू. ” त्यांनी आजोबांना सुचवलं.

ते विचारात पडले. त्याना  काय बोलावं ते सुचेचना. “पण थोडक्यासाठी त्यांना दुखवल्यासारखं होईल. नकोच ते. ठरलंय तसं होऊ दे. “ते म्हणाले.

आजी हिरमुसल्या.

“ठरलंय तसं करु,पण नाईलाज झाला तरच. मी बोलेन जावयांशी.  समजावेन त्यांना.  सांगून बघू तरी काय म्हणतात ते” आजी म्हणाल्या. जे जे होईल ते ते पहावे असा विचार करुन आजोबा नाईलाजाने गप्प बसले.

क्रमशः —- 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आई—!!! भाग 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

☆ आई—!!! भाग 1 ☆ 

(©️doctor for beggars )

एप्रिल चा पहिला आठवडा ! 

रस्त्यांवर लाॕकडाउन मुळे भयाण शांतता. नाही म्हणायला पोलीस जागोजागी… ! 

मी भिक्षेक-यांचा डाॕक्टर … माझं काम रस्त्यावरच !

लाॕकडाउन च्या काळात ज्यांना घरं होती, मग भले ती झोपडपट्टीत का असेनात, त्यांना घरी रहायला बजावुन सांगितलं…!  ज्यांना घरं नाहीत अशांना काॕर्पोरेशनने निर्माण केलेल्या निवारा केंद्रात पाठवुन दिलं. आता माझ्या भिक्षेकरी वर्गापैकी रस्त्यांवर कुणी नव्हतं. तरीही चुकुन कुणी सापडतंय का हे बघत मी रस्त्यांवरुन फिरत होतो. 

फिरता फिरता एका मंदिरापाशी आलो. मंदिराबाहेर शुकशुकाट. मंदिराची दारं बंद… ना भिक्षेकरी… ना भक्त !

—मी तिथुन निघणार तेव्हढ्यात भिक्षेकरी बसतात त्या ठिकाणी एक आजी बसलेली मला दुरुन दिसली. ही माझ्या ओळखीची नव्हती. कपडे ब-यापैकी नीटनेटके… ! 

भिक्षेकरी वाटत नव्हती…!  मग ही इथं का बसली असेल ? माझी उत्सुकता वाढली. मी जवळ गेलो… 

हा आता आपल्याला काहीतरी देणार या आशेनं तीनं आपसुक हात पुढे केला. 

मला आश्चर्य वाटलं… भिक्षेकरी तर वाटत नाही…मग हात का पुढे करावा हिने ? 

वय असेल साधारण 70-75 वर्षे. डोईवरचे सर्व केस पांढरे, डोळे खोल गेलेले, चेह-यावर सुरकुत्यांचं जाळं… हाताच्या बोटापर्यंत पसरलेलं… !  या जाळ्यात मध्येच लुकलुकणारे दोन डोळे, चेह-यावर अजीजी, करुण भाव … !

‘आजी इथं का बसलाय ?’ मी विचारलं. 

‘काही नाही, बसल्येय हो देवळाच्या दारात, आपण पोलीस आहात का?  बोलणं मृदु आणि स्वच्छ !

माझी खात्री झाली, आजी भिक्षेकरी नाही. 

तरीही तिला म्हटलं, “ देवळाच्या दारात बसलाय म्हणता, आणि इथं बसुन मागता. बरोबर ना ? मघाशी हात पुढं केलात, बघितलं ना मी…”

तिनं चमकुन माझ्याकडं पाहिलं, डोळ्यात पाणी तरारलं… पण बोलली काहीच नाही. 

“ उठा आजी असं उघड्यावर बसू नका, सध्या काय चालु आहे माहित आहे ना ? जा घरी…कुणी येणार नाही काही द्यायला “. मी पुन्हा बोललो. 

ती ओशाळली, म्हणाली, “ तसं नव्हे हो ! जाते मी इथुन …. कुणी येणार नाही काही द्यायला…काय करणार नशीबच फुटकं…! “—-मला या वाक्याचा अर्थ कळला नाही. 

ती उठली… जायला निघाली.— मनात नसतांनाही ती जायला उठली, पण तिला थांबायचं होतं अजून— माझ्याकडं तिनं ज्या केविलवाण्या नजरेनं पाहिलं त्यात मला ते स्पष्ट जाणवलं. 

मलाच वाईट वाटलं. म्हटलं, “आजी, मी डाॕक्टर आहे, काही औषधं लागत असतील तर सांगा, दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा…!  पण कुणाला भीक मागायला लागू  नये यासाठी मी काम करतोय, शिवाय तुम्ही चांगल्या घरातल्या वाटताहात…आणि …”

ती चालता चालता थबकली, वळून हसत म्हणाली…” चांगलं घर , वाईट घर असं पण असतं का ?”

“ नाही तसं नव्हतं म्हणायचं मला…” मी काहीतरी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

ती हसली; काहीतरी विचार करुन म्हणाली, “ केळी आहेत का तुमच्याकडे ? “

मला काही कळेचना, ब-यापैकी परिस्थिती वाटते, भिक्षेकरी तर वाटत नाही, तरी इथं मंदिरात काही मिळेल या आशेनं ती इथं बसली होती, हटकल्यावर निघाली, आता जातांना केळी मागते…! 

मानसिक रुग्ण असावी का ?—– उलगडा होईना. उत्सुकता अजुन चाळवली. 

मी तिच्या मागं गेलो, म्हणालो “ आजी… काय झालं… इकडे कुणाची वाट पहात होता का ? काही हवं होतं का… ? “ 

“ मला केळी द्याल…? ” पुन्हा तिनं भाबडेपणानं विचारलं.

मी डायरेक्ट मुद्द्यावर आलो, “ आजी झालंय काय ? नीट सांगाल, तर मी नक्की काहीतरी मदत करेन…! ” 

क्रमशः —-

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ महात्मा ☆ सौ राधिका भांडारकर  

राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे.आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत.

 

ही पृथ्वी ,हवा, भूमी, पाणी,हे सर्व म्हणजे आपल्या बापजाद्यांनी वारसाहक्काने दिलेली मालमत्ता नव्हे,तर ते पुढील पिढ्यांसाठीची जोखीम आहे.ती किमान जशीच्या तशी त्यांच्या हाती सोपवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

तलवार ही शूराची निशाणी नाही तर ती भीतीची निशाणी आहे बलहीन व्यक्ती कुणाला ही क्षमा करु शकत नाही. बलवान माणूसच क्षमा करु शकतो.

 

जे लोक म्हणतात,धर्माचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना धर्म काय हेच माहीत नाही.

 

असे आणि अशा तर्‍हेचे अनमोल विचार देणारे गांधीजी त्यांची आज जयंती.त्यानिमीत्ताने त्यांच्या बहुमोल विचारांचे चिंतन व्हावे ही अपेक्षा…

नेता याचा अर्थ मी असा समजते की जो समाजाला,सत्याच्या,न्यायाच्या ,नीतीच्या मार्गावर नेतो तो नेता.तो जाणता असला पाहिजे.निस्वार्थी असला पाहिजे.

समाजाची दु:ख,होरपळ या बाबतीत कृतीशील कनवाळु असला पाहिजे.त्याच्या कार्यावर त्याचा स्वत:चा विश्वास ,श्रद्धा,भक्ती आणि त्या प्रवाहात इतरांना आत्मविश्वासाने घेउन जाणारा हवा…

।।वैश्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे।।

स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीजींची हीच प्रतिमा होती..

म्हणून ते लोकनेता ठरले.ते देशाचे बापू झाले. राष्ट्रपिता ठरले.

गांधीजींना महात्मा हे संबोधन दिलं गेलं कारण ,एक स्वतंत्र सेनानी, अहिंसेचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे संपूर्ण कार्य महान होते.त्यांनी त्यांचं आयुष्य देशाला समर्पित केलं होतं.ते खर्‍या अर्थाने लोकांप्रती,लोकांसाठी आणि लोकांतर्फेच होते.!

सत्य अहिंसा परमोधर्म…

ही त्यांची निष्ठा होती.जीवन सूत्री होती.न्यायासाठी त्यांनी अंदोलने केली. चंपारण्य अंदोलनाद्वारे,शेतकर्‍यांवर होणार्‍या अत्याचाराला वाचा फोडली.. ब्रिटीश जमीनदारांच्या विरोधात हडताळ केले. आणि त्यांना झुकण्यास भाग पाडले. “भारत छोडो” अंदोलनात,

‘करो या मरो’ असा घणाघाती नारा दिला. लोकांच्या जाणीवा पेटवल्या. गुलामगिरीचे जोखड फेकून देण्यासाठी प्रवृत्त केले.

जातीभेद,अस्पृष्यता वर्णद्वेष,यांच्या उच्चाटनासाठी ,त्यांनी त्यांचं जीवन समर्पीत केलं.

गोल चष्मा ,काठी ,चरखा आणि पंचा म्हणजे गांधींची प्रतिकात्मक छबी!

या उघड्या भारतीय नेत्यांने जगाला नमवलं..थक्क केलं..

मातृभूमीसाठी त्यांनी बलीदान केलं. भारतीयांच्या मनात ते राष्ट्रपती आणि बापू  म्हणूनच सदैव जागृतच असतील.

प्रख्यात शास्त्रज्ञ, आईनस्टाईनने, गांधीजींच्या बाबतीत असं म्हटलं आहे, की “असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता ,हेच एक महान आश्चर्य आहे,.”

गांधीवाद, गांधीजींची तत्व, त्यांचे जीवन, त्यांच्या निष्ठा, म्हणजे एक मोठा अभ्यासक्रम आहे. एक संस्कृती प्रणाली आहे.

बदलत्या काळानुसार उलटसुलट वैचारिक प्रवाह  वाहताना दिसतात.

आज गांधीजी असते तर…? पासून ते गांधीजींने हे करायला नको होतं… पर्यंत विचारधारा आहेत..

आजही जनयात्रा, रथयात्रा, आशिर्वाद यात्रा निघतात.

उपोषणं केली जातात.. अंदोलने होतात. धरणे धरली जातात. संप होतात.. केंद्रस्थानी गांधीजींचे उपोषण, गांधींची दांडीयात्रा ही शिकवण असेलही पण ती तळमळ ,ती तात्विकता ,समर्पण आहे का?….

गांधी हत्येचं समर्थनही केलं जातं

GREAT MEN COMMIT GREAT MISTAKE

असं कंसात म्हटलंही जातं.

पण माझ्या मते गांधी एक इतिहासाचं पान आहे…

एक संस्था आहे.

एक ग्रंथ आहे.

वेळोवेळी उघडावा, वाचावा, अभ्यासावा…

गांधीजींचे जीवन म्हणजे मूर्तीमंत गीता आहे!

झाले बहुत।होतील बहुत।

परी या सम हाच।।

या दिव्यत्वासमोर कर माझे आदरे जुळती….!!

दोन आॅक्टोबर. आज त्यांची जयंती .म्हणून

या तत्वाला भावपूर्ण आदरांजली!!

धन्यवाद!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कार्यपट …. गदिमा ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  विविधा ?

☆ कार्यपट …. गदिमा ☆ सौ राधिका भांडारकर  

०१  ऑक्टोबर हा माननीय गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच गदिमा यांचा जन्मदिन..त्या निमीत्ताने मागे वळून पाहताना… गदिमा हे एक असाधारण व्यक्तीमत्व होते.दिग्गज कवी ,गीतरामायणकार,लेखक ही त्यांची ओळख तर आहेच,पण ते विख्यात पटकथा,संवाद लेखक होते.

Best Bhojpuri Video Song - Residence wघरच्या गरिबीमुळे,केवळ चरितार्थासाठी ते चित्रपट व्यवसायात आले. नवयुग चित्रपट संस्थेत,सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना,चित्रकथा कशी तयार करायची हे त्यांनी जाणून घेतले.१९४७ साली त्यांनी राजकमल पिक्चर्सच्या ,लोकशाहीर रामजोशी या चित्रपटाची कथा, संवाद व गीते त्यांनी लिहीली.त्यात तायांनी एक भूमिका पण केली.आणि या चित्रपटाला ,प्रचंड लोकप्रियता मिळाली.आणि त्यानंतर,कवी आणि लेखक अशा दोन्ही नात्यांनी ,गदिमा हे मराठी चित्रपट सृष्टीचा एक भक्कम आधार बनले, त्यांनी लिहीलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटात, पुढचं पाऊल,बाळा जोजो रे,लाखाची गोष्ट,पेडगावचे शहाणे,ऊनपाऊस,मी *तुळस तुझ्या अंगणी,जगाच्या पाठीवर *संथ वाहते कृष्गामाई या चित्रपटांचा समावेश आहे. शिवाय तुफान और दिया,दो आँखे बारह हाथ,गूँज ऊठी शहनाई हे त्यांची पटकथा असलेले उल्लेखनीय हिंदी चित्रपटही अतिशय लोकप्रिय झाले..

त्यांच्या चित्रकथा वैविध्यपूर्ण असून ,संवाद सोपे आणि चपखल असत.

योगायोगानेच त्यादिवशी गदिमांची ,कथा,संवाद आणि गीते असलेला लाखाची गोष्ट हा चित्रपट पहायला मिळाला.कृष्गधवल ,काहीशी धूसरच प्रिंट असलेला चित्रपट पाहतानाही,मन गुंतून गेले.कदाचित ते त्यातल्या प्रभावी कथानका मुळेच असेल.अत्यंत आशयपूर्ण आणि समाजापुढे हसत खेळत,एक चांगला संदेश देणारी गदिमांची कथा ही या चित्रपटाच्या यशाची जमेची बाजू.

१९५२ साली हा चित्रपट प्रसारित झाला.आणि प्रचंड गाजला.आजच्या इतकं प्रगत चित्रपट तंत्र नसतानाही त्यांत मन रमतं,कारण गदिमांची प्रसन्न कथा.कालबाह्य न होणारी कथा.

चित्रा,रेखा,राजा गोसावी आणि राजा परांजपे अशी उत्तम कास्ट.मालती पांडे आणि आशा भोसले यांनी गायलेली मधुर गाणी. खरोखरच सर्वांगसुंदर चित्रपट.

श्याम आणि रामनाथ हे दोघं कलाकार मित्र.श्याम चित्रकार.रामनाथ कवी.कलाक्षेत्रात अजुन न बहरलेले .

त्यामुळे गरीबच.खोलीचं भाडंही भरण्यापुरते पैसे नाहीत.

रामनाथची प्रेयसी रेखा. ती गायिका.रेडिओ प्रसिद्धीमुळे, थोडंफार कमावणारी.तिची मैत्रीण सरोज,ही एका श्रीमंत बापाची मुलगी.आणि पोर्ट्रेट करण्याच्या निमीत्ताने ,एकमेकांच्या प्रेमात पडलेले ती आणि रामनाथ.

अशी ही कलाप्रेमी मित्रांची एकमेकांत गुंतलेली प्रेम कहाणी.कथेचा विस्तार होत असताना ,अनेक विनोदी घटना प्रेक्षकांना खळखळून हसवतात. सरोजच्या वडीलांचं

अवास्तव श्वानप्रेम,रेखाच्या वडीलांचची फाटक्या संसारातही, नाट्यवेड टिकवून ठेवण्याची अतोनात धडपड…शेवटी काय पैसा महत्वाचा..

त्याचवेळी सरोजचे वडील रामनाथला एक लाख रुपये देतात.व एक विचीत्रअट घालतात.हे एक लाख रुपये एक महिन्यात संपवून दाखवलेस तरच माझी मुलगी तुझ्याशी लग्न करेल.वरवर सोपी वाटणारी ही अट अमलात आणत असताना अनंत अडचणी येतात.

ते २५/३० दिवस रामनाथ आणि श्यामचे प्रचंड तणावात जातात.आणि श्यामला जाणवायला लागते की या पैशापायी आपण कलेपासून दूर जात आहोत.रंग ,कॅन्व्हासची आपली दुनिया दुरावत आहे.कला हाच आपल्या जीवनाचा आत्मा आहे.शेवटी तो पैसा,प्रीतीचा त्याग करतो.आणि पुन्हा कलेकडे वळतो.श्रीमंत बापाचं घर सोडून श्यामची प्रेयसी सरोज त्याच्याचकडे येउन तिचं त्याच्यावरचं,आणि त्याच्या कलेवरचं प्रेम सिद्ध करते.

अखेर सरोजचे वडील  लग्नास परवानगी देतात.कलेवरचं प्रेम हीच लाखाची गोष्ट ,याची जाणीव त्यांना होते…कथा आणि चित्रपट  एक चांगला संदेश देऊन सुखांतात संपतो.

चित्रपट कुठेही रेंगाळत नाही.कंटाळवाणा आजही वाटत नाही.तो हसवत राहतो.उत्सुकता वाढवतो,आणि चुटपुटही लावतो.यात गदिमांच्या अत्यंत सजीव ,चैतन्यमयी लेखनाचाच वाटा आहे.

शिवास “माझा होशील  ना..

“त्या  तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे….”

“डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे…

ही अवीट गोडीची गदिमांची तरल गीते….

गदिमांची पटकथा असलेले चित्रपट गाजले ,ते त्यांच्या विचार देणार्‍या ,प्रभावी ,संवादात्मक कथानकामुळे….

अशा या महाराष्ट्राच्या वाल्मिकीला ,महान मराठी सारस्वताला माझा आदरपूर्वक प्रणाम…!!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवघ्या आशा श्रीरामार्पण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ अवघ्या आशा श्रीरामार्पण ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

Best Bhojpuri Video Song - Residence w‘गीतरामायण’ आणि कविवर्य ग. दि. माडगूळकर हे एक रत्नजडित समीकरण आहे. ही  ६६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गदिमा आणि आकाशवाणीचे अधिकारी सीताकांत लाड रोज प्रभातफेरीला जात असत. मराठी श्रोते आपल्या कुटुंबासह आनंद घेऊ शकतील असा वर्षभर चालणारा एक कार्यक्रम आकाशवाणीवर सादर करण्याची कल्पना लाडांनी एकेदिवशी मांडली.बऱ्याच कालावधी पासून गदिमांच्या मनात रामकथा घोळत होती.आकाशवाणी कार्यक्रमाबद्दल ऐकले त्याच वेळी गदिमांच्या मनात गीत रामायणाचे बीज रुजले आणि त्यातून ही दैवी रचना आकाराला आली.

त्यावेळी श्रीराम कथेने त्यांना जणू भारून टाकले होते. या भारलेल्या अवस्थेतच प्रासादिक शब्दरचना, प्रासादिक संगीत आणि प्रासादिक स्वर यांच्या त्रिवेणी संगमातून एक महाकाव्य जन्माला आले  ‘ गीत रामायण ‘. १एप्रिल १९५५ ची रामनवमी या दिवशी पुणे आकाशवाणी वरून पहिले गीत सादर झाले,

स्वये श्री रामप्रभू ऐकती

कुशलव रामायण गाती ||

एका दैवी निर्मितीची अशी ही सुरुवात झाली. रामनवमी १ एप्रिल १९५५ ते रामनवमी १९ एप्रिल १९५६  या काळात एकूण ५६ गीते सादर झाली.

प्रत्येक गीतातला रामकथेचा भाग  रामचरित्रातीलच एका व्यक्तीच्या तोंडून सांगितलेला आहे.  ही एक गीत शृंखलाच आहे. बऱ्याच गीतांमधील कथाभाग गीताच्या शेवटी पुढील प्रसंग किंवा पुढील गाण्याशी जोडलेला आहे.

मुळामध्ये ‘वाल्मिकी रामायण’ हे चिरंतन काव्य आहे. त्यातले अमृतकण गीत रामायणात देखील प्रकट झालेले आहेत. त्यामुळेच त्याला अध्यात्मिक अर्थ आणि श्रेष्ठत्व प्राप्त झालेले आहे. महर्षी वाल्मिकींनी उभ्या केलेल्या मंदिरात गदिमांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मराठमोळ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे गीतरामायण हे सर्वसामान्यांच्या देखील ‘मर्मबंधातली ठेव’ बनले आहे.

या रामकथेमधून मानवी प्रवृत्तीच्या विविध भावनांचे दर्शन होते. त्यामुळेच रामायणाच्या गीतांमधून सर्व रसांचा अनुभव आपल्याला येतो. रौद्र, कारुण्य, वात्सल्य, शौर्य, आनंद, असहाय्यता, त्वेष अशा सर्व भावनांचा यातून मिळणारा अनुभव थेट काळजाला भिडतो. या गीतांसाठी अतिशय चपखल अशी भावप्रधान, रसप्रधान  शब्दयोजना आणि गायकी वापरली गेल्याने या गीतातील भावनेशी आपण सहज एकरूप होतो.मनाला  भावविभोर करणारे संगीत आणि भक्तीच्या ओलाव्याने चिंब भिजलेले शब्दसामर्थ्य यांच्या मिलाफाने जनमानस अक्षरश: नादावून गेले.   

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणजे आदर्शांची परिपूर्ती. रामकथेच्या अनेक घटनांनी उत्तम आदर्श प्रस्थापित केले आहेत. मनुष्याला दुराचारापासून परावृत्त करणे आणि पुढे दुराचाराविरुद्ध उभे करणे ही रामायणाची प्रेरणा आणि चिंतन आहे. गीतरामायणाचे मोठेपण हे आहे की, या प्रेरणेचे आणि चिंतनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे.

मनुष्य हा परमेश्‍वराचा अंश आहे म्हणजे, मुख्य ज्योतीने चेतविलेली एक छोटी ज्योत आहे. त्याने परमेश्वरी शक्तीचे आरतीरूप गुणगान केले, तसे होण्याचा प्रयत्न केला तर ‘नराचा नारायण होणे’ अवघड नाही. हे सर्व सार गदिमा सहज एका ओळीच सांगून जातात ज्योतीने तेजाची आरती.

कमीत कमी शब्दात गहन अर्थ भरण्याची गदिमांची हातोटी विलक्षण अशीच आहे.

कित्येक गीतांच्या ओळी या सुभाषितवजाच आहेत. ‘

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ‘ 

हे  गीत याचा आदर्श नमुना आहे. श्रीरामांनी या गीतातून जीवनाचे सार आणि चिरंतन तत्वज्ञान साऱ्या मानवजातीसाठी सांगितलेले आहे. गदिमांच्या प्रतिभा संपन्नतेचा हा आविष्कार आपल्याला थक्क करणारा असाच आहे.

असे हे गीतरामायण गदिमा आणि सुधीर फडके यांच्या गीत आणि संगीत क्षेत्रातला शिरपेचच आहे. महाराष्ट्राला तर त्याने वेड लावलेच.पण त्याचबरोबरीने हिंदी, गुजराथी, कानडी, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोकणीतही त्याचे भाषांतर झालेले आहे.  मूळ अर्थामध्ये किंचितही फरक नाही. विशेष म्हणजे सर्वत्र बाबूजींच्या चालीत ते गायले जाते.

सर्व मानवी मूल्यांचा आदर्श असणारा ‘श्रीराम’ जनमानसाच्या गाभाऱ्यात अढळपदी विराजमान आहे. ही गीते आकाशवाणीवरून सादर होत असताना लोक रेडिओला हार घालून धूपदीप लावून अत्यंत श्रद्धाभावाने गीत ऐकत असत. असाच अनुभव दूरदर्शन वरून ‘रामायण’ सादर होतानाही आला. आत्ताच्या लॉक-डाऊनच्या काळात पुन्हा ‘रामायण’ प्रक्षेपित केले गेले तेव्हाही नव्या पिढीने अतिशय आस्थेने त्याला प्रतिसाद दिला. नवीन कलाकार अतिशय श्रद्धेने गीतरामायण सादर करतात आणि जागोजागी या कार्यक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून जनमानसावर रामकथेची मोहिनी अजूनही तशीच आहे याचे प्रत्यंतर येते. रामकथा ऐकल्यावर मन अननुभूत अशा तृप्तीने, समाधानाने भरून जाते. ” अवघ्या आशा श्रीरामार्पण ” याची अनुभूती येते.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दैवजात दुःखे भरता…. ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ दैवजात दुःखे भरता ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

Best Bhojpuri Video Song - Residence wप्रख्यात कवी, पटकथा, संवाद व लेखक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते सर्वांचे लाडके ग.दि.मा.. गजानन दिगंबर माडगूळकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये शेटफळ येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे बालपण अतिशय गरीब व प्रतिकूल परिस्थितीत गेले. वयाच्या सोळाव्या, सतराव्या वर्षी त्यांनी मराठी साहित्यीक क्षेत्रात प्रवेश केला आणि बघता बघता सम्राट पद प्राप्त केले. कथाकार, पटकथाकार, संवाद लेखन, गीतकार अभिनेता, निर्माता या सर्वच क्षेत्रात  त्यांचा वावर होता. त्यांनी 157 पटकथा लिहिल्या आणि 2000 पेक्षा जास्त गाणी लिहिली.

माडगूळ येथे बामणाचा पत्रा तेथे त्यांनी बरेच लेखन केले. त्यांच्या जोगिया, मंतरलेले दिवस ,चैत्रवन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.

1969 मध्ये “पद्मश्री”किताब देऊन त्यांना गौरविले गेले. 1971 मध्ये यवतमाळ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषवले.

त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले असले तरी ते कवी च होते., त्यांना शब्दाची अडचण भासली नाही. त्यांच्या काव्य रचनेला दाद मिळाली. पण गीत रामायण या  काव्याने किर्तीचा कळस गाठला आणि “आधुनिक वाल्मिकी”म्हणून त्यांचीनवीन ओळख झाली. वाल्मीकि रामायणात  वाल्मिकींनी 28000 श्लोकात राम कथा लिहिली. याच श्लोकावरून माडगूळकरांनी राम कथा ५६  गीतात शब्दबद्ध केली. गीत रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच कवीने वर्षभर रचले ,एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केले आणि हाच गीत रामायण  कार्यक्रम पुणे आकाशवाणी  केंद्रावर वर्षभर चालला. गीत रामायणातील बरीच गीते ८-१०-१२-१४-१६ कडव्यांची आहेत. सर्वच गाणी सुंदर आहेत पण”पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा”हे गीत मला  विशेष आवडते. ह्या गीतात अयोध्येत परत येण्यासाठी आग्रह करणाऱ्या भरताचे राम सांत्वन करतात व त्याला जीवनाचे सत्य उलगडून सांगतात. थोडक्यात मानवी जीवनाचे सार  या गीतात सांगितले आहे.

दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी नव्हे दोषी तात

राज्यत्याग कानन यात्रा सर्व कर्मजात

खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःखेयेतात, बऱ्याच वेळा मुलाला आपल्या मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नाही तेव्हा त्यात आई-वडिलांचा दोष असतो असे नाही.  प्रत्येकाच्या नशिबात जे घडणार असते तसेच घडते .आपल्यावर  अन्याय झाला तरी मर्यादा न सोडता संयमाने वागले पाहिजे ही शिकवण मिळते.

जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात?

प्रत्येकाला बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था येणार आणि शेवटी मरण हे अटळ आहे., जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कोणाची सुटका होत नाही. त्यासाठी दुःख करण्यात काहीच अर्थ नाही. आलेल्या परिस्थितीत हतबल न होता धैर्याने सामोरे गेले पाहिजे.

दोन ओंडकयांची होते सागरात भेट

एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही भेट

क्षणिक तोचि आहे बाळा  मेळ माणसाचा

सागरात दोन ओंडकयांची भेट होते पण पाण्याच्या प्रवाहाने त्यांच्या दिशा बदलू शकतात. आजच्या जीवनात असेच घडत असते ना! मनुष्य आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कधी आयुष्याच्या एखाद्या टप्प्यात काही लोकं भेटतात, काही दिवस, काही वर्ष आपल्या सहवासात राहतात पण काही कारणाने दुरावतात, दूर जातात ,भूतकाळात जातात माणसं मौल्यवान असतात जोपर्यंत ती सहवासात आहेत तोपर्यंत त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, त्यांना फोन करा, त्यांना भेटा.

नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ

पितृवचन पाळून दोघे होऊ दे कृतार्थ

माणसाने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे त्याची पूर्तता करून आयुष्य जगले पाहिजे.

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आण्णांची सुंदर बालकविता ☆ श्री सुभाष कवडे

?  विविधा ?

☆ आण्णांची सुंदर बालकविता ☆ श्री सुभाष कवडे

Best Bhojpuri Video Song - Residence wमराठी वाङ्मयात आपल्या अभिजात काव्य प्रतिभेने स्वत:ची ‘सुवर्णमुद्रा’ निर्माण करणारे, माणदेशाचे ‘सुवर्णरत्न’ म्हणजे, स्व.ग.दि.माडगूळकर(आण्णा) होत. आण्णा म्हणजे दुष्काळाने होरपळणाऱ्या माणदेशाची श्रीमंती होय. बहुमुखी प्रतिभेच्या आण्णांचा जन्म माणदेशातील आटपाडी तालुक्यातील ‘शेटफळे’ या छोट्या खेड्यात झाला आहे. माडगुळे आणि शेटफळे ही दोन छोटी गावे मराठी माणसाच्या मनामनात कुतूहलाचा आणि आदराचा विषय बनली आहेत. ते गदिमा आण्णांच्या आणि व्यंकटेश माडगूळकर तात्यांमुळेच. गदिमा, तात्या आणि शंकरराव खरात यांच्यामुळे माणदेशी माती धान्य झाली आहे .

    आण्णांवर काव्यलेखनाचे संस्कार अगदी लहानपणापासून त्यांच्या मातोश्रीकडून झाले आहेत. ओव्या,भजने,लोकगीते,पोवाडे,भारुडे आदी प्रकारच्या लोकगीतांचा खजिना त्यांना माणदेशातूनच विपुल प्रमाणात ऐकावयास मिळाला. ज्या मातीतून गदिमा जन्मले त्या मातीचे संस्कार घेऊनच ते मोठे झाले. लिहिते झाले. कोणताही कलावंत आपल्या मातीचे संस्कार घेऊनच मोठा होत असतो. आण्णांची लेखणी निर्मळ झऱ्याप्रमाणे होती. मनाला दिलासा देणारी होती. समाजमनावर संस्कार आणि मूल्यांची पेरणी करणारी होती. आण्णांच्या मनात माणदेशातील भोळ्याभाबड्या वारकऱ्यांबद्दल अपार श्रद्धा होती. म्हणूनच आण्णा संत कवी वाटतात. जगण्याचे तत्त्वज्ञान साध्या-सोप्या भाषेत सांगणारे तत्त्वचिंतक वाटतात. अत्यंत साधे-सोपे शब्द, सरलता, प्रासाद, अर्थपूर्णता ही आण्णांच्या लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आण्णांची कविता मातीत राबणाऱ्या अशिक्षित बळीराजालासुद्धा भावते. अण्णांची कविता म्हणजे, मानदेशी मातीचे ‘अक्षरलेणे’ आहे. आण्णांना आपल्या काव्यलेखनाचा अभिमान होता. पण गर्व मुळीच नव्हता. फुटपाथवर झोपलेल्या,उदबत्त्या विकलेले, शिकवण्या केलेले,आडत्याच्या दुकानात कामावर राहिलेले आण्णा आपल्या अलौकिक प्रतिभेने रसिकांच्या हृदयसिंहासनावर आज आरूढ झाले आहेत. महाराष्ट्राला पसा-पसा भरून ‘शब्दधन’ दिले आहे. व्यक्तीचित्रे, कथा, कादंबऱ्या, नाटके, पटकथा आणि हजारो गाणी लिहिणारे आण्णा उत्कृष्ट अभिनेते होते. अण्णांनी गाण्यांमध्ये विविध प्रकार हाताळले आहेत.   अभंग,कविता,भावगीते,भक्तिगीते, पोवाडे,लावण्या,गवळणी,स्फूर्तीगीते, अंगाईगीते असे विविध प्रकार हाताळले आहेत.याबरोबरीने गदिमांनी सर्वांगसुंदर अशी बालगीतेसुद्धा लिहिली आहेत. चांदण्यात चुळभरा, तळ्याकाठचे नंदी, चक्रपाणी,पोपटाची गोष्ट अशा काही सुंदर संस्कारक्षम बालकथा लिहल्या आहेत. आण्णांची ‘बालगीते’ म्हणजे आण्णानी ‘मूल’ होऊन लिहिलेल्या कविता आहेत. अतिशय निष्पाप मनाने आण्णांनी लेखणी लिहिती केली आहे. चिमुकल्यांचा भाबडेपणा, निष्पापपणा, भावविश्व सारं काही बाळाचं आहे. मुलांचं म्हणून एक जग असतं आणि या बाळजगताचा अभ्यास करुन बालकविता लिहिल्या आहेत.

‘बिनभिंतीची शाळा’ नावाची आण्णांची सुंदर कविता आहे. चार भिंतीतल्या शिक्षणाइतकेच निसर्गाचे शिक्षणही मुलांना आवश्यक आहे. हे निसर्गशिक्षण शिकवणारी ही कविता आहे. निसर्गातील प्राणी, पक्षी, फुलपाखरे,तारे,वारे,चांदण्या, प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवीत असतात म्हणून हे सारे आपले गुरू आहेत. असा उदात्त विचार मांडणारी ही कविता आहे.

बिनभिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू 

झाडे वेली पशू-पाखरे 

यांशी गोष्टी करू…..

या ओळी मुलांना शाळेबाहेरच्या ज्ञान देणाऱ्या या गुरूंचा परिचय करून देणाऱ्या आहेत. ‘कुरूप बदक’ अशीच एक आण्णांची सुंदर कविता आहे. एकटेपणाची जाणीव होता-होता जीवनाचे वास्तव समजल्यावर स्वतःचे अस्तित्व गळून जाते. यासाठी स्वपरिचय महत्त्वाचा आहे. असे मूल्य सांगणारी ही कविता मनाला चटका लावून जाते. आभाळ, सूर्य,चंद्र, चांदण्या याबद्दल मुलांना सदैव कुतूहल आणि आकर्षण वाटत आले आहे. या घरात जाण्यासाठी निळी वाट आहे, असं सांगणारी अण्णांची ‘देवाचे घर’ नावाची एक सुंदर बालकविता…. बाळाबरोबर मोठ्यांनाही आनंद देणारी आहे. या कवितेत लिहितात. याबरोबरीने गदिमांनी सर्वांगसुंदर अशी बालगीतेसुद्धा लिहिली आहेत.चांदण्यात चुळभरा, तळ्याकाठचे नंदी, चक्रपाणी,पोपटाची गोष्ट अशा काही सुंदर संस्कारक्षम बालकथा लिहल्या आहेत. आण्णांची बालगीते म्हणजे आण्णानी मूल होऊन लिहिलेल्या कविता आहेत अतिशय निष्पाप मनाने आण्णांनी लेखणी लिहिती केली आहे. चिमुकल्यांचा भाबडेपणा निष्पापपणा भावविश्व सारं काही बाळाचं आहे. मुलांचं म्हणून एक जग असतं आणि या बाळजगताचा अभ्यास करुन बाल कविता लिहिल्या आहेत. 

बिनभिंतीची शाळा नावाची आण्णांची सुंदर कविता आहे.चार भिंतीतल्या शिक्षणाइतकेच निसर्गाचे शिक्षणही मुलांना आवश्यक आहे.हे निसर्ग शिक्षण शिकवणारी ही कविता आहे निसर्गातील प्राणी,पक्षी,फुलपाखरे,तारे,वारे,चंद्र, चांदण्या,प्रत्येकजण आपल्याला काहीतरी शिकवीत असतात.म्हणून हे सारे आपले गुरू आहेत. असा उदात्त विचार मांडणारी ही कविता आहे.

बिन-भिंतीची उघडी शाळा 

लाखो इथले गुरू 

झाडे वेली पशु पाखरे 

यांशी मैत्री करू…

 अण्णांची ‘देवाचे घर’ नावाची एक सुंदर बालकविता बाळाबरोबर मोठ्यांनाही आनंद देणारी आहे. या कवितेत लिहितात .

निळी निळी वाट

 निळे निळे घाट 

निळ्या निळ्या पाण्याचे 

झुळझुळ पाट…..

 ‘लयबद्धता’ आणि ‘देखणी शब्दकळा’ यामुळे सारेजण ही कविता गुणगुणत राहतात. आणखी एक सुंदर बालकविता म्हणजे……

‘नाच रे मोरा’. पावसाळी वातावरण जिवंत करणारी, सातरंगी इंद्रधनुष्याच्या कमानीखाली मोराने नाचणे…. ही कल्पनाच आपल्या मनात मोरपंखी सातरंगी इंद्रधनुष्य निर्माण करणारी आहे.

पावसाची रिमझिम थांबली रे..

तुझी माझी जोडी जमली रे..

आकाशात छान-छान

सातरंगी कमान 

कमानीखाली त्या नाच,

नाच रे मोरा, आंब्याच्या बनात,

नाच रे मोरा नाच…..

‘गोरी गोरी पान’ हे गीत असेच फुलासारखे छान आहे. ‘चांदोबाची गाडी,’ गाडीला जुंपलेली  हरणाची जोडी, ही कल्पनाच किती मजेशीर व अफलातून आहे  आण्णा शब्दप्रभू होते. अलौकिक प्रतिभेचे वरदान लाभलेले महाकवी होते. त्यांची साक्ष ही कविता देते. मुलांसाठी सोपे लिहिणं अवघड असतं पण ते लिहीत होते.

 वहिनीला आणायला चांदोबाची गाडी

 चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी

 हरणाची जोडी तुडवी गुलाबाचे रान 

 दादा मला एक वहिनी आण…..

बालसुलभ कल्पना असावी तर अशी. हे फक्त गदिमांना शक्य झाले आहे. फुगडी खेळू गं फिरकीची,बकुळीचं झाड झरलं गं, अशांसारख्या अनेक गीतांचा उल्लेख करता येईल. ‘निज माझ्या पाडसा’ हे गदिमांनी लिहलेल प्रसिद्ध अंगाईगीत आहे. उत्तम निसर्गचित्रण या अंगाईगीतांमधून अनुभवता येते.

मिटून पापण्या पहा लाडक्या, स्वप्नामधली घरे ,

निळ्या धुक्यांच्या इमारतींना बर्फाची गोपुरे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधाप्रमाणे शिरलेल्या गदिमांच्या कवितांमध्ये त्यांनी लिहिलेल्या गीतांना एक वेगळे स्थान आहे. गदिमांनी शब्दमळा फुलवला. शब्दांची श्रीमंती पेरली. पाण्याविना भगाटा सोसणाऱ्या मातीला आपल्या शब्दांनी ओलावा दिला. म्हणूनच त्यांच्या सर्व साहित्यकृतींना आपण सारे अभिमानाने मिरवत आहोत. आण्णांच्या हृदयात सदैव एक निष्पाप मुल वास करत होते. म्हणून आण्णांनी चिमुकल्यांसाठी त्यांचे भावविश्व समृद्ध करण्यासाठी सुंदर संस्कारक्षम बालगीते लिहिली आहेत. ही बालगीते मराठी मनाला चिरंतन , चिरकाळ आनंद देत राहतील,  यात शंकाच नाहीत.

©  श्री सुभाष कवडे

भिलवडी जि.सांगली

भ्रमण -९६६५२२१८२२

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print